‘‘आज १५०-२०० विद्यार्थी ‘निवांत’वर आहेत. त्यांना जगण्याची उभारी देताना समाजव्यवस्थेशी लढावं लागलं. तो लढा नव्हता ते महायुद्धच होतं. ‘निवांत’च्या छताखाली अनाथ, शेतकरी, कातकरणींची, धुणं-भांडय़ाची काम करणाऱ्या आयांची, ऊस तोडणी कामगारांची, रिक्षाचालकांची मुलं आली अन् घडली-जगली. या मुलांना अभ्यासक्रम डोळसांचा आहे, पण शैक्षणिक सुविधा मात्र शून्य आहेत. हा काय सामाजिक न्याय आहे? आपणच एक समाज म्हणून या विद्यार्थ्यांच्या हाती ब्रेल पुस्तकांऐवजी भिकेचे कटोरे दिले. का?’’ विचारताहेत गेली १७ वर्षे ‘निवांत अंध मुक्त विकासालय’ची स्थापना करून अंध मुलांना घडवणाऱ्या संचालिका मीरा बडवे.
सतरा वर्षांचं ‘वेगळं जगणं’ शब्दबद्ध करणं अशक्य आहे. हे जगणं नव्हतं. विरघळणं होतं. त्या जगण्याचं रसायनच वेगळं होतं.. आहे. प्रत्येक क्षणाला असं वाटतं की, आताच तर प्रवासाला सुरुवात केली! किती वाटचाल अजून बाकीच आहे! तर मागे वळून बघताना असं वाटतं की, ‘अरेच्चा, किती लांबलचक, अवघड वळणाचा रस्ता, डोंगर, दऱ्या, खड्डे पार केले आपण.’ अशा विरघळण्यात तुमचं एक व्यक्ती म्हणून भौतिक अस्तित्व मिटून जातं.
‘निवांत’ एक मोठ्ठी प्रयोगशाळा आहे. इथला रोजचा चंद्र-सूर्य नवा-नवाच तर आहे, कारण ज्यांनी प्रकाशाचा एक किरणही पाहिलेला नाही, त्यांच्या ओंजळी प्रकाशकिरणांनी भरतानाच्या त्यांच्या मनात दडलेल्या ‘प्रकाशाचा उगम’ या प्रयोगशाळेतच शोधता आला.
१७ वर्षांपूर्वी जर कोणी भाकीत केलं असतं की, मी अनेक ‘विशेष दृष्टीच्या’ लेकरांची ‘मीरामाय’ होऊन जगेन, तर मी त्या साऱ्यांना वेडय़ात काढलं असतं. पण घडलं मात्र असंच. सर्वसामान्यपणे चाळिशी उलटल्यावर येणाराीेस्र्३८ ल्ली२३ २८ल्ल१िेी मलाही आला. घरच्या जबाबदाऱ्या पार पडलेल्या होत्या. पण स्वत:चं ‘असणं’, ‘मी कोण?’ या यक्षप्रश्नांची उत्तरं सापडली नव्हती.. शैक्षणिक क्षेत्रातल्या कामाचा अनुभव होता. पुन्हा कॉलेजमध्ये इंग्लिश विषय शिकवण्याची नोकरी धरण्याचा विचार पक्का केला. कन्या जन्मानंतर गेली १४ र्वष सांसारिक प्रपंचात वेगानं वाहून गेली होती. स्वत:चा शोध जरा विसावा मिळाल्यावर सुरू झाला. माझा नवरा आणि मित्र आनंद दरवर्षी स्वत:च्या वाढदिवसाला रक्तदान करायचा आणि अंधशाळेला डोनेशन द्यायचा. आमच्या धंद्याचं बस्तान बसेपर्यंत पैशांचा अभाव असूनही आनंद हे सारं निष्ठेनं अन् प्रेमानं करायचा. नोकरी सुरू झाली की अंधशाळेला जायला वेळ कुठला मिळणार म्हणून केवळ कुतुहलापोटीच मी आनंदबरोबर अंधशाळेला गेले.
