‘‘निसर्गाशी मैत्र जुळलं की तुम्ही कधीच एकटे नसता. जीव लावणारे असंख्य अनुभव येत राहतात. माझं लहानपण निसर्गातच गेलं. त्यामुळे वृक्षवल्लींप्रमाणेच वनचरेही सोयरे सहचर झाले. घरात असणाऱ्या गाई-गुरांपासून ते मांजरी-कुत्र्यांपर्यंत, सापांपासून फुलपाखरादी विविध कीटकांपर्यंत असंख्य जीव काहींना काही शिकवत गेले. पुढे ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’शी ओळख झाली आणि निर्सगातलं विज्ञानही कळू लागलं. निसर्गानं मला समृद्ध केलं, इतकं की ‘वनचरांशी खेळ मी मांडून गावे’ हे जगणंच झालं आहे..’’ सांगताहेत कवयित्री, लेखिका, पर्यावरण अभ्यासक रेखा शहाणे.

एकदा का तुमचं मैत्र निसर्गाशी जुळलं की तुम्ही कधीच एकटे नसता, एकाकी नसता. अनुभवलंय कधी? निसर्गाच्या एकतानतेत माझं मिसळून जाणं कधी सुरू झालं, नाही सांगता येत. आजही मनात आलं की मी एकटी, हव्याहव्याशा वाटणाऱ्या जागी, निरुद्देश भटकंतीसाठी बाहेर पडते. निसर्गातली अनेक गुपितं आपसूक नजरेला पडत राहतात..

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
Benefits Of Eating Poha With Lemon Juice And Kothimbir
पोहे बनवताना ‘हा’ पदार्थ वरून टाकायला अजिबात विसरु नका; प्रमाण किती हवं? चव वाढेलच पण हे फायदेही पाहा
Village culture of bhavki
मदतीला धावून येणारी भावकी! गावात जपली जाते आपली संस्कृती, VIDEO होतोय व्हायरल
alu in garden
निसर्गलिपी : येता बागेला बहर…

 मुलगी असण्याचं, बाई असण्याचं भय नाही वाटलं तुला? या प्रश्नाचं उत्तर नेमकं नाही सांगता येत. पण मला वाटतं, माझा या अवतालभवतालावर अधिक विश्वास आहे. त्यांचं त्यांचं एक जग असतं. तुम्ही त्यात नाही पडलात, ढवळाढवळ नाही केलीत तर ते जीवजंतू, साप, नाग कोणी नाही जात तुमच्या वाटेला. माणसांचंही तेच आहे. पण त्यांना तुमचं काय चाललंय यात नाक खुपसायचं असतं. ते चौकशी करतात. नेहमीच बरेपणाने नसेलही, पण तेव्हा समजून बोलायचं. चौकशी संपली की त्यांचा तुमच्यातला इंटरेस्ट संपतो. ते चालते होतात. मनमौजी मस्तीत चालत राहतात..

