सुमित्रा भावे / सुनील सुकथनकर  

चित्रपट करताना एखाद्या असाध्य रोगाला पकडून प्रेक्षकांची सहानुभूती मिळवणारी त्या रोगी माणसाची शोकांतिका मांडावी तसं ‘एड्स’ला धरूनही करणं कदाचित सोपंही गेलं असतं. पण सुमित्राला या आजाराच्या सामाजिक-मानसिक गुंतागुंतीपर्यंत पोचावंसं वाटलं. इथूनच

‘ज़िन्दगी ज़िन्दाबाद’च्या वेगळेपणाला सुरुवात झाली. या चित्रपटातून जे ‘विश्वरूपदर्शन’ आम्हाला सर्वाना घडत गेलं, ते आज माध्यम-स्फोटानंतरच्या तरुणांना उमगणारच नाही..!

सुमित्रा ‘स्त्री-वाणी’ या संस्थेत काम करत असताना ‘बाई’ या पहिल्या लघुपटाची निर्मिती झाली. ‘संशोधनाच्या निष्कर्षांवर लघुपट कर’ असं प्रोत्साहन तिला देणाऱ्या डॉ. फ्रान्सिस यासस या अमेरिकी वृद्ध बाई सुमित्रा ‘स्त्री-वाणी’ सोडून पूर्ण वेळ चित्रपट-निर्मितीत उतरलेली पाहून आनंदित व्हायच्या. सामाजिक संशोधन चित्रपट माध्यमात प्रतिबिंबित करण्याच्या या वाटचालीत ‘दोघी’ ही फीचर फिल्म तयार होत होती, ही घटना त्यांना फार आनंद देणारी होती.

‘दोघी’चं काम चालू असतानाच अचानक या फ्रान्सिस आजी आमच्याकडे आल्या. त्या खूप अस्वस्थ होत्या. त्यांनी सुमित्राला एक फीचर फिल्म करण्याची विनंती केली. ‘एचआयव्ही-एड्स’ या विषयावर. कारणही तसंच काळजाला भिडणारं होतं. ‘स्त्री-वाणी’ संस्थेत सफाई कामगार असणाऱ्या एका बाईंच्या मुलाला फ्रान्सिसआजी नातवाप्रमाणे सांभाळत असत. तो मुलगा राहुल, चक्क इंग्रजीत या आजीशी बोलायचा. तो जेमतेम १६ वर्षांचा होता आणि ‘एड्स’ग्रस्त होता. फ्रान्सिसआजीप्रमाणे आम्हीही हादरलो. त्यांची विनंती मनापासून स्वीकारली. पण फीचर फिल्मसाठी (तेही हिंदीत) लागणारा कमीतकमी खर्चसुद्धा तेव्हा सुमारे २०-२२ लाख रुपयांचा होता. डॉलरच्या गणितात तो फ्रान्सिसना कळत नाहीये, असंच मला वाटून गेलं! पण एका आठवडय़ात त्यांनी (त्यावेळच्या बँकिंग तंत्रज्ञानाचा वापर करत) तेवढे पैसे सुमित्राच्या खात्यात टाकलेदेखील! आणि बघता-बघता सुरू झाला प्रवास आमच्या दुसऱ्या फीचर फिल्मचा ‘ज़िन्दगी ज़िन्दाबाद’चा. लवकरच आम्ही त्याचं नामांकन ‘झेड झेड’ असं केलं.

‘दोघी’चं काम संपता-संपता आम्ही या नव्या अभ्यासाला लागलो. ‘दोघी’चे तेव्हाचे अनेक सहकारी उत्सुक होतेच. सुरुवातीलाच सुमित्रानं एक भूमिका पक्की केली. एखाद्या असाध्य रोगाला पकडून प्रेक्षकांची सहानुभूती मिळवणारी त्या रोगी माणसाची शोकांतिका मांडू नये. तसं ‘एड्स’ला धरूनही करणं चित्रपटासाठी कदाचित सोपंही गेलं असतं. पण सुमित्राच्या सामाजिक संशोधनाच्या पार्श्वभूमीमुळे तिला या आजाराच्या सामाजिक-मानसिक गुंतागुंतीपर्यंत पोचावंसं वाटलं. इथूनच ‘झेड झेड’च्या वेगळेपणाला सुरुवात झाली. या चित्रपटातून जे विश्वरूपदर्शन आम्हाला सर्वाना घडत गेलं, ते आज माध्यम-स्फोटानंतरच्या तरुणांना उमगणारच नाही..!