वर्ष १९९६. पुण्याच्या कोरेगाव पार्क अंधशाळेत शिरले, तेव्हा माहीत नव्हतं की तो क्षण ‘निवांत’चा जन्मक्षण होता. समोरच्या जिन्यावरून अडीच-तीन वर्षांची, गोबऱ्या गालाची इवलाली पिल्लांची रांग जिना चढायची धडपड करत होती. नुकतीच शाळेत आलेली चिमणी मुलं होती. एक अगदी होमसिक चिमणं मला येऊन धडकलं. मिठी मारून रडायला लागलं. त्याला मी त्याची आई वाटले.. अन् मला.. ते माझंच वाटलं. समोर सारा अंधार होता त्याच्या, पण स्पर्शातली माया दोघांनाही कळत होती. माझ्या डोळ्यांना आसवांची धार लागली. त्या चिमण्याच्या शिरावर सारी आसवं ओघळली. खरं सांगू? ती मिठी मी आजतागायत नाही सोडवू शकले. १७ वर्षांत अशा अनेक लेकरांनी माझी कूस आपली मानली. शेकडो लेकरांची आई होताना त्यांच्या काळजीनं माझं आयुष्य पिंजून काढलं. कसले पैसे कमावणं अन् कसली नोकरी? सारं सामान्य जगणं ‘निवांत’ नामक जगण्यात मिसळून गेलं, हरवून गेलं.
दुसऱ्या दिवसापासून मी शाळेत सेवा देण्यासाठी, इंग्लिश शिकवण्यासाठी जायला लागले. शाळेतला पहिला दिवस अजून जसाच्या तसा आठवतो. वर्गातल्या सात मुलांच्या चेहऱ्यावर कुठल्याही भाव-भावनांचं चित्र रेखाटलेलं नव्हतं. सारे चेहरे, हावभाव यंत्रवतच होते. हातवारे फारसे नव्हतेच. मी धसकलेच. त्यांचं ब्रेलमधलं पुस्तक उचलून हातात धरलं. सारी टिंबं! एक-दोन नाहीत तर असंख्य टिंबं! बुद्धीचा, ज्ञानाचा टेंभा मिरवणाऱ्या मला क्षणभर माझ्याच ज्ञानाची कीव आली. मी ‘ब्रेल निरक्षर’ होते ना? काय शिकवणार मी यांना? मला अजून खूप वाटचाल करायची आहे याची जाणीव झाली. आमचा वर्ग लायब्ररीत. सगळीच पुस्तक टिंबांची – तक्ते टिंबांचे. पायाखालची जमीनच सरकली. बाप रे! पळून जावंसं वाटलं मला; पण माझी वर्गातली पिल्लं (इ. सातवी) महा-उस्ताद होती. त्यांनी मला ब्रेल शिकवण्याचा चंग बांधला.
मीही ब्रेल शिकायचं नक्की केलं. वास्तविक पाहता आपल्याकडे डोळस पुस्तक अन् मुलांकडे ब्रेल पुस्तक असलं तरी शिकवता येतच; पण अंध जगताचा ‘बॉस’ व्हायला ब्रेल यावंच लागतं. ब्रेल म्हणजे सहा टिंबांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या अनेक कॉन्बिनेशन्सची लिपी. मुलांना फक्त आद्याक्षरं यायची. व्याकरणातील अनेक चिन्हं समाजायची नाहीत. अजून प्रवास अवघड करायला पुस्तकं संक्षिप्त लिखाणात (कॉन्ट्रॅक्शन) असायची. मला कोण ब्रेल नीट शिकवणार? मग मी डोळस पुस्तक समोर ठेवून संक्षिप्त ब्रेल वाचायची. ब्रेल उर्दूसारखी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते आणि उठावाची टिंबं डावीकडून उजवीकडे वाचली जातात. ही ‘मिरर इमेज’ अजून घोटाळ्यात टाकते. मी घरभर ब्रेलचे तक्ते टांगले. ब्रेल शिकायला घरकामात फारसा वेळ व्हायचा नाही. मग मी दात घासायच्या बेसिनवर, स्वयंपाकाच्या ओटय़ावर तक्ते टांगले. करंगळी आणि तर्जनीच्या बोटांची सहा पेरं म्हणजे ब्रेलची सहा टिंब समजून बसमध्ये (शाळेत) जाता-येता सतत कॉम्बिनेशन्स पाठ केली. ‘भारती ब्रेल’ पुस्तक विकत घेऊन ब्रेलचे सगळे नियम मी शिकले.
