राजन गवस

पूर्वीच्या काळी काहीच खायला मिळत नसताना पोरी धडधाकट होत्या. आज मुबलक खायला प्यायला असताना रोगट बनत आहेत. दर्शनी त्या कितीही ठीकठाक वाटत असल्या तरी एखादे बाळंतपण पेलताना मेटाकुटीला येतात. विशीतिशीत वेगवेगळ्या आजाराला बळी पडत आहेत पोरी. याची कारणं शोधायला हवीत का नकोत? मुलींच्या पालकांना आज सर्वात अधिक संगोपनसाक्षर करण्याची गरज खेडय़ापाडय़ात निर्माण झाली आहे.

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
scorching heat
उन्हाच्या झळांनी हापूस आंबा काळवंडला; डाळिंब, द्राक्ष, भाजीपाल्यावर परिणाम

आमचा कधीकाळचा विद्यार्थी मित्र कवितासंग्रहाचं एक हस्तलिखित घेऊन आला. त्याच्या संग्रहाचं शीर्षक होतं, ‘शेणाला निघालेल्या पोरी’. शीर्षक वाचल्या वाचल्याच एकदम आमच्या गावातली चित्रंच एकामागून एक माझ्या डोळ्यासमोरून सरकत चालली.

गल्लीतल्या पोरी थव्याथव्यानं घमेली घेऊन भर उन्हात गोठणावर फिरत असायच्या. वेण्या घातलेल्या तरीही वाऱ्यावर उडणाऱ्या झिंज्या. घामानं निथळलेले चेहरे. कमरेला खोचलेलं परकर. डोक्यावर घेतलेलं घमेलं. शेणाची पोटी दिसली की जीव घेऊन पळणाऱ्या. जिला पोटी सापडायची तिला आभाळ गवसल्याचा आनंद. बाकीचींचे हिरमुसलेले चेहरे. गोठणावरच्या चिंचेजवळ आल्या की पोरी ठेवून द्यायच्या घमेली. सरसर चढायच्या झाडावर. फांद्यांना लोंबकळत खेळायच्या तासन्तास. झाड पोरींनी लगडलं की उन्हालाही फुटायचा गोंडा. पोरी खेळता खेळताच चिंचांचे कंगोल लपवायच्या परकराच्या खिशात. हाताला न सापडलेल्या चिंचा पाडण्यासाठी मारत बसायच्या दगड बखोटं दुखंपर्यंत. उन्हाच्या कुंभारणी भांडायला लागल्या की पोरी तिथंच लोळायच्या चिंचेच्या गर्द सावलीत.

चित्र तरळून गेलं डोळ्यासमोरून आणि एकदम दचकलोच. शेणाचा आणि पोरींचा संबंधच तुटला की आजच्या काळात. आता गावात शेण गोळा करणारी कुठंतरीच दिसते एखादी पन्नाशी पार केलेली बाई. तालुक्याच्या गावात दिसत नाहीत औषधालाही शेणी. फक्त स्मशानभूमीसाठी पालिका प्रसिद्ध करत असते शेणीसाठीचे टेंडर. तरीही झोपडपट्टीतली खेडय़ातून आलेली बाई थापत असते चार दोन शेणी. गोबरगॅस आला, इंडेनिफडेनचे गॅस पोहोचले. चांगलंच झालं. बाईची शेणातून, शेणकुटातून मुक्ती झाली. पोरी शाळेचा उंबरा चढल्या. रानाला, शेणाला पारख्या झाल्या. त्यांना नवं आकाश गवसलं. प्रत्येक उंबऱ्याला वाटतं आपल्या पोरी शिकल्या पाहिजेत. खेडय़ापाडय़ात अगदी सामान्यातल्या सामान्य कुटुंबातही मुली पदवीधर होऊ लागल्या आहेत. पोलीस, कंडक्टर, प्राध्यापक, कलेक्टर अशा सगळ्या जागांवर गोरगरिबांच्या मुली पोहोचत आहेत. त्यांच्या नव्या वाटा, नव्या आकांक्षा सर्वाना कौतुकाच्या तर आहेतच. त्याबरोबरच त्यांच्या उद्याच्या माणूस म्हणून जगण्याबाबत आशावाद बळकट करत आहेत.

