scorecardresearch

सूर संवाद: संगीत साधना!

गायकासाठी रियाज सगळय़ांत महत्त्वाचा. नुसता गळय़ाचा नाही, बुद्धीचाही.. संगीतातली एकेक गोष्ट शेकडो वेळा घोटून घोटून गळय़ातून आणि डोक्यातूनही सहजतेनं येईपर्यंत तयार करावी लागते. तिथे नेईपर्यंत अर्थातच सोबत लागते गुरूची, बोट धरून वाट दाखवणाऱ्या मार्गदर्शकाची. वर्षांनुवर्ष चालणारा हा रियाज जो आनंद देतो, त्यानं त्या साधनेचंच साध्य होतं.

sur sanwad Music Practice by arti anklikar
मनात आपल्या गाण्याचा विषय निरंतर चालू राहायला हवा. (फोटो- लोकसत्ता टीम)

आरती अंकलीकर

या लेखमालेच्या प्रवासात अनेक वाचकांनी मला ई-मेल्स लिहून लेखासाठी विषय सुचवले. त्यातले अनेक लेख रियाजासंबंधी काही मार्गदर्शन करण्यासाठीचे होते. रियाज हा विषय अत्यंत सखोल आणि विस्तृत आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी एकाच तऱ्हेचा रियाज लागू होत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांला वेगळा रियाज असणं फार गरजेचं!

dombivli brahmin sabha, importance of yoga, yoga for healthy life, doctors told the importance of yoga
निरोगी राहण्यासाठी योगसाधना प्रभावी उपचार पध्दती, डोंबिवलीतील परिसंवादात तज्ज्ञ डाॅक्टरांची मते
should have sex during menstrual cycle?
कामजिज्ञासा: मासिकपाळीत सेक्स करावा का?
Ben Stokes Opens Up About Hair
Ben Stokes: ‘ही एक गोष्ट आहे, जी तुम्हाला इतर लोकांना कळू नये असे वाटते’; बेन स्टोक्सने केस प्रत्यारोपणाबद्दल केला खुलासा
know what is importance of good child in family-know from acharya chanakya
तुमचे मुलं नेहमी संस्कारी का असावे? चाणक्य नीतीमध्ये सांगितले महत्त्व, जाणून घ्या

मी गाणं शिकायला सुरुवात केली तेव्हा माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं, की भीमसेनजी जोशी दिवसातून १० ते १२ तास कठोर मेहनत करत असत. अनेक तास षड्ज भरत असत. षड्ज भरणं म्हणजे ‘सा’ हा स्वर सुरेल, भरदार, गोलाईयुक्त लावण्याचा रियाज करणं. तो रियाज इतका व्हावा की त्यावर हुकमत यावी! भीमसेनजींनी केवळ षड्जच नाही, तर आवाजाची साधनासुद्धा भरपूर केली. तानांचा रियाज, दमसासासाठीचा रियाज आणि त्यांनी केलेल्या कठोर परिश्रमांचं फळ आपल्याला, त्यांच्या करोडो श्रोत्यांना अनेक दशकं मिळालं. जितेंद्र अभिषेकीबुवांकडे मी काही नाटय़पदं शिकायला जात असे प्रभादेवीला, त्यांच्या घरी. कधी दुपारच्या वेळी, तर कधी संध्याकाळच्या वेळी तालमीसाठी जात असे. बुवा मात्र न चुकता ४ वाजता रियाजाला बसत. एक तबलावादक आलेला असे आणि त्यांचा वेगवेगळय़ा पलटय़ांचा, तानांचा रियाज मी स्वत: ऐकला आहे. ही गोष्ट सुमारे १९८० च्या सुमारची. बुवांचा लोणावळय़ाला एक छान टुमदार बंगला होता. तिथे गुरुकुल पद्धतीनं अभिषेकीबुवा त्यांच्या शिष्यांना शिकवत. पं. अजित कडकडे, पं. राजाभाऊ काळे आणि इतर काही शिष्य बुवांकडे राहून शिकत. पहाटे साडेचार-पाच वाजता तानपुऱ्याचा झंकार सुरू होई. सगळे शिष्य उठून बुवांबरोबर रियाजाला बसत. हे रियाजाचं सत्र अविरत चालू असे, अखंड!

