सुलभा आरोसकर

दृष्टी नसली तरी स्वप्नं पाहता येतात, आणि इच्छा असेल तर त्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणता येतं, अशीच एक माणुसकीची ज्योत गेली २५ वर्षं कित्येकांची आयुष्यं उजळवून टाकत आहे. त्यातूनच अनेक दृष्टिहीन मुलं आणि दिव्यांगांच्या आयुष्यात ज्ञान, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचा प्रकाश पसरला आहे. ते पसरवणार्‍या, स्वत: दृष्टिहीन असलेल्या परिमला विष्णू भट यांच्या ‘स्नेहांकित हेल्पलाइन’ या बहुुउद्देशीय केंद्राविषयी येत्या १५ ऑक्टोबरला असलेल्या ‘जागतिक पांढरी काठी दिना’निमित्ताने…

सुलभा आरोसकर

‘स्नेहांकित हेल्पलाइन’ ही हजारो दृष्टिहीनांच्या, दिव्यांगांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरवणारी, त्यांना आत्मनिर्भर करणारी, नि:स्पृह अशी सामाजिक संस्था. जन्मत: दृष्टिहीन असलेल्या परिमला विष्णू भट यांनी २५ वर्षांपूर्वी ‘स्नेहांकित हेल्पलाइन’ची मुहूर्तमेढ रचली आणि त्यातून निर्माण झालेल्या अनेक ज्ञानशाखांनी अनेकांची आयुष्यं मार्गी लावली आहेत.

स्वत:च्या वाढदिवसाच्या दिवशी

२१ऑगस्ट २००१ रोजी परिमला यांनी लावलेलं छोटं रोप आज आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षी विविधतेने बहरलेलं आहे. ही वाटचाल फक्त दिनदर्शिकेची पानं उलटवणारी नाही; ती ध्येयाची, जिद्दीची, कर्तृत्वाची आणि ईप्सित साध्य करण्यासाठी दिवसरात्र घेतलेल्या असीम परिश्रमांची आहे. अत्यंत प्रेमळ, मृदुभाषी परिमला यांनी आपलं अंधत्व मन:पटलावरून लहानपणीच पुसून टाकलं. सामान्य मुलांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेऊन परिमलांच्या आई-वडिलांनी त्यांना जणूकाही नानाविध अडचणींच्या गुहेत नेऊन सोडलं होतं. मात्र तेथेच कष्टाची, शिस्तीची आणि अडचणींवर मात करण्याची बीजं रुजली गेली. त्यांचा शैक्षणिक काळ ४०-४२ वर्षांपूर्वीचा. त्यामुळे ज्ञानेंद्रियं, कर्मेंद्रियं यांच्या प्रगल्भतेनेच अभ्यास आणि दैनंदिन गोष्टी शिकाव्या लागत. अनेक अडचणींतून त्यांनी बी.ए., एम.एस.डब्ल्यू. असं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. ते करतानाच माझ्यासारख्या दृष्टिहीनांच्या अडचणी दूर करण्यासाठी नक्कीच ठोस पावलं उचलेन, हा निर्धार केला. ‘स्नेहांकित’ हे त्याचंच कृतिशील स्वरूप.

शैक्षणिक यशामुळे परिमला यांना ‘एअर इंडिया’मध्ये नोकरी मिळाली आणि लगेचच त्या ‘नॅब’ या दृष्टिहीनांसाठी शिक्षण, प्रशिक्षण, सक्षमीकरणासाठी काम करणार्‍या संस्थेमध्ये आपलं योगदान देण्यासाठी जाऊ लागल्या. विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून त्यांनी अनेक उपक्रमांना गती दिली. त्यांचे नेतृत्वगुण पाहून ‘नॅब’ने ‘अंध महिला विकास समिती’ आणि राष्ट्रीय स्तरावरील सचिवपदाची धुरा त्यांच्यावर सोपवली. त्यातून त्यांना मलेशिया, जर्मनी येथील जागतिक परिषदांसाठी जाण्याची संधी मिळाली. ‘स्वीडिश फेडरेशन’च्या नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी भारताचा ठसा उमटवला.

