scorecardresearch

बटाटय़ाच्या चाळीतल्या ‘ताऱ्यांची वरात ’

‘भाईसाहेब, चाळ असणार तरच आम्ही असणार की हो! नायतर आम्ही नुसतेच भटकत राहणार, आत्म्यासारखे.. सोल विदाउट बॉडी! मग आमचं नुसतंच ‘भ्रमणमंडळ’ होणार की हो!

ch07‘भाईसाहेब, चाळ असणार तरच आम्ही असणार की हो! नायतर आम्ही नुसतेच भटकत राहणार, आत्म्यासारखे.. सोल विदाउट बॉडी! मग आमचं नुसतंच ‘भ्रमणमंडळ’ होणार की हो! चाळीसकट आम्हाला जन्माला घालणारे तुम्हीच.. मग तुमच्याशिवाय मुक्ती कशी मिळणार हो आम्हा सगळ्या अवतारांना? म्हणून आमचं हे ‘मुक्तिमंडळ’ घेऊन आलो आहोत.. आता आमचं जे काय करायचं ते तुम्हीच करा, भाईसाहेब!’
एक  फॅण्टसी.. पुलंची क्षमा मागून..खास दिवाळीच्यानिमित्ताने..
‘देशपांडे बटाटे भाई-भाई.. देशपांडे बटाटे भाई-भाई..’         
‘अगं, सुनीता कोण आहे बघ गं.. भाई देशपांडे म्हणून हाक मारताहेत बरीच मंडळी. काय मोर्चा-बिर्चा आलाय की काय आपल्या घरावर?’    
 ‘काही तरीच काय भाई, मोर्चा कशाला येईल? अन् ते ‘भाई देशपांडे’ नाही, देशपांडे बटाटे भाई-भाई म्हणताहेत. म्हणजे तुझीच मित्रमंडळी असणार कुणी तरी..’ वरून खिडकीतून पाहात, ‘रिकामटेकडे’ हा शब्द न वापरता, सुनीताबाईंनी नेहमीचा कधीच न चुकणारा अंदाज वर्तविला.    
 ‘अगं, मग हे तर नक्कीच आपले चाळकरी असणार, बटाटय़ाच्या चाळीतले! ‘सांडगे-बटाटे भाई-भाई’ घोषणा देणारे, सांस्कृतिक शिष्टमंडळवाले.’
‘अरे पण भाई, ही काय पद्धत झाली, फोनवरून अपॉइंटमेंट न घेता येण्याची?’   
 ‘अगं, फोन करून यायला ते काय थोडीच ‘ब्लॉकवाले’ आहेत? अन् जेमतेम दोन-चार रेडियो असणाऱ्या आख्ख्या चाळीत फोन कुणाकडे असणार? चोवीस तास घराचे दरवाजे उघडे ठेवून आयुष्य काढलेले हे चाळकरी. कधीही कुणाकडे घुसत.. काय जनोबा, आज काय पापलेट-बिपलेट घावलो की नाय चांगलो.. काय कुशाभाऊ , रजा झाली का सेन्क्शन.. असा थेट संवाद साधणाऱ्यांना टेलिफोनचा सोपस्कार कुठून माहिती असायला? बघ बघ जरा.. दार उघड. मंडळी वर आलीच असतील.’      
 सुनीताबाईंनी दार उघडताच, आठ-दहा मंडळीचा घोळका घरात घुसलाच. हे सुनीताबाईंना पटणं शक्यच नव्हतं. पण भाई ‘मनोहर’ असल्यामुळे इलाज नव्हता.
 ‘कुठाहेत भाई?’ सुनीताबाईंच्या पलीकडे पाहतच मंडळी भाईंना शोधू लागली.    
  सुनीताबाई चेहऱ्यावरचं हास्य ‘टिकवत’ बाजूला झाल्या. भाईंनी मोकळेपणी हसत स्वागत केलं.   
