scorecardresearch

‘शुद्ध’लेखन

सुत्तडगुत्तड

‘शुद्ध’लेखन
(संग्रहित छायाचित्र)

राजन गवस

भाषा ही भाषा असते. ती शुद्ध अथवा अशुद्ध कशी असेल? म्हणूनच शुद्धलेखन नियम म्हणण्याऐवजी प्रमाणभाषा लेखन नियम म्हणायला हवं. शुद्ध-अशुद्ध शब्दांच्या वापराने खेडय़ापाडय़ातल्या शिकणाऱ्यांत भाषिक न्यूनगंड तयार होतो आणि त्याचे परिणाम त्यांना आयुष्यभर भोगावे लागतात. आमच्या खेडय़ापाडय़ातल्या विविध बोलींचे त्यांनी अतोनात नुकसान करून टाकले आहे. आम्ही खेडय़ापाडय़ातल्या लोकांनी जे भोगलंय ते महानगरातील कोणी भोगलं असण्याची शक्यता कमी. मला प्रश्न पडतो, मराठीचे मारेकरी कोण?

समोरचे गृहस्थ मला शुद्धलेखनाचे महत्त्व पटवून देत होते. त्यांच्यासोबत आलेले आमचे स्नेही खेडय़ापाडय़ातल्या पोरा-पोरींना शुद्ध लिहिता येत नाही, शुद्ध बोलता येत नाही, अशी मुलं मग सर्व क्षेत्रात कशी मागं पडतात याबाबत माझे उद्बोधन करत होते. शांतपणे सगळं ऐकण्याशिवाय माझ्याकडं दुसरा पर्याय नव्हता.

