स्मृती आख्यान : मेंदूसाठी ध्यानधारणा

वर्षानुवर्षं ध्यानधारणा करणाऱ्या बौद्ध भिख्खूंच्या अभ्यासातून ध्यानधारणेमुळे मेंदूवर काय परिणाम होतो या विषयावरील संशोधनास दलाई लामांच्या प्रोत्साहनामुळे सुरुवात झाली.

|| मंगला जोगळेकर

थोडा वेळ डोळे मिटून ध्यानस्थ बसलं तरी मनाला शांत वाटतं, हा सगळ्यांचाच अनुभव. नियमित व्यायामासारखीच नियमित ध्यानधारणा के ल्यानं त्याचे फायदे शरीर-मनावर होणारच. मेंदूची तरतरी टिकवून ठेवण्यासाठी ध्यानधारणेचे होणारे फायदे आता जगभर विविध अभ्यासांमधून सिद्ध झाले आहे. एकदा ‘डिमेंशिया’ झाल्यावर मेंदूची स्मरणशक्तीच्या रुळावरून घसरलेली गाडी पुन्हा जशीच्या तशी रुळावर आणणं जरी अवघड असलं, तरी असं होऊच नये म्हणून आधीपासून प्रयत्न करायला हवेत.

आध्यात्मिक उन्नतीसाठी ध्यानधारणेचं अनन्यसाधारण महत्त्व आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पाच हजार वर्षांपासून चालत आलेल्या या पद्धतीला गेल्या सुमारे पन्नास-शंभर वर्षांपासून पाश्चिमात्य जगतानंही स्वीकारलं आहे. ध्यानधारणेमुळे शरीराबरोबर मनाचं आरोग्य सुधारतं हे दिसून येत असल्यामुळे ‘मेडिटेशनचं प्रिस्क्रिप्शन’ डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणात मान्य केलं आहे. त्याचबरोबर त्याचे फायदे सिद्ध करण्यासाठी ध्यानधारणेबाबत वेगवेगळ्या बाजूंनी संशोधन चालू आहे.

‘ध्यानधारणा हा देवाच्या प्रार्थनेचा प्रकार असून तो देवाच्या जवळ जायचा मार्ग आहे. तो भाविक लोकांनी धरावा आणि अध्यात्मात प्रगती करून घ्यावी,’ असं थोडंफार ‘मेडिटेशन’बद्दल सर्वसाधारणपणे समजलं जायचं, परंतु आता जीवनातील ताण कमी करायचा असेल तर ध्यानधारणेशिवाय तरणोपाय नाही, असा समज वाढीस लागलेला दिसतो. ध्यानधारणा करण्याच्या निरनिराळ्या पद्धती आहेत. ओंकाराच्या किंवा जपाच्या ध्वनीवर मन एकाग्र करून, श्वासावर लक्ष केंद्रित करत शरीराचा प्रत्येक स्नायू शिथिल करून किंवा विशिष्ट चित्रावर मन स्थिर करून वगैरे. ध्यानधारणा कुठल्याही पद्धतीनं के ली, तरी मनातील विचारांची मालिका थांबवणं, विचारांमध्ये न गुंतता त्यांचं बाहेर राहून निरीक्षण करणं, मनाला शांत करण्याचं तंत्र शिकत शिकत त्याला वरच्या पातळीवर नेणं हा ध्यानधारणेचा गाभा आहे. मुख्य म्हणजे मनाला शिस्त लावून, विचारांची साखळी थांबवून, मनाला शांत करण्याचं हे तंत्र प्रयत्नानं कुणालाही विकसित करता येतं असं मानलं जातं. जेव्हा मन विचारांवर उड्या मारणं कमी करतं, उद्या घडणाऱ्या, काल घडून गेलेल्या गोष्टींच्या विचारात गुंतण्यात काही अर्थ नाही असं जेव्हा पटतं, तेव्हा मनाची चलबिचल कमी होऊन मनाला स्थिरता येते. मनाविरुद्ध घडणाऱ्या छोट्यामोठ्या गोष्टींचा डोक्याला त्रास कमी होताना दिसतो. भावनांवर नियंत्रण करणं शक्य होतं. कुठल्याही प्रसंगाला धीरानं तोंड देण्यासाठी मानसिक बळ मिळतं. नकारार्थी गोष्टींचा मनावर परिणाम कमी होतो. आयुष्याकडे आशेनं बघितलं जातं. उत्साह द्विगुणित होतो, आनंद वाढतो. दयाळूपणा, प्रेमळपणा, अशा चांगल्या भावना मनावर राज्य करूलागतात. मेंदूमध्ये ज्या ठिकाणी राग आणि भीती या भावनांचा उगम होतो, तो भाग शांत होताना दिसतो. त्यामुळे मनाला, मेंदूला आवश्यक तो आराम मिळतो आणि मेंदूची एकंदर विचार करण्याची क्षमता वाढून हातातल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचं तंत्र जमू लागतं.

