scorecardresearch

शतस्मरण शांताबाईंचे!

अनेकांना शांताबाईंची मुख्य ओळख आहे ती गीतकार, कवयित्री म्हणून. पण विनोद आणि नाटक वगळता मराठीच्या सर्वच साहित्यप्रवाहात त्या लीलया वावरल्या.

शतस्मरण शांताबाईंचे!
शतस्मरण शांताबाईंचे!

वंदना बोकील-कुलकर्णी

अनेकांना शांताबाईंची मुख्य ओळख आहे ती गीतकार, कवयित्री म्हणून. पण विनोद आणि नाटक वगळता मराठीच्या सर्वच साहित्यप्रवाहात त्या लीलया वावरल्या. ८ कादंबऱ्या, ललितलेखन, सदरलेखन यांची ४० च्या वर पुस्तकं, किती तरी अनुवाद, बालसाहित्य, शिवाय संपादनंही! याचं कारण त्यांचं मुळापासूनच शब्दांवर असलेलं प्रेम, त्यातल्या अर्थावर असणारी हुकुमत. त्यामागे होतं त्यांचं सगळय़ा प्रकारचं प्रचंड वाचन, चिंतन आणि अद्वितीय स्मरणशक्ती. समरसून जगणाऱ्या, त्यातल्या प्रत्येक अनुभवांना समजून घेऊन त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या शांताबाईंचं ललितलेखनातून दिसणारं रूप हे पांडित्याचा तोरा न आणणारं, सहज, स्वाभाविक, गप्पिष्ट आणि मोकळं आहे. त्यांनीच एका कवितेत म्हटल्याप्रमाणे ‘जीवनाची तळमाती शोधू पाहणारी’ ही अतिसंवेदनशील कवयित्री. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांची सांगता १२ ऑक्टोबर २०२२ ला होते आहे. त्यानिमित्तानं..

लेखाच्या या थोडक्या जागेत जवळपास १०० पुस्तकांचा दमदार ऐवज निर्माण केलेल्या, शांताबाई या अनौपचारिक नावानेच आपण ज्यांना ओळखतो त्या चतुरस्र लेखिकेच्या साहित्यसंभाराचा परामर्श घेण्याची बिकट वाट पत्करली आहे. तेव्हा ती चालणं भागच आहे..

‘प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा माझा ठसा’ असं अगदी आत्मविश्वासानं लिहिणाऱ्या शांताबाईंसारखं एकूणच साहित्यावर मन:पूर्वक प्रेम करणारं व्यक्तिमत्त्व विरळा. त्यांचं शब्दांवर असणारं प्रेम किती तऱ्हांनी प्रकटलं आहे! शब्दांशी अगदी न कळत्या वयात त्यांचं नातं जुळलं आणि त्या शब्दांच्याच होऊन गेल्या. शब्दांवेगळं अस्तित्वच नव्हतं जणू त्यांना. आणि तरी कधीतरी त्यांनी म्हटलं आहे, मी कधीचीच शब्दांची, ते कधी होतील माझे..

कवयित्री आणि गीतकार अशी मुख्य ओळख असणाऱ्या शांताबाईंनी अगदी सुरुवातीपासून म्हणजे १९४४ पासून कथा लिहिल्या. ‘ओढ’, ‘धर्म’, ‘मायेचा पाझर’सारख्या ८-९ कादंबऱ्या त्यांच्या नावावर आहेत. ललित लेखन, सदरलेखन यांची ४० च्यावर पुस्तकं आहेत. कितीतरी अनुवाद आहेत. बालसाहित्य आहे. चित्रपटगीतसंग्रह, कवितासंग्रह तर आहेतच. शिवाय संपादनंही! विनोद आणि नाटक वगळता त्यांनी अगदी मुक्तसंचार केला साहित्यविश्वात.

