scorecardresearch

पद्मश्री ‘दीनभगिनी’

स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असणाऱ्या, खादीचा घरोघरी जाऊन प्रचार करणाऱ्या, खादीच्या कपडय़ांमध्ये सौंदर्य आणणाऱ्या मिठूबेन पेटिट यांनी ग्रामविकासाचा धडा ‘मरोली’च्या रूपाने घातला

पद्मश्री ‘दीनभगिनी’

स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असणाऱ्या, खादीचा घरोघरी जाऊन प्रचार करणाऱ्या, खादीच्या कपडय़ांमध्ये सौंदर्य आणणाऱ्या मिठूबेन पेटिट यांनी ग्रामविकासाचा धडा ‘मरोली’च्या रूपाने घातला आणि आजही तेथील काम तितक्याच समर्पित पद्धतीने होते आहे. त्यांचे काम पाहून भारावलेले वल्लभभाई पटेल यांनी त्यांना उत्स्फूर्तपणे ‘दीनभगिनी’ म्हटले त्या तेजस्वी शलाकेविषयी..
एकोणिसाव्या शतकात जन्मलेल्या व विसाव्या शतकात ज्यांचे नाव सर्वमुखी झाले त्या महाराष्ट्र कन्या मिठूबेन पेटिट यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावेच लागेल. ११ एप्रिल १८९३ साली मुंबईतील धनाढय़ उद्योगपती दिनशा माणेकजी पेटिट यांच्या घरी मिठूबेन यांचा जन्म झाला. घरात पूर्ण पाश्चात्त्य पद्धतीची राहणी. मिठूबेननी का व किती खर्च करावा यावर काही बंधन नव्हते. त्यामुळे ती बग्गी घेऊन खरेदीला निघाली की तिच्या सौंदर्यासक्त दृष्टीला जे दिसेल ते ती खरेदी करे. यातले बहुतेक सामान सभोवतालची माणसे, मैत्रिणी, नोकर-चाकर यांच्यात वाटले जाई. शाळेतल्या गरजू मुलींना फी पुस्तके, वह्य़ा; इतकेच नव्हे तर कपडे, चपला वगैरे साहित्यही ती पुरवीत असे.
मिठूबेनचे काका जहांगीर पेटिट व त्यांची पत्नी जायजीबेन यांची आफ्रिकेत गांधीजींशी ओळख झाली होती. गांधीजी आफ्रिकेतून मुंबईत आले तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ पेटिट परिवाराने एका ‘उद्यान मेजवानी’चे (गार्डन पार्टी) आयोजन केले. गांधीजी काठेवाडी पोशाखात मेजवानीला आले होते. गांधीजींच्या एका साध्या व्यक्तिमत्त्वाचा मिठूबेनवर फारच प्रभाव पडला. त्या दिवसापासून आपण गांधींजींच्याच विचारांप्रमाणे चालायचे असे तिने मनोमन ठरविले. तिचा हा निश्चय तिने आपल्या अखेरच्या दिवसापर्यंत तडीस नेला. मिठूबेन अभिजन वर्गातील. अर्थात तिचा मित्र परिवार, कुटुंबाचा मित्र परिवार, नातेवाईकही त्याच वर्गातले. त्यावेळचे भारतीय दिग्गज नेते दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, दिनशा वाच्छा हेही पारसी समाजातील. त्यांचे व पेटिट कुटुंबीयांचे अगदी घनिष्ठ संबंध असणे स्वाभाविक होते. इतकेच नाही तर रवींद्रनाथ टागोर, गोपाळ कृष्ण गोखले, सरोजिनी नायडू ही मंडळीही पेटिट कुटुंबाच्या मित्रमंडळींपैकी होती. यांच्याबरोबर होणाऱ्या पेटिट कुटुंबाच्या भेटीमुळे मिठूबेन हळूहळू बदलत चालली होती. मिठूबेन राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी झाल्या त्या १९१९ सालापासून. गांधीजींच्या प्रेरणेमुळे सरोजिनी नायडू व पेरीन नौरोजी (दादाभाई नौरोजींची नात) यांनी ‘राष्ट्रीय- स्त्रीसभे’ची स्थापना केली होती. या सभेतर्फे मुख्यत्वेकरून खादीचा प्रचार केला जाई. या सभेच्या मिठूबेन सदस्य झाल्या. रेशमी मुलायम तसेच परदेशी कपडय़ांचा त्याग करून ते सगळे कपडे परदेशी कपडय़ांच्या होळीत टाकले. त्या खादीधारी बनल्या.
