माधुरी ताम्हणे

‘‘उत्क्रांतीत सर्वाधिक बुद्धीची देणगी लाभलेला माणूस  सोयी-गैरसोयीचा, फायद्याचा विचार येताच प्राण्यापक्ष्यांशी प्रचंड क्रूरपणानं वागू शकतो, हे खरंच आश्चर्यकारक. रूढार्थानं आपली बुद्धी तल्लख झाली,  तरी भावनिक उन्नती झाली का, असा प्रश्न पडावा असे अनुभव पशुवैद्य म्हणून काम करताना मला येतात. प्राण्यांना ‘कमोडिटी’ मानणारा माणूस एकीकडे आणि दुसरीकडे प्राण्यांचं निर्मळ विश्व, त्यांचं आपल्यावरचं शाश्वत प्रेम यातला विरोधाभास मला नेहमीच बुचकळय़ात टाकतो..’’ सांगताहेत पशुवैद्य आणि प्राणीप्रेमी नीलिमा परांजपे.

दहा वर्षांची ती चिमुरडी. मैत्रिणींबरोबर दंगामस्ती करत शाळेतून घरी परतत होती. रस्त्यात तिला एक घोडागाडी उलटलेली दिसली आणि तिच्या बाजूलाच तिचा घोडाही पडलेला, विव्हळणारा, तडफडणारा! ती मुलगी घोडय़ाच्या शेजारी बसकण मारते. स्वत:च्या पाण्याच्या बाटलीतलं पाणी हळूहळू त्याच्या तोंडात सोडते. काहीही न सुचल्यामुळे घोडय़ासाठी हरभरे आणायलाही धावते. घोडय़ाचं डोकं मांडीवर घेऊन त्याला हरभरे भरवण्याचा प्रयत्न करते. घोडय़ाला मायेनं थोपटताना तिला रडू फुटतं.. काही क्षण असेच जातात आणि तो जखमी घोडा तिच्या मांडीवरच अखेरचा श्वास घेतो. ती हबकते, पण त्याच क्षणी तिच्या मनात एक निश्चय पक्का होतो, ‘माझ्या मांडीवर असा कुठलाच प्राणी मरणार नाही. मी त्यांचा जीव वाचवीन. मी प्राण्यांची डॉक्टर होईन!’ 

  ती मुलगी म्हणजे मी! निर्णय घेतल्याप्रमाणे मी खरोखरच प्राण्यांची डॉक्टर झाले. पण त्याहूनही अधिक मी प्राण्यांवर जिवापाड प्रेम करणारी प्राणीप्रेमी आहे. आज ‘रेस्क्यू’ केलेले तीन कुत्रे आणि पंधरा मांजरी माझ्या क्लिनिकमध्ये सुखेनैव नांदत आहेत. हा माझा परिवार! त्यांच्याव्यतिरिक्त आत्तापर्यंत उपचार केलेले असंख्य चतुष्पाद रुग्ण माझे मित्र आहेतच. काही मालकांबरोबर रुबाबात येणारे, काही कुणी जखमी अवस्थेत माझ्या दारात आणून सोडलेले निराधार, रस्त्यावरचे प्राणी.. असा खरं तर माझा भला मोठा परिवार आहे.

   माझ्या प्राणीप्रेमाची सुरुवात फार लहानपणी झाली. आई-वडिलांनी मी दोन वर्षांची असताना मला खेळण्यातला एक लाल रंगाचा गोंडस कुत्रा आणून दिला होता. तो माझा लाडका होताच, पण नंतर घरात एक छोटं कुत्र्याचं पिल्लू आलं. जणू ते खेळण्यातलं कुत्र्याचं पिल्लू जिवंत होऊन माझ्या घरात आलंय असंच मला वाटत असे!