त्यातही ललितगद्य  हा साहित्यप्रकार शांताबाईंनी सातत्यानं हाताळला. श्री. म. माटे हे त्यांचे स. प. महाविद्यालयातले गुरू. ते एकदा त्यांना म्हणाले होते, ‘‘काही अनुभव बचकेने उचलायचे असतात तर काही चिमटीने..’’  शांताबाईंच्या ललितगद्यात असे चिमटीने उचललेले कितीतरी अनुभव आहेत. त्या म्हणत, की ‘डोळे उघडे ठेवून वावरणाऱ्या कुणालाही विषयाचा तुटवडा पडू नये.’ खरोखर  रोजच्या जगण्यातले अनेक अनुभव, व्यक्ती आणि विचार ही त्यांच्या ललितगद्याची प्रेरणा आहे.  निसर्गवर्णन, व्यक्तिचित्र, प्रवासलेख, स्मृतिलेख, पत्र, परीक्षण, आस्वाद  असं सर्व प्रकारचं लेखन त्यांनी केलं आहे. अगदी कोणत्याही विषयावर त्यांनी सहज, उत्कट आणि वाचनीय लिहिलं.  एकपानी ते साताठ पानी असा लवचिक विस्तार आहे त्याचा. सिनेमे म्हणू नका, चित्रे म्हणू नका, की  विविध कलावंतांची चरित्रे म्हणू नका. शांताबाईंच्या नजरेत सारे येत होते आणि स्मृतिसंपुटात साठवले जात होते. त्यामुळे त्यांच्या लेखनात खमंग खाण्याचे, गोड गाण्यांचे उल्लेख जसे अगदी स्वाभाविक वाटतात, तसेच कालिदास, भवभूतीचेही. कधी नॉर्वेजिअन अभिनेत्री लिव उलमनचं आत्मचरित्र त्या आपल्यासमोर उलगडतात, तर कधी लॉरेन्स ओलिव्हिए या प्रख्यात अभिनेत्याचे उद्गार कसे नवीच प्रतीती देतात याविषयी लिहितात. कधी चिनी म्हणीचा उल्लेख करून ‘सहावे सुख’ याविषयी चिंतन करतात. खऱ्या अर्थानं मोकळय़ा होतात आणि फुलून येतात ते या ललितगद्य लेखनात. त्यांना बोलण्याची जी हौस होती ती या लेखनाला बोलकं आणि ओघवतं आणि प्रवाही बनवते. वचनं, सुभाषितं, कवितेच्या ओळी, प्राचीन ते अत्याधुनिक साहित्यातले दाखले त्यांचा विषय उजळत राहातात. वृत्तीची उत्कटता आणि शैलीची काव्यात्मता त्यांचं लेखन रसरशीत बनवतं.

 ललितगद्यात केंद्रस्थानी असतो तो लेखक  स्वत: आणि त्याचा अनुभव! आणि तो व्यक्त होतो तोही लेखकाचा अनुभव म्हणूनच. म्हणजे ललितगद्यातला ‘मी’ हा स्वत: लेखक असतो. कविता, कथा किंवा कादंबरीत तसं नसतं. त्यामुळे लेखकाचं व्यक्तिमत्त्व ललितगद्य लेखनात प्रतिबिंब उमटावं तसं स्वच्छ उमटतं.  ललितलेखनातून दिसणारं शांताबाईंचं रूप कसं आहे.. सहज, स्वाभाविक, गप्पिष्ट, मोकळं. ललितकलांविषयीची संवेदनात्मक जाणीव असणारं, लोकांत प्रिय असणारं, जीवनाविषयी अपार कुतूहल असणारं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व प्रकारच्या साहित्यावर आणि कलांवरदेखील नितांत प्रेम करणारं. खरोखर शांताबाई हाती लागेल ते वाचत, अगदी ‘कार्लाईलचा किल्लेदार’ ते कालिदास, भवभूती..!

त्यांना विलक्षण स्मरणशक्तीची देणगी लाभली होती. त्यामुळे या प्रचंड वाचनातले अगणित संदर्भ, कवितेच्या ओळी, किस्से, त्यांना नेमके आठवत आणि त्यांच्या लेखनात सहजपणे जागा पटकावत. या सहजतेमुळे पढीक पांडित्याचा गर्विष्ठ दर्प त्याला येत नाही. कमालीची संवादी वृत्ती असल्यामुळे त्यात वेल्हाळपण आलंय. सदरलेखनाविषयी त्यांनी म्हटलं आहे, ‘अशा प्रकाराच्या लेखनाची पहिली प्रेरणा पैसा ही असेलही, नव्हे असतेच. पण तो काही त्याचा  शेवट नव्हे.’ म्हणजे त्यांना याची जाणीव होतीच. आणि  त्याचा त्यांनी विचारही  केला होता. गरजेपोटी त्यांनी गाईड्स लिहिली, अन्य मागणीनुसार लेखन केलं, पण त्यांचा कधीही असा दावा नव्हता, की त्या साऱ्या कलाकृती  आहेत. त्यांच्या मोकळय़ा, साध्या आणि स्वागतशील वृत्तीचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात सदैव पडलं आणि ते ‘लव्हेबल’आहे. त्यांची मराठी भाषा फार वेल्हाळ आहे. क्वचितच कधी लेखनात इंग्रजी शब्द येतो, कारण ती जुन्या-नव्या साहित्याच्या वाचनावर पोसली आहे.

