डॉ. शुभांगी पारकर

आयुष्याच्या संध्याकाळी पैलतीरावर अलगद पोहोचण्यासाठी मानवी नात्याचा साकव महत्त्वाचा ठरतो, पण अनेकदा त्याचीच कमतरता असते. तुम्ही तरुणपणी कशाकशात गुंतवणूक करता यावर म्हातारपण किती सुखाचं जाणार हे ठरत असतं. म्हणूनच आपल्या देशात वृद्धांच्या होणाऱ्या आत्महत्या अस्वस्थ करतात. आयुष्याचा संधीकाल काळाकुट्ट होऊ नये यासाठीच आयुष्याची दुपार लख्ख असावी लागते..

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू

जेव्हा आपल्यापैकी बहुतेक जण आत्महत्येविषयी बोलतात, तेव्हा खूप लहान किंवा वृद्धांविषयी फारसा विचार केला जात नाही. तरीही आपल्याला माहीत आहे, की अगदी ५ वर्षांपेक्षा कमी वयाची मुलंही आत्महत्या करतात आणि साठीनंतरचे वृद्धसुद्धा आत्महत्या करतात.माणसाच्या आयुष्यातला संधीकाळ हा संक्रमणाचा काळ असतो. अनेक प्रकारच्या नुकसानीचा काळ असतो. आयुष्याच्या उत्तरार्धात होणारी आत्महत्या ही जागतिक सार्वजनिक आरोग्याची चिंताजनक बाब आहे. भारतात वृद्धांमधील आत्महत्येवर कमी संशोधन झालं आहे. तसं पाहिलं, तर ज्येष्ठ नागरिकांच्या आत्महत्या हा वृद्ध रुग्णांबरोबर काम करणाऱ्या मनोचिकित्सक आणि इतरांसाठी आव्हानात्मक विषय आहे. म्हातारपण तसंही माणसाच्या जीवनात घडणाऱ्या सर्व गोष्टींपैकी अनपेक्षित असतं. एका तत्त्ववेत्त्यानं म्हटलं आहे, की वृद्धत्व अशी काही गोष्टच नसते, तिथे फक्त दु:खच ठेवलेलं असतं.