खादीचा प्रचार करत असताना ही राजकन्येसारखी वाढलेली मुलगी हातावर व खांद्यावर खादी टाकून विक्रीसाठी बाहेर पडे. खादी जर लोकप्रिय व्हायची असेल तर तिचा पोत सुधारला पाहिजे. तसेच ती निरनिराळ्या रंगांत व छापील असली पाहिजे. खादीवर भरतकामही झाले पाहिजे, या मुद्दय़ावर पेरीनबेन नौरोजी व मिठूबेन यांचे एकमत झाले. दोघींनीही वयाच्या १८ व्या वर्षांपर्यंत सुंदर वस्त्रे वापरली होती. हे सौंदर्य त्यांनी साडीत आणले. साडी पन्ह्य़ाच्या व काठपदराच्या साडय़ा खादीमध्ये विणल्या जाण्याचे श्रेय मिठूबेन व पेरीनबेन यांनाच आहे. त्याचप्रमाणे घरात वापरण्यासाठी हस्तरूमाल, टॉवेल, पंचे, चादरी, पलंगपोस, पडद्याची कापडे विणण्याचे शिक्षण विणकऱ्यांना देण्याची व्यवस्था केली. मिठूबेन स्वत: कापड विणायला शिकल्या. त्यांचे पाहून व ऐकून आणखीही गृहिणी कापड विणायला शिकल्या. मिठूबेन व दादाभाई नौरोजींच्या तीन नाती (ज्या स्वातंत्र्याच्या इतिहासात ‘कॅप्टन भगिनी’ म्हणून ओळखल्या जातात) लोकांची आवड लक्षात घेऊन व आपल्या उपजत सौंदर्यदृष्टीचा उपयोग करून स्त्रीसभेच्या विणकर शाखेकडून खादी विणून घेऊ लागल्या. इतकेच नाही, तर अंगावर कापडाचे ओझे घेऊन घरोघरी जाऊन खादी विक्री करू लागल्या. त्या चौघी धनाढय़ कन्या मुंबईकरांच्या आदराचा व कौतुकाचा विषय बनल्या. हळूहळू स्त्रीसभेच्या या शाखेमध्ये स्त्रियांची संख्या वाढू लागली. मोतीलाल व जवाहरलाल नेहरू, देशबंधू दास हे स्त्रीसभेचीच खादी वापरत. इतकेच नाही, तर म्हैसूर, बडोदा व भावनगर येथील राजकुटुंबीयही आपल्या राजवाडय़ात खादीचा वापर करू लागले.
गुजरातमधील खेडा जिल्ह्य़ातील पुराच्या थैमानामुळे मिठूबेनचे लक्ष खादीवरून लोकांच्या प्रश्नाकडे वळले. विठ्ठलभाई पटेलांच्या नेतृत्वाखाली सामान्य व तळागाळातील कार्यकर्त्यांबरोबर त्यांनी खेडा जिल्हा पिंजून काढला. या फिरण्यात त्यांना गरिबी व दु:ख काय असते त्याची तीव्र जाणीव झाली. गुजरातचे ठक्करवाला व वल्लभभाई पटेल या निष्ठावंत तरुण गुजराती नेत्यांच्या त्या सहवासात आल्या. बार्डोलीच्या लढय़ात घरोघर फिरून स्त्रियांना ‘बाडरेलीचा लढा का’ हे समजावण्याचे काम त्यांनी केले.
