-डॉ. भूषण शुक्ल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या जवळची व्यक्ती आजारी असली की तिची काळजी वाटणं साहजिकच आहे. मात्र त्याचं दडपण घेऊन सगळी कामं सोडून घरी बसणं त्या आजारी व्यक्तीलाही आवडणारं नसतं. पण अतिसंवेदनशील मुलं आजारपणाचा थेट मृत्यूशी संबंध जोडून भयभीत होतात. संकल्पचं असंच झालं. आजी आजारी आहे हे कळल्यापासून भयानं त्यानं शाळेत जाणंच बंद केलं. आजीनं अशी कोणती गोळी दिली की संकल्पची कळी खुलली?

गेले चार दिवस संकल्पमुळे सगळे काळजीत होते. तसा हा अजिबात शाळा न बुडवणारा मुलगा. पण सलग चौथ्या दिवशीसुद्धा जेव्हा संकल्प शाळेत आला नाही तेव्हा त्याच्या वर्गशिक्षिकेचाच फोन आला. त्याचं दुखणं फार मोठं नाही. किरकोळ पोटदुखी आहे. हे ऐकल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला. बाकी दोन-चार गोष्टी बोलून त्यांनी फोन ठेवला. क्षमा, त्याची आई त्यांच्याशी बोलत असताना संकल्प समोरच होता, पण त्याने ‘मी फोनवर बोलणार नाही’, असं खुणेनंच तिला सांगितलं आणि तिनेसुद्धा ते मानलं. आईने फोन ठेवताच संकल्प पळाला तो थेट आजीच्या खोलीकडे. मागून आई तिथे आली तेव्हा तो आजीला पाणी पाजत होता.‘‘ओके संकल्प, मी आता जरा झोपते हं. तू आईबरोबर अभ्यास कर. आपण नंतर भेटूच.’’ असं म्हणून आजीने लगेच उशीवर डोकं ठेवलं. पांघरूण ओढून घेतलं आणि डोळे बंद केले.

हेही वाचा…जेंडर बजेटिंग : विनियोगावर ठरणार यशापयश!

आजीने डोळे मिटले, तरी संकल्प तिथेच बसून राहिला. शेवटी क्षमा त्याच्याजवळ गेली. खांद्यावर हात ठेवून त्याचा दंड अलगद पकडला आणि त्याला हळूच ओढून रूमबाहेर नेलं. ‘‘संकल्प, आजीला विश्रांती घेऊ दे. तू असा सारखा समोर बसलास की, त्यांनाच टेन्शन येतंय. आता हे तू थांबवायला हवंस.’’

‘‘म्हणजे तिला एकटीला सोडून द्यायचं का?’’ संकल्प काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता.

‘‘ एकटी म्हणजे काय? हे घरंच आहे ना? मी आहे. बाबा आहेत. उद्या आजीची बहीण येणार आहे. आपण सगळे आहोत आणि तू उद्यापासून शाळेत जाणार आहेस.’’ क्षमाचा आवाज वाढला, पण संकल्प आपला मुद्दा सोडायला तयार नव्हता. ‘‘मावशी आजी उद्या रात्री येणार आहे शिवाय तुला उद्या शुक्रवारी ऑफिसला जावंच लागेल. मी घरी थांबतो. नंतर शनिवार-रविवार सुट्टी आहे. सोमवारपासून जातो ना शाळेत. मग तर झालं?’’

‘‘संध्याकाळी बाबाशी बोलून ठरवूया. बाबा म्हणेल ते फायनल. त्यानंतर चर्चा नाही. ओके?’’ क्षमा बोलायची थांबली, पण तिचे विचार सुरूच राहिले. आज अनयशी बोलायलाच पाहिजे. संकल्पचे हे उद्योग थांबायला पाहिजेत. आम्ही संवेदनशील पालक आहोत. ऐकून घेतोय. याचा संकल्प फायदा उठवत आहे का? अर्थात त्याच्या मनात अनेक प्रश्न होते.

हेही वाचा…सेंद्रिय तांदळाचा शाश्वत सुगंध!

तसं हे नेहमीच व्हायचं. घरात कोणाला थोडं जरी बरं वाटत नसलं तरी संकल्प कावराबावरा व्हायचा. त्या व्यक्तीशेजारी बसून राहायचा. सतत काय हवं नको ते बघायचा. थोडा मोठा झाल्यावर त्यानं इंटरनेटचा आधार घेऊन सपाट्याने वाचन सुरू केलं. त्या त्या आजाराशी संबंधित प्रत्येक बारीक-सारीक लक्षणांचा तो इंटरनेटवर शोध घ्यायचा आणि ‘‘अमुक असेल तर मग तमुक टेस्ट करायची का?’’ असं विचारून भंडावून सोडायचा.

