-ऊर्मिला मातोंडकर

‘‘बालपण गावी गायी, म्हशींबरोबर गेल्यानं असेल मला लहानपणापासून प्राण्यांची आवड. कुत्रे तर माझ्याकडे येत गेले. मी त्यांना घरी आणून सांभाळत राहिले आणि ते माझे झाले. थॉर, पंच, लोको, स्टड, रोमिओ कितीतरी.. त्यांचं नि:स्वार्थी प्रेम मला आयुष्यभर मिळालं. अधिकारवाणीने त्यांनी माझ्यावर कायम हक्क गाजवला. अगदी मृत्यूसुद्धा माझ्या कुशीत स्वीकारला. आपला राग आणि प्रेम, आपला आनंद आणि दु:ख त्यांना अचूक कळतं. त्यांच्याकडून मला कायमच अपार प्रेम, माया आणि वात्सल्य मिळालं.’’

98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
girlfriend who murder lover
कोल्हापूर : प्रियकराचा खून करून मृतदेह जाळणाऱ्या प्रेयसीसह आरोपींच्या हातात बेड्या; आजरा पोलिसांची दमदार कामगिरी
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

ईश्वरी प्रतिमेतून आपल्याला एक निश्चित संदेश मिळत असतो, की निसर्ग, मानव आणि पशुपक्षी यांच्यात सुसंवाद हवा, सुखसंवाद हवा. आपण दत्तात्रयांचा फोटो बघतो ना? त्या फोटोत आपल्याला काय दिसतं? दत्तगुरूंच्या आजूबाजूला किती प्राणी असतात! गाय असते, पायाशी श्वान असतो. मला नेहमी वाटतं, एक प्रकारे दत्तगुरू आपल्याला प्राणिमात्रांवर प्रेम करा असाच संदेश देत असतात. प्रेम, आकर्षण, जिव्हाळा या कोमल भावनांचा उगम जणू या ईश्वरी शक्तीतून, दत्तगुरूंच्या प्रतिमेतूनच दृश्यमान होत असतो. आपल्या शास्त्रांमधून, पुराणांमधून हेच तत्त्व अधोरेखित करण्यात आलं आहे. पूर्वी जेव्हा माणूस निसर्गात अधिक रमत होता, तेव्हा त्याच्यात आणि प्राणिमात्रांमध्ये हा सुसंवाद होता. हळूहळू नागरी संस्कृतीचा प्रसार झाला आणि माणूस व निसर्ग, निसर्गातले पशुपक्षी यांच्यात काहीसा दुरावा निर्माण झाला. माणूस त्यांच्यापासून शरीरानं, मनानं खूप दूर गेला. त्याचं मातीशी नातं तुटत गेलं. खरं तर हे पशुपक्षी आपल्याला साधं, सोपं, अकृत्रिम आयुष्य कसं जगावं ते शिकवतात. प्रत्यक्षात आयुष्य किती सोपं असतं, असावं ते त्यांच्यामुळे कळतं.

