सूर संवाद: मैफलीतला संवाद..

कोणत्याही मैफलीची सुरुवात खूप आधीपासून सुरू होते. आधी मनात आणि नंतर प्रत्यक्षात. ‘ग्रीन रूम’मध्ये जुळवलेले तानपुरे, हार्मोनियम आणि तबला घेऊन आम्ही सर्व कलाकार रंगमंचावर येतो.

lokranga
सूर संवाद: मैफलीतला संवाद..

आरती अंकलीकर

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

कोणत्याही प्रकारच्या संगीताच्या मैफलींमध्ये कलाकार आणि श्रोते यांच्यात बंध निर्माण होण्यासाठी मैफलीच्या ठिकाणचं वातावरण, स्वरमंचाची रचना, रंगसंगती, स्वरयोजना अशा खूप गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात. हे सर्व नीट जमून आलं तरच मैफल जमते आणि ‘स्वरसंवाद’ साधला जातो..

कोणत्याही मैफलीची सुरुवात खूप आधीपासून सुरू होते. आधी मनात आणि नंतर प्रत्यक्षात. ‘ग्रीन रूम’मध्ये जुळवलेले तानपुरे, हार्मोनियम आणि तबला घेऊन आम्ही सर्व कलाकार रंगमंचावर येतो.. जर ७ वाजता कार्यक्रम सुरू व्हायचा असेल तर आम्ही ५.३० वाजताच रंगमंचावर येतो. तिथे आमच्यावर प्रकाश टाकणारे दिवे असतात. काही वेळा ते प्रखर असतात. ‘एसी’ चालू असतो. त्या एसी, प्रखर दिव्यांमुळे तानपुऱ्याच्या धातूच्या तारा छेडल्यावर येणाऱ्या आवाजात बदल होतात. त्या परत जुळवून घ्याव्या लागतात. तबल्याच्या सुरावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे तोही जुळवावा लागतो. आणि मग आम्ही ‘साऊंड चेक’ला सुरुवात करतो. गाण्यापूर्वीची ही जुळवाजुळव वेगवेगळय़ा पद्धतीनं करावी लागते. ती का, हे अनेकदा प्रेक्षकांच्या लक्षात येत नाही, पण आम्हाला खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं मैफल सुरू व्हायच्या आधीच सोडवावी लागतात.

रंगमंचावर शास्त्रीय संगीताचं सादरीकरण असताना रंगमंच व्यवस्था कशी असावी? त्याची उंची किती असावी? लांबी-रुंदी किती असावी? कलाकाराची नजर आणि श्रोत्याची नजर जोडून सरळ रेष काढली, तर ती उतरती असावी आणि किती उतरती? कलाकार आणि श्रोत्यांमध्ये संवाद निर्माण होण्यासाठीचं अंतर किती असावं? रागप्रस्तुतीचा निर्भेळ आनंद, अनुभव घेण्यासाठी श्रोत्यांनी हॉलमध्ये किती वेळ आधी येऊन बसावं? प्रकाश किती असावा कलाकारांवर? श्रोत्यांवर प्रकाश असावा की नाही? गायकाला संवादासाठी श्रोते दिसणं, त्यांच्या डोळय़ांतील भाव दिसणं, दाद देणाऱ्या त्यांच्या डोलणाऱ्या माना दिसणं किती आवश्यक आहे? रंगमंचावर साथीदार आणि गायक यांच्यात किती अंतर असावं? उशिरा येणाऱ्या श्रोत्यांना आत येण्यास परवानगी असावी का? असल्यास असा कुठला दरवाजा उघडावा, की जेणेकरून कलाकारांची एकतानता भंगणार नाही? ग्रीन रूम ते रंगमंच हा प्रवास किती असावा, जेणेकरून सर्व कलाकारांचं एकाग्र झालेलं मन अलगदपणे रंगमंचावर आणलं जाईल? मैफल रंगण्यासाठी, कलाकार व श्रोत्यांतील संवाद साधला जावा यासाठी असे किती तरी प्रश्न आधी सोडवावे लागतात.

