– अपर्णा क्षेमकल्याणी

सप्तपदी

Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
knight frank wealth report 2024
अग्रलेख : अधिक की व्यापक?
24 Year Old Women Pee Turned Black Like Cola Rush To ICU Are You Overdoing Perfect Ratio For Work and Exercise by dr Mehta
तुमचं शरीर किती थकतंय? ‘ही’ लक्षणे लगेच ओळखा; डॉ. मेहतांनी सांगितलं व्यायाम व कामाच्या वेळेचं परफेक्ट सूत्र
According to the credit rating agency the highest growth will be in the sale of svu eco news
‘एसयूव्ही’च्या विक्रीतच सर्वाधिक वाढ! पुढील आर्थिक वर्षासाठी ‘क्रिसिल’चे प्रवासी वाहन विक्रीचे अनुमान

आयुष्य म्हणजे रोलर कोस्टर राइड असते. कधी वर तर कधी खाली. अशा वेळी कुटुंबाचा, त्यातल्या माणसांच्या नात्याचा कस लागत असतो. कालौघात कुटुंबव्यवस्था बदलली तशी त्यातल्या माणसांच्या भूमिकाही बदलल्या. दोघंही नोकरी वा करिअर करू लागली तेव्हा कुटुंबाची जबाबदारी कुणा एकाच्या खांद्यावर असून चालणार नाही हेही लक्षात आलं. एकमेकांच्या साथीने, एकमेकांना बरोबर घेत, एकमेकांना पूरक ठरत जर जोडीने संसार केला तर जगणं माध्यान्हीचा सूर्य होण्यापेक्षा शीतल चांदणं होऊन जातं,तुमच्या संसाराच्या रोलर कोस्टर राइडमध्ये इतर वाचकांनाही सामावून घ्या. आपले ७०० शब्दांतले अनुभव आम्हाला पाठवा  chaturangnew@gmail.com या ईमेल आयडीवर.

‘विवाह व्हाया पूर्ण यशस्वी

 काय असावी शर्थ

 एक पक्ष अती मठ्ठ असावा

 दुजा असावा धूर्त’

 कवी कुसुमाग्रजांच्या या ओळी आमच्यावरच बेतून लिहिल्या असल्याची दाट शंका माझ्या मनात फार पूर्वीपासून आहे! ती वारंवार खरी ठरते, जेव्हा मठ्ठ असल्याचे पुरावे मी आपणहून माझ्या नवऱ्याच्या हाती देत राहते, अन् ‘हे असंच घडणार होतं’ हे जाणून माझा नवरा धूर्त हसत राहतो!

  सहजीवनाच्या पंधरा वर्षांहून अधिक कालावधीत अन् ओळखीच्या वीस वर्षांहून अधिक कालावधीत नवरा पंकजनं मला पूर्ण ओळखलं आहे याचा अभिमान वाटावा, की राग यावा हेच मला समजत नाही. प्रतिस्पर्ध्याचे सगळे डावपेच माहीत असावेत, तरीही प्रत्येक खेळीत स्पर्धकानं तितक्याच उत्साहानं सहभागी व्हावं, यासाठी काळीज नित्यनूतन असावं लागतं. अशा नित्यनूतन काळजाचा नवरा माझ्याकडे आहे ही माझ्यासाठी फार मोठी जमेची बाजू आहे. माझ्या आयुष्यात पंकज म्हणजे केवळ मित्र, प्रियकर, नवरा नाही, तर तो गुरुस्थानी आहे. ‘पानी पियो छानकर, गुरु बनाओ जानकर’. गमतीचा भाग सोडल्यास आज मी जे काही छोटं-मोठं करू बघते त्यासाठी पंकजची मोठी मेहनत आहे. मेहनत हाच शब्द बरोबर आहे. नाठाळ मुलांवर मेहनत घ्यावी लागते, त्यांची ऊर्जा व्यवस्थित ‘चॅनलाईज’ व्हावी यासाठी त्यांना वळण लावावं लागतं. हे सगळं पंकज माझ्यासाठी करत असतो.

