पणतीच्या निष्ठेने शिक्षण क्षेत्रात सतत तेवत राहिलेले एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे (उ.म.वि.) संस्थापक कुलगुरू एन. के. ठाकरे अर्थात निंबा कृष्ण ठाकरे. विद्यापीठाच्या बांधकाम आराखडय़ासोबत विकासाचा नकाशा रेखाटण्यापासून त्यांनी धुरा वाहिली. निवृत्तीनंतर आजही धुळ्यानजीक मोराणे या गावी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी उत्तम शिक्षण देण्यासाठी अविरत कार्यरत असणाऱ्या ठाकरे यांच्याविषयी..

‘मी तेवत राहीन’ नावाची रवींद्रनाथांची एक कविता आहे. तिचा भावार्थ असा- अस्तमानाला जाणाऱ्या सूर्याला प्रश्न पडतो की, ‘तो गेल्यानंतर अंधकार कोण दूर करेल?’ अशा वेळी फक्त एकटी पणतीच धिटाईने पुढे येते व म्हणते, ‘मी सगळा अंधार दूर नाही करू शकणार. पण मी तेवत राहीन.. प्रकाशाने अंधकार भेदला जातो यावरचा लोकांचा विश्वास जागता ठेवीन.’
 अशाच पणतीच्या निष्ठेने शिक्षण क्षेत्रात सतत  तेवत राहिलेलं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे (उ.म.वि.) संस्थापक कुलगुरू एन. के. ठाकरे अर्थात निंबा कृष्ण ठाकरे. शिवाजी विद्यापीठाचा गणितातील पहिला डॉक्टरेट.. शून्यातून सुरुवात करून ७५० एकर जागेत अतिशय देखण्या स्वरूपात विद्यापीठ परिसर विकसित करणारा पहिला कुलगुरू.. स्थापनेपासून अवघ्या चार वर्षांत विद्यापीठाला यूजीसी अ‍ॅक्ट १९५६ च्या सेक्शन १२ (डी) नुसार, अंतिम मान्यता मिळवून देणारं द्रष्टं नेतृत्व.. बडय़ा बडय़ा राजकारण्यांच्या शिक्षण संस्थांतील गैरकारभाराबद्दल त्यांना २ लाखांपर्यंतचा दंड ठोठावण्याची हिंमत दाखवणारा पहिला (आणि बहुतेक एकमेव) कुलगुरू.. धुळय़ाजवळील मोराणे या छोटय़ाशा गावातून इंटरनेटच्या माध्यमातून गणितातील एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे त्रमासिक चालवणारा गणितज्ञ असे अनेक विक्रम ज्यांच्या नावावर जमा आहेत असा हा ७६ वर्षांचा महर्षी निवृत्तीनंतर गेली ११ र्वष मोराणे गावात आपलं सर्वस्व ओतून उभारलेल्या अद्यावत शाळेत ग्रामीण विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी जिवाचं रान करीत आहे.
जिद्द असेल तर शिक्षण घेणारी कुटुंबातील पहिली पिढीदेखील गगनाला गवसणी घालू शकते हे ठाकरे बंधूंना पाहिल्यावर पटतं. हयात असलेल्या चार भावांपैकी मोठे एन. के. ठाकरे कुलगुरू, दुसऱ्या क्रमांकावरचे वसंतराव कृषितज्ज्ञ (वृक्षमित्र म्हणून ६० पुरस्कार व पर्यावरणासंबंधी २१ पुस्तकं प्रसिद्ध), तिसरे जगन्नाथ धुळय़ातील नामवंत सर्जन व चौथे शरदराव सोलापुरातील प्रथितयश उद्योगपती (यांच्या लक्ष्मी हॅड्रोलिक्स प्रा. लि.ची वार्षिक उलाढाल २५० कोटीं रुपयांच्यावर) या महारथींचं प्राथमिक शिक्षण मोराणे गावीच झालं. त्यांचे काका दशरथ पाटील क्रांतिकारक होते. बेचाळीसच्या लढय़ात त्यांच्या सहभाग होता. त्यांच्यामुळे विनोबा भावे, एस. एम. जोशी, ग. प्र. प्रधान अशी मातब्बर मंडळी गावात येत. सर म्हणतात, लहानपणी त्यांच्या भाषणातले विचार मात्र बालवयातच कायमचे ठसले.