१९९५ चं वर्ष. मोबाईल, इंटरनेट दृष्टिपथातही नव्हते. मी साधारण तिशीच्या आतला, सुमित्रा आमच्या आई-बाबांच्या पिढीची, काही सहकारी चाळिशीपुढचे तर काही अगदीच राहुलच्याच पिढीचे. काही वर्षांपूर्वी अनिलकाकाच्या (अवचट) ‘गर्द’ या पुस्तकातून ड्रग्स, गुन्हेगारी, तरुणांची वाताहत, कुटुंबांची धूळदाण समोर आली होती. त्यावर ‘मुक्ती’ हा चित्रपट करताना मध्यमवर्गीय चौकटीबाहेरचं एक भयानक वास्तव दिसलं होतं. ते मला तरी खूपच अनोळखी होतं. आणि आता ‘एड्स’! राहुल आणि त्याचं आयुष्य हे आमचं त्यासाठीचं प्रवेशद्वार होतं. ‘समिलगी संबंध’ हा शब्दप्रयोग उच्चारायलासुद्धा लाज-भीती वाटेल असा तो काळ. पौगंडावस्थेतल्या मुलाचं वेश्यांकडे जाणं, तरुण मुलांची आपापसातली लैंगिक साहसं, वस्तीतल्या मुताऱ्यांमध्ये लहान मुलांवर होणारे बलात्कार- हजारो गोष्टी राहुल निर्वकिारपणे आम्हाला सांगत होता.

दुसरीकडे ‘एड्स’च्या शोधाचा प्रवास आम्हाला पुढे-पुढे नेत होता. आंतरराष्ट्रीय संस्थांशी पत्र-व्यवहार चालू होता. ग्रंथालयं पालथी घातली जात होती. तेव्हा ‘एड्स’चं खापर कोणावर फोडायचं या भावनेतून ‘गोरे देश’ आफ्रिकेला दोषी ठरवून मोकळे होत होते. मुख्य प्रवाहातला समाज तर समिलगी प्रेमाला दोष देत होता. ‘एड्स’ हा एक विकारांचा समुदाय आहे, एचआयव्ही हा एक विषाणू आहे, हा विषाणू फक्त आणि फक्त शरीरातल्या द्रवांतच जगतो आणि त्यातूनच दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो, त्यानं रोगप्रतिकारकशक्ती संपत जाऊन माणूस मरू शकतो. एकेक गुह्य़ं उलगडत होती..

रक्त-दान, ब्लड-ट्रान्सफ्यूजन या गोष्टी  एचआयव्हीची लागण होण्याची कारणं म्हणून पुढे येत होत्या. पण मुख्यत: ‘अनैतिक’ शरीर-संबंध ठेवणाऱ्या ‘तसल्या’ लोकांना आणि ‘समिलगी संबंध’ ठेवणाऱ्या ‘आणखी वाईट’ लोकांना एचआयव्हीची बाधा होते-असा निष्कर्ष तथाकथित पुढारलेले देश आणि समाजही काढून मोकळे होत होते! आमच्यातले एक सहकारी म्हणालेदेखील, ‘‘या लोकांना त्यांच्या ‘वाईट वर्तनाची शिक्षा’ म्हणून हा रोग होत असेल तर मुळात त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगायचीच कशासाठी? मरू देत त्यांना.. भोगू देत आपल्या कर्माची फळं..!’’ आम्ही सगळेच हादरून गेलो. म्हणजे भ्रष्टाचारी, अत्याचारी, खुनी, गुन्हेगार यांच्यापेक्षा भयानक तथाकथित ‘अनैतिक’ माणसं? म्हणजे समाजाच्या तत्कालीन नियमांना झुगारणाऱ्या शरीरसंबधांना मृत्युदंड?

