‘‘आपल्या बागेत आणि आजूबाजूला छोटे बदल घडवून निसर्गातल्या प्रत्येक घटकाच्या संवर्धनासाठी आपण हातभार लावू शकतो. अनेक छोटय़ा जीवांना अधिवास देऊ शकतो, असेच बदल मी माझ्या बागेत केले आणि सुरु झालं माझं पक्ष्यांबरोबरच साहचर्य. माझ्या सादेला दाद देत आतापर्यंत माझ्या बागेत ५२ जातींचे पक्षी येऊन गेलेत. इतकंच नाही तर मुंगूस,  २ जातींचे साप, अनेक प्रकारची बेडकं, खेकडे यांचा मुक्कामही असतो बागेत. या साहचर्यानं मला इतकं समृध्द केलं की मी ‘आर्किटेक्ट’चा व्यवसाय सोडून निसर्ग संवर्धनासाठी काम करू लागले..’’ सांगताहेत आर्किटेक्ट आणि इकोलॉजिस्ट मोनाली शाह.

लहानपणी बहुतेक सर्वाना निसर्गाची खूप आवड असते. काऊ-चिऊच्या गोष्टी ऐकणं, फुलपाखरांच्या मागे धावणं हे सगळय़ांनी बालपणी अनुभवलेलं असतं. मला लहानपणीचं बाकीचं फारसं आठवत नाही, एवढं मात्र नक्की आठवतं, की मला लहानपणापासूनच पक्ष्यांचं खूप आकर्षण होतं.

How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा
World idli day 2024 how to make healthy oats idli
World idli day : पौष्टिक अन् झटपट नाश्त्यासाठी बनवा ‘ओट्स’ इडली; पाहा रेसिपी, प्रमाण
Tandlyachya pithache sandge recipe
झटपट दुप्पट फुलणारे तांदळाचे सांडगे; ‘या’ पद्धतीन बनवा कुरकुरीत सांडगे

कोल्हापूरला आम्ही राहात होतो, तो परिसर तसा माळरानाचा. झाडं फारशी नव्हतीच. घराच्या बाजूनं एक नाला वाहायचा. घरासमोर भाताची शेती. पावसाळय़ात भात लावून झाल्यावर शेत पडून असे. एकदा शेतात एक जनावर मरून पडलं होतं. मी नेहमीप्रमाणे बागेत हुंदडत होते. अचानक आकाशातून विमानासारखे मोठाले पक्षी एकामागून एक शेतात येऊ लागले. एवढे मोठे पक्षी मी प्रथमच बघत होते. सगळे पक्षी मरून पडलेल्या त्या जनावरावर तुटून पडले आणि थोडय़ा वेळातच सगळं फस्त करून आकाशात गायबही झाले. मी भान विसरून हे सारं पाहात होते. तसं पाहिलं तर हा प्रसंग विचित्र. पण त्या पक्ष्यांना पाहताना मी त्यांच्या कधी प्रेमात पडले, ते कळलंच नाही! अशा प्रकारे माझ्या पक्षीप्रेमाची सुरुवात सध्या दुर्मीळ झालेल्या गिधाड या पक्ष्यापासून झाली. वय वाढत गेलं, तसं पक्षी बघण्यासाठी दरवर्षी जंगलात फेऱ्या सुरू झाल्या. भारतभर अनेक अभयारण्यं पक्षी पाहण्यासाठी पालथी घातली. जंगलामध्ये पाणवठय़ावर दिसणारे असंख्य पक्षी, ढोलीमधून डोकावणारे पिंगळे, झाडांवर फुलांमधला मध आणि फळं खाण्यासाठी उडणारी पक्ष्यांची झुंबड या साऱ्याची मनात नोंद होत होती. त्यांच्या गरजा कळायला लागल्या होत्या.

