मृदुला भाटकर

जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या खटल्यातले प्रमुख आरोपी असणाऱ्या २३-२४ वर्षांच्या शीख मुलांचा खटला लढवताना, मनुष्य एकाच वेळी बुद्धिमान, भावनाशील आणि तितकाच कट्टर विचारांचा दहशतवादीही असू शकतो, याचं प्रत्यंतर मला पुन:पुन्हा आलं. जनरल वैद्यांचा मारेकरी सुखदेवसिंग याच्याशी खटल्याच्या निमित्तानं परिचय झाला आणि एक होतकरू तरुण कुठवर भरकटू शकतो याचं दर्शन घडलं. एका तरुणाचा अतिरेकी होण्यापर्यंतचा प्रवास सांगणाऱ्या लेखाचा उर्वरित भाग.

chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…

जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या हत्येच्या प्रकरणातला आरोपी सुखदेवसिंग आणि त्याच्या साथीदारांवरचा आम्ही चालवत असलेला पहिला खटला होता ‘एन्काऊंटर’चा. म्हणजे सुखदेवसिंग याला पुण्यात पकडलं आणि तेव्हा आरोपी आणि पोलिसांमध्ये जी चकमक झाली त्या घटनेचा. दुसरा खटला ‘युनियन बँके’वरच्या दरोडय़ाचा. तर तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा खटला होता जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या हत्येचा.

तेव्हा सुखदेवसिंगचे वकील म्हणून माझे वरिष्ठ नहार सर यांची Amicus Curie म्हणून व माझी त्यांची सहाय्यक म्हणून नेमणूक केलेली होती. तर जिंदाचं (म्हणजे हरजिंदर- जनरल वैद्यांच्या खुनातील प्रमुख सूत्रधार व आरोपी) वकीलपत्र अॅड. हर्षद निंबाळकर यांनी घेतलं होतं. दोषारोप ठेवण्यात आला त्या दिवशी दोघा आरोपींना विचारलं गेलं, की जनरल वैद्यांची हत्या करण्याचा कट रचला आणि ही हत्या केली हा गुन्हा कबूल आहे का? याला कोर्टाच्या परिभाषेत ‘प्ली’ असं म्हणतात. त्या वेळेस जिंदानं नकार दिला, पण सुखानं (सुखदेवसिंग) अचानक सांगितलं, ‘‘मला हा गुन्हा मान्य आहे.’’ आम्ही त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहिलं. तो कोर्टाकडे पाहात होता. तो म्हणाला, ‘‘मुझे गुनाह कबूल हैं। मैंनेही जनरल वैद्यको मार दिया।’’ न्यायाधीश रुईकरांनी हा प्रश्न दोन-तीन वेळा विचारला आणि त्याला कल्पना दिली, की तू हा जो काही गुन्हा कबूल करत आहेस त्याचा परिणाम माहिती आहे का? सुखा त्याच्या जबाबावर ठाम होता. त्यानं कोर्टासमोर नऊ पानी लेखी कबुलीजबाब सादर केला. त्यात त्यानं माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येपासून ते जनरल वैद्यांची हत्या का केली याची कारणं दिली होती. त्यात अर्थातच जर्नेलसिंग िभद्रनवाले याचाही उल्लेख होता. सुखाच्या हस्ताक्षरातल्या जबाबाची कार्बन कॉपी माझ्याकडे आजही असावी. हे सर्व खूपच अनपेक्षित होतं. सर सुखदेवपाशी गेले आणि त्यांनी त्याला कल्पना दिली, की ते त्याची केस लढण्यास असमर्थ आहेत. सरांच्या निर्णयाचं मला प्रथम आकलन झालं नाही. मग त्यांनी कोर्टाला सांगितलं, की आरोपीनं त्यांना कबुलीजबाब देताना विश्वासात घेतलं नाही. अशा परिस्थितीत आरोपीला ‘डीफेन्ड’ करणं हे वकिली पेशाच्या रिवाजांना (नॉम्र्सला) धरून नव्हतं. त्यांनी सांगितलं I can defend act of the accused and not the cause of the accused.कोर्टानं आम्हाला वकीलपत्र काढून घेण्याची परवानगी दिली. तिथे थांबण्याचं काहीच प्रयोजन नव्हतं, म्हणून आम्ही बाहेर पडलो.

