भारतीय खेळाडूंची यशस्वी कामगिरी दूरचित्रवाणीवर किंवा समाजमाध्यमांवर दाखवली गेली तर त्याचा प्रभाव लहान मुला-मुलींवर खूप मोठ्या प्रमाणात पडतो. गळ्यात पदक, हातात भारताचा झेंडा आणि सन्मानाने वाजवले जाणारे राष्ट्रगीत हे पाहून सर्वांचीच छाती अभिमानाने फुलून येते.
सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू बॅडमिंटनच्या क्षितिजावर चमकू लागल्या तेव्हा गल्लोगल्ली मुली बॅडमिंटन खेळताना दिसू लागल्या. मला आठवते, दीपा कर्माकरने २०१६च्या ‘रिओ ऑलिम्पिक’ मध्ये जिम्नॅस्टिक खेळात चौथी येण्याची चमकदार कामगिरी केली होती. अगदी छोट्याशा फरकाने दीपा ऑलिम्पिक पदकाला मुकली होती. त्या सुमारास ऐकदा मी रस्त्याने जाताना मला एक दृश्य दिसले की, एका गरीब वस्तीतील तीन-चार मुली दीपाप्रमाणे कसरती करायचा प्रयत्न करीत होत्या. म्हणजे केवढा प्रभाव असेल. कोनेरू हंपीचा आदर्श ठेवून तर बुद्धिबळात चमकदार कामगिरी करणारी द्रोणावली हरिका, वैशाली, दिव्या देशमुख अशी एक नवीन प्रतिभावान खेळाडूंची फळीच तयार झाली. भारताला बुडापेस्ट, हंगेरी येथे २०२४ मध्ये झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये पहिलेवहिले सांघिक सुवर्णपदक मिळवून देण्यात या फळीचा मोठा वाटा होता. कोनेरू हंपी संघात नसताना त्यांनी हे यश मिळवले हे विशेष!
भारतात क्रीडा संस्कृती अजूनही म्हणावी तेवढी विकसित झालेली नाही. त्यात आपल्या समाजात जन्मापासूनच मुलगा-मुलगी असा भेदभाव खूप प्रमाणात आढळतो. अजूनही बर्याच कुटुंबात मुलींना सकस आहार आणि शिक्षणासारख्या मूलभूत गोष्टीत मुलांच्या तुलनेत दुय्यम स्थान मिळते. असे असताना तिथे व्यावसायिक क्रीडा क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी मुलींना किती झगडावे लागत असेल याची कल्पना आपण करू शकतो. क्रीडा क्षेत्रात लहान वयोगटापासून मुलांच्या आणि मुलींच्या स्पर्धांमधील सहभागात फरक जाणवतो. मुलींच्या गटात मुलांच्या तुलनेत कमी सहभाग असतो. साधारणपणे जर एखादा खेळ भरपूर खेळाडू खेळत असतील, तर त्यात पदके मिळवणारे खेळाडू निपजण्याची शक्यता जास्त असते. सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक स्थितीत जशी सुधारणा होत आहे तशी भारतात स्त्री खेळाडूंच्या खेळातील सहभागात आणि कामगिरीत प्रगती दिसून येत आहे. स्वातंत्र्यानंतर १९४८मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय चमूत एकाही स्त्री खेळाडूचा समावेश नव्हता. १९६४च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेणार्या भारतीय खेळाडूंमध्ये ५२ पुरुष खेळाडू होते, तर अवघी १ स्त्री खेळाडू होती. हळूहळू ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय स्त्री खेळाडूंचा सहभाग वाढू लागला. २०००मध्ये कर्नम मल्लेश्वरी ही ऑलिम्पिक पदक मिळवणारी पहिली भारतीय स्त्री खेळाडू ठरली आणि स्त्रियांच्या खेळातील सहभागाचे स्वरूप पालटले. अधिकाधिक मुली लहानपणापासून खेळाकडे वळू लागल्या. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय चमूत २३ स्त्री खेळाडूंचा, तर ६० पुरुष खेळाडूंचा सहभाग होता. २०२४ मध्ये झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये या परिस्थितीत आणखी सुधारणा होऊन भारतीय चमूत ६५ पुरुष तर ४५ स्त्री खेळाडूंचा समावेश होता.