मला एक मैफल आठवतेय. १४-१५ वर्षांची होते मी. ‘ब्राह्मण सहाय्यक संघ, शिवाजी पार्क’ इथे मालिनीताई राजुरकरांचं गाणं होतं. गोविंदराव पटवर्धन हार्मोनियमसाठी आणि वसंतराव आचरेकर तबल्याच्या साथीला. त्या हॉलमध्ये एक ‘बनाबनाया’ स्टेज होतं. पण गाण्याच्या मैफलीसाठी खास स्टेज बनवलं होतं. दीड फूट उंच, दहा फूट आडवं आणि आठ फूट रुंद असावं ते. सगळी वाद्यं, कलाकार यांना बसायला जागा होती. अडचण नव्हती आणि रिकामी जागाही फार नव्हती. असं ‘कॉम्पॅक्ट’ होतं स्टेज. मागे दोन तानपुरे. आणि स्टेजवर पांढरीशुभ्र चादर. कोणतीही शोभिवंत रचना नव्हती. अगदी साधं, नीटसं, सुंदर स्टेज. त्या स्टेजच्या तीनही बाजूला श्रोते बसलेले. भारतीय बैठक. प्रचंड गर्दी होती. मालिनीताई आल्या रंगमंचावर. अतिशय साध्या, सोज्वळ. अगदी माझी लाडकी मावशी येऊन बसावी, तशा साधेपणानं येऊन स्टेजवर बसल्या. साधी साडी, साधी केशरचना. श्रोते आतुरतेनं मालिनीताईंच्या स्वरांची वाट पाहात होते. त्यांची आणि श्रोत्यांची नजरानजर झाली. कोणत्याही संवादाच्या सुरुवातीला संवाद करणाऱ्यांच्या नजरा एकमेकांना भिडल्यामुळे पुढील संवाद सोपा होतो का? की गायकाची नजर अंतर्मुख झाल्यामुळे आत वळलेली असते आणि तो प्रत्येक श्रोत्याच्या नजरेत राग पाहात असतो? मला त्या वेळी प्रश्न पडले होते.

गाणं सुरू झालं. नंतरचा एक तास म्हणजे अद्भुत रागानुभव होता. ताईंचा सुरेल, स्वच्छ आवाज. त्याचा सच्चेपणा. सगळं काही पुरेपूर अनुभवलं. समोरचा पहिला श्रोता आणि ताईंमध्ये केवळ चार फूट अंतर असेल. माझ्या मनात घर करून राहिलेली ही अविस्मरणीय मैफिल, भूपाली तोडीनं सुरू झालेली. तो रंगमंच, हॉल, साधेपणा.. सगळं सगळं डोक्यात आहे. असा माहौल अगदी साजेसा नाही का रागसंगीतासाठी?
आणखी एक मैफिल. ‘गीता गोपाल’ या कार्यक्रमाची. सी. रामचंद्र यांनी स्वरबद्ध केलेल्या रचनांचा हा कार्यक्रम. काही रचना ते गाणार होते आणि एक गायक होते, नाव आठवत नाहीये. मीही ६-७ रचना गाणार होते. सी. रामचंद्र स्वत: घरी आले होते या कार्यक्रमात गाण्यासाठी आमंत्रित करायला. पांढरे स्वच्छ कपडे, राजिबडे होते आण्णा. आमच्या घरी काही तालमी झाल्या, काही त्यांच्या घरी. तबलावादक गोडबोले कायम असत त्यांच्या तालमीला. अण्णांची सावलीच होते ते. सुगम संगीताच्या चौकटीसाठी तालाचा ठेका कायम चालू असणं खूप महत्त्वाचं. ‘साथसंगत’ म्हणजे तबल्याची साथ आणि एरवी आश्वासक संगत असा रोल होता गोडबोलेंचा. पुण्यामध्ये भरत नाटय़मंदिरात कार्यक्रम होता. खूप गर्दी जमली होती. तेव्हा मी १५-१६ वर्षांचीच होते. माझ्याबरोबर आईदेखील होती माझी. आण्णा आम्हाला त्यांच्या गाडीतून पुण्याला घेऊन आले, स्वत: गाडी चालवत. कार्यक्रमाला सुरुवात झाली. अतिशय आकर्षक चाली. माझ्या वाटय़ाला आलेली गाणी तर खूपच उत्तम होती. स्वरलयींची आकर्षक बांधणी. काव्याशी इमान ठेवून. माझी गाणी खूप रंगली. ‘वन्स मोअर’ मिळाले. माझं गाणं संपल्यावर मी उठून मागे बसायला जाणार, तेवढय़ात वन्स मोअरनं हॉल दणाणला. मी संकोचानं मागे जाऊ लागले, तर आण्णांनी ‘‘अहो मावशी, या पुढे आणि घ्या वन्स मोअर’’ अशी आज्ञा केली. भरत नाटय़च्या स्टेजवर आणखी एक दोन फूट उंचीचं स्टेज उभारलं होतं. १२ बाय १० चं असेल. बरेच कलाकार होते. आण्णा, मी, कोरस गाणाऱ्या चार जणी, तबला, साइड ऱ्हिदम, बासरी. त्या स्टेजला पायऱ्या मात्र एकाच कोपऱ्यात होत्या. बारीकसारीक हरकती, जागांवर दाद देणारे जाणकार श्रोते होते. कोरस गाण्यांनंतर माझं ‘सोलो’ गाणं होतं. त्यामुळे कोरस गायिका आत ग्रीन रूममध्ये जाऊन बसणार होत्या. मी माईकसमोर गायला बसले आणि धप्पकन आवाज आला. रंगमंचावरच्या सगळय़ांचा भंग नको म्हणून कोरस गाणाऱ्या एका मध्यमवयीन स्त्रीनं धाडस करून पायऱ्या नसलेल्या ठिकाणाहून उतरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. आण्णा, कलाकार, श्रोते सगळय़ांचं लक्ष तिच्याकडे गेलं. ती सावरली, उठली आणि लंगडत आत गेली. सगळय़ांचं लक्ष परत स्वरांवर आणण्यात थोडा वेळ गेला. अशा लहानशा व्यत्ययामुळेही विचलित झालेली सगळय़ांची मनं परत मार्गावर आणणं अवघड असतं. पण अण्णांच्या गाण्यांच्या मोहिनीनं लवकरच जादू केली. खरं तर त्या रंगमंच व्यवस्थेत कमतरता होती. दोन्ही बाजूंना पायऱ्या असणं गरजेचं नव्हतं का?
हल्ली रंगमंचाला स्वरमंच असंही म्हणतात बऱ्याच वेळा. स्वरांच्या दुनियेची सफर घडवणारा मंच- ‘स्वरमंच’! आणि रंगमंचही साजेसाच शब्द वाटतो.. जिथे सप्तरंगांची उधळण होते. स्वरांनी चितारलेल्या चित्रात रंग भरण्यासाठी तो रंगमंच.

