scorecardresearch

सोयरे सहचर : माझं प्राणीगोत!

‘‘आजवर मी कितीतरी प्राणी पाळले. काही मुद्दाम पाळलेले, तर काही ‘रेस्क्यू’ केलेले. साप, उंदीर, खार, कासवं, विंचू, मासे, बगळा आणि घुबडंही.. हे प्राणीपक्षी रूढ अर्थानं ‘पाळीव’ नाहीत.

सोयरे सहचर : माझं प्राणीगोत!
सोयरे सहचर : माझं प्राणीगोत!

‘‘आजवर मी कितीतरी प्राणी पाळले. काही मुद्दाम पाळलेले, तर काही ‘रेस्क्यू’ केलेले. साप, उंदीर, खार, कासवं, विंचू, मासे, बगळा आणि घुबडंही.. हे प्राणीपक्षी रूढ अर्थानं ‘पाळीव’ नाहीत. या प्राण्यांचं थोडं वेगळं असतं. हे प्राणी तुम्हाला ओळखतीलच असंही नाही! पण माझं मात्र या ‘प्राणीगोता’वर तेवढंच प्रेम होतं. यातल्या काहींनी मला प्राणीप्रेमाला ज्ञानाची जोड असणं किती आवश्यक आहे, याचा धडा दिला, तर बहुतेकांनी असहाय प्राण्याला काही दिवस आश्रय देता आल्याची धन्यता दिली.’’ सांगताहेत प्राणीप्रेमी व लेखक मिलिंद आमडेकर.

मी जेव्हा अगदी नवखा, अतिउत्साही सर्पमित्र होतो तेव्हाची गोष्ट- एका शाळेच्या मुलांची सहल घेऊन मी कर्जत, चौकजवळच्या माणिक गडावर गेलो होतो. माणिक गडाच्या पायथ्याशी असलेल्या वाशिवली गावापर्यंत बसनं गेलो. तिथून पुढे चालत गडावर पोहोचायला साधारण तीन तास लागतात. गडावर पोहोचलो तेव्हा अकरा वाजले होते. गडावर थोडी तटबंदी, पडकं देऊळ, मोठं पाण्याचं टाकं वगैरे पाहून आम्ही गडावर असलेल्या एकमेव मोठय़ा झाडाखाली जेवायला बसलो. माझ्या दोन मित्रांना गडावर चक्कर मारायची लहर आली. म्हणून ते दोघं गडावर फिरायला गेले. १५-२० मिनिटांत ते परत आले आणि म्हणाले, ‘‘मिलिंद, तिकडच्या पाण्याच्या टाक्यात एक मोठा साप आहे. तू पकडतोस का?’’ म्हटलं, चला बघू या.

