scorecardresearch

मागे राहिलेल्यांच्या कथा-व्यथा: चक्रव्यूह.. जरा जपूनच!

किशोरावस्थेतल्या मुलांच्या बहुतेक आत्महत्यांमागची कारणं शिक्षण आणि करिअरशी संबंधित असतात.

डॉ. शुभांगी पारकर
किशोरावस्थेतल्या मुलांच्या बहुतेक आत्महत्यांमागची कारणं शिक्षण आणि करिअरशी संबंधित असतात. या आत्महत्या टाळण्यासाठी पालक आणि शिक्षकांची मुलांच्या बाबतीतली संवेदनशीलता फार महत्त्वाची ठरते. परीक्षा म्हणजे संपूर्ण जीवन नव्हे, तर त्याचा एक भाग आहे आणि माणसावर कितीही कठीण प्रसंग आला, तरी खंबीरपणे त्याला तोंड देत, प्रसंगी इतरांच्या साथीनं त्यातून बाहेर येणं शक्य आहे, हे मुलांच्या मनावर लहानपणापासूनच वेगवेगळय़ा प्रकारे ठसवणं आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्येचा या वर्षीच्या ‘राष्ट्रीय युवा दिना’च्या निमित्तानं आढावा घेतला, तर तो धक्कादायक असाच म्हणावा लागेल. ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो’च्या (एनसीआरबी) आकडेवारीनुसार भारतात दर तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो. १९९५ पासून आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार १.८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात २०२० मध्ये सर्वात जास्त संख्येची नोंद झाली आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न अधिकाधिक गंभीर होत चालला आहे. प्रत्येक वर्षी या प्रकरणांमध्ये सातत्यानं वाढ होत चालली असल्यामुळे त्याचा शास्त्रीय आणि मनोसामाजिक पातळीवर वेध घेणं महत्त्वाचं ठरतं. २०२० मध्ये विद्यार्थ्यांच्या झालेल्या १२,७२६ आत्महत्यांपैकी जवळपास ५३ टक्के आत्महत्या महाराष्ट्र, ओडिशा, मध्य प्रदेश, तमिळनाडू, झारखंड आणि कर्नाटक राज्यांत झाल्या होत्या. आपण मागच्या लेखात (७ मे) वाचलेल्या गोष्टीत समीर या किशोरवयीन मुलाच्या आई-वडिलांनी उत्तम करिअर घडण्यासाठी त्याच्यामागे कडक शिस्तीचं वेळापत्रक लावलं होतं आणि त्यात समीर हळूहळू मनानं विझून गेला होता. परीक्षा झाल्यावरही त्याची मानसिक स्थिती सुधारली नाही, उलट तो आत्महत्येच्या वाटेवर गेला. समीर आणि तशा प्रकारे होणाऱ्या इतर विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांकडे पाहताना विद्यार्थिदशेत अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. किशोरावस्था हा मानवी जीवनातला विकासाचा सर्वात तणावपूर्ण आणि गतिमान, गंभीर बदलाचा काळ आहे. या वयातल्या मुलांना जैविक, मानसिक आणि सामाजिक ताणतणावांना सातत्यानं सामोरं जावं लागतं. शिवाय किशोरवय हे मानसिक विकारांची सुरुवात होण्याचा तसाही निसर्गत: एक दुबळा काळ आहे. किशोरवय- म्हणजे १३ ते १९ वर्ष वयोगटातल्या मुलांमध्ये शरीराच्या वाढीचा वेग आणि हॉर्मोनल (संप्रेरकीय) बदल उच्च स्तरावर होत असतात. मानसिक आणि शारीरिक वाढ जवळजवळ संक्रमणाच्या गतिशील अवस्थेतून जाणाऱ्या महत्त्वाच्या टप्प्यावर असते. या काळात सामान्य पातळीवर अल्लड, नादान, निरागस आणि अज्ञानाच्या स्थितीतून अचानक ज्ञान, जाणतेपणा, जबाबदारी आणि प्रगल्भता याची अतिरिक्त मागणी मुलांकडून केली जाते. एका लेखकानं म्हटलं आहे- Make no mistake, adolescence is a war. No one gets out unscathed. अर्थात पौगंडावस्था हे एक