  कविता, साहित्याच्या निमित्तानं झालेली कॉलेजमधली आमची ओळख साहित्याच्या आंतरिक जिव्हाळय़ानं कधी आपलेपणात बदलली ते समजलंच नाही. पंकज त्याच्या थोरल्या भावाच्या- आनंद आणि वाहिनी मनिषा यांच्या ‘स्त्रग्धरा’ मासिकासाठी काम करत असे. तीन भाऊ, एक बहीण आणि एक वहिनी मिळून साहित्याची नाव चालवत असत. छोटय़ा वयातल्या या सगळय़ा मुलांची समज फार मोठी होती. ‘स्त्रग्धरा’चं नाव गाजत होतं आणि या मासिकात आपण लिहिलेलं छापून येणं ही अभिमानाची गोष्ट असे. त्या काळी माझ्या कविता ‘स्त्रग्धरा’नं छापल्या, या कौतुकापेक्षा मला कौतुक वाटायचं ते या भावंडांच्या कामाचं. माझ्या माहेरी कुठलीच साहित्यिक पार्श्वभूमी नव्हती. पालकांनी वाचनाचे संस्कार केले, वाचन म्हणजे प्राण बनला, पण यापलीकडे साहित्यिक विश्वाशी माझा संबंध नव्हता. वाचनाची प्रक्रिया जितकी आनंददायी असते त्याहून अधिक साहित्याच्या निर्मितीची प्रक्रिया थरारक वाटली मला. क्षेमकल्याणी कुटुंबाशी परिचय झाला तेव्हा या सगळय़ाचं अप्रूप वाटू लागलं. घरातल्या काका-मावशीबरोबर जितक्या सहज गप्पा माराव्या, तितक्या सहज हे लोक साहित्यिकांबरोबर गप्पा मारायचे हे बघून मी भारावून गेले होते. ज्या रा. चिं. ढेरे, अरुणा ढेरे यांच्या लिखाणाच्या मी प्रेमात होते, त्या ढेरे कुटुंबीयांबरोबर पंकजचं असलेलं एकेरी नातं खरं म्हणजे मला त्याच्या प्रेमात पाडून गेलं. पंकज उत्तर महाराष्ट्रासाठी ‘राजहंस प्रकाशना’चं काम बघायला लागून काही र्वष झाली होती. त्याचं पुस्तकांनी भरलेलं दुकान मला त्याच्याजवळ आणत होतं. साहित्याच्या ओढीनं जवळ आलेलो आम्ही दोघं प्रेमाच्या आणाभाका, एकत्र फिरणं, यात कधी रमल्याचं मला आठवत नाही. पंकजच्या खर्जातल्या आवाजात त्याच्या स्वत:च्या आणि इतरांच्या कविता ऐकत कॉलेज कँटीनमध्ये तासंतास घालवलेले आठवतात. पण नवरा-बायको झालात म्हणजे कायम तुम्ही सोबत थोडंच असता! जेव्हा कधी माझ्या एकटीच्या वाटय़ाला परीक्षेच्या वेळा येतात, तेव्हा पंकजच्या आवाजातला दि. पु. चित्रेंचा ‘मॅजिक मुहल्ला’ मला ऐकू येतो, आनंद जोर्वेकरांच्या कविता आठवत राहतात,

उर्दू शेर दिलासा देतात. आज मी अभिवाचनाच्या, ‘व्हॉइस मॉडय़ुलेशन’च्या कार्यशाळा घेते, तेव्हा त्याची बीजं मला पंकजच्या कविता वाचनात दिसतात.

   पंकजबरोबरच्या सहजीवनाच्या सुरुवातीच्या काळापासून एकमेकांच्या आत्मिक देवाणघेवाणीची श्रीमंती मी अनुभवली आहे. लग्नाआधी घरून असणारा नाटकासाठीचा विरोध आता नव्हता, सगळय़ाच बाबतीत मुक्तपणा होता. तरीही आमचं आयुष्य रूढार्थानं कधीच सोपं नव्हतं. रोलरकोस्टर राइडचा अनुभव म्हणजे आमचं सहजीवन. थरारक, उत्कंठावर्धक, टोकाचा कडेलोट सगळं सगळं आहे त्यात! अजूनही आहे, म्हणूनच गंमत आहे आयुष्यात.

 नुकतं लग्न झालेलं असतानाच गोदावरीच्या रौद्र पुरात वाहून गेलेलं आमचं पुस्तकाचं दुकान जगण्याची पाटी कोरी करून गेलेलं आम्ही दोघांनी अनुभवलं आहे. कोऱ्या पाटीवर पुन्हा अक्षरं गिरवण्यासाठी पडलेले जगण्याचे फाके आजही आमच्या स्मरणात आहेत. एकेकदा केवळ वडा-सांबारवर काढलेले दिवस, घरात केवळ मुगाची डाळ शिल्लक असल्यानं तेच आणि तेवढंच खाऊन काढलेले दिवस, याचं स्मरण आजही दोघांना आहे. भांडणं, राग, रुसवे कुणाच्या सहजीवनात नसतात, आमच्याही आहेत. माझ्या बाजूनं तर अधिकच! अनेक वेळा नातेसंबंधाच्या टोकापर्यंत जाऊन माघारी फिरले आहे मी. आम्हाला आतडय़ानं जोडून ठेवणारा दुवा जसा आमचा मुलगा मल्हार आहे, तशी गतपरिस्थितीदेखील आहे.