मग मात्र माझी अन् मुलांची मस्त नाळ जुळली. मुलं त्यांच्या शाळेत डोळस मुलांपेक्षाही छान ब्रेल वाचायला लागली. त्यांच्याबरोबर मी क्रिकेट खेळले, अनेक वैज्ञानिक प्रयोग केले. इंग्लिश शिकवताना ‘बर्थ डे’ पार्टी करूनच बलून, फेस्टून्स, कँडल इत्यादी शब्द शिकवले. छोटी नाटकं बसवली. संवाद-संभाषण मस्त जमायला लागलं. त्यांची जिवाभावाची मैत्रीण झाले. तरीही एक दिवस मी शाळा सोडून दिली. काय घडलं असं? त्या शाळेत माझा जीव गुदमरायला लागला. शाळेच्या छताखाली सर्व सुखसोयी असूनही मुलांना विनामूल्य मिळणाऱ्या अमूल्य सेवांचं मूल्य कळत नाही हे जाणवलं. मुलं थोडी मोठी झाल्यावर त्यांना शिंगं फुटतात आणि जरुरीपेक्षा जास्त माणसं त्यांच्या सेवेला आल्यानं ते ‘प्रेम’, ‘मैत्री’ हे शब्द विसरून स्वार्थी होतात. त्यांचं कॉपी करणं, शॉर्ट-कटनी पास होणं, चोऱ्या करणं, लबाडय़ा करणं, सारं सारं त्यांना मिळणाऱ्या आयत्या सोयीमुळे होतं. प्रशासकीय वर्ग खूप छान असला, तरीही काय करणार मुलांच्या या मानसिकतेवर? मी अगदी हताश-निराश झाले. वाटलं हरलो, संपलं सारं.
शाळेला जाणं बंद केलं. अचानक दारात सिद्धा (सिद्धार्थ गायकवाड) उभा असलेला दिसला. अंधशाळेत तोंडही न उघडणारा सिद्धा नववीत रस्त्यावर आला. १८ वर्षांनंतर जशी अनेक अंध मुलं रस्त्यावर येतात, तसाच सिद्धा रस्त्यावर आला. त्याला आईवडिलांनी उशिरा शाळेत घातलं. त्यात त्याचा काय दोष? असा सिद्धा बंडगार्डनच्या फुटपाथवर राहायला लागला. उपाशी-तपाशी तसाच जगायला लागला. एक दिवस धीर एकवटून माझ्या दारात उभा राहिला.
पोटात अन्नाचा कण नसल्यानं आधीच कृश सिद्धा पार खंगलेला वाटला. धापा टाकत होता. मला तर वाटलं कुठल्याही क्षणी हा अखेरचा श्वासच घेईल. मी त्याला घरात घेतलं. प्रथम त्याला खूप साखर घालून चहा आणि बिस्किटं खायला घातली. माझा जीव कळवळला. अक्षरश: रडू यायला लागलं. घरचा पत्ता बरोबर हुडकला होता सिद्धानं. काही मुलं चुकली म्हणून साऱ्याच मुलांना मी रस्त्यावर का सोडलं? स्वत:ची लाज वाटली. अंध असूनही शिक्षणाच्या आशेनं माझ्या दारात उभ्या असलेल्या सिद्धाकडे मी भरल्या नजरेनं पाहत होते. शाळेतल्या घटनांनी मी अंध क्षेत्रातलं काम सोडून द्यायला निघाले होते. आणि सिद्धा मात्र मरणाच्या दारात उभा.. तरीही शिक्षण सोडायला तयार नव्हता.
