हेमा होणवाड
आयुष्यातला एक निर्णय चुकल्याची शिक्षा भारतीला पुरेपूर भोगायला लागली, पण ती भोगत असताना तिला आपली माणसे नेमकी कोणती याचा साक्षात्कार होत गेला. त्यातूनच ती अनेकांच्या संघर्षात त्यांच्यामागे ठामपणे उभी राहिली, ते करत असतानाच उच्च शिक्षण घेत तिने स्वत:लाही वाढवले. तिच्या जगण्याला मिळालेल्या या ध्येयाची मशाल अनेकांचे आयुष्य उजळवते आहे.
‘‘सगळं संपल्यासारखं वाटलं, तेव्हाच आतून आवाज आला -‘थांब, अजून सगळं बाकी आहे, तू अजून संपलेली नाहीस.’ माझं मोजमाप जग करणार नाही, मी स्वत:च माझी उंची ओळखते.’’
भारती – (आत्मदीपो भव)
ग्रामीण पार्श्वभूमी असलेली ही कवयित्री, फारशी कुणाला माहीत नसलेली. लहानपणापासूनच तिनं स्वत:चं खडतर आयुष्य तर अनुभवलं होतंच, पण इतर स्त्रियांनाही सामाजिक आणि आर्थिक संघर्ष करताना जवळून पाहिलेलं होतं. त्या अनुभवांमुळे तिच्या मनात अन्यायाची चीड, समतेचा आग्रह आणि लिंगभेदाला तीव्र विरोध ही मूल्यं खोलवर रुजली असली तरी ‘माझ्यावर लोकांनी कसा अन्याय केला. बिच्चारी मी,’ असं दळण भारतीनं कधीच दळलं नाही. उलट, फक्त रडत न बसता काहीतरी बदल घडवायला पाहिजे, हे तिच्या जीवनाचं ब्रीदवाक्य झालं. चुका केल्या, पण त्यांची जबाबदारीही स्वीकारली. अश्रूंचा महापूर लोटला तेव्हा, त्या अश्रूंची किंमत तिला उमजली. त्या अश्रूंची मागणी म्हणजे जीवनभर करावं लागणारं स्त्रियांसाठी काम. ते तिनं हसत हसत स्वीकारलं. ती भारती आता अनेकांसाठी आदर्श ठरली आहे, यापुढेही ठरेल.
भारतीचा सामाजिक क्षेत्रातील प्रवास तळागाळापासून सुरू झाला. गावोगावी जाऊन स्त्रियांशी बोलणं, त्यांच्या कहाण्या ऐकणं, त्यांच्या गरजा समजून घेणं. त्याची सुरुवात अर्थात स्वत:चे अनुभव आणि त्यांच्याकडे पाहण्याचा स्वत:चा दृष्टिकोन यातून झाली. काळोखी रात्र आली खरी, पण भारतीनं आपल्या आयुष्याची मशाल पेटवून आसमंत उजळला. प्रत्येकानंच खाचखळग्यांतून कशाला जायला हवं? म्हणून हिनंसुद्धा सेतू बांधायला सुरुवात केली, हीसुद्धा राखेतून झेप घेणारी ‘फिनिक्स’ झाली. हिच्यातला सुप्त ‘जोनाथन’ जागा झाला.
गरिबी, मुलगी असणं आणि आडवी येणारी जात अशी तीन आभूषणं लेवून ही लेक जन्माला आली. पोटभर जेवायला मिळालं की खूश. शिक्षकांनी शाळेची जमीन झाडायला लावली, सारवायला लावली तरी कधी तक्रार केली नाही. चप्पल घालायची तर तिला माहीतच नव्हती. त्यातल्या त्यात बरी गोष्ट म्हणजे सुतारकाम करणाऱ्या वडिलांना कसलंही व्यसन नव्हतं. त्या काळात दूरध्वनीसारखी साधनं नव्हती. त्यामुळे कामासाठी वडील बाहेरगावी गेले की, महिना महिना त्यांचा ठावठिकाणा माहीत नसायचा. मुलांच्या पानात वाढायचं काय? हा प्रश्न आईनंच कायम सोडवला. शिवण शिकून थोडं-फार कमवायला सुरुवात केली. राहण्याची जागा बदलल्यावर रात्री दहानंतरही घरात दिवे असणं हेसुद्धा अप्रूप वाटायचं तिला. वडिलांचे कारागीर नात्यातलेच होते. तेही घरीच राहायचे. एक खोली आणि स्वयंपाकघरात, सगळे मिळून नऊ जण एकत्र राहायचे. सुदैवानं इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही आईवडील शिकायला पाठवायचे. मुलगी म्हणून शाळेतून काढून घरात कामाला जुंपलं नाही ही त्यातल्या त्यात जमेची बाजू. त्या अर्थानं भारतीसाठी ते वयात येईपर्यंतचे दिवस छान होते.