   सुखी कुटुंबात वाढलेली मी, लग्नानंतर पंकजच्या घरात उलट परिस्थितीला सामोरी गेले. माझ्यासाठी अवघड होता सगळाच काळ. त्यातून होणारी चिडचिड, मनातली पूर्वीपासूनचीच बंडखोरी माझ्या लिखाणातून उतरत असते, तिच्याशी होणारी माझी मारामारी, या सगळय़ाला पंकजनं कमालीच्या धीरानं घेतलं पहिल्यापासून. मी वावटळ असेन, तर पंकज सावली-पाणी देणारा ढग झाला. ढग असला, तरी आपली तहान आपण भागवायची कला त्यानं मला शिकवायचा नेहमीच प्रयत्न केला. व्यवहारचातुर्य माझ्यापाशी नाही, आर्थिक साक्षरता, वेळेचं उपयोजन करण्याची कला नाही, हे सगळं माझ्यात उतरावं यासाठी तो घेत असलेले प्रयत्न बघून कधी कधी माझाही जीव तुटतो. मूळची मी नाठाळ! कुणी बस म्हणालं, तर मी उभी राहणार, उभी राहा म्हणालं, तर पळणार! पंकज काठावर उभं राहून मला सूचना करतो, मी दुर्लक्ष करते, मग नाकातोंडात पाणी जाऊ लागलं की मला समजतं पंकज बरोबर आहे. अशा वेळी पंकज मदतीचा हात देत नाही, तर त्यानंच पूर्वी सांगितलेलं कौशल्य वापरायला मला भाग पाडतो. तुम्ही बुडताना पटकन मदत मिळाली तर हायसं वाटतं. पण पंकज पटकन मदत करत नाही, मला स्वत:ला लढायला लावतो. तात्कालिक राग आला तरी मला नंतर समजतं की मी जगण्याच्या वाटेवर एक पाऊल पुढे सरकले आहे. कुठल्याही प्रसंगाला तोंड द्यायची ताकद माझ्या नवऱ्यानं मला शिकवली.

 आजही रात्री-अपरात्री कामावरून (शूटिंगवरून) एकटी बुलेट चालवत मी घरी पोहोचते, तेव्हा मनाला कुठलीच भीती शिवत नाही. मी सुखरूप येणार, वादळाला तोंड देणार हा विश्वास गाढ झोपलेल्या माझ्या नवऱ्याच्या आणि मुलाच्या मनात असतो. त्यांचा हा विश्वास मला कुठलंही साहस करायला प्रेरणा देतो. अशा वेळी अगदी रस्त्यात झालेलं बिबटय़ाचं दर्शनही मी ‘एन्जॉय’ करू शकते, नाटक-सिनेमात काम करण्याच्या निमित्तानं बिनघोर दिवसेंदिवस घराबाहेर राहू शकते. हवं ते आणि हवं तसं लिहू शकते. आणखी काय हवं!

माझ्या आकाशवाणीच्या सतरा वर्षांच्या कामाच्या काळात लोकांकडून मला जितकी वाहवा मिळाली, तितकी उपेक्षा पंकजच्या वाटय़ाला आली. माझं काम ‘काँट्रॅक्ट’ पद्धतीवर असे, मात्र लोकांना वाटे, की मला सरकारी नोकरी आहे, तरी पंकज व्यवसायासाठी इतका जीव का काढतो? मला कामाचे मिळणारे पैसे अतिशय कमी असल्यानं मी मासिकाचं संपादनदेखील करत असे, कार्यशाळा घेत असे, अनेक छोटी छोटी कामं करत असे. लोकांना वाटे, पंकज मला राबवून घेतोय. पंकजनं मात्र कधीही कुणाला कसला खुलासा केला नाही. माझी मानहानी होईल असं कुणाला बोलला नाही. त्याच्याकडे पडती बाजू घेऊन मला सांभाळत राहिला. त्याचेच गुण आमच्या मुलात उतरल्यानं मला केवढा दिलासा मिळाला आहे हे शब्दांत सांगू शकत नाही मी! पंकजबरोबरच्या सहजीवनात माझी कायम वाढच होत राहिली आहे. कुठल्याही प्रसंगाचा बाऊ न करणारा जोडीदार मला मिळाला आहे. म्हणूनच सप्तपदीनंतरचं आमचं आयुष्य म्हणजे रोलरकोस्टर राइडनंतरचा विलक्षण आनंददायी अनुभव आहे.

aparnakshemkalyani@gmail.com