 आम्ही तिघं त्या टाक्यापाशी आलो. टाक्यात एक चांगला जाड आणि पाच-साडेपाच फूट लांबीचा साप पडलेला दिसत होता. त्याचा आकार आणि लांबी बघून मी जरा चरकलो. नंतर लक्षात आलं, की अजगर जाडच असतो. हाही जाडाच होता. म्हणजे हा अजगरच असावा. अजगर बिनविषारी असतो, असं साप पकडणाऱ्या मित्रानं मला सांगितलं होतं. त्यामुळे अजगर पकडायला काही हरकत नाही, असं म्हणून मी टाक्यात हात घालून सापाला पकडायचा प्रयत्न करू लागलो. पण तो सारखा आतमध्ये जाई. तेव्हा मी विचार केला, की हा असा नाही हाती येणार. म्हणून मग मी त्या टाक्यात असणाऱ्या एका दगडावर उतरलो. तो दगड डुगडुगत होता. अजगर माझ्या आजूबाजूकडून फिरत होता. मी  जिद्दीला पेटलो. मी सापाची शेपटी पकडली, मित्रानं काठीनं सापाचं तोंड दगडावर दाबून धरलं. मी चपळाईनं पाण्यात हात घालून त्या सापाची मान पकडली. एका हातात शेपूट आणि दुसऱ्या हातात मान धरून मी टाक्यातून बाहेर आलो. मी त्याची मान थोडी दाबताच त्या सापानं मोठा जबडा वासला. तेव्हा त्याचे दोन तीक्ष्ण सुळे मला दिसले. ते पाहाताच मला वाटलं, की अजगराला इतके मोठे सुळे कसे काय? पण नंतर विचार केला, की त्यानं पकडलेल्या भक्ष्याची पकड सुटू नये म्हणून कदाचित हे मोठे सुळे अजगर भक्ष्याच्या शरीरात घुसवत असेल. मी साप घेऊन मुलं आणि शिक्षिका बसल्या होत्या तिथे आलो. त्यांनाही मोठं आश्चर्य वाटलं. सगळेजण माझ्याभोवती गोळा झाले. मग मी त्यांना हा साप म्हणजे अजगर आहे, तो आपलं भक्ष्य कसं पकडतो, कसं गिळतो वगैरे ऐकीव माहिती सांगितली. तो बिनविषारी साप आहे असंही सांगितलं. त्यामुळे सुरुवातीला बिचकणारी मुलं नंतर बिनधास्त हात लावत होती. दरम्यान, त्या सापाची माझ्या पकडीतून सुटण्यासाठी धडपड सुरू होती. पण मी सावध होतो. पकड सैल होण्याची संधीच त्याला देत नव्हतो. जवळपास पाऊण तास तो साप माझ्या हातात होता. आम्ही त्याचे फोटो काढले आणि त्यानंतर त्याला सोडून दिलं. हळूहळू एका कपारीत तो दिसेनासा झाला. मुलांना घेऊन मी परतलो. दुसऱ्या दिवशी माझ्या साप पकडणाऱ्या मित्राला भेटून माणिक गडावर पकडलेल्या सापाविषयी, त्याच्या अंगावरच्या नक्षीविषयी, तीक्ष्ण सुळय़ांविषयी सांगितलं. माझं सगळं ऐकून मित्र म्हणाला, ‘‘तू सुदैवानं वाचला आहेस. तू अजगर समजून अतिविषारी घोणस पकडला होतास. तो जर तुला चावता तर तुझी धडगत नव्हती.’’ तेव्हा त्याचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं. कदाचित आज हे लिहायला मी हयातही नसतो.  एका अनपेक्षित अरिष्टातून मी आणि ती शाळेची मुलंही पुरते बचावलो होतो. माझं सापांविषयीचं अर्धवट ज्ञान घात करू शकलं असतं. माझा पहिला धडा मला मिळाला होता. मग सापांबद्दलची जेवढी पुस्तकं मिळतील तेवढी वाचून काढली. वेगवेगळय़ा प्राणीसंग्रहालयांत जाऊन विषारी, बिनविषारी सापांची नीट ओळख करून घेतली. त्यांच्या विषाचे आपल्या शरीरावर कोणकोणते आणि कसकसे परिणाम होतात ते समजून घेतलं. प्रथमोपचार माहीत करून घेतले. सर्पविषावरची प्रतिविषं कुठे मिळतात ते लक्षात ठेवलं.

एकदा मी दुर्गमित्र संस्थेबरोबर कर्जत-आंबिवलीजवळच्या कोथळी गडावर गेलो होतो. दिवसा गडाची साफसफाई केल्यावर आमच्यातली काही मंडळी बालेकिल्ल्यावर गेली होती. उतरताना संध्याकाळ झाली. तशात कुणाच्या तरी हाताला कशाचा तरी गार स्पर्श झाला. त्यानं झटक्यानं हात मागे घेतला. बॅटरी लावून पाहिलं, तर ते सापाचं लहान पिल्लू होतं. मी त्या पिल्लाला पाहिलं. अंगावरच्या नक्षीवरून ते डुरक्या घोणसाचं पिल्लू होतं. डुरक्या घोणस बिनविषारी, मातीत राहाणं पसंत करणारा साप आहे. मी ते साधारण पाच इंच लांबीचं पिल्लू पाळण्यासाठी एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून दुसऱ्या दिवशी घरी आणलं. पिल्लू घरी तर आणलं, आता याला खायला काय घालावं हा प्रश्नच होता. ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’मधले सर्पतज्ज्ञ

