मंगला जोगळेकरmangal.joglekar@gmail.com

मेंदूच्या विविध आजारांमुळे निर्माण होणाऱ्या लक्षणांना डिमेंशिया म्हणतात. विस्मरण हा त्याचा प्रमुख भाग आहे, पण मेंदूच्या एकू णच कार्यावर परिणाम होत गेल्यामुळे विस्मरणाबरोबर इतरही अनेक प्रश्न डिमेंशियात दिसून येतात.    

Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?

‘डिमेंशिया’ची व्याख्या करणं खरं तर अवघड आहे. हा आजार फार गुंतागुंतीचा आहे. सोप्या शब्दांत सांगायचं, तर  डिमेंशिया हे एका विशिष्ट आजाराचं नाव नसून ज्या वेगवेगळ्या आजारांमुळे किंवा व्याधींमुळे मेंदूच्या कार्यावर सावट येत राहतं (स्मरण राखणं हा मेंदूच्या कामाचा फक्त एक भाग आहे.), अशा आजारांच्या लक्षणांना आणि त्याच्या परिणामांना एकत्रितपणे डिमेंशिया असं संबोधतात. डिमेंशियाचा आजार होण्याची भरपूर (शंभरापेक्षा जास्त) कारणं आहेत असं सांगितलं जातं. परंतु आपण हा आजार विविध कारणांमुळे होतो एवढंच लक्षात ठेवूया.

 ‘अल्झायमर्स’ आणि ‘डिमेंशिया’यांमध्ये काय फरक आहे, हा प्रश्न नेहमी विचारला जातो. ज्या विविध कारणांमुळे डिमेंशिया होतो, त्यांपैकी अल्झायमर्स हा एक आजार आहे. इतर आजार आहेत- व्हॅस्क्युलर डिमेंशिया, लुवी बॉडी डिमेंशिया, फ्रंटो टेम्पोरल डिमेंशिया, पार्किन्सन्स, हंटिंग्टन्स, इत्यादी. अल्झायमर्स हे डिमेंशिया होण्याचं प्रमुख कारण आहे. पन्नास ते सत्तर टक्के व्यक्तींना डिमेंशिया होण्याचं कारण असतं अल्झायमर्स. त्यामुळे डिमेंशिया आणि अल्झायमर्स हे समानार्थी शब्द म्हणून वापरण्यात येतात आणि त्यात गल्लत होते. अल्झायमर्समुळे होणाऱ्या डिमेंशियाचं प्रमाण जास्त असल्यानं संशोधनाचा भर साहजिक अल्झायमर्सवर आहे.

शास्त्रज्ञांना बुचकळ्यात पाडणाऱ्या दोन विचित्र रचना अल्झायमर्स झालेल्या व्याधीग्रस्त पेशींमध्ये दिसून येतात. चिकट पदार्थाच्या छोटय़ा गुठळ्या आणि गुंता (‘प्लॅक’ आणि ‘टँगल्स’) असं त्याचं वर्णन करता येईल. ही विचित्र रचना होण्यामागे असतात दोन प्रकारची प्रथिनं-‘बीटा अमिलॉइड’ आणि ‘टाऊ’. आपला स्वभाव किंवा गुणधर्म आणि काम सोडून ही प्रथिनं पेशींच्या आजूबाजूला आणि आत जमू लागतात. खरं तर बीटा अमिलॉइडची नव्या पेशींच्या उत्पादनात, तसंच पेशीच्या बाह्य़ आवरणाची दुरुस्ती करण्यासाठी मदत होते. परंतु का कोणास ठाऊक, हे बीटा अमिलॉइड अधिक प्रमाणात बनवलं जातं आणि पेशींच्या अवतीभवती जमू लागतं. त्यामुळे त्याची उपयुक्तता संपून उपद्रव मात्र वाढतो. टाऊ प्रथिन पेशींमधील आवश्यक पदार्थाची वाहतूक करणाऱ्या भागाची (मायक्रोटुब्युल्स) काळजी घेत असतं. स्वयंपाक करताना एखादा पदार्थ बिघडतो, तसं अल्झायमर्स झालेल्या व्यक्तींमध्ये चुकीचं ‘टाऊ’ तयार होतं आणि त्याचे कण एकमेकांना पेशींच्या आत चिकटून बसतात. ‘टाऊ’ला नेमून दिलेल्या मायक्रोटय़ुबुल्सच्या आरोग्याकडे बघण्याचं काम कोलमडल्यामुळे तो भाग जणू काही विरघळू लागतो. अन्नपदार्थाची वाहतूक थांबते. पेशींच्या बाहेर जमलेलं बीटा अमिलॉईड आणि आत साठलेलं टाऊ प्रथिन यांच्या गाठी आणि गुंत्यामुळे पेशींना ठरवून दिलेली कामं करणं अशक्य होतं. आजाराची वाढ झाल्यावर पेशी प्रचंड संख्येनं नष्ट होतात आणि मग फक्त प्लॅक आणि टँगल्स शिल्लक राहतात.