निवांत हा आमचा बंगलाच या मुलाचं घर झालं आणि सिद्धासाठी उघडलेलं दार नंतर अनेकानेक अंध विद्यार्थ्यांसाठी उघडलं गेलं. बारा महिने-तेरा काळ! कधीही बंद न होण्यासाठी!
एकटय़ा सिद्धाबरोबर अनेक लेकरांना खाऊ, पिऊ, न्हाऊ-माखू घातलं, अभ्यास विषय शिकवणं, जगवणं, शिस्त, संस्कार देऊन घडवणं- सारं घडलं कसं कळलं नाही. या प्रवासात मला माझ्यातलं मूल मरू देता आलं नाही. दररोजचे १४-१५ तासही काम केलं. काय होतं माझ्या हाताशी? मुलांचं प्रेम, त्यांच्या गरजांची जाण आणि कसदार तसंच दर्जेदार जीवन त्यांना देऊन आपल्यात सामावून घेण्याची इच्छा – एवढंच हाती होतं. ‘निवांत’ म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्यासारखंच होतं.
बराच शोध घेतल्यावर कळलं, की १८ वर्षांनंतर समाजकल्याण खात्याच्या कायद्यानुसार अपंग विद्यार्थ्यांना स्वतंत्र जगायला सोडून दिलं जातं. साधारणपणे अनुत्पादक घटक समजून कुटुंबातील मंडळी त्यांना शाळेत सोडून जातात. कधी कधी हे सोडणं कायमचं असतं. १८ र्वष पूर्ण कशी होतात? कित्येकदा आई-वडिलांना त्यांच्या अंध मुलाची जन्मनोंद करण्याची गरजच भासत नाही. त्याचं जन्मणं त्यांच्या दारिद्रय़ानं भरलेल्या आयुष्यातलं न पेलणारं आव्हान असतं. ज्यांचे पाठीराखे कोणी नाहीत अशी मुलं रस्त्यावरच येतात. परत जायला घर नाही. जाणार कुठं? मनात शिक्षण घ्यायची, चांगलं जगण्याची इच्छा असली, तरी पर्याय संपलेले असतात.
दुर्बल, हरलेले हे जीव वाममार्गाला लावायला समाज टपलेलाच असतो. मुलांना वेगळ्या कारणासाठी, तर मुलींना वेगळ्याच कारणासाठी समाज वापरतो. हे वास्तव फार हृदयविदारक आहे. ही सारी हरवल्यासारखी दिसणारी माणसं माझ्या शोधात घरी आली, हे माझं भाग्यच – अन् त्यांचंही. मुलं माझ्यावर नितांत श्रद्धा अन् निष्ठा घेऊन जिद्दीनं माझ्याकडे येत राहिली. त्यांच्या आयुष्यातले झंझावात माझं आयुष्य पूर्णपणे बदलतं करून गेले. माझं सारं विश्वच बदललं. हरलो-संपलो वाटलं, तरी मुलांच्या जिद्दीनं लढायचं बळ दिलं. या साऱ्या प्रवासात माणूस म्हणून माझ्या अस्तित्वाचा पोत सुधारला.
कधीच वाटलं नव्हतं. सातत्यानं आपण १७ र्वष हे काम करू शकू. आता १५०-२०० विद्यार्थी ‘निवांत’वर आहेत. त्यांना जगण्याची उभारी देताना समाजव्यवस्थेशी लढावं लागलं. तो लढा नव्हता ते महायुद्धच होतं. शाळा संपली की शिक्षण संपलं अशीच अंधक्षेत्राची अवस्था होती. दहावीनंतरच्या मुलांसाठी एकही अक्षर ब्रेलमध्ये उपलब्ध नव्हतं. श्रीमंत अन् घरच्यांचा पाठिंबा असणारी मुलं शिकायची, पण बाकीच्यांचं काय? ‘निवांत’च्या छताखाली अनाथ, शेतकरी, कातकरणींची, धुणं-भांडय़ाची काम करणाऱ्या आयांची, ऊस तोडणी कामगारांची, रिक्षाचालकांची मुलं आली अन् घडली-जगली. या मुलांना अभ्यासक्रम डोळसांचा आहे पण शैक्षणिक सुविधा मात्र शून्य आहेत. हा काय सामाजिक न्याय आहे? आपणच एक समाज म्हणून या विद्यार्थ्यांच्या हाती ब्रेल पुस्तकांऐवजी भिकेचे कटोरे दिले.