शंकरकाका सत्तरीला पोहोचलेले गृहस्थ. मुंबईच्या सुस्थापित विभागात आपल्या पत्नीसह राहात होते. उच्चशिक्षित आणि पेशानं प्राध्यापक म्हणून जवळजवळ तीसेक वर्ष काम करून पंधरा वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. त्यांची मुलगी आणि मुलगा दोघंही उच्च शिक्षण घेऊन अमेरिकेत आपापला संसार थाटून स्थिरावले होते. सुरुवातीला अनेक वेळा मुलांकडे परदेशवारी करून त्यांचं भरभराटीचं आयुष्य पाहून दोघंही सुखावले होते. त्या दोघांनी मुलांकडून कधी पैशाअडक्याची मदत घेतली नव्हती, पण कमीत कमी दरवर्षी आपल्या कुटुंबाची एकत्र भेट व्हावी ही त्यांची आपल्या मुलांकडून मागणी होती. इतकी वर्ष मुलांना शिकवून व्यवस्थित स्थिरस्थावर करायचं या उद्देशानं त्यांनी आपल्या आवडीनिवडीच्या गोष्टींना कात्री लावून निगुतीनं संसार केला होता. आता मुलांच्या जबाबदाऱ्या संपल्या म्हणून मित्रमंडळींबरोबर छोटया-मोठया भेटीगाठी आणि सहलींत त्यांचा वेळ चांगला जात होता. पाच वर्षांपूर्वी शंकरकाकांना पक्षाघाताचा झटका आला आणि एक बाजू लुळी पडली. बोलता येईना, व्यक्त होता येईना, तोंडातलं अन्नही बाहेर ओघळायला लागलं. अशी गलितगात्र अवस्था झाली, तेव्हा शंकरकाका आणि उमाकाकूंना आपली मुलं जवळपास, आपल्या अवतीभोवती असावीत असं प्रकर्षांनं वाटू लागलं होतं. पण त्या दोघांची आपापली घरटी तयार झाली होती. मुलं आठवडयातून जवळजवळ तीन-चार वेळा व्हिडीओ कॉल करायची, त्यांनी शंकरकाकांना सांभाळायला सकाळ-दुपार नर्सही ठेवली होती. पण या दोघांची प्रेमाची भूक काही केल्या भागत नव्हती. तशात उमाकाकूंचा रक्तदाब वाढायला लागला होता. संसाराची एकेकाळी पूर्ण जबाबदारी घेणारे शंकरकाका अलीकडे सहकार्य करत नव्हते. आजारामुळे त्यांची चिडचिड वाढायला लागली होती. एकंदरीत परिस्थिती काकूंना भावनिकदृष्टय़ा पेलत नव्हती. त्यांना प्रचंड एकाकी वाटू लागलं. आपली मुलं आता आपल्याला भावनिक आधार देत नाहीत याचं दु:ख त्यांच्या मनात दाटू लागलं होतं. रात्र रात्र झोप येईना. मन तळमळत होतं. आतल्या आत हुंदके दाटत होते. त्यांच्या सततच्या भावुक होण्याला कंटाळून दोन्ही मुलांनी त्यांना सरळ सांगून टाकलं, की घरातली ही परिस्थिती आता दीर्घकाळ राहील आणि त्यांनी आता या परिस्थितीशी जुळवून घ्यायला हवं. काही दिवसांनी मुलगा आणि सून भारतात आले, त्या वेळी ते जेव्हा उमाकाकूंना माझ्याकडे घेऊन आले, तेव्हा काकूंना गंभीर नैराश्य आल्याचं मी सांगितलं. आता अशा नाजूक अवस्थेत त्यांना भावनिक आधाराची खूप गरज आहे, याची जाणीवही करून दिली. त्या वेळी, असे काही वृद्धाश्रम आहेत का, जिथे त्या दोघांनाही भावनिक विरंगुळय़ासाठी ठेवता येईल, याची चौकशी मुलांनी केली. पैशांची काहीच समस्या नाही असंही त्यांनी ध्वनित केलं. यानंतर त्यांची आपसात बोलणी झाली असावीत. मुलं अमेरिकेत जायच्या दोन दिवस आधी उमाकाकू खूपच अस्वस्थ झाल्या. मुलं आता आपल्याला सोडून जाणार या एकाच विचारानं त्यांना इतकं निराश केलं की त्यांनी सरळ विषाचा प्याला जवळ करून स्वत:चा शेवट करून घेतला.

एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यास कारणीभूत असलेले अनेक घटक आहेत. बऱ्याचदा असं जाणवतं, की जेव्हा लोक वृद्ध होतात तेव्हा ते सामाजिकदृष्टया अदृश्य होतात. त्यांची भावनिक व शारीरिक गरज त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात येत नाही किंवा जाणीवपूर्वक ते त्याकडे दुर्लक्ष करतात. कदाचित आजची पिढी स्वत:च्याच क्लिष्ट जीवनात इतकी गुंतली आहे, की आपल्या वयोवृद्ध नातेवाईकांच्या अस्तित्वालाच ते नाकारत आहेत की काय असं अनेकदा वाटू लागतं. बऱ्याचदा नातेवाईक सांगतात, की ‘अहो त्यांचा संसार पूर्ण झाला, संपलं आता त्यांचं आयुष्य. आमचं सगळं अजून व्हायचं आहे. त्यांनी समजून नको का घ्यायला?’ वृद्धांमधील आत्महत्या रोखण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोन आज गरजेचा आहे. वृद्धांच्या आयुष्यातला एकटेपणा कमी करण्यासाठी अधिकाधिक मानवी संपर्क असणं आवश्यक आहे. प्रत्यक्ष भेट देणं, फोनवर बोलणं, त्यांना घराबाहेर नेऊन इतर नातेवाईकांत वा समवयस्क मित्रमंडळींत रममाण होण्यास मदत करणं, हा एकटेपणाचा सामना करण्यासाठी उपयुक्त मार्ग आहे.

