आरती अंकलीकर-टिकेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘माझं सुरांशी असलेलं नातं शब्दातीत, व्यक्त होण्याची संवादाची माझी भाषाही स्वरांची.. नादाची..! लहानपणापासून माझं सुरांशी घट्ट नातं जुळत गेलं आणि याच माझ्या सुरांनी मला खूप अनुभव दिले, माणसं भेटवली, मला संपन्न केलं. या लेखमालिकेतून तेच सांगत वाचकांशी सूरसंवाद साधायचा आहे. अर्थात त्यानिमित्ताने मी माझ्याशीच बोलू लागले आहे, मलाच समजून घेऊ लागले आहे, मलाच समजावू लागले आहे..! ’’

आरती अंकलीकर-टिकेकर या जयपूर अत्रौली घराण्याच्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आहेत. शास्त्रीय संगीतातील रागदारी ते सुगम संगीतातील सहजभाव या दोन्हीच्या बाबतीत त्यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांनी संगीताचे पहिले धडे आग्रा ग्वाल्हेर घराण्याच्या पं. वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे गिरवले. त्यानंतर जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका, गानसरस्वती किशोरीताई आमोणकर या त्यांना गुरुस्थानी लाभल्या. शास्त्रीय संगीतातील विविध दिग्गजांकडून संगीताची दीक्षा घेताना त्यांनी स्वत:ची अशी गायनाची शैली निर्माण केली. शास्त्रीय संगीताबरोबरच त्यांनी सुगम संगीत आणि लोकसंगीताला आपलंसं केलं, तसंच पार्श्वगायनातही स्वतंत्र ओळख त्यांनी निर्माण केली आहे.

प्रिय वाचकहो,

‘सूर संवाद’ला सुरुवात करायची ठरवलं आणि आठवले ते थेट बालपणीचे दिवस. साडेतीन-चार वर्षांची असेन मी.. आमच्या माटुंग्याच्या घरातील बाल्कनीमध्ये असलेल्या झोपाळय़ावर बसून, झोके घेत मी माझी पहिली गाण्यांची मैफिल सदर केली होती. सोलो कॉन्सर्ट. साथीदारांशिवाय.

मला येत असलेली बडबडगीतं, नर्सरी ऱ्हाइम्स, भजनं गाऊन.. माझा पहिला श्रोता माझी आई.. आणि मला मिळालेली पहिली दादही माझ्या आईची. संगीतातून संवाद साधण्याचा माझा प्रवास तिथं चालू झाला! सादरकर्ती मी आणि श्रोता आई. कधी कधी बाबासुद्धा. केवळ श्रोते नव्हते म्हणा ते, मला अगदी जवळून बारकाईनं पाहणारे, ऐकणारे समीक्षकसुद्धा आणि जिथे गरज पडेल तिथे टाळय़ा आणि लयदार टिचक्यांनी साथ देणारे माझे संगतकारसुद्धा! 

स्वरभाषेतून मी व्यक्त होणं अर्थात गाणं, ते श्रोत्यांच्या कानावर पडणं आणि त्यांनी त्याचा अनुभव घेऊन मला दाद देणं, त्यांच्या देहबोलीतून, डोलणाऱ्या मानेतून, चेहऱ्यावर उमटणाऱ्या भावातून ती माझ्यापर्यंत पोहोचणं, असा सुरू झाला संवादाचा प्रवास. आणि मग अशा अनुभवांची शृंखला. व्यक्त होण्याची संवादाची माझी भाषा स्वरांची, नादाची! 

मी एक गायिका म्हणून प्रस्तुतीकरण करण्याआधीचा टप्पा, प्रवास हा थोडा कष्टाचा. मेहनतीचा. कडक शिस्तीच्या असलेल्या माझ्या आईवडिलांनी तशाच शिस्तीच्या गुरूंची निवड माझ्यासाठी करणं यात नवल ते काय? इथे सुरू झाला विद्याग्रहणाचा, ज्ञानार्जनाचा, गुरू आणि शिष्याचा संवाद. गुरू-शिष्याचं नातं या काळात शिष्या म्हणून अनुभवलं आणि हेच नातं काही काळानंतर वेगळय़ा भूमिकेतूनही अनुभवता आलं. संवाद तोच, भूमिका बदलल्या.