पी. बी. शेखर यांना भेटलो. ते म्हणाले, ‘‘पांढऱ्या उंदरांच्या जोडय़ा पाळ. त्यांना होणारी पिल्लं या सापाच्या पिल्लाला खायला घालता येतील.’’ म्हणून मग मी पांढऱ्या उंदरांच्या तीन जोडय़ा आणल्या. त्यांना एका वेगळय़ा मोठय़ा खोक्यात ठेवलं. सापाच्या पिल्लाला एका रिकाम्या फिशटँकमध्ये खाली माती पसरून ठेवलं होतं. आता उंदरांना पिल्लं कधी होतात त्याची वाट पाहाणं सुरू झालं. दहा-बारा दिवसांत एका उंदरिणीनं पिल्लं दिली. ती पिल्लं पाहून यांना मारू नये असंच वाटत होतं. पण सापाच्या पिल्लालाही उपाशी ठेवता येणार नव्हतं. शेवटी ‘जीवो जीवस्य जीवनम्’चा मंत्र आळवला. दोनच मिनिटांत त्या उंदराच्या पिल्लाला विळख्यात जखडून सापाच्या पिल्लानं थंड केलं. काही क्षणातच उंदराचं पिल्लू सापाच्या पिल्लाच्या पोटात गडप झालं. सापाच्या पिल्लाची ही पहिली शिकार पाहण्यासाठी आमच्या घरातले, वाडय़ातले बरेच जण जमले होते. नंतर सापाचं पिल्लू मातीत शिरून निवांत पडून राहिलं.  दुसऱ्या दिवशी त्याला उंदराचं दुसरं पिल्लू घातलं, पण साप ते खाईना. कारण पहिलं पिल्लूच अजून पचलं नसावं. सापाच्या पिल्लाला एक उंदराचं पिल्लू पचवायला तीन-चार दिवस तरी लागणार हे माझ्या लक्षात आलं नव्हतं. बरं, तेवढय़ा काळात उंदरांच्या पिल्लांची वाढ थोडीच थांबणार होती? ती चालूच राहणार होती. म्हणजे या गतीनं उंदराच्या सहाव्या पिल्लाचा नंबर येईपर्यंत ते बऱ्यापैकी मोठं होणार होतं. तशातच आणखी दोन-दोन दिवसांच्या अंतरानं उंदरांच्या इतर दोन माद्यांनाही आठ-आठ पिल्लं झाली. म्हणजे तेव्हा माझ्याकडे एक सापाचं पिल्लू, सहा मोठे पांढरे उंदीर आणि उंदरांची एकवीस पिल्लं असा संभार होता. म्हणजे एकविसाव्या पिल्लाचा नंबर येईपर्यंत तो चांगला मोठा उंदीरच झाला असणार होता. एव्हाना आम्हाला सापाच्या पिल्लाऐवजी उंदरांची पिल्लं कशी वाढतात, कशी खेळतात, ते बघण्यात मौज वाटू लागली. साधारण चार महिने आमच्या सापाला खाण्याची फिकीर पडली नाही. पण नंतर उंदीर आपापसात मारामारी करून मरू लागले. तीन-चार उंदरांच्या गळय़ाला गाठी झाल्या. शेवटी एकच उंदीर शिल्लक राहिला. ते पावसाळय़ाचे दिवस होते, म्हणून सापाच्या पिल्लाला बेडूक खायला घालत होतो.  सापाचं पिल्लू आता साधारण दहा-अकरा इंच लांबीचं झालं होतं. ते काचेच्या पेटीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतं. मी साप पाळला आहे, ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीत झाली होती. त्यामुळे त्याला पाहायला बरेच जण येत. मग त्यांना साप बाहेर काढून दाखवला जाई. पावसाळा संपल्यावर बेडूक मिळेनासे