सुखदेवसिंग हा अत्यंत भावनाशील आणि भावनाप्रधान (‘इम्पल्सिव्ह’) असा २३-२४ वर्षांचा कोवळा तरुण होता. तो जेव्हा पकडला गेला, तेव्हा इंग्लिश साहित्यात ‘एम.ए.’ करत होता. त्यानं लिहिलेला Queen of Belinda हा निबंध मी वाचला होता. त्याचे वडील साधे पंजाबी शेतकरी. ‘अंडा सेल’मध्ये तो भरपूर व्यायाम करत असे. त्याची लांब उडी जवळजवळ १६ फूट होती. त्यानं शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण घेतलं होतं. सुखा आणि जिंदानं मला त्यांचे अल्बम कौतुकानं दाखवले, तेव्हा मला धक्का बसला होता. अगदी १०-१२ वर्षांची शीख मुलंमुली स्टेनगन्स, पिस्तूल, तलवारी यांचं प्रशिक्षण घेताना आणि हाताळताना दिसत होते.

एका सकाळी सुखदेवचे वडील आणि बहीण आमच्या ऑफिसमध्ये आले. बहीण छोटीशी, गोरीपान, सैलसर पंजाबी ड्रेस घातलेली. वडीलही देखणे होते. मात्र त्यांच्या चेहऱ्यावरच्या रेषा त्यांच्या मुलाचं भविष्य सांगत होत्या. ते घाबरून आमच्या ऑफिसमध्ये बसले होते. त्या वेळी पुण्यात शीख दहशतवादाबद्दल प्रचंड दहशत आणि चीड होती. त्यात हे दोघं पंजाबवरून दूरवर पुणे शहरात आले होते. एक आम्ही सोडलो, तर या शहरात त्यांच्या ओळखीचं कुणीच नव्हतं. त्यांच्या नजरेत भीती, असहायता आणि दगाफटका तर होणार नाही ना, असा सततचा भाव होता. मी अननस खाण्यासाठी काढला, कापून त्याच्या काही चकत्या मी त्यांना खाण्यासाठी दिल्या. त्यांनी नकार दिला. मी त्यांना आग्रह केला, कारण मला जाणवत होतं, की त्यांना भूक लागली असावी. तेव्हा ते म्हणाले, ‘‘पहले आप खाओ।’’ मी खाल्ल्यावर त्यांनी अननस खाल्ला. ते फळ त्यांनी पहिल्यांदाच खाल्लं होतं. त्यांना वाटत होतं, हे फळ झाडाला लटकतं, नारळासारखं! मग मी त्यांना सांगितलं की ते जमिनीवर उगवतं.

सुखदेववर आणखी एक केस होती. ती म्हणजे पोलीस आयुक्त भास्करराव मिसार यांना त्यानं पत्रानं जीवे मारण्याची धमकी दिली होती. ते एक इनलॅण्ड पत्र होतं. त्यात जनरल वैद्यांना मारल्याचा उल्लेख होता. नहार सरांनी ही केस मला स्वतंत्ररीत्या चालवायला दिली. सुखानं त्याला होकार दिला. त्या केसमध्ये मी मिसार यांची दोन तास उलटतपासणी घेतली (त्यानंतर काही वर्षांनी जेव्हा ते मला भेटले, तेव्हा त्यांनी ती उलटतपासणी आवडल्याचं मला सांगितलं होतं.). सत्याचा भाग हा होता, की हे पत्र सुखदेवसिंगनं लिहिलेलंच नव्हतं. तो खोटा, पेरलेला पुरावा होता. त्याचं म्हणणं असं होतं, ‘‘मी हे असं धमकीचं पत्र कशाला लिहीन?’’ कारण निनावी पत्र हे त्याला भ्याडपणाचं वाटत होतं आणि असल्या शेळपट आरोपाखाली आपल्यावर खटला चालतोय याचा त्याला राग होता. तो मला म्हणाला, ‘‘हम इनको धमकी क्यूँ देते? अगर चाहते तो हम इनको उडा देते। जैसे जनरल वैद्य को मार दिया।’’ आरोप खोटा होता म्हणून आम्ही डीफेन्ड करत होतो.