माझी एक गोष्ट बाबा सांगायचे. पाच-सहा वर्षांची असेन-नसेन तेव्हा. कुठे चाललोय ते कळण्याचं वयही नव्हतं. पण शेतामागून काही शेतं पार करत मी पोहोचले तिथे लोखंडीचं झाड फुललेलं होतं. त्या फुलांच्या सुगंधाचा माग काढत मी त्या झाडाखाली आनंदात उडय़ा मारत उभी होते. बाकी सगळे हवालदिल, पोर कुठे हरवली म्हणून. सगळीकडे ही शोधाशोध. तर, हे असलं माझं नादिष्टपण लहानपणापासूनचंच. त्या वेळी पायात बांधलेले छुमछुम आजही घुंगुरांशिवाय तसेच खुळखुळत असतात. शेणामातीनं सारवलेलं, मागेपुढे देखणी अंगणं असलेलं मातीचं मोठ्ठं जुनं घर होतं आमचं. प्रशस्त आवार, घरासमोर साडेचार एकर भातशेती. टोकाला बारमाही पाणी असलेली, रहाटगाडगं लावलेली विहीर. झापडं बांधून बैल भोवती फिरत. त्याचं मात्र मला वाईट वाटायचं. भरपूर झाडं, बांबूची बेटं, फुलं, पक्षी, कुत्री, मांजरी. साप-सापसुरळय़ा, इंगळय़ा तर कधी घरात येतील सांगता यायचं नाही. रात्री कोल्हेकुई ऐकू यायची. पलीकडच्या शेतात कधी तरस यायचा. घरात बैल, खोंड, पाच-सहा म्हशी, गाई, त्यांची वासरं होती, या सगळय़ांना ओळख होती, नावं होती. सगळं मिळून एक मोठं खटलंच ते. दूध काढण्यापासून शेणगोठा करणं, गाईगुरांना चरायला, पाणी पाजायला नेणं, शेणी घालणं, दुधाचे उकाडे घालणं, भरपूर उस्तवार असायची कामांची. ही सगळी कामं करायला बाया आणि गडीमाणसं होती. पण घरात सोवळंओवळंही भरपूर. ते साग्रसंगीत सांभाळत माणसांनी आणि कामांनी घर गजबजलेलं असायचं. त्या सगळय़ा माणसांच्या गोतावळय़ाचं, सर्वाचंच निसर्गाशी एक अतूट नातं होतं. म्हणूनच तिथल्या जैवविविधतेशी नकळत सहज ओळख होत गेली. अर्थात हे शब्दही पार नंतर माहीत झाले. पण साप, पाणसाप, नानेटय़ा कुठंही कधीही दिसायच्या. त्यांना पाहिल्यावर धावत सुटायचं नाही. त्यांच्या वाटेला जायचं नाही. आहात तिथे जसे आहात तसे उभे राहा. त्याच्या वाटेने ते निघून जातील. हा सोपा फंडा होता. पण जनावरांनी सावज पकडलेलं असेल तर ते जिवाच्या आकांतानं ओरडत असे. ‘जनावरानं बेडूक पकडलाय. आत्ता कुणी बाहेर जायचं नाही.’ आईआजीचा हाकारा व्हायचा. सावज सुटलं तर त्याचा सपाटून पाठलाग करताना जनावर कुठून कसं जाईल ते ठरवणं अवघडच. पण कोणी पोर बाहेर असेल तर गडीमाणूस पोराला हाताला धरून घरी आणून सोडत असे. त्यामुळे भयभीती तशी वाटायची नाही. हे सगळं पाहात, शिकत मी मोठी होत होते. झाडं भरपूर. त्यामुळे पक्षीही. त्यांची मधुर शीळ साद घालायची. हा कोणता पक्षी? त्यांच्या आवाजातले हलके फरक काही वेगळं सांगतात असं अंदाजानं थोडं काही समजायला लागलं. कोणत्या वेळी कोणत्या झाडावर कोण घरटं बांधतंय ते पाहायचं. चतुर, सुया, फुलपाखरांच्या मागे धावताना मजा यायची. वासरांबरोबर खेळताना- हुंदडताना गाई, म्हशी, बैल यांच्याशी आपसूक नातं जुळत गेलं. शेतातून फिरताना मनात आलं, की म्हैस-सातघरवालीचा आचळ स्वत:च्या तोंडात पिळायचा. दूध प्यायचं नि धावत सुटायचं. तिनंही कधी हुस्कावलं नाही, की लाथाडलं नाही. भुरीनं तर शिंगावरच घेतलं असतं. तिची टोकदार शिंग नंतर कापली होती तरी तिच्या जवळ जायला भीती वाटायची.

शाळा सकाळी ११ ते ५ दरम्यानची. घरापासून लांब होती. १० लाच निघायचो. डांबरी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खारटाणं होती. वाटेत बसण्यासाठी सिमेंटनं बांधलेले समोरासमोर कट्टे होते. तिथे पाण्यावर पक्षी यायचे. बाभळीवर घरटी करायचे. थंडीत वेगळे पक्षी यायचे. हुप्पू, स्वर्गीय नर्तक, फीजंट-टेल्ड जकाणा मला विलक्षण आवडायचे. शाळेच्या वाटेवर रमतगमत हे सगळं पाहणं जमून जायचं. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीची-बीएनएचएस- ओळख खूप नंतर झाली. मग बीएनएचएसबरोबर वनस्पतिशास्त्र (बॉटनी),पक्षिशास्त्र (ओर्निथोलॉजी),  कीटकशास्त्र (एण्टोमोलॉजी) यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. निसर्गाच्या जवळ जाणं अधिक सजग होत गेलं. निसर्ग निरीक्षण, संरक्षण, संवर्धनाची निकड अधिक जाणवायला लागली. मग ते वैयक्तिक, सामाजिक पातळीवर विनामोबदला जमेल तेवढं मी जरूर करते. ‘हे विश्वची माझे घर’ म्हणावं असं आमचं आवार समृद्ध होतं. पक्ष्यांचा प्याऊ होता. बुलबुल, कावळे, चिमण्या, दयाळ, कबुतरं, कधी भारद्वाज यायचे. बाकीही यायचे पण तेव्हा नावं माहीत नव्हती. त्यांचं पाणी पिणं, अंघोळी करणं पाहताना मजा यायची. पण जवळ जायचं नाही. लांबून पाहायचं, ही शिकवण. ‘प्याऊ नेहमी भरलेला हवा,’ त्यात पाण्याची भर घालत बाबा सांगायचे. माझी आजची सवय ही तेव्हापासूनची.