काही हृदयस्पर्शी कथा- ‘निवांत’ची मानसकन्या, भारती डिंबळे-गरुड ही बी.ए. ( राज्यशास्त्र) शिकली. मात्र दुर्दैवाने लग्नानंतर वर्षांतच दोन्ही किडन्या निकामी झाल्याने वयाच्या २३व्या वर्षी तिचा मृत्यू झाला. पती विकासबरोबर ती नोकरी करत होती. कर्तृत्ववान, धडाडीची झाशीची राणीच जणू. अखेरची इच्छा (डायलिसिसला नकार) ‘‘मॅडम, माझ्यावर तुमचं प्रेम असेल, तर मला घरी घेऊन जा. माझ्या माणसात अखेरचा श्वास घेईन. माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न करा व माझ्या जागी दुसऱ्या अंध मुलीलाच नोकरी द्या.’’
* * *
समीना शेख- बी.ए.( नृत्यशास्त्र) शिरूरजवळच्या खेडय़ातली. ज्या समाजातून आली, त्या सर्वाची समजूत घालून, त्यांचं मन जिंकून जिद्दीने डान्सिंगमध्ये करिअर केलं. बी.ए. विथ डान्सिंग. शमा भाटेजींकडे कथकची तालीम पार पाडली. आपल्यासारख्याच अनेक अंध मुलींची देहबोली सुधारणे व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे यासाठी तिला आयुष्य वेचायचे आहे.
* * *
सुनीता पवार-सोळंकी – एम.ए हिंदी व हिंदी पंडित हा बहुमान पटकावला. ‘निवांत’च्या मदतीने जगताना अलम दुनियेत कोणी नसताना इतकं शिक्षण घेऊन गडहिंग्लजला शिक्षिकेची नोकरी पत्करली. अशीच उपेक्षित मुलांसाठी झटते आहे. पहिल्याच वर्षी सात हजार रुपये ‘निवांत’ला पाठवून दिले. तिच्यासारख्याच एका मुलीच्या शिक्षणासाठी दत्तक घेण्याची तिची इच्छा आहे.
* * *
वृषाली पानसरे – बी.ए. राज्यशास्त्र शिवाय एम.लिब. पूर्ण केलं. सात र्वष ‘निवांत’च्या ब्रेल लायब्ररीची ग्रंथपाल होती. आता ‘बँक ऑफ महाराष्ट्रात’ नोकरी मिळालीय. पण जवळची ब्रँच घेऊन रोज दोन तास व शनिवारी अर्धा दिवस येऊन अंध बांधवांची सेवा करण्याची तिची इच्छा आहे.