त्यांना आमच्या एम.ए.च्या मुलांसाठी शुद्धलेखनाची कार्यशाळा घ्यायची होती. आठवडाभर ते कार्यशाळा घेणार होते आणि त्यासाठी प्रत्येक मुलाने हजार रुपये फी भरावी अशी त्यांची अपेक्षा होती. आमच्याकडं येणारी सगळी पोरं दुर्गम भागातली, गरीब परिस्थितीतली. त्यांना अशा कार्यशाळेसाठी हजार रुपये भरता येतील असं मला वाटत नव्हतं. या गृहस्थांना नकारच द्यायचा आहे तर उगाच कशाला मतभेद करा म्हणून मी डोळे मिटून त्यांचे ज्ञानामृत प्राशन करत होतो. अशातच आमचे स्नेही न थांबता बोलतच होते, ‘‘आमच्या गल्लीतल्या मुली तर इतक्या अशुद्ध बोलतात की, बोलायची सोय नाही. सरळ सरळ ‘मी आल्तो, गेल्तो’ म्हणतात. म्हणजे यांना मराठी शाळेत, हायस्कूलमध्ये काय शिकवत असतील?’’ लगेच शुद्धलेखनवाले गृहस्थ म्हणाले, ‘‘अहो, शिक्षकांनाच शुद्ध लिहिता, बोलता येत नाही ते मुलांना काय शिकवणार? आम्ही आता मराठी शाळेतल्या शिक्षकांचेही शुद्धलेखनाचे वर्ग घ्यायला सुरुवात केली आहे. पण फी द्यायला लागते म्हणून हे लोक फिरकतही नाहीत वर्गाकडे. कशी आपली भाषा जगणार? सांगा तुम्ही.’’ मग आमच्या स्नेह्य़ांचं प्रवचन. मला भयंकर वैताग यायला सुरुवात झाली होती. म्हणून म्हटलं, ‘‘मला तुमचं सगळं मान्य आहे. फक्त तुम्ही ‘शुद्धलेखन’ कार्यशाळा म्हणता तेवढं म्हणायचं बंद करा.’’ तर ते गृहस्थ एकदम उखडले, ‘‘म्हणजे? शुद्धलेखन म्हणायचे नाही तर काय म्हणायचे?’’ म्हटलं, ‘‘प्रमाणभाषा लेखन कार्यशाळा म्हणा.’’ तर त्यांनी माझ्याकडं साशंक नजरेनं बघतच विचारलं, ‘‘असं कसं म्हणता येईल? जे रूढ आहे ते रूढच आहे, तेच वापरले पाहिजे. महामंडळाने शुद्धलेखनाचे नियम तयार केलेले आहेत. सगळ्या क्रमिक पुस्तकात शुद्धलेखनाचे नियम छापलेले आहेत. सर्व विद्यापीठांची व्यवहारोपयोगी मराठीची पुस्तकं, संदर्भग्रंथ काढून पाहा. त्या सगळीकडे शुद्धलेखनाचे नियम असे छापले असताना तुम्ही कसा काय आक्षेप घेता? तुम्ही कोण लागून गेलात? तुमच्यासारख्या माणसाने शुद्धलेखन नियमांना विरोध करणं योग्य नाही.’’ त्यांची टकळी सुरूच. त्यांना थांबवून म्हटलं, ‘‘अहो, माझा नियमांना विरोध नाही, नियमानुसार प्रत्येकाला लिहिता आलंच पाहिजे. फक्त मी प्रमाणभाषा लेखन नियम म्हणा असं सुचवतोय. शुद्धलेखन नियम म्हणणे मला योग्य वाटत नाही. कारण भाषा ही भाषा असते. ती शुद्ध अथवा अशुद्ध असत नाही, असं मी वर्गात भाषाशास्त्र शिकवताना मुलांना सांगत असतो. या शुद्ध-अशुद्ध शब्दांच्या वापराने खेडय़ापाडय़ा- तल्या शिकणाऱ्यात भाषिक न्यूनगंड तयार होतो आणि त्याचे परिणाम त्यांना आयुष्यभर भोगावे लागतात.’’ तर ते म्हणाले, ‘‘कमाल झाली. आता काय बोलणार?’’ आवाज आक्रमक होण्याच्या बेतात होता. मला त्यांच्याशी वाद घालण्यात रस नव्हता. खुर्चीवरून उठतच म्हटलं, ‘‘आपण यावर नंतर बोलू. मला थोडंसं काम आहे.’’ आणि ते निघायच्या आतच मी माझ्या खोलीतून बाहेर पडलो. सहकाऱ्यांच्या खोलीत जाऊन बसलो. तरी त्यांचं शुद्धलेखनाबाबत आक्रमक होणं डोक्यातून जातच नव्हतं.

शुद्धलेखनाबाबत हा माझा सार्वत्रिक अनुभव. ज्यांना कुणाला म्हणावं, ‘‘बाबारे, शुद्धलेखनाचे नियम हा शब्द न वापरता आपण प्रमाणभाषा लेखन नियम असा शब्द वापरला पाहिजे. एखाद्या मुलास आपण ‘शुद्ध  बोल’ असं सांगण्याऐवजी ‘प्रमाणभाषेत बोल’ असं सांगू या’’ तर समोरचा एकदम आक्रमक. एकतर माझी अक्कल काढणार किंवा मला ‘गावठी’ संबोधून रिकामा होणार. कोणी मला ‘गावठी’ म्हटल्याचा राग येत नाही. उलट आनंद होतो. पण अक्कल काढायला लागला, की शीर ठणकते. लोकांना शुद्धलेखनाचे नियम, शुद्ध बोलणे याविषयी एवढं अपरंपार प्रेम का, हा प्रश्न मला सततच छळत आलाय. ज्ञानी लोकही सहजपणे शुद्धलेखनाचे नियम सांगायला लागतात. ते किती महत्त्वाचे, शुद्ध लिहिणं, शुद्ध बोलणं किती महत्त्वाचं, असलं काय काय अथक बरळत असतात. त्यांना महाराष्ट्राच्या भूगोलाची माहिती नसेल का? एवढय़ा मोठय़ा प्रदेशात वेगवेगळ्या समाजाचे गट, बोलींचे गट राहात आहेत त्यांची व्यवहाराची, जगण्याची भाषा वेगळी आहे. मराठीला असंख्य बोली समृद्ध करत आहेत. प्रमाणभाषा नियमाप्रमाणे लिहिली पाहिजे. अचूक लिहिले पाहिजे. प्रमाणभाषेत नीट बोलता आले पाहिजे. प्रत्येक शब्दाचा उच्चार आघातशास्त्रानुसार ध्वनिशास्त्राचे आकलन करून घेऊन केला पाहिजे. प्रमाणभाषेत बोलताना ‘पानी’ न म्हणता ‘पाणी’ असेच उच्चारले गेले पाहिजे. लिहिले गेले पाहिजे याबाबत मी त्यांच्यापेक्षा कैक आग्रही आहे. अगदी विरामचिन्हासह. नीटच लिहिले पाहिजे. याबाबतची ढिलाई मलाही चालत नाही. पण ‘शुद्धलेखन’ हा शब्द मात्र मला सहन होत नाही.