या सर्व अनुभवांच्या समृद्धीतूनच ‘स्नेहांकित’चा जन्म झाला. त्यासाठी त्यांनी ‘नॅब’च्या पदांतून मुक्तता घेतली. स्वत:च्या घरातच अजित बारटक्के या समविचारी मित्राबरोबर कार्याला सुरुवात झाली. दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक ‘बोलके पुस्तक’ हाच मोठा आधार आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. त्या काळी ध्वनिमुद्रण हे कॅसेट्सवर करावं लागे. एका पुस्तकाला ४०-५० कॅसेट्स लागत. त्या स्वयंसेवकांपर्यंत नेऊन देणं, परत आणणं अशी कामं त्या स्वत: अजितच्या मदतीने करू लागल्या. पुढे तंत्रज्ञान प्रगत झाल्यानंतर सी.डी.चा जमाना आला. तेव्हा या कॅसेट्स सी.डी.मध्ये उतरवण्याचं काम लीला जाधव यांनी केलं.

बदलत्या युगात संगणक प्रशिक्षणाची गरज ओळखून एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या सहकार्याने त्यांनी दृष्टिहीनांसाठी संगणक साक्षरता सुरू केली. त्यासाठी डॉ. वंदना चक्रवर्ती यांनी मोलाचं सहकार्य केलं. २०१५ पासून परिमलांच्या अंधेरी येथील घरातच कार्यालय दिमाखात उभं राहिलं. संस्थेने बरेच प्रकल्प हाती घेतले. डोंबिवलीतील ‘पाटकर ट्रस्ट’ यांच्या जागेत २०१५ पासून संगणक प्रशिक्षण सुरू केलं. रमण शंकर, त्यांच्या पत्नी पल्लवी आणि संपदा पळणीटकर यांनी संगणक विभागाची धुरा घेतली. ऑनलाइन आणि अंधेरी केंद्रातून ऑफलाइन असे बेसिक व प्रगत प्रशिक्षण सुरू झाले. त्यांच्या या उपक्रमाचा संपूर्ण भारतातून ३०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. समिती सदस्य आणि स्वत: दृष्टिहीन असलेले समीर लाटे २०२१ पासून मुलांना ऑनलाइन ‘टॅली’ शिकवत आहेत. दृष्टिहीनांसाठी ‘ब्रेल’ लिपी ही वाचण्याची, लिहिण्याची ताकद आहे हे लक्षात घेऊन त्यांनी ब्रेल विभाग सुरू केला. विद्यार्थ्यांना ब्रेलर उपकरणं दिली. इच्छुकांना ब्रेलमध्ये लिखाण, वाचन, प्रूफरीडिंग शिकवून पुस्तकांचं लिप्यांतर सुरू केलं. त्यासाठी २०१६ मध्ये एका दात्याने ब्रेल प्रिंटर दिला. त्यामुळे १५,००० पुस्तकं तयार झाली. संस्थेच्या ट्रस्टी साधनाताईं वझे यांनी अनेक पुस्तकं ब्रेलमध्ये आणली.

याशिवाय ही संस्था २०१६ पासून दरवर्षी निवासी शिबिरं आयोजित करते. ५० मुलांना ८ दिवस या शिबिराचा आनंद घेता येतो. यात बुद्धीला चालना आणि हाताला कौशल्य यावर भर दिला जातो. योगाभ्यास, ध्यानधारणा, झुंबा नृत्य, गतिशीलता अशा शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उपक्रमासोबतच, मातीकाम, केस धुण्याची पावडर, चटण्या, मुखवास, फेसवॉश, साबण, मेणबत्त्या तयार करण्याचं, स्वत:ची सही करायला शिकवणं असं प्रात्यक्षिक ज्ञान जाणकारांकडून दिलं जातं. शिवाय पोहणं, स्केटिंग, मल्लखांब यांचाही आनंद दिला जातो. इंग्रजी संभाषणावर भर दिला जातो. एवढा भरगच्च दिनक्रम असल्याने मुलं पुढल्या वर्षीच्या शिबिराची वाटच पाहत असतात. या वर्षीही आसनगावला १५ ते ३० ऑक्टोबरदरम्यान निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं असून इच्छुकांना त्यात सहभागी होता येईल.

