आरती अंकलीकर

‘‘डोळे, नाक, स्पर्शेद्रिय, जिव्हा आणि कान या पंचेंद्रियांची कवाडं उघडून त्यामध्ये गायकाला राग भरायचा असतो.. नव्हे, राग होऊन जायचं असतं! आजूबाजूला काहीही सुरू असो, कितीही अडचणी येवोत, मैफलीत गायला बसण्याआधी मनातली सर्व जळमटं दूर सारून सूरमय व्हायचं असतं. हासुद्धा एक रियाझच असतो..’’

Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
pet dog save child from falling down the stairs
… म्हणून कुत्रा माणसाचा चांगला मित्र आहे, कुत्र्याने चिमुकलीला पायऱ्यांवरून पडताना वाचवले; पाहा VIDEO
women murdered in Kenya
विश्लेषण : केनियात महिलांच्या इतक्या प्रमाणात हत्या का होताहेत? काय आहे ‘डार्क व्हॅलेंटाइन’ चळवळ?

पुण्यातला कार्यक्रम. थोडं दूर होतं सभागृह. अर्धा तास तरी लागेल पोहोचायला, असा विचार करत होते. आयोजकांनी पाठवलेली गाडी कधीच येऊन थांबली होती आणि माझीही तयारी झाली होती. देवाला नमस्कार केला, आईला नमस्कार केला आणि गुरूंना स्मरून खाली उतरले. बाहेर पांढरी इनोव्हा पाहून शांत वाटलं मनाला. रंगाचा प्रभाव!

   गेले काही दिवस आजच्या मैफलीत गायचे राग मनात घोळतायत. ‘मारुबिहाग’ गायचं ठरवलं होतं. गाडीत बसले. चालू असलेला रेडिओ आधी बंद करायला लावला. माझ्या मनात तयार होणाऱ्या ‘मारुबिहाग’च्या चित्राचा रसभंग करत होता त्यावेळी तो रेडिओ! मला ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसायला आवडतं. कारण तिथे आजूबाजूचा अगदी ‘अनइंटरप्टेड’, स्वच्छ ‘व्ह्यू’ मिळतो. दूरवर जाणाऱ्या रस्त्यावर नजर रोखली की माझ्या मनातल्या विचारांच्या पसाऱ्यात गुंतलेला ‘मारुबिहाग’ शोधायला मदत होते. बाजूनं

उगाच हॉर्न वाजवत सुटणारे, सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगवर गाडी थांबवून बिचाऱ्या पादचाऱ्यांना असुविधा निर्माण करणारे ड्रायव्हर्स बघून वाटत होतं, ‘यांचं करायचं काय? यांना कोण शिकवणार? हे कधी आणि कसे शिकणार?’ वगैरे. गाडीनं वेग घेतला आणि माझं मन परत ‘मारुबिहाग’ शोधू लागलं. एखाद्या वेगात आलेल्या गाडीच्या इंजिनमधून येणारा सूर, गाडीमध्ये दरवळणारा मंद सुवास, समोर क्षितिजापर्यंत दूरवर दिसणारा रस्ता.. इतक्यात अचानक डावीकडून एक स्कूटरवाला आला आणि सिग्नल न देता उजवीकडे वळला. आमच्या ड्रायव्हरनं कचकन ब्रेक दाबला. गाडीबरोबरच विचारांनाही ब्रेक लागला आणि मन एकदम दहा वर्षांपूर्वीच्या एका रविवारी जाऊन पोहोचलं..