‘शुद्ध’ या एका शब्दानं आमच्या खेडय़ापाडय़ातल्या, विविध जातीजमातींतल्या कितीतरी पिढय़ा गारद करून टाकल्या आहेत. आमच्या खेडय़ापाडय़ातल्या विविध बोलींचे अतोनात नुकसान करून टाकले आहे. आज शिकून-सवरून खेडय़ापाडय़ातून बाहेर पडलेल्या कोणत्याही शिक्षित माणसास आपल्या बोलीतील एखादा शब्दही आठवणे कठीण होऊन गेलेले आहे. असं सांगायला गेलो तर उलटा मलाच प्रश्न केला जातो, तुम्ही भाषेचे शिक्षक आहात ना? आता कुणाला काय काय सांगणार? कधी कधी उबळ येते, ओरडून सांगावं, ‘‘मला प्रमाणभाषा, बोलीभाषा, लेखन नियम सगळं सगळं येतं. किंचित तुमच्यापेक्षाही अधिक. पण शुद्ध या एका शब्दानं आम्ही खेडय़ापाडय़ातल्या लोकांनी जे भोगलंय ते तुमच्या महानगरातील कोणी भोगलं असण्याची शक्यता कमी.’’ खेडय़ापाडय़ात जन्मलेले आम्ही लोक. आमची दर बारा मलावर भाषा बदलते. पुन्हा जातीची, व्यवसायाची आणि गावाची बोली वेगळीच. म्हणजे समजा खेडय़ापाडय़ातला खाटीक व्यावसायिक असेल तर त्याची व्यवसायाची बोली वेगळी, त्याची समाजबोली वेगळी, त्याची गावबोली वेगळी. या तीनही बोली लीलया आत्मसात करणारं पोर किंवा पोरगी जेव्हा शाळेत येते तेव्हा तोंड उघडलं की गुरुजी म्हणतो, ‘शुद्ध बोल’. आमचा गुरुजी आम्हाला असंच म्हणाला. एकदा आमच्या हिंदीच्या सरांनी हिंदीतून मराठीत अनुवाद करायला परिच्छेद दिला. त्या परिच्छेदाचा अनुवाद करताना जिथं जिथं ‘मैंने मैंने’ असे शब्द आले तिथं तिथं त्याचा अनुवाद ‘मीनं मीनं’ असा केला. आणि गुरुजींनी बेदम ठोकून काढले. चूक काय? तर मैंने चा अनुवाद ‘मीनं’ केला. अशा कैक गोष्टींसाठी, शुद्ध बोलण्यासाठी बेदम मारही खाल्ला गुरुजींचा. तेव्हा हातावर, ढुंगणावर काठीचे वळ उठायचे. तेव्हा वाटायचं आपलं सगळंच अशुद्ध आहे. या शुद्ध भाषेची धडकीच भरायची उरात. आपोआपच ज्या दोन-तीन-चार बोलींनी माझं भावविश्व सुंदर केलं होतं, त्या बोलींविषयी आपोआपच तिटकारा निर्माण व्हायला सुरुवात झाली. शुद्ध बोलण्याची जीवघेणी धडपड सुरू झाली. या शुद्ध बोलण्याच्या नादात ज्या दोन-तीन बोली मेंदूत घर करून होत्या त्यांचे दरवाजे बंद करण्याचे आटोकाट प्रयत्न आम्ही सुरू केले. हे फक्त एवढय़ावर थांबले नाही. आमच्या सगळ्या गावातील माणसं अशुद्ध, आमच्या समाजातील माणसं अशुद्ध, आमचे व्यवसाय अशुद्ध. या सगळ्यांना टाकल्याशिवाय मला शुद्ध बोलता येणार नाही. लिहिता येणार नाही. शिकता येणार नाही. शिकायचंच असेल तर या सगळ्यांना आयुष्यातून वगळायलाच हवं. त्यांच्याशी संपर्क राहिला की, मी अशुद्ध झालोच. ही धारणा बालमनात पक्की होणे सहज स्वाभाविक. बालमानसशास्त्र ही शाखा आहेच ना विकसित. यामुळे मातीपासून पशू-पक्षी-प्राण्यांपासून आपोआपच आमचे दूर जाणे सुरू झाले. आयुष्यातून शेणा-मुताचा वास परागंदा झाला. मी शिकत गेलो. नोकरदार झालो. आपोआपच आमच्या तीन-चार बोली आम्हाला गमवाव्या लागल्या. आज कोणी म्हटलं, ‘काय गोमचाळ झालं तुझ्या आयुष्याचं?’ तर गोमचाळ म्हणजे काय? कोणाला तरी विचारावं लागतं. आम्ही आमच्या जन्मजात बोलींना मुकलो. माणसांना मुकलो. आम्हा खेडय़ापाडय़ात शिकलेल्या, नोकरदार झालेल्या माणसांच्या बायका, मुलाबाळांना गावाकडं घेऊन जायलाही नकार देऊ लागल्या. आम्हालाच तत्त्वज्ञान सांगायला लागल्या, गावाकडं गेलं की मुलं गल्लीत खेळायला जातील, तिथली भाषा बोलायला लागतील. त्यांची भाषा अशुद्ध होईल. त्या माऊलीला दोष देण्यात अर्थ तो काय? शुद्ध भाषेचं पाचर कोणी मारलं आमच्यात? या एका शब्दाच्या अतिवापरानं सगळं जगणंच काळवंडून गेलं. घराचा उंबरा परका झाला.

