scorecardresearch

बालुशाहीचे पाळे

काही घरगुती वादामुळे लाडक्या बहिणीशी जवळपास २७ वर्षे आमच्या पिताश्रींचा अजिबात संपर्क नव्हता. स्वाभाविकच त्यानंतर इतक्या वर्षांनी येणाऱ्या आपल्या बहीण-मेव्हण्यांचे जंगी स्वागत करण्याचा त्यांनी चंगच बांधला. भाऊबीजेला ती येणार होती.

काही घरगुती वादामुळे लाडक्या बहिणीशी जवळपास २७ वर्षे आमच्या पिताश्रींचा अजिबात संपर्क नव्हता. स्वाभाविकच त्यानंतर इतक्या वर्षांनी येणाऱ्या आपल्या बहीण-मेव्हण्यांचे जंगी स्वागत करण्याचा त्यांनी चंगच बांधला. भाऊबीजेला ती येणार होती. त्या दिवशी तिला आपल्या हाताने बनविलेला पदार्थ त्यांना खाऊ घालायचा होता आणि सुरू झाला एक प्रयोग..
त सं आमच्या पिताश्रींना स्वयंपाकघरात हौसेने वावरण्याची नेहमीच आवड! नेहमीच ते काही ना काही तरी पदार्थ बनवायचे आणि आमची क्षुधाशांती व्हायची. अर्थात ते जेव्हा घरी असायचे तेव्हाच आम्हाला त्यांच्या हातच्या लज्जतदार पदार्थाची चव चाखायला मिळायची हे सांगायला नको. पण जेव्हा ते स्वयंपाकघरात शिरायचे तेव्हा मात्र काही तरी वेगळं बनवायचेच. आमच्या मातोश्रीही कौतुकाने सांगायच्या, ‘मला जेवण बनवायला यांनीच शिकवलं बरं का’! पण त्यांच्या धर्मपत्नीनेच म्हणजेच आमच्या मातोश्रींनी प्रमाणपत्र दिल्यावरही त्यांची कळी बिळी कधी खुललेली आम्ही पाहिली नाही, ही वेगळी गोष्ट!
एकदा का आमचे पिताश्री मूडमध्ये आले की अनेक नवनवीन खाद्यपदार्थाना जन्माला घालायचे. एकदा त्यांच्या कार्यालयातल्या मित्रांची लोणावळ्याला सहकुटुंब ट्रिप गेली होती. तिथे गेल्यावर महिलावर्गाने नुसतं जेवण बनवायलाच नव्हे तर बाहेर जेवायलाही नकार दिला. जेवायला तर पाहिजेच, मग काय तमाम पुरुषवर्गाने कंबर कसली. लजपतराय नावाचा पंजाबी सहकारी म्हणाला, ‘कोई बात नही. हम खाना बनायेंगे, मगर जो बनेगा वही खाना पडेगा’ आणि सगळ्या पुरुषांनी रांधायला सुरुवात केली आणि त्यातून तयार झाली एक डिश ‘चायना राईस’. भात आणि त्यात सर्व प्रकारच्या भाज्या, अख्खी वांगी, गाजराचे तुकडे, बीटचे तुकडे आणि गरममसाला घालून बनविलेला तो एक वेगळाच पुलाव होता तो. तब्बल तीन तासांनी तयार झालेला १० जणांसाठीचा राईस खाताना चीनमधले साम्यवादी कसे जगत असतील हा विचार मात्र मनात आल्याशिवाय राहिला नव्हता. असो. अर्थात ‘भुकेला कोंडा..’ असल्यामुळे अख्खी नि न शिजलेली वांगी खाताना महिला वर्गाला जेवण बनवताना कशाकशाचे भान ठेवायला लागते याचा प्रत्यय येत होता.