  आम्ही एका मोठय़ा वाडय़ात राहात असू. माझं वय जेमतेम चार वर्षांचं. एकदा आम्ही सगळे मच्छरदाणी लावून खाली झोपलो होतो आणि मी सकाळी जागी होऊन बघते तर काय.. मनीमाऊची नुकती जन्मलेली इवली इवली पिल्लं चक्क माझ्या अंथरुणात, माझ्या कुशीत झोपलेली! माझ्यासाठी ते मोठं ‘सरप्राईज’ होतं. माझी अशी काही गडबड उडाली! मग आईच्या मदतीनं मऊ बिछाना तयार केला, दुधाची वाटी जवळ ठेवली. पुढे तर माझ्या कुशीत, अंगावर मांजराची पिल्लंच पिल्लं असायची. आमच्या वाडय़ातल्या शेजाऱ्यांना मात्र माझ्या या मार्जारप्रेमाचा राग येत असे. ते म्हणायचे, ‘‘हिच्या मांजरी आमच्या दारात नुसती घाण करून ठेवतात.’’ मी तशी लहानच होते. तरीही सकाळी उठल्याबरोबर आईला घेऊन माझा पहिला कार्यक्रम हाच, की या मांजरींनी जिथे जिथे घाण केलीय तिथे जाऊन म्हणजे शेजाऱ्यांच्या दारातली घाण साफ करायची! पण हे काम करण्याचा मला कधी कंटाळा नाही आला.

 आमची ही छोटी पिल्लं कधी आजारी पडायची. पण तेव्हा फारसे पशुवैद्य नसायचे. पिल्लं माझ्या डोळय़ांसमोर आचके देताना, मरताना मी पाहायचे. माझ्या बालमनाला त्याचं फार दु:ख व्हायचं. पुढे मी खूप शोध घेतला तेव्हा घरापासून दूरवर मला एक प्राण्यांचा सरकारी दवाखाना सापडला. मग मी माझ्या आजारी मांजरींना आणि त्यांच्या छोटय़ा पिल्लांना पिशवीत घालून अर्धा तास चालत तिथवर जायचे. पण बहुतेक वेळा माझे प्राणी वाचू शकायचे नाहीत, कारण त्यांच्याकडे तेवढे आधुनिक उपचारच उपलब्ध नसायचे. त्याचं कारण मला पुढे कळलं. १४० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी भारतात ‘बॉम्बे व्हेटरनरी कॉलेज’ची स्थापना केली, ती त्यांचे बग्गीचे घोडे आजारी पडायचे, त्यांच्यावर उपचार व्हावेत म्हणून. भारतात अशा डॉक्टरांना ‘ढोरांचे डॉक्टर’ म्हटलं जायचं. एके काळी गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना अक्षरश: पैसे व खाणंपिणं देऊन हे शिक्षण दिलं जायचं. हा व्यवसाय त्या काळी माणसाला उपयुक्त ठरणाऱ्या गाई, म्हशी, बैल, घोडे, कोंबडय़ा अशा जनावरांसाठी सुरू झाला. त्यामुळे कुत्रा, मांजरं, गाढवं ही तुलनेनं दुर्लक्षित जनावरं होती. आता मात्र निदान शहरांत चित्र बदलत आहे. कदाचित माणसा-माणसांमधली नाती वेगानं तुटत चालली आहेत, माणसांचा एकमेकांवरचा विश्वास उडत चाललाय. हे जाणवल्यामुळे की काय, पण माणसांना प्राण्यांमधला नैसर्गिक निर्मळपणा कळायला, जाणवायला आणि भावायलाही लागला आहे.  प्राण्यांची डॉक्टर म्हणून सर्वच प्राण्यांना कदाचित मी वाचवू शकणार नाही, पण किमान त्यांचे क्लेश कमी करण्याचा तरी मी नक्की प्रयत्न करेन, हा निश्चय सुरुवातीपासूनच केला होता. गंमत म्हणजे माझी ही प्रामाणिक भावना आणि कळकळ माझ्या प्राणी-रुग्णांपर्यंत अचूक पोहोचते. तुम्हाला गंमत वाटेल, पण माझे काही रुग्ण प्राणी ‘डॉ. नीलिमाकडे जायचंय’ म्हटलं तरी नाचतात! ब्रूनो हा लॅब्रॅडॉर कुत्रा तर माझ्याकडे जायचं म्हटलं, की त्याच्या मालकिणीच्या हातात त्याचा पट्टा व गाडीच्या चाव्याच आणून देतो. माझ्याकडे आला की त्याला मुळी बाहेर थांबायचं नसतं. तो सरळ आत येऊन माझ्या टेबलावर उडी मारून बसतो. मी त्याला इंजेक्शन देत असो वा त्याची ब्लड टेस्ट करत असो.. तो शांतपणे सगळं करून घेतो.  पशुवैद्यकशास्त्र हे मूक प्राण्यांसाठी असलेलं करुणा, भूतदया आणि संवेदनशीलतेचं शास्त्र आहे. पण दुर्दैवानं आपल्याकडे काही क्षेत्रांत या शास्त्राचा तद्दन व्यावसायिक आणि भावनाहीन गोष्टींसाठीही वापर होतो. मला आठवतं, आमच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून आम्हाला कत्तलखान्यात ‘फील्ड व्हिजिट’साठी जावं लागे. त्या कोवळय़ा वयात तिथलं अमानुष वास्तव बघून काळजाला चरे पडायचे. कत्तलखान्यात आणताना बारा-पंधरा तास एका छोटय़ा गाडीत कोंबून गाई, म्हशी, बैलांना आणलं जाई. तिथं येईपर्यंत दाटीवाटीनं भरल्यामुळे एकाचं शिंग दुसऱ्याच्या पोटात गेलेलं, कुणाचे पाय मोडलेले, असं विदीर्ण करणारं दृश्य असे. रेतीचा ट्रक उलटा करावा तसं त्यांना गाडीतून खाली टाकत. ते सगळे प्राणी पाण्यासाठी तहानलेले असत. मी तिथं काहीही शिकले नाही. कधी ‘फील्ड वर्क’ही केलं नाही. मी सरळ तिथल्या विहिरीवर जाऊन बादलीत पाणी भरायचे आणि त्या प्राण्यांना पोटभर पाणी पाजायचे. पहिल्याच लेक्चरमध्ये प्राण्यांना ‘वस्तू’ (कमोडिटी) असं संबोधलेलं ऐकलं आणि मला अक्षरश: घृणा आली होती. 