आतापर्यंत ‘असतो एकेकाचा स्वभाव’ किंवा ‘किती कुतूहल आहे याला? मोठा होऊन डॉक्टर होईल बहुतेक’, असं म्हणून घरातल्या सगळ्यांनी दुर्लक्षच केलं होतं, पण आजीचं दुखणं सुरू झालं आणि हा सर्व प्रकार हाताबाहेर गेला. दिसायला त्रास होतो आणि डोकं सारखं दुखतंय म्हणून डोळ्यांच्या डॉक्टरकडे तपासायला गेलेली आजी एमआरआय तपासणीची चिठ्ठी घेऊन परत आली. पुढचे आठ दिवस वेगवेगळ्या तपासण्या आणि डॉक्टरांच्या भेटी झाल्या. कर्करोगाचं निदान झालं. केमोथेरपी करावी लागेल, पण तोसुद्धा कायमचा उपाय नाही कारण कर्करोग खूपच पसरला आहे, हे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं.

हेही वाचा…माझं मैत्रीण होणं!

आजीची तर उपचार घ्यायची अजिबातच तयारी नव्हती, पण मोठ्या बहिणीच्या आग्रहाने निदान केमोची एक सायकल तरी घेऊया आणि त्यानंतर ठरवूया. एवढी तयारी आजीने केली. या धावपळीत आणि काळजीत आई-बाबा व्यग्र असताना अनेक महत्त्वाच्या चर्चा, फोनवरची संभाषणं संकल्पच्या देखत घडत राहिली. तो सर्व काही ऐकतच होता. आजीच्या तपासणीचा रिपोर्ट बघून त्यानं गूगलच्या मदतीनं भरपूर माहिती शोधली. आधी आई-बाबांना आणि नंतर आजीला प्रश्न विचारायला सुरुवात केली. मग मात्र खरा प्रश्न सुरू झाला. संकल्प आजीजवळ ठाणच मांडून बसला. शाळेतून आला की थेट तिच्याकडेच जायचा. खाणं-पिणं, अभ्यास सर्वकाही तिच्या समोरच बसून करू लागला. सुरुवातीला आजीलाही बरं वाटलं संकल्पकडे पाहून. त्याच्याशी बोलून त्यांनाही मनात चाललेल्या विचारांपासून विरंगुळा मिळाला. उभारी आली, पण सोमवारपासून संकल्पने शाळेत जायला ठाम नकार दिला. ‘माझं पोट बिघडलं आहे, असं शाळेत बाईंना सांगा. मी आज शाळेत जाणार नाही. आजीला मदत करायला थांबतो,’ असं त्यानं जाहीर करून टाकलं. सध्या चालू असलेल्या धावपळीत उगाच कशाला वाद वाढवा म्हणून आई-बाबासुद्धा तयार झाले, पण एकाचे चार दिवस झाले, तेव्हा मात्र काहीतरी जास्तच बिघडलंय, याची त्यांना शंका आली. मध्ये एक दिवस बाबा डोकं दुखलं म्हणून घरूनच काम करत होता, तर संकल्प पाण्याची बाटली घेऊन त्याच्या शेजारी जाऊन बसला.

संकल्प दर दहा-वीस मिनिटांनी शू करायला जात आहे. तो चिंताग्रस्त आहे हे बाबाच्या लक्षात आलं. ‘ये इकडे बस माझ्याजवळ’, असं म्हणत बाबाने संकल्पला जवळ घेतलं आणि उचलून मांडीवर बसवलं. संकल्प त्याला बिलगलाच. हळूहळू रडायला लागला. बाबांनी त्याला घट्ट जवळ धरून ठेवलं आणि हळूहळू थोपटलं. थोड्या वेळात संकल्प शांत झोपी गेल्याची खात्री पटल्यावर त्यांनी त्याला अलगद उचलून बेडवर ठेवलं आणि आता आईबरोबर मुलाचीही काळजी घ्यावी लागणार हे त्याला स्वच्छ कळलं.

हेही वाचा…सांधा बदलताना : मन करा रे थोर!

मोठा उसासा टाकून बाबांनी परत कामाकडे लक्ष वळवलं. संकल्प उठला की, त्याच्याशी बोलावं लागणार आहे, असं ठरवून बाबा कामाकडे वळला. तासाभराने संकल्प उठला आणि बाबा काही बोलायच्या आतच आजीच्या रूमकडे पळाला. ती पुस्तक वाचत होती. संकल्पला पाहताच तिने पुस्तक खाली ठेवलं आणि तिच्याजवळ येण्याची खूण केली. संकल्प आज्ञाधारकपणे आजीजवळ जाऊन बसला.

