scorecardresearch

पाहायलाच हवेत: जगण्यातल्या नि:स्तब्धतेचा प्रत्यय!

स्त्रियांना गर्भपात करून घेण्यावर अतिप्रगत देशांमध्येही घातलेली बंदी, हे सध्याचं वास्तव.

पाहायलाच हवेत: जगण्यातल्या नि:स्तब्धतेचा प्रत्यय!

मीना कर्णिक

स्त्रियांना गर्भपात करून घेण्यावर अतिप्रगत देशांमध्येही घातलेली बंदी, हे सध्याचं वास्तव. या पार्श्वभूमीवर जवळपास ३५ वर्षांपूर्वी लहानशा देशात राहणाऱ्या दोन मैत्रिणींची गोष्ट ‘फोर मन्थ्स, थ्री वीक्स, टू डेज’ हा चित्रपट मांडतो. वरवर पाहता ही एका गर्भपाताची गोष्ट असली, तरी एकूण जगण्यावर कडक निर्बंध लादले की त्यातून पळवाटा काढणारी एक स्वतंत्र व्यवस्था कशी निर्माण होते, काळाबाजार कसा होऊ लागतो, याचा प्रत्यय देते आणि त्याच वेळी त्यामुळे येणाऱ्या जगण्यातल्या नि:स्तब्धता, कोरडेपणाला अधोरेखित करते. कसा ते पाहाण्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा.

जेमतेम एका दिवसात घडणारी गोष्ट. अत्यंत वास्तववादी. त्यामुळे कुठे जाणीवपूर्वक नाटय़ आणण्याचा प्रयत्न नाही, की भावनांचे कढ नाहीत आणि तरीही पहिल्या क्षणापासून मनात उत्कंठा दाटून येते. एक अनामिक भीती घर करून राहते, श्वास रोखून धरायला लावते. सिनेमा पाहताना असा अनुभव क्वचित येतो. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या, रोमेनियाचे दिग्दर्शक क्रिस्तियान मुनज्यू यांच्या ‘फोर मन्थ्स, थ्री वीक्स, टू डेज’ या चित्रपटानं तो दिला होता. आता पंधरा-सोळा वर्षांनंतर (सिनेमाची कथा माहीत असूनसुद्धा) तो पुन्हा पाहताना त्या अनुभवात बदल झालेला नाही हे लक्षात आलं.ऑतिलिया आणि गॅबी या दोन मैत्रिणींची ही गोष्ट. सिनेमा सुरू होतो तेव्हा पडद्यावर दिसतो एक फिश टँक. एक खूप पसारा पडलेलं टेबल आणि अॅश-ट्रेमधली जळती सिगारेट. आजूबाजूला कुणी तरी आहे हे सांगणारी. बाकी एक ‘ऑकवर्ड’ नि:स्तब्धता. कॅमेरा मागे जातो तेव्हा लक्षात येतं, की एखाद्या डॉर्मिटरीमधली ही खोली आहे. एक मुलगी बॅगेत सामान भरतेय. ही गॅबी. दुसरी, म्हणजे ऑतिलिया तिला मदत करतेय. शॅम्पू संपलाय माझा, गॅबी सांगते. ऑतिलिया तो आणायला निघते, तेव्हा ‘अमुक ब्रँडचाच आण’ असा सूचनावजा आदेशही देते. मग दिसते शॅम्पू, सिगारेट, च्युईंगगम यांसारख्या गोष्टी आणण्यासाठी डॉर्मिटरीमधल्याच दुकानात जाणारी ऑतिलिया. कधी पाठमोरी, कधी समोरून. कॅमेरा तिच्या हालचाली टिपतो, अगदी संथपणे. काय घडतंय याचा अंदाज अजून आपल्याला आलेला नाही. ऑतिलिया रूममध्ये परत येते तेव्हा गॅबी पायाचं वॅक्सिंग करत असते. ‘तू कुठे पिकनिकला चाललेली नाहीयेस,’ ऑतिलिया म्हणते. तिच्या स्वरावरून आपल्या लक्षात येतं, काही तरी घडलंय आणि बिघडलंयसुद्धा. गॅबी बॅग भरून नेमकी कुठे चाललीये, कशाला चाललीये याचा थेट उल्लेख होईपर्यंत चांगली वीसेक मिनिटं उलटून जातात.