बालवयातल्या आणखीही काही प्रसंगांनी माझ्या मनावर खोल घाव निर्माण केले. लहानपणी आमच्या वाडय़ात एकाच्या घरात एक भटका कुत्रा चुकून शिरला. त्यांनी त्या कुत्र्याला एका खोलीत डांबलं आणि महापालिकेची गाडी बोलावली. त्या लोकांनी त्याला खोलीबाहेर खेचून बेदम मारलं. ते भयंकर दृश्य पाहून माझ्या बालमनाला जी वेदना झाली होती ती अजूनही ठसठसते. प्राण्यांशी माणसांचं स्वार्थी, क्रूरपणाचं वागणं पाहिलं तेव्हापासून अशा माणसांच्या कृतीचा तिरस्कार निर्माण झाला. इतका की नको ती माणसं.. नको ती नातीगोती.. नको ते लग्न.. नको ती मुलंबाळं.. असहाय्य, मुक्या आणि सातत्यानं अन्यायाला बळी पडणाऱ्या प्राण्यांविषयी मला कमालीची अनुकंपा वाटू लागली. तेव्हा मनानं पक्कं केलं, की आपलं आयुष्य या प्राण्यांच्या कल्याणासाठीच वाहून घ्यायचं.

  एकदा एका बारशाला आम्ही सगळे जण गेलो होतो. अचानक कळलं, की घरी माझ्या मांजरीच्या पिल्लावर काकांचा पाय पडून ते तडफडतंय. मी तडक घर गाठलं. पिल्लावर औषधोपचार केले. नंतर त्यावरून घरात बरंच वाजलं. माझं एकच म्हणणं होतं, ‘‘दादाच्या बाळाचं कोडकौतुक करायला तिथं शंभर जण होते. माझं पोर तिथं एकटं तडफडत होतं. त्याच्याजवळ कोणी नव्हतं. मग मला जायला नको का?’’

५-६ वर्षांपूर्वीची गोष्ट. माहीमला एका रस्त्यावरच्या कुत्रीला मार मार मारून शौचालयात डांबून ठेवलं होतं. रात्री एक वाजता तिथून तिला सोडवून काही लोक माझ्याकडे घेऊन आले. तिचे मागचे पाय मोडले होते. ती अत्यंत करुणपणे माझ्याकडे पाहात होती. मी तिच्यावर उपचार केले आणि तिला माझ्याचकडे ठेवून घेतलं. त्या रात्री मी तिला क्लिनिकमध्ये ठेवून गेले. दुसऱ्या दिवशी दार उघडून बघते तर काय.. माझ्या पशुखाद्य भरलेल्या जवळपास २५ हजार रुपये किमतीच्या गोण्या तिनं फाडल्या होत्या, त्यावर प्रातर्विधी करून ठेवले होते. माझ्या लक्षात आलं, त्या अंधाऱ्या खोलीत रात्रभर ती एकटी होती. तिनं तिचं सगळं भय, वैफल्य त्या गोणींवर काढलं होतं. प्राण्यांनी कितीही नुकसान केलं तरी मी त्यांना रागावत नाही. ते त्यांच्या नैसर्गिक शिस्तीत जगत असतात. त्यांना  स्वातंत्र्य प्रिय असतं. त्यांना सोबत हवी असते. त्यानंतर मी कधीही तिला एकटं ठेवलं नाही.