गेला काही काळ श्रोत्यांशी, वाचकांशी संवाद साधावासा वाटतोय. पण भाषा शब्दांची! माझे जीवनातले अनुभव एक व्यक्ती म्हणून, गायिका म्हणून, श्रोता म्हणून, शिष्या, गुरू, मुलगी, बायको, सून, आई .. असे अनेक भूमिकांमधून आलेले! मी पाहिलेलं, जगलेलं जीवन तुम्हा सर्वासमोर मांडावं, तुम्हाला सांगावं असं वाटल्यानं हा सूर-संवाद. आज तुमच्याशी बोलण्यासाठी म्हणून कागदावर लिहू लागले आणि थोडय़ाच वेळात लक्षात आलं, की मी माझ्याशीच बोलू लागले आहे, मलाच समजून घेऊ लागले, मलाच समजावू  लागले आहे. तुमच्याशी संवाद साधणं म्हणजे माझा माझ्याशी झालेला संवादच असणार आहे.

रोज सकाळी मी दरवाजा उघडून वर्तमानपत्र हातात घेते. ताजं वर्तमानपत्र, त्याचा सुखावणारा स्पर्श! इंटरनेटवर पेपर वाचण्यात तेवढी मजा नाही. पण नाइलाजास्तव परदेश दौऱ्यांमध्ये मात्र मी इंटरनेटवर आवर्जून पेपर वाचते. भारतात असताना मात्र सकाळी झोपेतून,आळसातून बाहेर येऊ पाहणारी मी, माझ्याबरोबर असतो गरमागरम वाफाळता आल्याचा चहा आणि वर्तमानपत्र! राजकारण, रोजच्या घडामोडी, कला-क्रीडा पुरवण्या, सुडोकू, कोडी सगळंच माझ्या आवडीचं. हा माझा सकाळचा सवंगडी! कधी कधी वामकुक्षीनंतरची माझी दुपारही उजळून टाकतो. कधी कधी वाटतं, फक्त आनंद देणाऱ्या बातम्या देणारं एखादं वर्तमानपत्र असावं, नाही का? मन उल्हसित करणारं, सकारात्मकता वाढवणारं, नकारात्मकता घालवणारं..

 वर्तमानपत्र जसं माझी सकाळ उजळून टाकतं तसं माझ्या सांगीतिक प्रवासात माझ्या मैफिलींची वर्तमानपत्रात आलेली परीक्षणंसुद्धा माझ्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका निभावतात. लहानपणी मैफिलीनंतरच्या सकाळी मी आतुरतेनं वाट पाहात असे अशा परीक्षणांची. त्या काळी समीक्षकही जाणकार असत. अनेकजण गाणं शिकलेले आणि बहुतेक संगीताची सखोल माहिती असणारे. त्यांच्या परीक्षणातून खूप काही शिकायला मिळायचं. श्रोत्यांच्या, जाणकारांच्या भावना त्यात व्यक्त होत. त्या भावना, ज्या गायिका म्हणून मैफिलीच्या वेळी माझ्या नजरेतून सुटून जात. हल्ली मात्र अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले किंबहुना या हळकुंडाचा केवळ स्पर्श झालेले अनेक जण गाण्याच्या कार्यक्रमांवर प्रतिक्रिया देताना मी वाचलंय, ऐकलंय, पाहिलंय.. म्हणजे केवळ वर्तमानपत्रात नाही हं! समाजमाध्यमांवर- फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम इत्यादी माध्यमांमार्फत. आमच्या लहानपणच्या वर्तमानपत्रात येणाऱ्या समीक्षणाचा दर्जा काही औरच होता.

मी करोनाकाळात खूप ‘मिस’ केलं वर्तमानपत्राला. माझ्या सवंगडय़ाला! आता मात्र परत पूर्वीचे दिवस आले आहेत. परत सगळं सुरळीत झालं आहे. वाटलं, आता संवाद साधावा वर्तमानपत्रामार्फत. दर पंधरवडय़ानं मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. तुमच्या सकाळच्या चहाबरोबर!