apmc market, license issue, nashik district
नाशिक : बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास

‘निवांत’चं वेगळेपण हे आहे की, अंधशाळेच्या बाहेर पडलेल्या विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी ते रचलं गेलं. मागे वळून बघताना नवल वाटतं- कॉमर्स, कला शाखा, लॉ, कॉम्प्युटर सायन्स, लायब्ररी सायन्स, डान्सिंगची थिअरी, परकीय भाषा जर्मन, जॅपनीज (शैक्षणिक साधनांची उपलब्धता व उत्तम गुरू शोधून देणे), बेकरी कन्म्फेशनरी, एम.एस.डब्ल्यू. मॅनेजमेंट, एम.एस.सी.आय.टी.चे वर्ग घेणे, २० ते २२ विषय शिकून त्याचं दोन्ही माध्यमातलं रेकॉर्डिग करणे, बी.एड., डी.एड.चे विद्यार्थी तर विसरलेच, अ‍ॅनॉटॉमी शिकवणे, प्रिंटर नव्हता तेव्हा ब्रेल पुस्तकं हाती लिहून घेणे. त्यांचं डिक्टेशन, प्रूफ रीडिंग, ब्रेल प्रिंटिंग, एडिटिंग, हिशेब लिहिणं, ब्रेल पुस्तकांसाठी प्रकाशकांना भेटणं, मुलांच्या वसतिगृहातील अ‍ॅडमिशन, वेगवेगळ्या करियरसाठी प्रवेश मिळवण्यासाठी उपकुलगुरू, संस्थाप्रमुखांना भेटणं व त्यांना मुलांच्या क्षमतांविषयी विश्वास देणं, नोक ऱ्यांसाठी कॉन्टॅक्ट्स आणि फॉलो-अप्, संस्था दाखवणं, डोळस शाळांमध्ये ब्रेल शिबिरं घेणं, मुलांच्या कॉलेजमधील वर्गात बसून न समजलेले विषय समजून घेणं. जागृतीपर भाषणं द्यायला क्लब्ज, शाळा-कॉलेजेसना जाणं, रायटर्स क्लब चालवणं, विविध शैक्षणिक साधनं निर्माण करणे व आधुनिक तंत्रज्ञान अंध जगतात आणणे – कसं घडलं असेल हे सारं? १२ र्वष, मुलं व त्यांची मीरामाय यांनी शस्त्र चालवल्यावर गेली पाच र्वष मात्र या प्रवासात माझ्याबरोबरच अनेकांनी या लेकरांचं मातृत्व-पितृत्व स्वीकारलं. आनंद तर आमचा पाठीचा कणाच! हातात हात धरून सारे पुढे सरकलो. निरपेक्ष, प्रसिद्धीपासून दूर, तृणपात्याच्या मुळाशी काम करण्याचे वस्तुपाठ अनेकांनी घालून दिले. स्वत:च्या आनंदासाठीच सारं करतो. त्याचं भांडवल करायचं नाही हे सर्वानी शिकवलं. माझेच विद्यार्थी माझे सहकारी झाले. खांद्याला खांदा लावून शिकवायला लागले.
‘निवांत’मध्ये सध्या चार ब्रेलप्रिंटर्स असून रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट एण्डनं त्यातील तीन प्रिंटर्स दिले आहेत. पूर्वी चक्क हातानं पुस्तकं लिहित. २५० ब्रेल पुस्तकं लिहिली गेली. विंदा करंदीकर, नारायण सुर्वे, सुधा मूर्ती, मीना प्रभू, उत्तम कांबळे, अशा अनेकानेक साहित्यिकांची पुस्तकं व क्रमिक पुस्तकं इथून विनामूल्य दिली जातात. प्रिंटर आल्यावर ‘व्हिजन अन्लिमिटेड’ या लायब्ररीत ३००० हून अधिक अनेक भाषांतील ग्रंथसंपदा उभी आहे. त्याच्या १७ शाळा महाराष्ट्रात आहेत. दरवर्षी २ लाख पेपर छापला जातो व या पुस्तकांच्या प्रकाशनासाठी स्वत: अनेक साहित्यिक ‘निवांत’ भेटीला आले. मुख्यत्वेकरून महाराष्ट्रातील व भारतभरातील अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न सोडवले जातात.
