scorecardresearch

सोयरे सहचर : ‘अच्छे इन्सान जरूर बन जाओगे!’

प्रेमानं कुत्रा पाळणाऱ्याच्या आयुष्यात त्या लहानग्या जीवाचं स्थान काय असतं, हे ते प्रेम मनात असल्याशिवाय कदाचित कळणार नाही.

– नीना कुळकर्णी

प्रेमानं कुत्रा पाळणाऱ्याच्या आयुष्यात त्या लहानग्या जीवाचं स्थान काय असतं, हे ते प्रेम मनात असल्याशिवाय कदाचित कळणार नाही. तुमच्यावर अवलंबून असलेलं, पण जीव लावणारं, ज्याच्यासाठी तुम्ही जगातली सर्वोत्तम व्यक्ती आहात असं कुणी तरी आजूबाजूला आहे, हे वाटणं अद्भुत आहे! आपल्याही नकळत माणूस म्हणून जास्त प्रगल्भ होण्याचा हा प्रवास आहे..

कुत्र्यांचं प्रेम माझ्या मनात निर्माण वगैरे झालं नाही, ते मुळातच होतं. आनुवंशिकतेनं आलेलं म्हणतात ना, तसं! पण माझा प्राणिपालनाचा प्रवास जसा सुरू झाला, तसतशा या सोयऱ्या सहचरांबद्दलच्या विविध नाजूक भावना उलगडत गेल्या. एखाद्या विशिष्ट कुत्र्याला भेटताक्षणी तो ‘माझा’ आहे, अशी अत्यंत आपुलकीची, जवळिकीच्या नात्याची भावना वाटणं, कुत्र्यांना आपल्याला काय सांगायचंय हे समजणं, कुत्र्यांच्या असण्यानं घर हसतंखेळतं होणं आणि कुत्रा गेल्यानंतर येणारी, आपण कधी विचारही केला नसेल अशी प्रचंड उदासवाणी पोकळी, हे सारं जग वेगळंच आहे. ज्यानं प्राण्यांवर प्रेम केलंय, त्यांना हे अचूक समजेल.