ch13ग. प्र. प्रधानांचा आदर्श समोर असल्याने, शिक्षण क्षेत्रातच काम करायचं हे सरांनी आधीच ठरवलं होतं. घरची रग्गड शेती होती. दूधदुभत्याला कमी नव्हतं. पण रोख पैसा नसायचा, त्यामुळे एका शाळेत पूर्ण वेळ शिकवता-शिकवता ते मुंबई विद्यापीठातून एम.एस्सी. झाले. या परीक्षेत गणितात अव्वल क्रमांक मिळाल्याने त्यांना मुंबईतील एस.आय.ई. एस. या महाविद्यालयात सहज नोकरी मिळाली. पुढे व्ही.जे.टी.आय.,  मीठीबाई, मग गोव्यातील चौगुले कॉलेज असे मजल-दरमजल करीत ते १९६९ पासून कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात गणिताचे प्रोफेसर म्हणून रुजू झाले. इथल्या आठ वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी गणितात प्रचंड संशोधन (२०० हून अधिक शोधनिबंध) करून पीएच.डी. संपादन केली. या विद्यापीठाचा गणितातील पहिली डॉक्टरेट हा बहुमान तर त्यांनी मिळवलाच त्याहूनही अधिक मोलाचं म्हणजे त्यांचे गुरू फुजियारा नावाचे जे जपानी परीक्षक होते त्यांनी असं मत मांडलं की, ‘त्यांचे गणितातील युरोपमध्ये प्रसिद्ध झालेले शोधनिबंध एन. के. ठाकरे याने तपासावेत व त्यावर आपलं मत द्यावं. एका विदेशी परीक्षकाच्या या शेऱ्याने सरांचं नाव सर्वतोमुखी झालं.
 धुळय़ातील जय हिंद कॉलेजचे संस्थापक प्राचार्य (१९९२ ते ८५) या केवळ ३ वर्षांच्या कारकिर्दीत सरांनी आपल्या कॉलेजला दर्जेदार महाविद्यालयाच्या पंक्तीत नेऊन बसवलं. यशाच्या शिडीवरील सरांचं पुढचं पाऊल म्हणजे पुणे विद्यापीठाने दिलेलं, ‘टिळक प्रोफेसर ऑफ मॅथेमॅटिक्स’ हे मानाचं पद. तत्कालीन शिक्षण सचिव कुमुद बन्सल यांच्या आयुष्याला वेगळी दिशा देणारा फोन इथेच आला. त्यानुसार धुळे, जळगाव व नंदुरबार या तीन जिल्हांसाठी नव्याने स्थापन होणाऱ्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा पहिला कुलगुरू म्हणून सरांची निवड करण्यात आली होती. या बातमीवर खरं तर ठाकरे पतीपत्नींचा विश्वासच बसेना. कारण खेडय़ातील एका शेतकऱ्याचा मुलगा, कुठेही लागेबांधे नाहीत, उच्चपदस्थांत ऊठबस नाही.. स्वकर्तृत्वावर सामोरं आलेलं हे शिवधनुष्य उचलण्यासाठी सर सज्ज झाले.