  प्राणी किती जीव लावतात त्याचा एक मनोज्ञ किस्सा! माझ्या मैत्रिणीच्या घराच्या परिसरात एक माकडाचं पिल्लू राहायला लागलं होतं. तिथं एक रस्त्यावरची कुत्री होती- स्नोई. या माकडाच्या पिल्लानं स्नोईला जणू आई मानलंय! त्या दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम आहे, की स्नोईच्या जवळ कोणीही गेलं, तिला हात लावला की हे माकडाचं पिल्लू त्या व्यक्तीला कडकडून चावतं. मलाच ते दहा वेळा चावलं आहे. हे पिल्लू दिवसभर स्नोईच्या पाठीवर बसून भटकत असतं. ती जरा नजरेआड झाली की ते बेचैन होऊन भिरभिरत्या नजरेनं तिला शोधतं. असे अनुभव विलक्षण. एकदा एक महिन्याचं भटक्या कुत्र्याचं पिल्लू माझ्याकडे कुणी तरी आणलं. रिक्षानं उडवल्यामुळे ते जायबंदी झालं होतं. मी ठरवलं, की आपणच याचा सांभाळ करावा. त्याच्या पायाला प्लास्टर घातलं आणि दुसऱ्या एका पिल्लासोबत त्याला ठेवलं. कसंच काय! त्या दोघांचं भांडण जुंपलं. मात्र त्याच आवारात एक समंजस कुत्री होती- काळू. मी रात्री भटक्या कुत्र्यांना खाऊ घालायला जायचे तेव्हा काळू माझी वाट बघत असायची. आधी या पिल्लांना ती खाऊ घालायची, मग स्वत: खायची. काही दिवसांनी ती दोन्ही भांडणारी पिल्लं छान एकमेकांना बिलगून झोपलेली पाहिली तेव्हा लक्षात आलं, की प्राणी किती एकदिलानं राहतात! माणसांनी हे त्यांच्याकडून शिकायला हवं. आणखी एक गंमत सांगते, माझ्या खंडोबाची! तो गणेश चतुर्थीचा दिवस होता. एक कुत्रा थेट माझ्या टेबलाखाली येऊन बसला. मी त्याला खायला दिलं, पण त्यानं कशालाही तोंड लावलं नाही. तेव्हापासून दरवर्षी गणेश चतुर्थी, अनंत चतुर्दशी, दसरा आणि दिवाळीत तो न चुकता माझ्या क्लिनिकमध्ये येत असे. तो कुठून येतो, का येतो ते कळायचं नाही. मी त्याच्या चारही पायांना हात लावून पाया पडत असे. २०२१ च्या दिवाळीपर्यंत तो आला. मार्च २०२२ ला समाजमाध्यमांवर एक पोस्ट आली आणि त्यातून कळलं की तो कुत्रा मार्वे रोडला राहात होता आणि तो वारला. ही बातमी कळली आणि माझ्या पोटात खड्डाच पडला. आता खंडोबा इथं येणार नाही, म्हणजे मीही इथं असणार नाही, असं मला आतून वाटू लागलं. आश्चर्य म्हणजे ध्यानीमनी नसताना मला त्या क्लिनिकची जागा सोडावी लागली. मी क्लिनिकसाठी नवी जागा शोधू लागले. मला एक जागा आवडली, ती मी नक्की केली आणि कळलं, की हीच त्या खंडोबाची वास्तव्याची इमारत होती! मी त्याच्याशी किती घट्ट जोडली गेली आहे, हे जाणवून मी भर रस्त्यात ओक्साबोक्शी रडायला लागले. माझ्यासाठी तो श्वान नव्हता.. ते शिवतत्त्वच होतं जणू!