मिठूबेनने स्वीकारलेले हे खडतर जीवन तिच्या आई-वडिलांना अजिबात आवडले नाही. मिठूबेनला त्याचे दु:ख झाले. त्या वडिलांना म्हणाल्या, ‘‘सरकारमध्ये ऊठबस करणे हे जसे तुम्ही तुमचे काम समजता, तसे मी माझे काम देशातल्या गरीब, दु:खी व गांजलेल्या लोकांच्या बरोबर आहे, असे मी समजते. तेव्हा मागे फिरण्याचा प्रश्नच नाही.’’ लेकीचे हे उत्तर ऐकून त्यांनी मिठूबेनला आपल्या संपत्ती व मालमत्तेतून बेदखल केले. मिठूबेनसाठी ठेवलेल्या दागिन्याला मात्र तिच्या हाती सोपवण्याचे ठरविले. मिठूबेनना भौतिक संपत्तीची हावच नव्हती. मग दु:ख कशाचे? उलट खेडय़ांतच राहून विधायक कार्य करावयाचे हा त्यांचा निश्चय अधिकच दृढ झाला.
१९२९ साली दारूच्या दुकानावर निदर्शने करताना त्यांना अटक झाली. ती त्यांची पहिली अटक. सुटकेनंतर त्यांनी आदिवासी व ग्रामीण जनतेसाठी आयुष्यभर काम केले. त्यांचे काम पाहून भारावलेले वल्लभभाई पटेल यांनी त्यांना उत्स्फूर्तपणे ‘दीनभगिनी’ म्हटले व याच नावाने पुढे त्या ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांचे आजोबा दिनशा पेटिट यांना औषधी वनस्पतींचा अभ्यास व छंद होता. त्यावर त्यांनी एक पुस्तकही लिहिले होते. मिठूबेन यांनीही तोच छंद जोपासला. आपल्या छंदाचा उपयोग करून त्या ग्रामीण जनता व आदिवासी यांना औषधोपचार करू लागल्या. त्यांचे नाव दक्षिण गुजरातेतील खेडय़ापाडय़ांत पसरले. लोक त्यांना ‘माईजी’ म्हणू लागले. ग्रामीण जनतेच्या हालअपेष्टांच्या जाणिवेमुळे मिठूबेननी मुंबईला घरी न परतण्याचा निश्चय केला व तो आजन्म पाळला.
मिठूबेननी सुरत जिल्ह्य़ात ‘स्त्री स्वराज्य संघ’ स्थापन केला. त्यांची शिबिरे भरवून त्यांना अहिंसक मार्गाने सत्याग्रह व निदर्शने करण्याचे शिक्षण दिले जाई. तरुणांनो खेडय़ात चला, या गांधीजींच्या आदेशाला मान देऊन मिठूबेन आयुष्यभर सुरत जिल्ह्य़ातील ‘मरोली’ नावाच्या खेडय़ातच स्थायिक झाल्या. कस्तुरबा गांधींच्या साहाय्याने त्यांनी तिथे आश्रम सुरू केला. आश्रमाजवळच झोपडी बांधून घेऊन त्यातच त्या आजन्म राहिल्या. सुरुवातीला आश्रमाच्या आसपास १०-१२ आदिवासींची कुटुंबे राहात होती. हळूहळू तिथे इतर जाती-धर्माच्या लोकांनीही वस्ती केली. मिठूबेन ऊर्फ माईजींचा त्यांना मोठाच आधार वाटू लागला. त्यांच्यावर औषधोपचार होऊ लागले. त्या गावातल्या लोकांनी एकत्र येऊन कस्तुरबा सेवा आश्रम दत्तक घेतला. या आश्रमात कस्तुरबांच्या नावाने ‘वणतशाला’ (विणकाम केंद्र) सुरू केले. तळागाळातील भूमिहीन पालकांच्या मुलांना नाना प्रकारचे