‘माणसाखालोखाल मला निसर्ग प्रिय आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे. खरोखर याचं प्रत्यंतर आपल्याला त्यांच्या लेखनात येतं. माणसात वावरताना येणारे अनुभव जसे त्यात संख्येनं जास्त आहेत तसेच निसर्ग सहवासाचेही. निसर्गाशी समरस होण्याचं अंग त्यांना पिंडातूनच मिळालं होतं. त्यांची  काही शीर्षकंच पाहा..‘पावसाआधीचा पाऊस’,  ‘ललित नभी मेघ चार’, ‘गुलाब, काटे, कळय़ा.’

सातत्यानं केलेलं वाचन आणि लेखन, अनुभव उत्कटतेनं घेणं, आविष्कारातली सहजता, शैलीतलं लालित्य, अनुभव मांडताना त्यावर ठायी ठायी केलेली चिंतनपर भाष्यं यांमुळे त्यांच्या ललितगद्याला त्यांचा विशिष्ट असा रंग आहे. त्यांच्या ज्ञानाची ऊब आहे आणि ते रंजकही आहे. त्यात तोरा नाही, भपका नाही. काही विशेष सांगतोय असा आविर्भाव नाही. ‘वडीलधारी माणसे’मध्ये त्यांनी ज्यांच्याविषयी लिहिलं आहे त्यात काही सर्वजण वडिलधारे नाहीत. त्यात काही व्यक्तिचित्रं उत्कृष्ट उतरली आहेत. विशेषत: ‘वहिनी’ हे त्यांच्या आईचं आणि ‘दुर्गाबाई’ हे. या प्रकारचं लेखन त्यांनी आणखी करायला हवं होतं असं वाटावं इतकं अप्रतिम!  

‘एखादी गोष्ट आठवत नाही आता, असं त्या सहजपणे सांगून  मोकळय़ा  होतात. ‘आपण जे लिहिलं आहे ते चार लोकांपुढे आलं पाहिजे, त्यांनी ते वाचलं पाहिजे’ ही ऊर्मीही कविता लिहिण्याच्या ऊर्मीइतकीच प्रबळ होती, हेही शांताबाईंनी प्रांजळपणे सांगितलं आहे. त्याशिवाय ‘निर्मितीच्या आनंदाला परिपूर्णता येत नाही,’ हे त्यांनी जाणलं होतं.

  इतक्या कादंबऱ्या लिहूनही त्यांनी म्हटलं आहे, ‘‘कादंबरी हा मला न जमलेला साहित्यप्रकार आहे.. आता वाईट वाटतं, की कादंबरी निर्माण करू शकतील असे विषय त्या वेळी आमच्या जातीत, आसपासच्या घरांत कितीतरी होते. त्यात अंतर्भूत असलेली कथानकं, व्यक्ती, घटना, प्रसंग माझ्या डोळय़ांसमोर मला दिसत होते, पण त्यातलं जिवंतपण मला पकडता आलं नाही.’’ स्वत:च्या लेखनाची इतकी वस्तुनिष्ठपणे चिरफाड अन्य कुणा लेखकानं केली असेल की नाही, शंकाच आहे. 

कविता आणि गीतं

शब्दांच्या माध्यमातून शांताबाईंच्या ओळखीची झालेली कवितेची रूपं छापील स्वरूपात नव्हतीच! अगदी नकळत्या वयात कानावर पडलेली गाणी, श्लोक यांनी त्या नादावून गेल्या होत्या. शांताबाईंनी म्हटलं आहे, ‘‘तिच्यातल्या नादाचे नर्तन, तिचे लडिवाळ खटके, तिची विशिष्ट लय, बोलीभाषेच्या संगतीने प्रकट होणारे तिचे मनोगत या सर्वानी  मला अगदी मोहून टाकले.’’

