तुझ्याशी लग्न करायचे म्हणजे अनेक प्रश्न होते. शिवाय आपले वैचारिक मतभेद. जगात देव नसतो हे मी तुला समजावून देऊ शकलो नाही आणि जग देवाच्या इच्छेने चालते हे तूही मला समजावून देऊ शकली नाही. शेवटच्या दिवशी निरोप घेताना शेकहँड केलेला तुझा हात माझ्या हातात रेंगाळू पाहात होता आणि माझा हात शक्यतो त्या बंधनातून लवकर सुटू पाहात होता.. महम्मद रफी आणि मुकेशच्या आवाजातील विरह बास्तरावरून माहिती होता पण असे काही आतमध्ये पण घडते हे माहिती नव्हते..

तुला हिटलर आवडायचा. तू त्याने केलेल्या कृत्यांचे पाठ अगदी सहज सांगायचीस. ग्रुपमध्ये कुणीही गांधींचा विषय काढल्यानंतर त्यावर उथळ विनोद मारून तू इतर मित्र-मैत्रिणींच्या टाळ्या मिळवायचीस. १९९९ मध्ये असे वागणे राजकीयदृष्टय़ा फारसे योग्य होते, असे म्हणता येणार नाही. तुझ्या या टोकाच्या भूमिकेकडे एरव्ही कुणी लक्ष दिले नसते, पण कॉलेजातली सर्वात सुंदर मुलगी म्हटल्यानंतर या सगळ्या वागणुकीचे खुरटे झाड नेमाने डौलत रहायचे. आजचे पुरोगामी ज्या गोष्टींना सतत आक्षेप नोंदवतायेत ती वैदिक विमाने आणि संगणकाला संस्कृत भाषा समजते. अशा जावईशोधापासून सुटका मिळून मला तीन वर्षांचा काळ झाला होता. फक्त मुलांसाठी असलेल्या त्या शाळेने तसे खूप दिले, खूप दिले तसे खूप घेतलेही आणि या देण्याघेण्याच्या खटपटीचा हिशेब लागेना म्हणून मी शिक्षणाचाच नाद सोडला.

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
Randeep Hudda Post
सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याची हत्या, रणदीप हुडाने मानले अज्ञात मारेकऱ्यांचे आभार, पोस्ट शेअर करत म्हणाला..
Navneet Rana nominated for Amravati Lok Sabha Constituency
नवनीत राणा हिंदुत्वाच्या राजकारणावर स्वार
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

मी बारावीत दुसऱ्यांदा नापास होऊन कॉलेजात उडाणटप्पूगिरी करीत फिरत होतो तेव्हा तू एफवायबीएला होतीस. उगीचच पुढल्या वर्षी इंग्रजी स्पेशल घेण्याच्या चर्चा करीत आपल्याला पुढे करिअर वगैरे आहे या आभासात. तुझा हा भ्रम तोडायला मला वेळ लागला नसता, पण मी स्वत:च शिक्षणाच्या वाटेवर नव्हतो. जगात देव नसतो हा अतिसामान्य साक्षात्कार मला होण्याचीही हीच वेळ. आज इतक्या वर्षांनंतर तुला परत आठवताना आपल्या नात्यांचे फाउंडेशन नीट पाहायला हवे. प्रेमात पडलेल्या दोन जिवांना ‘आपण एकमेकांच्या प्रेमात का पडलो’ हे सांगायला हजार कारणे असतात. ‘आपण एकमेकांशिवाय का जगू शकत नाही’ या भावनात्मक लाचारीलाही हजार कारणे असतात. त्याकाळी ही लाचारी बहुतेक लोकांसाठी तीनेक वर्षे चालायची. एफवायला जाऊन मुली प्रेमात पडायच्या आणि वरवरच्या लिमिटेड शरीरसुखाच्या मर्यादेत आपला प्रियकर आपल्याशी लग्न करेल की नाही हे उर्वरित तीन वर्षे चाचपडत राहायच्या. पळून जाऊन लग्ने आत्ता कुठे शक्य होऊ लागली होती, पण एकूण प्रेमविवाह आणि एकूण प्रेमभंग यांच्यात अजूनही मोठी तफावत होती. तुझ्या त्रिवार्षिक उत्कटप्रेम योजनेत इतर चौघांपेक्षा माझे नाव वर कधी आले हे कळले नाही. पण आपल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होताना मी परत शिक्षणाच्या ट्रॅकवर आलो. प्रेमाच्या आणि शिक्षणाच्या विद्यापीठातले माझे पहिले वर्ष सुरू झाले तेव्हा तू थर्ड इयरला होतीस. तुझ्या आखीव-रेखीव स्वप्नांना आणि इच्छा-आकांक्षांना केवळ एक वर्ष मिळणार होते. एकाच वर्षांत सगळेच प्रयोग. मी खटपटी करून चार पैसे मिळविण्याच्या मागे लागलो. हजार-बाराशेसाठी रात्रपाळीत कामे करून दिवसा मलुल डोळ्यांनी तुझ्यासोबत स्वप्ने रंगवत राहिलो. नास्तिकतेचे सरळ लॉजिक बाजूला ठेऊन उगीचच आपल्या प्रेमाच्या यशासाठी तुझ्यासोबत देवांसमोर हात जोडीत राहिलो. तुझी बुवाबाजींच्या पंथांना असलेली कमिटमेंट मात्र खटकत रहायची. श्रद्धा कुठे संपते आणि अंधश्रद्धा कुठे सुरू होते यावर आपण बरेचदा भांडायचो, त्या भांडणाच्या शेवटी तुझ्या डोळ्यांत अश्रू असायचे. बोलताना मी कुठल्यातरी माताजी किंवा बाबाजींचा अपमान केला म्हणून. ‘आपण एकमेकांशिवाय का जगू शकत नाही?’ हा प्रश्न लवकरच ‘आपण एकमेकांसोबत कसे काय जगू शकू?’ इथवर येऊन थांबला.