नारायणरावांचा स्वभाव हसतखेळत लोकांमध्ये रमणारा. त्यांना विनोदवीरच म्हणत असत! कधी ‘पीजे’, कधी निखळ विनोद करून स्वत:ही खळखळत हसायचे. अवतीभोवतीच्या लोकांमध्ये हास्याचं कारंजं निर्माण करायची विलक्षण कला त्यांना अवगत होती. सतत आनंदी चेहरा घेऊन चार माणसांत वरचष्मा ठेवणारा हा आनंदी माणूस ‘आयुष्यात कठीण समय येतात, पण जगणारा कसाही जगून दाखवतो,’ अशी ऐट बाळगून वावरत असे. एकंदरीत स्थिरावलेला सुखासीन संसार होता त्यांचा. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांना यकृताचा आजार झाला आणि आनंदाच्या शिखरावरून ते झपझप कसे खाली कोसळत गेले हे त्यांना आणि इतरांनासुद्धा कळलं नाही. आपली ही अशी असहाय, हताश, अगतिक अवस्था खरंच झालीय, की आपण स्वत:लाच असं पराभूत झालेलं पाहात आहोत.. त्यांना काही सुचत नव्हतं. मन बधिर झालं होतं. आपलं रूप, आपला रुबाब, आपली ऐट, सगळंच गमावून बसलेल्या नारायणरावांना जिण्यावर धिक्कार वाटू लागला होता.

आपण काय होतो आणि काय झालो आहोत आणि पुढे काय होईल हे कुणालाही सांगता येत नाही. आयुष्यातल्या अनेक जखमा एकाकीपणानंच अनुभवाव्या लागतात. आयुष्यात घडत जाणाऱ्या बदलांच्या अमुक एक दिशा नसतात. एका बाजूनं संकटांचा पहाड कोसळत असतो, तेव्हा तुम्हाला दुसऱ्या बाजूनं स्वत:ला कसं अलगद बाहेर काढायचं ते जमलं नाही, तर तुम्ही बाहेर येणारच नाही. नारायणरावांबाबतीत तेच घडलं. त्यांच्या ते लक्षातच आलं नाही. त्यांना पराभूत वाटू लागलं. त्यांनी ‘ती’ रात्र तळमळत काढली आणि पहाटे उठून बिल्डिंगच्या गच्चीवर गेले आणि तिथून सरळ खाली उडी घेतली. खरं तर त्यांनी आपण किती चांगलं आयुष्य जगलो होतो याचा सकारात्मक विचार केला असता, तर बचावाची आशा राहिली असती. पण ते ना त्यांना समजलं ना कुणी त्यांना समजावून दिलं.