झाले. मग विचार केला, याला पालही चालेल. म्हणून मग आम्ही एकदा फोटोफ्रेमच्या मागे लपलेली पाल पकडली. ती सापाला घातली. ती त्यानं खाल्ली, तेव्हा सुटकेचा निश्वास टाकला. आमच्या घरातल्या पाली संपल्यानंतर आम्ही शेजारपाजारच्या घरी जाऊन पाली पकडत असू. किंबहुना शेजारीच आम्हाला पाल पकडायला बोलावत. कधी कुणा मित्रांकडे, नातेवाईकांकडे गेलो आणि तिथे पाल दिसली, की आम्हाला आमच्या सापाची आठवण होई. मग त्यांच्याकडे पाल पकडण्याचं प्रात्यक्षिक होई. त्याच वेळी आमच्याकडे तीन लहान कासवं आली. ती लेदरबॅक टर्टल किंवा आपल्या नदी, तळय़ात सापडतात ती कासवं होती. त्यांना एक प्लास्टिकचा टब दिला. त्यांच्या खाण्यासाठी गांडुळं शोधण्याचं काम वाढलं. कधीकधी त्यांना लहान लहान मासे विकत आणून खायला घालत असू. एकदा ट्रेकला गेलो असताना दोन मोठे काळे विंचू पकडून आणले. त्यांना एक फिशटँक आणून त्यात माती घालून दगडांचा आडोसा वगैरे करून ठेवलं होतं. विंचू माझ्याकडे महिनाभर होते. त्यांना मी आमच्या इथल्या काही शाळांमध्ये दाखवून त्यांची माहिती सांगितली. कारण आपल्याकडे साप बरेच दिसतात, पण विंचू सहसा दिसत नाहीत. त्यामुळे या मोठय़ा काळय़ाभोर इंगळय़ा पाहून शाळेतली मुलं खूश व्हायची. आमच्या घरच्या या विचित्र प्राणिसंग्रहालयामुळे आम्ही कामावर गेलो असलो, की आजूबाजूची लहान मुलं येऊन या प्राण्यांना बघत असत, त्यांना हात लावायचा प्रयत्न करत. त्यामुळे मग आईवडिलांनी खबरदारीसाठी विंचवांना सोडून द्यायला सांगितलं. मग दोन्ही विंचू हाफकीन इन्स्टिटय़ूटला देऊन टाकले. मग त्यांचा फिशटँक रिकामा झाला म्हणून शोभेचे मासे घरी आणले. पण माशांच्या कुठल्या जाती कुणाबरोबर राहू शकतात ते कुठे माहीत होतं.. त्यामुळे झालं असं, की आक्रमक वृत्तीचे किसिंग गुरामी, फायटर मासे इतर माशांसह एकत्र ठेवल्यामुळे सुंदर शेपटय़ांचे गप्पी मासे आक्रमक माशांना बळी पडू लागले. मग गप्पी माशांसाठी आणखी एक छोटा फिशटँक आणला. काही दिवसांनी त्या गप्पींच्या टँकमध्ये लहान लहान पिल्लं दिसू लागली. पुढे दुसऱ्याही जातीच्या माशांच्या माद्या गर्भार दिसू लागल्यामुळे आणखी दोन फिशटँक आणले. आमच्या दोन खोल्यांच्या जागेत एक साप, चार फिशटँक, तीन कासवं, एक पांढरा उंदीर असे प्राणी होते. ही प्राणीसंख्या कमी पडली म्हणून की काय, एक जखमी झालेला बगळाही आमच्याकडे पंधरा-वीस दिवस पाहुणचार घेऊन गेला. त्याला खायला घालण्यासाठी नदीतले लहान लहान मासे विकत आणत असू. तो बरा झाल्यावर उडय़ा मारत घरात फिरत असे. तसा एकदा तो गॅलरीत गेला आणि आपल्या सवंगडय़ांमध्ये सामील झाला.