माझ्या वडिलांना कुत्र्यांची खूप आवड. माझ्या लहानपणी त्यांनी एक छानशी अल्सेशियन कुत्री पाळली होती. रोझी तिचं नाव. मी ९ वर्षांची असताना ती आमच्याकडे आली आणि पुढे १३ वर्ष होती. तेव्हाचा काळ वेगळा होता. आम्ही मुंबईत ज्या सहनिवासात राहायचो, तिथे जवळपास माझ्या सगळय़ाच मित्रमैत्रिणींकडे कुत्री पाळलेली होती. कॉलनीतसुद्धा मोकळी कुत्री असत. त्यामुळे एखाद्याकडे घरी कुत्रा पाळलेला नसला, तरी दुसऱ्या कुणाचं ना कुणाचं कुत्रं खेळायला, लाड करायला आहे, हे आम्ही गृहीतच धरल्यासारखं होतं. रोझी बाबांची लाडकी. माणसं जी कुत्री पाळतात, त्या सगळय़ांवर त्यांचं सारखंच प्रेम असतं, पण तरीही त्यातला एखादा विशिष्ट कुत्रा ‘आपला’ असतो. कुत्रा घरी येताक्षणीच मनात ते पक्कं बसतं. तशी रोझी बाबांची! ती जेव्हा गेली त्यानंतर त्यांना पुन्हा कुत्रं पाळावंसं वाटलं नाही. आमचंही तिच्यावर खूप प्रेम. शिवाय घराचं दार उघडलं की बाहेर कॉलनीतले इतर श्वानमित्र होतेच. त्यामुळे रोझीनंतर आम्हालाही पुन्हा कुत्रा पाळावासा वाटला नाही. पुढे अनेक वर्षांनी जेव्हा माझी मुलं मोठी झाली तेव्हा आमच्याकडे दुसरी कुत्री आली. माझी मैत्रीण शिवाजी पार्कजवळ भटक्या कुत्र्यांना खाणं द्यायचं काम करायची. मीही तिच्याबरोबर अधूनमधून हे काम करायचे. तेव्हा तिला रस्त्यावर एका बास्केटमध्ये कुत्र्याची सहा पिल्लं सापडली. आम्हा मित्रमैत्रिणींनी मिळून एकेक पिल्लू घरी न्यायचं ठरवलं. खरं तर असं रस्त्यावरचं पिल्लू एकदम घरी आणायचं म्हटलं, की त्याची आपल्याला आधीची काहीच माहिती नसल्यामुळे सुरुवातीला खूप लक्ष देऊन निगा राखावी लागते. तरी दिलीप (दिलीप कुळकर्णी) मला म्हणत होता, की नको पाळायला कुत्रं. एकदा कुत्रं घरी आलं की त्याचा खूप लळा लागतो आणि पुढे त्याचं काही बरंवाईट झालं तर तितकाच त्रासही होतो, असं त्याचं म्हणणं. शिवाय तेव्हा नाटक आणि चित्रीकरणांच्या निमित्तानं आम्ही दोघंही अधिक वेळ बाहेर असायचो; पण अखेर त्या सापडलेल्या पिल्लांमधलं एक पिल्लू मी घरी आणलंच. मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिच्यासाठी म्हणून आणलं. मुलं हरखूनच गेली. भारतीय हाऊंड जातीच्या त्या पिल्लाचं नाव आम्ही मस्तानी ठेवलं, पण सगळे तिला मस्ती म्हणायचो. नावाप्रमाणेच ती खूप छान, आनंदी, थोडी चंचल होती. माझ्या मुलीची तर ती जान झालीच, पण आधी कुत्रं नको म्हणणाऱ्या दिलीपच्याही ती महिन्याभरातच खूप जवळची झाली. दिलीप २००२ मध्ये गेला तेव्हा मस्तीला प्रचंड नैराश्य आलं. आपण कुत्र्यावर प्रेम करतो, पण कुत्र्यांच्या आपल्याप्रति किती उत्कट भावना असतात हे आम्ही त्या काळात पाहिलं. तो गेल्यावर भेटायला लोक सारखे यायचे. ती घराचं दारही बंद करू द्यायची नाही. दाराबाहेर एकटक बघत तो कधी परत येतोय याचा अंदाज घेत राहायची. तिनं खाणंही सोडलं. आम्ही तिला औषध द्यायचा प्रयत्न केला, पण ती फार हट्टी होती. पुढे ती जेवायला लागली, पण तिचं बिनसलं ते बिनसलंच. याच वेळी आमच्या ‘आई’ या चित्रपटाची कॅसेट निघाली होती. एकदा आम्ही घरात ती टीव्हीवर लावली आणि चित्रपटात दिलीपचा आवाज येताच मस्ती धावत त्या खोलीत आली. टीव्ही हुंगायला लागली, टीव्हीकडे हरखून बघू लागली. तिला चित्रपट लागलेला नक्कीच कळलेला नसणार, पण दिलीपचा आवाज तिनं अचूक ओळखला होता. त्या क्षणी ती नैराश्यातून बाहेर आली आणि हळूहळू पूर्वीसारखी वागू लागली. पुढे २००४ मध्ये आणखी एक कुत्रं पाळायचं मी ठरवलं. माझी आई म्हणत होती, की आता ही जबाबदारी नको; पण नवीन कुत्रं आलं, तर मुलांची मरगळ जरा दूर होईल असं मला वाटलं. माझ्या मैत्रिणीकडच्या लॅब्रेडॉर कुत्रीला पिल्लं झाली होती. त्यातलंच एक घरी आणलं. आम्ही तिला क्लिओपात्रा म्हणू लागलो. क्लिओला मी मुलांसाठी म्हणून आणलं होतं, पण मीच तिच्या प्रेमात पडले! माझे तिच्याशी काही तरी जिवाभावाचे लागेबांधे असावेत तसं झालं. जशी मस्ती दिलीप आणि सोहाची (माझी मुलगी), तशी क्लिओ माझी झाली! क्लिओ आली आणि आमच्या घरात एक परिवर्तनच झालं. मस्तीला अचानकच स्पर्धक आली होती; पण त्यांची भांडणं लुटुपुटूची असत. लहान मुलं खेळताना भांडली तरी शेवटी जसं ‘तू शिवाजी, आम्ही मावळे’ असं समजुतीनं घेतात, तसंच. मस्तीचे लाड करावे लागायचे नाहीत, क्लिओला मात्र लाड केलेले आवडत. ती अंगानं मोठी, जड होती. तरी हक्कानं मांडीवर येऊन बसायची. दिलीप गेला तेव्हा माझा मुलगा दिविज १५ वर्षांचा होता. तो या काळात खूप उदास राहत असे; पण क्लिओनं घराचं रूप पालटलं. दिविजची कळी खुलली ती क्लिओमुळेच. इतका त्याला तिचा लळा लागला. ती जातिवंत आणि अत्यंत हुशार. घरकामाच्या बायकांचंही तिच्याशी छान पटायचं. मी त्या वेळी माझ्या कामाला सुरुवात केली होती आणि त्यानिमित्त बाहेर असे. तेव्हा मुलं घरात एकटीच असायची; पण दोन-दोन कुत्री घरात आहेत आणि ती मुलांचं रक्षण करतील, या विश्वासानं मी निर्धास्त असे. घराला कुत्र्यांचा किती आधार असतो, हे मला त्या वेळी प्रकर्षांनं जाणवलं.

