काळ बदललाय तशी गावातली ‘ती’ आणि शहरातली ‘ती’ बदललीय नात्यांच्या संदर्भात. दोघींनाही आपलं आयुष्य स्वतंत्र असावं असं वाटतं. नात्यांच्या गोतावळ्यात आपण अडकायला नको ही भावना दोन्हीकडे सारखीच असते. कुठलंही नातं हे विश्वासावर आणि समजुतीवर फुलतं. मग शहरातली ‘ती’ असो, किंवा गावाकडची. नातं विकसित होत जाणं महत्त्वाचं. तरी मला गावाकडची ‘ती’ आणि शहरातली ‘ती’ यांच्यातल्या त्या वेगळेपणाविषयी कुतूहल आहे..

आपली पाश्र्वभूमी काय यावर अनेकदा गोष्टी अवलंबून असतात. पाश्र्वभूमी या शब्दाला सामाजिक, आर्थिक, मानसिक, बौद्धिक असे सर्वच पदर अपेक्षित आहेत. ‘ती’चं अवलोकन करताना ही पाश्र्वभूमी खूप महत्त्वाची आहे. मला शहरातली ‘ती’ आणि गावाकडची ‘ती’ यांच्यात नेहमी गोंधळ वाटतो. म्हणजे शहरातली ‘ती’ समजा गावाकडे गेली, तर ‘ती’बदलेल का किंवा गावाकडची ‘ती’ शहराकडे आल्यावर शहरातल्या ‘ती’च्यासारखी बिनधास्तपणे वागू शकेल का? बरं, या दोघींमध्येही होणारे बदल कसे असतात? मला भेटलेल्या अनेक ‘ती’च्या बाबतीत मला हा प्रश्न पडलाय. त्याचं उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न करतोय. ‘ती’ गावाकडची असो वा, शहरातली, ‘ती’च्या बद्दल सगळंच जरा गोंधळाचं वाटतं.

Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Village culture of bhavki
मदतीला धावून येणारी भावकी! गावात जपली जाते आपली संस्कृती, VIDEO होतोय व्हायरल
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

माझ्या आजूबाजूला या दोन्ही प्रकारच्या ‘ती’ होत्या आणि आहेत. ‘ती’च्या बद्दल असे प्रश्न मनात असण्याचं कारण म्हणजे आपली सो कॉल्ड संस्कृती, सो कॉल्ड सामाजिक-कौटुंबिक बंधनं, सो कॉल्ड बाईपणाचा शिक्का. या सगळ्याला तोंड देत ‘ती’च्यात कसे बदल झाले, ‘ती’ने ते कसे स्वीकारले हे अनेक प्रश्न मनात आहेत. शेवटी, ‘ती’चं कोणतं रूप खरं मानावं असा प्रश्न अनेकदा पडतो. एकूणच ‘ती’च्या बद्दल मला नेहमीच कुतूहल वाटत आलंय. कारण, आपल्या संस्कृतीनुसार तिला पुरुषापेक्षा जास्त तडजोड करावी लागते. शारीरिक-मानसिक बदल सहन करावे लागतात, पुरुषांच्या नजरांना तोंड द्यावं लागतं, नाती सांभाळावी लागतात आणि मुख्य म्हणजे, लग्नानंतर आपलं घर सोडावं लागतं. हे सगळं उण्यापुऱ्या पंचवीस-तीस वर्षांत करावं लागतं आणि हे सगळं करताना आपल्या मनातल्या इच्छा-आकांक्षा, स्वप्नही पूर्ण करायची असतात. त्याचं दडपण असतं तेही वेगळंच. मग, हे सगळं करायची क्षमता येते कुठून? पुरुषांनाही यातल्या बऱ्याच गोष्टी कराव्या लागत असल्या, तरी त्यात समाज, परंपरा असल्या गोष्टींचं दडपण नसतं. एका अर्थानं पुरुष मुक्त असतो, जे हवं ते करायला. ‘ती’चं तसं नसतं. तरीही ‘ती’ उभी राहते प्रत्येक बदलाला सामोरी जात. या सगळ्याचा विचार करताना खरंच गोंधळायला होतं. आता मूळ मुद्दय़ाकडे..

जागतिकीकरणानंतर गाव आणि शहर या संकल्पना काहीशा धुसर झाल्या. तंत्रज्ञान, माध्यमं यामुळे जगात काय चाललंय याचा अदमास गावाकडेही सहज येऊ लागला. तरी ‘ती’गावाकडची आहे आणि ‘ती’ शहरातली आहे, स्पष्ट कळतंच. गावाकडची ‘ती’ही बिनधास्त बोल्ड असते, नाही असं नाही. पण, तिच्या बोल्ड असण्यालाही एक मर्यादा असते. शहरातल्या तिच्याबाबतीत असं नाही होत. वागणं-बोलणं, पोशाख, विचार हे सगळंच वेगळं असतं. यांच्या भूमिका बदलल्या, तर त्या कशा असतील?