त्यानंतर एकदा मी एक हरणटोळ (साप) पकडून आणला. आमच्या इथल्या शाळांमध्ये जाऊन मी त्याच्याबद्दलचे गैरसमज दूर केले. महिनाभर घरी होता हरणटोळ. नंतर त्याला जंगलात सोडून दिलं. पुढे गडिहग्लजला विज्ञानमित्र कार्यक्रमासाठी गेलेलो असताना, तिथे मला एक खारीचं लहान पिलू मिळालं. त्याचे डोळेही उघडले नव्हते. तिथे मी त्याला एका खोक्यात ठेवलं होतं. कापसाचा बोळा करून मी त्याला दूध पाजत असे. आमचा आठवडाभराचा कार्यक्रम संपेपर्यंत मी त्याला दूध पाजून सांभाळलं. शेवटच्या दिवशी त्याचे डोळे उघडले. मी त्याला माझ्याबरोबर अंबरनाथला घरी घेऊन आलो. आता खारीची स्वारी दरम्यान काही दिवस घरी असलेल्या लावऱ्यांच्या पिंजऱ्यात पाठवली. त्यात दोन करवंटय़ांचे आडोसे तयार करून दिले. आम्ही खारीला दुधाप्रमाणेच नंतर शेंगदाणे, खोबरं, खारीक असं पिल्लाच्या वाढत्या दातांना कुरतडता येईल असं कडक खाद्य देत असू. त्याला दारं-खिडक्या बंद करून पिंजऱ्याबाहेर काढत असू. ते आमच्या अंगाखांद्यांवर उडय़ा मारत इकडेतिकडे पळत असे. अर्ध्या-पाऊण तासानं आम्ही त्याला परत त्याच्या पिंजऱ्यात सोडत असू. माझ्या मुलीनं तिचं नाव पिंकी ठेवलं. दोन महिन्यांत पिंकी चांगली मोठी झाली. आता तिची नखं चांगलीच लागत. पण ते सगळं सहन करत असू. एकदा पिंकी पिंजऱ्यातून सुटून गॅलरीत गेली. तिथे एक कावळा जरा जवळ येताच पिंकीनं अंगावरचे आणि शेपटीवरचे सारे केस असे काही फुलवले, की कावळा पळूनच गेला. त्यानंतर काही दिवसांनी पिंकीही तिच्या सवंगडय़ांकडे निघून गेली. पुढे आमचे ट्रेकिंगचे कार्यक्रम जोरात सुरू झाले. त्यामुळे प्राण्यांकडे पुरेसं लक्ष देता येईना, म्हणून कासवं सोडून दिली. मासे मित्रांना दिले. साप आणि उंदीर मात्र कुणी घ्यायला तयार होईना, त्यामुळे ते राहिले. साप तर चार वर्ष माझ्याकडे होता. तोपर्यंत तो जवळजवळ तीन फूट लांब झाला होता. एकदा ट्रेकिंगला जाण्यापूर्वी त्याला एक मोठी पाल पकडून खायला घातली होती. जेव्हा आम्ही परतलो तेव्हा पाल तशीच होती पण साप मृत्युपंथाला लागला होता. जणू काही तो आमचीच वाट पाहात होता. त्याच संध्याकाळी त्यानं अखेरचा श्वास घेतला. पुढे पांढरा उंदीर आमच्याकडे एकटाच वर्षभर होता. नंतर तोही मेला. त्यानंतर मी कुठलाही प्राणी पाळला नाही. या गोष्टीला आता तीस वर्ष होऊन गेली.               

