scorecardresearch

सोयरे सहचर : आनंदाचा राजमार्ग दाखवणारे सांगाती

‘‘समाजात सध्या मोठय़ा प्रमाणावर नकारात्मकता दिसते. त्याचा स्पर्श आपल्यालाही होतो आणि नकळत आपलं भावविश्व झाकोळून जात असतं.

‘‘समाजात सध्या मोठय़ा प्रमाणावर नकारात्मकता दिसते. त्याचा स्पर्श आपल्यालाही होतो आणि नकळत आपलं भावविश्व झाकोळून जात असतं. या परिस्थितीतून बाहेर काढणारे मित्र म्हणजे आपल्या घरातले मुके, पाळीव सदस्य, असं मला नेहमी वाटत आलेलं आहे आणि तसे अनुभवही आम्हा कुटुंबीयांना खूप आले. कोणत्याही परिस्थितीत निर्व्याज प्रेम देत आनंदाचा राजमार्ग दाखवणारे हे सांगाती आहेत!’’ सांगताहेत प्रसिद्ध अभिनेते नागेश भोसले. 

बालपणीच्या आठवणी आठवाव्यात असं जेव्हा वयही नव्हतं, अगदी तेव्हापासून मी प्राणी पाळू लागलो होतो! त्यांच्या विश्वात रमत गेलो आणि नेहमीच माझ्या या पाळीव मित्रांना घरातलेच मानत आलो. हे सगळं सहज, आपसूक घडलं. सध्या माझ्या घरात चार कुत्रे, एक मांजर आहे. हे सगळे गेली कित्येक वर्षे आमच्याबरोबर राहताहेत. याखेरीज बाल्कनीत अनेक पक्षी- चिमण्या, कावळे, पोपट, घारी दररोज येतात. बायकोनं, जॉयनं रोज त्यांच्यासाठीचं अन्न वेगळय़ा भांडय़ात ठेवलेलं असतं. त्यातून ते अन्न खातात, पाणी पितात आणि मार्गस्थ होतात. हे पक्षीही दररोज येणारे; त्यामुळे आमच्या कुटुंबाचा भाग आहेत. ते मुक्तपणे विहार करतात, पण रोज आम्हाला भेटल्याशिवाय राहात नाहीत.

 माझा जन्म नागपूरचा. लहानपणची एक आठवण आहे, ते दिवस ऐन पावसाळय़ाचे होते. संध्याकाळची वेळ आणि त्यात पावसाची संततधार. पुढचं काही दिसू नये इतका दाट काळोख दाटलेला. मी पायांनी छान चिखल तुडवत रमतगमत घराकडे निघालेलो. अचानक मला जाणवलं, की कुणीतरी माझ्यामागून येतंय. मी तीन-तीनदा मागे वळून पाहिलं, पण छे! त्या अरुंद गल्लीत कुणीही मला दिसलं नाही. पुन्हा चिखल तुडवू लागलो. पुन्हा कुणी तरी दबक्या पावलांनी मागे येत असल्याचं भासलं.. पुन्हा मागे वळून पाहिलं, कुणीही दिसेना! आता मात्र मी घाबरलो. भास की सत्य या  विचारात पडलो. मग हिम्मत करून चालत राहिलो, आणि मग एका क्षणी लक्षात आलं, माझ्या मागे येणारी व्यक्ती दोन पायांची नव्हे, चार पायांची होती! एक छोटंसं काळय़ा रंगाचं कुत्र्याचं पिल्लू असहाय्यपणे माझ्या मागे थांबत थांबत चालत येत होतं. मी थांबून त्याला निरखलं. आवडला मला तो. तसाच चालत राहिलो. मग हा गडी माझ्यामागे थेट घरापर्यंत आला. ‘चिखलानं भरलेला कुत्रा घरी का घेऊन आलास’चा ओरडा खायला नको म्हणून मी त्याला एकदम घरात घेतलं नाही. पण लक्ष मात्र सारखं घराबाहेर केकाटणाऱ्या त्या पिल्लाकडे लागलं होतं. कसला आवाज येतोय म्हणून आईनं दार किलकिलं करून पाहिलं. तिला हे भिजलेलं, गारठलेलं पिल्लू दिसलं. त्यानं अगदी केविलवाणेपणानं आईकडे पाहिलं असावं. तिला त्याची दया येणं स्वाभाविकच होतं. पावसात भिजल्यानं पिल्लू पार मलूल झालं होतं. आईनं त्याला घरात घेतलं तेव्हा कुठे मी तिला हिम्मत करून ते पिल्लू माझ्यामागेच इथवर आल्याचं सांगितलं. त्यावर ती म्हणाली, ‘‘अरे बाळा, मग मला हे आधीच नाही का सांगायचं!’’ आईचा प्रेमळ पवित्रा पाहून मी मनातून सुखावलो होतो. पिल्लाला घरात घ्यावं असं मनोमन मला वाटत होतंच. आईनं त्याला आंघोळ घातली, पुसून कोरडं केलं आणि कोमट दूधही पाजलं. त्याला झोपायला गोधडी घातली. का कोण जाणे, पण त्या दिवशी रात्री मला सारखी जाग येत होती. या नवीन पाहुण्याला झोप लागलीय की नाही हे मी सारखं उठून पाहात होतो. खरं तर खूप आपलेपणा वाटत होता. माझं आहे हे पिल्लू, अशी एक भावना खोलवर रुजायला लागली होती. दुसऱ्या दिवशी आम्ही पिल्लाला डॉक्टरकडे नेलं, त्याच्यावर उपचार केले. तो घरी आला तेव्हा त्याचं वय काही दिवसांचं असावं. रंग काळा असल्यानं त्याचं नाव आम्ही काळू ठेवलं. काळू १५ दिवसांतच घरचा होऊन गेला. माझं जगच काळूमय झालं होतं. तेव्हापासून मला मुक्या प्राण्यांच्या जगात रमण्याची ओढ लागली आणि आता ही अपरिहार्य सवय, ओढ माझ्या मुलांमध्येही उतरली आहे.