मैत्रीतून फुलत गेलेले प्रेम पुन्हा एकदा समंजस मैत्रीकडे जाऊ लागले, पण हा समंजसपणा मला दाखवायचा नव्हता. तुझ्याशी लग्न करायचे म्हणजे जातीचा प्रश्न होता, पैशांचा प्रश्न होता, माझ्यामागे अजून लग्न न झालेल्या माझ्या दोन लहान बहिणींचा प्रश्न होता आणि लग्न केलेच तर तुझा भाऊ कुठकुठल्या हिंसेपर्यंत जाऊ शकेल या शक्यतांचाही होता. याशिवाय माझे वय एकवीस वर्ष पूर्ण नसणे हाही एक मोठा प्रश्न होता. ही गणिते सुटणे तर दूर पण मांडणेही अशक्य होते. या विरून गेलेल्या शक्यतांवर कोटी केली ती आपल्या वैचारिक मतभेदांनी. जगात देव नसतो हे मी तुला समजावून देऊ शकलो नाही आणि जग देवाच्या इच्छेने चालते हे तूही मला समजावून देऊ शकली नाही. शेवटच्या दिवशी कॅन्टीनमध्ये भेटल्यानंतर माझा निरोप घेताना शेकहँड केलेला तुझा हात माझ्या हातात रेंगाळू पाहात होता आणि माझा हात शक्यतो त्या बंधनातून लवकर सुटू पाहात होता. इतक्या सहजपणे आपल्या नात्यांचा संपर्क संपुष्टात येईल असे वाटले नव्हते. पण तसे झाले खरे. या सोपेपणामुळे त्या दिवशी तरी फारच मोकळेपणा वाटला होता. मी प्रचंड कोलाहलातून बाहेर आलो होतो. मेंदूतली भावनिक आंदोलने थांबून आता त्याला भविष्याचा विचार करण्याची संधी मिळणार होती. महम्मद रफी आणि मुकेशच्या आवाजातील विरह बाह्यस्तरावरून माहिती होता पण असे काही आतमध्ये पण घडते हे माहिती नव्हते.