आपली अठरा इंच लांब शेपटी मिरवणारा देखणा ‘स्वर्गीय नर्तक’ पक्षी मन वेधून घ्यायचा. माझा भाचा सौरभ त्या वेळी लहान होता. त्यानं फोन केला, ‘‘आमच्याकडे रोज केशरी बुलबुल येतो. तू पाहिलायस का गं?’’ म्हटलं, ‘‘अरे ही मिसेस स्वर्गीय नर्तक. लहानपणापासूनची माझी मैत्रीण. आता तिचे मिस्टर येतायत का तेही पाहा.’’ माझी माहिती. राखी वटवटय़ाला तो ‘इटूकचिटूक’ म्हणायचा. बुलबुलनं केलेलं घरटं त्याला माहीत असायचं, असं सहज कुतूहल निसर्गाशी जवळीक वाढवतं.

 माझ्या लहानपणच्या आठवणींत सर्वाचा लाडका कुत्रा काळू तात्यांनी हौसेनं पाळलेला. वाण देशीच होतं. पण वाघासारखा होता. त्याची जेवायची, दूध, पाणी प्यायची भांडी, झोपायची जागा, अंथरूण,पांघरूणही होतं. जेवायच्या आधी त्याच्या खाण्यापिण्याची विचारपूस करून मगच बाबा जेवत. त्याच्या गळय़ात पट्टाही होता. पण त्याला एक खोड होती. घराजवळ टोल नाका होता. रस्ता डांबरी. पण कडेला माती होती. येणाऱ्या जाणाऱ्या एसटय़ा, गाडय़ा-बैलगाडय़ांमुळे कडेची माती अगदी मऊसूत होऊन जायची. भर दुपारी त्या मातीवर जाऊन तो लवंडायचा. त्याचा तो नेमच होता. पण एका दुपारी कुणा दुष्टानं त्याच्या अंगावर एसटी घातली. नाकेदार सांगायला आले. बाबा गहिवरले. काळू रक्ताच्या थारोळय़ात पडला होता. काही दिवस बाबा धड जेवलेही नाहीत. पूर्वीच्या संस्कारांप्रमाणे म्हणाले, ‘आपल्या देवाला कुत्रा चालत नाही.’ पुढे आम्ही कधीही कुत्रा पाळला नाही. पण भटके कुत्रे असायचे. उरलंसुरलं अन्न फेकून न देता, युयु करून बोलवलं की ते लग्गेच हजर व्हायचे. त्यांची जागा ठरलेली होती. मग सवय लागायची आणि ते घरचेच होऊन जायचे.

 शेताभातात फिरताना ते मागे मागे, बरोबर सोबत असायचे. मधेच कधी म्युन्सिपाल्टीची भटक्या कुत्र्यांना मारायची टूम निघायची. ते अन्नातून विष घालायचे. तशा दिवसांत असाच एक न पाळलेला, पण आमच्या घरचाच झालेला कुत्रा संध्याकाळी धावत धावत जिवाच्या आकांतानं मुसंडी मारत दिंडीतून आत घुसला. नाकातोंडातून हे रक्त ओघळतंय.. मागील दारी, नेहमीच्या जागी त्यानं लोळण घेतली. धावत जाऊन आई, आज्जीला सांगितलं. त्याची तडफड बघवत नव्हती. काही न बोलता विषावर उतारा म्हणून आई आंबट ताक घेऊन आली. त्याला पाजलं. ते पिणंही त्याला जमत नव्हतं. आई त्याच्या अंगावर हात फिरवत बसली. आज्जी हळुवार झाली. त्याच्या डोक्यावर ओलं फडकं ठेवत हात फिरवत राहिली, पण उपयोग नव्हता. मेलाच तो. अन्यानं त्याला शेतात पुरलं. वेळ संध्याकाळची होती. काळोख झाला होता. बाबा घरी येण्याची वेळ होती. पाटी-पुस्तकं, दप्तरं आवरून आम्ही शिस्तीत परवचा म्हणायला बसलो. तोपर्यंत चहा घेऊन तात्या उजळणीवर लक्ष ठेवत फेऱ्या मारायचे. पण आज ते आमच्यासाठी थांबले नाहीत. अन्याबरोबर कुत्रा पुरला होता तिथे जाऊन थांबले. असे सोयरे सवंगडी आणि आम्ही एकत्रच वाढलो. त्यांच्या नसण्यानं रडलो.