महायुद्धच आहे. त्यातून कुणीही सहीसलामत बाहेर येऊ शकत नाही. त्यात अनेक चक्रव्यूह आहेत. शिक्षणाचा चक्रव्यूह, नात्यांचा चक्रव्यूह, आकाक्षांचा चक्रव्यूह, आकर्षणाचा चक्रव्यूह, व्यसनांचा चक्रव्यूह.. यातून बाहेर येताना कौशल्य, प्रगल्भता आणि भावनिक आधाराची गरज सगळय़ांनाच लागते. या संधिकालात सामाजिक गणितं चुकली, मानसिक नेम चुकले आणि भावनिक तोल ढासळला, तर पुढच्या आयुष्याच्या मनोऱ्याचा पायाच कच्चा होतो. यामुळे या सगळय़ा गोष्टींचा सुवर्णमध्य या कमकुवत काळात कसा साधायचा याचा विचार या मुलांना सांभाळणाऱ्या वडिलधाऱ्यांनी डोकं शांत ठेवून केलेला बरा.
२०१४ ते २०२१ च्या काळात डोकं भणाणून सोडणारी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना दिली होती. या काळात आत्महत्या केलेले १२२ विद्यार्थी ‘आयआयटी’, ‘आयआयएम’, केंद्रीय महाविद्यालयं आणि इतर उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत होते. यातले २४ विद्यार्थी अनुसूचित जाती, ४१ मागासवर्गीय आणि ३ अनुसूचित जमातीचे होते. यासाठी ‘मनोदर्पण’ या प्रकल्पाची सुरुवात करून पालक, शिक्षक आणि विद्यार्थिवर्गाला मानसिक, भावनिक आधार देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यांच्यामधला मानसिक आजार- विशेषत: डिप्रेशन (नैराश्य) व अँक्झायटी (चिंता) या गोष्टी लवकरात लवकर ओळखल्या जाव्यात आणि त्यांच्यावर उपचार केले जावेत, यासाठी योजना राबवल्या गेल्या. हे सगळं ‘काहीच न करण्यापेक्षा काही तरी केलेलं बरं’ अशा प्रकारचं काम दिसून येतं. तहान लागली की विहीर खणण्यासारखं ते प्रकरण आहे.
शैक्षणिक क्षेत्राचा मानसिक आरोग्याशी कसा आणि किती खोल संबंध आहे, याचा विचार आजही आपल्या देशात झालेला दिसत नाही. मुलांचे तणाव शिक्षण क्षेत्रातले असले, तरी वेगवेगळय़ा प्रकारचे असतात. मध्यंतरी कडप्पा जिल्ह्यातल्या १७ वर्षांच्या ‘इंटरमीडिएट’ विद्यार्थ्यांनं एका खासगी महाविद्यालयात असताना वसतिगृहाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी वाचण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार हा विद्यार्थी कॉलेजनं घेतलेल्या अंतर्गत परीक्षेत चांगले गुण मिळवू न शकल्यानं त्याला त्यानंतर दुसऱ्या विभागात हलवण्यात आलं होतं. विभागात हा जो बदल झाला, त्यामुळे त्याचं नैतिक खच्चीकरण झालं असणारच, शिवाय कॉलेजच्या दबावामुळे त्याच्या पालकांनीही त्याला चांगलंच फटकारलं होतं. त्यामुळे आत्महत्येच्या दुर्दैवी प्रसंगापूर्वी तो मानसिकदृष्टय़ा प्रचंड नैराश्यात वावरत होता. त्या वेळी त्याला समजून घेणारं आणि भावनिक आधार देणारं जवळचं कोणी नव्हतं. पालक त्याच्यावर आग पाखडून त्याला तसंच एकटय़ाला वसतिगृहात सोडून रागारागानं निघून गेले होते. त्याचे मित्र आपापल्या अभ्यासात गुंतलेले होते आणि शिक्षक इतके संवेदनशील नव्हते. कोणाच्याच लक्षात आलं नव्हतं, की तो आतून इतका ढासळला असेल. त्याच्या खोलीत सापडलेल्या ‘सुसाइड नोट’मध्ये त्यानं लिहिलं होतं, की शैक्षणिक दबाव सहन न झाल्यानं तो आपलं जीवन संपवत आहे. त्यानं त्यात असंही म्हटलं होतं, की त्याच्या पालकांचं त्याच्याबद्दलचं स्वप्न पूर्ण करण्यात तो पूर्णपणे अपयशी ठरला असल्यामुळे त्याच्या जीवनात आता जगण्यालायक काही उरलं नव्हतं.
