नमिता गोखले या इंग्रजीत लेखन करणाऱ्या एक प्रथितयश भारतीय लेखिका. सुप्रसिद्ध ‘जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल’च्या त्या संस्थापक आणि सहसंचालकदेखील आहेत. ‘थिंग्ज टू लीव्ह बिहाइंड’ या त्यांच्या कादंबरीला या वर्षीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. ‘आपण सगळे एकमेकांसाठी कथाच’ असं मानणाऱ्या नमिता यांची खास मुलाखत घेतली आहे, दिल्लीत वास्तव्य करणाऱ्या आणि मराठी आणि इंग्रजीत लेखन करणाऱ्या अर्चना मिरजकर यांनी.

अर्चना मिरजकर : तुम्ही १९८४ मध्ये लेखनाला सुरुवात केलीत. जग इतक्या वेगानं बदलत आहे, की तो काळ फार मागे गेल्यासारखा वाटतो. या दरम्यान तुम्हीदेखील लेखनाव्यतिरिक्त अनेक प्रकल्पांत गुंतलात आणि तरीही तुम्ही अनेक उत्कृष्ट पुस्तकं लिहीत राहिलात, आजही लिहिता आहात. तुम्ही लिहायला सुरुवात केली तेव्हा तुमच्या प्रेरणा कोणत्या होत्या आणि आज लेखनामागील तुमच्या प्रेरणा काय आहेत?

Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
ai researcher demis hassabis
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतील संशोधक उद्योजक
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

नमिता गोखले : माझ्या लेखनाच्या मुळाशी प्रेरणा म्हणण्यापेक्षा एक प्रकारची सक्ती असते, असं म्हणणं अधिक योग्य ठरेल. माझ्या हृदयातून, स्मृतीतून, कल्पनेतून जेव्हा शब्द आणि प्रतिमा उचंबळून बाहेर पडतात तेव्हा मी लिहायला बसते. मी या कथा लिहिण्यापूर्वी आणि लिहिल्यानंतर कुठल्याशा गूढ प्रदेशात त्यांचं वास्तव्य असतं. लेखनाव्यतिरिक्त जे इतर उद्योग मी करते, त्यांचं स्थान माझ्या मेंदूत आणि माझ्या व्यक्तिमत्त्वातसुद्धा वेगळय़ा ठिकाणी असतं. आजूबाजूच्या जगात घडणाऱ्या बदलाचं मी माझ्या कथांसाठी नेहमीच निरीक्षण करत असते. आजकालचं साहित्य असो, की इतिहासकथन असो, बदल हा घडतच असतो. माझी पहिली कादंबरी ‘पारो’ १९८४ मध्ये प्रकाशित झाली. अडतीस वर्षांपूर्वी; पण अजूनही तरुण वाचक ती वाचतात आणि तिच्यावर प्रतिक्रिया देतात, हे मला विशेष वाटतं. तिथून सुरू झालेला माझा साहित्यिक प्रवास वीस पुस्तकांनंतर आता बराच लांबचा पल्ला गाठून आला आहे. लेखनाची शिस्त आणि सराव ही माझी ओळख आहे आणि त्यानंच मला स्थैर्य मिळत आलं आहे.

अर्चना : बालपणी हिमालयाच्या कुशीत राहण्याचं भाग्य तुम्हाला मिळालं. एकूणच भारतीय मनाच्या जडणघडणीत हिमालयाला विशेष स्थान आहे. तुमच्या लेखनावरही हिमालयाचा मोठा प्रभाव आहे. पर्वताच्या तुमच्या लेखनावरील, विशेषत: ‘हिमालय त्रिपुटका’वरील प्रभावाविषयी सांगा.

नमिता : माझं जन्मनाव नमिता पंत. मी नैनितालमध्ये माझ्या आजीकडे आणि मावश्यांकडे वाढले. त्या परिसराचं निसर्गसौंदर्य, नैनितालच्या मध्यभागी असलेला तो हिरवा तलाव, उत्तुंग पर्वत, हे सर्व माझ्या मनात खोलवर कोरलेलं आहे. कुमाऊच्या खोऱ्याची पार्श्वभूमी असलेल्या माझ्या तीन कादंबऱ्या आहेत. त्याशिवाय ‘माऊंटन एकोज – कुमाऊच्या स्त्रियांच्या आठवणी’ हे माझ्या आजीचं आणि तीन चुलत आज्यांचं मौखिक चरित्र आहे. हे चरित्र साकार करताना केलेलं संशोधन, जिला २०२२ चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला त्या ‘थिंग्ज टू लीव्ह बिहाइंड’ या कादंबरीसाठी उपयोगी पडलं. हिमालयाशी संबंधित लेखनाच्या दोन संग्रहांचं मी संपादन केलं आहे. शिवाय त्या परिसराविषयी आणि त्या विषयाशी संबंधित इतरही स्फुट लेखन केलं आहे. डोंगरदऱ्यांतील साहित्य हे खडबडीत आणि एकाकी असतं. समुद्राच्या समंजसपणापेक्षा, त्याच्या भरती-ओहोटीच्या लयीपेक्षा वेगळं असतं. कुणी तरी म्हटलं आहे, ‘‘मी पर्वतीय नाही, पर्वतच आहे.’’ मलाही तसंच वाटतं.

