‘‘विटकरी आणि कोका-कोला रंगाचा ‘कोट’ घातलेली, सावध, चपळ, ऐटदार आणि नितांतसुंदर! ही आमची शेकरू! ‘महाराष्ट्राचा राज्यप्राणी’ एवढीच तिची आपल्याला एरवी ओळख असते. पण गोव्याच्या रानभूमीत राहाताना मला त्यांचं अगदी जवळून निरीक्षण करायला मिळालं. त्या कधीच पाळीव होणार नाहीत हे मला माहीत आहे आणि तसा प्रयत्नही मी कधीच करणार नाही. पण लांब राहून शेकरूंच्या कुटुंबाचं निरीक्षण करण्यातही न्यारी मजा आहे. त्यांच्या सहवासाची मौज आम्ही पुरेपूर लुटतोय..’’ सांगताहेत प्राणीप्रेमी श्रीरंग फडके. 

मी मूळचा भूगोलाचा विद्यार्थी. मुंबई विद्यापीठातून मी भूगोल या विषयात ‘एम.ए.’चं शिक्षण घेतलं. परंतु व्यावसायिक कारणांसाठी २०१९ मध्ये मुंबई सोडून गोव्यात स्थायिक झालो. गोव्यात पश्चिम घाटात आमची कंपनी निसर्गाच्या संकल्पनेवर आधारलेली दोन रीसॉर्ट चालवते. लहानपणापासूनच निसर्ग, रानावनांची, वन्यजीवांची आवड होतीच. त्यामुळे आडवाटेवरची भटकंती पुष्कळ झाली. त्या अनुभवातून मी निसर्गावर, प्राण्यांवर लेखही लिहू लागलो. गोव्याच्या पूर्वेकडचा भाग पर्यटकांपासून तसा अलिप्तच आहे. ते आमचं खरं कार्यक्षेत्र. पक्षीनिरीक्षण, वनभ्रमंती, पदभ्रमण अशा अनेक गोष्टी तिथे चालतात. संरक्षित रानाच्या बाहेरच्या भागात असलेल्या वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आम्ही ‘प्लॅनेट लाइफ फाऊंडेशन’ हा ट्रस्टसुद्धा चालवतो. 

Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
Rangpanchami was celebrated in Tuljabhavani temple in a devotional atmosphere
जगदंबेच्या मंदिरात सप्तरंगाची उधळण, भक्तीमय वातावरणात तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमी साजरी
Manoj Jarange Patil on Daughter
“मुलीची प्रकृती बिघडली, आईचं उद्या ऑपरेशन, पण मला…”, जरांगे पाटलांचं विधान

 गोव्याच्या पश्चिम घाटात असलेलं आमचं घर रानाच्या गाभ्यात वसलेलं आहे. साहजिकच वनचरांचा इथे मुक्त वावर असतो. मुळात वन्यजीवांचं मुक्त निरीक्षण आणि अभ्यास करणं हाच मी मुंबईहून गोव्याच्या या भागात स्थायिक होण्यामागचा प्रमुख उद्देश होता. हुदाळे (ओटर्स), काही सरपटणारे प्राणी, उडणखार यांसारख्या कमी माहिती असलेल्या वन्यजीवनावर इथे अभ्यास सुरू आहे. संपूर्ण पश्चिम घाटात वावर असलेल्या शेकरूंचं (मलबार जायंट स्क्विरल) हे रान अगदी नैसर्गिक अधिवास. आमच्या वनकुटय़ांच्या मागच्या उंच झाडांवर त्यांचे गोदे पाहायला मिळतात. टाळेबंदीच्या काळात इतर कामांना विराम मिळाल्यानं मला या प्राण्याचं बऱ्यापैकी निरीक्षण करण्याची संधी मिळाली आणि त्यातल्या एका शेकरूनं माझं लक्ष वेधून घेत शेकरू अभ्यासाची वाट माझ्यासाठी आनंददायी केली.