एचआयव्ही एड्सला इतर जीवघेण्या रोगांसारखी कीवसुद्धा नशिबी नव्हती. कारण या रोगाभोवती ‘अनैतिकतेचं’ वलय होतं. आमच्या हे लक्षात आलं, की हा चित्रपट बनवण्यासाठी आम्ही मूल्यात्मकदृष्टय़ा तयार होणं आवश्यक आहे. आणि ते फक्त नेतृत्वानं नव्हे तर सर्व सहकाऱ्यांनीदेखील. सुमित्रानं आम्हा सर्वासाठी एक कार्यशाळा आयोजित करायचं ठरवलं. वेश्यांमध्ये काम करणारे, लैंगिक रोगांवर उपचार करणारे, ‘एड्स’बद्दल जागरूकता तयार करणारे अशा अनेक तज्ज्ञांना आम्ही भेटत होतो. पुण्याची बुधवार पेठ-दाने आळी, मुंबईचा फोरास रोड येथे गेलो. अनेक कुंटणखान्यांना भेटी दिल्या. गिऱ्हाईकांना ‘कंडोम वापरा’ म्हणून सांगूनही त्यांनी नकार दिल्याने विषाणूग्रस्त होणाऱ्या शरीरविक्रय करणाऱ्या असहाय स्त्रिया पाहिल्या. (‘दोघी’ मधल्या गौरीचं काय झालं असेल ते अचानक डोळ्यांसमोर आलं.) ‘दोघी’मधल्या गौरीप्रमाणेच त्या नरकात राहूनदेखील त्या मुलींच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा अबाधित दिसल्यावर समाजातल्या पुरुषी दुटप्पीपणाचा संताप आणखी वाढला. हे पुरुष अशा ठिकाणी घेतलेला रोग घरच्या अनभिज्ञ बायकांपर्यंत पोचवतात आणि अशा ‘एड्स’ग्रस्त बाईला तिचा काहीच दोष नसताना तिचं कुटुंब घराबाहेर काढतं-अशा कथा उलगडत गेल्या. कोणीच सुरक्षित नाहीये, हे लक्षात आलं. ससून रुग्णालय, जे.जे.रुग्णालय इथले मृत्युशय्येवरचे ‘एड्स’चे रुग्ण पाहिले. त्यांच्या अंगावरची झडणारी त्वचा पाहिली. (आमच्या मेकअप मनना दाखवली..!) त्या काळात अनेक डॉक्टर्स आणि नस्रेसनी या रुग्णांची शुश्रूषा करायला नकार दिल्याच्या गोष्टी ऐकल्या. ब्लड-बँकांची वाईट परिस्थिती पाहिली. दुसऱ्या बाजूला ‘एड्स’ झाला म्हणून घराबाहेर काढलेल्या मित्राची काळजी घेणारा राहुल दिसत होता. रस्त्यावरची बेवारस हिंडणारी पोरं या गत्रेत जाऊ नयेत म्हणून त्यांना हक्काचं घर देऊ पाहणारा मुंबईतला वडाळ्याचा ख्रिश्चन फादर भेटत होता. ‘आपली संस्कृती महान आहे, इथे असा रोग येणं शक्यच नाही’, असं म्हणणारे महाभागही भेटत होते. ‘एड्स’वर आंतरराष्ट्रीय संघटनांचं लक्ष आहे हे पाहून वरवरचे उपक्रम चालवून गबर होणाऱ्या संस्थाही दिसत होत्या.

..आणि सुमित्राच्या डोळ्यांसमोर तयार झालेली कहाणी आमच्यापर्यंत पोचू लागली. ती एकटय़ा-दुकटय़ा माणसाची कहाणी नव्हती.. ती होती पूर्ण समाजाची. हा एचआयव्ही विषाणू गरीब-श्रीमंत भेदभाव करत नाही, जात-पात, धर्म मानत नाही, स्त्री-पुरुष समान मानतो, वयाचा मुलाहिजा बाळगत नाही, असं वाटलं, जणू काही ‘एचआयव्ही-एड्स’च्या या साखळीनं आपला सारा समाज एकमेकांना बांधला गेलाय..! या सगळ्या कल्लोळात एक दुहेरी जाणीव सुमित्राच्या संहितेतून व्यक्त होत होती. एका बाजूला करुणा-अनुकंपा-निरपेक्ष प्रेम. हा रोग झालेल्या व्यक्तीवर नैतिक-अनैतिकतेचा शिक्का न मारता त्याच्या-तिच्या उरलेल्या चार क्षणांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणं ही या नाण्याची एक बाजू. दुसरीकडे या रोगाची लागण होऊ नये यासाठीच्या सुरक्षिततेचा विचार करताना जाणवणारं जगण्याचं महत्त्व. कुणी म्हणेल देवानं दिलेलं तर कुणी म्हणेल वाटय़ाला आलेलं- पण प्रचंड मोलाचं असं हे आपलं आयुष्य.

