अतुल आरेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘मला लहानपणापासून पाळीव प्राण्यांचं वेड आहे, पण मी एक वेगळी गोष्ट केली, ती म्हणजे पोलिसांचा श्वान त्याच्या निवृत्तीनंतर दत्तक घेतला. सेवेच्या दहा वर्षांनंतर हे श्वान पोलीस खात्यातून निवृत्त केले जातात, त्यांना कुणीही दत्तक घेऊ शकतं. गुन्हेशोधक, बाँबशोधक, नार्कोटिक्सशोधक, रेस्क्यू टीम, फॉरेस्ट श्वान असं वेगवेगळय़ा प्रकारचं काम करणारे हे श्वान पूर्णत: प्रशिक्षित आणि लसीकरण केलेले असतात. २६ नोव्हेंबर २००८ च्या  मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांनी फेकून दिलेला जिवंत हँड ग्रेनेड पोलीस टीमनं ज्या ‘मॅक्स’च्या सहकार्यानं शोधून काढला आणि हजारो लोकांचे प्राण वाचवले, त्या ‘मॅक्स’ला मी घरी आणलं आहे. त्याची काळजी घेण्यात मला अतीव आत्मसुख लाभतं आहे.’’

जी व्यक्ती पाळीव प्राण्यांना प्रेमाने सांभाळते, तिच्यापेक्षाही पाळीव प्राणी त्या व्यक्तीवर अधिक प्रेम करतात; ते इतकं प्रेम करतात, की त्यांच्या प्रेमाला माणूस तितका पात्र नसतो, असं मला नेहमीच वाटत आलं आहे.

माझ्या बालपणापासून आमच्या घरी अनेक प्राणी सांभाळले गेले आहेत. एक सत्य घटना माझा बाबा नेहमी सांगायचा,  त्याचा काका, म्हणजे माझे चुलत आजोबा कर्जतला राहायचे, कर्जतच्या टेकडीखाली त्यांचा वाडा होता. त्यांच्या घरी एक कुत्रा होता, काळू. काळूचं काकांवर अफाट प्रेम होतं. काकांचं निधन झाल्यावर तो त्यांच्या देहाभोवती फिरत राहिला, कुणाला हातही लावू देईना. शेवटी त्याला साखळीनं बांधलं आणि नंतरच अग्निसंस्कारासाठी आजोबांचा देह नेण्यात आला. पण थांबेल तर तो काळू कसला. त्यानं जोरात हिसडा देऊन साखळी तोडली;  स्मशानात आला व काकाआजोबांच्या चितेवर चढून बसला. सर्वानी त्याला उतरवण्याचे खूप प्रयत्न केले, पण तो ऐकेना. शेवटी काही जणांनी एकत्रितपणे ताकद लावून त्याला उचलून घरी आणला, एका खोलीत बंद केला आणि मगच अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर आठ दिवसांतच काळू वारला. अर्थात असे अनुभव विरळाच.

 त्याच्या मुलाकडे म्हणजे राजाकाकाकडे एक अबलख घोडा होता- सुलतान. आमचं बालपण या सुलतानच्या पाठीवर गेलं. माझी मावशी कल्याणला राहायची. सुट्टीमध्ये अनेकदा आम्हा पोरांचा मुक्काम तिच्याकडे असायचा. त्यांचा फडणीस वाडा मोठा नामांकित होता. तिच्याकडे तीन दणदणीत श्वान होते- पप्पू, सीझर व राणी. तिघंही धिप्पाड! विनायककाका त्यांना घेऊन बाहेर फिरायला जायचा. मी कल्याणमध्ये असलो, की त्याच्याबरोबर जायचो. रुबाब होता. कल्याणचे रस्ते छोटे. त्या रस्त्यांवरून जाताना दोन बाजूला पप्पू व सीझर, मध्ये आम्ही पोरं आणि मागे विनायककाका. समोर यायची कोणाचीही हिंमत व्हायची नाही. हे तिन्ही श्वान रुबाबदार, पण कोणाला त्यांनी कधी साधी जखम केली नाही.