तुझे कॉलेज संपल्याने आता तू जिथे नाहीस त्या कॅम्पसमध्ये माझ्यासाठी विशेष असे काही उरलेले नव्हते. माझ्या घरी फोन होता, तुझ्या घरी नव्हता. प्रेमाच्या काळात तू दिवसातनं दोन वेळा तरी फोन करायचीस आता दोन महिने वाट पाहूनही तुझा फोन काही यायचा नाही. एकदा आलेला तेव्हा तू फोनवर नुसतीच रडत होतीस. दुसऱ्यांदा आला तेव्हा मी घरी नव्हतो आणि माझ्या नव्या कामाच्या ठिकाणचा फोन इंटरनेटच्या डायल अप कनेक्शनवर बिझी होता. पुढच्या काही महिन्यांत इंटरनेटचा स्पीड, माहितीचा विस्फोट आणि माझा पगार वाढत राहिला. दरम्यान, याच काळात तुझ्या भावाला कुणीतरी माझ्याबद्दल सांगितले, त्यावरून तुला मारहाण झाली आणि तुझे घरातून बाहेर येणे-जाणे बंद झाले याविषयी मला नंतर कधीतरी समजले. पुढच्या काळात तू कमालीची अशक्त होऊन कुठल्याशा हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होतीस आणि मी तुला भेटायला यावे अशी सुप्त इच्छा ठेऊन होतीस हेही कळले. यालाच स्त्रीचा विरह म्हणतात हे मला अलीकडे अभ्यास करताना कळलेय, त्यावेळी मात्र तसे काही वाटले नव्हते.

आणखी काही दिवस सरले आणि तुझ्यासोबत घालवलेल्या एकूण दिवसांची संख्या तुझ्या विरहात घातलेल्या दिवसांच्या संख्येएवढीच झाली. दरम्यान जिथे काम करायचो ती कंपनी बुडाली, दुसऱ्या एका ठिकाणी काम मिळाले तीही चार महिन्यांतच बुडाली. मी रस्त्यावर आलो. वाटले संपले आता सगळे. पण पुढचा जॉब अगदी मोठय़ा कंपनीत बऱ्याच चांगल्या पगारावर लागला. मग बहिणींची लग्ने ठरली. या जबाबदारीतून मोकळा झाल्यानंतर आता आयुष्यात दुसरी म्हणून काही जबाबदारी राहाणार नव्हती. तुझ्याशी लग्न करण्यासाठी आवश्यक म्हणून ज्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्याच जुळून आलेल्या होत्या. माझे कुटुंब चाळीतल्या खुराडय़ातून स्वत:च्या मोठय़ा फ्लॅटमध्ये राहायला गेले होते, माझ्याकडे स्वत:ची टु व्हिलर होती आणि बँकेत लाखभर रुपये. मी पुन्हा एकदा चाचपणी सुरू केली. तुझ्या घरच्यांशी नेमके काय बोलायचे याची मनात अनेकदा उजळणी केली आणि मग तुझ्या संपर्कात असलेल्या एका मित्रामार्फत तुला निरोप पाठवायचे ठरवले. पण ‘मला आता कुणालाही भेटायचे नाही’ असा स्पष्ट निर्वाणीचा निरोप तू त्याच्याकडे कळवलास. तुझे लग्न ठरले होते आणि हे लग्न ठरण्याआगोदर  एक लग्न मोडले होते. त्याने तुला का सोडले असावे याचे कारण तुलाच माहिती असेल, पण त्याच्यासोबत असताना तू मला विसरली असशील हे नक्की. आणि तोही तुझ्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर आता नेटाने आणि काळजीपूर्वक लग्न करून टाकावे या व्यवहारी निर्णयापर्यंत तू आली असावीस. तेवीस जानेवारीला मी माझ्या बहिणीच्या लग्नानंतर जबाबदाऱ्यांमधून मोकळा होणार होतो. अठरा जानेवारीला तुझे लग्न. आपल्या प्रेमाच्या पहिल्या दिवसात तुझ्या क्लासजवळ आपण जिथे भेटायचो त्या जागेच्या समोरच्याच मंगल कार्यालयात.