 ‘अरे वा वा, अलभ्य लाभ. अख्खी बटाटय़ाची चाळच आलेली दिसत्येय.. अगं सुनीता, हे सोकाजी त्रिलोकेकर, अण्णा पावशे, आचार्य बाबा बर्वे.. हे म्हाळसाकांत पोम्बुर्पेकर, मंगेशराव हट्टंगडी, बाबुकाका खरे.. हे कुशाभाऊ  अक्षीकर, नागूतात्या आढय़े, राघूनाना सोमण अन् हे कोचरेकर मास्तर! सगळे आपल्या बटाटय़ाच्या चाळीचे चाळकरी.’  
 ‘तसं मी ओळखते सगळ्यांना. प्रत्यक्ष गाठ आजच पडतेय..’ हास्य कायम ठेवीत ‘गाठ’ शब्दावर सुनीताबाईंचा जोर.  
 ‘मग आता इतकी सगळी मंडळी प्रथमच घरी आली आहेत, तर..’ भाईंचा हा रोख आता सुनीताबाईंच्या सवयीचा.     
 ‘आलं लक्षात..’ असं म्हणत एकूण कपांचा अंदाज घेत, सुनीताबाई आत वळल्या.
 ‘वहिनी, बरोबर भजी-बीजीदेखील चालतील.’ इति खाद्यपंडित (..आणि नाटय़तज्ज्ञ!) कुशाभाऊ  अक्षीकर.           आचार्य बाबा बर्वेनी नुसतं त्यांना कोपरानं हळूच ढोसलं. वास्तविक आचार्याना चोवीस भाषा येतात आणि चोवीस भाषांत ते मौन पाळू शकतात. त्यामुळे मौनाचं सामथ्र्य चोवीसपट वाढतं, असं त्यांचं मत. ते असो, पण त्यांचं ढोसणंदेखील कुशाभाऊंच्या चेहऱ्यावर ‘बोललंच’.    
‘काय आचार्य, कुशाभाऊंना कुशीत ढोसताय..’   
 ‘तसं नाही भाई, ज्या कामासाठी आलो ते महत्त्वाचं की चहा-भजी महत्त्वाची?’
‘खरं तर इतके सगळे इतक्या वर्षांनी, कधी नव्हे ते एकत्र जमल्यावर, या क्षणी चहा-भजीच महत्त्वाची..’                             
यावर आचार्य सोडून सगळेच हसले. पु.ल. सावरून घेत म्हणाले, ‘चहा-भजी काय.. मिळतीलच हो, पण असं कुठलं महत्त्वाचं काम काढून घोषणा देत आला आहात इकडे, एवढय़ा लांबवर? साधं पत्र टाकायचं.. काय राघूनाना?’     
 पोस्टात सव्‍‌र्हिस करणारे राघूनाना सोमण (हे म्यॅट्रिक पास कसे झाले, हा नास्तिकाला आस्तिक करणारा प्रश्न!) काहीच बोलेनात. ‘राघूनानांची कन्येस पत्र’ हा आख्खा बटाटय़ाच्या चाळीतला ‘चाप्टर’ ते कसे विसरणार? पण गोंधळून काय उत्तर द्यावं हे न समजल्यामुळे, ते नुसतंच गूढ हसले. कुणीच काही बोलेना.      
मामला खरंच गंभीर दिसतोय. चाळीतली ही असली – एरवी कधीच नसणारी- शांतता पुलंनादेखील कोडय़ात टाकणारी. सगळ्यांना बोलतं करण्यासाठी ते म्हणाले, ‘अरेच्च्या.. पन्नाशीच्या दशकांतल्या निदान चार-पाच दिवाळ्या मी बटाटय़ाच्या चाळीत काढल्या.. तुम्हा मंडळीवर इतका लोभ जडला, अन आता बोलायला कसला संकोच? त्रिलोकेकर, तुम्हीच जरा नीट सांगा, असं काय घडलं की इथवर तुम्हाला यावं लागलं?’