मेंदूच्या मध्यभागी ‘हिप्पोकँपस’ हा महत्त्वाचा भाग असतो. कुठल्याही नवीन माहितीचा तुकडा प्रथम इथे येतो, मग तो मेंदूत इतरत्र पाठवला जातो. अल्झायमर्सच्या सुरुवातीच्या स्थितीत या भागातील पेशी आजारानं ग्रस्त झाल्यामुळे त्यांच्या कामावर परिणाम होतो. नवीन माहिती ग्रहण करण्याच्या कामात अडथळे येतात. त्यामुळे हा आजार झालेल्या व्यक्तीच्या तात्पुरत्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो. तसंच नवीन शिकणं कठीण होतं. मेंदूच्या कामात संदेशवहनाचं अपार महत्त्व आहे. मेंदूतील पेशी एकमेकांशी संदेशवहनातून बोलत असतात. हे काम मेंदूमध्ये असलेल्या रसायनांमार्फत होतं. या रसायनांना ‘न्यूरोट्रान्समीटर’ म्हणून संबोधलं जातं. विस्मृतीचे आजार झालेल्या व्यक्तींमध्ये न्यूरोट्रान्समीटर्सचं प्रमाण पुरेसं नसतं. त्यातून गाठी आणि गुंत्यामुळे पेंशीमधल्या संदेशवहन प्रक्रियेत अडथळे येतात. संदेशवहनाचा वेग मंदावतो. जसा आजार वाढत जातो, तशा विविध क्षमता गमावल्या जातात. आजाराच्या पुढील टप्प्यावर मेंदूच्या संपूर्ण कामावर त्याचा परिणाम होतो.

या सर्व बदलांमुळे अल्झायमर्स झालेल्या व्यक्तीला दैनंदिन जीवन स्वावलंबीपणे जगणं कठीण होऊन बसतं. अशा व्यक्तींच्या आवडीनिवडी बदलतात. चिडचिड वाढते. कशातही मन रमत नाही. निर्णय घेणं जमेनासं होतं. अर्थातच हे बदल रातोरात घडून येत नाहीत.

बीटा अमिलॉईड आणि टाऊ प्रथिनानं घातलेलं थैमान थांबवण्यासाठी जगभर संशोधन चाललं आहे. त्यामुळे आज हा आजार बरा कसा करावा, याबद्दल शास्त्रज्ञांना पुरेसं ज्ञान नसलं, तरी लवकरच अशी औषधं उपलब्ध होतील असा आशावाद या विषयावर काम करणाऱ्या प्रत्येक शास्त्रज्ञामध्ये आहे. 