   मुक्या प्राण्यांचं जगच न्यारं! ते ज्या घरात, ज्या कुटुंबाबरोबर राहतात, ते गरीब आहेत, श्रीमंत आहेत, त्यांचं ‘सोशल स्टेट्स’, त्यांचे स्वभाव, आवडीनिवडी, लकबी, तुम्ही अपंग आहात की सदृढ, अगदी कशाचंही या प्राण्यांना देणंघेणं नसतं. मात्र आपले मालक, त्याचं कुटुंब या सगळय़ांवर हे मुके प्राणी जीवापाड प्रेम करतात. त्यांच्या अवतीभवती बागडतात, चाटून, भुंकून आपलं प्रेम व्यक्त करतात. खरंच इतकं निरागस प्रेम करण्याची कला आपल्याकडे, माणसांकडे असती, तर जगात वाढत चाललेला द्वेष, मत्सर, हेवेदावे, अहंकार, असूया या खिन्न करणाऱ्या भावना राहिल्या नसत्या! त्यामुळे माणुसकी  दाखवण्यात मी दोन पायांच्या माणसांपेक्षा चार पायांच्या प्राण्यांना खचितच अधिक गुण देईन.

आमच्या घरी जे चार कुत्रे, एक मांजर आहेत, ते आमचे घरातलेच झाले आहेत. त्यांनी कधी काही कारणास्तव आहार कमी घेतला, मलूल दिसले की आम्ही सगळे अस्वस्थ होतो. आमचं जगणं त्यांच्याशी, त्यांच्या आनंदाशी निगडित आहे. अनेकांचा असा एक (गैर)समज आहे, की कुत्रा आणि मांजर एकत्र एका छताखाली राहू शकत नाहीत! पण गेली अनेक वर्ष आमच्याकडे कुत्रे आणि मांजर मजेत एकत्र राहाताहेत. पूर्वी आमच्याकडे एक टर्किश मांजर होती, तीदेखील घरच्या कुत्र्यांसोबत सुखेनैव राहात होती. ती मांजर मेल्यावर आमच्याकडे जी मांजर आलीये, ती आमच्याकडे कशी आली याचा एक किस्साच आहे. त्याचं असं झालं.. माझा मुलगा लहान असतानाची गोष्ट. एकदा तो बाहेर मित्रांबरोबर खेळत होता. अचानक जवळून जाणाऱ्या गाडीचे ब्रेक्स करकचून मारले गेल्याचा आवाज आला.  कुणीतरी गाडीखाली आलं असावं अशी सगळय़ांना शंका आली. मित्रांचा घोळका तिथे पोहोचला आणि पाहतो तर एक मांजरीचं पिल्लू गाडीखाली आलं होतं. रक्तबंबाळ झालेल्या त्या पिल्लाला घेऊन माझा मुलगा आणि त्याच्या मित्रांनी डॉक्टर गाठला. मांजर जखमी होती, पण जिवंत होती. मग माझा मुलगा मांजरीला घेऊन तडक घरी आला आणि त्यानं जाहीर केलं, ‘‘मांजरीला घरी ठेवावं लागेल. तिची शुश्रूषा करावी लागेल. जखमी आहे बिचारी!’’ १५-२० दिवसांत ती बरी झाली आणि मग काय, तोपर्यंत ती आमच्या घरातलीच एक होऊन गेली होती. आमच्या या मनीमाऊचं नाव आम्ही ‘कॅट’ असंच ठेवलंय! कॅट आमच्या घरच्या कुत्र्यांमध्ये आणि आमच्यात खूप रमली.