 या ‘चायना राईस’चा प्रयोग जेव्हा आमच्या घरी झाला तेव्हा एका दिवसात घरच्या फोनचे बिल एक महिन्याच्या बिलाइतके आले होते. कारण एकच, त्या काळी भ्रमणध्वनी नव्हते आणि प्रत्येक गोष्ट कशी करायची हे विचारायला राईस तयार होईपर्यंत पिताश्रींची त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर फोनवर चर्चा सुरू होती. आता त्या वेळी ‘चायना राईस’ची क्वालिटी सुधारली होती, आणि वांगी त्याचप्रमाणे भातात घातलेले इतर पदार्थ खाता येत होते, ही गोष्ट वेगळी!
आमच्या पिताश्रींनी एकदा ‘काली दाल’ नामक पदार्थ बनविला होता. हॉटेलमध्ये मिळणारी ‘काली दाल’ वेगळी आणि त्यांनी बनविलेली ‘काली दाल’ वेगळी हे माझे मत त्या दिवशी अगदी ठाम झाले. त्या दिवशी मातोश्री त्यांच्या कन्येकडे पाहुणचाराला गेल्या होत्या आणि आम्ही दोघेच घरात होतो. अचानक त्यांची कळी खुलली आणि मातोश्रींनी बनविलेले जेवण बाजूला सारत त्यांनी काली दाल बनवितो असे फर्मान काढले. अस्मादिकांच्या मदतीने त्यांनी ती बनविण्यास सुरुवात केली. काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि तत्सम अनेक गरममसाले त्यांनी एकत्र केले आणि मूग, मसूर एकत्र करत पाण्यात शिजत ठेवले. जेवताना आग्रह करून करून ते ही दाल वाढत होते आणि स्वत:ही खात होते. पण पाणीदार झालेली ती काली दाल चपातीबरोबर खाताना आईची आठवण इतकी तीव्र झाली की अध्र्या तासात अस्मादिकांनी मोटरसायकल सुरू करून बहिणाबाईंकडे प्रस्थान ठेवले. कारण रात्री पुन्हा ती काली दालच खावी लागणार होती. काली दालचा किस्सा ऐकताच, ‘काही तरी बिघडले असेल, नाही तर त्यांची ती फेव्हरिट डिश आहे,’ असे पुटपुटत मातोश्रीही लगेच मुंबईत दाखल झाल्या त्यामुळे रात्री ती डाळ कोणाला खावी लागली नाही. पिताश्री मात्र आपल्या पाककृतीवर जाम खूष होते. त्यांना ती कशी खाता आली हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. मातोश्रींचे मात्र ‘पिताश्रींनीच जेवण बनविण्यास शिकवले’ हे पालुपद आजही आम्हाला ऐकायला मिळते. कारण तिचा त्यांच्यावर विश्वास होता.
एकदा मात्र आम्ही ऐन दिवाळीमध्ये त्यांच्या नवा पदार्थ शिकण्याच्या नादात पुढचे दोन महिने वेगळाच पदार्थ खात होतो. त्याचे झाले असे की अनेक वर्षांच्या दुराव्यानंतर त्यांची बहीण प्रथमच नवऱ्यासह आमच्याकडे येणार होती. त्याचे काहीसे वेगळेच अप्रूप पिताश्रींना होते. कारण काही घरगुती वादामुळे लाडक्या बहिणीशी जवळपास २७ वर्षे त्यांचा अजिबात संपर्क नव्हता. स्वाभाविकच आपल्या बहीण-मेव्हण्यांचे जंगी स्वागत करण्याचा त्यांनी चंगच बांधला. भाऊबीजेला ती येणार होती. त्या दिवशी तिला आपल्या हाताने बनविलेला पदार्थ त्यांना खाऊ घालायचा होता. झाले. काय करावे बरे या चर्वितचर्वणात काही दिवस रात्री गेल्यानंतर त्यांनी घरात कोणकोणता कच्चा माल आहे याचा शोध घ्यायला सुरुवात केली. दिवाळीनिमित्त घरी जास्तीचं साखर, तूप, मैदा वगैरे आणून ठेवले होते. काही पदार्थ तयार झाले होते आणि काही बनवायचे होते. लाडू, चकली, चिवडा तयार झाला होता. करंज्या बाकी राहिल्या होत्या. मातोश्री जरा दुपारच्या जेवणानंतर कलंडल्या होत्या आणि पिताश्रींनी हुकूम जाहीर केला, ‘आता मी बालुशाही बनवितो, कोणीही स्वयंपाकघरात यायचे नाही आणि लुडबुड करायची नाही.’ आमच्या मातोश्रींनी डोळे किलकिले करत अंदाज घेतला आणि पुटपुटल्या, ‘करंज्यांसाठी मैदा ठेवलाय. उगाच तूप, साखर आणि मैदा नासवू नका.’ पिताश्रींनी नेहमीप्रमाणे बायकांची कटकट असा त्रासिक चेहरा करत स्वयंपाकघराकडे कूच केले. एक किलो मैदा, साखर साधारण दीड किलो आणि एक किलो तूप असे साहित्य त्यांनी घेतले. बहिणीला भरपेट बालुशाही खायला घालायचीच, असं म्हणत ते कामाला लागले.
 मैदा भिजवताना त्यांनी गरम तूपही त्या पिठात घातले आणि तुपात मैद्याची कणिक तयार केली. कढईत तूप गरम करत ठेवले आणि त्यात या पिठाचे गोळे सोडण्यास सुरुवात केली. आता पिठातले तूपही गरम झाल्यावर कढईत गोळे फुटले आणि कढईभर पसरले. एक घाणा झाला, दुसरा झाला, गोळे शिजण्याऐवजी संपूर्ण कढईत पसरत होते. कदाचित मैदा कमी असेल म्हणत त्यांनी आणखी मैदा घेतला. नंतर पुन्हा त्यात तूप घातले, परत त्यात पिठीसाखर घातली. काय चुकत होते, त्यांना कळत नव्हते आणि मातोश्रींनी आत यायचे नाही म्हणून त्यांना कोणी काही सांगतही नव्हते. तब्बल दीड तास हा प्रकार सुरू होता. इतक्यात दाराची बेल वाजली आणि त्यांची लाडकी बहीण आपल्या नवऱ्यासमवेत दत्त म्हणून हजर झाली. आता बहीण आली म्हटल्यावर सगळे सोडून ते बाहेर आले आणि मातोश्रींना, ‘आत जे काय  झालंय ते तूच बघ आता. मला नको काही विचारूस,’ असे म्हणत ते साळसूदपणे बाहेर गप्पा मारत बसले. मातोश्रींनी काय झाले ते सगळे एका क्षणात ताडले आणि त्यांनी डोक्याला हात लावला. सगळ्या वस्तू वाया गेल्या, म्हणत असतानाच तिने जरा विचार केला आणि त्यात सुधारणा करत सगळ्या पिठाच्या शंकरपाळ्या केल्या. आपल्या नणंदेला तिने गरमागरम शंकरपाळ्या खायला घातल्या. पण त्यानंतर संपूर्ण महिनाभर कोणीही घरी आले की समोर शंकरपाळे बशी भरून येत असत. कोणी विचारले तर आम्ही सांगायचो, ‘ते बालुशाहीचे शंकरपाळे आहेत.’ पिताश्रींनी त्या शंकरपाळ्यांचे नावच ठेवले ‘बालुशाहीचे पाळे’. आता कधी फराळात कोणाकडेही शंकरपाळे दिसले की आमच्या सगळ्यांच्याच चेहऱ्यावर एक हलकेच स्मित येते. पिताश्रींचे ते पाळे आठवतात पण त्याचबरोबर त्यांची बहिणीला खाऊ घालण्यासाठीची धडपड आठवून सहज मन भरूनही येते..

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Special article on diwali occasion

ताज्या बातम्या