या एक ते दीड वर्षांत सुखावरचे आणि त्याच्या सहकाऱ्यांचे तीन ते चार खटले उभे राहिले आणि ते आम्ही चालवले. या खटल्यांमध्ये वेळोवेळी शीख समाजाच्या मानसिकतेचं विश्लेषण आम्ही करत असू. सुखा, निर्मलसिंग, जिंदा ही सगळी तिशीच्या आतली तरुण मुलं होती. त्यांची कृती त्यांच्या दृष्टीनं योग्य होती. ते त्यांनी शोधलेलं प्रश्नांवरचं उत्तर होतं. रीतीशी त्यांना सोयरसुतक नव्हतं. एकदा निर्मलसिंग किंवा इतर कुणा अतिरेक्याची बायको त्यांचा छोटा, दीड वर्षांचा मुलगा घेऊन भेटायला आली होती. त्यांच्याकडे बघताना माझ्या मनात विचार आला, ‘उद्या या अतिरेक्यांना शिक्षा होईल. एखाद् वेळेस फाशी! ते छोटं बाळ उद्या मोठं झाल्यावर त्याची आई त्याला काय सांगेल, ‘पंजाबच्या स्वातंत्र्यासाठी तुझे वडील फासावर गेले?’ म्हणजे पुढच्या पिढीसाठी तो प्रश्न तसाच निरुत्तर करणारा. सुडाचा प्रवास असा असतो का? कदाचित!’मला जिंदा कधीच आवडला नाही. जिंदा मला कायम क्रूर आणि जन्मत:च गुन्हेगारी स्वभाव असलेला वाटायचा. सुखदेव- सुखा मात्र वाट चुकलेला आणि डोळय़ांत दु:ख असलेला तरुण वाटत असे.

सुखदेवसिंग म्हणत असे, ‘‘हम गुनाहगार, खुनी नहीं हैं। हम martyr हैं। अगर हम खुनी होते, तो हम जनरल वैद्य के बॉडीगार्ड क्षीरसागर और उनकी पत्नी भानुमती- जो आय-विटनेसेस हैं, उन्हें भी मार डालते। गोली चलाने में कोई दिक्कत नहीं थी। उन्होंने सिखोकें खिलाफ कुछ गुनाह नहीं किया था। निरपराध को मारना यह गुनाह हैं। जनरल वैद्य पंजाब के लिए दोषी थे। उन्होंने पवित्र सुवर्ण मंदिर में लष्करी कारवाई की। उसकी सजा हमनें उन्हें दी। इसीलिए हमने उनपर गोली चलाई।’’

हे ऐकल्यावर मी त्याला म्हटलं, की ‘‘जनरल वैद्य यांनी वरिष्ठांचा हुकूम ऐकला आणि त्याची अंमलबजावणी केली. म्हणून ते लष्कर घेऊन सुवर्ण मंदिरात आले होते. जनरल वैद्य हे कर्तव्य बजावत होते. त्यात त्यांची काय चूक?’’ मी त्याला पुढे उदाहरण दिलं, ‘‘आरोपी म्हणून तुझे जे मूलभूत हक्क आहेत ते राखण्यासाठी कोर्टानं सरांची आणि माझी नेमणूक केलेली आहे. वकील म्हणून ते आमचं कर्तव्य आहे. हे न आवडल्यामुळे जर मला कुणी पिस्तूलाच्या गोळय़ा घातल्या तर ते योग्य होईल का?’’ या माझ्या बोलण्यावर सुखदेव हसत म्हणे, ‘‘आप तो गांधीजी जैसा आग्र्युमेंट करती हैं।’’

दिवसभर कोर्टात शीख दहशतवाद, दहशतवादी कृत्य यावर तर्क-विश्लेषण करून आम्ही कोर्टातून बाहेर पडत असू, तेव्हा आम्ही खडकीमधून येत असू. तिथे सदर्न कमांडची खूप मोठी शीख रेजिमेंट होती. तगडे पंजाबी सैनिक, गणवेशातले, कवायत करताना किंवा टेहळणी करताना दिसत. ते देशासाठी कितीतरी मौल्यवान होते! मला या दोन शीखांमधला विरोधाभास प्रखरपणे जाणवत असे.