बालपणातली माझी संपूर्ण उन्हाळय़ाची सुट्टी कोकणात गेली आहे. गाई, म्हशींच्या संगतीत, अगदी मजेत! गाय मला खूप आवडते. तिच्या डोळय़ांत अपार माया, ममत्व, वात्सल्य असतं. ती सात्त्विक जीवनाचं प्रतीक आहे, असं मला नेहमी वाटतं. तिचं हंबरणं हा मानवी संवेदनांचा हुंकार वाटतो मला! या लेखाचा विषय कळल्यावर मी बालपणाचे ते क्षण, ते आयुष्य पुन्हा जगले. मला वाटतं, माझ्या प्राणिप्रेमाची सुरुवात तिथूनच झाली असावी. पण आज मी नक्कीच असं म्हणू शकते, की ज्यांच्या आयुष्यात प्राणी नाहीत ते फार मोठय़ा आनंदाला मुकतात. मला आठवतंय, ‘नयना’ चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं. पावसाचे दिवस होते. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, किर्र काळोख. अशा पावसाळी वातावरणात शूटिंग संपवून मी घरी निघाले होते. अचानक रस्त्याच्या कडेला मला कुत्र्याची छोटी-छोटी चार-पाच पिल्लं दिसली. मन कळवळलं. अशा भयप्रद वादळी हवेत या छोटय़ा पिल्लांचा कसा निभाव लागेल? भय वाटून मी गाडीतून उतरले, आणि थरथरणाऱ्या त्या पिल्लांना उचलून घेतलं आणि ती सारी माझी झाली. त्यांना घेऊन घरी आले. आमची कुत्री लैला हिलासुद्धा आम्ही असंच वांद्रय़ाच्या रस्त्यातून उचलून आणलं आहे. एकदा ‘ट्विटर’वर मी एका कुत्र्याच्या पिल्लाचा फोटो पाहिला. त्याची भावंडं आणि आई रस्ते अपघातात गेली होती. मी ठरवलं, की या पिल्लाला आपण घरी घेऊन यायचं. मी त्याला घरी आणून त्याचं ‘थॉर’ असं नामकरण केलं. एकाला माझ्या पाचगणीच्या घरी ठेवलं, म्हणून त्याचं नाव ‘पंच’. अशा बचाव केलेल्या प्राण्यांना ‘रेस्क्यु अ‍ॅनिमल्स’ असं म्हणतात. पण खरं तर आपण त्यांना वाचवलेलं नसतं. त्यांनीच आपल्याला वाचवलेलं असतं. आपल्या मनातल्या सगळय़ा हीन भावभावनांपासून तेच आपला बचाव करतात आणि आपल्या अंतरीच्या अत्यंत खोल गर्भागाराशी आपली हृद्य ओळख करून देतात. ३५ वर्षांपूर्वी माझ्या काकांकडे डॉबरमॅन, पॉमेरियन अशा वेगवेगळय़ा प्रजातींचे कुत्रे असायचे. काका मूळचे स्वभावाने तापट. पण या मुक्या प्राण्यांशी ते इतके मृदू वागत की आश्चर्य वाटायचं! कुत्र्यांना ते प्रथम जेवू घालत, नंतरच स्वत: जेवत. बालपणी काकांचं हे श्वानप्रेम अनुभवलं आणि वाटायला लागलं, आपणही एखादा कुत्रा पाळायला हवा. माझ्या मित्रांनी मला कुत्रा भेट दिला होता, पण त्या काळात शूटिंग्समध्ये खूप बिझी असायची मी. घरातच नसायची. अनेक लोक पाळीव प्राण्यांना घरात आणून ठेवतात, पण त्यांच्या सहवासात राहत नाहीत. पाळीव प्राण्यांना वेळ द्यावा लागतो. नाहीतर आपल्यात आणि त्यांच्यात ते हळवं, अलवार नातं निर्माणच होत नाही. जेव्हा माझ्याकडे पुरेसा वेळ उपलब्ध झाला, मी ‘लोको’ला घरी आणलं. घरी आणला तेव्हा तो खूप आजारी होता. एक महिना त्याला भरपूर चिकन खाऊ घातलं, त्याची खूप काळजी घेतली. हळूहळू तो व्यवस्थित झाला. नंतर बरीच वर्ष तो माझ्याजवळ होता. अगदी माझं लग्नसुद्धा त्यानं पाहिलं. लोको माझ्यावर इतका हक्क गाजवायचा म्हणून सांगू! मी बाहेरगावाहून घरी आले, की माझं घडय़ाळ, रिंग, मोबाइलसह सगळय़ा गोष्टी दूर ठेवाव्या लागत.  माझ्या अंगावर उडय़ा मारणं हा त्याच्या अत्यानंदाचा खेळ. मला दुखापत होणार नाही अशा बेतानं हलकेच चावेही घेई आणि जणू त्याच्या भाषेत मला जाब विचारत असे, ‘कुठे गेली होतीस मला सोडून’ एकदा मी आणि माझी आई पुण्याला एका समारंभासाठी निघालो, तर तो इतका भांडला की आम्ही परत येऊन त्याला गाडीत घेतलं तेव्हाच तो शांत झाला. हे मुके प्राणी भांडतात आणि रुसतातसुद्धा! पण त्यांचा रुसवा जास्त काळ टिकत नाही. माणूस इतका स्वार्थी, आत्मकेंद्रित आहे की तो वर्षांनुवर्ष राग, दुस्वास करतो. पण प्राण्यांचं तसं नसतं. सध्या ‘थॉर’ला आम्ही शिस्त लावतोय. मग कधी त्यानं अवखळपणा केला की एक चापटी मारावीच लागते. मध्यंतरी दात शिवशिवत असल्यामुळे त्यानं एका पायपुसण्याचे चावून चावून दोन तुकडे केले. त्यासाठी त्याच्यावर मी रागावलेय हे त्याला बरोबर कळलं. आमच्या ‘स्टड’ची गंमत सांगते. हा रॉटवायलर जातीचा दांडगा कुत्रा नि ‘रोमिओ’ एकदम गोजिरवाणा. दोघं एकत्र खेळत. रोमिओचे दात स्टडच्या मागच्या पायांवर उठत. पण दांडगा असूनही तो रोमिओला कधीही दुखवत नसे. इतका तो समजूतदार होता. कोणी घरात आलं तर तो एकटक त्याला बघत बसे. तुम्ही शांत, तर तोही शांत! पण रात्री आठ वाजल्यानंतर माझा सहकारी जर माझ्या खोलीत आला, तर स्टड खोलीबाहेरच गुरगुरत राही. जणू माझा राखणदारच तो!