गावाकडची ‘ती’ जरा पारंपरिक होती. स्वत:चा वेगळा विचार नसणारी.. एकत्र कुटुंबाची अपेक्षा असणारी.. सर्व जुन्या प्रथा पटत नसल्या, तरी न बोलता पाळणारी.. किंबहुना, स्वत:चं मतच न मांडणारी.. नव्या पिढीची असूनही मागे मागे राहणारी.. का असेल ती अशी? मला नेहमी प्रश्न पडायचा. आजही पडतो. ती दिसायला जशी साधी होती, तशीच प्रत्यक्षातही होती. माझ्या सोबत असतानाही तिनं कधी धाडसी, स्वत:चं मत मांडलं नाही. तू कधी ‘सेटल’ होशील? हाच प्रश्न ‘ती’ मला विचारायची.. या प्रश्नात काही चुकीचं नव्हतं. पण माझ्या ‘सेटल’ होण्याच्या वेळात ती स्वत: काय करणार याचं उत्तर तिच्यापाशी कधीच नव्हतं. तिनं त्याचा कधीच विचारही केला नव्हता. कारण, ती सर्वस्वी माझ्यावरच अवलंबून राहणार होती. आपण स्वतंत्रपणे काही तरी वेगळं करू असा विचार तिच्या मनात का येत नव्हता? घरचे संस्कार की पुढे जायला वाटणारी भीती? नेमकं काय? तिला मी तेव्हा त्या बद्दल विचारलंही.. अर्थात समाधानकारक उत्तर मिळालं नाही. तिचं तसं असणं मला पटत नव्हतं.. खरं तर तिला मनापासून शहरात यायचं होतं. पण, शहरात आल्यावर काय करणार याचं उत्तर मात्र तिच्यापाशी नव्हतं. शहरात आल्यावर ती इथल्यासारखं जगू शकली असती का, तिनं काय केलं असतं कशाचाच अंदाज बांधता येत नाही. मध्यंतरी ‘ती’ शहरात आल्याचं ऐकलं होतं, पण काही काळानं ‘ती’ पुन्हा गावाकडे गेल्याचंही ऐकलं. आज ‘ती’ काय करते मला काहीच कल्पना नाही.. पहिल्या ‘ती’ सारख्या अनेक ‘ती’ माझ्या परिचयाच्या आहेत. त्यातल्या काही लग्नानंतर शहरातही आल्या आहेत. शहरात आलेल्या बऱ्याच जणी शहरात राहून गावाकडे असल्यासारखाच विचार करतात. वागणं-बोलण्यातून शहरीपण आलं आहे. पण, या शहरीपणाचे पोपडे वरचेवर उडून पडतात.

आता दुसऱ्या ‘ती’ बद्दल.. म्हणजे शहरातल्या ‘ती’ बद्दल! बोल्ड, बिनधास्त, मोकळीढाकळी. अगदी चित्रपटात पाहतो तशीच शहरी. स्वत:चं मत असणारी, उत्तम वाचन असलेली, परखड मत मांडणी, स्पष्ट बोलणारी. बऱ्यापैकी ‘फेमिनिस्ट’ विचार असलेली. ‘फेमिनिस्ट’ अशा अर्थानं, की ‘हे सगळं आम्हीच का करायचं, पुरुष का नाही करत’, असा प्रश्न सरळ विचारणारी. लग्नापूर्वीची ‘ती’, लग्नानंतरची ‘ती’ आणि मुलं झाल्यानंतरची ‘ती’, हाच बदल इतका प्रचंड आहे, की त्याचं अवलोकन करताना गरगरायला होतं. इतके झटपट बदल ‘ती’नं कसे स्वीकारले असतील हा प्रश्न पडतो. सुरुवातीला ‘ती’ला पाहिल्यावर ‘ती’ संसार वगैरे करेल असं कधीच वाटलं नसतं. पुढे तिच्याशी मैत्री झाल्यावर ‘ती’ दिसते, त्यापेक्षा बरीच वेगळी आहे हे जाणवलं. लग्नानंतर ‘ती’ अजून वेगळी वाटली. आधीच्या दोन्ही रिलेशनशिपमध्ये ‘ती’ तिच्या मुद्दय़ांबाबत कायमच आग्रही असायची. आजही असते. लग्नानंतर मुली बदलतात. तशी ‘ती’ही बदलली, पण आपलं स्वतंत्र अस्तित्व जपून. हे बदल स्वीकारत ‘ती’ जबाबदार झाली. ही जबाबदारी ‘ती’नं इतक्या सहजपणानं स्वीकारणं जरा अनपेक्षित आणि आनंददायी होतं. मात्र, मला भेटलेल्या शहरातल्या ‘ती’विषयी जरा वादग्रस्त मत आहे माझं,  ‘ती’ला माज असतो. कारण, स्वत:ची मतं असतात, स्वतंत्र अस्तित्त्व असतं, स्वतंत्रपणे पैसे कमवत असल्याचा अभिमान असतो. आपण स्वतंत्रपणे पैसे मिळवले, म्हणजे सारं काही झालं का? चार चौघांमध्ये वावरताना रिलेशनशिपची कौतुकं सांगायची, प्रत्यक्षात मात्र स्वत:च्या पलीकडे जाऊन आजूबाजूच्यांचा विचार का करावासा वाटत नाही? हा विरोधाभास न कळणारा आहे. तिच्या स्वतंत्र कमाईचा प्रत्येक ‘त्याला’ नक्कीच फायदा होतो, हेही तितकंच खरं. आपल्याशिवाय अजून एक पैशांचा स्रोत घरात येतो, हा त्याच्यासाठी खूप मोठा ‘रिलिफ पॉइंट’ असतो.