इथवर ‘सेल्फ-कंट्रोल’ करणारे त्रिलोकेकर खरं तर बोलण्याची वाटच पाहत होते.
‘त्याचं काय आहे भाईसाहेब, बटाटय़ाची चाळ तुम्हीच बांधलीत..’      
  ‘मी नव्हे.. धुळा नामा -बटाटे- क्रॉफर्ड मार्केटातील टोपल्यांचे व्यापारी – यांनी, १८८० साली बांधली.. मी फक्त ती तुमच्यासारख्या एकशेएक वल्लींनी जिवंत केली!’ मिश्कील हसत ‘भाईसाहेब’ म्हणाले.
 ‘तुमच्या ‘कन्व्हिनियस’साठी तसं म्हणा, पन ‘आयडिया’ तुमचीच.. तुम्ही ‘लाइट’मंदी आणलीत १९५८ साली, करेक्ट?.. तेव्हा आम्ही सारे चाळीचे ‘रेसिडेंट्स’देखील ‘लाइट’मंदी आलो. एरवी ‘डार्क’मंदी धूळ खात पडलो असतो धुळा नामा बटाटय़ांच्या चाळीत.. खरा की नाय बाबूकाका?’      चाळीचा सगळा इतिहास, ‘आपली पायरी सोडून वागणाऱ्या जिन्यासकट’ लिहिणारे इतिहासाचार्य महापंडित बाबूकाका खरे, कधी नव्हे ते त्रिलोकेकरांशी सहमत झाले. तरीही अजून पुल ‘डार्क’मंदीच. हा मोर्चा कशासाठी?   
 ‘पण त्रिलोकेकर, इतकी र्वष दहा दिशांना दहा तोंडं असूनही, एकत्र सुखाने नांदत आहातच की चाळीत! मग आता नेमकं काय घडलं की तुम्ही मोर्चा घेऊन माझ्याकडे..’
 ‘छे, छे, मोर्चा हा असांस्कृतिक-अशिष्ट शब्द आहे, भाई. हे आमचं ‘अवतार मुक्तिमंडळ’ आहे, तुमच्या ‘सांस्कृतिक शिष्टमंडळा’सारखं.’ इति म्हाळसाकांत पोम्बुर्पेकर. अर्थातच चाळीचे ‘फडके’ वा ‘खांडेकर’.  ‘पोम्बुप्र्याचा पंपू’ या त्यांच्या कादंबरीमुळे पोम्बुप्र्याचं नाव साऱ्या दिगंतात पसरलं. त्यामुळे थेट भाईंचीदेखील शिकवणी घ्यायचा जणू त्यांचा चाळीने बहाल केलेला लेखणीसिद्ध हक्कच.      
‘ठीक आहे पोम्बुर्पेकर, पण कुणाचा अवतार अन् कुणाची मुक्ती? कुणी राहू-केतू मागे लागलाय की शनीच्या साडेसातीपासून मुक्ती हवी आहे, म्हणून माझ्याकडे हा नव-ग्रहांहून वरचढ दश-ग्रहांचा मुक्तिमोर्चा- सॉरी- मुक्तिमंडळ घेऊन आलात? तेसुद्धा तुमच्यातच ग्रह-गौरव अण्णा पावश्यांसारखे होरारात्न असताना?’