भारतीय स्त्री खेळाडूंनी अनेक खेळांमध्ये जागतिक दर्जाची कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे भारतात पारंपरिक दृष्ट्या ‘मर्दानी’ समजल्या जाणार्या वेटलिफ्टिंग, कुस्ती, बॉक्सिंग अशा खेळांमध्ये भारतीय स्त्री खेळाडूंनी ऑलिम्पिक पदके मिळवली आहेत. भारतात असलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीत ही विशेष बाब मानली पाहिजे. कर्नम मल्लेश्वरीच्या वर्ष २००० मध्ये सिडनी ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये मिळवलेल्या कांस्य पदकाने भारतीय लोकांचा अशा खेळांविषयीचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलण्यास मदत झाली. मीराबाई चानूने २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये याच खेळात रौप्य पदक मिळवून यावर शिक्कामोर्तब केले. मेरी कोम आणि लव्हलीना बोरगोहेन यांनी बॉक्सिंगमध्ये तर साक्षी मलिकने कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक मिळवून भारतीय ्त्रिरया अशा ‘मर्दानी’ समजल्या जाणार्या खेळांमध्ये पदके मिळवण्यात पुढे आहेत हे सिद्ध केले. सायना नेहवाल आणि सिंधू या दोघींनी बॅडमिंटनसारख्या चपळाईची कसोटी पाहणार्या खेळात ऑलिम्पिक पदकेच नव्हे तर अनेक जागतिक दर्जाच्या स्पर्धा जिंकून भारतीय स्त्री खेळाडूंसाठी एक आदर्श निर्माण केला. बॅडमिंटनमध्ये तोपर्यंत भारतीय पुरुष खेळाडूंनी नाव कमावले होते, पण सायना आणि सिंधूमुळे जागतिक पातळीवर बॅडमिंटनमध्ये प्रथमच भारतीय स्त्री खेळाडूंची दखल घेतली जाऊ लागली.
हॉकी, धनुर्विद्या यासारख्या प्राचीन भारतीय परंपरा असलेल्या खेळातसुद्धा भारतीय स्त्री खेळाडूंनी चमक दाखवली आहे. शूटिंगसारख्या अचूकतेची परिसीमा गाठलेल्या खेळात मनू भाकरने २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवून तर वैशाली व दिव्या देशमुख यांनी अनुक्रमे ‘कॅन्डिडेट्स’ व ‘वर्ल्ड कप बुद्धिबळ’ स्पर्धा जिंकून स्त्री खेळाडूंच्या येणार्या दमदार नवीन पिढीची चाहूल भारतीय क्रीडा क्षेत्राला दिली आहे.
बरेच वेळा एखाद्या खेळाडूचे पदक थोडक्यात हुकते. त्यावेळी त्यासाठी सर्व देश हळहळतो. परंतु काळाच्या ओघात अशा खेळाडूची नोंद पुसली जाते. भारतीय स्त्री खेळाडूंच्या जागतिक कामगिरीची पहिलीवहिली दखल अशाच एका हातातोंडाशी आलेल्या पण हुकलेल्या घासामुळे घेतली गेली. १९८४ च्या लॉस अँजेल्स येथील ऑलिम्पिकमध्ये धावपटू पी. टी. उषाच्या एक शतांश सेकंदाच्या फरकामुळे हुकलेल्या कांस्य पदकासाठी सारा देश हळहळला. पण सर्व भारतीय स्त्री खेळाडूंसाठी ही कामगिरी स्फूर्तिदायक होती. अलीकडच्या काळात भारतीय स्त्री खेळाडूंमध्ये ऑलिम्पिक पदक थोडक्यात हुकल्याची ठळक उदाहरणे म्हणजे, जिमनॅस्ट दीपा कर्माकर, टेनिसपटू सानिया मिर्झा, गोल्फर आदिती अशोक. वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि शूटर मनू भाकर यांनी जरी आधी ऑलिम्पिक पदकं मिळवली असली, तरी २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आणखी एक ऑलिम्पिक पदक मिळवायची सुवर्णसंधी त्यांच्या हातून थोडक्यात निसटली. २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये स्त्रियांच्या भारतीय हॉकी संघाने प्रथमच उपांत्य फेरी गाठली होती. कांस्य पदकासाठी झालेल्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात ब्रिटनकडून ३ विरुद्ध ४ गोल असा निसटता पराभव झाला आणि भारताचे कांस्य पदक हुकले. कुस्तीगीर विनेश फोगटला मिळालेले पदक जेव्हा
अगदी थोडे वजन जास्त भरल्यामुळे गेले तेव्हा सार्या देशाला अशीच हळहळ वाटली होती.