दरम्यान २५ वर्षांपूर्वी मी ठाण्यात स्थलांतरित झालो. १०-१२ वर्षांपूर्वी एका सकाळी ठाण्याचे राजू तुलालवार यांचा फोन आला आणि त्यांनी एका कामासाठी बोलवलं. त्यांच्या एसीच्या बॉक्स खालून रात्री आवाज येत होता, म्हणून त्यांनी बॉक्स काढून पाहिलं तर त्याखाली एका पक्ष्याची पिल्लं होती. ती त्यांनी खोक्यात घालून गच्चीत ठेवली होती. पण आता कावळे या पिल्लांना त्रास देत होते. मी जाऊन त्या पिल्लांना माझ्याकडे घेऊन आलो. ती ‘बार्न आऊल’ म्हणजे  गव्हाणी घुबडाची पिल्लं आहेत हे कळत होतं. लहान असल्यामुळे त्यांच्या अंगावर कापसासारखी पांढरी डाऊन फेदर्स होती. त्या लहानमोठय़ा आकाराच्या कापसाच्या गोळय़ांना चोच आणि डोळे तेवढे ठळकपणे दिसत होते. या पिल्लांमुळे आमच्या घरी फेरी मारून जाणाऱ्या मांजरीला आम्ही मनाई केली. कामावर जाताना त्यांना वाटीत पाणी ठेवून जात होतो. आता यांना खायला काय द्यायचं? दुसऱ्या दिवशी अंजू- माझी बायको मटणाच्या दुकानात गेली आणि म्हणाली, ‘‘पाव किलो मटण देना छोटा छोटा टुकडा करके, बच्चोंको खिलाना हैं!’’ दुकानवाला आणि इतर गिऱ्हाईकं हे ऐकून चक्रावलीच! अंजू मटण घेऊन आली आणि आम्ही एकेका पिल्लाच्या तोंडासमोर मटणाचे तुकडे धरले, तर पिल्लं ते तुकडे लगेच गिळून टाकत होती! आमच्याकडच्या या पाहुण्यांची खबर आम्ही आमचा पुण्याचा मित्र चंद्रहास कोल्हटकरला कळवली. तो पुण्यातल्या एका संस्थेमध्ये घुबडांविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी काम करत होता. तो ठाण्यात येतो म्हणाला आणि तुलालवार यांच्या सोसायटीत घुबडांवरचा ‘स्लाइड शो’ करायचं ठरलं. तोपर्यंत आमच्या घरी पिल्लांना येऊन आठवडा होऊन गेला होता. संध्याकाळ झाली, की ती उत्साहात दिसत. रात्री कर्कशपणे ओरडत. त्यामुळेच त्यांना ‘स्क्रीच आऊल’ असंही म्हणतात. त्यांना आता काही पिसं येऊ लागली होती. चंद्रहास स्वत:ही घुबडाचं एक पिल्लू घेऊन आला. मग आम्ही आमच्याकडची पिल्लं आणि चंद्रहासनं आणलेलं, अशी सहा पिल्लं घेऊन त्या सोसायटीत गेलो. स्लाइड शोला चांगला प्रतिसाद मिळाला. बच्चेकंपनीला विश्वासात घेऊन सांगितलं, की गच्चीत आपण खोका ठेवणार आहोत. दिवसा या खोक्याचं झाकण बंद करायचं, म्हणजे कावळे पिल्लांना त्रास देणार नाहीत. संध्याकाळी झाकण उघडायचं, म्हणजे पिल्लांचे आई-बाबा त्यांना खायला आणतील. त्यांचं नैसर्गिक खाणं म्हणजे उंदीर. या जातीची घुबडं उंदीर पूर्ण गिळतात. ते इतर पक्ष्यांसारखे त्याचे लचके तोडत नाहीत. एक उंदीर पचायला त्यांना आठवडा-दहा दिवस लागतात. ज्या दिवशी आम्ही पिल्लं गच्चीत ठेवली, त्या रात्री आम्ही गच्चीच्या एका कोपऱ्यात निरीक्षणासाठी बसलो. रात्र झाली, तसं पिल्लांचं ओरडणं सुरू झालं. त्यांचे आई-बाबा घिरटय़ा घालू लागले. आधीच्या पिल्लांमध्ये त्यांच्याच जातीच्या नव्या पिल्लाला सामावून घेतलं गेलं. आई-बाबा घुबडांपैकी कोणी उंदीर मारून आणला, की एखादं पिल्लू त्यावर झेपावून, इतरांना पंख पसरून धाक दाखवे आणि तो उंदीर गिळून टाके. आम्ही घुबड आई-बाबांच्या फेऱ्यांच्या नोंदी करत होतो. ४-५ दिवसांनी रात्री गच्चीत निरीक्षणासाठी बसत होतो. उंदीर खाऊन पिल्लांची  पोटं भरत होती. तशी त्यांची वाढ होतानाही दिसत होती. पिसं यायला लागली होती. दरम्यान त्यांच्यातलं सगळय़ात लहान पिल्लू मेलं. कदाचित मोठय़ा पिल्लांच्या दादागिरीमुळे असेल वा खायला कमी मिळाल्यानं. महिन्याभरात ५-६ वेळा आम्ही निरीक्षणं केली. घुबड आई-बाबा चांगल्या प्रकारे पिल्लांची काळजी घेत होते. पिल्लं मोठी होत होती. आपल्या पंखांचं बळ अजमावत होती. स्वतंत्रपणे उडण्याचा सराव करत होती. या काळात प्रत्येक पिल्लानं दोन-दोन उंदीर तरी खाल्ले असावेत. ही घुबडं उंदीर पूर्ण गिळतात, तेव्हा त्यातला न पचलेला भाग- म्हणजे उंदराची कवटी, हाडं, केस वगैरे गोळीच्या रूपात तोंडावाटे बाहेर टाकतात. त्याला ‘आऊल पेलेट’ असं म्हणतात. अशी ६-७ पेलेट्स आम्हाला मिळाली होती. त्या पिल्लांची वाढ पूर्ण झाली, तशी एक-एक करत सर्वजण उडून गेली. त्या सोसायटीच्या सभासदांच्या सहकार्यामुळे त्या घुबडांच्या पिल्लांना आम्ही वाचवू शकलो. घुबडांविषयीचे गैरसमज काही प्रमाणात दूर करू शकलो.

