स्त्रिया कायमच अनेक प्रकारे व्यक्त होत होत्या. आपल्याला अशा कितीतरी ओव्या माहीत आहेत, ज्यावेळी बाईला दु:ख त्रासदायक होत होतं त्यावेळी ती प्रतीकांच्या भाषेतून बोललेली आहे. सीता, द्रौपदी यांच्या माध्यमातून तिनं आपलं सर्व प्रकारचं दु:ख हलकं करण्याचा प्रयत्न नेहमीच केलेला आहे.
संपूर्ण ‘रामायण’ किंवा ‘महाभारत’ स्त्रियांच्या ओव्यांमधून आपल्याला शोधून काढता येतं आणि तसा प्रयत्न झालेला आहे. एका ओवीमध्ये बाई म्हणते,

‘‘सीतेला सासुरवास
झाला गं परोपरी।
वाटून दिला तिने घव
सयांना घरोघरी।।’’

किंवा

‘‘सीतेला सासुरवास
झाला गं बहु बहु ।
वाटून दिला तिने
सयांना गहू गहू ।।’’

घरोघरी आपल्याला जो सासुरवास होत आहे, तो लहानसा आहे. सीतेला एवढा मोठा सासुरवास झाला याचं कारण काय? तर सासू ही खलनायिका समजली जाते. सीतेला तर तीन सासवा. मग तिला सासुरवास किती झाला असेल? ती ओवी आहे,

‘‘कौशल्या, सुमित्रा, कैकयी
तीन-तीन सासा।
सीताबाईंनी सासुरवास
भोगीयेला कसा ।। ’’

(सासा म्हणजे सासवा)अशा कितीतरी ओव्या द्रौपदीच्या बाबतीतही आहेत. आजही आपण गृहीत धरतो की, मुलीचं लग्न करून दिलं की ती सुरक्षित होते. हे द्रौपदीच्या बाबतीत आपल्याला दिसतं का? सीतेच्या बाबतीत तरी दिसतं का? सीतेला पती आहे, म्हणून रावणाने तिला पळवून नेणं सोडलं नाही आणि द्रौपदीला पाच नवरे असतानासुद्धा तिच्या आणीबाणीच्या प्रसंगी ते सगळे सभेमध्ये खाली माना घालून बसलेले होते. अशा वेळेस माझी जात्यावर दळण दळणारी ही साधीसुधी बाई जास्त शहाणी आहे, असं मला वाटतं. उदाहरणार्थ – द्रौपदीच्या संदर्भात एक ओवी आहे, यात द्रौपदीच्या ठिकाणी ही बाई स्वत:ला ठेवते आणि म्हणते,

पाच पतीची मी नार।
अनाथ रंडकीवाणी।
या वो श्रीहरी वाचूनी
मला नाही कोणी।।

श्रीहरी म्हणजे श्रीकृष्ण. या बाईला आपण अडाणी म्हणणार आहोत का?

मी ज्याचा वारंवार उल्लेख करते की, जुन्या काळापासून आजपर्यंत लोकसंस्कृतीतल्या या विचारांचा, भावनांचा प्रवाह सतत चालू आहे. तो अलीकडच्या काळामध्ये दिसला सावली मित्रा या अत्यंत नामांकित नर्तकीच्या एका अभिजात नृत्यनाट्यातून. त्यांनी सादर केलेल्या नृत्यनाट्याचं नाव आहे, ‘नाथवती अनाथवत’! सावली मित्रा या आधुनिक नर्तिका आहेत, कलावती आहेत आणि नृत्याच्या माध्यमातून जी भावना त्या व्यक्त करतात, तीच भावना जात्यावरच्या दळण दळणार्या बाईने ओवीतून व्यक्त केलेली आहे.

‘नाथवती अनाथवत’ म्हणजे अनेक नाथ असूनसुद्धा अनाथ असल्यासारखी द्रौपदीची अवस्था झालेली आहे. हे समजणार्या बाईला आपण अडाणी म्हणणार का? नवरा ज्यावेळेस त्रास देतो त्यावेळेस त्या नवर्याचाही निषेध बायकांनी केलेला आहे आणि त्या संदर्भात एक ओवी आहे,

‘‘घरची अस्तुरी
जशा करदळीच्या गाभा।
पराया नारीसाठी
चोर गल्लीमध्ये उभा।।’’

अस्तुरी म्हणजे बायको, ही कर्दळीच्या गाभ्यासारखी कोमल आणि कोवळी आहे. पण हा नवरा काय करतो? तर दुसर्या बायकांवर नजर टाकत गल्लीत उभा राहातो. हल्लीच्या भाषेत, सांगायचं तर ‘रोड रोमियोगिरी’ करत असतो. याचं तात्पर्य म्हणजे जात्यावर दळण दळणार्या पारंपरिक बायकांनी आपले श्रम हलके करण्यासाठी जसे कष्ट केले तशाच त्या आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत राहिल्या. भावनांचं ‘विरेचन’ (catharsis) केलं. आपल्या भावनांचं विरेचन करण्यासाठी साहित्याचा उपयोग केला जातो, असं संस्कृत, इंग्रजी रसचर्चेतही सांगितलेलं आहे.