अभ्यासाचं महत्त्व फारसं कळत नव्हतं. पण ती उत्तीर्ण होत गेली. थोडी मोठी झाल्यावर लग्नासाठी स्थळं येऊ लागली. पण कसली तर बिजवरांची. भारती हे मान्य करणं शक्यच नव्हतं. बारावी झाल्यावर ती एका संस्थेत कामाला लागली. काम करताना शिकायला मिळायचं आणि ११०० रुपये पगार. त्या पगारात भागायचं नाही. कारण काम बारामतीत होतं. घरी सासवडला जायचं तरी एका वेळचा ७० रुपये खर्च व्हायचा. पण भारती आपली जबाबदारी पेलत आणि त्याची द्यावी लागणारी किंमत मोजत परिपक्व होत गेली. काही काळानं कंपनीच्या मालकानं काही आर्थिक घोटाळे केले म्हणून कंपनी बंद पडली. पोलिसांनी तिथे काम करणाऱ्या सर्वांना अटक करून तुरुंगात टाकलं. भारतीची तब्येत बरी नसल्यानं ती त्या दिवशी घरी राहिली म्हणून वाचली. या प्रसंगामुळे तिच्यातील ‘झाशीची राणी’ जागी झाली. तिच्या गावातील ‘किशोरी विकास’ हा ‘ज्ञानप्रबोधिनी’चा उपक्रम आणि ‘मासूम’ या संस्थेच्या शिबिरात तिनं सहभाग घेतला होता. त्यावेळी पेटलेल्या स्फुल्लिंगाच्या बळावर तिनं आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना सोडवून आणलं. ते निर्दोष आहेत हे पोलिसांना व्यवस्थित पटवून दिलं. कंपनीतील कामाचं काही सामान, पंखे, टेबल वगैरे विकून आलेले पैसे सगळ्यांना समान वाटून दिले.
भारतीच्या दोन भावांपैकी मधला भाऊ वाईट संगतीमुळे व्यसनाधीन झाला. दारू पिणं, घरात दादागिरी करणं सुरू झालं, एका संध्याकाळी तर भारतीला ‘इतक्या लवकर दिवा का लावला?’ असं म्हणत केस धरून मारहाण केली. आईवडीलही त्याच्या गुंडगिरीला घाबरायचे. त्यामुळे ते कधी भारतीच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. त्यामुळे या घरात आपल्याला काही स्थान नाही हे भारतीला लवकरच कळून चुकलं. माणसाच्या दोन मूलभूत गरजा घरात भागेनाशा झाल्या की, (एक, मी कोणाचा तरी आहे आणि कोणीतरी माझं आहे हा आपलेपणा. आणि दुसरं, मी एक महत्त्वाची व्यक्ती आहे कारण घरात माझा सहभाग आहे.) माणूस दुखावतो. भारती त्यामुळेच घरापासून मनाने तुटली.
झाडाचं मूळ नेहमी पाण्याच्या शोधात असतं आणि माणूस जिव्हाळ्याच्या, प्रेमाच्या. याच काळात तिला त्याच कंपनीतील तिचा एक सहकारी मित्र आवडू लागला. स्वभावानं चांगला, संवेदनशील होता. उत्तरेकडचं ब्राह्मण कुटुंब होतं त्याचं. भविष्याची चांगली स्वप्नं बघत ही त्याच्याबरोबर त्याच्या घरी निघून आली, पण लग्नाची स्वप्नं प्रत्यक्षात आलीच नाहीत. त्याच्या कुटुंबानं हिला स्वीकारलं नाही. तिला घरी आणि त्याला दुसरीकडे ठेवलं. न केलेल्या गुन्ह्यासाठी अटक झाल्यापासून दीपकही खचला होता, काही कमवत नव्हता. (कंपनीत झालेल्या धरपकडीत यालाही निष्कारण अटक झाली होती.) त्यांच्या घरी तिची पुरेपूर अवहेलना झाली. भारती जिथे जिथे वावरायची तिथे ती जागा ही माणसं पाणी शिंपडून शुद्ध करायचे. माणूस या नावाचे ते देह होते फक्त. अखेर त्यांनी तिला हैदराबादला नेऊन सोडलं. ९०० रुपये हातात दिले आणि ‘घरी जा’ म्हणून सांगितलं. ‘मासूम’ संस्थेच्या मनीषाताईंशी (गुप्ते) तिचा पत्रानं संपर्क होता. त्यांनी सुचवल्यामुळे ती शेवटी घरी गेली.
