‘‘कामवाल्या बाईंना सहानुभूतीपूर्वक एखाद्या घरातल्या माणसाप्रमाणं वागवणारी, तिच्या मुलीच्या लग्नात भरपूर आहेर देणारी, तिच्या अडीअडचणीला धावून जाणारी, हीच का ती रजनी? .. मग आज हे एकदम कसले विचार आले एका स्त्रीबद्दल एका स्त्रीच्याच मनात?  आणि का.. ’’ दामूकडे याचं उत्तर नव्हतं.
‘‘अगं, पण तुला रात्री दप्तर भरून ठेवायला काय होतं? सकाळी किती गडबड होते शाळेत जायला.’’ रजनीचा नेहमीचा त्रासिक स्वर.
‘‘आई अगं, बोलण्यात का वेळ घालवते आहेस? माझं दप्तर भरून होईल दोन मिनटांत. माझी वेणी घालून द्यायची आहे तुला.’’ चिंगीचं उलट उत्तर.
‘‘एक दिवस तुझी तू घालून बघितलीस तर. पण नाही.. या बाईपण नं.. जरा वेळेवर येतील तर शपथ! बस नाही थांबत माझ्यासाठी, मला जाऊन थांबावं लागतं. ७-४५ ला माझ्या बससाठी. चिंगीची शाळेची व्हॅन चुकली की तिला तरी सोयीस्कर बस कशी मिळणार? नाहीतर रिक्षा करून जायची वेळ. टेंशनशिवाय एक दिवस जाईल तर शप्पथ.’’ रजनीचं पोळ्यावाल्या बाईंवर घसरणं.
आता मात्र दामूला डोक्यावरचं पांघरुण दूर करून उठणं भागच. सकाळी दोघीही जाईपर्यंत वातावरण तप्त. ते ‘कूल’ करण्याचा मार्ग दामू शोधू लागला. आलेल्या वृत्तपत्रातला एक विनोद वाचून दाखवण्याचा प्रयत्न केला, पण रजनी आंघोळीला बाथरूममध्ये गेली होती आणि चिंगीनं निर्वकिारपणे शाळेचं शेरापुस्तक सहीसाठी समोर धरलं होतं.
‘‘तुमच्या टीचरना शेरे-ताशेरे मारल्याशिवाय शाळा झाल्यासारखी वाटत नाही का गं?’’ सही करता करता दामूनं हसत हसत विचारलं. तेवढय़ात बेल वाजली म्हणून चिंगीनं मक्खपणे ते शेरापुस्तक हिसकावून घेतलं अन् जाऊन दार उघडलं.
‘‘मावशी, जरा लवकर या नं.. जीव टांगणीला लावता अगदी, चिंगीचा व्हॅनवाला थांबायला तयार नसतो.’’ बाथरूममधून बाहेर येता येता, घरात प्रवेश करणाऱ्या बाईंना रजनीनं ऐकवलंच.
‘‘अगं, पण व्हॅनवाल्या काकांना सांग जरा सबुरीनं घ्यायला, पैसे देतेस ना त्यांना महिन्याचे महिन्याला, शाळेला सुटी असलेल्या दिवसांतसुद्धा.’’ दामू हसत उद्गारला त्यावर रजनीनं डोळे मोठे केले अन् आता मात्र चिंगी फिसकन् हसली.
‘‘ताई, पाहुणे आलेत हो घरी, समद्यांचं चहापाणी करून निघायला जरा उशीर झाला, पण कधीमधीच व्हायचं असं, हमेशा नाही वो.’’ मावशींनी सारवासारव केली. मायलेकींची आवराआवर पुढे चालू झाली.
‘‘ताई, उद्या यायला जमणार नाही बरं का. यजमानांचं श्राद्ध आहे.’’ बाईंनी सांगितलं.
क्षणभर स्तब्धता.. आणि मग ‘‘ठीक आहे,’’ म्हणून रजनी आणि तिच्यामागे घाईघाईत बूट बांधत चिंगी बाहेर पडल्या.

बाईंचा नवरा व्यसनापायी अकाली गेला होता. बाईंचं वय त्या वेळी असेल ३५-३६. लिहा-वाचायला येत नव्हतं. दोन मुली मोठय़ा आणि शेंडेफळ मुलगा पदरात. त्यांना वाढवण्यासाठी जावेच्या मदतीनं लोकांकडे भांडी, धुणी, झाडू-पोछा, स्वयंपाकाची कामं करून मुलं वाढवणं हेच ध्येय. प्रामाणिक आणि कष्ट करण्याची तयारी या शिदोरीवर सकाळपासून राबत राबत तिने चार पैसे गाठीशी बांधले. मोठय़ा मुलीचं लग्न करून दिलं. जाऊ-दीर सांभाळून ठेवलेले. त्यांच्या मोठेपणानं निभावलं. धाकटी मुलं शिकणारी.