गॅबीला गर्भपात करून घ्यायचा आहे. कायद्यानं त्याला परवानगी नाही आणि मैत्रीण म्हणून तिला शक्य ती सगळी मदत करण्यासाठी ऑतिलियानं पुढाकार घेतलाय, याची थोडी थोडी कल्पना येऊ लागेपर्यंत आपल्याला या दोघींच्या आयुष्यात गुंतवण्यामध्ये दिग्दर्शक पूर्णपणे यशस्वी झालेला असतो. ही गोष्ट घडते तो काळ आहे १९८८ चा. कम्युनिस्ट रोमेनियामध्ये तेव्हा निकोलाय चाऊशेस्कू या हुकूमशहाची राजवट होती. १९६० च्या दशकाच्या मध्यास तो सत्तेत आला आणि त्यानं अनेक नवीन कायदे केले. त्यांपैकीच एक होता ‘डिक्री ७७०’. या कायद्यामुळे गर्भपात आणि कुटुंब नियोजनही बेकायदेशीर ठरवण्यात आलं. कारण रोमेनियाची लोकसंख्या २३ कोटींवरून ३० कोटींवर नेण्याचा सरकारचा मानस होता. सरकारनं मग बायकांचा गर्भ म्हणजे आपली मालमत्ता आहे असं समजून त्यावर नजर ठेवायला सुरुवात केली. पंचविशीपर्यंत एखाद्या बाईला मूल झालं नाही तर तिला त्याचा जाब विचारला जाई. त्यांच्यावर अधिकचे कर लादले जात. आठ-दहा मुलांना जन्म देणाऱ्या बाईचा ‘मदर हिरोइन’ म्हणून सन्मान व्हायचा. याचा अर्थ बायकांनी फक्त मुलं जन्माला घालावीत अशी सरकारची अपेक्षा होती असं नाही. त्यांनी नोकरी करावी, घर सांभाळावं हेही गृहीतच होतं. अर्थातच सर्व बायकांना ते शक्य होत नसे. मग, काही जणी मूल जन्माला घालून त्यांना नाइलाजानं रस्त्यावर सोडून द्यायच्या आणि बऱ्याच जणी लपूनछपून गर्भपाताचा मार्ग निवडायच्या. असंही म्हणतात, की आपल्या शरीरावर असा हक्क सांगणाऱ्या सरकारच्या विरोधात ‘गर्भपात’ हे अनेक स्त्रियांनी हत्यार म्हणून वापरलं. हा कायदा संमत झाल्यापासून १९८९ मध्ये रोमेनियात क्रांती होऊन निकोलाय चाऊशेस्कू सत्तेवरून जाईपर्यंतच्या काळात तिथे हजारो बायका अशा बेकायदेशीर गर्भपातांमध्ये मृत्युमुखी पडल्या. यात बहुसंख्य आर्थिकदृष्टय़ा खालच्या स्तरातल्या बायका होत्या. पण दिग्दर्शक क्रिस्तियान मुनज्यू आपल्या सिनेमात या कायद्याविषयी बोलत नाहीत. तेव्हाच्या राजकीय वातावरणावर थेट भाष्य करत नाहीत. निकोलाय चाऊशेस्कू हे नावही कुठे येत नाही किंवा गर्भपात करणं योग्य की अयोग्य यावर सिनेमात चर्चा होत नाही. ते निव्वळ एक गोष्ट सांगतात आणि ती सांगता सांगता अनेक गोष्टी आपोआप आपल्यासमोर येतील असं पाहतात. उदाहरणार्थ, हॉटेलमध्ये बुकिंग केल्यावर ऑतिलिया दुर्मीळ अशा केन्ट सिगारेटचं पाकीट रिसेप्शनवर ठेवते. अशी लाच देणं हे सर्रास होत असल्याचं आपल्या लक्षात येतं. रूमवर जाताना ऑतिलियाची चौकशी करणारा स्टाफ आपला जणू हा हक्क आहे, ती ताकद आपल्याला सत्ताधीशांनी दिलेली आहे अशा आविर्भावात वागतो. रिसेप्शनवरची मुलगी फोनवर बोलताना आपल्या सहकाऱ्याला, ‘आज पगार होणार असेल तर प्लीज मला कळवशील का?’ असा प्रश्न करते. डॉक्टर वाटेत आपल्या आईला भेटतो तेव्हा, ‘दुकानात साखर आलीये म्हणून सकाळपासून तिथे रांगा लागल्यात,’ हा संवाद आपण तिच्या तोंडून ऐकतो. अशा छोटय़ा छोटय़ा दृश्यांमधून दिग्दर्शक आपल्याला जे हवं ते नेमकं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. कडक निर्बंध लादले की त्यातून पळवाटा काढणारी एक स्वतंत्र व्यवस्था निर्माण होते, काळाबाजार होऊ लागतो, याची जाणीव आपल्याला अनेकदा करून दिली जाते.