पं. सुरेशदादा तळवलकरांकडेदेखील गुरुकुल पद्धतीनं काही शिष्य शिकत असत. सुरेशदादा स्वत: त्या वेळी उठून शिष्यांबरोबर बसून त्यांचा रियाज करून घेत, वर्षांनुवर्ष. असे अनेक शिष्य त्यांनी तयार केले आहेत.

आणखी वाचा-सूर संवाद: मी राधिका!

मीही लहानपणापासून ऐकून होते, की आमचे घरातले सगळे बुजुर्ग पहाटे उठून रियाज करत असत. सगळं काही शांत असताना. घरात सामसूम, सगळे झोपलेले. आपलंही मन आणि चित्त शांत, थाऱ्यावर असतं या वेळेला. दिवसाची लगबग, गडबड सुरू होण्याआधीची ती वेळ. आवाजही संपूर्ण रात्रभर विश्रांती मिळालेला. ताजा, पण थोडा जड. थोडा पोत वेगळा असतो आवाजाचा पहाटे. मन एकाग्र करण्यासाठी सर्वोत्तम वेळ! असंही ऐकलंय, वाचलंय, की कोनाडय़ाकडे तोंड करून गात असत पूर्वी. आपलाच आवाज आपल्याला छान ऐकू येतो असं गायल्यानं आणि आपल्या मागे काही हालचाल असेल तर ती न दिसल्यानं चित्ताची एकाग्रता ढासळत नाही. एकूण काय, तर पहाटे रियाज करणं खूप फायद्याचं. शरीरासाठी, मनासाठी आणि बुद्धीसाठी! किशोरीताई आम्हाला म्हणत, ‘‘तुझे डोळे उघडले की तुझा हात तानपुऱ्यावर पडायला हवा.’’ म्हणजे काय, की रियाजाचाच विषय डोक्यात ठेवून झोपायचं आणि उठल्यावरदेखील हाताला तानपुरा लागायला हवा. म्हणजेच मनात आपल्या गाण्याचा विषय निरंतर चालू राहायला हवा.

काही बुजुर्ग खाँसाहेबांकडून त्यांनी ‘चिल्ला’ केल्याचंही मी ऐकलंय. चिल्ला म्हणजे ४० दिवस एका बंद खोलीत आपला तानपुरा घेऊन राहणं. दिवसरात्र फक्त एकच विचार, संगीत! चिल्ला करणाऱ्याला तयार जेवण सकाळ-दुपार-संध्याकाळ मिळत असे; पण कोणाशीही संपर्क नाही, कोणाशीही बोलणं नाही. त्या खोलीत बसून केवळ संगीताचा विचार करणं, प्रत्यक्ष रियाज करणं, चिंतन करणं, मनन करणं आणि हे सगळं लगातार ४० दिवस करत राहणं याला चिल्ला म्हणतात. प्रत्येक व्यक्ती, ज्यानं चिल्ला केलेला आहे, त्यांना साक्षात्कारी अनुभव मिळाल्याचं ते सांगतात.

मन एकाग्र करण्यासाठी, आवाज स्थिर-सुरेल करण्यासाठी, आवाज कसा वापरावा, कसा लावावा, त्याचा पोत कसा असावा, हे आपल्या आत पाहून त्यावर काम करण्यासाठी योग्य वेळ म्हणजे पहाट! अनेक पद्धती आहेत रियाजाच्या. शारीरिक रियाज आहे. म्हणजे, आपला गळा सर्वोत्तम पद्धतीनं चालावा या दृष्टीनं केलेले निरनिराळे रियाज. म्हणजे स्थिर स्वर, लांब स्वर, गळय़ाची लवचीकता, सुरेलपणा, माधुर्य, तानांचे पलटे, मींड, हरकत, कण, खटका, गरजेनुसार आवाज बारीक वा मोठा करता येणं, आसयुक्त गाणं, उत्तम शब्दोच्चार, सुरेल शब्दोच्चार, ताल-लयीचा अभ्यास, तालामध्ये सुरेल गाणं, तालामध्ये उत्तम सुरेल शब्दोच्चार करून गाणं, लयीच्या भिन्न भिन्न प्रकारांचा अभ्यास, रागाभ्यास, रागाचं कोडं सोडवण्याचा अभ्यास, रागातील बंदिशींचा अभ्यास, बंदिशींमधील आवर्तनं भरण्याचा रियाज, रागरचनेचा अभ्यास, रागामधील आवर्तनांचा रचना म्हणून अभ्यास, आलापांचं आवर्तन, तानेचं आवर्तन, बोलबाटचं आवर्तन आणि एकंदर रागप्रस्तुतीच्या रचनेचा अभ्यास. अत्यंत सखोल विषय आहे हा!