रजनीला बाईंचं कौतुक होतं. घरात जुनंपानं आवरायला काढलं की दोन पिशव्या भरलेल्या जायच्या बाईंकडं कपडय़ाच्या आणि इतरही वापरातल्या फुटकळ वस्तूंच्या. बाईंना आनंद त्याचाही.
‘‘आज मावशींच्या मुलाची फी भरायला हजार रुपये दिलेत बरं का.’’ रजनीनं एके दिवशी दामूला सांगितलं होतं. ‘‘पुढच्या दोन महिन्यांत घेऊ वळते करून.’’ यावरून दामूला कळलं की पसे गेल्या महिन्यापासून एकदम वाढवून दिलेले दिसताहेत.
‘‘अरेच्या, सहा महिन्यांमागेच तर वाढवले होते ना. त्या बाई तुझा आवाका घेताहेत बरं का, तोंडाला येईल ते मागतात आणि तुझं काम अडायला नको म्हणून तूही.’’ दामूनं सुनावलं.
‘‘अरे, बिचारीला यावरच गुजराण करावी लागते, महागाई कोण वाढलीय.’’ रजनी कढ येऊन अन् कड घेऊन बोलत होती.
‘‘हो, आणि आपल्याला नाही वाटतं महागाई. इकडं महागाई वाढतीय जॉमेट्रिकली अन् आमदनी वाढतीय अ‍ॅरिथमॅटिकली, तीसुद्धा बॉसना वाटलं तर!’’ दामूनं आपलं घोडं दामटलं.
‘‘राहू दे रे, आपल्या अडीअडचणीला नाही म्हणत नाहीत बिचाऱ्या. कामही चांगलं आहे. आपल्यामुळं सोसायटीतली आणखी चार घरं मिळाल्यानं आपल्यावर खूश आहेत.’’ रजनीला फारच भरतं आलेलं पाहून दामूनं विषय आटोपता घेतला.
मधल्या एका रविवारी निवांतपणे उठून सकाळची काम आटोपली जात होती. बाईही जरा उशिराच म्हणजे साडेआठच्या सुमारास आल्या. दामू पेपर वाचून नुकताच दाढी करायला बेसिनवरच्या आरशापुढे उभा राहिला होता. रजनी आणि तिच्याच ‘स्टाइल’मध्ये चिंगी पेपरवाचन करत बसल्या होत्या.
‘‘अरे वा, साडी नेसलात वाटतं आज मी दिलेली. चांगली दिसतीय तुम्हाला.’’ रजनी उद्गारली. बाई लाजून हसल्या आणि कामाला लागल्या.
‘‘मी तुला भोपाळहून आणलेली तीच ना ही साडी?’’ दामूनं तोंडावरून ब्रश फिरवत रजनीला विचारलं.
‘‘हो.’’ पेपरमधून डोकं न काढता रजनीनं हुंकार भरला.
‘‘त्या वेळी पहिल्यांदा तू माझं साडी खरेदीबद्दल कौतुक केलं होतंस. आठवतं?’’
‘‘हो.’’ पुन्हा तसाच हुंकार.
‘‘पण काही म्हण, तुझे काय माझे काय, कपडे खरेदीत तुझाच चॉइस मस्त असतो बरं का..’’ दामूचं बोलणं ऐकून आता रजनीचे डोळे पेपरमधून बाहेर डोकावून दामूवर रोखलेले.. ‘‘अर्थात तुझा चॉइस चांगला असतो हे तर आपल्या लग्नावरूनच सिद्ध झालेलं आहे, काय?’’ असं म्हणून दामू जोरात हसला. तशी चिंगीपण खदखदून हसली. दामू जे म्हणाला ते समजून की अर्धी दाढी केलेला दामूचा चेहरा पाहून ते दामूला नाही समजलं. पण ‘‘तुला काय कळलं गं.’’ असं म्हणत रजनीनं मात्र, लटक्या नाराजीनं असेल कदाचित, पण एक चापट दिली ठेवून चिंगीला.. ‘‘आणि तुलाही कळत नाही का रे कुणासमोर काय बोलावं ते?’’ नकळत तिनं बाईंकडे कटाक्ष टाकलेला दामूला दिसला नव्हता.
‘‘तुला काय झालं बिघडायला?’’ तो रजनीवर डाफरला.
‘‘इनफ इज इनफ!’’ रजनीनं शेवटचं सांगितलं म्हणजे आता संभाषण बंद हे दामूला कळलं.
बाईंनी एक दिवस सुट्टी मागून दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारीही घेतली आणि रविवारी सकाळीच आल्या.
‘‘काल पण यायला जमलं नाही, ताई. श्राद्धाला आलेले पाहुणे होते घरात अजून आणि धाकटय़ाच्या शाळेत बोलावलं होतं.’’ बाईंची ओढाताण पाहून रजनीही काही बोलली नाही. परवाच झालेलं त्यांच्या नवऱ्याचं श्राद्ध आणि मुलांची शाळा. सगळ्यांच्या वेळा सांभाळता सांभाळता आपलीही कशी तिरपीट उडते हे रजनीतल्या गृहिणीला समजलं नाही तरच नवल.