बरं, ही गोष्ट दिग्दर्शकानं जी मुलगी गर्भपात करू इच्छितेय तिच्या नजरेतून सांगितलेली नाही. गॅबीची घालमेल, तिचं आईपण आणि त्याविषयी तिला नेमकं काय वाटतंय, तिला कुणापासून दिवस गेले, याची माहिती देण्यामध्ये दिग्दर्शकाला मुळी फारसा रसच नाही. या गोष्टीची ‘प्रोटॅगनिस्ट’ (नायिका) आहे ऑतिलिया. गॅबी बेधडक आपल्याशी खोटं बोलते, गर्भपातासाठी लागणारे पैसे जमा करण्याची जबाबदारी आपल्यावर टाकते, डॉक्टरला भेटायला आपल्यालाच पाठवते, हे सगळं कळत असूनही मैत्रिणीसाठी वाट्टेल ते करणारी ऑतिलिया. आपल्या बॉयफ्रेंडबरोबर भांडणारी ऑतिलिया. गर्भपात करायला जाताना पायावरचे केस काढण्याकरिता वॅिक्सग करणाऱ्या गॅबीवर वैतागणारी ऑतिलिया. ‘पुढच्या वेळेस खोटं बोलणार असशील तर मला आधी सांगून ठेव,’ असं गॅबीला बजावणारी ऑतिलिया आणि डॉक्टरच्या मागणीवरून त्याच्याशी अगदी सेक्सही करायला तयार होणारी ऑतिलिया.
सिनेमातला अख्खा दिवस आपण ऑतिलियाबरोबर घालवतो. बेबे नावाच्या छुपे गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला ती भेटते. त्याला घेऊन हॉटेलवर येते. त्याला असंख्य प्रश्न विचारते. आपल्याला तिची अस्वस्थता सतत जाणवत राहते. या डॉक्टरचंही स्वत:चं असं तत्त्वज्ञान आहे. गॅबीला तपासल्यावर त्याच्या लक्षात येतं, की ही आपल्याशी खोटं बोललीये. ती तीन महिन्यांची गरोदर नाही, तर तिला चौथा महिना लागूनही काही आठवडे उलटून गेले आहेत. ‘पकडला गेलो तर पाचव्या महिन्यात हे काम करणाऱ्याला थेट खुनाच्या आरोपाखाली अटक होते हे माहितीये का तुम्हाला?’ तो रागानं विचारतो. ‘आता केवळ जास्तीच्या पैशानंच भागणार नाही, मला अधिक काही तरी लागेल’ अशी मागणी करतो. ऑतिलियाबरोबर सेक्स करताना बेबे आपल्याला दिसत नाही. कॅमेऱ्यावर असते बाथरूममध्ये बसलेली गॅबी. थोडय़ाच वेळात ऑतिलिया तिथे येते आणि गॅबी बाहेर जाते. इतकं तटस्थपणे सगळं घडतं आणि तरीही आपल्या हृदयात धडधडतंय हे आपल्या लक्षात येतं. पडद्यावरचा तो कोरडेपणा एव्हाना आपल्याला त्रास देऊ लागलेला असतो.