कोणतीच भाषा शुद्ध-अशुद्ध नसते. भाषा ही भाषा असते. सर्व बोलीतील अभिजनांची, सत्ताधीशांची, सर्व बोलींना जवळ असणारी, समजणारी बोली प्रमाणभाषेचा किंवा सर्व समूहाच्या मध्यवर्ती भाषेचा दर्जा प्राप्त करून घेत असते. मिळवत असते. किंवा तिला तो दिला जात असतो. त्यातून लेखन होत असतं. ते लेखन सुसूत्र व्हावं, ते बोलणं सुसूत्र असावं म्हणून भाषेचं व्याकरण आकाराला येत असतं. भाषेतील सर्व सूक्ष्मातिसूक्ष्म घटक तपासण्याची क्रिया सुरू होते. भाषेचे व्याकरण तयार झाले की, भाषा वापरणे, लिहिणे, परभाषिकास भाषा शिकणे सहज शक्य होते. लेखनात सुसूत्रता यावी म्हणून प्रमाणभाषा लेखन नियम तयार केले जातात. ते नियम पाळले, तर भाषिक व्यवहार सुखकर होईल. म्हणून शुद्धलेखन नियम नाही तर ते प्रमाणभाषा लेखन नियम आहेत. ते सर्वानी आत्मसात केले पाहिजेत. म्हणजे आपली भाषा समृद्ध होईल. असे म्हटले असते तर आधीच तीन-चार बोली आत्मसात करणारे आम्ही लोक प्रमाणभाषेत एकदम निष्णात झालो असतो. आधीच दोन-तीन बोली बोलणाऱ्या माणसास एक प्रमाणभाषा शिकायला कसली अडचण? पण असे म्हणण्याची हिंमत भाषाधुरिणांनी, राज्यकर्त्यांनी, शिक्षणतज्ज्ञांनी का दाखवली नसावी? कारण त्यांना खेडय़ापाडय़ातला, गावगाडय़ातला माणूस प्रमाणभाषेत निष्णात व्हावा असं वाटतच नव्हतं. म्हणून आजवर शुद्धलेखन हा शब्द वापरला जातोय का, हा प्रश्न कोणाला विचारायचा? आणि कोणी? असं बोलायला गेलं की ते लगेच म्हणतात, ‘‘आम्ही शुद्धलेखनाचे नियम केले, शुद्ध बोला म्हटलं. तुमच्या बोली सोडा असं कुठं म्हटलं? तुम्हाला शुद्ध लिहायला यायला नको का?’’ यावर आपण काय बोलणार? शुद्धतेचा आग्रह धरून एका भलामोठय़ा समूहाला नाउमेद करण्याचा चालवलेला खेळ सगळ्यांच्याच ध्यानात आलेला असतो. फक्त त्याबाबतचे जाहीर उच्चारण करायला कोणीच तयार नसतो.