  घरी सगळय़ांना बागेची आवड असल्यामुळे कोल्हापुरात आमच्या घराभोवती मोठी बाग होती. पण आंब्याची दोन झाडं सोडली, तर शोभेची झाडंच अधिक! बागेत चिमण्या, कावळे, बुलबुल, मैना, भारद्वाज, कोकिळा असे ठरावीकच पक्षी दिसायचे. जंगलात पक्षीनिरीक्षण करून आले, की मनात विचारचक्र सुरू व्हायचं, निसर्गात असतो तसाच अधिवास जर आपल्या घराभोवतीच्या बागेत केला तर येतील का पक्षी बागेत? होतील का ते आपले सहचर? हळूहळू विचार पक्का होत गेला आणि सुरु झाले बागेतले बदल आणि त्याचबरोबरच माझा पक्ष्यांबरोबरचा प्रवासही! शोभेची झाडं जाऊन तिथे पक्ष्यांना मध, फळं, कीटक मिळतील अशी छोटी-मोठी झाडंझुडपं लावली. वडिलांनासुद्धा झाडं लावायची खूप आवड होती. त्यांनी घरासमोरच्या रस्त्यावर बरीच झाडं लावली. वेगवेगळय़ा आकाराचे आणि खोलीचे छोटे पाणवठे बागेत तयार केले. काही पाणवठे मी स्वत: तयार केले तर काही ठिकाणी मातीची भांडी ठेवली. झाडांवर कीटनाशक फवारायचं पूर्णपणे बंद केलं. प्लायवूड, प्लास्टिकचे कॅन, पाईप, मडकी, कार्डबोर्डचे बॉक्स अशा वस्तू वापरून ढोलीत घरटी करणाऱ्या पक्ष्यांसाठी वेगवेगळय़ा आकारात कृत्रिम घरटी बनवून बागेतल्या झाडांवर टांगली. मी बागेत बदल करत गेले, बागेचा परिसर हिरवागार झाला, एक छानसा अधिवास तयार झाला. पण त्याचवेळी आजूबाजूलाही बदल होत होते. समोरचं शेत जाऊन तिथे उंच इमारत आली, बाजूनं वाहणाऱ्या नाल्याचं गटार झालं, घराच्या बाजूचा रस्ता रुंद होऊन गाडय़ांची वर्दळ वाढली आणि पर्यायानं प्रदूषणही वाढलं. त्यामुळे जरी मी बागेत छोटा अधिवास निर्माण केला, तरी वर्दळीच्या ठिकाणी पक्षी येतील का म्हणून मी साशंक होते. पण निसर्गाची जादूच अद्भुत आहे याचा मला लवकरच प्रत्यय आला. आपल्यासाठी या बागेत सुरक्षित अधिवास आहे हे जणू पक्ष्यांना कळलं, की माझ्या आतल्या आवाजाची त्यांना जाणीव झाली, माहिती नाही. पण माझ्या बागेत पूर्वी न दिसणारे चष्मेवाला, वटवटय़ा, सूर्यपक्षी, सुभग, हळद्या असे अनेक नवीन नवीन पक्षी आता दिसायला सुरुवात झाली. हळूहळू माझ्या असं लक्षात आलं, की जिथे छोटे पाणवठे केले आहेत, तिथे बरेचसे पक्षी सकाळी आणि दुपारी हजेरी लावताहेत. मग शनिवार-रविवारी माझा मुक्काम बागेतच त्यांचं निरीक्षण करण्यात जात असे. पण मी त्यांचं निरीक्षण करत बसले की माझी बाकीची कामं राहून जायची. मग मी हे पाणवठे जिथून मला काम करता करता कधीही ते बघता येतील अशा जागी हलवले. तिथली एक खिडकी मोठी करून त्याला पूर्ण काच लावली, म्हणजे मला काम करता करता त्यांना बघता यावं. अशा प्रकारे रोजच त्यांच्याबरोबर माझं सहजीवन सुरू झालं.