२६/११ चं भीषण हत्याकांड झाल्यानंतर सरकारकडून काही दिवसांतच उच्च न्यायालयाला विनंती पत्र आलं, की कसाबला पकडल्यामुळे या खटल्यासाठी विशेष न्यायालयाची निर्मिती आणि विशेष न्यायाधीशांची नेमणूक लगेच करायला हवी. सकाळी पत्र माझ्याकडे आल्यावर मी तातडीनं चीफ जस्टीस स्वतंत्रकुमार यांच्यापुढे ठेवलं. ‘‘Find out who can be appointed…’’ ते म्हणाले. माझ्या लक्षात आलं, की कसाबची केस जरी ‘ओपन अॅण्ड शट’ अशी दिसत असली, तरी ती तशी नाही. कारण या भयानक अतिरेकी हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा सहभाग वरकरणी तरी दिसत होता. त्यातही जो नृशंस संहार झाला त्यामुळे सर्व जगाचं लक्ष असलेला हा खटला असणार. भारतात लोकशाही असल्यानं भारतीय न्यायव्यवस्था न्यायाचा सन्मान (Rule of Law) किती करते आणि कोणत्याही आरोपीला, अगदी शत्रूलासुद्धा ‘फेअर ट्रायल’ देण्याची लोकशाहीची मूल्यं कशी जपते, याचा कस पाहाणारा तो खटला होता. त्यासाठी फौजदारी प्रक्रिया, मारल्या गेलेल्या देशबांधवांना, त्यांच्या नातेवाईकांना न्याय मिळणं, याबरोबरच आरोपीचे हक्क, या सर्वाचा समतोल राखणारा, तसंच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील माध्यमांवर होणाऱ्या चर्चाच्या दबावाखाली न येता खटला सुरळीतपणे तडीस नेणारा खंबीर न्यायिक अधिकारी हवा होता. न्या. तहिलीयानी यांचं (निवृत्त न्यायमूर्ती एम. एल. तहिलीयानी) नाव माझ्या डोळय़ासमोर आलं. न्यायाधीश म्हणून फौजदारी प्रकरणांचा वेगानं निपटारा करण्याचा त्यांचा मोठा अनुभव तर होताच, पण न्यायालयीन कामकाजाचा दृष्टिकोन किंवा मानसिकताही (Judicial Temperament)) उत्तम होती. त्यांच्या शांत स्वभावात एक विनोदाची मिश्कील छटा होती. तेव्हा ते माझ्यासमवेत रजिस्ट्रीत काम करत होते. मी न्या. तहिलीयानी यांना बोलावून विचारलं, ‘‘तुम्ही हे काम करण्यास योग्य आहात. तर हे कराल का?’’ ते म्हणाले, ‘‘मॅडम, जरूर.’’ चीफनी त्यांचं नाव मंजूर केलं आणि तो खटला त्यांच्यापुढे चालला हे आपल्या सर्वानाच माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयात त्यांचा फाशीचा निर्णय कायम ठेवून कसाबला फाशी झाली. बऱ्याचदा आपल्या मनात प्रश्न असतो, की ‘कशाला हे खटल्याचं नाटक आणि आरोपीवर एवढा खर्च? मारून टाकायचं!’ नाही! लोकशाही व्यवस्थेमध्ये हे असं करता येत नाही. प्रत्येक आरोपीचा गुन्हा सिद्ध व्हावा लागतो. त्या व्यक्तीला ती स्वत: निरपराधी आहे हे सांगण्याचा आणि केस लढवण्याचा अधिकार असतो. इथे Rule of Law महत्त्वाचा! ‘राज्यघटना’ हाच या देशाचा सर्वाना लागू असलेला कायदा आहे आणि तिचं रक्षण करण्याची जबाबदारी न्यायव्यवस्थेवर आहे.