जे लोक मुक्या प्राण्यांना पाळतात, त्यांना त्यांची भाषा, भावना, अभिव्यक्ती बरोबर कळते. तसंच आपला स्वर, आवाजाची पट्टी, आपला राग आणि प्रेम, आपला आनंद आणि दु:ख त्यांना अचूक कळतं. तो जीव आणि तुम्ही, तुमच्या आपसातील अनुबंधातून हे दृढ नातं निर्माण होत असतं.  हिंदू धर्मात मुक्या प्राण्यांविषयी जे तत्त्वज्ञान मांडलं आहे, त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. हे पुण्यात्मे आहेत. तुमच्या आयुष्यात त्यांच्या असण्याचं उद्दिष्ट वेगळं असतं. तुमचा-त्यांचा ऋणानुबंध असल्यानं ते तुमच्या संपर्कात व सहवासात येतात. तुमचं आणि त्यांचं एक वेगळं, अनोखं नातं निर्माण होतं. एकदा माझे वडील ‘लोको’ला घेऊन मॉर्निग वॉकला गेले असताना   पडले. तेव्हा तो एकदम गलबलूनच गेला! बिचारा एवढासा कोवळा जीव. ‘आता मी काय करू’ या भावनेनं नुसता त्यांच्याभोवती अस्वस्थपणे फिरत राहिला. या मुक्या प्राण्यांना सगळं सगळं कळतं. तुम्हाला असं वाटत असेल की त्यांना माणसांप्रमाणे आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत म्हणजे त्यांना काही कळत नाही. तर तसं समजणं तद्दन चुकीचं आहे. मुके प्राणी तुमच्या आयुष्याशी, तुमच्याशी कमालीचे समरस व एकरूप होऊन गेलेले असतात हा माझा अनुभव आहे. म्हणूनच अगदी ५० ‘पग’मधून आणि १०० ‘डॉबरमॅन’ मधून तुमचा डॉगी तुम्ही नेमका ओळखू शकता! कारण त्यांचे डोळे कमालीचे बोलके असतात. त्या डोळय़ांची हाक, भाषा तुम्हाला नेमकी कळते. करोनाच्या काळात अनेकांनी भीतीपोटी आपल्या घरांतील मुक्या प्राण्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. हे अत्यंत गैर आहे. गीतेत स्पष्ट म्हटलंय, प्रत्येकाला आपल्या कर्माची फळं भोगावीच लागतात. असे निर्दयी लोकही त्यातून सुटणार नाहीत, असं म्हणावंस वाटतं इतका राग येतो मला त्यांचा. हे प्राणी मनुष्यप्राण्यापेक्षाही अधिक प्रेम व जिव्हाळा आपल्याला देतात. अनेक मुलं आपल्या वयस्कर आई-वडिलांशी कृतघ्नपणे वागतात. ‘तुम्ही आमच्यासाठी हे केलं नाही. आम्हाला ते दिलं नाही’ असं ऐकवतात. पण अशी कृतघ्नपणाची भावना प्राण्यांच्या ठायी तसूभरही नसते. तुम्ही त्यांना राजेशाही थाटात ठेवा किंवा सामान्यपणे वाढवा. त्यांना काय हवं असतं? फक्त तुमच्या आयुष्यातला थोडासा वेळ आणि प्रेम. पाचगणीला असते तेव्हा मी लवकर उठून त्यांना फिरायला घेऊन जाते. असा वेळ देऊन तुम्ही