 इतका वेळ चुळबुळ करीत गप्प बसलेले अण्णा पावशे आता मात्र सरसावले. ‘भाई, कसं सांगू? सध्या खरंच आमचे ग्रह फिरलेत, पौशियन पद्धतीनुसार. (सायन-निरयन पद्धतीसारखी ही अण्णा पावशांची ‘पौशियन’ पद्धत!) समोर नुसता अंधार आहे. स्पष्टच बोलतो.. काय आहे की, हल्ली कुणीही उठतो अन् म्हणतो, पुलंचं साहित्य आता कालबाह्य़ वगैरे झालंय..’                                                  
 ‘असं कोण म्हणतं ते फक्त सांगा, अण्णा..’   अण्णा पावशांना मध्येच तोंडात नागूतात्या आढय़े बाह्य़ा सरसावीत पुढे झाले. पस्तीस वर्षांचा ‘टाइम्स’ पाठ असणारे नागूतात्या, जगातले सारे विद्वान कसे महामूर्ख आहेत, हे नेहमी ते तारीखवार सांगतात. त्यांना कसंबसं शांत करीत त्रिलोकेकर म्हणाले, ‘ते जाऊ दे, ते लोग समदा ‘इडियट’ हाय. पन बटाटय़ाची चाळदेखील ‘आऊटडेटेड’ झाली असं म्हणतात.. म्हणजे आता आम्ही चाळीचे ‘रेसिडेंट्स’ पण ‘आऊटडेटेड’ होणार..’    
 ‘असं कुणी सांगितलं?’ भाईंना आता थोडाफार ‘आयडेंटिटी क्रायसिस’चा अंदाज येऊ लागला.
 ‘भाई, तुम्हीच नाही का सांगितलंत बटाटय़ाच्या चाळीच्या अखेरच्या ‘चिंतन’ शिबिरात?’    
चर्चेचा अंदाज घेत कोचरेकर मास्तर सावधपणे म्हणाले. त्यांचा बटाटय़ाच्या चाळीत ‘सावध सज्जन’ असा लौकिक आहे.
‘चिंतन शिबीर?’ आता मात्र पुलं मनापासून हसले अन् म्हणाले, ‘आपली तेवढी ऐपत नाही, कोचरेकरमास्तर.. तो राजकारण्यांचा प्रांत. त्यांना त्यांची, त्यांच्या भावी पिढय़ांसाठी कमवून ठेवण्याची कायम चिंता. त्यांच्या या चिंतन-शिबिरांमुळेच देशाची परिस्थिती चिंताजनक करून ठेवली आहे. नको तो विषय.. उगाच ती आणीबाणी, १९७७ च्या निवडणुकीतल्या प्रचारसभा अन् त्यानंतरचा सत्ताधाऱ्यांचा ‘तमाशा’ आठवतो. त्यापेक्षा आपल्यासाठी आपला ‘तीन पैशांचा तमाशा’ अन् आपली ‘विदूषकी’ बरीच बरी.. ते जाऊ  द्या मास्तर, पण त्या ‘चिंतना’बद्दल काय म्हणत होता?’    
आता कोचरेकरमास्तरांच्या मदतीला नाटय़भैरव कुशाभाऊ  अक्षीकर आले. ‘मी सांगतो.. तुम्हीच नाही का त्या अखेरच्या चिंतनात म्हणालात..’ अन् कुशाभाऊ  थेट पुलंच्या भूमिकेत शिरले..
 ‘चाळीची दारं अन् ब्लॉकची दारं यांतला मुख्य फरक तिला ठाऊक आहे. ब्लॉकची दारं सदैव बंद असतात, त्या दारांना आलेल्या माणसावर अविश्वास दाखविणारी बारीक भोकं असतात.. चाळीत आतल्या माणसाच्या पानांत काय पडलं आहे ते ग्यालरीतून जाणाऱ्या-येणाऱ्याला दिसतं. अण्णा पावशांनी घेतलेला कढीचा भुरका ग्यालरीपर्यंत ऐकू येतो. ब्लॉकमध्ये टेबलावर जेवतील पण दारं बंद करून चोरून जेवतील. चाळीला दु:ख आहे ते या चोरटय़ा जीवनाचं!.. पण आता इलाज नाही. चाळ आता कोलमडत आली आहे. शेवटला घाव कोण घालणार याची ती वाट पाहत आहे. तिला चिंता आहे ती एकच की, हा घाव घालणारा आम्हा साऱ्या चाळकऱ्यांचा भार सिमेंट काँक्रीटच्या प्रचंड कपाटांच्या खणात बंद करून ठेवणार आहे.. त्यांत आता मोकळा श्वास उरणार नाही, मोकळे आवाज ऐकू येणार नाहीत..’  