पण शहरातल्या ‘ती’ची मतं इतकी भिनलेली असतात, की आपलं काही तरी चुकतंय हे सांगूनही पटत नाही. अशा वेळी मग हा स्वतंत्रपणा काय करायचाय? आधुनिक विचार, नातेसंबंध आणि घर यांची ज्या पद्धतीनं सांगड घालायला हवी, तशी घातली जात नाही. ‘ती’ला आपल्या मतांबाबत आडमुढेपणा, अहंकार जास्त असतो. म्हणूनच शहरातल्या ‘ती’च्या बाबतीत लग्नानंतर अनेकदा अडचणीचे प्रसंग निर्माण होतात. जगण्याच्या बाबतीतही स्वतंत्र असणं दोघींनाही महत्त्वाचं वाटतं. दोघींही आपल्या जगण्याकडे तितक्याच निरलसपणे पहातात.

मी पाहिलेली शहरातली ‘ती’ जेव्हा गावाकडे जाते, तेव्हा तिच्यासाठी विचित्र परिस्थिती असते. गावाकडच्या प्रथा-परंपरा तिला पाळायच्या नसतात, तिला हवा असलेला मोकळेपणा गावात नसतो. गावाकडे गेल्यावर मुख्य अडचण होते, ती म्हणजे गावाकडची ‘ती’ आणि शहरातली ‘ती’ समोरासमोर येतात तेव्हा. त्यातून निर्माण होतात तात्त्विक प्रश्न, जे दोन्ही बाजूला बरोबर असतात आणि चुकीचेही! आपण जिथं जातो, तिथल्यासारखं व्हायचं हे बोलणं सोपं असतं. प्रत्यक्षात आचरण करणं मात्र अवघड होऊन बसतं. कारण, दोन्ही ‘ती’ला स्वत:चं म्हणणं बरोबर वाटत असतं. शहरातल्या तिला वाटत असतं, गावाकडच्या ‘ती’नं बदलायला हवं. किती काळ त्या पद्धती पुढे रेटत राहणार.. तर गावाकडच्या तिला वाटत असतं, की शहरातल्या ‘ती’नं थोडं अ‍ॅडजेस्ट केलं तर बिघडलं कुठे? तुमच्या शहरातल्या पद्धती तिथं ठेवा, गावात आल्यावर इथल्यासारखं वागा. गावातल्या लोकांचं लक्ष असतं. शहरातल्या तिला गावातल्या लोकांचा काही फरक पडत नसतो. गावातल्या ‘ती’ला पडतो. हा झगडा वर्षांनुर्वष सुरू आहे. तो संपणार कधी, याचं उत्तर काळच देईल.

काळ बदललाय तशी गावातली ‘ती’ आणि शहरातली ‘ती’ बदललीय नात्यांच्या संदर्भात. दोघींनाही आपलं आयुष्य स्वतंत्र असावं असं वाटतं. नात्यांच्या गोतावळ्यात आपण अडकायला नको ही भावना दोन्हीकडे सारखीच असते. त्या बाबतीत या दोन्ही ‘ती’ मानी असतात. कुठलंही नातं हे विश्वासावर आणि समजुतीवर फुलतं. मग शहरातली ‘ती’ असो, किंवा गावाकडची. नातं विकसित होत जाणं महत्त्वाचं. तरी मला गावाकडची ‘ती’ आणि शहरातली ‘ती’ यांच्यातल्या त्या वेगळेपणाविषयी कुतूहल आहे. सहजपणे बदल स्वीकारण्याच्या ‘ती’च्या त्या क्षमतेबद्दल आदर आहे. या सगळ्यात गावाकडची ‘ती’ आणि शहरातली ‘ती’ यांच्यातलं माझा गोंधळ कधी आणि कसा संपणार, हा मात्र माझ्यापुढचा मोठा प्रश्न आहे.

चिन्मय पाटणकर

chinmay.reporter@gmail.com