१५ ऑगस्ट १९९०ला सरांनी कुलगुरूपदाचा कारभार हाती घेतला तेव्हा जमीन मिळवण्यापासून तयारी होती. पुणे विद्यापीठाने परत बोलीवर दिलेली जुनी गाडी, एक टाइपरायटर, २ लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट व स्वत:च्या दोन सुटकेस घेऊन सर १८ ऑगस्टला जळगावात दाखल झाले. विद्यापीठाच्या उभारणीच्या काळातील एक अनुभव सरांच्या पत्नी पुष्पलताताईंनी सांगितला. त्या वेळी त्या पुण्यातील भारती विद्यापीठातील कनिष्ठ महाविद्यालयात शिकवत होत्या. एका सुट्टीत जळगावमध्ये त्या आल्या असताना सर त्यांना उ.म.वि.च्या नियोजित स्थळी घेऊन गेले. एका मोठय़ा डोंगरापाशी गाडी थांबली. सर झपाझप पुढे आणि या धापा टाकीत त्यांच्यामागे अशा प्रकारे तो गड चढल्यावर समोर पसरलेल्या सातशे एकर माळरानाकडे इशारे करीत सर प्रचंड उत्साहात सांगू लागले. इथे प्रवेशद्वार.. या ठिकाणी मुख्य इमारत.. इथे ग्रंथालय.. इथे अमुक, तिथे तमुक. त्या म्हणाल्या, ‘मी वरवर मान डोलवत होते पण त्या मोकळय़ा अवकाशात मला फक्त एकच गोष्ट दिसत होती ती म्हणजे याचं झपाटलेपण व प्रचंड कष्ट.’
स्वप्नातलं ध्येय प्रत्यक्षात साकार करणं ही एक मोठी कसोटी असते. सरांनी बांधकामाच्या आराखडय़ासोबत विद्यापीठाच्या विकासाचा नकाशाही तयार केला. निष्ठावान सहकारी शोधले. त्यांना संरक्षण दिलं. ‘अंतरी पेटवू ज्ञानदीप’ हे बोधवाक्य निश्चित केलं आणि हेच ध्येय डोळय़ांसमोर ठेवून योजनाबद्ध पद्धतीने ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरू केली.
विद्यार्थ्यांच्या नसानसात रुजलेली कॉपी करून पास होण्याची वृत्ती आणि या गोष्टीला संस्थाचालकांकडून मिळणारं खतपाणी यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या शैक्षणिक गुणवत्तेविषयी त्या काळी एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. हा कलंक पुसण्यासाठी सरांनी सत्त्वशील शिक्षकांची एक संघटना उभी केली. या ब्रिगेडने अचानक धाड घालून कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पकडून संस्थाचालकांना त्यांच्यावर कारवाई करायला तर भाग पाडलंच, शिवाय अनेक अंतर्गत गैरव्यवहारातही शोधून काढले आणि त्यावर दीर्घकालीन उपाययोजनांचा कार्यक्रम राबवला. शैक्षणिक शुद्धीची सरांची ही पहिली चळवळ कमालीची यशस्वी ठरली.
त्याचबरोबर विद्यापीठाचा पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रगत व्हावा म्हणून सरांनी तज्ज्ञ प्रोफेसरांना कामाला लावून आर्ट, सायन्स, कॉमर्स या तिन्ही शाखांसाठी १४८ नवी पाठय़पुस्तकं तयार केली. अभ्यासक्रमात कार्यानुभव व प्रकल्पपद्धती आणली त्यामुळे शिक्षण समाजाभिमुख झालं. तसंच बायोकेमेस्ट्री, पॉलिमर केमेस्ट्री, फूड टेक्नॉलॉजी.. असे २५ नवीन अभ्यासक्रमही सुरू केले. या सर्व प्रयत्नांचं फलित म्हणजे (‘इंडिया टुडे’ २०१३ ने केलेल्या परीक्षणानुसार) आज या विद्यापाठाने महाराष्ट्रात पहिलंवहिलं स्थान पटकावलं आहे.
काटकसरीचं व्यवस्थापन हा सरांचा आणखी एक विशेष. यासाठी तर सरांनी अनेकांचा रोषही ओढवून घेतला आहे. फीद्वारे जमा होणाऱ्या पैशातील गरजेपुरता पैसा हाताशी ठेवून, उर्वरित रक्कम रोजच्या रोज बँकेतील मुदत ठेवीत गुंतवण्याचा नियम घालून दिल्याने, उत्तम नियोजन असेल तर विद्यापीठं स्वत:च्या पैशात व्यवस्थित चालू शकतात हा धडा घातला गेला.