पाणवठय़ावर उन्हाळय़ात आणि हिवाळय़ात पाणी पिण्यासाठी, आंघोळीसाठी २५ हून अधिक जातीचे पक्षी यायला लागले. सकाळी ८ वाजता आणि दुपारी ४ ते ६ असा ‘राउंड’ व्हायचा सगळय़ांचा पाण्यासाठी. त्या वेळी मला त्यांचं व्यवस्थित निरीक्षण करता यायचं. हे करताना मी नेहमीच एक पथ्य पाळलं, की कधीही त्यांच्या खूप जवळ जाऊन त्यांना ‘डिस्टर्ब’ करायचं नाही. त्यांना निसर्गातच राहू द्यायचं. जवळ न जाताही माझं त्यांच्याशी घट्ट  नातं तयार झालं होतं. त्यांच्या नुसत्या आवाजावरूनही मी त्यांना ओळखू लागले होते. त्यांच्या सगळय़ा सवयी मला माहिती झाल्या होत्या. पक्ष्यांनाही स्वभाव असतो, जगण्याचं एक तंत्र असतं, एक गाणं असतं. आपण फक्त त्यांच्या सुरांमध्ये सूर मिसळायचे असतात. म्हणजे ते आपले सोयरे कधी बनून जातात हे कळतही नाही!

पाण्यावर सकाळी सर्वात अगोदर यायचा तो नाचणं (फॅनटेल फ्लायकॅचर). याला आंघोळीची भारी हौस. दिवसातून सात-आठ फेऱ्या तरी होत त्याच्या पाण्यावर. चिमण्या, बुलबुल खूप मोठया संख्येनं एकत्र पाण्यात डुबक्या मारायचे. तर दयाळ, होला यांना कायम एकटय़ानं आंघोळ करायला आवडायचं. भांगपाडी मैना आणि जंगल मैना क्वचितच पाण्यावर हजेरी लावायच्या, पण आल्या की मनसोक्त आंघोळ करायच्या. शिपाई बुलबुल एकदम धीट राजासारखा यायचा, तर छोटुकला काळी-पांढरी रंगसंगती असलेला सेनेरिअस टीट मात्र भलताच भित्रा; पाण्यावर आला की अगोदर पाणवठय़ाच्या भोवती चार-पाच चकरा मारणार, आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करणार आणि घाबरत घाबरत एखादीच डुबकी मारून महाशय पसार! दयाळ नावाप्रमाणेच शांत, प्रेमळ. पाण्यावर येताना मंजुळ शीळ घालत आपल्या आगमनाची वर्दी देत येणार. दुसरा कोणता पक्षी मध्येच आला आंघोळीला, की हा सभ्यपणे त्याला जागा करून देणार. चिमणीपेक्षाही छोटुसा, डोळय़ाभोवती पांढरी रिंग असलेला चष्मेवाला- हे कायम मोठय़ा घोळक्यात यायचे. त्यांचा घोळका पाण्यावर आला की उत्साहाला उधाणच यायचं. सतत नाचणं, उडय़ा मारणं, जणू हिरव्या पऱ्याच! रॉबिन, शिंपी, वटवटय़ा, मुनिया, कोकिळा असे पक्षीही दिवसातून एकदा तरी पाण्यावर यायचेच. मला खूप आवडायचं साऱ्यांना बघायला.  तासन्तास त्यांना बघूनही मला कधीच कंटाळा आला नाही. उलट मन उत्साही होऊन त्याच्यासारखंच नाचायला लागायचं! पक्ष्यांची आंघोळ करून झाली की शेजारच्या झाडावर बसून सगळी पिसं साफ करायची, शेपटीखाली असलेल्या तेलग्रंथीमधून चोचीनं तेल काढून पिसांना लावून पिसं विंचरायची, हा त्यांचा रोजचा कार्यक्रम असतो. पक्ष्यांना त्यांच्या पंखांवरची धूळ, घाण, छोटे किडे इत्यादींपासून संरक्षण होण्यासाठी अशा आंघोळीची खूप गरज असते. आंघोळीमुळे आणि पिसं विंचरल्यामुळे त्यांचं पंखातलं बळ कायम राहतं. हल्ली नैसर्गिक पाणवठे नष्ट झालेत किंवा आहेत ते प्रदूषित आहेत. त्यामुळे अशा मानवनिर्मित पाणवठय़ांची त्यांना खूप गरज असते. माझ्या बागेत त्यांना स्वच्छ पाणी मिळत असल्यानं त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. घरातल्या सगळय़ांनाच त्यांची इतकी सवय झाली होती, की एखादा दिवस जरी एखादा पक्षी नाही दिसला, की आमच्या घरी त्याची चर्चा व्हायची की कुठे गेला असेल हा? का नाही आला दोन-तीन दिवस? मग आम्ही सगळे त्याची वाट बघायचो. आमच्या कुटुंबाचे सदस्य होते ना ते सारे!