भूमिकेतून बाहेर येत कुशाभाऊ  म्हणाले, ‘भाई, तो साऱ्या नाटय़ाचा हाय-लाइट होता. त्या अखेरच्या चिंतनाने ‘बटाटय़ाची चाळ’चा प्रेक्षक भारावून घरी जायचा.. आठवतंय ना?’                    ‘ते कसं विसरेन, कुशाभाऊ? मात्र आत्ता तुम्ही अगदी गणपतराव जोशांची आठवण करून दिलीत बघा! बटाटय़ाच्या चाळीत तुमची तुमच्या नाटय़प्रेमावरून मी भरपूर ‘खिल्ली’ उडवली होती, ते देखील आठवतंय.. आता तुम्हीदेखील नाटय़भैरव आहात अन् चांगलं जाणता की प्रेक्षकच तर आपले मायबाप. खरं तर त्या काळी पन्नास वर्षांपूर्वीदेखील माझ्या त्या चिंतनावर टीका व्हायची. अन् टीकाकारांना कुठच्याही काळी कधीच तोटा नसतो. त्या टीचभर टीकाकारांचं सोडा. आपला मतलब प्रेक्षकांशी-वाचकांशी. त्यांची खुषी आपल्यासाठी महत्त्वाची. कारण आपला ‘हसविण्याचा धंदा’! मघाशी अण्णा पावशे म्हणाले, ‘पुलं कालबाह्य़ झाले,’ असं म्हणणारे टीकाकार आहेत हे खरंच आहे. खरा रसिक जाणकार वाचक-प्रेक्षक असं कधीच म्हणत नाही. कारण तो जाणतो की, मी नेहमीच माणसांबद्दल, त्यांच्या वृत्ती-प्रवृत्तीबद्दल लिहिलं. आता काळानुरूप संदर्भ बदलले तरी माणूस, त्याच्या वृत्ती थोडय़ाच बदलतात? मुंबईतली चाळ इतिहासजमा झाली, तरी त्यांत राहणारा माणूस त्याच वृत्ती-प्रवृत्ती-विकृती, प्रेम-माया, राग-लोभ या साऱ्या गुण-अवगुणांसकट थोडय़ाफार फरकानं तोच असतो. मग हा ‘माणूस’ कालबाह्य़ होईल का? मला हा ‘माणूस’ लिहायला, सादर करायला आवडला.. म्हणून मला कालबाह्य़ व्हायची भीती नाही, तर तुम्हाला कसली भीती?’
‘कसं आहे भाई, बटाटय़ाच्या चाळीवर शेवटला घाव घालणारे हे टीकाकारच आहेत की काय, या भीतीनं आम्ही जरा भरकटलो. तसे आम्ही निव्वळ तुमच्या शब्दांचे गुलाम. तुमच्या शब्दांमुळेच आम्ही कल्पनेतून ‘अवतार’ घेऊन सत्यात आलो. आमच्यावर हक्क तुमचाच. खिल्ली उडवा वा आवडीनं गुणगान करा.. जर जन्माला घालणारे तुम्ही, तर घाव घालून संपवणारे टीकाकार कसे असतील? आम्हाला मुक्ती देणारेदेखील तुम्हीच. त्या बांधीलकीला स्मरूनच आज आम्ही तुमच्याकडे आलो आहोत, ‘अवतार मुक्तिमंडळ’ घेऊन.’    
  ‘कुशाभाऊ, तुम्ही शब्दांचे ‘पलटे’ घेत मोठी ‘तान’ घेऊन पुन्हा समेवर.. मूळ पदावर आलात की! नक्की काय म्हणायचंय तुम्हाला?’  