  आम्ही मुंबईमधल्या गोरेगावात राहातो. एका संध्याकाळी बाबा वेताच्या छोटय़ा टोपलीमधून एक छोटं पिल्लू घेऊन घरी आला. ते राणीचं बाळ होतं. तिचं नाव आम्ही ठेवलं पॉपी. मी तेव्हा जेमतेम सहावीत असेन. एकदम गोड बाळ होतं ते. ताई, मी, शलाका आणि पॉपी. बाबाची ही चार मुलं! सर्वावर सारखं प्रेम! आई व बाबा नोकरी करायचे, त्यामुळे आमच्यासाठी घरात एक कायम स्वरूपी आया ठेवली होती. तिचं लग्न ठरलं. आम्ही मुलं शाळेत जाणार आणि हे दोघे नोकरीवर जाणार. त्यामुळे विनायककाका म्हणाला, ‘‘पॉपीला कल्याणला आणा.’’ तसा तिचा जन्मही त्याच घरातला. मोठय़ा कष्टानं तिला आम्ही कल्याणला पाठवलं. तोवर तिच्या आईचा म्हणजे राणीचा कोणीतरी विष घालून मृत्यू घडवला होता. पॉपी कल्याणला गेल्यावर मात्र एकदम हिट झाली. ती अत्यंत लाघवी होती. फडणीस वाडय़ात कोणीही शिरलं की आधी तिला भेटत मग बाकीच्यांना.

   नंतर अनेक वर्ष, म्हणजे माझं लग्न होईपर्यंत आमच्या घरात एकही पाळीव प्राणी नव्हता. लग्नानंतर बायको, ईशाच्या सोबतीला आली, आमची ‘नेली’! नेली डॉबरमन होती. सामान्यत: ही जात आक्रमक असते, पण ही अगदी साधी. माझी आजवरची सर्वात शहाणी लेक. माझा भाचा मैत्रेय, तिचा लाडका. आमचे दोन मजल्यांवर दोन फ्लॅट आहेत. कोणी तरी तिला सांगायचं, की दादा आलाय, की ती धावत खालच्या मजल्यावरील फ्लॅटमधून वरच्या मजल्यावर जायची. मैत्रेयचा बाबा मिलिंद. तिचा मिलिंदवरही जीव होता. माझ्या आई-बाबांवरही तिचं जिवापाड प्रेम होतं. त्यांच्याशी कोणी मोठय़ानं बोललं, तरी ही चिडायची. ती तिच्या वयाच्या सातव्या वर्षी स्टमक स्टॉर्शनने गेली. म्हणजे डॉबरमन श्वानांच्या पाठचा भाग काहीसा मोठा असतो, त्याला पीळ बसला आणि त्यात ती गेली. नेलीच्या पोटाला जेव्हा पीळ बसला, तेव्हा तिला घेऊन मी आमच्या व्हेटर्नरी डॉक्टर नीलिमा परांजपे यांच्याकडे गेलो, तिनं रात्री तिच्या गुरूंना डॉ. वाकणकर या नामांकित प्राणी शल्यविशारदांना तिच्यावर शस्त्रक्रिया करायला लावली. नीलिमानं मला सलाईन कसं लावायचं, औषधोपचार कसे करायचे ते शिकवलं. ती दररोज सकाळी येऊन जायची. त्यानंतर नेली वर्षभर जगली. नंतर तिला अ‍ॅसिडिटीचा त्रास होऊ लागला. त्या अ‍ॅसिडिटीमुळे हृदयावर व फुप्फुसावर ताण येऊन ती वारली. त्यानंतर अनेक महिने ईशा तिच्या आठवणींतून बाहेर येऊ शकली नाही.