शब्द, त्यांचा नाद, त्यांची पुनरुक्ती, त्यातून उठणारी उच्चारांची मजेशीर वलयं याचं त्यांना वेड लागलं होतं आणि शाळकरी वयात लागलेलं हे कवितेचं वेड वाढत गेलं. पोरवय सरत गेलं आणि आधुनिक कवितेच्या प्रांगणात त्यांचा प्रवेश झाला. बालकवी, रविकिरण मंडळाचे कवी- विशेषत: माधव जूलियन, यांच्या कवितेची त्यांच्या जिवाला भुरळ पडली. १९४२-४४ नंतरच्या काळात मात्र मर्ढेकरांच्या कवितेनं त्यांच्या ‘मनात जणू धरणीकंप’ झाला. त्यांच्या कल्पनेतील कवितेविषयीचे सगळे दिखाऊ, सुबक संकेत जमीनदोस्त  झाले. काव्यविषयक जाणिवा पार बदलून गेल्या. ‘कविता ही एक काळजाला झोंबणारी, जीवन व्यापून टाकणारी, स्वत:कडे आणि जगाकडे बघण्याची अगदी वेगळी दृष्टी देणारी शक्ती आहे. तो आनंद आहे, तशीच वेदना आहे,’ याची तीव्र जाणीव त्यांना झाली. पण म्हणून त्यांची कविता बदलली असं नाही.

शांताबाईची कविता भावगंभीर गाभ्याची कविता आहे. ‘दिवसगतीने फिकाच पडतो, रंग सुखाच्या गडद क्षणांचा’ ही जीवनाची उमज तिच्यात आहे. ‘अर्ध्य जसा ओंजळीत धरला जन्म उभा शिणलेला..’ जगताना आलेला  सगळा शिणवटा, उदासीनता त्यांनी ‘अर्ध्य धरावे आणि अर्पावे’ तसा ओंजळीत धरला आहे, असं म्हटलं आहे. म्हणूनच कदाचित त्यांच्या कवितेत जीवनातला अटळ एकाकीपणा आणि शीण , दु:ख आणि शल्यं प्रकटूनही कडवटपणा किंवा संताप दिसत नाही. त्यांचा जीवनावरचा लोभ उणावलेला दिसत नाही.

‘पापणी श्रांत लवताना मी विसरू बघते काही’ अशी स्वत:च स्वत:ला अनोळखी असण्याची आणि एकाकीपणाची गडद जाणीव तिच्यात आहे. अनाम भीती, आधारासाठी पार्थिवावर विसंबून राहाण्याऐवजी निराकार तत्त्वाकडे वळणं.. हेही पुन:पुन्हा दिसतं तिच्यात. ‘सर्व काही व्यर्थ आहे जाणते मी,’ असं असूनही जीवनाचा हा खेळ त्या समरसून खेळल्या. म्हणूनच सारे आनंदी भाव जगासाठी ठेवून कवितेत मात्र केवळ त्या स्वत: उरल्या. ‘हृदयावरचं अदृश्य ओझं उतरवण्याचं’ निकटचं स्थान अशी त्यांची  कविता आहे. त्यातला सूर अत्यंत आत्ममग्न आहे. ‘कुणीही आत शिरकाव करू न शकणारा कोश मी स्वत:भोवती विणत राहिले’, असं त्यांनी लिहिलंय ते म्हणूनच!

कविता आणि गीत या दोहोंमागच्या प्रेरणा भिन्न असतात तशीच त्यांची कलात्मक मागणीही वेगळय़ा प्रकारची असते. गूढता, सूचकता, अल्पाक्षरत्व आणि संपूर्ण व्यक्तिगत अनुभवांमुळे येणारी पृथगात्मता हे कवितेसाठी आवश्यक असणारे गुण गीतरचनेला मात्र बाधक ठरतात. सोपेपणा, सहजता, ऐकताक्षणी मनात अर्थ उलगडत जाईल अशी शब्दकळा ही गीताची गरज असते, हे जाणून घेऊन शांताबाईंनी आकाशवाणी, चित्रपट आणि ध्वनिमुद्रिका या सर्व माध्यमांसाठी विपुल गीतरचना केली. उत्तम गीतरचनेसाठी आवश्यक ते संस्कार त्यांच्यावर लहानपणापासूनच झाले होते. गेय कवितेच्या विपुल श्रवणामुळे आकर्षक धृवपद, सोपी व नादमधुर रचना, चित्रदर्शी वर्णनशैली व नाटय़ात्मता हे गीतगुण त्यांच्या गीतरचनेत आपसूकच उतरले. लोकगीतांच्या चालींचा गोडवा, कानाला रिझवणारे खटके त्यांच्या गीतांत सहजपणे येत गेले.