  दूध उकळू लागलं, की कसं पातेल्यातलं खालचं दूध वर आणि वरचं दूध खाली होतं ना, तसे माझ्या मनातले विचार वरखाली होतायत. जितका खोल विचार करतेय, तितका तो विचार घोटीव होत आहे. दूध आटावं तसा! मनात येणारे हे घोटीव विचार मी पटकन कागदावर उतरवायला सुरुवात केली. एकामागोमाग एक विचार येऊ लागले. मी झरझर लिहू लागले. मात्र मी थांबून जेव्हा परत मागे जाऊन वाचू लागले, तेव्हा लक्षात आलं, की मला अभिप्रेत असलेल्या अर्थाव्यतिरिक्त काही वेगळे अर्थही त्या वाक्यांमधून डोकावत आहेत. शब्द हे विचारप्रवाही, अर्थप्रवाही असतात. पण सगळेच शब्द भावप्रवाही असतात का? की भाव वाचकाच्याही मनात आवश्यक? तरलभाव शब्दांतून व्यक्त करणं, पोहोचवणं आव्हानात्मक. गाण्याचंदेखील असंच आहे. एकामागोमाग एक विचार सुचत जातात. इथे लेखणीऐवजी गळा चालू लागतो. मी गात जाते. एखाद्या क्षणी थांबते आणि त्या क्षणी मनाला मागे नेऊन मागचं ऐकू लागले, की वाटतं ‘गंधारा’ऐवजी इथे ‘मध्यम’ सुंदर दिसला असता का? या स्वरसमूहाऐवजी दुसरा स्वरसमूह हवा होता का? आवाजाचा पोत थोडा वेगळा चालला असता का? तसंच जीवनाचंदेखील आहे. मागे वळून पाहिलं की वाटतं, की हे करण्याऐवजी ते केलं असतं तर? मग लक्षात येतं की जीवन हे वर्तमानात आहे. या क्षणात आहे. आज मिळवलेल्या तानपुऱ्यात आहे. पं. कुमार गंधर्व, गानसरस्वती किशोरीताई अमोणकर यांच्या अनेक मैफिली ऐकल्या. अनेक वेळेला यमन ऐकला, बागेश्री ऐकली. एकच राग अनेक वेळा ऐकला. परंतु त्यातून प्रत्येक वेळी एक वेगळा जिवंत अनुभव येत असे. प्रत्येक दिवशी चितारलेलं यमनाचं चित्रं निराळं, आगळंवेगळं. वर्तमानाचा परिपूर्ण अनुभव घ्यायला लावणारं, चित्ताकर्षक, विस्मयकारक. यावरून लक्षात आलं की कंठातून उमटलेला सूर आसमंतात विरून जातो. तो त्या क्षणाचा असतो. पुढच्या क्षणी पुढचा विचार मांडायचा!

गायकाच्या मनातले भाव तुमच्या, म्हणजेच श्रोत्यांच्या मनापर्यंत पोचवायचे. जसे आहेत तसे. त्यासाठी तुम्हाला गायकाची भाषा अवगत असायला हवी ना? गाणारा राग मांडतो, तेव्हा त्याची भाषा श्रोत्याला अवगत असायला हवी ना? सुरांतून त्याचं व्यक्त होणं म्हणजे त्याची गायकी. त्याची भाषा. गायक आणि श्रोत्याच्या संवादामध्ये श्रोत्याचाही सहभाग आहे. भाषा समजून घेण्याची जबाबदारी त्याच्यावरही आहे. गायक तपश्चर्या करून, साधना करून आपली कला सादर करतो. त्यातले भाव समजून घेण्यासाठी श्रोत्यालाही साधनेची, श्रवणभक्तीची गरज नाही का?..

आता मनाला थोडा आवर घालते. खूप विषय रुंजी घालतायत मनात. माझं लहानपण, मला लाभलेले दिग्गज गुरू, अनेक प्रसंगी भेटलेले गुणिजन, त्यांचं मार्गदर्शन, अनेक मैफिली गायलेल्या-ऐकलेल्या, परदेश दौरे, माझी मैफिलींची तयारी, जीवनातील चढ-उतार.. यादी मोठी आहे.

उद्या पुण्यात कार्यक्रम आहे माझा. संध्याकाळचे राग गायचे आहेत. गाण्याचा कार्यक्रम असला की दोन दिवस आधीच त्याची तयारी सुरू होते. मानसिक आणि इतरदेखील. मनामध्ये यमन, श्याम कल्याण, बिहाग, मारू बिहाग, बागेश्री रुंजी घालत आहेत. वसंतपंचमी जवळ आली आहे. बसंतचे सूरसुद्धा मनात रेंगाळत आहेत. कधी बसंत, तर कधी बसंत-बहार! गाण्याबरोबरच इतर अनेक गोष्टीही डोक्यात आहेत. तिकडे जायचं कसं, कधी पोहोचायचं, कोणत्या रंगाची साडी नेसावी, माझा मूड आणि रंग याचाही एक संबंध असावा..  माझ्याबरोबर कोण शिष्या गातील, तानपुऱ्याची कोणती जोडी न्यावी, थंडी असेल का, की स्टेजवर गरम होईल? अनेक गोष्टींची व्यवधानं पाळावीच लागतात.

डेहराडूनमध्ये अगदी ४ अंश तापमान असलेल्या थंडीत गायलेला कार्यक्रमही आठवतोय आणि मे महिन्याच्या उकाडय़ामध्ये घामाच्या धारा लागेल्या असताना ‘ए.सी.’ नसलेल्या साध्या हॉलमध्ये गायलेली मैफलही आठवते आहे! निकोप आवाज लावायला हवा. मन एकाग्र व्हायला हवं.. या कार्यक्रमाची हकिकत पुढच्या भेटीत..

aratiank@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sur sanvad aarti anklekar tikekar tunes relationship without words of communication language vowels experience ysh
First published on: 14-01-2023 at 00:15 IST