मला मोहवणारी ही शेकरू खार होतीच खास! बहुधा आधीच्या वर्षीच्या थंडीच्या सुरुवातीच्या दिवसांतच तिचा जन्म झाला असावा. अगदी लहान, इवलुशी असताना एकदा मला तिला बघायची संधी मिळाली होती. फारच गोजिरं रूप होतं तिचं तेव्हा. शून्यात कुठेतरी तंद्री लागलेली असायची. कुणाचीही चाहूल लागली, तर मात्र एकदम गडबड उडायची तिची! थोडी मोठी झाल्यावरही ती दिसायची. पण त्यानंतर मात्र कुठे दर्शन झालं नाही. आमच्या बांधाकडेला असलेल्या एका घोटींगच्या प्रचंड, अजस्त्र झाडावर तिच्या आईबाबांनी सहा एक तरी घरटी बांधली आहेत- म्हणजे तेव्हा तरी होती. देवखार किंवा शेकरूंना अशी एकापेक्षा जास्त घरटी करायची सवयच असते. याचा उपयोग केवळ मीलनकाळापुरता नसून विश्रांतीसाठीही असतो. कलत्या दुपारी, पाचाच्या सुमाराला वाऱ्याची झुळुक मागच्या नदीवरनं यायला लागे आणि यांचं कूळ आनंदानं वाऱ्याबरोबर घरटय़ात झुला झुलायचं. पण नजर आणि कान भारी तिखट! शत्रूचा जरासाही आवाज यांना बेचैन करे आणि त्या कुठल्या कुठे गडप होत. तशी आमच्या भागात, इथे गोव्यातल्या पश्चिम घाटात यांची संख्या खूप. त्यातून हा रानभाग. अनेक मोठाले वृक्ष बांधाकडेला उभे दिसतात. या वर्षीच्या दवात सहज त्या घोटींगच्या झाडाचं विहंगावलोकन करताना एक इवलंसं पिल्लू मला त्या झाडावर दिसलं. अंगावर झगझगीत लाल कोट अजून यायचा होता. शेकऱ्याची पिल्लं तशी कमीच नजरेस पडतात. मोठय़ांचा तो अंगावरचा नैसर्गिक ‘कोका कोला’ रंग काय सुंदर दिसतो! खाली दक्षिणेकडे आपण जसजसे जातो तसा हा कोट अधिक गडद होतो. या बबडय़ावर मात्र तो कोट अजून चढायचा होता. झाडाच्या एका नाजूक फांदीवर बसून रानातले सगळे आवाज हे पिल्लू चौकसपणे टिपत असे. मग अजून मोठं झाल्यावर झाडाझाडावरनं बागडायलाही शिकलं आणि मग काय विचारता, त्यांच्या त्या मशीनगनसारख्या आवाजात आणखी एका आवाजाची भर पडली! कधीकधी त्यांच्या दंग्यानं सार रान दणाणून जाई.

थंडीच्या सरत्या काळात आमच्याकडचे रायआवळे आणि लिंबं चांगलीच बहरात आली होती आणि या पिल्लाबरोबर अजून दोन-चार शेकरू दिवसाचा बराचसा वेळ या झाडांवरच पडीक असत. त्यांचा तो उच्च स्वर  कधी कधी नकोसा होई! पण माणसाच्या वाऱ्यालाही ती उभी राहात नसत. फळांवर यथेच्छ ताव मारून ती आपल्या नेहमीच्या झाडाकडे आश्रयाला जात तेव्हा त्यांचा मार्ग ठरलेला असे. भल्या सकाळी दवाच्या पागोळय़ा झाडांवरून खाली टपटपत असताना या शेकरूही आवाज करायला लागत. कधी उगीच झाडावरनं वर-खाली येरझाऱ्या मारत. पहाटेला पाखरांच्या मंजुळ आवाजाशी तो आवाज मोठा विसंगत वाटे. सूर्याची किरणं त्या घोटींगच्या झाडाला स्पर्श करू लागताच माणसांची चाहूल घेऊन ते वरखाली उतरत आणि विलक्षण वेगात आवळय़ावर किंवा लिंबावर चढत. त्यांची खायची पद्धतही फारच मजेशीर. आवळे तोडून पुढच्या दोन पायात पकडून कुरतडत बसणार. लिंबंही तशीच खाणार. पेरू मात्र झाडावरच चावणार! कित्येकदा त्यांचा ब्रेकफास्ट ‘शेअर’ करायला अनेक पक्षी, त्यात मलबार पोपट, लोरीकिट जातीचे पोपट, बुलबुल आणि वानरं असणारच असणार!