आमच्या घरी आतापर्यंत एकही श्वान विकत आणलेला नाही, आम्ही त्यांना दत्तक घेतो. नेली २०१२ च्या सुमारास गेली आणि काही वर्ष घरी श्वान नव्हता. एकदा मी एका वर्तमानपत्रात, पोलिसी श्वानांबद्दल माहिती वाचली. मी मैत्रेयला म्हणालो, ‘‘चल आपण आरे कॉलनीमध्ये पोलिसांचं श्वान केंद्र आहे तिथं जाऊ या.’’ खरं म्हणजे तिथं जाण्याची कुणाला परवानगी नसते. पण, आम्ही तसेच घुसलो. दोघे-तिघे जण विचारायला आले, तर आम्ही म्हणालो, ‘‘आम्हाला पोलिसी श्वान बघायचे आहेत.’’ आमच्याकडे पाहून त्यांच्या लक्षात आलं, की हे दोघे श्वानवेडे आहेत. तेवढय़ात दोघा श्वानांची फिरायला नेण्याची वेळ झाली. त्यातल्या एका श्वानाला त्याच्या हँडलरने (त्यांचा सांभाळ करणारे) कमांड दिली, ‘स्टे!’ तो बहाद्दर होता त्या जागी बसला. आता तो तिथून वीस मिनिटे त्याचं बूड हलवणार नव्हता.  ते बाळ असं एका जागी शांत बसलेलं बघून आम्हाला त्याला पळवायचा मोह झाला. आमचं बोलणं चालू असतानाच तिथं लाड साहेब आले. त्यांना मी विचारलं की, ‘‘पुढे या श्वानांचं काय होतं?’’ ते म्हणाले, ‘‘हे श्वान दहा वर्षांचे झाले, की आम्ही त्यांना त्यांच्या कामातून निवृत्त करतो. मग विरारच्या फिजामॅडम त्यांना सांभाळण्यासाठी घेऊन जातात, त्यांचं संगोपन करतात.’’ त्यावेळी तिथं तीन श्वान होते- ऑस्कर, मॅक्स  आणि सँडी. आम्ही म्हणालो,‘‘हे निवृत्त होतील तेव्हा त्यांना आम्हाला द्या.’’ एक दिवस ‘नवा काळ’ वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली, की या तीनही श्वानांना पोलीस खात्यातून निवृत्त करत आहेत. मी त्यांना फोन करण्याचा विचार करत असतानाच लाड यांचा फोन आला. आम्ही घाटकोपरला निरोप समारंभासाठी गेलो. पूर्वी आमच्याकडे नेली असल्यानं मी ‘सँडी मला द्या’ अशी मागणी केली. पण सँडीला त्वचेचा आजार होता, म्हणून तिला तिचे हँडलर घेऊन जाणार होते, ऑस्कर पांढरा शुभ्र होता, त्यालाही त्याचे हँडलर नेणार होते. लाडसाहेब म्हणाले, ‘‘तुमच्यासाठी आम्ही मॅक्स राखून ठेवलाय.’’ मॅक्सबरोबर त्याचे पी.एस.आय. चव्हाणसाहेब आणि त्याचे दोघे हँडलर गावकर आणि तावडे होते. मी त्यांना विचारलं, की ‘‘मॅक्सचं आणि आमचं जमेल का?’’ ते उद्गारले, ‘‘काही काळजी करू नका.’’ मी मॅक्सला घेऊन चार पावलं चाललो, तर तो लगेच गावकर व तावडे यांच्याकडे परतला. मी म्हणालो, ‘‘बघा, तो आमच्यात कसा रुळेल? मला काळजी वाटते.’’ तर गावकर म्हणाले, ‘‘तुम्हाला वाटतंय त्यापेक्षा अधिक वेगानं तो तुमच्या कुटुंबात मिसळेल.’’

१ मे २०१७ रोजी सारं पेपरवर्क पूर्ण झालं आणि मॅक्सची पूर्ण टीम, अगदी त्याला ट्रेनिंग देणारेसुद्धा त्यात होते, त्याला निरोप द्यायला आमच्याकडे आली. त्याला हार घातलेला, त्याची डॉगकार्ट सजवलेली. मॅक्सला आमच्या ताब्यात देऊन जड पावलांनी ते परतले. प्रत्येकाचा जीव त्याच्यात होता. पण पोलिसी कठोरपणानं एकेक जण मागे न बघता गेले. गावकर मात्र थांबले. त्यांचा पाय निघत नव्हता. दहा वर्ष ते त्याच्याबरोबर होते. त्याला मिळणारं प्रत्येक ट्रेनिंग त्यांनी पाहिलं होतं. गावकर मला म्हणाले, ‘‘साधारणपणे पंचेचाळीस ते साठ दिवसांचे श्वान पोलिसी कामासाठी खरेदी केले जातात, त्यांच्यासाठी दोन हँडलर नियुक्त केले जातात. सहा महिने ते हँडलर त्या श्वानांबरोबर राहतात, त्यांना परस्परांची सवय होते. त्यानंतर तिघांनाही पुण्याला शिवाजीनगर येथे पोलीस सेंटरमध्ये ट्रेनिंगसाठी पाठवलं जातं. वेगवेगळय़ा प्रकारच्या गुन्ह्यांच्या शोधासाठीची वेगवेगळी प्रशिक्षणं दिली जातात. प्रत्येक श्वानास एकेका गुन्ह्याच्या शोधासाठी प्रशिक्षण दिलं जातं. गुन्हेशोधक श्वान, बाँबशोधक श्वान, नार्कोटिक्सशोधक श्वान, रेस्क्यू टीम श्वान, फॉरेस्ट श्वान असे वेगवेगळय़ा प्रकारचे काम करणारे श्वान असतात. अलीकडे परदेशात, वैद्यकीय उपचारासाठी श्वानांची मदत घेतली जाते.’’ बोलणारा प्राणी गुन्हा करतो आणि मुका प्राणी गुन्ह्याचा माग लावतो, अजबच आहे!