त्यांच्यावर नव्हे, तर ते तुमच्यावर उपकार करत असतात. मला स्वत:ला त्यांच्या पंज्यांची निगा राखणं, केसांचं ब्रिशग करणं, त्यांना आवडेल ते खाऊ घालणं खूप आवडतं. ‘लोको’ला बोर्नविटा-बिस्किट लागतं. इडली त्याची अत्यंत आवडती. वाढत्या वयात अशा खाण्याबरोबर त्यांची इतरही काळजी घ्यावी लागते. या नात्यातील सगळय़ात चटका लावणारी, क्लेशदायक गोष्ट म्हणजे त्यांचा मृत्यू! जेव्हा मी लोकसभा निवडणुकीसाठी उभी राहिले होते, तेव्हा नाइलाजानं ‘स्टड’ला दूर ठेवावं लागलं होतं. ते त्याला मानवलं नसावं. त्याचं माझं नातंच तसं होतं. मृत्यूच्या आठवडाभर आधी एकदा तो माझ्याकडे करुणपणे बघत बसला होता. त्या नजरेचा अर्थ मला नेमका कळला. मी मनात म्हटलं, याचे आपले ऋणानुबंध संपले. त्यानंतर आठवडाभर मी त्याला जे जे खायला आवडायचं ते ते खाऊ घातलं. रताळं, चिकन वगैरे. मृत्यूच्या काही क्षण आधी तो तीरासारखा धावत माझ्याकडे आला. माझ्याकडे एकटक पाहत त्यानं या जगाचा निरोप घेतला. त्याच्या आठवणीनं आजही मला रडू फुटतं. त्याला खेळणी खूप आवडायची. पाचगणीला आम्ही त्याचा चबुतरा बांधला तेव्हा त्याच्याबरोबर त्याचा चेंडू ठेवला. त्याला तो चेंडू एवढा आवडायचा की तो तोंडात ठेवूनच पाणी प्यायला दुडुदुडु धावत यायचा! एरवी स्टड आणि रोमिओ एका खेळण्यासाठी भांडत. पण ‘स्टड’ गेल्यावर काही दिवस ‘रोमिओ’ त्या ठिकाणी  फिरकत नव्हता. पण एक दिवस आम्ही पाहिलं, की तो ‘स्टड’च्या चबुतऱ्याच्या नेमका त्याच जागी पहुडला होता. त्याचं डोकं नेमकं ‘स्टड’च्या डोक्यावर होतं. जणू तो अत्यंत मूकपणे रडत त्याला सांगत होता, ‘मित्रा मी तुला मिस करतोय! ये ना परत!’ माझ्या या मित्रांकडून मी अनेक गोष्टी शिकले, शिकते. माझा रोमिओ तर काहीही कारण नसताना गिरक्या घेत घरभर मस्त फिरायचा. आपल्या वाटय़ाला आलेलं आयुष्य आनंदात कसं जगावं हे जणू मला तो त्यातून सांगत असावा. ‘अगं, आयुष्य खूप सुंदर आहे. ते छान मजेत जग!’ मला नेहमी वाटतं, माणसांच्या जगातले रुसवे-फुगवे, स्वार्थ, मतलबीपणा या सगळय़ा गोष्टी माणसाला खुजेपणा देतात. मात्र प्राण्यांबरोबरच्या जगात फक्त निव्र्याज आनंद भरलेला आहे. मात्र हे समजण्याची कुवत, बुद्धी व दृष्टी आपल्याकडे असायला हवी. ती असेल तर माणूस म्हणून स्वत:ची आत्मिक उन्नती साधताना, अडसर ठरणाऱ्या व आपल्याभोवती आपणच उभारलेल्या भिंतींना छेद देणं आपल्याला खूप सोपं होईल.