आणखी वाचा-सूर संवाद: उपशास्त्रीय गाण्यांचा अद्वितीय आनंद

प्रत्येक विद्यार्थ्यांला त्याच्या प्रतिभेप्रमाणे, त्याच्या कुवतीप्रमाणे रियाजाची गरज असते. कोणाच्या गळय़ात मींड उत्तम असते, कोणाचा गळा मंद्रात चांगला चालतो, कोणाचा तारसप्तकात सहजपणे जातो, कोणाच्या गळय़ात उत्तम तान असते अगदी भिंगरीसारखी! कोणाचे शब्दोच्चार उत्तम असतात. कधी कोणी तानेत कमी असतं, सुरेलपणामध्ये कमी असतं, लयीला कमी असतं. प्रत्येकानं आपलं बलाबल पाहून रियाज करणं महत्त्वाचं. प्रत्येक विद्यार्थ्यांनं आपलं सामथ्र्य कशात आहे त्याचा अभ्यास करावा. तसंच आपण कशात कमजोर आहोत, दुर्बल आहोत त्याचाही अभ्यास करावा. आपलं सामथ्र्य टिकवून ठेवण्याचा रियाज करावा आणि दुर्बलतेवर मात करण्यासाठी आवश्यक असलेला रियाज करावा.

सुरेशदादांनी मला शिकवताना एकदा सांगितलेलं आठवतंय, ‘‘एक तान ५०० वेळा म्हणण्याची गरज का आहे बरं? जर ती ४ ते ५ वेळा गाऊन कंठातून चांगली येत असेल, तर ५०० वेळांची गरज काय?’’ मग त्यांनी उकल करून सांगितलं, एखाद्या पितळय़ाच्या वस्तूला जेव्हा पॉलिश करायचं असतं, तेव्हा आपण आधी त्याच्यावरची धूळ झटकून घेतो. नुसतं फडकं त्याच्यावरून ३-४ वेळा फिरवल्यानंतर भांडय़ावरची धूळ जाऊन आतली पितळय़ाची वस्तू छान दिसू लागते. त्यानंतर एखाद्या पावडरनं त्या भांडय़ाला पॉलिश केलं, तर ते चकाकू लागतं. थोडा जोर काढून पॉलिश केलं, तर तेच पितळय़ाचं भांडं सोन्यासारखं चमकू लागतं. गाण्याचंही असंच आहे! १०-१५ वेळा घोटल्यावर तान उत्तम येत आहे असं वाटतं, पण ती १०० वेळा म्हटल्यानंतर अत्यंत सहजपणे येऊ लागते. अधिक वेळा म्हटल्यावर त्याच्यात तेज येऊ लागतं आणि ५०० वेळा म्हटल्यावर ती एखाद्या विजेसारखी चमकू लागते! हे साधनेचं फळ आहे!

माझ्या लहानपणी आमच्याकडे एक छोटासा स्टीलचा डबा होता, पेढेघाटी. त्यात छोटे छोटे हिरवे मणी होते. २ मिलीमीटरचे असावेत. किती होते कोणास ठाऊक? बाबा ऑफिसमधून आल्यावर संध्याकाळी मला समोर बसवत. डब्याचं झाकण उघडून ठेवत. क्लासमध्ये शिकलेला एखादा नवीन पलटा, थोडासा पेचदार.. तो पलटा मला ४-५ वेळा म्हणायला लावत. एकदा तो डोक्यात बसला की खरा रियाज सुरु होत असे. तो पेचदार पलटा एकदा म्हटला, की डब्यातला एक हिरवा मणी बाबा झाकणात काढून ठेवत असत. परत दुसऱ्यांदा तान, मणी इकडचा तिकडे! तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पंचविसाव्यांदा, शंभराव्यांदा.. कल्पना नाही, किती वेळा म्हणत असे! तो डबा बाबांकडेच असे. शेकडो वेळा करून घेत असत बाबा तानेचा रियाज. कधी कधी मनात यायचं, की तो डबाच कुठे तरी लपवून ठेवावा. बाबांना मिळूच नये! पण आता लक्षात येतंय त्या डब्याचं महत्त्व.. बाबांचं महत्त्व.

