कथा-कादंबरीकार आणि समीक्षक रवींद्र शोभणे
लोटेल या मांजरीची आता चौथी पिढी आमच्या घरात यथेच्छ नांदते आहे, पण यादरम्यान आमच्याकडे आलेल्या मांजर आणि बोक्यांनी आम्हाला विश्वरूप दर्शन घडवलं. मांजरींचं भय, त्यांच्या वेदना, जगण्यातली अनिश्चितता, प्रेम करण्याच्या नाना तऱ्हा सगळं काही आम्ही अनुभवलं, आमची लेक शर्वरीच्या प्राणीप्रेमामुळे.’’ सांगताहेत मराठी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमच्या घरात गेल्या तीन-चार पिढय़ांपासून पाळीव प्राण्यांविषयी कुठलंही आकर्षण नव्हतं. खेडय़ात कुत्रा-मांजरांचा लळा असतो किंवा गाय-म्हशी-बकऱ्यासुध्दा घरटी एखाद् दुसऱ्या असतातच. गायी-म्हशींच्या, बकऱ्यांच्या मुताचा, लेंडय़ांचा वास त्यांच्या दैनंदिन जगण्याशी एकरूप झालेला असतो. मग तो मोठा शेतकरी असो की शेतमजूर. आमच्या घरात असा कुठल्याच प्राण्यांचा वावर नसायचा. कुत्र्याचं एक पिल्लू मी खूप लहान वयात घरी आणलं होतं, तर ते का घरात आणलं, म्हणून मला चांगलंच रागावलं गेलं होतं. त्यामागचं कारण म्हणजे त्या प्राण्याच्या खाण्या-पिण्यापासून तर त्याच्या दैनंदिन क्रियांपर्यंत घ्यावे लागणारे कष्ट. एकदा आजीनं एक गाय विकत घेतली होती, पण ती शेतातच बांधलेली असायची. ती काही दिवसांतच इतकी मारकी झाली, की तिला वर्षभरातच विकावं लागलं. आणि आज मात्र आमच्या घरात सतत मांजरीचा वावर असतो. घरातल्या माणसांसारख्याच त्या घरात सर्वत्र वावरतात. हक्कानं अंगाला अंग घासून काही खायला मिळवतात. हे कसं झालं हा प्रश्न मलाही कधी कधी पडतो.

या बदलांना कारणीभूत आहे शर्वरी,आमची कन्या. तिच्या मनात लहानपणापासून भूतदयाभाव आहे. तिला कुठल्याही प्राणीमात्रांविषयी मुळातच प्रेम आहे. त्या प्रेमात बराचसा बालिशपणाचाही अंश असतोच. हा तिचा स्वभाव आम्हाला कधीकधी गमतीचा वाटतो. ती लहान असताना तिच्या समोरून एखादं गाढव किंवा डुक्कर गेलं तरी ‘ओहऽ किती स्वीट आहेऽ’अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया तिच्या तोंडून निघाल्यावाचून राहात नसे. आता ते जरा कमी झालं; पण पाळीव प्राणीमात्रांविषयी तिला प्रचंड ओढ आहे. बायको, अरुणाला या असल्या प्राण्यांविषयी फारसं काही वाटत नाही. मी आपला मधला मार्ग निवडतो. पण शर्वरीच्या या प्राणीप्रेमाचा नाही म्हटलं तरी आमच्यावर थोडाफार परिणाम झालेला आहेच. ती गंमत पुढे येईलच. घरात कुठला तरी पाळीव प्राणी हवाच हा शर्वरीचा हट्ट.