त्या दिवशी बाबांची तब्येत जरा बरी नव्हती. रविवारी सकाळी ९.३० वाजता पनवेलला गाण्याचा कार्यक्रम ठरला होता. दोन दिवसांचा संगीत महोत्सव होता तिथे. रविवारच्या सकाळच्या सत्रात माझं गाणं होतं. बाबांच्या तब्येतीमुळे शनिवारी मला निघणं शक्य नव्हतं. संयोजकांना बरोबर सकाळी साडेनऊला कार्यक्रम सुरू करायचा होता. मी ड्रायव्हरला सकाळी सहा वाजता बोलावलं होतं आणि वादकांनादेखील. सम ही पहिली मात्रा. समेवर येणं, सम गाठणं म्हणजे पहिल्या मात्रेवर येणं. काही क्षणांनंतर समेवर येऊन चालत नाही. तसंच सहा हे सहाच वाजता वाजतात! या नियमाप्रमाणे सगळे वादक, शिष्य नेहमी वेळेवर येतात. सहा वाजता शिष्या आणि तबलावादक आले. पहाटे साडेचार वाजता ड्रायव्हरचा फोन आला होता की, ‘मावशी गेली, मी येऊ शकत नाही.’ इतक्या पहाटे दुसरा ड्रायव्हर मिळणं अशक्यच. मीच ड्रायिव्हग करायचं ठरवलं. मरून रंगाची आयकॉन. संवादिनीवादक अजून आला नव्हता. फोन केला त्याला बऱ्याच वेळा; पण तो फोनही घेत नव्हता. आता साडेसहा वाजले होते.

१२० किलोमीटर दूर पनवेल. मी ड्रायिव्हग करायचं, पोहोचायचं, मन एकाग्र करून नंतर तीन तास गायचं.. आलेल्या एक हजार श्रोत्यांचे प्रत्येकी तीन तास म्हणजे एकूण तीन हजार तासांची जबाबदारी माझ्यावर आहे असं वाटायला लागलं. मग आम्ही संवादिनी वादकाच्या घरीच जायचं ठरवलं.  त्याच्या घरी जाऊन बेल वाजवली तीन-चार वेळा. एका वेगळय़ाच मुलानं डोळे चोळत दरवाजा उघडला आणि हे सगळं सांगितल्यावर ओरडत आत जाऊन हार्मोनियम वादकाला उठवलं. रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमात वाजवून पहाटे गाढ झोप लागली होती त्याला! गाढ झोपेनं अलार्मलाही हरवलं होतं. पठ्ठय़ा तोंडावर पाणी मारून, खांद्यावर हार्मोनियम घेऊन माफी मागत गाडीत मागच्या सीटवर येऊन बसला आणि बसल्यानंतर पाच मिनिटांतच झोपलादेखील गाढ! मी स्टीअिरगवर, बाजूला तबलावादक. सात वाजले होते. गाडी भरधाव सोडली. अतिद्रुत! पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर.

 वेळेवर पोहोचायचं होतं. सम गाठायची होती. मूडपण ताब्यात ठेवायचा होता. तो खराब न होऊ देण्याचं आव्हान होतं. एकदाचे पोहोचलो नऊ वाजून दहा मिनिटांनी. ना ‘दत्त’चा वडा, ना मिसळ, ना चहा! हार्मोनियम वादकाला उठवलं. हॉलमध्ये गेल्या गेल्या गरम चहा घेऊन तयार झालो आणि ‘शार्प’ साडेनऊ वाजता रंगमंचावर बसलो. गाडी, ड्रायव्हर, उशीर, रस्ता, झोप, अलार्म, वेग, वळणं या विचारांच्या जळमटातून ‘जौनपुरी’ डोकावू लागली. एक एक जळमटं बाजूला करत मी अगतिकतेनं ‘जौनपुरी’ शोधू लागले.. असे काही काही अनुभव! अशा वेळी आजूबाजूला असलेल्या जंजाळातून, कोलाहलातून मन एकवटून सुरांचा मागोवा घेताना आणि श्रोत्यांना ऐकवण्यासाठी ठरवलेल्या रागातून नवं शोधताना कस लागतो; पण संगीताच्या सान्निध्यात हे तंत्र आपोआप शिकायला मिळत असावं आणि अंगी भिनतही असावं. गायकानं कधी सुरांची साथ सोडायची नसते, तो हा धडा असावा! हे विचार करता करता अचानक गाडी थांबली. दरवाजा उघडण्याचा आवाज आला. मी भानावर आले.