सुरुवातीला तिचं घरी छान स्वागत झालं. एकमेकींच्या गळ्यात पडून आई-लेक दोघी रडल्या. सगळ्यांनी आपल्याला प्रेमानं स्वीकारलं असं वाटलं तिला. पण ते प्रेम म्हणजे अळवावरचं पाणी. टिकलं फक्त दहा-बारा दिवसांपुरतं! त्यानंतर घरच्यांनी तिला दूषणं द्यायला सुरुवात केली. तिला घरात लपवून ठेवणं, पाहुण्यांसमोर येऊ न देणं, अबोला धरणं हे सगळं सुरू झालं. नातेवाईकांनी ज्याची पहिली बायको स्टोव्हचा भडका होऊन वारली (की मारली?) होती, अशासारख्यांची स्थळं आणायला सुरुवात केली. पण तोपर्यंत जगाचा चांगला-वाईट अनुभव तिच्या गाठीशी होता. स्वत:चं बरं-वाईट थोडं समजायला लागलं होतं. मंजुश्री सारडाचं प्रकरण तिनं वाचलं होतं. कशा माणसाशी लग्न करायचं नाही हे तिला पक्कं ठाऊक होतं.
आपल्या चुकीची जबाबदारी पूर्णपणे स्वीकारून समोर येणारा प्रत्येक दिवस जगायचा तिनं ठरवलं. लोकांची, विशेषत: पुरुषाची तिच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे हेही तिच्या लक्षात आलं. संधी साधून शेजाऱ्याने केलेल्या घाणेरड्या मागणीतून तिनं स्वत:ला वाचवलं. तिच्या जिवलग मैत्रिणीसुद्धा तिची ‘संगत’ नको म्हणून ती दिसल्यावर रस्ता ओलांडून पलीकडे जायला लागल्या. सगळ्या बाजूंनी अवहेलनाच तिच्या वाट्याला येत होती. पण तिला लहानपणापासून कष्टांची, कामाची सवय होतीच. बडीशेपची पाकीटं भरणं, सामाजिक वनीकरणाच्या कामात मातीच्या पिशव्या भरणं, मागावर तयार झालेलं कापड गुंडाळायला मदत करणं, तक्ते रंगवणं अशी कामं तिनं खूप छोट्या वयापासून केली होती.
मात्र दु:खाचेही दिवस बदलतातच. हिलाही वाट दाखवणारी काही माणसं भेटली. मीरा सदगोपालनं स्वत:च्या घरी भारतीला प्रेमानं प्रवेश दिला. स्वत:च्या मुलीचा अभ्यास घेण्याचं काम तिच्यावर सोपवलं. भारतीला आश्रितासारखं वाटू नये याची एखाद्या मैत्रिणीसारखी सर्वतोपरी काळजी घेतली. भारतीसाठी हा परीसस्पर्श ठरला. यानंतर तिनं काम करणं आणि शिकत राहणं या दोन्ही गोष्टी समांतर चालू ठेवल्या आहेत. मीराताई, मनीषाताई, शिरिषाताई (साठे) यांच्यामुळे तिला कामाच्या संधी उपलब्ध झाल्या. तिनं काम करता करता बी.कॉम.,पत्रकारिता पदविका, एम.बी.ए. या पदव्या मिळवून स्वत:ला अधिक सक्षम बनवलं.