दृष्टिहीन मुलांसाठी ‘होम मॅनेजमेंट स्किल्स’ प्रशिक्षणही राबविलं जातं. गरजू मुलींच्या घरी जाऊन त्यांच्याकडून दैनंदिन व्यवहारातील कामाचा सराव करून घेतला जातो. येथील सागर पाटील या मुलांना एल.ई.डी. दिवे तयार करायला शिकवतात.

डोंबिवलीत सुरुवातीला एम. के. चौधरी आणि आता ‘चंद्रकांत पाटकर ट्रस्ट’ यांनी जागेचा प्रश्न काही अंशी सोडवला असून २०१५ पासून तेथे ‘बहुउद्देशीय केंद्र’ उदयाला आलं. ७-८ महिन्यांचं बाळ ते शालेय विद्यार्थी या केंद्रात येतात. ३० ते ३५ मुलं आणि त्यांचे पालक यांना प्रशिक्षण दिलं जातं. विशेष शिक्षक, संगणक प्रशिक्षक आणि स्वयंसेवक यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे कार्य सुरू असतं. पुस्तक वाचनाची समस्या दूर करण्यासाठी आजपर्यंत संस्थेतर्फे ७५०० पेक्षा जास्त पुस्तकं ध्वनिमुद्रित झाली आहेत. त्यात केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, साहित्यिक, कायदेविषयक पुस्तकांचा समावेश आहे. ही पुस्तकं मराठी, हिंदी, इंग्रजी, पाली, संस्कृत, गुजराती भाषांमध्ये आहेत. यासाठी २०० पेक्षा जास्त स्वयंसेवक कार्यरत आहेत. कौतुक म्हणजे शहापूरच्या दुर्गम भागात संस्थेच्या सेवेकर्‍यांनी घरोघरी जाऊन ४५ घरांतील दृष्टिहीन व्यक्तींना शोधून मोबिलिटी प्रशिक्षण आणि सरकारी सुविधांची माहिती दिली आहे.

‘स्नेहांकित’ला नि:स्वार्थीपणे काम करणारे मंगल राजे, साधनाताई वझे, सुव्रता सामंत, संस्थेचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे सी. ए. गिरीश गद्रे अशी अनेक माणसं जोडली गेली आहेत. तसेच रुजुल गोयथळे, स्वराज कदम, निखिल लोकरे, दृष्टी गाबा, सिद्धी दळवी अशा असंख्य विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशामुळे ‘स्नेहांकित’चं नाव उज्ज्वल केलं आहे. परिमलाताईंना ‘स्नेहांकित’चा कार्यपरीघ वाढवायचा आहे. दिव्यांगांसाठी शिक्षण, स्वावलंबन आणि पुनर्वसन एकाच छत्राखाली आणून वसतिगृह, आधुनिक तंत्रज्ञान, व्यावसायिक शिक्षण, जीवनकौशल्य, संगीत, क्रीडा असा सर्वांगीण विकास करणारं आदर्श केंद्र उभारायचं आहे. त्यासाठी अर्थातच मोठी जागा आणि जास्त मोठं आर्थिक बळ लागणार आहे, मात्र त्यांचं स्वप्न नक्की साकार होईल, अशी आशा वाटते.

‘सर्वे संतु निरामय:’ हा कौल घेऊन सुरू झालेला संस्थेचा प्रवास असाच बहरत राहो आणि सुवर्ण महोत्सव साजरा होवो, हीच प्रार्थना.

संस्थेचा इमेल-

snehankithelpline@ gmail.com
sulabha.aroskar@gmail.com