आजीच्या हाताला अजून सलाईन आणि इंजेक्शन दिल्या ठिकाणी चिकटपट्ट्या होत्या आणि एका ठिकाणी थोडं काळं-निळं झालं होतं. संकल्प तेच बघतो आहे हे लक्षात आल्यावर आजीने स्वत:च ती जागा थोपटून त्याला सांगितलं, ‘‘आता दुखत नाहीये तिथे. बरं झालंय. डॉक्टरांनी उगाच चिकटपट्टी ठेवली. उद्या हॉस्पिटलमध्ये गेले की ते काढून टाकतील.’’

संकल्पच्या चेहऱ्यावर हसू बघून आजीने त्याचे थोडे केस विस्कटले आणि ‘‘जा आता. अभ्यास संपवून टाक.’’, असं म्हणून त्याला वाटेला लावलं. या सर्व प्रकरणात बाबाचं आणि संकल्पचं बोलणं राहूनच गेलं.

बघता बघता संध्याकाळ झाली आणि शुक्रवारच्या शाळेबद्दल बोलायची वेळ आली. जेवणानंतर सगळेजण आजीजवळ बसले होते तेव्हा आईने विषय काढलाच. ‘‘हा उद्यासुद्धा शाळेत जायचं नाही म्हणतोय. आज शाळेतून फोन आला होता, पण बोलला नाही हा बाईंशी. अनय, आता तूच ठरव काय करायचं ते.’’

बाबा काही म्हणायच्या आतच संकल्पने पुन्हा सकाळचीच पट्टी आळवली. ‘‘मावशी आजी आली की मग मी जातो ना. सोमवारी पक्का जातो. उद्याच्या दिवस घरी थांबतो. आजीबरोबर कोणीतरी नको का?’’

‘‘अरे, दिवसभर आपली नंदा असते ना. तिचं आणि आजीचं छान जमतं.’’ आईनं समजवायचा प्रयत्न केला, पण संकल्पनं या शक्यतेचाही विचार करून ठेवला होता.

हेही वाचा…इतिश्री : मिठी की थप्पड?

‘‘ अगं ती दिवसभर कामच करत असते. ती काही बसत नाही आजीबरोबर. शिवाय दुपारभर ती फोनवर असते. आजीला तिचा काय उपयोग? मी उद्या थांबतो. मावशी आजी आली की मग माझी ड्युटी संपली. मग मी शाळेत जातो.’’

त्याच्या आवाजातला ठामपणा सगळ्यांनाच जाणवला. आता चार दिवस शाळा बुडलीच आहे. अजून एका दिवसाने काय मोठा फरक पडणार? असा विचार करून बाबानं आणखी एक सुस्कारा सोडला. ‘‘ठीक आहे. पण तू तुझा रोजचा अभ्यास करायचा. सारखं इथे बसून राहायचं नाही आणि सोमवारी काय वाटेल ते झालं तरी शाळेत जायचं. जायचं म्हणजे जायचंच. काहीही झालं तरी.’’ बाबा बोलून तर गेला, पण एकदम त्यानं जीभ चावली. आपण काहीतरी भलतंच बोललो हे त्याला जाणवलं. संकल्प एकदम कावराबावरा होऊन त्याच्याकडे बघत राहिला.

‘‘अरे ‘काय वाटेल ते’ असं फक्त म्हणायला. काय होणार आहे कोणाला? सोमवारी तू शाळेत गेला की मी पहिल्या इंजेक्शनसाठी रुग्णालयात जाणार आहे. तू शाळेतून येईपर्यंत मीसुद्धा परत आलेली असेन. पहिलं इंजेक्शन एकदम सोपं असतं, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे ना आपल्याला. तू निवांत शाळेत जा.’’ आजीनं सारवासारव केली. ‘एका मुलाचा बाप झाला, तरी काही समज आली नाही तुला’, असा कटाक्ष आपल्या मुलाकडे टाकून ती हसली. मग सगळेच हसले आणि शाळेचा विषय तात्पुरता संपला.

दुसऱ्या दिवशी आई आणि बाबा कामावर गेल्यानंतर संकल्प आजीशेजारी बसून गृहपाठ संपवत होता. तेव्हा आजीनं विषयाला तोंड फोडलं. ‘‘काय रे पिल्लू? तू इतका का घाबरला आहेस? घर सोडायला तयार नाहीस. संध्याकाळी खाली खेळायलासुद्धा जात नाहीस.’’