गॅबीच्या योनीमध्ये एक तार टाकून बेबे निघून जातो. गर्भ बाहेर पडायला दोन तासही लागू शकणार असतात किंवा दोन दिवसही. तोवर गॅबीनं न हलता पलंगावर पडून राहायचं असतं. त्यानंतर त्या गर्भाचं काय करायचं याचाही सल्ला तो देतो आणि शांतपणे निघून जातो. ऑतिलियाला संध्याकाळी तिच्या बॉयफ्रेंडच्या, आदीच्या आईच्या वाढदिवसाला जायचं असतं. गॅबीला त्याच्या घरचा फोन नंबर देऊन ती निघते. आदीच्या घरचं वातावरण अगदी विरुद्ध. माणसं हास्यविनोद करताहेत, वाइन पिताहेत, चांगलंचुंगलं खाणं समोर येतंय.. ऑतिलियाला ते सहन होत नाही. तिच्या मनात प्रश्नांनी घर केलंय. ‘मी प्रेग्नंट असेन तर तू काय करशील?’ ती आदीला विचारते. ‘नाहीयेस ना, मग कशाला विचार करायचा आपण त्याचा? आहेस का?’ तो घाबरून विचारतो. मैत्रिणीच्या अनुभवामुळे आपल्या नात्यामध्ये आलेल्या या अनिश्चिततेला कसं सामोरं जावं हे ऑतिलियाला कळत नाही.

एखाद्या प्रसंगात आपण असून नसल्यासारखे असतो तेव्हा नेमके कसे असतो? आपल्या मनात दुसरेच विचार चालू आहेत हे आपल्या आजूबाजूच्यांना समजत असतं का? त्यांना त्याची फिकीर असते का? मुळात आपल्या असण्याशीच त्यांना काही देणंघेणं तरी असतं का? आदीच्या घरचा समारंभ बघताना या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात. आदीच्या आईवडिलांच्या मध्ये ऑतिलियाची खुर्ची आहे. मागे आदी बसलाय. आजूबाजूची मंडळी मोठमोठय़ानं वेगवेगळय़ा विषयांवर गप्पा मारताहेत. सुरुवातीला ऑतिलियाची थोडीफार चौकशी केल्यानंतर माणसं आपल्या आवडीच्या विषयांवर बोलू लागली आहेत. बायकांच्या बोलण्यात निरनिराळय़ा रेसिपी आहेत. ‘आपल्या मुलांनी सरकारी नियमाप्रमाणे लष्करी सेवा करायलाच हवी हे मला पटत नाही,’ असे उल्लेख येताहेत. कुण्या चर्चमधल्या प्रीस्टची खिल्ली उडवणं चालू आहे आणि या सगळय़ात ‘आपण शहरी माणसं अधिक हुशार असतो’ असा एक आविर्भावही आहे.

कॅमेरा एका जागी स्थिर ठेवलाय. मधोमध आपल्याला ऑतिलिया दिसतेय. बोलणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यांकडे आळीपाळीनं पाहणारी. मध्येच कुणी तरी तिला सिगारेट ‘ऑफर’ करतं. ऑतिलिया ती घेते. टेबलवरचा एक पुरुष म्हणतो, ‘आपल्या ज्येष्ठांसमोर सिगारेट ओढणं बरं नाही. माझे वडील गेले तेव्हा मी ४३ वर्षांचा होतो, पण त्यांना मी सिगारेट ओढतो हे शेवटपर्यंत कळलं नाही.’ मागे बसलेला आदी अगदी सहजपणे हातातला लायटर पुन्हा पॅन्टच्या खिशात टाकतो. आदीचं पुरुषप्रधान असणं असं स्वाभाविकपणे अधोरेखित होतं.