‘‘गीतरचना हा प्रकार एका वेगळय़ा तऱ्हेनं आनंददायक आहे. कागदावर निर्जीव वाटणारं गाणं नंतर कलेकलेनं उमलत जातं. सुरांशी बिलगताना, वाद्यांच्या साथीनं उमटताना, गायकाच्या किंवा गायिकेच्या कंठातून चैतन्यमय होताना ते अंग धरतं, उभं राहातं. नाचू लागतं. हे सर्व बघणं हा रोमांचकारक अनुभव आहे..’’ त्यांच्या या स्वागतशील आणि मोकळय़ा वृत्तीमुळे त्या अनेक वर्ष गीतलेखनाचा आनंद घेऊ शकल्या.

लोकोत्सवात वावरणाऱ्या, प्रसन्न आणि मोकळय़ा वाटणाऱ्या शांताबाई त्यांच्या  कवितेत फार वेगळय़ा दिसतात. त्यांचं  ललितलेखन जीवन रसरसून भोगणाऱ्या, मोकळय़ा, गप्पिष्ट, साहित्यावर नितांत प्रेम करणाऱ्या वृत्तीचं प्रतिबिंब आहे. ललितलेखन आणि कविता हे दोन्ही प्रकार आत्मनिष्ठ. इंदिरा संत यांचं ‘मृद्गंध’मधलं लेखन आणि त्यांची कविता एकाच गाभ्यातून आलं आहे, त्याचा प्रत्यय एकाच जातकुळीचा आहे. तसं शांताबाईंच्या कविता आणि त्यांचं ललितलेखन नाही. आपलं अगदी गाभ्यातलं मन; तेही पूर्णपणे नव्हे, पण बऱ्याच अंशी त्यांनी कवितेकडे सोपवलं, असं दिसतं. त्यांची गीतं आणि त्यांचं ललितलेखन प्रसन्न, मोकळय़ा, संवादी स्वरातलं आहे. तर भावकविता केवळ अंतर्मनातला हुंकार असावा, तशी आहे.

बाह्य घडमोडी आणि त्यांवरील त्यांच्या  मनात उमटणाऱ्या प्रतिक्रिया या रेषा त्यांच्या कवितेत किंवा अन्य लेखनात कधी एकमेकींना भिडल्या नाहीत. त्यांची वाटचाल समांतर राहिली. भावपरता हा शांताबाईंच्या पिंडाचा भाग होता. उत्कट आणि अत्यंत संवेदनशील मनावर उमटलेले अनुभूतीचे खोल ठसे त्यांच्या लेखनात उमटले आहेत. आरती प्रभू यांच्यावरचा ‘सुंदरतेला झोंबलेली कुसे’ हा लेख काय, किंवा इंदिरा संत यांच्या ‘मृद्गंध’वरील लेख काय, शांताबाईंचं समीक्षापर लेखनही त्यांच्या भावपर पिंडाचा आविष्कार आहे. त्यात वस्तुनिष्ठेपेक्षा जिव्हाळा अधिक आहे. समीक्षेच्या तात्त्विक बैठकीपेक्षा आस्वाद घेण्याकडे आणि शिक्षकी पेशेमुळे समजावून देण्याकडे त्यांचा कल आहे.

 लोकांतामधल्या शांताबाई आणि एकांतामधल्या शांताबाई ही शांताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाची दोन रूपं होती. त्यांनीच एका कवितेत म्हटल्याप्रमाणे झाडाची मुळं जमिनीखालचं जगणं स्वीकारतात, तशी जीवनाची तळमाती शोधू पाहाणारी अतिसंवेदनशील कवयित्री त्यांच्या भावकवितेत भेटते. आणि त्यांची गीतं व अन्य लेखन झाडाच्या पालवीचा डौल व प्रसन्न मोकळा बहर मिरवतं!

vandanabk63@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-10-2022 at 00:07 IST

संबंधित बातम्या