घरी आणलेल्या श्वानांशी तिचे सूर फारसे जुळले नाहीत, पण मार्जारपुराण मात्र अखंड सुरू राहिलं. त्याची छान रंगतदार कहाणी आहे. एखादा योगायोग घडावा अशी. एक दिवस अचानक आमच्या अंगणात कुठूनशी मांजरीची दोन छोटी पिल्लं आली. पांढऱ्या रंगावर कळसर- करडे ठिपके असलेली ही दोन्ही पिल्लं दिसायला अतिशय गोड होती. त्यांना पाहताच शर्वरी आनंदली. तिनं पटकन त्यांना दूध दिलं प्यायला आणि आपण कुठल्यातरी अनोळखी घरात आलो आहोत हे पार विसरून ती दोन्ही पिल्लं छान डोळे उघडे ठेवून दूध पिऊ लागली. त्यांचं दूध पिऊन झालं, की आजूबाजूला कुठंतरी पळून जायची. मग काही वेळानं पुन्हा हजर. काही दिवसांतच दोन्ही पिल्लांशी शर्वरीची छान मैत्री झाली. आम्हालाही ती पिल्लं आवडायला लागली. त्यातच शर्वरीनं त्यांचं नामकरणही केलं. दोन्ही माद्या होत्या. एकीचं नाव लोटेल आणि दुसरीचं बिटेल. ती त्यांना नावानं बोलावू लागली आणि पिल्लंही छान प्रतिसाद देऊ लागली. त्यांच्याबरोबर त्यांची आईही यायची. पोर्चमध्ये बसायची. तिला शर्वरीनं नाव दिलं-मॉम. आणि त्यांचा हा संसार आमच्या घरात, अंगणात सुरू झाला. एक दिवस मात्र विपरीत घडलं. मी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं दुपारी बाहेर गेलो होतो.

एकदम संध्याकाळीच परतणार होतो. अरुणा शाळेत गेली होती. शर्वरीचा मला अचानक फोन आला. ‘बाबाऽ बिटेलला कुत्र्यांनी मारलं. तिच्या पोटातली आतडीच बाहेर काढली. तुम्ही लवकर घरी या नाऽ’ आणि ती फोनवरच ढसढसा रडू लागली. माझा कार्यक्रम चालूच होता. मला माघारी जाणं अवघड होतं. तेव्हा कशीबशी मी तिची समजूत काढली. एखाद्या डॉक्टरांशी बोल म्हणून सांगितलं. तिनं गूगलवरून एका व्हेटरनरी डॉक्टरांचा पत्ता शोधला. शेजारच्या मुलीला सोबत घेऊन ती त्या जखमी मांजरीला घेऊन डॉक्टरकडे गेली. त्यानं मांजरीवर उपचार केले, पण काही तासांतच ती गेली. शर्वरीचं दु:ख अनावर होतं. आम्ही तिची खूप समजूत काढली. खरं तर गल्लीतल्या कुत्र्यांनी दोन्हीही पिल्लांवर हल्ला केला होता. पण त्यातून लोटेल सुटली आणि चपळाईनं झाडावर चढून बसली. तिच्या बहिणीला ती रक्तबंबाळ अवस्थेत भीतीनं थरथरत पाहत होती. नंतर लोटेल कुणालाही आपल्या अंगाला हात लावू द्यायची नाही. शर्वरीनं हात लावण्याचा प्रयत्न केला तरी फिस्कारायची. खूप दिवस तिच्या मनात ती भीती कायम असावी. हळूहळू ती त्या धक्क्यातून सावरली. त्यानंतर शर्वरीचा जीव गुंतला तो लोटेलमध्ये. तिला ती जपू लागली. आम्हीही हळूहळू लोटेलच्या प्रेमात पडलो. ती हक्कानं घरात वावरू लागली. डायिनग टेबलाच्या खुर्चीवर बसून हक्कानं खायला-प्यायला मागू लागली. अरुणानं स्वयंपाकघरातलं एखादं कपाट उघडलं, की ती धावत येऊन त्या कपाटात डोकं घालू लागली. तिला द्यायला मी हातात दुधाचा कप जरी घेतला तरी ती आनंदानं उडय़ा मारायची.