‘‘ठीक आहे. तशी पोळ्यांचीही काही अडचण नव्हती अन् भांडी एक दिवस राहिली तर नडत नाही.’’ रजनीनं बाईंच्या मनाची अस्वस्थता कमी केली.
आज रविवार असल्यानं आज निवांत उठून चहा, पेपरवाचन आणि मग दाढी असाच दामूचा कार्यक्रम होता. दाढी करता करता दामूच्या गप्पा सुरू झाल्या. रजनी बाईंना सूचना देऊन पेपर वाचायला बसली होती. चिंगी चित्र काढत बसलेली.
‘‘तुझ्या बॉसनं अगदी आपणहून चौकशी केली बरं का त्याच्या मुलीच्या लग्नात काल. तू उगाचच त्याला नावं ठेवतेस. तुझ्या कामाचं कौतुक करत होता. त्याला अगदी ताब्यात ठेवलेला दिसतोय..आणि घरी ‘नवरा माझ्या मुठीत गं’ हां हां हां! पण काही म्हण, काल ते जेवण अगदी अंगावर आलं नाही का, रजनी?’’
‘‘हं.’’ पेपरमधून डोकं न काढता रजनीनं हुंकार भरला.
‘‘आपल्याला अगदी आग्रह करकरून जिलब्या वाढल्या. वाया जातील अशी धमकी देऊनसुद्धा.’’ दामू तोंडाचा चंबू करून बोलत होता, त्यामुळं चिंगी हसत होती. दामूनं बाईंकडे बघितलं. त्या शांतपणे भांडी घासत होत्या.
‘‘.. संध्याकाळी अजिबात जेवणाची इच्छा राहिली नाही. तरी चिंगीच्या मत्रिणीच्या वाढदिवसाला जावं लागलं आणि खावं लागलं. किती छान कुटुंब आहे ना त्या चौघांचं. पण मला ते केक त्या रुहीच्या तोंडाला फासणं मात्र अजिबात आवडलं नाही. चिंगी सांग गं तुझ्या मत्रिणींना माझा हा निरोप. म्हणावं अन्नपदार्थ असे नासू नयेत.’’ दामू
‘‘तुला काय साऱ्या जगाला शहाणपणा शिकवायचा मक्ता दिलाय का रे?’’ रजनी उसळून म्हणाली.
‘‘ताई, येऊ का?’’ बाईंनी काम करून निरोप घेतला. दार बंद करून रजनी दामूकडे आली तरातरा.
‘‘तुला कळत कसं नाही? दाढी करताना का गप्पा मारत असतोस आमच्याशी?’’ दामूला हा हल्ला अनपेक्षित होता. ‘‘चिंगे, जा गं तुला पॅटिस घेऊन ये दुकानातून.’’ पसे आणि पिशवी देऊन रजनीनं चिंगीला बाहेर पिटाळलं.
‘‘नको रे अशा गप्पा मारत जाऊ त्या मावशींपुढे.’’
‘‘म्हणजे? त्याला काय झालं?’’ स्वत:च्या गालावरून हात फिरवत आरशात बघत दामूनं विचारलं.
‘‘मला नाही आवडत असे आपल्यातले विषय त्यांच्यासमोर बोललेले. त्या एक विधवा गरीब बाई आहेत. आपल्या एकमेकांच्या कौतुकाच्या अन् आपुलकीच्या गोष्टी, खाण्यापिण्याच्या, वाढदिवस हे सारं ऐकून त्यांना स्वत:च्या परिस्थितीबद्दल विषाद वाटत असेल. आपली लटकी किंवा खरी भांडणं पाहून त्यांची करमणूक होत असेल, आणखी चार घरी कामाला जातात त्या, तिथं तिखटमीठ लावून सांगत असतील.. आणि.’’ रजनी एवढी गंभीरपणे बोलता बोलता थांबलेली पाहून दामूनं खुणेनं पुढं काय असं विचारलं. ‘‘. आणि शेवटी ती एक विधवा आहे. आपल्या सुखी संसाराला तिची..’’ रजनीचं पुढचं बोलणं दामूला ऐकू जाईनासंच झालं. पुसायला घेतलेला हातातला ब्रश गळून पडला.
त्या बाईंना सहानुभूतीपूर्वक, एखाद्या घरातल्या माणसाप्रमाणं वागवणारी, तिच्या मुलीच्या लग्नात भरपूर आहेर देणारी, तिच्या अडीअडचणीला धावून जाणारी, जादा झालेल्या साडय़ा, कपडे, वस्तू देताना त्या धडधाकट उपयोगी असल्याची खात्री करणारी हीच का ती रजनी? मग आज हे एकदम कसले विचार आले एका स्त्रीबद्दल एका स्त्रीच्याच मनात?  आणि का.. दामूकडे याचं उत्तर नव्हतं.