आज कुठल्याही प्राथमिक शाळेत, माध्यमिक शाळेत महाविद्यालयीन वर्गात प्रवेश केला की, वर्ग मुलींनीच भरलेला असतो खचाखच. वर्गात पहिल्या पाच नंबरांत क्वचितच एखादा मुलगा मिळतो. नाहीतर सगळे नंबर पोरींचेच. स्पर्धा परीक्षेत मुली लक्षणीय यश संपादन करीत आहेत. सावित्रीच्या लेकी महाराष्ट्रभर कर्तृत्व गाजवत आहेत. याबाबत भरभरून बोललं, वाचलं, लिहिलं जातं. पण हे सर्व होत असताना त्यांच्या आरोग्याबाबत, मानसिकतेबाबत कोणीच काही ध्यानात घ्यायला तयार नाही. हा खरा चिंतेचा प्रश्न आहे. पालक, शाळा, समाज सारेच मुलींच्या आरोग्याबाबत काही विचार करत आहेत याचे कुठं काही तपशील येतात असे चित्र नाही. खेडय़ापाडय़ात राजकारण्यांनी एकमेकांच्या ईष्य्रेवर शाळा उघडल्या. यातल्या बहुतेक शाळांना स्वत:च्या इमारतीच नाहीत. गावात उपलब्ध होईल त्या खुराडय़ात मुलामुलींना कोंबलं जातं. जिथं स्वच्छ हवा, प्रकाश असेल याची खात्री नाही, तिथं पाणी, स्वच्छतागृह यांची अपेक्षा काय करणार? ज्या शाळांना थोडीफार इमारत आहे, तिथं फक्त मुलांना बसायला जागा मिळते. पण बाकीच्या सगळ्या सोयींबाबत आनंदच. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सोडल्या तर अपवादात्मक शाळांत मुलांसाठी क्रीडांगण उपलब्ध आहे. बहुतेक शाळा क्रीडांगणाशिवाय चालविल्या जातात. अशातच इंग्रजी माध्यमाचं पेव फुटलंय. तिथं तर कोंबडय़ा खुराडय़ात भराव्या तशी मुलं वर्गात कोंबली जातात. शाळेला क्रीडांगण असले पाहिजे, हा विचारच आता शिक्षणातून हद्दपार झालाय. खेळाचा शिक्षक संस्थाचालकाच्या गाडीचा ड्रायव्हर किंवा घरगडी. मदानच नाही तिथं तो करणार तरी काय? आता हळूहळू क्रीडाशिक्षक हे पदच शाळेतून गायब व्हायला लागलंय. क्रीडांगण नसलेली शाळा ही कल्पना शिक्षणशास्त्रात शक्य आहे? पण महाराष्ट्राचं ते रखरखीत वास्तव आहे. आणि ज्या शाळांना क्रीडांगण उपलब्ध आहे त्या शाळांतील मुलांना क्रीडांगणावर किती भरभरून खेळू दिलं जातं, हा संशोधनाचा विषय आहे. प्रत्येक आईबापाला, शिक्षकाला मुलामुलींची टक्केवारी भलतीच महत्त्वाची झालीय. एखादा गुण आपल्याला कमी पडला तर पालकांचे सगळे खानदान बुडाले असे चेहरे होतात. मुलीनं खेळावं, बागडावं असं कोणत्याच पालकाला वाटत नाही. त्यांना मूल माणूस म्हणून हवं असत नाही तर एटीएम मशीन म्हणून हवं असतं. त्यासाठी किती आटापिटा. मास्तर तरी अशा मुलांना क्रीडांगणावर नेण्याची तसदी कशाला घेतील? त्यांनाही त्यांच्या शाळेचा निकाल शंभर टक्के लावायचाच असतो. त्यात कुठं असतात क्रीडांगणावरच्या खेळाला मार्क?

हे सगळं वास्तव भयावह आणि मुलांच्या भवितव्याबाबत चिंता निर्माण करणारं आहे. त्यातल्या त्यात मुलींच्याबाबत तर अधिक चिंताजनक. घरात मुलीनं खेळलं पाहिजे ही अजूनही मानसिकता नाही. तिला खेळायला पाठवलं पाहिजे, तिला नवनवे खेळ शिकवले पाहिजेत, हे तर पालकांच्या स्वप्नातही येणे शक्य नाही. घरात टीव्हीवर लागलेल्या गाण्यावर पोर नुसती ताल जरी धरू लागली तरी आईच्या डोळ्यांचं चुलवान आणि बापाच्या तळपायाची आग मस्तकात. तिनं गल्लीत खेळायचं नाही. घरात खेळायचं नाही. शाळेत तर खेळायला जागाच नाही. अशा वातावरणात पोरीच्या आरोग्याचं होणार तरी काय? त्यात पोरगी म्हणजे दुसऱ्या घरचं धन. तिला अंगमेहनतीचं काम लावायचं नाही. उन्हातान्हात पाठवायचं नाही. शाळा ते घर आणि घर ते शाळा. पुन्हा लेक लाडाची. तिला शाळेत सोडायला वडील नाही तर भाऊ असतातच दिमतीला. तिचे पाय मातीला लागणारच नाहीत याची खबरदारी. शाळेत अभ्यास, घरात अभ्यास. अशातच इयत्ता पार करत पोहोचते महाविद्यालयात. तिथं तर सगळा आनंदीआनंदच. सततचा पहारा. अशात आलं स्थळ टाकली देऊन. तिथून पुढे तिच्या जगण्याचे वांदे सुरू. कामाचा अचानक समोर आलेला रगाडा. बाळंतपणाचा डोंगर. पार मोडूनच जाते पोर. मुलींच्या संगोपनाची पद्धतच गमावून बसलो आपण.