   वानर आणि शेकरूंच्यात बऱ्याचदा जुंपलेलीही पाहायला मिळे. वानरांनी कितीही त्रास दिला, तरी या जागच्या हलत नसत. शेवटी खाली पडलेली फळं खाण्यावाचून वानरांना गत्यंतर नसे. शेकरूंचा परतीचा मार्गही मोठा प्रेक्षणीय. आवळय़ावरनं उतरल्यावर धावतपळत आमच्या घराच्या बाजूच्या आंब्यावर त्या चढायच्या. अख्खं झाड तपासायच्या. नुकत्याच आलेल्या बकुळी मोहोरात त्यांना फारसा रस नसे. या आंब्यावर आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांना, छायाचित्रकारांना शेकरूंचे वेगवेगळय़ा कोनातून एकदम खासमखास फोटो मिळत. मग आंब्याच्या वरच्या फांदीवरून परस्पर एका वाळलेल्या सागावर त्या यायच्या. सरळसोट खोडावरनं खाली येऊन बाजूच्या ‘पावडर पफ’च्या झुडपातल्या गुलाबी फुलांकडे झेपावायच्या आणि मधासाठी आलेल्या शक्करखोऱ्यांना (एक छोटा, सुंदर पक्षी) आणि लिटिल स्पाइडर हंटरला (लांबडय़ा चोचीचा, छोटा पक्षी) उगीचच उडवायच्या. त्यानंतर जमिनीवरून पळत जाऊन कोकमावर, तिथून फणसावर आणि मग आपल्या मूळ झाडावर असा त्यांचा प्रवास ठरलेला असे. अधेमध्ये रानात फुललेल्या पळस, पांगाऱ्यावरही त्या ताव मारून येत. कुंपणाकडे असलेल्या शेवग्यावरही अधूनमधून दिसत. थंडीच्या सरत्या महिन्याबरोबर हा सर्व कबिला बहुधा दुसऱ्या झाडावर किंवा दुसऱ्या भागात स्थलांतरित झाला. कदाचित तिथे खाण्यापिण्याची जास्त चंगळ असावी. त्यांच्या उपस्थितीला सरावलेलो आम्हीही त्यांना काही दिवसांत विसरलो.