भारतीय खेळाडूंचे जागतिक स्तरावरील लक्षणीय यश मापले, तर त्यात वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर मिळवलेली पदके जास्त प्रमाणात दिसून येतात. स्त्री आणि पुरुष दोन्ही खेळाडूंच्या बाबतीत ही गोष्ट आढळते. याला महत्त्वाचे कारण म्हणजे संघटनात्मक पातळीवर खेळाडूंच्या प्रगतीसाठी होणार्या प्रयत्नांची वानवा. कधीकधी तर संघटना यशस्वी खेळाडूंचे पाय ओढतानादेखील दिसतात. एखाद्या खेळात पदक विजेता संघ उभारायचा तर त्यासाठी देशभरातील प्रतिभावान खेळाडू हेरावे लागतात. नंतर एखाद्या हिर्याला पैलू पाडावेत, त्याप्रमाणे त्यांना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण, सराव, त्यांचा आहार, मानसिक क्षमता, कौटुंबिक व आर्थिक अडचणी अशा अनेक गोष्टींवर मेहनत घेऊन बलवान संघ उभारावा लागतो. हे सर्व करण्यासाठी उत्तम संघटन कौशल्य, चिकाटी, दूरदृष्टी, आर्थिक पाठबळ अशा खूप बाजू भक्कम असाव्या लागतात. भारतीय क्रीडा क्षेत्रात या गोष्टींचा अभाव प्रकर्षाने जाणवतो आणि म्हणून भारतीय खेळाडूंची सांघिक कामगिरी अजून तरी मर्यादित स्वरूपातच राहिली आहे.
कदाचित यामुळेच स्त्रियांच्या क्रिकेट वर्ल्ड कपमधील सांघिक अजिंक्यपद आपल्याला विशेष सुखावून गेले. हॉकीमधील स्त्रियांच्या संघाचे ऑलिम्पिक पदक जरी थोडक्यात हुकले असले तरी स्त्रियांच्या आशियाई गेम्समधील हॉकी कांस्य पदकाचे महत्त्व त्यामुळे यत्किंचितही कमी होत नाही. ॲथलेटिक्ससारख्या क्षेत्रात भारतीय स्त्री धावपटूंनी सांघिक रिले शर्यतीत मिळवलेल्या कॉमनवेल्थ रौप्य पदकाचे आणि आशियाई कांस्य पदकाचे मोल तर खूप आहे. बुद्धिबळात कमालीची सांघिक कामगिरी केली ती २०२४च्या स्त्रियांसाठी झालेल्या हंगेरी येथील ऑलिम्पियाडमध्ये. १८१ देशांच्या संघांचा सहभाग असलेल्या या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये अमेरिका, चीन अशा जागतिक महासत्तांना मागे टाकून सुवर्ण पदक मिळवण्याचा अचाट पराक्रम आपल्या स्त्रियांच्या संघाने केला.
भारतीय क्रीडा क्षेत्रातील बहुतेक स्त्री खेळाडू सामान्य परिस्थितीतून वर आलेल्या आहेत. विशेषत: अलीकडच्या काळात खूप स्त्री खेळाडू छोट्या शहरांमधून किंवा लहान गावांमधून क्रीडा क्षेत्रात उतरून चांगली कामगिरी करताना दिसतात. ही बाब नक्कीच अभिमानास्पद आणि आशादायी आहे. रांची जवळील रामचट्टी या छोट्या गावातून आलेली धनुर्धारी दीपिका कुमारी २०१२ मध्ये जगात पहिल्या स्थानावर गणली जात होती. गंमत म्हणजे लहान असताना तिने नेमबाजीचा सराव दगडाने किंवा घरी बनविलेल्या बांबूच्या धनुष्य-बाणाने झाडावरील आंबे पाडून केला होता. उपलब्ध संधीचा पुरेपूर उपयोग करून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जेव्हा भारतीय स्त्री खेळाडू क्रीडाक्षेत्रात देशाची मान उंचावताना दिसतात तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो.
भारतीय स्त्री खेळाडूंनी खूप संघर्षानंतर लावलेल्या या ‘इवल्याशा रोपाचा’ वेलू गगनावरी जाईल का? या प्रश्नाचं उत्तर बर्याच लहान-मोठ्या घटकांवर अवलंबून आहे. येणार्या पिढीतील मुली किती प्रमाणात, एक छंद म्हणून तरी, लहानपणापासून एखादा खेळ आपलासा करतात? क्रीडाक्षेत्रात मुलींमधील गुणवत्ता योग्य प्रकारे जोपासली जाते का? शिखर सर केलेल्या स्त्री खेळाडूंना आर्थिक सुबत्ता सहज मिळते. पण व्यवस्थेतील त्रुटी, दुखापती, वैयक्तिक अडचणी अशा काही कारणाने तिथवर पोचू न शकलेल्या थोड्या खालच्या फळीतील खेळाडू निदान चांगल्या दर्जाची जीवनशैली कमवू शकतात का? कौतुकाची थाप फक्त आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या स्त्री खेळाडूंना न मिळता, राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेत्या स्त्री खेळाडूंनासुद्धा मिळेल का? विशेषत: क्रिकेटेतर खेळांमध्ये हे चित्र बदलेल का?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे भविष्यात सकारात्मक मिळत गेली तर भारतीय क्रीडाविश्वाचा सुवर्णकाळ येईल. गुणवत्तेत कुठेही कमी नसणार्या भारतीय स्त्री खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात सातत्याने बहारदार कामगिरी करण्यास मग कोणीच रोखू शकणार नाही.
gokhale.anupama@gmail.com