 अशा प्रकारे ६ वर्षांच्या अविश्रांत कामांनंतर १९९६ला सरांनी कुलगुरूपद सोडलं तेव्हा शून्यातून प्रारंभ करणाऱ्या उ.म.वि.ची गंगाजळी १४ कोटी रुपयांची होती; शिवाय प्रशस्त व देखण्या अशा ४० इमारती विद्यापीठात मोठय़ा दिमाखात उभ्या होत्या. सुमारे ५ लाख झाडांनी व जागोजागीच्या हिरवळीने वेढलेलं आणि वेरुळ-अजिंठा येथील लेण्यांच्या चित्रांनी नटलेलं हे विद्यापीठ आज ‘पर्वतावरील ज्ञानशिल्प’ म्हणून ओळखलं जातं.
मुख्य म्हणजे गरजेपेक्षा एकपंचमांश कर्मचारी कमी असताना सरांनी एवढं मोठं कार्य उभं केलं. या सर्वाच्या (शिपायापासून रजिस्ट्रापर्यंत) निवड प्रक्रियेसाठी प्रश्नपत्रिका सरांनी स्वत: काढल्या. नेमणुकांच्या वेळी सत्तेतील राजकारण्यांच्या आदेशाला ‘गुणवत्ता असेल तर न्याय मिळेल’ असं रोखठोक सांगण्याची निर्भयता त्यांच्यात होती. सहकाऱ्यांना आपल्या वागण्यातून कर्तव्यकठोरतेचे धडे तर त्यांनी दिलेच, पण त्याचबरोबर त्यांना त्यांच्या गुणदोषांसह स्वीकारून तळहातावरच्या फोडासारखं जपलंदेखील.
कुलगुरूपदाची मुदत संपल्यावर सर पुन्हा पुणे विद्यापीठात रुजू झाले आणि निवृत्त होईपर्यंत म्हणजे १९९८ पर्यंत तिथेच राहिले. त्यांच्या इथल्या कामाने व संशोधनाने यूजीसी, नवी दिल्लीने पुणे विद्यापीठाच्या गणित विभागाला ‘गणितातील प्रगत शिक्षण देणारे केंद्र’ हा दर्जा प्रदान केला. ‘जो कशासाठी तरी मरायला तयार नाही तो जगायला लायक नाही’, हे मार्टिन ल्यूथर किंगचं वचन सरांना तंतोतंत लागू पडतं. स्वस्थ बसणं हा त्यांचा स्वभाव नव्हताच. आजही नाही. निवृत्तीनंतर नवा ध्यास, नवं स्वप्न घेऊन ते आपल्या गावी मोराणे येथे आले आणि वाटय़ाला आलेल्या वडिलोपार्जित ११ एकर जमिनीवर त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी इंग्रजी माध्यमाची शाळा काढली. त्यासाठी धुळे व पुणे येथील स्वत:ची दोन घरं विकली, शिवाय आपला फंड आणि आयुष्यभराची बचत या कामात ओतली आणि उराशी जपलेलं स्वप्न साकार केलं.
आपल्या आईवडिलांच्या नावे (शेवंता प्री प्रायमरी व प्रायमरी स्कूल व कृष्णा हायस्कूल) सुरू केलेली सरांची शाळा बघण्याचा योग मला अलीकडेच आला. दोन हजार हिरव्यागार झाडांनी नटलेली ती स्वच्छ, सुंदर, प्रशस्त शाळा बघताना रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनची आठवण येते. सर्वात कमी फी आकारणारी धुळ्यातील दर्जेदार शाळा असा या शाळेचा लौकिक आहे. औरंगाबाद येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय ज्ञानपीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धातून या शाळेची मुलं डझनाने सुवर्णपदकं जिंकतात. सुज्ञ पालक शाळेचं मोल जाणून आहेत याचंही एक उदाहरण त्यांनी सांगितलं. धुळ्यात पोस्टिंग असताना ए.सी.पी. प्रदीप देशपांडे यांनी शिपायाच्या आग्रहामुळे आपल्या मुलीला या शाळेत घातलं. त्यांच्या मुलीला ही शाळा इतकी आवडली की वडिलांची पुण्याला बदली झाली तेव्हा ती तिथे रमू शकली नाही, केवळ हीच शाळा हवी म्हणून आज ती व तिची आई धुळ्यात राहतात.