अशीच आणखी एक गोष्ट आजही विसरू म्हणता विसरता येत नाही. त्या दिवशी सकाळी, नेहमीसारखी माळ ओढत तात्या अंगणात फेऱ्या मारत होते. बरोबर मीही. मोठा दिंडी दरवाजा सकाळी हलकासा उघडलेला असे. रस्ता ओलांडत एक कुत्रा आत आला. उभा राहिला. तोंडात काही होतं. आम्ही जवळ गेलो. तोंडात चिपाड झालेली आमची मांजरी होती. तिला समोर ठेवलं. बाबांकडे पाहिलं. पायाला अंग घासलं आणि दिंडी बाहेर रस्ता ओलांडून, दोन पायावर मान ठेवून बसून राहिला. त्याचं ते रूप आजही नजरेसमोरून हलत नाही. बाबा म्हणाले,‘‘आपली तारी मेली. महिना-दीड महिना तुम्ही शोधताय ना तिला. मेली ती.’’ मला रडायला आलं. कुत्र्यांजवळ जायचं नाही. त्यांना हात लावायचा नाही अशी सक्त ताकीद असताना मी धावत बाहेर जाऊन त्या कुत्र्याच्या जवळ बसून रडत राहिले. या घरचं हे मांजर, नेमकं ओळखलं त्यानं. ते मेलंय, तर हा तिला आमच्या स्वाधीन करून मूकपणे बसून होता. शब्दांशिवायचा हा संवाद..  

आमच्या गोकुळात कधी मांजर व्यालेली असे, कधी कुत्री, गाय, कधी म्हैस किंवा एखादी कामाला येणारी गरवारशी असे.आपसूक त्या सगळय़ांकडे आई-आजी अधिक लक्ष देत. मांजरा-कुत्र्यांच्या पिलांशी, गाईम्हशींच्या वासरांशी खेळण्यात आम्ही त्यांच्यासारख्याच उत्साहात दंग असायचो. गाईची वासरं त्यांच्या अंगच्या चणीमुळे, रंगरूपामुळे मला प्रिय होती, पण सगळेच खेळगडी. आता वाटतं, बालपण म्हणजे एक सहज लोभस जीवलावी उत्सव होता.  जनावरांचे डॉक्टर अधूनमधून येत असत. तरीही वासरं मरायची. आम्हाला वाईट वाटायचं. मुंढीचं वासरू मेलं आणि ती दूध काढू देईना. चारा खाईना. नुसती ओरडत राही. शेवटी तिच्यासाठी पेंढा भरलेलं वासरू तयार केलं तेव्हा ती दूध काढू देऊ लागली, खाऊ लागली.

आमच्याकडे मांजरांच्या किती पिढय़ा जन्माला आल्या आठवतही नाही. दुधा-तुपाची रेलचेल होती. सगळी मस्त गब्दुल असायची. आमचे खेळगडीच ते. माझ्या आठवणीत जास्त तारी, गज्जू आणि उल्ल्या आहेत. माझं वाचनाचं वेड लहानपणापासूनचंच. दुसरीत असताना अकरावीची पुस्तकं वाचायचे. मी नादिष्ट आहे. आपल्याच नादात, ‘होय, झोपते आता’ म्हणत रात्ररात्र वाचत बसायचे, की गज्जू, उल्ल्या जवळ येऊनच नाही तर पुस्तकाच्या पानांवर येऊन बसायचे. मग कधी राग यायचा नि जरा चढय़ा आवाजात सांगितलं, की लाडीगोडीनं पायांशी घुटमळून मांडीवर येऊन बसायची. आणि मग झोपताना वेटोळे करून माझ्या पायांवर माझ्या बाजूलाच निजून जायची. असं मांजरांचं आणि माझं सख्य.