  ‘ते मी सांगतो भाई,’ पलटे अन् तानांचा विषय निघाल्यावर -अन् कुशाभाऊंनी एवढं ‘फुटेज’ खाल्ल्यावर – संगीतकलानिधी एच. मंगेशराव ऊर्फ मंगेशराव हट्टंगडी थोडेच गप्प बसणार? ते पुढे सरसावले अन् त्यांच्या कानडी ‘ठेक्यात’ म्हणाले, ‘भाईसाहेब, चाळ असणार तरच आम्ही असणार की हो! नाय तर आम्ही नुसतेच भटकत राहणार, आत्म्यासारखे.. सोल विदाउट बॉडी! मग आमचं नुसतंच ‘भ्रमणमंडळ’ होणार की हो! चाळीसकट आम्हाला जन्माला घालणारे तुम्हीच.. मग  तुमच्याशिवाय मुक्ती कशी मिळणार हो आम्हा सगळ्या अवतारांना? म्हणून आमचं हे ‘मुक्तिमंडळ’ घेऊन आलो आहोत.. आता आमचं जे काय करायचं ते तुम्हीच करा, भाईसाहेब!’ एच. मंगेशरावांचा राग ‘रोखठोक’!  ‘वा..छान, मंगेशराव! राग थोडक्यात छान मांडलात की हो.. अन् मलादेखील कळला. तुमच्या अशा रागांमुळेच माझा तुमच्याविषयी लोभ वाढलाय की हो! तुमच्या भावना पोचल्या, पण एक किरकोळ अडचण आहे.’  
सगळे एकदम शांत. ‘सहज मुक्ती’त आता कसली अडचण?                               
शांतता असह्य़ होऊन शेवटी भाईच बोलू लागले, ‘बटाटय़ाची चाळ अन् त्यातले तुम्ही तमाम चाळकरी, या निर्मितीची जबाबदारी माझी असेलही. पण ही निर्मिती मी वाचक-प्रेक्षकांच्या हाती सोपविली. चाळीचं अन् चाळकऱ्यांचं आयुष्य आणि मुक्ती यावर आता त्यांचा हक्क. तेच आता तुमचे मायबाप. म्हणून बालगंधर्वदेखील प्रेक्षकांना ‘मायबाप’ म्हणायचे. टीकाकार बालगंधर्वाचेदेखील होतेच की! ‘बटाटय़ाची चाळ’ मी उभी केली तेव्हाच ती सत्तरएक वर्षांची होती. अन् तेव्हाच ती मोडकळीला आली आहे म्हणता म्हणता आता वर साठ-पासष्ट र्वष उलटून गेलीत.. चाळ उभीच आहे, उभीच राहणार आहे.. प्रेक्षक-वाचकांची इच्छा असेपर्यंत! तोवर तुमची सुटका नाही, तुम्हाला मुक्ती नाही. मुंबईच्या चाळी असोत वा पुण्यातले वाडे असोत, ही मध्यमवर्गीयांची निवासस्थानं. मध्यमवर्गीयांचं राहणीमान, त्यांची विचारमूल्यं, यांचे केवळ संदर्भ बदलतील, पण ते कालबाह्य़ कधीच होणार नाहीत. चाळ-संस्कृती इतिहासजमा झाली, तरी या ‘बटाटय़ाच्या चाळी’चे ऐतिहासिक संदर्भ कायमच असतील. भविष्यातदेखील ‘चाळ’ विषयावर लिहिताना बटाटय़ाच्या चाळीत काही काळ घालविण्याशिवाय पर्याय नसेल. यानंतरही कुणी अशा सहजीवनावर लिहील, रंगमंचावर सादर करेल, तेव्हा केवळ संदर्भ बदलले असतील, व्यक्तिरेखांची नावंदेखील बदलली असतील. पण मूळ गाभा तोच असेल, माणसं तीच असतील, स्वभाव अन् वृत्ती त्याच असतील. तेव्हा कदाचित पुन्हा वेगळ्या ‘अवतारांत’, वेगळ्या ‘आयडेंटिटीत’ तुम्हालाच सादर व्हावं लागेल.. सादर करणारादेखील तेव्हा वेगळा असेल. तुम्हाला मुक्ती नाही. जशी अश्वत्थाम्यालाही नाही. स्वत:च्या जखमा विसरून तुमचा इतरांना ‘हसविण्याचा धंदा’ कायम चालूच राहणार आहे! आपल्याला कालबाह्य़ करतील तर फक्त रसिकच, एवढंच लक्षात ठेवायचं. काय ‘साहित्तिक’ म्हाळसाकांत पोम्बुर्पेकर, पटतंय ना?’