संकल्पला हे अपेक्षित नव्हतं. आजी इतकं थेट बोलेल, असं त्याला वाटलं नव्हतं. त्यामुळे काय उत्तर द्यावं, याची तो मनातल्या मनात जुळवाजुळव करायला लागला. आजीच पुन्हा म्हणाली, ‘‘ हे बघ तू तर सगळं ऐकलंच आहेस. माझा कर्करोग बराच पसरलाय, असं डॉक्टरांनी मलासुद्धा सांगितलंय. आपल्या घरात आपण महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट बोलतो की नाही? उगाच आंधळी कोशिंबीर खेळत नाही हे माहिती आहे ना तुला?’’

हेही वाचा…स्त्री ‘वि’श्व: क्रिकेटची बदलती दुनिया

आता मात्र संकल्पचा धीर सुटला. तो एकदम जोरात रडायला लागला. ‘‘आता तू मरणार आहेस ना?’’

आजी हसायला लागली, ‘‘अरे मी अगदी व्यवस्थित आहे. मला लगेच काही होत नाहीये. शिवाय केमोथेरपीमुळे कर्करोग चांगला ताब्यात येणार, असं डॉक्टरांनी सांगितलं. मी चांगली भक्कम आहे.’’ असं म्हणताना आजीनं गाल फुगवले आणि दोन्ही हात विठोबासारखे कमरेवर ठेवले. संकल्प हे बघून खुदकन हसला. ‘‘हे बघ माझा आजार आता बराच वेळ चालणार आहे. कमी जास्त होत राहणार. काही दिवस बरे असतील काही दिवस अवघड असतील. मलासुद्धा थोडी भीती वाटते. त्यामुळे तुला तर भीती वाटणं साहजिकच आहे. किती लहान आहेस तू. पण आपण सगळेजण याप्रसंगी एकत्र आहोत की नाही?’’

त्याला उत्तर म्हणून संकल्पने फक्त जोरजोरात डोकं ‘हो’ म्हणून हलवलं. ‘‘मग आता प्रत्येकानं आपापलं काम व्यवस्थित करायचं. आई-बाबांचं काम म्हणजे कार्यालयात जायचं आणि घर सांभाळायचं. माझं काम म्हणजे व्यवस्थित उपचार घ्यायचे आणि तुझं काम म्हणजे शाळेच्या वेळेत शाळेत जायचं. अभ्यास करायचा. मला आणि आई-बाबांना मदत करायची.’’

संकल्पची आजीविषयीची काळजी अद्याप मिटली नव्हती. आजीच्या चेहऱ्यावरचा खेळकरपणा गेला आणि थोडा कठोरपणा आला. ‘‘हे बघ संकल्प, आई-बाबांनासुद्धा रोज कामाला जावं लागतं की नाही? माझा आजार किती महिने किंवा किती वर्षं चालू राहील कोणालाच माहीत नाही. आता आपण सगळ्यांनी इथं बसून राहायचं का असं माझ्या भोवती? तुम्हाला सगळ्यांना असं बघितलं की माझीच तब्येत बिघडते. तुझ्या काळजीनं आता मीच आजारी पडून रुग्णालयात जाते की काय, असं मला वाटायला लागलंय.’’

‘‘ आजी तू प्लीज असं म्हणू नकोस. तू फक्त इंजेक्शनसाठी रुग्णालयामध्ये जा. राहायला जाऊ नकोस.’’

हेही वाचा…‘आईची जात, ती मुलांची का नाही?’

‘‘ ठीक आहे. मग ठरलं. मी फक्त जाऊन परत येणार आणि तू शाळेत जाऊन परत येणार. रोज रात्री आपण भेटूच.’’

‘‘ ओके. तू रोज उपचार घ्यायचे आणि बरं व्हायचं आणि मी रोज शाळेत जायचं आणि…’’ ‘‘… आणि मोठं व्हायचं.’’ आजीनं त्याचं वाक्य पूर्ण केलं आणि दोघे हसायला लागले. ‘‘ आणि हो, मावशी आजीचं काम म्हणजे आपल्याला रोज तुझ्या आणि तिच्या लहानपणीच्या गोष्टी सांगायच्या.

संकल्पला ‘हाय फाइव्ह’ देत आजी म्हणाली, ‘‘बरोब्बर, मी पण तिची त्यासाठीच वाट पाहात आहे.’’

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story about sensitive boy grandmother illness and grandma strength and wisdom help him overcome his fears psg
Show comments