अर्चना : भारतीय पौराणिक कथांचादेखील तुमच्या लेखनावर ठसा आहे. पौराणिक संदर्भामुळे भारतीय साहित्य अधिक समृद्ध होतं का? त्यामुळे जागतिक साहित्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय लेखकांची एक विशिष्ट वर्गवारी केली जाते?

नमिता : मला असं वाटतं, की पौराणिक कथांची वेगवेगळय़ा संदर्भातून आणि दृष्टिकोनांतून सतत होणारी व्याख्या आणि पुनर्निर्मिती हा भारतीय साहित्याचा गाभा आहे. प्रत्येक पिढीत त्यांचं पुनरुज्जीवन होतं. रामायण आणि महाभारत या पायाभूत ग्रंथांत उपस्थित केलेल्या मूलभूत प्रश्नांकडे वेगळय़ा दृष्टीनं पाहिलं जातं. यात कमीपणा वाटण्यासारखं काही नाही. पाश्चात्त्य साहित्यावर ग्रीक, नोर्स दंतकथांचा असाच प्रभाव आहे आणि त्यामुळे तेदेखील अधिक समृद्ध झालं आहे.  मी ‘द बुक ऑफ शिवा’, ‘द पफिन महाभारत’ आणि लहान मुलांसाठी ‘घटोत्कच’ ही पुस्तकं लिहिली आहेत. शिवाय ‘इन सर्च ऑफ सीता’ आणि ‘फाइंडिंग राधा’ या संकलनांचं संपादनही केलं आहे. याशिवाय पौराणिक कथांवर आणखीही काही लिहिलं आहे आणि पुढेदेखील लिहिण्याची इच्छा आहे.

अर्चना : तुमच्या ‘थिंग्ज टू लीव्ह बिहाइंड’ या कादंबरीला या वर्षीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ही कादंबरी एकाच वेळी ब्रिटिश राजवटीच्या सुरुवातीपासून बदलणाऱ्या काळाचं प्रतिबिंब आहे, एका मनस्वी स्त्रीची कहाणी आहे आणि कर्तव्य व आकांक्षा यातील संघर्षांचं चित्रण आहे. आधुनिक काळाशी हे कथानक कसं जुळून येतं आणि मानवी प्रारब्धावर काय भाष्य करतं?

नमिता : ‘थिंग्ज टू लीव्ह बिहाइंड’ ही प्रामुख्यानं एक प्रेमकथा आहे. ती मानवी मनात खोलवर रुजलेल्या प्रेरणांचा वेध घेते आणि सामाजिक रूढी जेव्हा त्या प्रेरणांवर बंधनं घालतात तेव्हा निर्माण होणाऱ्या संघर्षांचा वेध घेते. सर्वच शाश्वत साहित्यात हा विषय वारंवार येतो. या कादंबरीत भारताचा ब्रिटिश राजवटीशी आलेला संबंध आणि त्या शतकाच्या शेवटी व्यक्त होऊ पाहणारी कोवळी आधुनिकता यांचाही परामर्श घेतलेला आहे. 

अर्चना : सध्या तुम्ही काय लिहीत आहात? कथा-कादंबऱ्यांची कोणती बीजं अंकुरित होण्याची तुमच्या मनात वाट पाहताहेत?

नमिता : मी दोन-तीन प्रकल्पांवर सावधपणे काम करते आहे. माझ्या अत्यंत व्यग्र दिनचर्येतून जसजसा वेळ मिळेल तसतसं काम चालू आहे. त्यापैकी एक संग्रह आहे, एक साहित्येतर विषयावर आहे. बघू कसं जमतं ते! तणावाखाली काम करायला मला आवडत नाही. जसजसं आपोआप होईल तसं करणं अधिक इष्ट असतं.

अर्चना : तुम्ही ‘जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल’च्या संस्थापिका आणि सहसंचालक आहात. ‘माऊंटन एको’ या भूतानमधील लिटरेचर फेस्टिव्हलच्या सल्लागार म्हणूनदेखील तुम्ही काम केलं आहे. आज भारतात अनेक साहित्य महोत्सव साजरे होतात. त्यामध्ये ‘जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल’चं वैशिष्टय़ काय आहे? येत्या काही वर्षांत या महोत्सवाची उद्दिष्टं काय आहेत?