माझ्या घालमोडय़ा दादा-दादी हो, हे सगळं सहज शक्य होतं. फक्त तुम्ही ‘शुद्ध’ या शब्दाचा आग्रह सोडायला हवा होता. प्रमाणभाषेत बोल, प्रमाणभाषेत लिही, नियमानुसार लिही, अचूक लिही एवढं म्हटलं असतं तर किती बरं झालं असतं. पण आजही हे नागरी समूहातील लोक असं म्हणायला तयार नाहीत. उलट असं म्हणणाऱ्यावर भाषिक अज्ञानाचा ठपका ठेवून त्यास मोडीत काढण्यासाठी रकानेच्या रकाने भरण्यासाठी सरसावलेले असतात. गावगाडय़ातील लोक त्यांच्या आक्रमक हल्ल्याने गांगरून जातात बिचारे. अशा वेळी शासनानं आदेश काढून शुद्धलेखन हा शब्द वापरण्यास सर्व शिक्षक, सर्व तज्ज्ञ, सर्व ग्रंथकत्रे, साहित्य महामंडळं, वर्तमानपत्रवाले यांना बंदी केली असती आणि शुद्धलेखन नियम नव्हे तर प्रमाणभाषा लेखन नियम असे म्हटले पाहिजे, लिहिले पाहिजे, शुद्ध बोलणे नाही तर प्रमाणभाषेत बोलता यायला हवे एवढे जरी म्हटले असते तरी आम्हा खेडय़ापाडय़ातल्या लोकांचा भाषिक न्यूनगंड कधीच संपून गेला असता. ज्ञानाच्या क्षेत्रात गावगाडय़ातील लोकांनी अधिक भरीव कामगिरी केली असती.

साहित्याच्या क्षेत्रात व्यंकटेश माडगूळकरांनी बोलीतील शब्दांना, वाक्यांना संवादात स्थान दिले आणि मराठीत बोलींचा चंचूप्रवेश सुरू झाला. परिणामी विविध जातीजमातींतल्या लेखकांनी लिहायला सुरू केल्यानंतर मराठी साहित्य समृद्ध होत गेले. बोलीतील अनेक शब्दांनी प्रमाणभाषेचा शब्दसंसार अधिक भरघोस केला. एवढे एक उदाहरण सर्व गोष्टींवर प्रकाश टाकणारे आहे. हे प्रत्येक ज्ञानक्षेत्रात घडून गेले असते. पण तो भाषिक न्यूनगंड संपवण्याऐवजी वाढवण्यातच सर्वाचे हेतू लपलेले होते. आहेत. हेच लोक गळे काढतात, मराठी संपत चालली आहे, मराठी मरते आहे. पण मला प्रश्न पडतो, मराठीचे मारेकरी कोण?

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या