प्रत्येक वेळी आपण जेव्हा एखाद्या विद्यार्थ्यांनं आत्महत्या केल्याची बातमी ऐकतो, तेव्हा त्याचं शैक्षणिक अपयश वा परीक्षेत नापास होणं हेच कारण गृहीत धरतो. विद्यार्थी आत्महत्या का करतात? पारंपरिकदृष्टय़ा सर्वसामान्यपणे लोकांना वाटतं, की ती मुलं मनानं भित्री असावीत, जगायला घाबरत असावीत, त्यांनी परीक्षेसाठी अभ्यास केला नसणार किंवा कधी कधी आपल्या पालकांना लज्जास्पद वाटू नये म्हणून त्यांनी आत्महत्या केली असणार. पण आत्महत्या कधी अचानक होत नाहीत. यांपैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आधीसुद्धा अनेक समस्यांचा सामना केला असणार. याचा अर्थ परिस्थितीशी सामना करण्याच्या त्यांच्या क्षमतेमध्ये समस्या असावी. त्यांना स्वत:ची समस्या व्यक्त करता आली नसावी, दुसऱ्या कुणाला ती जाणवली नसावी किंवा कदाचित या विद्यार्थ्यांना प्रियजनांकडून मदत मागता आली नसावी.
पालक आणि शिक्षकांना अशा आपल्या पाल्यांच्या वा विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर अत्यंत दुखं वाटतं, खूप धास्ती वाटते. वर उल्लेखलेल्या समीरच्या आत्महत्येनं त्याचे पालक जितके हादरले नाहीत, त्याच्या किती तरी पट ते त्याच्या निकालानंतर हादरले होते. कारण समीरला ९२ टक्के गुण मिळाले होते. शंकाच नाही, की समीर दहावी-बारावीच्या काळात घरातल्या श्वासरोधक वातावरणात घुसमटला होता. ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधान
नरेंद्र मोदींनी एक चांगली संकल्पना मांडली होती, की ‘आपण परीक्षेला आयुष्याचा एक सर्वसामान्य भाग मानलं पाहिजे. असं खरोखर घडलं तर मुलांना गुदमरून टाकणारा दबाव येणार नाही.’ अर्थात तसं घडत नाही. समीरच्या बाबतीत आणि अशा अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत आई-वडिलांसह संपूर्ण शैक्षणिक यंत्रणा त्यांची गळचेपी करत राहते. समीरचे आईवडील त्याच्या आत्महत्येनंतर इतके धास्तावले होते, की त्याच्या लहान भावाच्या- मिहिरच्या बाबतीत आपण काय करायला पाहिजे आणि कसं वागायला पाहिजे, हेच त्यांना समजत नव्हतं. ते गोंधळले होते. ‘आता मिहिरला जे काही करायचं ते स्वत:हून करू दे, आपण मध्ये मध्ये करायचं नाही,’ अशा प्रकारे त्यांनी मिहिरच्या अभ्यासातून अंगच काढून घ्यायचं ठरवलं. एकाएकी एका ध्रुवावरून दुसऱ्या ध्रुवावर उडी मारली. हल्ली असे अनेक पालक आहेत, जे मुलं आत्महत्या करतील म्हणून घाबरून सर्वसाधारण गोष्टी- जिथे पालकांनी लक्ष देणं आवश्यक आहे, नाही तर मुलं भिरभिरतील, तिथेही लक्ष देत नाहीत. त्यांची स्वत:चीच परिस्थिती दिशाहीन भरकटलेल्या वाटसरूसारखी झालेली असते. या पालकांसाठी मराठीत एक सुंदर, व्यवहारी म्हण आहे- ‘अति तेथे माती’.