पोलिसी श्वानांना व्यवस्थित लसीकरण करून सांभाळलं जातं. लहान बाळासारखी त्यांची काळजी घेतली जाते. त्यांना डॉगफूडच दिलं जातं. श्वान अठरा महिन्यांचा झाला की पूर्ण वाढतो. एखाद्या गोष्टीचा वास लक्षात ठेवण्याची श्वानाची क्षमता माणसाच्या चाळीसपट असते, त्याची बघण्याची क्षमता वीसपट तर ऐकण्याची क्षमता दहापट अधिक असते. अर्थात, श्वानाला फक्त तीन रंगच कळतात, म्हणून त्याची वास घेण्याची क्षमता नैसर्गिकरीत्या खूप अधिक आहे.

   मॅक्स आमच्या घरात तीन दिवसांत रुळला. म्हणजे तो माझ्या बिछान्यात तिसऱ्या दिवशी स्वत: येऊन झोपला. पोलिसी वळणातून बाहेर पडला होता तो. त्याचं सर्वाशी पटकन नातं जुळलं, फक्त घरातल्या स्त्रियांशी नातं जुळायला त्याला वेळ लागला. कारण, पोलीस खात्यात त्याच्या अवतीभवती स्त्रिया नव्हत्या. हळूहळू तो ईशाला व माझ्या आईला सरावला.

  मॅक्स हा देशसेवक श्वान आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’वर कसाबनं हल्ला केला, त्यावेळी मॅक्सनं सतत तीन दिवस काम केलं आहे. त्या अतिरेक्यांनी फेकून दिलेला जिवंत हँड ग्रेनेड शोधून त्यानं अनेकांचे प्राण वाचवले आहेत. तो बाँबशोधी श्वान आहे. अनेक महनीय व्यक्तींसाठी कार्यक्रमांच्या वेळी त्यानं आपली सेवा दिली आहे. एका वेळी हे पोलिसी श्वान जास्तीत जास्त पंचवीस मिनिटं काम करतात, त्यानंतर त्यांना काही काळ विश्रांती द्यावी लागते. आज मॅक्स आजारी आहे. कित्येक वर्ष, प्रशिक्षणाच्या काळात आणि नंतरही त्यानं मोठय़ा प्रमाणात स्फोटकांचा वास घेत माग घेतला आहे, त्याचे दुष्परिणाम त्याच्या शरीरावर, मेंदूवर, फुप्फुसावर झाले आहेत. त्यासाठी त्याला काही सप्लिमेंट्स द्यावी लागतात, ठरावीक खाणं, ठरावीक वेळी द्यावंच लागतं. त्याला हिप डिस्लेशिया झालाय. त्यामुळे त्याला वर चढता येत नाही. त्याला उचलून न्यावं लागतं.  डॉ. नीलिमा त्याची काळजी घेते. तिनं मध्यंतरी डॉ. करकरे या नामांकित व्हेटर्नरी हार्ट स्पेशालिस्टकडे त्याला नेलं होतं. त्यांना, त्या मानाने बरी प्रकृती असलेला मॅक्स बघून आश्चर्य वाटलं होतं. मध्यंतरी मॅक्सला ताप आला होता, आमचं संपूर्ण घर हळवं झालं होतं. मॅक्सनं दहा वर्ष देशाची सेवा केली आहे, आज त्याची सेवा करताना मला देशसेवेचं पुण्य लाभतं असं वाटतं. दर दहा वर्षांनी पोलिसी श्वान निवृत्त केले जातात, त्यांच्या सांभाळासाठी समाजातील सुहृदांनी पुढे यायला हवं, त्यांची मायेनं सेवा करायला हवी. मला असं वाटतं, की पोलिसी श्वानांना आठव्या वर्षी निवृत्त केलं जावं. त्यांच्या समस्यांना सर्वानी समजून घ्यायला हवं.

  शिवसेना नेते सुभाष देसाई यांना मी माझ्या लहानपणापासून ओळखतो. एकदा त्यांच्या सकाळच्या फेरफटक्याच्या वेळी मी त्यांना मॅक्सबद्दल सांगितलं. मॅक्सचा आपण जोरदार वाढदिवस करू; त्या निमित्तानं पोलिसी श्वानांना लोकांनी दत्तक घ्यावं असं आवाहन करता येईल. त्यांना ही कल्पना आवडली. पण नेमका करोनाकाळ सुरू झाला आणि ते राहून गेलं. आता पुढच्या ४ एप्रिलला मॅक्सच्या वाढदिवशी ही मोहीम राबवण्याचा माझा विचार आहे.

atul.nelly@yahoo.com

शब्दांकन : डॉ. नितीन आरेकर

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soyare sahchar max pets police dogs retirement ysh
First published on: 25-06-2022 at 00:02 IST