एकदा डिसेंबरच्या गुलाबी थंडीत मी खिडकीजवळ बसून होते. एक वेगळीच शीळ ऐकू आली. मी आश्चर्यानं आणि सावधपणे बघू लागले. भुरकट रंगाचा, मोठय़ा टपोऱ्या डोळय़ांचा छोटासा पक्षी पाण्यावर आला होता. नीट बघितल्यावर मी अक्षरश: आनंदानं नाचायलाच लागले. ‘रेड ब्रेस्टेड फ्लायकॅचर’ हा हिवाळय़ात युरोपमधून भारतात स्थलांतर करणारा पक्षी माझ्या बागेत आला होता. त्यानंतर गेली कित्येक वर्ष हा युरोपियन पाहुणा न चुकता हिवाळय़ात बागेत मुक्कामाला येतो. राखी धोबी, पांढरा धोबी, चीफचाफ असे हिमालयातून स्थलांतर करणारे तर बीइटर, कोतवाल असे स्थानिक स्थलांतर करणारे पक्षीही दरवर्षी न चुकता बागेत येतात. एकदा का हिवाळा संपला, की एकेक करत परत मायदेशी निघून जातात. बरेच दिवस मुक्कामाला आलेले पाहुणे निघून गेले कीजसं वाटतं, तसं मन उदास होऊन जातं ते गेल्यावर!

  हिवाळा सरून उन्हाळा सुरू झाला, की पक्ष्यांचा विणीचा हंगाम सुरु होतो. बुलबुल, मुनिया, चष्मेवाला, शिंपी, नाचणं, सुभग, सूर्यपक्षी, वटवटय़ा असे अनेक पक्षी बागेतल्या झाडांवर घरटी बनवायचे. मी त्याच्या येण्याजाण्याच्या वाटेवर काटेसावरीचा मऊ कापूस, गवताच्या काडय़ा, सुतळीचे तुकडे झाडांवर लावून त्यांना थोडी मदत करायचे. प्रत्येकाला घरटं बनवायला किती वेळ लागतो, अंडी कधी दिली, किती दिवस उबवली, पिल्लं कधी अंडय़ातून बाहेर आली, त्यांना काय भरवताहेत, या सगळय़ाच्या मी नोंदी करून घ्यायचे. माझा घरबसल्याच सगळा अभ्यास व्हायचा. या पिल्लांना भरवायला भरपूर कीटक लागत. त्यामुळे माझ्या बागेत कीडनियंत्रण आपोआपच व्हायचं. पिल्लं जरा मोठी होऊन घरटय़ाबाहेर डोकावू लागली, की त्यांच्याशी माझी जास्तच जवळीक व्हायची. पण एकदा का ती आपल्या अवकाशात भरारी मारून निघून गेली, की घरटं रिकामं व्हायचं अन् मनाला चुटपुट लागून राहायची. ढोलीत घरटं करणाऱ्या पक्ष्यांसाठी मोठी झाडं जवळपास नसल्यामुळे कृत्रिम घरटी मी बागेत लावली होती. या घरटय़ांमध्येही दयाळ, मैना, टीट, मुनिया, रॉबिन, चिमण्या यांनी संसार थाटून कित्येक पिढय़ा जन्माला घातल्या. हे सारं अनुभवताना आपल्या छोटय़ाशा प्रयत्नानं आपण या सहचरांच्या संवर्धनासाठी हातभार लावतो आहे, या जाणिवेनं खूप आनंद मिळतो.