ध्यानधारणेच्या या फायद्यांचा परिणाम शरीरावरदेखील दिसू लागतो. उच्च रक्तदाब कमी होणं, नाडीचा वेग कमी होणं, झोप चांगली लागणं, रोगप्रतिकारकशक्ती वाढणं आदी अनेक फायदे ध्यानधारणेमधून होतात असं दिसून येत आहे.  नियमित ध्यानधारणा व आरोग्यदायी जीवनशैलीमुळे इन्सुलिनच्या पातळीत वाढ होऊन साखरेचं प्रमाण कमी होतं असंही दिसून येत आहे. ध्यानधारणेचा फायदा मेंदूला होऊ शकतो, हे दाखवणारे अनेक अभ्यास झाले आहेत आणि होत आहेत. या अभ्यासांची सुरुवात झाली ती मोठ्या आजारांत, विशेषत: ‘क्रॉनिक’ (दीर्घकालीन) आजारपणात ध्यानधारणेमुळे फायदा होऊ शकेल का, हे तपासण्यातून. या क्षेत्रातल्या पहिल्या अभ्यासाद्वारे सोरायसिसच्या रुग्णांना ध्यानधारणेची टेप ऐकत ऐकत ‘अल्ट्राव्हायोलेट’ दिव्याखाली घेतलेल्या उपचारांचा अधिक जलद फायदा होतो असं दिसून आलं. केमोथेरपी घेतल्यानंतर होणारा त्रास ध्यानधारणेमुळे कमी होतो असं दिसून आलं. ज्या दुखण्यांमध्ये असहनीय वेदना होतात, त्या रुग्णांना ध्यानधारणेमुळे आराम पडतो, असं दिसून आलं. अगदी हृदय प्रत्यारोपणाच्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेआधी ध्यानधारणा करून शरीर शिथिल केल्यामुळे नवीन हृदयाचा स्वीकार करणं शरीराला सोपं पडतं, वेदना कमी होतात, औषधं कमी घ्यायला लागतात, एवढंच नाही तर आजारातून माणूस लवकर उठतो, असा डॉ. मेहमेत ऑझ या अमेरिकेतील प्रख्यात हार्ट सर्जनचा अनुभव आहे. 

 वर्षानुवर्षं ध्यानधारणा करणाऱ्या बौद्ध भिख्खूंच्या अभ्यासातून ध्यानधारणेमुळे मेंदूवर काय परिणाम होतो या विषयावरील संशोधनास दलाई लामांच्या प्रोत्साहनामुळे सुरुवात झाली. विस्कॉनसिन विद्यापीठातील डॉ. रिचर्ड डेव्हिडसन यांनी १९९२ पासून अशा अभ्यासांना वाहून घेतलं आहे. ‘एफ.एम.आर.आय.’ तंत्रज्ञानाच्या विकासामुळेही मेंदूचा अभ्यास करणं सोपं होऊ लागलं आहे. ध्यानधारणा करताना मेंदूच्या आत काय घडतं ते या तंत्रानं बघणं शक्य होतं. संशोधनातील या तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे मेंदूमधील निरनिराळ्या भावनांचं उगमस्थान समजत आहे. ध्यानधारणा करताना मेंदूतील ज्या भागामुळे आपल्याला एकाग्रचित्तता साधता येते, ज्यामुळे हृदयाचे ठोके, रक्तदाब वगैरे महत्त्वाच्या गोष्टींवर नियंत्रण ठेवलं जातं, त्या भागात काम चालू आहे असं दिसून येतं.