 माणूस म्हटलं, की त्याला दु:ख, अपमान, उपेक्षा, निराशा, अशा अनेक नकारात्मक भावनांना सामोरं जावं लागतं. नेमक्या या आणि अशाच भावनांपासून मुक्ती मिळते ती आपल्या घरातल्या या पाळीव प्राण्यांमुळे. आम्हा सगळय़ांना हा अनुभव आला आहे. अगदी मूकपणे हे अबोल मित्र आपल्या भावनांशी एकरूप होतात. आपण अस्वस्थ, बैचेन असलो की तेही आपल्यासारखेच नि:शब्द होऊन जातात. आणि आपण आनंदात असलो की आपल्या अवतीभवती बागडून आपल्या आनंदात भर घालतात. मी अलीकडेच एका हॉलीवूड फिल्मसाठी दीड महिन्यासाठी इंडोनेशियाला गेलो होतो. तेव्हा माझ्या या मित्रांनी मला खूप ‘मिस’ केलं. ठरावीक वेळ झाली की ते दाराकडे जात आणि माझी वाट पाहात. कासावीस होऊन जात अगदी. मी घरी असतानासुद्धा जरा कुठे १५ मिनिटांसाठी खाली गेलो आणि पुन्हा घरी आलो की आल्या आल्या मला बिलगतात. त्यांच्यासारखी आत्मीयता कलियुगात माणसांमध्ये क्वचितच पाहायला मिळते. खूप शिकण्यासारखं आहे या दोस्तांकडून.

आमच्याकडे येणारे पाहुणे आम्हाला विचारतात, मुंबईसारख्या शहरात फ्लॅट लहान असतात. इतक्या पाळीव प्राण्यांसह राहाणं कसं शक्य होतं तुम्हाला? कधी शेजाऱ्यांनी तक्रार केली नाही का? या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असंच आहे. ज्या जातीचे कुत्रे आमच्याकडे आहेत, त्यांना आवश्यक असणारं अन्न आम्ही त्यांना देतो. त्यांच्या लशी, आरोग्य तपासणी, स्वच्छता, सगळय़ाची काळजी अगदी डोळय़ात तेल घालून घेतो. त्यामुळे आमच्या शेजाऱ्यांनी आजवर आमच्या प्राण्यांमुळे त्यांना त्रास झाल्याची कधी तक्रार केलेली नाही. आमचा दिवस त्यांच्या आवाजानं, किलबिलीनं सुरू होतो. ते आमच्याच अंथरुणात असतात झोपायला. दररोज सकाळी या मंडळींसह कधी मी, कधी मुलगा अमरेंद्र, मुलगी कुहू फिरायला जातो. फिरायला जाणं त्यांना खूप प्रिय आहे. सकाळी ते सगळे कल्ला करतात. खूप मजा वाटते त्यांची तेव्हा. हे कौतुकाचे क्षण आम्ही सगळे ‘एन्जॉय’ करतो. ज्यांच्या घरी असे पाळीव प्राणी आहेत ते आमच्या भावना उत्तमपणे समजू शकतील. माझा थकवा, शीण, ताणतणाव दूर करण्याचं कसब आमच्या या मुक्या दोस्तांकडे आहे. मी चित्रीकरणात असलो, की दिवसातून दोनदा तरी बायकोला, मुलांना फोन करतो. मी जेव्हा जॉयला फोनवर विचारतो, की ‘‘पोरं काय करताहेत?’’ त्याचा अर्थ मी या आमच्या या मूक मुलांविषयी विचारत असतो! आमच्यासाठी आमच्या पाळीव प्राण्यांचं घरातलं स्थान आमच्या मुलांसारखंच आहे.