जीवनोपयोगी शिक्षण इथे दिले जाऊ लागले. खादी विणणे, पशुपालन, चामडय़ाचे काम, दुधाची डेअरी इत्यादी. शिक्षणाची, खेडेगावातील लोकांसाठी रोजगार उत्पन्न करण्यासाठी सोय केली. या आश्रमाच्या भूमिपूजनाला गांधीजी, सरदार पटेल, खान अब्दुल गफारखान असे नेतेही हजर होते. आपण हे काम आजन्म  सोडणार नाही, असे मिठूबेनने गांधीजींना वचन दिले. कस्तुरबा सेवाश्रम हा आजही त्याच जिद्दीने तळागाळातल्या लोकांसाठी झटत आहे. हा सेवाश्रम बलसाड जिल्ह्य़ातील ‘मरोली’ गावी आहे. एखाद्या गुरुकुलासारखे मरोली, केवाडी, आंबेवाडी व चासवड या चार खेडेगावांत मुला-मुलींच्या शिक्षणाकरिता मिठूबेननी शाळा सुरू केल्या. मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून वसतिगृहे बांधली. मरोली गावच्या आसपासची सुमारे पंचवीस खेडी आजही या आश्रमाशी बांधलेली आहेत. आरोग्याचे प्रश्न व औषधोपचार हा मिठूबेनचा जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांनी चार सार्वजनिक दवाखाने सुरू केले. ऊन, पाऊस यांची जराही तमा न बाळगता त्या पायी फिरून रोगी पाहात. आपल्या औषधाने जे बरे होणार नाहीत त्यांची सोय व्हावी म्हणून ग्रामीण इस्पितळ बांधले. या इस्पितळात सुरुवातीला २५ खाटांची सोय होती. आता त्या ३५ आहेत. या सर्व इमारती आश्रमाच्या परिसरात देणगी म्हणून मिळालेल्या आठ एकर जमिनीवर बांधल्या आहेत.
१९४२ च्या लढय़ात त्यांचा जीव गुंतलेला होता. पण जिवापाड कष्ट करून केलेली आश्रमाची उभारणी व कामही तितकेच महत्त्वाचे होते. आश्रमाच्या भूमिपूजनाच्या वेळी गांधीजींनी त्यांना या जबाबदारीची आठवण करून दिली होती. गांधीजींना त्यांनी आमरण आश्रमाचे काम पाहीन, असे वचन दिले होते. त्यामुळे आश्रमात राहून आंदोलनाला जी मदत करता येईल ती करायची त्यांनी ठरविले. १९४२ च्या आंदोलनात काही कैद्यांना क्रूरपणे वागवल्यामुळे ते मनोरुग्ण झाले होते. अशा तीन-चार स्वातंत्र्यसैनिकांना गांधीजींनी मिठूबेनकडे पाठविले. मिठूबेननी निसर्गोपचारांद्वारे त्यांना बरे केले. त्यातूनच मनोरुग्णांसाठी इस्पितळाची कल्पना सुचली. हे इस्पितळ नैसर्गिक उपचाराने मनोरुग्ण बरे करते. आज देशच नव्हे तर विदेशातूनही रोगी इथे येतात. मिठूबेनचे हे फार मोठे योगदान आहे. या इस्पितळात वॉर्ड, खोल्या वगैरे व्यवस्था नाही. अगदी छोटय़ा-छोटय़ा झोपडय़ांतून त्यात रोगी व त्यांची काळजी घेणारी एक-दोन माणसे राहतात. रुग्ण स्वतंत्रपणे परिसरात फिरू शकतात. आपले छंद जोपासू शकतात. आजही नैसर्गिक पद्धतीने रुग्ण बरे होतात असे समजते.