मी सतरा जानेवारीला हॉलवर जाऊन आलो होतो. हॉलबाहेर लावलेल्या बॅनरवर तुझे माहेरचे आडनाव स्पष्ट दिसत होते. योगायोग असा की त्याच दिवशी अवकाळी पाउसही पडून गेला होता. आठवडय़ाभरात होणाऱ्या बहिणीच्या लग्नाच्या गडबडीत असल्याने रडायला फारसा वेळ मिळाला नाही. पण तरीही वेळ मिळेल तसा रडून घेत होतो. तुझ्यासोबत आयुष्य घालविणे आता कधीही शक्य होणार नाही या कल्पनेने आतून कोसळलो होतो. व्यवस्थित विचार करता कळले की गेली तीन-चार वर्षे चाललेला सगळा संघर्ष हा त्याच सुप्तभावनेत चालला होता. उगीच मनाला फसविल्यासारखे वाटू नये म्हणून स्वत:लाही शब्दात तसे काही सांगितले नव्हते. तुझे नसणेही आता शब्दापासून वेगळे काढून विनाशब्दाची भावना बनवणे आवश्यक होते, नाहीतर आत्महत्येशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. दु:ख शब्दांच्या पलीकडे नेऊन ठेवले तरी ते डोळ्यात मात्र कायमचेच उतरले. मी दिवसेंदिवस कुणाशी काही न बोलता निमूटपणे जगत राहिलो. शरीर व्यवस्थित चालू होते. व्यवस्थित पगार येत होता पण तो विरह कुठेच गेला नाही. नंतर नंतर तर तुझा चेहराही आठवायचा नाही, पण दु:ख मात्र तसेच होते. पुढच्या काळात तत्त्वांची चौकट आणखीनच पक्की झाली. मी देव मानणाऱ्यांना समजावत बसण्याऐवजी त्यांना आयुष्यातूनच वजा करू लागलो. नव्याने रीतसर माणसांत येण्याआगोदर बऱ्या गोष्टी स्वत:पुरत्या सुस्पष्ट केल्या. या सुस्पष्टतेमुळे मग नंतर कधी कुणाशी नाती जुळली नाहीत. काही जणींना प्रेमाची भावना इथेतिथे उगीचच उगवून आल्यासारखी वाटली. पण देव मानणाऱ्यांशी केलेल्या प्रेमाचे नंतर काय होते याची कल्पना असल्याने त्यांच्या वाटेवर कधी गेलो नाही.

तू आजकाल नेमके कसे आयुष्य जगत असशील हे पडताळून पाहण्यासाठी माझ्यासमोर आता असंख्य उदाहरणे आहेत. तुझ्याबद्दलची माझी मते आयुष्यात तू कुठेच नसताना अधिक तीव्र झाली आहेत. यात भविष्यातही काही बदल होतील असे वाटत नाही. तुला शेवटचे भेटून आता सोळा वर्षे झालीयेत. तुझे लग्न कुणाशी झालेय, तू कुठल्या शहरात आहेस, तुला किती मुले आहेत हे मला माहिती नाही. मी तुला शोधण्याचा प्रयत्नच केला नाही असे नाही पण तूच ही माहिती आपल्या सगळ्या मित्र-मैत्रिणींपासून लपवून ठेवली असावीस किंवा त्यांनी ती माझ्यापासून लपवून ठेवलेली असावी. तुझे नावही इतके सामान्य आहे की फेसबुकवर शोधले तर त्या नावाच्या लाखभर मुलींची नावे समोर येतात, त्यांच्यात तू शोधूनही सापडत नाहीस. आता अगदी गरिबांकडेही व्हॉट्स अ‍ॅप आणि स्मार्टफोन असतो, तुझ्याकडेही असणारच पण त्याचा नंबर मला माहिती नाही. तो सहजतेने मिळाला असता तर सहजतेने मी तुला संपर्कही केला असता. पण तो सहजपणे मिळणे शक्य नाही. अधिक विचार केला तर दुर्मीळ योगायोगाशिवाय आपली भेट आता कधीही शक्य नाही. आपले पहिले प्रेम आयुष्यात कधीतरी परत कुठेतरी भेटेल याबद्दल सगळेच आशावादी असतात, मी मात्र याला अपवाद असेन.

आज हिटलर पूर्वीपेक्षा लोकप्रिय आहे आणि गांधींच्या मारेकऱ्यांचा पुतळा येऊ घातलाय. कधीकाळी तुझे नाकारलेले विचार आता या देशाचा मुख्य विचार आहे. मी आजही या विचारांचा विरोधक असलो तरी आता माझा विरोध क्षीण आणि दुबळा ठरू लागला आहे. ‘माणूस व्यवहारचतुर असला म्हणजे तो ज्ञानसंपन्न असतोच असे नाही’ हे माझे वाक्य तुला तेव्हा जितके बाष्कळ वाटायचे त्याहीपेक्षा जास्त बाष्कळ आता अनेकांना वाटते.

आज अठरा वर्षे मागे वळून बघताना एक गोष्ट मात्र स्पष्टपणे जाणवते. तू जिंकलीस. मी हरलो!

राहुल बनसोडे rahulbaba@gmail.com