मस्ती आमच्याकडे १८ वर्ष होती, तर क्लिओ १४ वर्ष. क्लिओला एकाच वेळी ११ पिल्लं झाली आणि त्यातली सर्व जगलीही. काही पिल्लं आम्ही मित्रांना तशीच सांभाळायला दिली, तर काही विकली; पण हा संपूर्ण काळ क्लिओ आणि माझं नातं घट्ट होण्याचा होता. तिचं बाळंतपण, पिल्लं सांभाळणं, ही फार मजेची गोष्ट होती. क्लिओला मी किंवा सोहाच आंघोळ घालायचो. मीच तिला फिरवायला न्यायचे. जणू ती माझी सखीच! क्लिओचं जाणं फार चटका लावून गेलं. त्या वेळी सोहा ‘पेट व्हिस्परर’ म्हणून काम करायला लागली होती. प्राण्यांना आपल्याला काय सांगायचंय, हे तिला बरोबर कळे आणि तिनं त्यातलं प्रशिक्षणही घेतलं होतं. मग मीही या विषयातला एक अभ्यासक्रम केला. क्लिओच्या अखेरच्या दिवसांत सोहा मला म्हणाली, की आपण ‘पेट व्हिस्पिरग’द्वारे तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू या, त्यामुळे तिचं जाणं तू पचवू शकशील. त्याचा बराच उपयोग झाला. तरीही क्लिओ गेल्यावर ३-४ महिने मी फार एकटी पडले होते. तो काळ भावनिकदृष्टय़ा फार वाईट होता. मी पृथ्वीवरची सगळय़ात एकाकी व्यक्ती आहे, असं काहीसं मला वाटे. मग मात्र ठरवलं की आता पुन्हा कुत्रं पाळायचं नाही.

पण पुढच्याच ‘मदर्स डे’ला सोहानं ‘मिनी डॅशंड’ प्रजातीची काळय़ा-भुऱ्या रंगाची रोझी नावाचीच कुत्री आणली. माझ्या लहानपणच्या कुत्रीचं नाव रोझी असल्यामुळे ते मला आकर्षक वाटलं. केवळ त्या एका नावामुळे मी पुन्हा कुत्रं पाळायला तयार झाले. (आमची क्लिओ जेव्हा गेली, नेमका तेव्हाच कुठे तरी रोझीचा जन्म झाला होता, हा आणखी वेगळाच योगायोग! अर्थात हे नंतर कळलं.) मुलांना मात्र ते नाव आवडलं नव्हतं. रोझी हे काय नाव आहे, असं म्हणून दोघांनी तिला काही तरी फॅन्सी नाव देऊन पाहिलं; पण ती पठ्ठी फक्त रोझी म्हणून हाक मारली तरच येते! ही रोझी आता ४ वर्षांची होईल. गतवर्षी एका दिग्दर्शकांच्या घरचा एक वर्षांचा बीगल कुत्रा ‘फॉस्टर होम’ म्हणून माझ्या घरी आला. त्यांना काही कारणामुळे त्याला सांभाळणं शक्य होणार नव्हतं. तो आमचा स्काय. आता तोही ३ वर्षांचा होईल. आल्याबरोबर त्याची आणि रोझीची दोस्तीच झाली. आमच्या मस्ती आणि क्लिओचंही पटायचं, पण त्यांची मैत्री अशी नव्हती. त्या एकमेकींना ‘टॉलरेट’ करायच्या. रोझी मात्र स्कायवर लट्टूच झाली! माझं मांजरींशी कधी फारसं सख्य नव्हतं; पण आता आमच्याकडे कोको ही ‘ब्रिटिश लाँगहेअर’ प्रजातीची मांजर आहे. ती इतकी सुंदर आहे, की हॉलमध्ये येऊन बसली की अगदी पुतळय़ासारखी दिसते!