आश्रमात येणाऱ्या पाहुण्यांचा भारतीय पद्धतीने साधा व सन्मानाने पाहुणचार व्हावा यावर मिठूबेनचा कटाक्ष होता. पाहुण्यांचे दोन प्रकार होते. मिठूबेनचे वैयक्तिक पाहुणे व आश्रमाचे पाहुणे. वैयक्तिक पाहुण्यांचे जेवणखाण व राहणे याचा खर्च त्या स्वत:च करीत. आश्रमाच्या गरजेच्या वेळी त्या आपला एक एक दागिना मोडून पैसा उभा करीत. त्यांच्या काकांना त्यांच्या कामाचे व नि:स्पृहतेचे फारच कौतुक वाटले. अभिमानही वाटला. त्यांनी आपल्या ट्रस्टमधून बरीच मोठी रक्कम मिठूबेनला भेट दिली. याच रकमेच्या व्याजातून त्या आपला खर्च व पाहुण्यांसाठी होणारा खर्च चालवीत. ही शिकवण त्यांना गांधीजींच्या विचाराने दिली. त्यांच्या आईने मरणापूर्वी आपले सर्व धन या मुलीला दिले. काकांनी संपत्तीत वारसा ठेवला. या सर्वाचा वापर करून त्यांनी मरोलीला अद्ययावत ऑपरेशन कक्ष असलेले इस्पितळ आपले वडील ‘होरमसजी पेटिट दर्दी निवास’ या नावाने बांधले.
मिठूबेन यांचे विधायक कार्य खादी ग्रामोद्योगांपर्यंत मर्यादित होते. ग्रामविकासाचा एक अतिउत्कृष्ट नमुना हे विधायक कार्याचे महत्त्वाचे अंग आहे, हे त्यांनी आपल्या कार्याने सिद्ध केले. १९४१, ५९ व ६९ साली तापी नदीच्या महापुरात त्यांनी केलेले मदतकार्य अलौकिकच म्हणावे लागेल. १९६९ सालच्या पुराच्या वेळी त्यांनी वयाची ७५ वर्षे पुरी केली होती. पण आपल्या वयाचा अगर प्रकृतीचा विचार न करता या पुराच्या वेळी त्यांनी मदतकार्य केले, हे अगदी विशेष होय.
माणसांप्रमाणे मिठूबेन प्राण्यांवरही प्रेम करीत. अनेक प्राणी त्यांनी पाळले होते. सर्व प्राण्यांना नावे दिली होती. त्यांना बांधून अगर पिंजऱ्यात ठेवले नव्हते. अगदी मुक्तसंचारी प्राणी होते. कोणताही प्राणी आजारी असला तर त्या जातीने स्वत: शुश्रूषा करीत. त्यावर इस्पितळात पाठविण्याची गरज असेल तर तसे करीत. पाळीव प्राणी मेल्यावर त्याला प्रेमाने गाडून निरोप देत.
कुठे काही झाले तर ते इतरांना समजण्यापूर्वीच तिथे मदतीला हजर असत. मिठूबेनच्या सर्व विधायक कार्याची नोंद अखेर भारत सरकारने घेतली. गांधीजींची विश्वस्त संकल्पना प्रत्यक्षात उतरविणाऱ्या, दलित व तळागाळातील लोकांसाठी अव्याहत झटणाऱ्या मिठूबेनना भारत सरकारने १९६१ साली ‘पद्मश्री’ देऊन गौरविले. त्याकाळी ही पदवी  एखाद्या कामात तावून सुलाखून निघालेल्या व्यक्तीला मिळे, म्हणून त्या वेळी तिचे महत्त्व खूप होते.
१६ जुलै १९७३ रोजी मिठूबेन स्वर्गवासी झाल्या. त्यांच्या मृत्यूबद्दल कै. पद्मविभूषण डॉ. उषा मेहता लिहितात, ‘‘मिठूबेननी जीवनात एक मोलाचा संदेश दिला. सुख हे संपत्तीवर अवलंबून नाही, तर दुसऱ्यांची सेवा करण्यात व दुसऱ्यांसाठी त्याग करण्यात आहे. स्त्रियांचे सौंदर्य हे कृत्रिम प्रसाधनाच्या वापरावर नाही; तर ते त्यांच्या निर्मल, पवित्रता व संयमी चारित्र्यावर अवलंबून आहे. मिठूबेनना स्वर्गवासी होऊन आज ४० वर्षे पुरी झाली. पण त्यांनी घालून दिलेला ग्रामविकासाचा धडा ‘मरोली’च्या रूपाने आपल्याला त्यांच्या या कामाची सदैव आठवण देत राहील.’’    
gawankar.rohini@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या