 ध्यानधारणेचा मेंदूच्या रचनेवर, कार्यपद्धतीवर उल्लेखनीय परिणाम होतो, असं आत्तापर्यंतच्या अनेक अभ्यासांनी दाखवून दिलं आहे. त्यातले बरेचसे अभ्यास ‘हार्वर्ड’, ‘य़ेल’, ‘एम.आय.टी.’ (मॅसॅच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) या अमेरिकेतील मान्यवर संस्थांमध्ये केले गेले आहेत. मेंदूच्या लवचीकतेबद्दल आपण आधी माहिती घेतली होती. नवीन शिकण्यातून जसे मेंदूमध्ये बदल घडलेले दिसतात, तसेच ध्यानधारणेमुळेही मेंदूमध्ये बदल घडवून आणणे शक्य आहे, असे कित्येक अभ्यासांमधून दिसून येत आहे. ध्यानधारणेमुळे मेंदूच्या आवरणाची (कॉर्टेक्स) जाडी वाढल्याचं, मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांची रुंदी वाढल्याचं, त्याचबरोबर मेंदूचा रक्तपुरवठा सुधारला असल्याचं दिसून आलं. याशिवाय पंचेंद्रियांकडून येणारी माहिती ग्रहण करणारा भाग अधिक कार्यक्षम झालेला दिसला.

ध्यानधारणेतून आपल्या मनातील नकारार्थी विचार झटकू न प्रेम, दया, क्षमा, शांती अशा उदात्त विचारांची आस धरल्यामुळे आपला स्वभाव बदलता येतो, असं तासन्तास सलग ध्यानधारणा करणाऱ्या बौद्ध भिख्खूंचं म्हणणं आहे. ध्यानधारणेचा अनुभव जितका जास्त, जितकी नियमित ध्यानधारणा असेल, तितके हे फायदे जास्त दिसणार हे वेगळं सांगायला नकोच, परंतु नव्यानं ध्यानधारणा शिकणाऱ्यांनासुद्धा पहिल्या महिनाभरातच त्याचा फायदा होताना दिसतो आहे. शांत मनानं परीक्षेला गेल्यास केलेला अभ्यास नीट आठवतो, हा प्रत्येकाचाच अनुभव असल्यानं ध्यानधारणेचा फायदा स्मरणशक्तीला होत असणार हे तर खरंच. अमेरिकेतील अ‍ॅरिझोना येथील ‘अल्झायमर्स रीसर्च अँन्ड प्रीव्हेन्शन फाऊंडेशन’ या संस्थेच्या वतीनं

डॉ. धर्मसिंग खालसा यांनी विसरभोळेपणाच्या तक्रारी असणाऱ्या ५२ ते ७० वयोगटातील लोकांना कीर्तन क्रिया (जप आणि हस्तमुद्रा) हा ध्यानधारणेचा प्रकार शिकवला. तो नियमित आठ आठवडे रोज बारा मिनिटं केल्यावर मेंदूतील शिकण्याचं आणि स्मरणशक्तीचं अधिष्ठान असलेल्या((Posterior Cingulate Gyrate) भागाचा रक्तपुरवठा सुधारलेला दिसला. वयानुसार मेंदूत होणारे बदल कमी प्रमाणात होतात, असंही संशोधकांना आढळून येत आहे; परंतु अजूनही ‘डिमेंशिया’ झालेल्यांच्या मेंदूची गमावलेली शक्ती ध्यानातून परत येते असं दिसलेलं नाही.