प्रत्येक जीवजंतू सृष्टीच्या साखळीचा एक भाग आहे. ते एकमेकांसाठी उपयुक्त आहेत. पण माणसापासून कोणत्या प्राण्यांना फायदा होतो सांगा बरं? उलट माणूस निसर्गाचा नाश करून जीवसृष्टीला धोक्यात टाकतोय. नैसर्गिक उत्क्रांतीमध्ये माणसाचा मेंदू विकसित होत गेला. मग या प्रगत मेंदूनं प्राणिमात्रांच्या कल्याणाचा विचार नको का करायला? १९९५ मध्ये मी पशुवैद्य म्हणून उत्तन, गोराई आणि मनोरी इथे जात असे. तिथले रहिवासी रानटी कुत्रे, गाई आणि बैल पाळत. आज हे सर्व खारफुटीचं जंगल नामशेष होत चाललंय. तिथं मोठमोठय़ा सोसायटय़ा उभ्या राहात आहेत. तिथले लोक तक्रार करतात, की इथं कुत्र्यांचा नुसता सुळसुळाट आहे. अरे पण हे कुत्रे त्या धरतीवरचे मूळ रहिवासी आहेत हे तुम्ही कसं विसरता? त्यांची तक्रार करण्यापेक्षा त्यांची नसबंदी करा. त्यांची काळजी घ्या! गगनचुंबी इमारती बांधून, झाडं तोडून आपण प्राण्यांपक्ष्यांच्या अधिवासावर आक्रमण करतोय याची मला खूप खंत वाटते. दलाई लामांचं एक वचन आहे- ‘प्राण्यांविषयी ज्यांना करुणा वाटते, अनुकंपा वाटते, त्यांचा आत्मा उन्नत अवस्थेत असतो’. योगानंद म्हणतात, ‘ज्यांना प्राण्यांचं दु:ख व वेदना जाणवतात त्या आत्म्याला शांती- म्हणजे शाश्वत ज्ञानाची प्राप्ती होते’. आपण सगळे या शाश्वत ज्ञानाच्या शोधमार्गावरचे प्रवासीच तर आहोत!

madhuri.m.tamhane@gmail.com