‘व्हॅस्क्युलर डिमेंशिया’ हे डिमेंशिया होण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण. ‘स्ट्रोक’ किंवा ‘अर्धागवायू’मुळे मेंदूमधील रक्तपुरवठा खंडित होणं, नकळत होणारे छोटे छोटे स्ट्रोक, रक्तवाहिन्यांचं काम सुरळीत होत नसल्यामुळे मेंदूच्या रक्तपुरवठय़ामध्ये येणाऱ्या अडचणी, यांमुळे या प्रकारचा डिमेंशिया होतो. मेंदूच्या कुठल्या भागाला रक्तातून मिळणारे अन्नघटक आणि प्राणवायूचा पुरवठा होत नाही किंवा झालेला नाही, यावर मेंदूच्या कुठल्या क्षमतांवर परिणाम झालेला आहे हे अवलंबून असतं. गोंधळ उडणं, एकाग्रचित्ततेत कमतरता, विचारांत सुसंगती नसणं, नियोजनक्षमता आणि विचार- क्षमता मंदावणं, अशा प्रकारची लक्षणं या प्रकारच्या डिमेंशियामध्ये दिसून येतात. जीवनशैलीत बदल करून, तसंच आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असलेल्या घटकांकडे योग्य लक्ष देऊन या प्रकारच्या डिमेंशियाचं प्रमाण कमी करणं आपल्या हातात आहे.

त्यानंतर डिमेंशिया होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ‘लुवी बॉडी डिमेंशिया’. या डिमेंशियामध्ये अल्झायमर्ससारख्या गाठी-गुंत्याबरोबर एक विशिष्ट प्रकारचं प्रथिन पेशींमध्ये जमा होतं, ज्याला ‘लुवी बॉडी’ म्हणतात. विचार करणं, स्मरण आणि हालचालीवरील नियंत्रण ही कामं करणाऱ्या पेशींमध्ये लुवी बॉडी दिसायला लागतात. भास होणं, लक्ष देऊन काम न करता येणं, अशी लक्षणं या डिमेंशियामध्ये दिसतात. बऱ्याचदा ‘पार्किन्सन्स’ आजारासारखी लक्षणंही यात बघायला मिळतात- जसं स्नायू कडक होणं, चालणं मंदावणं, कंप, इत्यादी.

‘फ्रंटो टेम्पोरल डिमेंशिया’मध्ये कपाळाच्या पाठीमागचा फ्रंटल लोब आणि कानाच्या वरच्या टेम्पोरल लोबमध्ये पेशींचा मोठय़ा प्रमाणात ऱ्हास होतो. या प्रकारच्या डिमेंशियामध्ये सुरुवातीला वर्तन समस्या जाणवायला लागतात, भाषाज्ञानामध्येही त्रुटी जाणवतात. काहीही करण्यात उत्साह नसतो. सारासार विचारक्षमता कमी झालेली जाणवते. इतरांच्या भावनांचा विचार न करणं, भूक जास्त लागणं, अशीही लक्षणं दिसून येतात. डिमेंशियाचा हा प्रकार जरा लवकरच्या वयात होताना दिसतो. यातील ३० ते ४० टक्के व्यक्तींना आनुवंशिकतेमुळे आजार झाल्याची शक्यता असते. अल्झायमर्समध्ये दिसणाऱ्या टाऊ प्रथिनाच्या जोडीनं इतर प्रथिनांच्या गाठीही पेशींमध्ये दिसतात. या गाठींचा शिरकाव मेंदूसाठी पूरक कामं करणाऱ्या पेशींमध्येही झालेला दिसतो. 

सौम्य, मध्यम आणि प्रगत अशा तीन स्थितींमधून डिमेंशिया पुढे जाताना दिसतो. प्रत्येक टप्पा किती काळाचा असेल, त्यामध्ये कुठली लक्षणं दिसतील, हे नेमकेपणानं सांगणं अवघड असतं. आजाराचा सर्वसाधारण कालावधी चार ते आठ वर्षांचा असला, तरी आजारानंतर वीस वर्षांपर्यंत आयुष्यमान असू शकतं. लक्षणांमध्ये असलेल्या वैविध्यामुळे  एखादा रुग्ण अमुक टप्प्यावर आहे, असं सांगणं तितकंसं सोपं नसतं.