‘माइंडफुलनेस मेडिटेशन’

हल्ली ‘माइंडफुलनेस मेडिटेशन’बद्दल खूप ऐकू येतं. याबरोबर जोडलेलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे डॉ. जॉन कॅबट-झिन. १९६५ पासून त्यांचा ‘मेडिटेशन’ विषयाशी संबंध आला. त्यांनी १९७९ मध्ये मॅसॅच्युसेटस् विद्यापीठात ‘स्ट्रेस रीडक्शन क्लिनिक’ची सुरुवात केली. त्यामध्ये पाठीच्या विकारांचे रुग्ण, औद्योगिक अपघात झालेले,

कर्क रुग्ण, पॅरॅप्लेजिक अशा विविध रुग्णांना ध्यानधारणा शिकवायला सुरुवात केली. आपल्या जीवनातील परिस्थिती योग्य की अयोग्य, ती आपल्याच वाट्याला का आली? याचा सतत विचार न करता आपल्या हातात असलेल्या क्षणाला साद घालत तो स्वीकारत जगणं, म्हणजे ‘माइंडफुलनेस मेडिटेशन’, असं ते म्हणतात. हे साधता साधता आपल्या चांगल्या, वाईट भावनांकडे लांबून बघितलं जातं. जणू काही या भावना म्हणजे मीच का? असा प्रश्न विचारला जातो. त्यातून दु:ख, वेदना या भावना म्हणजे मी नाही, असा विचार रुग्णांमध्ये जागृत होतो, असं त्यांना दिसून आलं. त्यातून काही रुग्णांनी वेदनेशी वेगळंच नातं जोडलं, तर काही जण वेदनेतून बाहेर पडले. एकदा मनाचं आवर्तन थांबलं, की मग आपल्याला मिळालेलं जीवन आनंदानं स्वीकारणं आणि ते फुलवणं सहजसोपं होतं, असं दिसून आलं. या अनुभवावर आधारित ‘फुल कॅटॅस्ट्रॉफी लिव्हिंग’ हे पुस्तक तीस वर्षांपूर्वी त्यांनी लिहिलं, ते खूप नावाजलं गेलं. ध्यानधारणा म्हणजे प्रेम आणि पवित्रता या भावना निर्माण करणारं आयुध आहे, असं ते म्हणतात. एकदा या भावना आपल्यामध्ये खोलवर पाझरल्या, की आयुष्यात कुठलेच प्रसंग संकट होऊन येत नाहीत. या विषयावर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्यांच्या ध्यानधारणेच्या अभ्यासक्रमाचं  जाळं बहुतेक देशांत पसरलं आहे. ‘माइंडफुलनेस स्ट्रेस रीडक्शन’, ‘माइंडफुलनेस सी.बी.टी. (कॉग्निटिव्ह बीहेव्हिअरल थेरपी) ट्रेनिंग’ असे प्रशिक्षण कार्यक्रम त्यातून चालू झाले. शाळेतील मुलांपासून विविध गटांना ताण, चिंता, वेदना यापासून मुक्ती देणं हा त्यांचा हेतू आहे. ‘माइंडफुलनेस’चा वापर मोठ्या प्रमाणात व्हावा आणि देशांमधील सरकारांच्या धोरणांची दिशा बदलावी, असंही त्यांना वाटतं. आज आपल्याकडेही असे अभ्यासक्रम ठिकठिकाणी चालू झाले आहेत. ज्यांना पूर्वापार पद्धतीनुसार ध्यानधारणा शिकायची आहे, त्यांनाही मार्गदर्शन मिळू शकतं.

आतापर्यंतच्या अभ्यासांच्या सांगण्याप्रमाणे जीवनातील ताणाच्या नियंत्रणासाठी, शरीराचं आरोग्य राखण्यासाठी, मेंदूचं तेज टिकवण्यासाठी, शांततेच्या राजमार्गाकडे वळण्यासाठी ध्यानधारणा रोजच्या जीवनाचा भाग व्हायला हवी याबाबत दुमत नसावं.

 रोज ध्यानधारणेची सवय लावल्यामुळे मेंदू जर झळाळून निघणार असेल, तर त्याला तशी संधी अवश्य द्यायला हवी.

mangal.joglekar@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Smruti akhyan author mangala joglekar article meditation for the brain akp

Next Story
लढा दुहेरी हवा!
ताज्या बातम्या