उन्हाळय़ाचे दिवस सुरू झाले. बहावा आणि सोनमोहोर बहरायला लागला. गुलमोहोराचं अंग अंग लाल फुलांनी कुंद झालं. एके सकाळी एका शेकरूची हाळी ऐकायला आली. मी बाहेर जाऊन पाहातोय, तो आंब्यावर मस्तपैकी ताव मारताना हे ‘पोर’ मला दिसलं! ते जुनंच असणार, कारण त्यांचे फिरायचे सर्व रस्ते यानं आत्मसात केलेले. बाकी कुणी दिसत नव्हतं. बहुधा सोडून गेले असावेत बाकीचे. आपल्या ठरलेल्या रस्त्यानंच हे खुडबुड करत होतं. लहानपणीची अंगावरली लव जाऊन मस्त विटकरी रंग आला होता. मोठे गोल कान, मिश्या, बोलके पाणीदार डोळे! त्यानंतर ते रोजच आमच्या जागेत दिसायला लागलं. सध्या मात्र आपला मुक्काम त्यानं फणसाच्या झाडावर हलवलाय. मस्तपैकी पिकलेल्या फणसावर ते हल्ली ताव मारत असतं. खायचा सुकाळ असल्यानं ही शेकरू आता बरीच धीटही झालीय. जमिनीवरूनही तिचा मुक्तसंचार चाललेला असतो. कधीमधी सुपारीच्या बागेतल्या गर्द सावलीत तिला दिवसभर बसायला फार आवडतं. कलत्या दुपारी नदीकडून येणारा थंड वारा सुरू झाला, की ही आपल्या मूळ झाडावर वापसी करते. आमच्या जागेच्या एका कडेला उंच झाडावर व्याधाची एक जोडी राहाते. त्याची शीळ आली रे आली, की ही घाबरलीच म्हणून समजा! हल्लीच एका दुपारी माझ्या खोलीत मी वाचत पडलो होतो, तोच व्याधाची शीळ आली आणि त्यामागोमाग ही स्वारी आमच्या खिडकीत अवतरली. चेहऱ्यावर खूप घाबरल्याचे स्पष्ट भाव. चांगलंच भ्यालं असावं. मिश्या थरथरत होत्या. खिडकीच्या पडद्यावर बराच वेळ बसून त्या व्याधाच्या जोडीकडे ती पाहात बसली होती. मग काही वेळानं निघून गेली. तिचा तो काळसर विटकरी रंग भलताच उठून दिसत होता. एकदा सकाळी सकाळी व्हरांडय़ात खुडबुड ऐकू आली. हळूच दार उघडलं, तर समोर व्हरांडय़ातच स्वारी ऐटीत बसून आपली सुंदर झुबकेदार दुरंगी शेपटी साफ करत होती! भलतीच धीट झाली म्हणायचं! स्वच्छतेची खात्री झाल्यावरच उठली. मी तिच्यासमोर बराच वेळ बसलो होतो, तरी माझ्या उपस्थितीला तिनं आक्षेप घेतला नाही. कदाचित नियमित दिसणाऱ्या माणसांना हे जंगली प्राणीही ओळखत असावेत. मात्र म्हणून तिला पाळीव समजून खाणंपिणं द्यायची चूक आम्ही केलेली नाही. तिचं नैसर्गिक खाणं तिला मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि निसर्गत:च आत्मनिर्भर झालेल्या तिला परावलंबनाच्या कुबडय़ा लावायची आमची इच्छा नाही. आम्ही तिच्या अधिवासात आलो आहोत, त्यामुळे तिनं आम्हाला स्वीकारलं आहे ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.

आंबा-काजू-कोकमाच्या दिवसांत ती कुठे ना कुठेतरी मस्त वावरत असते. संध्याकाळी कुंडावर पोहायला गेलो असता वरच्या झाडावरनं आम्हाला पाहात बसते. आमच्याकडच्या एका रायवळच्या आंब्याला आम्ही एक झोका बांधलाय. कधीतरी ती त्यावर बसून झोकेही घेते! फांदीवर विश्रांती घेत असता त्या झाडावर आलेल्या एखाद्या सुतारपक्ष्याला किंवा तांबट पक्ष्याला बघत बसते. बहाव्याच्या शेंगा तिला भारी प्रिय! कधी कधी ते खात बसते. तिचं निरीक्षण करताना आमचा वेळ अगदी आनंदात जातो. रात्रीतून काजव्यांच्या असंख्य वाती आमच्या रानावर तेवत असताना कधी अचानक तिची साद ऐकू येते. रात्रीच्या अंधारात तिच्या नेहमीच्या फणसावर विजेरी मारली असता चक्क फणस खातानाही ती सापडते. कधी काटांदरही तिच्या आसपासच्या फणसावर वावरताना दिसतात.

निसर्गाचं हे अत्यंत प्रेक्षणीय आणि आनंददायी लेणं कधी ना कधी इथून दुसऱ्या ठिकाणी आपला संसार थाटायला किंवा बागडायला जाणार याची आम्हालाही जाणीव आहे. त्यामुळे आम्ही आता गवसलेले हे शेकऱ्यांचे दिवस मनापासून जगतोय! या बयेचा जोडीदारासाठी शोध सुरू झालाय का माहीत नाही, पण लवकरच तो होईल! न जाणो तिच्याच मालकीच्या जुन्या घोटींगच्या झाडावर ती माहेरपणाला येईल आणि आम्ही तिच्या पुढच्या पिढीला वाढताना, आमच्या आवारातल्या आवळय़ावर किंवा फणसावर मोठं होताना पाहू शकू..

shreerang.kanha@gmail.com