आणखी वाचा-सूर संवाद : श्रीमंत करणारा अनुभव!

जसा गळा उत्तम चालण्यासाठी निरनिराळय़ा तऱ्हेनं रियाज करता येतो, तसा बौद्धिक रियाजही करावा लागतो. तसंच चिकाटीनं रियाज करणं, त्यात सातत्य असणं, हेदेखील आवश्यक असतं. ‘१५ दिवस रियाज करून पुढचे ४ दिवस चुकवला, तर ‘ये रे माझ्या मागल्या’. पहिले १५ दिवस रियाज केल्याचा काही उपयोग नाही!’ असं माझ्या काही सहाध्यायी गुरुबंधू-भगिनींनी म्हटलेलं आठवतंय. रियाज हा डोळसपणे झाला पाहिजे. उत्तम रियाजाची फळं गोमटी, तेवढीच चुकीच्या रियाजाची फळं कडू! चुकीचा रियाज केल्यानं अनेकांचा आवाज बिघडल्याचीही उदाहरणं डोळय़ासमोर आहेत. खूप रियाज केल्यावर काही जणांचा आवाज बसतो. याचा अर्थ रियाज चुकीचा होत आहे. चुकीचा जोर लावला जातो आहे. अशा अनेक तांत्रिक गोष्टी रियाजामध्ये येतात. केसरबाई केरकर यांना अल्लादिया खाँसाहेब तासन्तास तालीम देत असत. तासन्तास शिकवत. अनवट रागांचा, त्यातल्या लयदार, पेचदार बंदिशींचा, पल्लेदार तानांचा, तिन्ही सप्तकांमध्ये लीलया फिरणारा आवाज घडवण्याचा हा सगळा रियाज खाँसाहेब करवून घेत असत.

मी किशोरीताईंकडे शिकायला जात असे, तेव्हा ताईंचा रियाजही मी जवळून पाहिलेला आहे. पहाटेचा रियाज तर चालेच त्यांचा. त्यानंतर आम्ही सकाळी ९ वाजता पोहोचल्यावर स्वरमंडल घेऊन त्या असा राग गाण्यासाठी घेत जो त्यांना पुढच्या मैफलीत गायचा असे. खरं तर त्या इतक्या ‘मंझी हुई कलाकार’ झाल्या होत्या त्या वेळी.. ५०-५२ वर्षांच्या असतील ताई तेव्हा. प्रत्यक्ष रियाजाची तशी त्यांच्या गळय़ाला गरज नव्हती त्या वेळी, सगळं काही गळय़ामध्ये उत्तम बसलेलं होतं आणि गळय़ातून लख्ख, प्रकाशमान, तेजस्वी गाणं येत होतं त्यांच्या.

रियाजामध्ये गुरूची भूमिका अतिशय महत्त्वाची असते! चांगला डोळस गुरू शोधून, विद्यार्थ्यांला असलेली तळमळ, त्याची चिकाटी आणि सातत्य याचा गुरूला प्रत्यय आल्यावर हा गुरूच शिष्याला मार्ग दाखवू शकतो रियाजाचा. शारीरिक रियाज, बौद्धिक रियाज, ज्या कुठल्या प्रकारच्या रियाजाची गरज त्या शिष्याला असेल ते गुरूच्या मार्गदर्शनाप्रमाणे करणं हे अत्यंत उपयोगी. शक्यतो सुरुवातीचा रियाज गुरूच्या डोळय़ांसमोर झालेला उत्तम.

ज्याला आपल्या रियाजात ‘राम मिळाला’, आनंद मिळाला त्याची साधना हेच साध्य झालं म्हणून समजा! त्याची नैया पार झाली, त्याच्या जीवनाचं सोनं झालं!

aratiank@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sur sanwad music practice by arti anklikar mrj

First published on: 18-11-2023 at 00:18 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×