एन्काऊंटर, युनियन बँक दरोडा या सर्व खटल्यांच्या वेळेस सुखदेव, जिंदा, निर्मलसिंग आणि इतर दोघे हे कोर्टात पांढरी शुभ्र चुडीदार, पांढरा अंगरखा, डोक्याला बांधलेल्या रंगीबेरंगी पगडय़ा, अशा पेहरावात येत असत. कधी फक्त घोटय़ापर्यंत असलेला अंगरखा घालत असत. त्या सगळय़ांचे कपडे पांढरेशुभ्र असत. जेव्हा ते आत येत, तेव्हा त्यांनी लावलेल्या अत्तराचा एक विशिष्ट गंध येत असे. ते अत्तर ओल्या मातीच्या वासाचं असे. तो गंध अगदी वेगळा होता. त्यांनी दहशतवादी कृत्यं केली होती यात काही संदेह नव्हता. सुखा आणि जिंदाला फाशीची शिक्षा झाली. त्यांना शिक्षा मिळणं सर्वार्थानं योग्य होतं, कारण त्यांनी गुन्हे केले होते. परंतु सहवास ही एक अशी गोष्ट आहे, की ती हळूहळू आपुलकी निर्माण करते. माणसाबद्दलच नाही तर प्राण्यांबद्दलसुद्धा! तर दुसरी बाजू म्हणजे सहवास ही अशीही गोष्ट आहे, की ती एकमेकांबद्दल तिरस्कार व घृणा निर्माण करते.

जनरल वैद्यांच्या खटल्यात जिंदा आणि सुखदेवसिंग यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यावर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलं. ऑक्टोबर १९९२च्या सुमारास मला निरोप आला, ‘‘आपको सुखदेवसिंगने मिलनेको बुलाया हैं।’’ तोपर्यंत सुखा नावाचं प्रकरण वकील म्हणून आमच्या लेखी संपलं होतं. मला हा निरोप आल्यावर कळेना की त्यानं मला असा निरोप का दिला असेल? मी दुसऱ्या दिवशी जायचं निश्चित केलं. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रामध्ये बातमी होती, की सुखा आणि जिंदाला फाशीचं वॉरंट! माझ्या लक्षात आलं. मी फाशी जाणाऱ्या कैद्याला भेटायला जाणार होते. दुसऱ्या दिवशी मी ‘अंडा सेल’च्या खिडक्यांच्या बाजूला प्रवेश केला, जेलरनं तिथे स्टूल ठेवलं. मी आल्याचं पाहाताच सुखा मला भेटायला आला. खिडकीच्या एका बाजूला तो हसतमुखानं उभा होता. त्यानं हात जोडले आणि म्हणाला, ‘‘आप आयी इसलिए धन्यवाद। आपने हमारी केस चलायी। नहार सर को प्रणाम। हम तो अब चले। बस दो दिन में फाँसी का फंदा होगा। लेकिन आपको प्रशाद के लिए बुलाया हैं।’’ त्याच्या सांगण्यावरून तिथल्या सेवकानं एक बुंदीचं पाकीट आणलं. ती शुद्ध तुपातली ताजी बुंदी होती. सुखदेवनं ते पाकीट माझ्या हातात दिलं. तो म्हणाला, ‘‘हम चलनेवाले हैं। इसका प्रशाद आपको दिया।’’ माझ्या तोंडून शब्द फुटेना. मी त्याच्या हाताला सांत्वनाचा स्पर्श केला, तो पहिला आणि शेवटचा. तिथून मी बाहेर पडले.

काही दिवसांत (मला वाटतं, तो १० ऑक्टोबर १९९२चा दिवस होता) वर्तमानपत्र उघडलं, पहिल्या पानावर मोठी बातमी ‘जनरल वैद्यांच्या मारेकऱ्यांना फाशी!’ जनरल वैद्यांच्या हत्येला न्याय मिळाला होता हे योग्यच. सुखदेव हा जनरल वैद्यांचा मारेकरी फासावर गेला.
पण त्याच वेळी माझ्या डोळय़ात अश्रू आला, तो सुखदेवसिंग नावाच्या वाट चुकलेल्या माणसासाठी!
chaturang@expressindia.com