प्रतिभा ही माझी एक रुग्ण दहावीत एका विषयात नापास झाली आणि तिच्या मनात आत्महत्येचे विचार आले, म्हणून तिच्या अशिक्षित आईनं तिला आमच्याकडे समुपदेशनासाठी आणलं. तिच्या मनातून ते विचार माझ्या समुपदेशनानंतर गेले. तिची आई भाजीवाली होती. तीही मुलीला म्हणाली, ‘‘आम्ही कुठं शिकलो? पण जगतोय ना आनंदात, श्रम करत? तूही श्रम कर. मग जगणं सोपं होईल की..’’ प्रतिभा दुसऱ्यांदाही नापास झाली- चार गुणांनी, इंग्लिशमध्ये. कच्चं होतं तिचं इंग्लिश. पण ती माझ्यासाठी गुलाबाची फुलं आणि बरोबर मिठाई घेऊन आली होती. मला वाटलं, उत्तीर्ण झाल्याची गोड बातमी ती घेऊन आली आहे; पण तिनं मला आश्चर्याचा गोड धक्का दिला. ती म्हणाली, ‘‘डॉक्टर, मी पुन्हा परीक्षेत नापास झाले, पण मला आत्महत्या करावीशी नाही वाटली या वेळी. मला आत्मविश्वास आहे, की मी काही तरी करीन.’’ तिनं पुढे ब्युटिशियनचा कोर्स केला. स्वभावानं लाघवी असल्यामुळे उत्तम व्यवसाय केला आणि नंतर ‘बी.ए.’, ‘एम.ए.’ही केलं. पालकांनी मुलांना परीक्षेचा ताण आणि निराशेचा सामना कसा करायचा हे सुरुवातीपासूनच शिकवायला हवं. किशोरवयीन वय हे पूर्वीपेक्षा आव्हानात्मक झालं आहे. अलीकडच्या भारतीय संशोधनात असं दिसून येत आहे, की विद्यार्थ्यांचा ताणतणाव जास्त प्रमाणात वाढण्याचं कारण म्हणजे पालकांच्या उच्च अपेक्षा, भविष्याबद्दल मुलांच्या मनात असणारी असुरक्षित भावना आणि डोक्यावर करिअरची चिंता. मुलांच्या शैक्षणिक प्रवासात त्यांच्यातला आत्मविश्वास कमी झाला आणि त्यांना मानसिक आधार कमी मिळाला तर या मुलांचं नैतिक खच्चीकरण अधिक होतं. त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना, नैराश्याचा आजार आणि भविष्याबद्दलचे नकारात्मक विचार वृद्धिंगत झाले, तर आत्महत्येचं प्रमाणही या मुलांमध्ये वाढत जातं. भावुक आणि संवेदनशील मुलांना शिक्षणाचा तणाव जाणवला, की मनोचिकित्सकांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या केवळ आत्महत्याच होणं टळणार नाही, तर मुलांच्या नैराश्यावर उपचार झाल्यानं त्यांची समग्र मानसिक क्षमता वाढेल आणि कठीण परिस्थितीचा सामना करण्यास ती सज्ज होतील. भविष्यात कुठल्याही क्षेत्रात तग धरतील. तर पालकांनो आणि शिक्षकांनो, वेळीच सावध व्हा.
pshubhangi@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Stories those left behind chakravyuh just careful behind suicides teaching career spinach teachers amy

ताज्या बातम्या