आवारात राखणदार म्हणजे अगदी स्वच्छ दहाचा आकडा दिसणारा कोब्राही होता. आमच्या शेतात मुंगुसंही होती. तरी साप-मुंगुसाची लढत कधी कोणाला पाहायला मिळाली नाही. पण एका विलक्षण झुंजीची मी साक्षीदार आहे. आमच्या गज्जू मांजरानं राखणदाराशी दिलेली झुंज. वेळ दुपारची. जेवण झाल्यावर बाकी सगळे गप्पा मारत पडले होते. मी आपली पक्ष्यांच्या मागे फिरत होते. स्वयंपाकघराच्या पायऱ्या चढणार तेवढय़ात पाहिलं, गज्जू उंच दगडावर कमानदार होत, शेपटी फुलवून, डावली (पंजा) मारतेय. पुन्हा जागा बदलतेय. एका आविर्भावात ती कोणाला डावल्या मारतेय कळत नव्हतं. थोडय़ा लांबवर हे चाललंय. मी तिथेच उभी होते. मग एकदम नागाचा फणा दिसला आणि हिची डावली. नागाचा फणा लाल झालेला होता. तो फुसफुसतोय. ही उंचावर पोझिशन घेऊन. मी पटकन बाबांना उठवलं. आम्ही सगळे बाहेर जमा झालो. जे चाललंय त्यात हस्तक्षेप करायचा नसतो. बाबा हाताची घडी घालून उभे होते. शेवटी गज्जूनं सापाला ठार मारलं. तेव्हाच ती  बाजूला झाली. मग तिथल्या झाडाच्या विशाल बुंध्यावर अंग चाटत शांतपणे बसली होती. नेहमीप्रमाणे अन्यानं सापाला उचलून शेतात पुरलं. सगळे हळहळले. गज्जूनं सापाला का रोखलं? का मारलं? काहीच कळलं नाही. पण एवढय़ा वर्षांचा राखणदार आमच्यासमोर गज्जूनं ठार मारून टाकला होता. काही दिवस ती बाहेरबाहेरच होती. नैवेद्याचं दूध प्यायलाही फिरकली नाही. होती आजूबाजूलाच, पण घराबाहेर. का? नाही माहीत.   

चित्रकुटीर-पेणच्या परिसराशीही माझं असंच नातं आहे. मुंबईतही काही वेगळं नाही. फुलपाखरं, पतंग तर घरात कधीही जन्माला येतात. शिवाय अनेक जखमी पक्षी, कधी घार, कावळा, तांबट असू दे, की चिमणी, कोणी का असेना, बरी होऊन उडून जातात. उन्हानं हल्लक झालेला तांबट एकदा तीनेक दिवस घरी होता. ‘एशियाटिक’मधून येताना अशोक शहाणे त्याच्यासाठी रुमालात उंबराची पिकलेली फळं बांधून घेऊन यायचे. तर कधी पोरकी झालेली पक्ष्यांची पिल्लंही घरात असतात. त्यात घरटय़ातून पडलेली चिमणीची पिल्लं अधिक. मग मी तिचं घरटं शोधून पिल्लू आत ठेवते.

अनेकदा संथ, शांत गतीत रानवाटांवरून चालताना, निळय़ा आकाशाकडे पाहताना वाटतं, हे सारं अवतालभवताल, निसर्गातले आगळे संमिश्र ताल, सगळे बेमालूम मिसळून गेलेत एकमेकांत आणि अख्खा निसर्ग गातोय, आश्चर्यकारक अशी एक मोठ्ठी गोड सिम्फनी! अवाढव्य, अतिप्रचंड आकलनापलीकडची सिम्फनी. पण यातले सूक्ष्म आवाज साध्या डोळय़ाला न दिसणाऱ्या जीवजंतूंपासून ते आताच्या महाकाय हत्तींचेही आहेत. सर्वदूर अजब सरमिसळ होऊन गेलीय सूरतालांची. ते संगीत ऐकता आलं तर ही सिम्फनी वेड लावते. निसर्गातलंच एक होऊन जाणं ज्यांना जमतं, त्यांचे वृक्षवल्लीसह सारे वनचर अगदी सगेसोयरे होऊन जातात. असे सगेसोयरे सहचर बरोबर असतील तर मग भय-भीती कशाची?

rekhashahane@gmail.com

तळटीप – लेखाचं शीर्षक कवी ना. धों. महानोर यांच्या ‘या भुईने या नभाला दान द्यावे’ या कवितेतील ‘पाखरांशी खेळ मी मांडून गावे’ या ओळीवर आधारित.