मला या लोकपरंपरेतून प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं की, हे विरेचन करण्यासाठी बाई आपलं मन मोकळं करते आणि आपल्या मनातल्या वेदनेला वाट करून देते. ही कविता केव्हा निर्माण होते? तिची कविता ऐकणारं कोणी असतं का? पहाटेची शांत वेळ. ऐकणारं कोणी नाही. एकटं ‘जातं’ आणि ‘ती.’ जात्याची घरघर चालू असताना ती आपल्या मनातल्या, अंतस्तरातल्या तिच्या भावना गाण्यामधून एकटीच व्यक्त करत असते.

सुप्रसिद्ध इंग्रजी कवी विलियम वर्ड्सवर्थ उत्कृष्ट कवितेचं वैशिष्ट्य सांगताना म्हणतात, ‘‘spontaneous overflow of powerful feelings recollected in tranquility.’’ याचाच अर्थ भावनांचा अचानक तीव्र उद्रेक शांत अवस्थेमध्ये होतो, त्याला कविता म्हणायचं. त्यामुळे जगात सगळ्यात उत्कृष्ट कविता कुठली असेल तर, जात्यावर दळण दळणार्या बाईची ओवी! तिच्यातून सर्व प्रकारच्या भावना अत्यंत एकांत अशा अवस्थेमध्ये उद्रेक होऊन व्यक्त होतात. ही स्त्री आनंदाच्या भावनासुद्धा तेवढ्याच प्रेमानं व्यक्त करताना दिसते. ‘दळण संपलं’ असं म्हणायचं नाही. कधी नकारात्मक बोलायचं नाही. हल्लीच्या भाषेत ‘निगेटिव्ह’ बोलायचं नाही, अशी परंपरा आहे. मग ती काय म्हणते तर,

‘‘सरलं दळण
मी गं सरलं म्हणू कशी?।
सासरी माहेरी
माझ्या भरल्या दोन्ही राशी।।’’

माझं सासर आणि माहेर समृद्ध आहे. हे दोन्ही जेव्हा प्रेमाने नांदवतं तेव्हा त्या सासरचं आणि माहेरचं कौतुकही तिने केलेलं आहे. सासर्याला ‘छाया’ देणार्या वटवृक्षासारखं म्हटलेलं आहे, तर सासूला आईसारखी माया करणारी म्हटलेलं आहे. नणंदेचंही कौतुक आहे, कारण माझ्या नवर्याला ती सहकार्य करणारी लाडकी बहीण आहे. परंपरेमध्ये पुष्कळ ओव्या आहेत. नणंदेचं वर्णन करताना ती म्हणते,

‘‘काकणा शेजारी
पाटली जशी शोभते।
तशी भावाला
बहीण शोभते।।’’

काकण म्हणजे बांगडी. बांगडी शेजारी पाटली (बांगडीसारखाच दागिन्याचा प्रकार) जशी शोभते तशी भावाला बहीण म्हणजे माझी नणंद शोभते. परंतु नणंद जेव्हा त्रासदायक होते, त्यावेळेस थोडंसं तिरकसपणाने ती म्हणते,

‘‘नणंद अक्काबाई,
जसा चिंचेचा आकडा।
नितं स्वभाव वाकडा।।

चिंचेचा आकडा जसा वाकडा असतो आणि आंबट-चिंबट असतो तशी कधी-कधी ही नणंदसुद्धा बोलत असते. म्हणजेच ज्यावेळेस चांगले अनुभव येतात तेही ती मोकळेपणाने व्यक्त करते आणि जाचक अनुभव असतात तेही व्यक्त करते. त्यात बाईची जशी वेदना आहे तशी बंडखोरीही आहे. सीतेच्या आणि द्रौपदीच्या बाबतीतल्या ओव्यात आपण त्याची एक झलक पाहिली. त्या वेदनेबरोबर तिचा विद्रोहही कधी-कधी व्यक्त झालेला आहे. उदाहरणार्थ; लोकपरंपरेमध्ये रामायणासंबंधी पुष्कळ ओव्या आहेत. सर्व भारतीय स्त्रियांनी आपापल्या प्रादेशिक भाषेमध्ये त्या सांगितलेल्या आहेत.