हे दृश्य तब्बल सात मिनिटांचं आहे. कॅमेरा स्थिर आहे. माणसांची सिनेमाच्या गोष्टीशी अजिबात संबंध नसलेल्या विषयांवरची बडबड आहे. या संपूर्ण काळात एकही घटना घडत नाहीये आणि तरीही ते दृश्य आपल्याला खूप काही सांगू पाहतंय. यात दिग्दर्शकाची ताकद लक्षात येते. ऑतिलियाच्या आजूबाजूला चाललेला हा गोंधळ आणि तिच्या मनात चालू असलेला कल्लोळ यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न त्यामुळे प्रेक्षक म्हणून आपणही करतो. ते वातावरण आनंदी वाटत असलं तरी नकोसं होणं समजू शकतो. अशी अनेक दीर्घ लांबीची दृश्यं या सिनेमात आपल्याला बघायला मिळतात.
गॅबी फोन उचलत नाहीये हे लक्षात आल्यावर ऑतिलिया पार्टी सोडून, मित्राचा राग पत्करून निघून येते. रस्त्यात आता काळोख झालाय. वातावरण अधिकच गडद झालंय. मधूनच एखाद्या कुत्र्याचं भुंकणं कानी पडतं आणि ऑतिलियाच नाही, तर आपणही दचकतो. परतीचा हा प्रवास दिग्दर्शकानं खूप विस्तारानं दाखवलाय. त्यामुळे गॅबीचं काय झालं असेल याचं दडपण ऑतिलियाच्या चेहऱ्यावर जेवढं दिसतं तेवढंच ते आपल्या मनातही निर्माण झालेलं असतं, कारण ऑतिलियाप्रमाणेच एवढा वेळ आपल्यालाही हॉटेलमध्ये झोपलेल्या गॅबीची स्थिती काय झालीये हे दिग्दर्शकानं सांगितलेलं नाही.
ही वातावरणनिर्मिती नकळतपणे आपल्या मनावर बिंबते ती दिग्दर्शक वापरत असलेल्या रंगाच्या पॅलेटमुळे. दिवस हिवाळय़ाचे आहेत. त्यामुळे मुळातच स्वच्छ सूर्यप्रकाश आपल्याला फारसा दिसतच नाही. प्रत्येक फ्रेममध्ये हे मळभ आपला पाठलाग करतं. उजळ रंग फारसे कुठे सापडत नाहीत. ना लोकांच्या कपडय़ात, ना आणखी कशात. अपवाद दोनच. डॉक्टर बेबेची लालभडक रंगाची गाडी आणि बाथरूममध्ये पडलेला रक्तात माखलेला गर्भ. कम्युनिस्ट राजवटीमधली गोष्ट सांगताना हा एकच रंग ठळकपणे दाखवणं दिग्दर्शकानं अजाणतेपणी नक्कीच केलेलं नाही.

या सिनेमाची शेवटची पंधरा मिनिटं एखाद्या थ्रिलरच्याही तोंडात मारतील इतकी श्वास रोखून धरायला लावणारी आहेत. कोणत्याही उत्कंठावर्धक सिनेमात संगीताचा खूप मोठा सहभाग असतो. पण या संपूर्ण सिनेमात संगीताचा वापर अजिबात नाही. लोकांची बडबड, कुत्र्याचं भुंकणं किंवा जोरात आपटलेलं कचऱ्याच्या डब्याचं झाकण, फोनची कर्कश घंटी, दूरवरून जाणाऱ्या ट्रेनचा आवाज, ट्रॅमची बेल, फ्लशची खळखळ, यातून जो काही ध्वनी निर्माण होईल तेवढाच. एरवी या सिनेमानं नि:स्तब्धतेचा (सायलेन्सचा) अतिशय परिणामकारक वापर केला आहे.

एका मुलाखतीमध्ये क्रिस्तियान मुनज्यू यांनी म्हटलंय, ‘एखाद्याकडून जरुरीपेक्षा जास्त अपेक्षा केल्यावर जी स्तब्धता निर्माण होते तिथूनच मला सिनेमाची सुरुवात करायची होती.’ त्यांच्या एका जवळच्या मैत्रिणीच्या अनुभवावर हा सिनेमा बेतलेला आहे. एका पुरुष दिग्दर्शकानं पूर्णपणे बायकांशी संबंधित विषयावर इतक्या संवेदनशीलतेनं, बायकांच्या दृष्टिकोनातून सिनेमा करणं मोठय़ा प्रमाणावर दिसत नाही. ‘फोर मन्थ्स, थ्री वीक्स, टू डेज’मधून ते समर्थपणे होताना दिसतं. कदाचित म्हणूनच आज इतक्या वर्षांनंतरही हा सिनेमा मनात इतकं पक्कं घर करून राहिला होता आणि पुन्हा बघताना तेवढाच ताकदीचा अनुभव देऊन गेला.
meenakarnik@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-01-2023 at 00:05 IST

संबंधित बातम्या