त्याची धूळधाण आपल्याच हातांनी न करण्याचं शहाणपण. दुर्दैवानं मृत्यूच्या जवळ गेलेल्यांच्या आणि त्यातूनच जागं होऊन जगण्याची किंमत कळलेल्या सर्वाच्याच जीवनाला सलाम. म्हणून ‘ज़िन्दगी ज़िन्दाबाद’. ‘झेड झेड’ आम्हा सर्वाच्या मनात उतरत होता. आम्ही सगळे मोकळे होत होतो. प्रेम म्हणजे काय, शारीरिक संबंध या गोष्टीचं आयुष्यात महत्त्व काय व किती, लैंगिकता आणि शारीरिकता यांचा एकमेकांशी असणारा मेळ, समाजात सेक्सभोवती असणारं भयानक कुतूहल, ते दाबण्याची प्रवृत्ती, कुटुंबव्यवस्था आणि सामाजिक नीती-नियम यामागे दडलेला खोटेपणा आणि दुटप्पीपणा, शिव्यांपासून ते गलिच्छ बोलताना होणारा अवयवांचा उल्लेख आणि उद्धार -अनेक विषयांवर आम्ही वेगवेगळ्या वयाचे स्त्री-पुरुष लीलया बोलू लागलो होतो. श्लील-अश्लील यांची कृत्रिम पुटं गळून पडत होती. ती आवरणं किती बेगडी होती, हेही कळत होतं. प्रत्येकाची वैयक्तिक मूल्यव्यवस्था वेगवेगळी असेलही, पण निदान नैतिकतेच्या बडेजावातून उंच-नीच ठरवणं त्या गटामधून पूर्ण हद्दपार झालं. मी स्वत: त्या वेळी ‘पुरुषांमध्ये समलैंगिक प्रेम असूच कसं शकतं’, असं आश्चर्य वाटणाऱ्या जमातीतला होतो. (जणू काही स्त्रियांना तसं वाटलं तर माझी मान्यता होती..! कारण त्या मुळातच ‘छानच’ असतात..!) या निखळ पुरुषी ठोंबेपणाला तडे जाऊ लागताच कळलं की माझ्या भोवतालचे काही मित्र ‘तसे’ आहेत.. मोकळेपणे स्वत:ची लैंगिकता मान्य करणं, कुटुंबीय आणि मित्र-मत्रिणींशी सहज व्यक्त होणं हे आजही अवघड आहे, तेव्हा तर हा विषय खूपच सतरंजीखाली सारलेला होता.. आणि मग स्वत:च्या कोतेपणाचं आणि अज्ञानाचं हसू आलं. कदाचित या काही जणांना आपली समलैंगिक जाणीव मान्य आणि व्यक्त करायला ‘झेड झेड’मुळे बळही मिळालं असेल..!

‘झेड झेड’ पूर्ण झाला. हिंदीमध्ये असूनही त्याला वितरक मिळाले नाहीत. पण अनेक विशेष खेळांमध्ये तो दाखवला जाऊ लागला. मात्र हे सगळं पाहायला राहुल नव्हता. त्यानं घडवलेलं विश्वरूपदर्शन आम्हाला संकुचित भिंतींमधून बाहेर काढणारं ठरलं. त्यानं त्याचं आयुष्य उधळून टाकलं आणि त्यातून आम्हाला जगण्याचं मोल शिकवलं. मृत्यूच्या दारात असताना त्यानं त्याच्या मित्राची केलेली शुश्रूषा करुणेचं भान देणारी होती. हा चित्रपट आम्ही त्यालाच समर्पित केला आहे. ‘झेड झेड’ बनत जाण्याची प्रक्रिया हा एक स्वतंत्र विषय आहे. तो पुढच्या (१जूनच्या) लेखात.. तोपर्यंत, ज़िन्दगी ज़िन्दाबाद!

sunilsukthankar@gmail.com

chaturang@expressindia.com