अभिजन पातळीवरचं रामायण असं सांगतं की, सीतेला दुसर्यांदा रामाने वनवासात पाठवलंच नाही. ‘उत्तरकांड’ हा प्रक्षेप मागून समाविष्ट केलेला आहे, मात्र भारतीय लोकभाषांतील, शेकडो गीते, कथांमध्ये सीतेला दुसर्यांदा वनवासात पाठवलं आणि त्यावेळेस तिचे किती हाल झाले, हे सांगितलंय. कारण त्यावेळेस तिच्या ‘शीला’वर संशय घेतलेला होता आणि एका अर्थानं तिला फसवून लक्ष्मणाबरोबर रामाने वनवासात पाठवून दिलेलं होतं. सीतेचा हा दुसरा वनवास भारतातील लोकपरंपरेतल्या बायकांना अजिबात आवडलेला नाही. त्यासाठी त्यांनी परंपरेमध्ये सीतेला झुकतं माप दिलेलं आहे आणि रामाला दूषणेही दिलेली आहेत.

त्याच्या अनेक ओव्या आहेत, त्यात ‘अंकुशपुराण’ हे लोकपुराण आहे. त्याची उदाहरणे ‘सीतायन’ या माझ्या पुस्तकात आहेत. सीतेच्या वनवासातलं वातावरण वर्णन करताना ग्रामीण कष्टकरी स्त्रीचं जसं जगणं असतं तसंच या सीतेचं जगणं होतं. ती बाळंतीण कशी झाली? तर श्रम करता-करता रानातल्या एखाद्या बाईच्या पोटात कळ यावी आणि तिच्याबरोबरच्या कष्ट करणार्या बायकांनी तत्परतेनं जुनी लुगडी झाडाला बांधून आडोसा करावा आणि तिचं बाळंतपण करावं, अशी सीता बाळंतीण झाली. त्याचं वर्णन करताना या बायका ओवीतून म्हणतात,

‘‘येवढ्या गं वनामंदी
काय दिसतं लाली-लाल।
सीता नार बाळंतीण
लुगड्याचं गं दिलं पाल।।’’

पाल म्हणजे आडोसा. फाटक्या लुगड्याच्या आडोशाला सीताबाई बाळंतीण झालेली आहे, अशी पुष्कळ तपशीलवार वर्णनं आहेत. आता सीतेचं हे दु:ख केवळ जुन्या बायकांनीच वर्णन केलंय का? तर सीतेचं दु:ख आधुनिक स्त्रीपर्यंत चालत आलेलं आहे आणि आधुनिक कवयित्रीही अनेक परीने ते वर्णन करतात. सीतेच्या कथा सांगतात, म्हणी सांगतात, आधुनिक कवयित्री पद्मा गोळे म्हणतात, सीतेपुढे एकच ओढली रेषा लक्ष्मणाने, तिने ती ओलांडली आणि झालं रामायण

‘‘आमच्यापुढे दाही दिशा,
लक्ष्मणरेषा ओलांडाव्याच लागतात।
रावणांना सामोरे जावेच लागते।
कमी एकच असते।
घेत नाही भुई दुभंगून पोटात।।’’

सीतेचं दु:ख जात्यावर दळण दळणार्या बाईपासून ते आधुनिक स्त्रीपर्यंत सगळ्यांच्या मनामध्ये खोलवर रुजलेलं आहे. सीता, द्रौपदी आणि इतरही अनेक पौराणिक स्त्रियांच्या निमित्ताने स्त्रियांनी ते व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे पारंपरिक स्त्रीने आपल्या वैयक्तिक जगण्यातले अनेक पैलू छोट्या ओव्यातून व्यक्त केले. या ओव्या आनंदाच्या होत्या. आपल्या भावाचं-बापाचं कौतुक करणार्या होत्या आणि जिथं जाचक वाटेल, तिथे निषेध करणार्याही होत्या. एक परीने परंपराशील स्त्रीनं या वेदनेतून विद्रोह व्यक्त केला आहे, असं साधार म्हणावंसं वाटतं.

यावरून एक लक्षात येते की, लोकसंस्कृतीमधील अनेक बाबी काळाच्या प्रवाहात टिकून राहतात. क्वचित थोडा बदल होतो. बदलत्या काळानुसार काही नवीन बाबींचाही समावेश होतो. काळाबरोबर बाई सतत बदलत आली आहे. या बदलाच्या खुणाही आपण पुढील लेखांतून पाहाणार आहोतच.

uchaturang@expressindia.com