आणि हो, मागील लेखात ऑस्ट्रेलियाच्या मैफलीबद्दल सांगीन म्हटलं होतं.. तर अखेर मला ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळाला! केवळ तीन दिवस आधी मिळाला. मी जेमतेम एक दिवस आधी मेलबर्नला पोहोचले. तीन दिवसांचा महोत्सव होता. माझं गाणं दुसऱ्या दिवशी होतं. मी पहिल्या दिवशीचा कार्यक्रम ऐकायला गेले. अतिशय आलिशान हॉल. १००-१२५ वर्षांपूर्वीचा. बनाबनाया स्टेज तिथंही होताच, पण त्यांनी तिथं नाही केला कार्यक्रम. तिथल्या अनेक श्रोत्यांना भारतीय बैठक आवडते. त्यामुळे दोन फूट उंचीचं स्टेज बनवलं होतं. समोर ५०-६० श्रोते. बहुतांशी विदेशी नागरिक. भारतीय बैठकीवरचे. मागे साधारण ३०० खुच्र्या. भारतीय बैठकीवर बसलेल्या श्रोत्यांचा आणि कलाकाराचा संवाद उत्तम साधला गेला. पहिल्या रांगेत खुर्चीवर बसणाऱ्या श्रोत्यांचं ठीक होतं, पण मागच्या रांगेतल्या श्रोत्यांना कलाकार दिसण्यात खूप अडथळे येत होते. कार्यक्रम संपला. मी स्टेजबद्दलची नाराजी व्यक्त केली. सगळय़ांचं एकमत झालं, की कमी उंचीचं स्टेज हे साजेसं नव्हतं. अतिशय तत्पर कार्यकर्ते, मंडळाचे कार्यशील सभासद यांनी दुसऱ्या दिवशी लवकर येऊन सगळी रंगमंच व्यवस्था बदलली. इतकं सोपं काम नव्हतं ते. ध्वनिसंयोजन व्यवस्थाही पूर्ण बदलावी लागली. हॉलच्या मूळ स्टेजवर एक फूट उंच स्टेज बनवलं आणि कार्यक्रम उत्तम पार पडला. सगळय़ा श्रोत्यांना निर्भेळ आनंद लुटता आला. रंगमंचीय व्यवस्था इतकी महत्त्वाची असते ते पुन्हा एकदा सिद्ध झालं.