काही आरोग्यदायी अपवाद वगळता म्हातारपण हा अनेक प्रकारातील नुकसानाशी संबंधित कालावधी आहे. तीव्र कायिक आजारांचा कळस गाठला जातो, बिघडत जाणारी संवेदनाक्षम कमजोरी आयुष्य गलितगात्र बनवत असते. याचा एखाद्या व्यक्तीच्या जीवनाच्या गुणवत्तेवर लक्षणीय परिणाम घडू शकतो. स्मृतिभ्रंशासारख्या आजारांत बिघडणारी आकलनशक्ती अनेकदा प्रभावित व्यक्तींमध्ये चिंता निर्माण करते, कारण त्यांना स्वतंत्रपणे करता येणाऱ्या गोष्टींमध्ये अडथळा यायला लागतो. अशा स्थितीत स्वत:च्या स्वाभिमानाला तिलांजली देत दुसऱ्यावर अवलंबून राहावयास लागलं, तर होणारी मानहानी कित्येक जणांचं स्वत्व पणाला लावते. याव्यतिरिक्त वृद्ध व्यक्तींना मर्यादित उत्पन्नात वाढत्या आरोग्य सेवा आणि खर्चाचा सामना करावा लागतो, म्हणून आर्थिक समस्या असू शकतात. या अडचणी असूनही अनेक स्वाभिमानी ज्येष्ठ त्यांच्या कुटुंबावर किंवा मित्रांवर आर्थिक बोजा पडेल या भीतीनं सग्यासोयऱ्यांशी संवादच टाळतात आणि एकटे पडतात. आत्महत्येचे विचार मनात येणं हा वृद्धत्वाचा नैसर्गिक आणि सर्वसामान्य भाग आहे, या गैरसमजासह बरेच ज्येष्ठ नागरिक व्यावसायिक मदत घेण्याचं टाळतात.

श्रीधरपंत आयुष्याच्या उभरत्या काळात स्वत:च्या गुर्मीत जगले. बायकोमुलांची पर्वा कधी केली नाही. मनमुराद स्वातंत्र्याचा बिनदिक्कत अनुभव घेत उन्मादानं भरलेलं आयुष्य जगताना सूर्य कधी मावळला ते त्यांना कळलं नाही. जेव्हा ते परत आपल्या कुटुंबाकडे आले तेव्हा कर्तव्य म्हणून कुटुंबानं श्रीधरपंतांना सांभाळायचं ठरवलं. पण पश्चात्तापानं दग्ध झालेल्या त्यांना गणगोतांचा विशुद्ध भावनिक ओलावा मिळाला नाही. अंतर्यामी ते प्रेमासाठी तहानलेले राहिले आणि त्या निराशेत त्यांनी आत्महत्या केली.

आयुष्याच्या संध्याकाळी मानवी नात्याचा साकव पैलतीरावर अलगद पोहोचायला महत्त्वाचा ठरतो. मृत्यू हे सत्य आहे, पण त्याच्याबरोबर जाताना मन किती शांत आणि समाधानी आहे यावर आपला शेवट सुखकारक होईल की नाही हे ठरत जातं. भावनिक कोंडी, असहाय्य करणारे शारीरिक आजार, मानसिक रोग, आर्थिक विवंचना, एकाकीपणा असे अनेक घटक ज्येष्ठांच्या आत्महत्येसाठी जोखमीचे ठरतात. वृद्धत्वामधलं नैराश्य, पूर्वी झालेलं व्यक्तिमत्त्व विकाराचं (पर्सनॅलिटी डिसऑर्डर) निदान, तरुणपणी केलेला आत्महत्येचा प्रयत्न, जोडीदाराचा गंभीर आजार वा मृत्यू, कौटुंबिक कलह, या गोष्टी जोखमीच्या ठरतात.

अनेक प्रकरणांमध्ये ज्येष्ठांचा मृत्यू जाणुनबुजून केलेल्या कृत्यामुळे होत असतो. जसं- जीव वाचवणाऱ्या औषधांचं अति प्रमाणात सेवन करणं किंवा ती न घेणं, अपघात किंवा ऐच्छिक पडझड इत्यादी. आत्महत्या खरंच केली आहे की नाही हे निर्धारित करणं अनेकदा कठीण जातं. आधुनिक वैद्यकीय शास्त्रात वृद्ध जेव्हा जाणीवपूर्वक जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या गोष्टी, पाणी व अन्न घेणं थांबवतात आणि हेतूपूर्वक मृत्यूला कवटाळतात, तेव्हा आपला मृत्यू घाईघाईनं यावा हा त्यांचा प्रयत्न असू शकतो. कधी भयानक आजार झाले की भूक लागत नाही माणसाला. पण वारंवार मृत्यूविषयी बोलणारी व्यक्ती जेव्हा तसा प्रयत्न करते तेव्हा ‘व्हीएसईडी’शी Voluntarily stopping eating & drinking संबंधित आत्महत्या असते. काही देशांत, धर्मात तिला सामाजिक मंजुरी आहे.