आजाराच्या सुरुवातीच्या स्थितीमध्ये रुग्ण स्वावलंबी असतो. जवळजवळ सगळी कामं स्वतंत्रपणानं करणं जमतं. स्वतंत्र प्रवास करणं, स्कूटर किंवा गाडी चालवणं, बँकेतील कामं, घर संभाळणं, लोकांमधली ऊठबस, सगळं व्यवस्थित होत असताना दिसतं. बाहेरच्या लोकांना अगदी काही तासांच्या सहवासातूनही या व्यक्तीला विस्मरणाचा आजार आहे याची शंका येत नाही. परंतु कुटुंबीयांना प्रश्नांची कल्पना असते. काय जमेल, काय जमणार नाही, कुठे गोंधळ उडेल, याची माहिती त्यांना असते. या स्थितीतील सर्वसाधारण प्रश्नांकडे पाहिलं, तर नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी काही प्रश्न उद्भवताना दिसतात. महत्त्वाच्या गोष्टी कुठे ठेवल्या आहेत ते स्मरत नाही, वस्तू हरवण्यात वाढ झालेली दिसते, घरातील छोटय़ा समारंभाचं आयोजन किंवा ज्यामध्ये नियोजन करावं लागतं अशा कामांची जबाबदारी पेलवत नाही. परंतु प्रश्न सांभाळून व्यक्तीच्या आरोग्याकडे लक्ष दिलं, मानसिक स्थिती सांभाळली, तर हा टप्पा विशेष प्रश्नांशिवाय जगता येणं अवघड नसतं.

मधली स्थिती हा आजाराचा सर्वात मोठा टप्पा म्हणावा लागेल. या काळात प्रश्न वाढीस लागलेले दिसतात. आजार इतरांपासून लपवता येणं हळूहळू अशक्य होतं. भाषेवरची पकड ढिली झाल्यामुळे आपल्या मनात काय चाललं आहे, काय होतं आहे, हे सांगणं जमत नाही. रुग्णाचं वागणं अनाकलनीय वाटतं. वर्तन समस्यांना तोंड देणं कुटुंबासाठी आव्हानात्मक ठरतं. स्वत:च्या आयुष्यातील घटनाक्रम आठवणं, स्वत:चा पत्ता, फोन नंबर लक्षात राहणं शक्य होईलच असं नसतं.आपल्या घराच्या जवळपासचा रस्ता, आजूबाजूच्या खुणा विसरायला होतात. त्यामुळे रस्ता चुकण्याची शक्यता वाढते. लोकांमध्ये मिसळणं नको वाटतं. आवडीच्या गोष्टींमधला रस निघून जातो. एकंदरीत इतरांच्या मदतीशिवाय आयुष्य जगणं अशक्य होत जातं. तरीही आजारी व्यक्ती काय करू शकते, ते समजून घेऊन शक्य ती कामं त्या व्यक्तीनंच करावीत, हा नियम पाळावा लागतो. आवश्यकता असेल तिथे मदत करून, कामांचं आकलन होण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करून आयुष्याची गुणवत्ता टिकवण्यासाठीचा प्रयत्न महत्त्वाचा ठरतो.

आजाराच्या प्रगत स्थितीमध्ये रुग्णाचा आपल्या भवतालाशी असलेला संबंध हळूहळू संपत येतो. आजारी व्यक्ती जणू आपल्या जगातच असते. एखाद्दुसरं वाक्य किंवा काही शब्द, एवढाच काय तो भाषेशी संबंध उरतो. हालचालींवर खूपच मर्यादा येतात. मेंदूच्या क्षमता झपाटय़ानं उतरणीला लागलेल्या दिसतात. तरी या स्थितीतही कुटुंबीयांचा प्रेमाचा स्पर्श व्यक्तीला समजतो. व्यक्तिगत कामं करणं शक्य नसल्यामुळे परावलंबी जीवन वाटय़ाला येतं. इन्फेक्शन, न्युमोनिया, अन्न गिळायला त्रास होणं, अशा प्रश्नांना सामोरं जावं लागतं. कुटुंबीयांना बाहेरच्या मदतीची आवश्यकता जाणवते. असं सगळं असलं, तरी रुग्णाची स्थिती जाणून घेऊन कु टुंबीयांनी शक्य तिथे मदतीचा हात दिला, रुग्णाची प्रेमानं काळजी घेतली, तर त्याचं आणि कु टुंबीयांचंही जीवन सुरळीत चालू राहू शकतं.

पुढच्या भागात (११ डिसेंबर) डिमेंशियाग्रस्त  व्यक्तीची काळजी कशी घ्यावी याविषयी..