नमिता : साहित्य महोत्सवामुळे पुस्तकं आणि कल्पना, संवाद आणि चर्चा  यांना एक व्यासपीठ प्राप्त होतं. शिवाय वाचक आणि लेखक यांना ते एकत्र आणतात. भारतासारख्या बहुभाषिक संस्कृतीत लेखकांना एकमेकांशी संवाद साधण्याची ते संधी देतात. शिवाय भाषांतराला त्यामुळे चालना मिळते. ‘जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल’ हा अनेकांच्या सहकार्यानं साकारलेला प्रकल्प आहे. मी सहभागी असलेल्या सर्वच महोत्सवांमध्ये मी अंत:प्रेरणेनं काम करते. प्रकाशक आणि पुस्तकांच्या जगातील मित्रमैत्रिणी मला पुस्तकं पाठवतात, महोत्सवाच्या सत्रांसाठी कल्पना सुचवतात. शक्य होईल तितकं मी त्यांचं ऐकते.

अर्चना : भारतात निर्माण होणाऱ्या इंग्रजी आणि भारतीय भाषांतील साहित्याविषयी तुमचं काय मत आहे? जागतिक साहित्याच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला भारतीय साहित्य कसं वाटतं?

नमिता : इंग्रजी हीसुद्धा एक भारतीय भाषा आहे आणि भारतीय लेखकांनी ती त्यांच्या सोयीनुसार घडवली आहे. जागतिक व्यासपीठाविषयी मला विशेष कर्तव्य नाही. आपण आपल्याच कथा ऐकल्या आणि समजून घेतल्या पाहिजेत- आपल्याच भाषा आणि बोलींमध्ये.

अर्चना : तुमचं आडनाव अस्सल मराठी आहे. महाराष्ट्राशी तुमचा काय संबंध आहे? तुम्हाला मराठी येतं का? कोणते मराठी लेखक तुमच्या आवडीचे आहेत?

नमिता : लग्नापूर्वी माझं नाव नमिता पंत होतं. माझे पूर्वज सोळाव्या शतकात हिमालयातील कुमाऊ भागात स्थलांतरित झाले. आमचा वंशवृक्ष जवळजवळ अठरा पिढय़ा मागं जातो. जयदेव पंत हे आमचे पूर्वज कोकणातून निघून हा लांबचा प्रवास करून उत्तरेत आले. वयाच्या अठराव्या वर्षी माझं राजीव गोखले यांच्याशी लग्न झालं. तरुण वयातच त्यांचं निधन झालं आणि माझ्या मुलींना घेऊन मी माहेरी माझ्या आई-वडिलांकडे राहायला आले. कुटुंबातील एक सदस्य म्हणून माझी ओळख मला तेव्हाही आणि आताही अत्यंत महत्त्वाची वाटते. माझे सासरे इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री होते. माझी दिवंगत नणंद सुनंदा भंडारे या दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश होत्या. या कुटुंबाशी माझे अजूनही जवळचे संबंध आहेत. मला मराठी वाचता येत नाही, पण अनेक वर्षांपूर्वी मी रणजित देसाई यांचे अभिजात पुस्तक ‘श्रीमान योगी’ समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. विक्रांत पांडे यांनी केलेल्या सुंदर इंग्रजी भाषांतरासाठी मी ब्लर्ब लिहिला होता. ‘निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी’ या त्यात उद्धृत केलेल्या ओळी मला फार आवडतात. अर्चना : गेल्या शतकातील वाचकापेक्षा आजचा वाचक हा फार वेगळा आहे. त्याच्यावर चोहीकडून विविध माध्यमांतून आशयाचा मारा होतो आहे. या वेगानं बदलणाऱ्या जगात लेखन, साहित्य आणि पुस्तकं यांविषयी तुमचं काय मत आहे?

नमिता : आपण सगळे एकमेकांसाठी कथाच असतो. पुस्तकं टिकून राहतील आणि आपलं आयुष्य समृद्ध करत राहतील. पुस्तकांचं रूपांतर महत्त्वाचं आणि फायदेशीर आहे. ध्वनिमुद्रित पुस्तकांच्या प्रचंड शक्तीवरदेखील माझा विश्वास आहे. वाचनाला त्यानं एक नवं परिमाण लाभतं. तंत्रज्ञान आणि बदल यांची मला भीती वाटत नाही. ते साहित्याला आणि आपल्या एकत्र अनुभवाला नवं आणि अनपेक्षित परिमाण देतील, असं मला वाटतं.  archanamirajkar@gmail.com