कोणी म्हणेल आपल्याकडे कुठं होती मुलींच्या संगोपनाची पद्धत? थोडं नीट लक्षपूर्वक आपणच आपला गाव वाचला तर ध्यानात येते. आपल्या गावगाडय़ात मुलींच्या संगोपनाची स्वत:ची विकसित केलेली संगोपन पद्धती होती. पोरी खेळत्या-सवरत्या झाल्या की फिरायच्या रानावनात. शेण गोळा कर, लाकडं गोळा कर. जळणाची जबाबदारी घरातल्या पोरीची. काटय़ाकुटय़ाला, शेणामातीला सरावून जायच्या पोरी. त्यात पुन्हा घराची सारवणं, अंगणातला सडा तिनंच टाकायचा. रांगोळीची जबाबदारी तर फक्त तिचीच. अशात गल्लीतल्या पोरी पोरी जमून काचाकवडय़ा-लंगडी-दुडुमुडु-जेवणापाण्यानं-जिबलीनं असं चिक्कार खेळ खेळायच्या. अशात यायचा एक एक सण. मग झिम्माफुगडी. फक्त बसून सगळं अंग चंप्यावर तोलून खेळली जायची. निस्सरफुगडी. गुडघ्यावर गुडघा ठेवून कोंबडा खेळायच्या पोरी. गौरीत पोरी बेभान होऊन फेर धरून नाचायच्या. नवीन लग्न झालेल्या पोरी थकेपर्यंत घागर घुमवायच्या. काटवट-परात पायाच्या अंगठय़ात पकडून भाकरी बडवायच्या. पाटा-वरवंटय़ावर मसाला वाटायच्या. पायली दोन पायली भात मुसळानं कांडायच्या. भल्यामोठय़ा डेऱ्यात ताक घुसळणं. डुईवर घागर, काखेत घागर घेऊन चार-पाच खेपा पाणी भरायच्या. हे काम पोरीच्या जातीनं केलंच पाहिजे असा दंडक. या साऱ्यामुळं नसर्गिकपणेच पुढच्या संसाराच्या साऱ्या जबाबदाऱ्या पेलण्यास तिला सक्षम केलं जायचं. घरचे तिच्या भावी आयुष्याबाबत निश्चिंत असायचे. झिम्माफुगडी, निसरफुगडी, कोंबडा खेळता खेळता ओटीपोटी दणकटपणा आपोआपच यायचा. घागर घुमवताना हृदयाचे आकुंचन-प्रसरण गतीनं होऊन हृदयाला बळकटी यायची. बाळंतपणं सहजपणे पार पडायची. मुलीचे संगोपन करताना आई-आज्जी या साऱ्याची काळजी घ्यायच्या. हे त्या काळचं संगोपनशास्त्र चांगलं का वाईट याबाबत मला काहीच म्हणायचं नाही. ते खेळ, ती गाणी, ते वाढणं, रांधणं टाकून द्यावं वाटत असेल, तर टाकून द्या. झिम्माफुगडी कालबाह्य़ वाटत असेल तर खेळू नये. पण त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था आपण काही निर्माण केली का? नवं संगोपनशास्त्र विकसित केलं का? याचं उत्तर नकारार्थीच येतं.

या साऱ्यामुळं मुलींच्यामध्ये आढळणारे आजार चिंता उत्पन्न करणारे आहेत. त्या काळी काहीच खायला मिळत नसताना पोरी धडधाकट होत्या. आज मुबलक खायला प्यायला असताना रोगट बनत आहेत. दर्शनी त्या कितीही ठीकठाक वाटत असल्या तरी एखादे बाळंतपण पेलताना मेटाकुटीला येतात. विशीतिशीत वेगवेगळ्या आजाराला बळी पडत आहेत पोरी. याची कारणं शोधायला हवीत का नकोत? मुलींच्या पालकांना आज सर्वात अधिक संगोपनसाक्षर करण्याची गरज खेडय़ापाडय़ात निर्माण झाली आहे. मुली शिकत आहेत. वेगवेगळ्या व्यवसायात नोकरी करत आहेत. म्हणून त्यांच्या आरोग्याबाबत अधिक साक्षरता गरजेची. त्यांच्या संगोपनाबाबत घरातील पालकांनी आणि शाळेतल्या शिक्षकांनी स्वत:चे परंपरागत दृष्टिकोन बदलायला पाहिजेत. जेव्हा तुम्ही जुने खेळ सहज टाकून देता तेव्हा जुने दृष्टिकोन नको का टाकून द्यायला. मुलगी म्हणजे परक्या घरचं धन. बाईच्या जातीनं असं करून कसं चालेल. बाई म्हणजे काचेचं भांडं. आमच्या घरची अशी रीत, तशी रीत. हे सगळं बाजूस सारल्याशिवाय मुलीचं संगोपन कसं होईल नीट.

शहरातील पालक थोडे तरी प्रगल्भ झालेत. खेडय़ात मात्र बुरसटलेल्या मानसिकतेतच वावरत आहेत. पालक, शिक्षक आणि समाजातील सगळेच घटक. यांच्या मेंदूची धुलाई काळाची गरज झालीय. ‘लेक वाचवा’ अभियान हवेच पण त्याबरोबरच ‘लेक मुक्त वाढवा’ अभियानाचीही तितकीच गरज आहे खेडय़ापाडय़ात.

chaturang@expressindia.com