अभ्यासाबरोबरच इथले विद्यार्थी शामक डावर यांच्या नृत्यशिक्षकांकडून पाश्चात्त्य नृत्याचे धडे घेतात, चित्रं काढतात, गातात, वृक्षारोपण करतात, पक्ष्यांशी गप्पा मारतात, जलदीपासन (योगातला अवघड प्रकार – काचेचा ग्लास, त्यात जळती मेणबत्ती ठेवून ग्लास कपाळावर ठेवून सारी आसनं), ज्युडो तर शिकतातच पण राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धाही भरवतात. हे विद्यार्थी रक्तदान करतात, मलखांब व स्केटिंग करतात. चेसला त्यांना डोळसांबरोबर आंतरराष्ट्रीय रँकिंगही आहे! ते सॉफ्टवेअर क्षेत्रात प्रचंड नाव कमवून आहेत. त्यांची स्वत:ची ‘टेक् -व्हिजन’ नावाची सॉफ्टवेअर फर्म आहे व त्यांचे अमेरिकन व भारतीय क्लायंट्स आहेत. बोर्ड-वॉक् टेक् या सिलिकॉन व्हॅलीतील कंपनीचे खूप प्रोजेक्ट्स ते करताहेत व फडफ ही चौथ्या जनरेशनची लँग्वेज् शिकायला त्यांच्याकडे डोळस इन् टर्नस् येतात. आता डोळस व्यक्ती या मुलांच्या पेपरवरून कॉपी करतात व गोव्यावरून आलेल्या डोळस शिक्षकांना ही मुलं प्रशिक्षण देतात.
वर उल्लेख केलेल्या करियरच्या वेगवेगळ्या वाटा या विद्यार्थ्यांनी धुंडाळल्या. या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण घेऊन आता १५०० हून अधिक विद्यार्थी ५००० ते ३५,००० रुपये कमावत आहेत. ‘निवांत’चा गेल्या १७ वर्षांचा निकाल १०० टक्के असून कित्येकांनी आपापल्या क्षेत्रात विद्यापीठात प्रथम येऊन दाखवलं आहे. पीएच.डी.पर्यंत त्यांचं शिक्षण चालू आहे.
अभ्यास करतानाही अत्यंत स्वाभिमानानं ही मुलं कमावती झाली आहेत. उत्कृष्ट व आंतरराष्ट्रीय दर्जाची चॉकलेट्स, ब्रेल कार्ड्स, पेपर बॅग्ज् आणि ऑरगंडीची देखणी गुलाबाची फुलं बनवून त्याची विक्री करून, तसंच ब्रेल पुस्तकांचं प्रिंटिंग, बाइंडिंग करून हे विद्यार्थी स्वत:ची फी, मेस् बिल्स तर भरतातच, पण स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन, ऑटिझम सेंटर यांना आपल्या प्राप्तीतला १ टक्का द्यायला विसरत नाहीत. ‘निवांत’च्या कमावत्या विद्यार्थ्यांचा ‘सो कॅन आय’ क्लब एखाद्या अंध बांधवाची २० ते २५ हजार फी भरून त्याच्या शिक्षणात खंड पडू देत नाही. पल्लवी चिवेच्या ब्रेन टय़ुमरच्या सर्जरीसाठी विद्यार्थ्यांनी स्वत: व इतरांकडून लाखो रुपये जमवलेच, पण तिचं जगात आईशिवाय कोणी नाही म्हणून तिच्या उशा-पायथ्याशी बसून तिची सेवाही केली.
या तर साऱ्या जिद्दीच्याच कथा. आयुष्यात प्रश्न, अडथळे, समस्या आहेत, तरी ‘आयुष्य सुंदर आहे’ आणि अनुत्पादक म्हणून सोडून दिलेली ही लेकरं इतकी उत्पादक झाली आहेत की, आपल्यालाही सांभाळतात. अंधत्वाचं इथे भांडवल केलेलं नसून ‘निवांत’ समर्थ मााणसांचं गाव आहे.
आता प्रश्न असा आहे, की सरकार-समाज काहीच करत नाही म्हणून आपण स्वस्थ बसायचं का? आपल्याभोवती स्वर्ग रचणं आपल्याच हाती आहे!
संपर्क – मीरा बडवे,
संचालिका, निवांत अंध मुक्त विकासालय.
पत्ता- सव्हे न. ३३/ १ , प्लॉट नं. ७५, विद्यानगर,
पुणे-४११ ०३२
भ्रमण दूरध्वनी- ०९९२३७७२३७५
वेबसाईट- niwantvision@gmail.com