लोटेल दिसायला सुंदर आहे, पण रागीट आहे. अहंकारी असावी अशी. तिची चालही जणू एखाद्या राणीसारखी वाटते. दारातून ती घरात प्रवेश करते तीच आपल्या तोऱ्यात. तिचं ते चालणं पाहात राहावंसं वाटतं. गल्लीतल्या बोक्यांसाठी लोटेल आकर्षणच होती. तिला आवाज देऊन कुणी कुणी बोका बोलवायचा. तीही त्याच तोऱ्यात त्यांच्यात जाऊन मिसळायची. अशातच काही दिवसांत तिचं पोट फुगलेलं दिसू लागलं. मग घरातल्या बाईची काळजी घ्यावी तशी काळजी शर्वरी घेऊ लागली. आम्ही आपली ती सगळी गंमत पाहत असायचो. लोटेल खुर्चीत बसलेली असली, की तिला खाली उतरायला शर्वरी छोटा चौरंग पाट ठेवून तिला सांगायची- ‘हळू उतर’. लोटेल मात्र तो चौरंग ओलांडून छान उडी मारून पुढे जायची. लोटेलनं चार पिल्लांना जन्म दिला. त्यातलं एक पिल्लू खूपच गोड होतं. लोटेलसारखंच. शर्वरीनं त्याचं नाव टिक्कू ठेवलं. दुसऱ्या एकाचं हेजू आणि एकीचं कॉफी. घरातल्या दुधासोबतच ती त्यांच्यासाठी कॅटफूड विकत आणू लागली. त्या कॅटफूडसाठी सगळी पिल्लं अक्षरश: तिच्या मागे धावत यायची. सगळय़ांचा नवा संसार सुरू झाला. पिल्लं मोठी झाली आणि लोटेलनं सगळय़ांना आमच्या घरी टाकून पळ काढला. शर्वरीचा संसार मात्र उभा राहिला होता. टिक्कू आणि त्याची तिन्ही भावंडं तिच्या अवतीभवती वावरायची. त्यातच टिक्कू तिच्या अधिक अंगावरचा. लॅपटॉपवर काम करीत असली की तो छान तिच्या मांडीत बसून तिचं काम पाहत बसायचा. तिनं त्याला पोटाशी घेतलं, की छान प्रतिसाद द्यायचा. दिवसभर तो घरात असायचा. रात्री बाहेर जायचा.

रात्री मांजर घरात असू नये हे आम्ही तिला निक्षून सांगितलं होतं म्हणून. दुसऱ्या दिवशी सकाळी टिक्कू आला, की शर्वरीच्या बंद दारासमोर उभा राहून तिला आवाज द्यायचा. त्याच्या आवाजानं तिनं दार उघडलं, की तो आत जायचा आणि तिच्या दुलईत घुसायचा. आणि तिनं दार उघडलं नाही तर अक्षरश: तो दाराच्या हँडलला उडी मारून लटकायचा आणि दार उघडण्याचा प्रयत्न करायचा. मी जेवायला बसलो, की तो माझ्यासमोर येऊन बसायचा. त्याच्यासमोर पोळी किंवा भाकरीचे तुकडे टाकले, की चांगली चतकोर भाकर खायचा. उकडलेलं अंडं त्याच्या नाकासमोर धरलं तर झोपेतूनसुध्दा ताडकन उठायचा. लोटेल या दिवसांत पूर्णत: गायब होती. एकदा ती आली तेव्हा ओळख दाखवायला म्हणून टिक्कू तिच्याजवळ गेला तर लोटेलनं चक्क त्याच्या थोबाडीत ठेवून दिली. आपलं पिल्लू एका विशिष्ट वाढीचं झालं, की ही प्रजाती त्यांना पूर्णपणे आपल्यापासून तोडते आणि शेवटी यांच्यातही नर-मादीचं नातं उरतं हा अनुभव मला त्या वेळी आला. आनंद यादवांची ‘माऊली’ कादंबरी याच विश्वाचं दर्शन घडविणारी आहे.

एक दिवस दुपारच्या वेळी गल्लीतल्या कुत्र्यांचा जोरदार आवाज आला, तसा मी बाहेर आलो. पाहातो तर कॉफी त्यांच्या भक्ष्यस्थानी पडली होती. अगदी जखमी अवस्थेत ती रस्त्यावर पडली होती. मी तिला घरी आणलं, पाणी पाजलं. ती मरणप्राय वेदनांनी विव्हळत होती आणि टिक्कू आपल्या बहिणीचा आकांत थिजल्या डोळय़ांनी पाहत होता. कॉफी शेवटी गेलीच. टिक्कूनं तिला शेवटचं हुंगलं आणि मी तिला दूर नेऊन पुरून परत आलो. घरातलं वातावरण उदास झालं होतं.. दुसऱ्या दिवशी टिक्कू नेहमीप्रमाणे ठरलेल्या वेळी घरी आला नाही. कुठे गेला असेल, येईल काही वेळानं म्हणून आम्ही टिक्कूची वाट पाहत होतोच. अशातच शेजारच्या बाईंनी पहाटेच टिक्कूला कुत्र्यांनी मारल्याचं शर्वरीला सांगितलं. ते ऐकताच शर्वरी घेरी येऊन पडली. त्या बाईनं मला आवाज दिला. मी शर्वरीला उचलून घरात आणलं. भान येताच शर्वरी टिक्कूसाठी मोठमोठय़ानं रडू लागली. आम्ही तिला समजावलं. खरं तर कुणा प्राण्यासाठी रडण्याचं शर्वरीचं वय नव्हतं. ती पुरेशी मोठी झाली होती, पण तिचा टिक्कूतही तेवढाच जीव गुंतला होता. काही दिवसांनी शर्वरीचा टिक्कूसोबतचा एक फोटो फ्रेम करून तिच्या खोलीत लावला. यादरम्यान घरात कुठलंही मांजर नव्हतं.