‘मासूम’, ‘स्त्रीवाणी’, ‘महिला राजसत्ता आंदोलन’ यांच्या कामांमध्ये भारती रमली. ‘सहेली संघ’, वेश्या व्यवसायातील स्त्रिया, राजकारणातील स्त्रियांचा सहभाग, ऊसतोड कामगार स्त्रिया यांच्याबरोबर काम करताना त्यांच्या जगण्याचे हक्क, आरोग्याचे प्रश्न, त्यांचं सक्षमीकरण करताना भारतीही ‘माणूस’ म्हणून घडत गेली. या कामामुळे तिला ‘तिचा स्वत:चा’ असा एक ‘समाज’ लाभला. जगण्यासाठी बळ मिळालं. प्रगल्भ स्त्रीवादी दृष्टिकोन असलेल्या कार्यकर्त्याकडून ती शिकत गेली की, ‘विकासाचा पाया समता आणि न्याय हा आहे.’ ऊसतोडणी करणाऱ्या स्त्रियांबरोबर काम करताना तिला प्रकर्षानं जाणवलं की, ‘सर्व स्त्रिया एकाच जमिनीवर उभ्या आहेत. काहींना प्रगत घराण्याचा, वातावरणाचा फायदा मिळाला असेल, पण बहुसंख्य स्त्रिया शिक्षित असोत वा अशिक्षित, पितृसत्ताक व्यवस्थेचा अनुभव घेतातच आहेत.’
तिला अनेकदा समाजाचा विरोध, पैशांची कमतरता यांना तोंड द्यावं लागलं आणि स्वत:बद्दल अविश्वाससुद्धा वाटला. पण सगळ्या चढ-उतारात ती ध्येयाशी प्रामाणिक होती आणि आत्मनिर्भर होती. प्रत्येक संघर्षाने तिला अधिक संवेदनशील, ठाम आणि मजबूत बनवलं. गेल्या काही वर्षांत तिनं ऊसतोडणी कामगारांच्या हक्कांसाठी ५० संस्थांचं जाळं उभं केलं, ग्रामसभांमध्ये स्त्रियांचे मुद्दे मांडले, आणि गावाचा दहा टक्के निधी स्त्रियांच्या कौशल्य विकासासाठी राखून ठेवावा, यासाठी प्रयत्न केले.
सध्या ती ‘सहेली’ संघामध्ये कामगार स्त्रियांच्या आरोग्य, लैंगिक, कायदेशीर हक्क आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी काम करते आहे. शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि सामूहिक ताकद या तीन गोष्टी स्त्री सक्षमीकरणासाठी सर्वात महत्त्वाच्या आहेत हे ती शिकली. ती आजही इंग्रजी संवादकौशल्य आणि नेतृत्वक्षमता वाढवण्याचा अभ्यास करते आहे. वंचित समाजातील अधिकाधिक स्त्रियांना उमजावं की, बदलाची सुरुवात धैर्यानं आणि चिकाटीनं होते, हे तिचं आता ध्येय आहे. नेतृत्वाच्या आणि निर्णय घेणाऱ्या पदांवर जास्तीत जास्त स्त्रिया दिसाव्यात हे स्वप्न तिनं उराशी बाळगलं आहे आणि ते या विश्वासावर उभं आहे की प्रत्येक स्त्रीमध्ये परिस्थितीवर मात करून बदल घडवण्याची ताकद आहे. केवळ स्वत:साठीच नाही, तर आपल्या संपूर्ण समाजासाठी. तिचा स्वत:चा प्रवास याच विश्वासाचा पुरावा आहे.
‘बाई ही बाईची शत्रू असते.’ ही म्हण खोटी पाडणारे अनुभव भारतीला आले. दुसऱ्या स्त्रीला आधार देणाऱ्या, तिच्या जखमेवर मलम लावणाऱ्या शेकडो स्त्रियांना तिनं जवळून पाहिलं आहे. भारती म्हणते, ‘‘माझ्या या प्रवासात मी एकटी नव्हते. मीरा सदगोपाल, मनीषाताई यांच्यासारख्या असंख्य मैत्रिणींनी वेळोवेळी पाठीवर हात ठेवून लढ म्हटलं. त्यांचं प्रेम, मार्गदर्शन आणि विश्वास यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचले आहे. आता माझी जबाबदारी आहे, इतरांना हात देण्याची. ज्या स्त्रियांनी मला उभं राहायला हात दिला, त्यांच्या ताकदीचा स्पर्श माझ्या हृदयात आहे.’’