भाईंनी ‘साहित्तिक’ (हा पावश्यांच्या प्रभाचा लाडिक उच्चार) म्हटल्यावर भानावर येत, एका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ‘म्हाळसाकांत पोम्बुर्पेकर’ हे नाव परस्पर सुचविण्यात आलं होतं, तेव्हा ‘टाइम नाही’ म्हणून पोम्बुर्पेकरांनी ते नाकारलं होतं, ते पोम्बुर्पेकारांना आठवलं.. शिवाय त्यांनी लिहिलेल्या ‘बटाटय़ाची चाळ’ या संपूर्ण वास्तववादी व मध्यमवर्गीयांच्या जीवनाचे हृदयद्रावक दर्शन घडविणाऱ्या कादंबरीची एकेक प्रत स्वत:ची स्वाक्षरी करून चाळकऱ्यांना फुकट दिल्याचंदेखील आठवलं.. अर्थात त्यानंतर चाळकऱ्यांनी केलेली ‘धुलाई’ ते कसे विसरणार! त्या नकोश्या आठवणीतून भानावर येत पोम्बुर्पेकर म्हणाले, ‘वा भाई, पुन्हा तसाच ‘चिंतना’चा आनंद दिलात. तुम्ही म्हणता तेच खरं.. प्रेक्षकच आपले खरे मायबाप!’                          
 अन् बटाटय़ाच्या चाळीतल्या ‘अवतार मुक्तिमंडळा’च्या ‘दशग्रहांनी’ घोषणा दिली..  ‘पुलं- बटाटे झिंदाबाद.. पुलं- बटाटे झिंदाबाद.. झिंदाबाद!’..
०     
सुनीताबाई भाईंची तंद्री मोडत म्हणाल्या, ‘काय रे भाई, घोषणा कसल्या देतोयस झिन्दाबादच्या? आपली ही ‘ताऱ्यांवरची वरात’ आहे की मोर्चा आहे?’  
 ‘अगं सुनीता, ते अवतार मुक्तिमंडळ.. ते दशग्रह.. बटाटय़ाची चाळ..’ भानावर येत भाई ओशाळत म्हणाले, ‘अगं, जरा डोळा लागला तेवढय़ात.. बटाटय़ाच्या चाळीतल्या ‘ताऱ्यांची वरात’ आली होती..’  भाईंनी थोडक्यात सगळा किस्सा सांगितला अन् म्हणाले, ‘काही नाही गं सुनीता, इथं आल्यापासून हे असंच होतंय..’       
 भाईंना पुरेपूर ओळखणाऱ्या सुनीताबाई हसून म्हणाल्या, ‘कारण तू कायम तुझ्या ‘माणसांत’ रमलेला, तुझी जित्याची खोड कांही ‘इथं’ येऊनही जात नाही..’
  ‘कसं आहे सुनीता, जोपर्यंत आपल्यावर ‘जिवा’पाड प्रेम करणारी ही आपली माणसं आहेत, अन् आपल्याला कालबाह्य़ करायला टपलेले हे टीकाकारदेखील आहेत, तोपर्यंत आपल्याला ‘मरण’ नाही! मग ‘जित्याची’ खोड कशी जाणार..?’  
कोटय़ाधीश पुलंचा बिनतोड सवाल!    

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Special article on diwali occasion