प्राणी पाळायचा असेल तर मूळची आवडच लागते. मला ती वडिलांकडून मिळाली; पण आवड नसेल तर ते अडचणीचं होऊ शकतं. मांजर तरी स्वावलंबी असते, पण कुत्रा ही पूर्णवेळची जबाबदारी आहे. तो आपल्यावर अवलंबून असतो. पाळीव प्राणी सांभाळताना आपल्याही स्वभावात खूप फरक पडतो. कुत्रं सुरुवातीला घरातली कोणतीही वस्तू पाडतं, फोडतं, घरात घाणही करतं. त्याला शांत राहून हाताळावं लागतं. आपल्या सगळय़ा ‘ओसीडी’ बाजूला ठेवाव्या लागतात! पण त्यांना वाढवण्यात एक वेगळा आनंद असतो. कुत्री रक्षण करतातच, पण अमाप प्रेम देतात. आपण कोणाचे तरी आहोत, हा ‘सेन्स ऑफ बीलाँगिंग’ त्यात असतो. तुम्ही त्यांच्यासाठी जगातली सगळय़ांत चांगली व्यक्ती असता, हे सुखावून जातं. घरात आपल्याबरोबर कुणी तरी आहे, या जाणिवेनंही मनाला बरं वाटतं. दोन-तीन वर्षांपूर्वी मी आजारी पडले आणि काही दिवस रुग्णालयात राहावं लागलं. मी जेव्हा घरी आले आणि रोझी मला ‘वेलकम’ करायला समोर आली, तेव्हा तिच्या डोळय़ांत पाणी होतं! मी आजारी होते हे तिला जणू कळलंय असंच ती वागत होती.

मी जेव्हा ‘पेट व्हिस्पिरग’चं प्रशिक्षण घेतलं, त्यानंतरही माझ्या दृष्टिकोनात बराच फरक पडला. त्यांचे स्वभाव कळायला लागले, त्यांना काय म्हणायचंय याचा अर्थ लावता यायला लागला. रोझीला लहानपणी ‘टिक फ्लू’ झाल्यानं ती आजारी होती. मी तिला मांडीवर घेऊन बसले होते. तेव्हा अचानक मला जाणवलं, की आताच्या आता त्वरेनं तिला हॉस्पिटलमध्ये नेलं नाही तर तिचं काही खरं नाही आणि खरोखरच त्यामुळे तिला आम्ही वेळीच वाचवू शकलो. सोहानं मात्र ‘पेट व्हिस्पिरग’मध्ये खूपच प्रावीण्य मिळवलं आहे.

पूर्वी माझे गुरू, ज्येष्ठ दिग्दर्शक सत्यदेव दुबे त्यांच्या अभिनय वर्गात आम्हाला सांगत, ‘‘ या प्रवासात तुम्ही चांगले अभिनेते झाला नाहीत, तरी अच्छे इन्सान तो जरूर बन जाओगे’’.  पाळीव प्राण्यांच्या बाबतीत काही वेगळं सांगणं आवश्यक आहे का!

chaturang@expressindia.com  

शब्दांकन- संपदा सोवनी

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Soyare sahchar author nina kulkarni animallover dog definitely become good person ysh

ताज्या बातम्या