जेव्हा रुग्ण नैराश्याची वा आत्महत्येची भाषा करू लागतात, तेव्हा त्यांच्या जीवनात त्यांना कशामुळे अर्थपूर्ण वाटेल आणि आयुष्याच्या शेवटी वैद्यकीय सेवेसाठी शेवटी आरोग्याच्या दृष्टीनं त्यांचं प्राधान्य कशाला असावं, याबद्दल गंभीर संभाषण सुरू केलं पाहिजे. सार्वजनिक आरोग्यात वृद्धत्वाची स्थिती (ageism) ही मनोकायिक क्षयाची स्थिती म्हणून ओळखली जाते. त्यामुळे एक नकारात्मक, उपहासात्मक असं वृद्धत्वाचं दर्शन घडवलेलं दिसतं. केवळ जगणं महाकठीण आणि वेदनायुक्त आहे, म्हणून आत्महत्या ज्येष्ठांसाठी तर्कसंगत (Rational)आणि मानवी हक्कांची निवड मानता येणं कठीण आहे. मरणाची इच्छा आणि जगण्याची इच्छा यांच्यातलं संतुलन गतीशील आहे, जे वारंवार, क्षणोक्षणी बदलत राहातं. ज्येष्ठांमधले वृद्धत्वाचे परिणाम आणि मृत्यूबद्दल त्यांना असलेली भीती ओळखणं, त्यांना परिस्थितीचा साकल्यानं विचार करण्यासाठी मदत करणं, त्यांना आशा देण्याचा आणि त्यांच्या जीवनाचं मूल्य आहे याची पुष्टी करण्याचा प्रयत्न करणं वर्तमान परिस्थितीत आवश्यक आहे. पाश्चिमात्य संस्कृतीत तर्कशुद्ध आत्महत्येबद्दल सामाजिक दृष्टिकोन बदलू लागला आहे, ज्याला ज्येष्ठ रुग्ण स्वायतत्तेच्या चळवळीचा परिणाम म्हणून पाहातात. डिमेंशिया होण्यापेक्षा आत्महत्या करू इच्छिणाऱ्या एखाद्याच्या विश्वासाचा आदर आणि समर्थन कसं करायचं, हा नैतिकदृष्टय़ा अत्यंत किचकट प्रश्न आहे. शिवाय वृद्धांमधल्या मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे अनेकदा दुर्लक्ष केलं गेलं आहे. बहुतेकदा असं मानलं जातं, की वृद्धांमध्ये ही निराशाजनक लक्षणं नित्याचीच असू शकतात. अमेरिकेत वृद्धांच्या आत्महत्येचा दर ४० टक्के किंवा त्याहून अधिक आहे. त्याला ‘मूक आत्महत्या’ म्हणून संबोधतात. यामध्ये ओव्हरडोस, स्वत: लादलेली उपासमार आणि निर्जलीकरण, तसंच अपघात यांचा समावेश होतो. या वयोगटातलं आत्महत्येचं प्रमाण वापरलेल्या पद्धतींच्या मारकतेमुळे जास्त आहे. आयुष्याच्या संध्यासमयी आदरणीय ज्येष्ठांच्या मनात आत्महत्येचे विचार येणं हे खरं तर समाजमनाच्या नैतिक मूल्यांवर प्रश्नचिन्ह उभं करणारं आहे. या विषयाचा नातेवाईकांनी आणि ज्येष्ठांनीही खुलेपणानं विचार करायला हवा. किंबहुना तरुणपणापासूनच विचार व्हायला हवा.
pshubhangi@gmail.com