सरांच्यातील गणितज्ञ इथेही स्वस्थ बसलेला नाही.आय.एम.एस.तर्फे प्रकाशित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या जर्नल (इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी)चे संपादन ते २००७ ते २०१३ या काळात मोराणे गावातून करीत होते. आता ते या संस्थेच्या जनरल सेक्रेटरी पदावर कार्यरत आहेत. कविमनाच्या या योद्धय़ाचे कथा व कवितासंग्रहही प्रसिद्ध झाले आहेत.
जेथे राघव तेथे सीता या न्यायाने सरांच्या अर्धागिनीने, पुष्पलताताईंनीही निवृत्तीनंतर स्वत:ला शाळेसाठी वाहून घेतलं आहे. सकाळी मुलांच्या आधी शाळेत येणारे व संध्याकाळी शाळेचे दरवाजे-कुलूप लावून परतणारे ठाकरे पती-पत्नी स्वत:साठी एक पैसाही घेत नाहीत. शाळेचे हिशेब स्वत:च ठेवतात. मात्र विद्यार्थ्यांसाठी करायच्या खर्चात कुठलीच तडजोड नाही. शिक्षक व इतर कर्मचारी यांच्यावर तर पुत्रवत प्रेम. त्यांचे पगार ७ तारखेच्या आत झाले पाहिजेत हा दंडक. या आपुलकीने इथल्या ३५ कर्मचाऱ्यांना बांधून ठेवलंय.
कौटुंबिक आयुष्यातही सर तृप्त आहेत. मुलगी डॉ. आसावरी, मल्टिनॅशनल कंपनीत व्हाइस प्रेसिडंट पदावर असणाऱ्या पतीसह पुण्यात सुखाने नांदतेय, तर मुलगा अमित आपल्या डॉ. पत्नीसह अमेरिकेत स्थिरावलाय.
गणित शिकवताना सरांना विद्यार्थ्यांचं अगणित प्रेम मिळालं. (१८ पीएच.डी., व १२ एम.फिल.) गेल्या वर्षी सरांची पंचाहत्तरी झाली तेव्हा त्या विद्यार्थ्यांनी ‘एन. के. ठाकरे गौरव समिती’ स्थापन केली व सरांना २५ लाख रुपयांची थैली दिली. हा निधी सरांनी ‘इदं न मम’ं म्हणत जसाच्या तसा पुणे विद्यापीठाकडे गणितरत्न (भारतरत्नप्रमाणे) पुरस्कार सुरू करण्यासाठी दिला. समर्पित वृत्तीने शिक्षणाची नंदनवनं उभारणाऱ्या या ज्ञानयोग्याचा हा जीवनपट पाहताना ब्रह्मकुमारी पंथाचं एक गीत आठवत राहतं..
अच्छे रखो विचार, उत्तम करी व्यवहार
आदर्श व्यक्तीकी ये पहचान हैऽऽऽ
जो मन वचन कर्म से पवित्र है,
वो चरित्रवानही यहाँ महान है।    
waglesampada@gmail.com संपर्क – nkthakare@gmail.com

ugc new decision direct admission to phd after graduation
आता पदवीनंतर पीएच.डी.ला मिळणार थेट प्रवेश! काय आहे युजीसीचा नवा निर्णय? युजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेशकुमार यांची माहिती 
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
10 th Exam
दहावीत नापास झालात? काळजी नसावी कारण येत आहे नवे धोरण…
mumbai IIT
मुंबई आयआयटीचे ३६ टक्के विद्यार्थी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या प्रतीक्षेत