कुहू लहान असताना एका मित्राचे दोन पॉमेरियन कुत्रे त्यानं आम्हाला दिले. मुलीचं बालपण त्या पॉमेरियनशी खेळता खेळता खूप छान घडलं. ही दोन कुत्री आमच्याकडे १२ वर्ष होती. त्यानंतर दोन्ही कुत्री मरण पावली आणि आम्ही इतके दु:खी झालो.. त्यांच्या आठवणींनी आजही डोळे पाणावतात. त्यानंतर आम्ही ठरवलं, की आता हे प्राणी घरी आणायचे नाहीत. खूप लळा लावतात, असे निघून जातात आणि मग त्यांचा विरह सहन होत नाही. आमचा हा निश्चय फार काळ टिकला नाही! रॉटवेलर वंशाचं कुत्र्याचं एक अनाथ पिल्लू होतं. जॉयला हेही समजलं की त्याच्या लशींचा डोस पूर्ण झाला आहे. मग काय, घरच्या ‘बॉस’नं जेव्हा त्याला घरी आणलं तेव्हा तो आमचा सगळय़ांचाच मित्र झाला. नंतर एकदा जॉय एका कार्यक्रमात गेली होती, तिथे अनेक ‘स्ट्रे डॉग्ज’ होते. तिथूनच तिनं ‘जॅझ’ला आणलं. या जॅझला आठ पिल्लं झालीत. आमच्यासाठी हा खूप आनंदाचा, ‘थ्रिलिंग’ अनुभव होता. तोही एक किस्साच आहे. माझ्या एका नाटकाचा प्रयोग ‘पृथ्वी थिएटर’ला होता. सकाळी बायकोनं सांगितलं होतं, की आज जॅझची ‘डिलिव्हरी’ होईल. ‘सगळं नीट पार पडू दे देवा,’ असं म्हणत मी प्रयोगाला गेलो. संध्याकाळी मी घरी फोन केला, तेव्हा मुलं म्हणाली, ‘आपल्या जॅझला पिलं होताहेत.’ नाटकाचं मध्यंतर झालं तेव्हा जॅझला दोन पिल्लं झाल्याचं मुलानं सांगितलं. त्या दिवशी माझे लागोपाठ दोन प्रयोग होते. मी पिल्लांना पाहाण्यास अधीर झालो होतो, पण ‘शो मस्ट गो ऑन’ या उक्तीप्रमाणे मी माझे दोन्ही प्रयोग पूर्ण केले आणि घरी फोन केला, तेव्हा जॉय म्हणाली, की ‘जॅझला पाच पिल्लं झालीत!’ अखेर मी घरी पोहोचेपर्यंत जॅझनं एकूण आठ पिल्लांना जन्म दिला होता. आम्ही सगळे भलतेच खूश होतो. आठ पिल्लांपैकी दोन पिल्लं जन्मताच गेली. उरलेल्या सहा पैकी चार पिल्लं आम्ही आमच्या प्राणीप्रेमी मित्रांना दिली. यातलं एक पिल्लू ब्राऊन रंगाचं म्हणून त्याचं नाव – ब्राऊनी. खूप सुंदर आणि लडिवाळ असलेल्या ब्राऊनीला आम्ही दिलं खरं, पण त्याच्या अनुपस्थितीत घरात कुणी जेवलं नाही. आम्हाला त्याची सारखी आठवण येत होती. मग काय, ब्राऊनीला जिथे दिलं होतं, तिथून त्याला पुन्हा घरी घेऊन आलो. पिल्लांपैकी कॅरॅमलला कुणी नेलं नाही, तो आमच्याकडे राहिला.

  आता अमरेंद्र ३० वर्षांचा आणि कुहू २२ वर्षांची आहे. म्हणजे त्यांच्या जन्माच्या पूर्वीपासून आमच्याकडे पाळीव मित्रमंडळी होती. माझं सारं बालपण कुत्र्यांच्या सहवासात गेलं आणि आता पुढची पिढीदेखील या सहचरांसोबत वाढलीत. आमच्याकडे एक कासवदेखील होतं. ते १८ वर्ष जगलं. आमच्या पाळीव दोस्तांचा वाढदिवसही आम्ही छानपैकी, केक कापून जल्लोषात साजरा करतो.  जवळचे लोक घरी येतात, पार्टी करतो म्हणा ना! मोठी धमाल असते तेव्हा.

या मुक्या दोस्तांनी आमच्या सगळय़ांच्या आयुष्यात प्रेमाचे गहिरे रंग भरलेत. सध्या समाजात एक प्रकारची नकारात्मकता, समाज व्यवस्थेविरुद्ध एक आक्रोश दिसतो. वाढती गुन्हेगारी, हेवेदावे, मत्सर अशा सगळय़ामुळे समाजाचं एकूणच मानसिक आरोग्य असंतुलित झालेलं दिसतं. नैराश्य तर अगदी दर १० पैकी नऊ व्यक्तींना असतं असं म्हणता येईल. अशा सगळय़ा वातावरणात हे मुके प्राणीच काय तो सुखाचा, आनंदाचा राजमार्ग आहेत अशी माझी भावना आहे.

    शब्दांकन- पूजा सामंत

1rocky500@gamail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Soyare sahchar in society negativity touch situation pet families love ysh

ताज्या बातम्या