भारतात अनेक ठिकाणी अतिशय नयनरम्य स्थळी महोत्सव होतात. बनारसमध्ये होणाऱ्या गंगा महोत्सवात गंगेच्या पात्रात रंगमंच उभा करतात आणि गंगेच्या तीरावरील घाटाच्या पायऱ्यांवर बसून श्रोते संगीताचा मनसोक्त आनंद लुटतात. गंगेवरील अपार भक्ती आणि सुरांवरील प्रेम या दोहोंचा संगमच त्यांना भावानुभव देतो. ठाण्यात तलावपाळीवरदेखील मी काही कार्यक्रमांत गायले आहे. तलावात स्टेज आणि तलावाच्या काठावर असलेल्या पायऱ्यांवर श्रोते. एलोरा महोत्सव (वेरुळ महोत्सव) ऐकण्याचा आणि तिथे गाण्याचा अनुभवही अद्भुत. अतिशय सुरेख रंगमंच, आकर्षक रोषणाई आणि रंगमंचामागे दिमाखात उभं असलेलं कैलास मंदिर. त्या स्थळाप्रति असलेला भाव मनात घेऊन महोत्सवातल्या कलाकृतीचा आनंद घेणं हा एक आगळा अनुभव. तसंच मंदिराच्या गाभाऱ्यात बसून गाणं हादेखील तसाच अनुभव. तिथलं वातावरण प्रासादिक आणि श्रोत्यांचा भक्तिभाव, समर्पण भाव, गायकाचाही तोच भाव, यामुळे भावाभिव्यक्ती सुकर होते आणि त्यायोगे गायक-श्रोता हा संवादही.

माझ्या स्मरणातला उत्कट अनुभव देणारा रंगमंच म्हणजे १९८३ मध्ये सवाई गंधर्व महोत्सवात गाण्याचा. मी अवघी २० वर्षांची होते. इतक्या मोठय़ा महोत्सवात प्रथमच गाण्याची संधी मिळाली होती. रंगमंच सजावट तशी साधीच होती. आजच्या सजावटीच्या मानानं श्रोता रंगमंचाच्या अगदी जवळ. त्या रंगमंचावर गेल्यावर समोर श्रोत्यांचा समुद्र पाहिल्यावर मनात आलेले भाव अजूनही ताजे आहेत. अनेक दिग्गज साधकांनी आपल्या परिपक्व झालेल्या कलेनं उजळून टाकलेला तो रंगमंच. स्वरांच्या तेजानं लखलखणारा, श्रोत्यांच्या प्रेमात नाहणारा तो रंगमंच. सिद्ध आसन. त्या रंगमंचावर बसल्यावर अनेक दिग्गज कलाकार समोर दिसतात. प्रगल्भ श्रोतेही दिसतात. नुकतीच शिकायला सुरुवात केलेली युवासेनाही दिसते. प्रत्येक बारकावा समजणारे श्रोते. उत्कटतेनं दाद देणारे, गाठलेल्या समेवर माना डोलावणारे. या रंगमंचावर पाऊल ठेवताक्षणी आधी गायलेल्या तमाम दिग्गजांच्या भावविश्वाचं ओझं मनावर. पण त्याची परिणती म्हणजे क्षणात भानावर येणारं, एकाग्र होणारं मन आणि अनुषंगानं पुढचं उत्कट सादरीकरण.

हल्ली खूप मोठे महोत्सव होतात. मोठमोठय़ा पटांगणात उंच स्टेज, श्रोते दूर. स्टेजच्या मागच्या झाडांवर कधीकधी १०० मीटर उंच रोषणाई असते. खूप सजवलेलं स्टेज. श्रोत्यांना गायक मुंगीएवढा दिसत असेल मागून. त्यामुळे जागोजागी स्क्रीन्स लावलेले आणि त्यावर कॅमेरा टिपत असलेली दृश्यं. गायक मंचावर आल्यावर समोरच्या श्रोत्यांच्या डोळय़ांत पाहण्याचा प्रयत्न करतो, तर श्रोते स्क्रीनकडे पाहत असतात. भव्यदिव्य सजावट आणि दिव्यांमुळे श्रोत्यांच्या डोळय़ांना काम खूप आणि कान मात्र मागच्या सीटवर जाऊन बसतात! जिवाचे कान करायचे असल्यास इतर इंद्रियांना काम कमी असलेलं बरं नाही का? पण ही व्यवस्था, कारण एका वेळी हजारो श्रोते ऐकू शकतात तो कार्यक्रम.
माझ्या मनात मात्र अजूनही घर करून आहे ती छोटय़ा हॉलमधली भारतीय बैठकीची मैफल!

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 12:00 IST
Next Story
कलावंतांचे आनंद पर्यटन: परिभ्रमणे कळे कवतुक!
Exit mobile version