असे कुणी, कुणी पाहुणे येतच असतात. पण आता कायमचा प्राणी पाळणं थांबवलं आहे.  निसर्गातल्या अनेक गोष्टी जाणून घेण्याच्या इच्छेतून अनेक अभयारण्यं बघून झाली आहेत. वाचन चालू होतंच, मग लेखनही सुरू झालं. निसर्गविषयक माहितीची सहा पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. नोकरी सांभाळून हा छंद जोपासता आला तो निसर्गाच्या ओढीतूनच.              

हे इतके विविध प्राणी वेगवेगळय़ा वेळी आमच्या घरी आश्रयाला आले. कुणी जखमी झालं होतं, कुणी घाबरलं होतं. कुणी असहाय्य होतं. तर काही आम्ही मुद्दाम पाळले होते. पण प्रत्येकाला जगवायचं मनात होतं. जे काही दिवसांसाठी आले होते त्यांना निसर्गातलं त्यांचं कार्य सक्षमपणे पार पाडू लागेपर्यंत वाढवायचं ठरवलं होतं. यांपैकी कुणी आमच्यावर प्रेम केलं का? कुणी आम्हाला ओळखू लागलं होतं का? तर ‘नाही’ असंच म्हणावं लागेल!  या प्राण्यांनी खूप काही शिकवलं. त्यांची परिस्थितीशी जुळवून घेण्याची वृत्ती, जगण्यासाठी तग धरण्याची ईर्षां आणि निसर्गाची ओढ, हीच तर सगळय़ाची प्रेरणा होती.

milindamdekar@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Soyare sahchar rescue animal bird pet animal lover ysh