आणि सहा-आठ महिन्यांत एक दिवस शर्वरीनं एक बऱ्यापैकी टग्या झालेला बोका घरात आणला आणि मला सांगू लागली, ‘‘बाबा हा टिक्कूचा लहान भाऊ आहे, हेजू. बघा त्याच्या डोक्यावर तसाच डॉट आहे. माझ्याकडे त्याचा आधीचा फोटो आहे.’’ तिनं तिच्या मोबाइलमधला एक फोटो मला दाखवला, तसाच. आणि एखादं जीवाभावाचं माणूस खूप दिवसांनी भेटावं तशी ती त्याचे लाड करू लागली. हेजू तसा टग्या, पण प्रत्येक वेळी बाहेरच्या बोक्यांपासून मार खाऊन येणारा. एकदा तर एका मोठय़ा काळय़ा बोक्याशी त्याचं भांडण झालं आणि भरपूर मार खाऊन जखमी होऊन तो घरी परतला. मग आठ दिवस त्याच्या जखमा बऱ्या व्हायला लागले. शर्वरी पुढे ‘एम.आय.टी.’मध्ये (महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी) शिकायला गेली तेव्हा तिनं मला बजावून ठेवलं होतं- ‘हेजूची काळजी घ्यायची बाबा’. आणि तिची जागा मग मी घेतली.. या दिवसांत खूप दिवसांनंतर लोटेल घरी चकरा मारायला लागली. मध्यंतरी लोटेलची मॉम बाळंत झाली, पण तिची दोन्ही पिल्लं किरटी निघाल्यामुळे ती काही दिवसांतच गेली.

मॉमच्या बाबतीतला एक किस्सा. तिचं एक पिल्लू मरणासन्न झालं होतं. अतिशय अशक्त होऊन ते निपचित पडून होतं. मॉम त्याचं संरक्षण करीत त्याच्या बाजूला जणू ठाण मांडून बसली होती. आम्हा कुणाला जवळ भटकू देत नव्हती. मी काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो. संध्याकाळी घरी आलो तेव्हा अरुणाजवळ त्या पिल्लाची चौकशी केली. ते पिल्लू मेलं म्हणून तिनं सांगितलं. मी घरामागे जाऊन पाहिलं. तर मॉम आपल्या मेलेल्या पिल्लाला शांतपणे खात होती. त्याचं डोकं खाऊन फस्त केलं होतं. मला आश्चर्य वाटलं आणि रागही आला. मी तिला रागावून तिथून हाकललं आणि त्या मेलेल्या पिल्लाची विल्हेवाट लावली. त्यातून एक गोष्ट जाणवली. आपण जन्माला घातलेलं मूल मेल्यानंतर आपल्याच पोटात गेलं पाहिजे की काय, अशी तर या प्राण्यांची नैसर्गिक ठेवण नसावी ना?

आणि आठ दिवसांपूर्वीच लोटेलनं आपल्यासारखीच तीन सुंदर पिल्लं पुन्हा घरात आणली. आता ही पिल्लं घरभर, अंगणात सारखी हिंडत असतात. धुमाकूळ घालत असतात. लोटेलच्या येण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आतातरी तिच्या चौथ्या पिढीजवळ येऊन थांबलाय. पुढच्या पिढय़ा येतच राहातील.. आणि लोटेलचं गोकुळ असंच नांदतं राहील..
hobhaner@gmail. com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Such a compassionate bried fear of cats their pain uncertainty in life to love amy
First published on: 02-07-2022 at 01:11 IST