आणखी एकदा एक वेगळाच आवाज आंब्याच्या झाडावरून येऊ लागला. बाकीच्या पक्ष्यांचा पण खूप कलकलाट सुरू झाला. मी हा आवाज जंगलामध्ये ऐकला होता. शिकारी पक्ष्यासारखा काहीसा आवाज. मी धावतच बागेत गेले. बाकदार चोचीचा, पिवळे भेदक डोळे असलेला शिक्रा हा शिकारी पक्षी आंब्याच्या गर्द पानांमध्ये बसला होता. शिकारी पक्षी हे निसर्गाच्या अन्नसाखळीत सर्वोच्च स्थानी असतात. छोटय़ा कीटकांपासून ते शिकारी पक्ष्यांचं बागेतलं अस्तित्व म्हणजे बागेत निसर्ग साखळी पूर्ण झाल्याची खूणच.

पक्ष्यांबरोबरच मुंगूस, दोन जातींचे साप, अनेक प्रकारची बेडकं, खेकडे यांचा मुक्कामही असतो बागेत. आम्हाला कुणालाच त्यांची कधी भीती वाटली नाही. आपला त्यांना आणि त्यांचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून काळजी घेतली की झालं. हे सारे जीव मग आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक होऊन जातात.

आतापर्यंत माझ्या बागेत देशी आणि स्थलांतरित मिळून ५२ जातींच्या पक्ष्यांची नोंद मी केली आहे. पक्षी हे परिसंस्थेचे निर्देशक असतात. परिसंस्था जर कमजोर, बिघडलेली असेल तर तिथे कबुतरं, कावळे, घारी मोठय़ा संख्येनं दिसतात. माझी बाग मात्र याला अपवाद आहे. एक खूप चांगली परिसंस्था मी बागेत तयार करून जपली आहे याचा खूप आनंद वाटतो. हे सारं करता करता मी निसर्गात, पक्ष्यांमध्ये एवढी गुंतत गेले, की माझ्या अभ्यासाचा, अनुभवाचा निसर्ग संवर्धनासाठी उपयोग व्हावा, इतरांनाही निसर्गाची गोडी निर्माण व्हावी, असे अधिवास जागोजागी निर्माण व्हावेत, जपले जावेत, या प्रेरणेतून मी माझा आर्किटेक्चरचा व्यवसाय सोडून जैवविविधता शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि माझी स्वत:ची ‘इकोलॉजिकल कन्सल्टन्सी’ सुरू केली. पर्यावरण संवर्धन करणाऱ्या अनेक संस्थांशी जोडली गेले. अनेक संस्थामध्ये याविषयी कार्यशाळा घ्यायला सुरूवात केली.

निरीक्षण करता करता मी या साऱ्यांचं चित्रीकरणही करत होते. माझे प्रयत्न आणि त्याला पक्ष्यांनी दिलेली दाद, यावर आधारित ‘साद’ हा लघुपट मी बनवला. या लघुपटास राज्याच्या पर्यावरण विभागाचा द्वितीय पुरस्कार पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मिळाला, तर ‘गार्डन क्लब- कोल्हापूर’चा प्रथम पुरस्कार मिळाला. हे पुरस्कार मी माझ्या बागेतल्या सहचरांनाच समर्पित करते. निसर्गाला आणि निसर्गातल्या प्रत्येक जीवाला आपले सोयरे सहचर बनवण्यासाठी छोटे छोटे प्रयत्नही खूप मोलाचे आहेत. असे प्रयत्न आपण आपल्या आजूबाजूला करत राहिलो तर निसर्गाचा ऱ्हास कमी होऊन नक्कीच समतोल साधला जाईल.

monaalisa2003@gmail.com