 नुकताच मी एक वेगळा अनुभव घेतला. टाळेबंदीत मी पाचगणीला आले होते आणि नंतर तिथेच राहिले. त्या काळात सातारा जिल्ह्यात बरंच काम केलं. तिथल्या गावागावांत फिरताना मला तीव्रतेनं जाणवलं, की खेडय़ापाडय़ातल्या माणसांचं त्यांच्या अंगणातल्या जनावरांशी खूप खोल, गहिरं, जिवाभावाचं नातं आहे. गाई, म्हशी, शेळय़ा, मेंढय़ा, बैल, कुत्रे, मांजरी.. सगळय़ांशीच! असं जिव्हाळय़ाचं नातं अगदी उच्चभ्रू वस्तीतल्या सधन घरातसुद्धा कदाचित दिसणार नाही. खेडेगावांत प्राणी आणि माणसांचे बंध खूप घट्ट आहेत. हे प्राणी त्या विश्वाला खूप एकसंध ठेवतात. ईश्वरानं हे विश्व याच प्रेमभावनेसाठी निर्माण केलं आहे. जी प्रेमभावना सर्वच प्राणिमात्रांना एकमेकांशी दृढ बंधनात ठेवते. मात्र माणूस उद्दामपणे, अहंकाराच्या कोषात स्वत:ला गुरफटून घेतल्यामुळे या अत्यंत पवित्र व नैसर्गिक जगापासून खूप खूप दूर येत चाललाय. हे जग जितकं माणसांचं आहे तितकंच या प्राण्यांचंही आहे. ही मनाची विशालता आज अत्यावश्यक आहे. मला या निमित्तानं लोकांना नम्रपणे हात जोडून सांगायचं आहे, की अमुक ब्रीडचाच कुत्रा चांगला, रस्त्यावरचे भटके, अनाथ कुत्रे वाईट, हा उच्च-नीचभाव कृपा करून मनात आणू नका. माझी लैला ‘इंडी’ जमातीची आहे. स्टडची आई चाळीसारख्या लोकवस्तीतून आली होती. चांगल्या ब्रीडचा प्राणी तुम्हाला जे आणि जेवढं प्रेम देतो, त्यापेक्षा काकणभर जास्तच उत्कट प्रेम हे रस्त्यावरचे कुत्रे तुम्हाला देतात. म्हणूनच उच्च-नीच हा भेद पुसून टाकून जे निरपेक्षपणे, संवेदनशीलतेनं प्राण्यांना हाताळू शकतात त्यांनीच प्राणी पाळावेत. मला नेहमी वाटतं, आपण एखादं चांगलं पुस्तक वाचतो, चांगलं संगीत ऐकतो, तेव्हा आपल्याही नकळत आपण एका वेगळय़ाच दुनियेत जातो. एक प्रकारे ते उन्नत आध्यात्मिक जग असतं. ते जग किती सुंदर आहे ते आपल्या मनाला नकळत जाणवतं. नेमकी हीच भावना, हाच आनंद मला या मुक्या प्राण्यांच्या सहवासात लाभतो. माझ्या सहवासात ते जितके आनंदी होतात, त्याच्या कैकपटीनं अधिक आनंद, सुख व समाधान मला त्यांच्या सहवासात लाभतं.

पाळीव प्राण्यांविषयी असं प्रेम असलेली व्यक्ती ही तरल, संवेदनशील असते असं माझं ठाम मत आहे. म्हणतात ना, प्रेम लाभे प्रेमळाला.. हेच खरं!

ती ओळ आल्फ्रेड लॉर्ड टेनिसन यांची ८ जानेवारी २०२२ रोजी ‘सोयरे सहचर’ या सदरामध्ये प्रसिद्ध झालेल्या अरुण खोपकर यांच्या ‘पाय, पंजे आणि पंख’ या लेखात अनवधानाने एक संदर्भ चुकीचा असल्याचे वाचक नारायण वाडदेकर यांनी ध्यानात आणून दिले. त्यानुसार   Nature is red in tooth and claw ही ओळ आल्फ्रेड लॉर्ड टेनिसन या प्रख्यात ब्रिटिश कवीच्या १८५० मध्ये प्रकाशित झालेल्या In Memor या पुस्तकातील आहे.

शब्दांकन- माधुरी ताम्हणे

madhuri.m.tamhane@gmail.com