 पनवेलच्या विचारातून मन पुण्यात आलं परत. हॉलवर पोहोचलो. पांढऱ्या इनोव्हातून उतरले ‘मारुबिहाग’ला कुशीत घेऊन! एका मोठय़ा गवयाच्या मैफलीला जाताना सोबत असलेल्यांनी कोणतंही परफ्यूम लावू नये असा कटाक्ष होता. काहींना अ‍ॅलर्जी असते, शिंका येतात, आवाज बसतो, असं काहीसं असावं. काहींना विशिष्ट परफ्यूम लागतो. किशोरीताईंचाही होता असा आवडता परफ्यूम. त्यांना विशिष्ट रंगाची गाडीदेखील हवी असे. मरून रंगाची. रुमालदेखील मरून रंगाचा वापरत. साडीसुद्धा बहुतेक वेळा मरून रंगाचीच. डोळय़ांना आनंद देणारी विशिष्ट रंगाची गाडी, विशिष्ट परफ्यूमचा सुगंध, बोटांनी सुरेल तानपुरा छेडणं, त्या तानपुऱ्याचा स्पर्श, तोंडात खडीसाखर-लवंग किंवा नेहमीची सवयीची एखादी गोळी.. सगळीकडे भरून राहिलेला तानपुऱ्याचा झंकार. डोळे, नाक, स्पर्शेद्रिय, जिव्हा आणि कान या पंचेंद्रियांची कवाडं उघडून त्यामध्ये ‘मारुबिहाग’ भरायचा आहे. डोळय़ांनी ‘मारुबिहाग’ पाहायचा आहे, कानात सूर भरायचा आहे, स्पर्शातही सूर भरलेला  आहे. जिभेवर ‘मारुबिहाग’ नाचतोय. आता मनाची कवाडं बंद केली. पंचेंद्रियं सगळी ‘मारुबिहाग’मध्ये एकवटली. जप करताना, नामस्मरणाच्या वेळीसुद्धा आपण हेच करतो का?..

समोर इष्टदेवतेची मूर्ती नेत्रांसाठी, हातात जपमाळ स्पर्शेद्रियासाठी, उदबत्तीचा मंद सुगंध, कानात नामाचा जप-ओठावरही जप. मन एकाग्र करून ईश्वरमय व्हायचं. सगुणातून निर्गुणात जायचं. ‘मारुबिहाग’ गाणं आणि ध्यान हे एकच नाही का? सगुणातून निर्गुणाकडे नेणारं. एव्हाना मी पुण्याच्या हॉलमधल्या ग्रीन रूममध्ये पोहोचले होते. तानपुरे मिळवले मुलींनी. सुरेल झंकार. तबला सुरात मिळवला. षड्ज लावला. आता एकाग्र झालेल्या मनाच्या मागे धावण्यासाठी आवाज सज्ज झाला. ‘मन जिथे जाईल तिथे आवाज जाईल असा आवाज तयार करा,’ असं म्हणत किशोरीताई, अण्णा- भीमसेनजी तासन्तास खर्ज भरत असत. सुरेल भरदार आवाज कमावण्यासाठी! तहानभूक विसरून खडतर तपश्चर्या केली त्यांनी. डोळय़ांसमोर असे थोर आदर्श. माझ्या परीनं मीही केला रियाझ. मनात येईल तो विचार गाऊ शकणारा आवाज तयार करण्यासाठीचा रियाझ. मी तुम्हाला पुण्याच्या मैफलीची हकीकत सांगता सांगता माझ्याच मनातल्या चिंचोळय़ा गल्लीबोळांची सैर करवली!

 गेल्या वेळचा (१४ जानेवारी)लेख वाचून अनेक लोकांचे फोन आले. व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आले.  ई-मेल्सदेखील आले. वेगवेगळे विषय सुचवले वाचकांनी. दाद दिली. एक आवर्तन संपवून हुकमतीनी सम गाठली की श्रोत्यांच्या चेहऱ्यावर अवर्णनीय आनंद दिसतो. तो आनंद मला पुढचं आवर्तन भरण्याची ऊर्जा देतो. ते आव्हान स्वीकारण्याचा आत्मविश्वासही देतो.  तसंच तुमच्या अभिप्रायांमुळे वाटलं. पुढचं आवर्तन – हा लेख लिहिण्यासाठी मी सज्ज झाले. पुण्याचा कार्यक्रम छान निर्विघ्न पार पडला रंगमंचावर बसल्यानंतर प्रस्तुतीकरण करण्यासाठीची तालीम घ्यायला मात्र खूप लहानपणी सुरुवात केली होती मी. त्याबद्दल पुढच्या (११ फेब्रुवारीच्या) लेखात..