‘‘धाव संत्या धाव. कर तिला आऊट. टाक टप्पू टाक, टाक. अय गयबान्या आर कर की आऊट.’’ रणज्या मोठमोठय़ानं ओरडत होता आणि संत्या मात्र तिच्या जवळ जाऊन थांबलेला. तिला स्पर्श करायचंही धाडस त्याला होतं नव्हतं. चवळीच्या शेंगेसारखी तिची नाजूक काया. त्यात लाजून लाजून तिचे गाल टोमॅटोसारखे लालबुंद झालेले. तिनं ओंजळीत तोंड लपवलेलं. लाजत होती की घाबरत होती तिलाच माहीत.

शाळेच्या मदानात नववीच्या वर्गाचा खो-खो रंगात आलेला. मुलं विरुद्ध मुली असा सामना होता. नेमका संत्याला खो बसला आणि समोर सवडी धावताना त्याला दिसली. ती समोर पळत होती आणि संत्याही तिच्यामागं धावत होता. आम्ही दोघंही अगदी स्लो मोशनमध्ये धावतोय, असं त्याला वाटलं. तिच्या प्रत्येक पावलागणिक जमिनीवरची माती हलकेच उडत होती. माती कसले ते तर मोतीच जणू. पिक्चरमध्ये हिरॉईनच्या मागे हिरो जसा डोंगरातून, गवतातून धावतो तसंच काहीतरी संत्याला वाटू लागलं. आपल्या डोळ्यावर गॉगल आहे. अंगावर लाल जॅकेट आहे. आम्ही दोघं स्वित्र्झलडच्या हिरव्यागार डोंगरावर आहोत. मी आता धावत जाणार आणि तिला मागून मिठी मारून उचलणार. मग गोल गोल वेढे मारणार, दोघंही हात वर करत गाणं म्हणणार, असं काय काय त्याच्या मनात येऊन गेलं. कमालीचा चेकाळत संत्या तिच्या मागं पळत गेला आणि अवघ्या पाच-सहा ढांगात त्यानं सारं अंतर कापलं.

हातभर अंतरावरच ती घाबरून थांबली. तिनं वळून मागं पाहिलं. संत्याच्या डोळ्यात हसू होतं, भीती होती, कुतूहल होतं, आनंद होता आणि प्रेमही होतं. तिनं संत्याकडं पाहात ओंजळीत तोंड लपवलं. संत्या आपल्याला आता आऊट करणार आणि मगाशी त्यानं जसं सिंधूच्या पाठीत रपाटा टाकला तसा तो आता आपल्याही पाठीत टाकणार, असं तिला वाटलं. म्हणून ती क्षणभर घाबरलीही. संत्यानं तिला आउट करण्यासाठी हात वर उचलला तशी टीममधली पोरं संत्याला आवाज देत तिला आऊट करण्यास सांगू लागली. संत्या मात्र हरवून गेला.. आपली सुहागरात्र आहे आणि आपण बेडजवळ आलो आहोत. बेडवर फुलांच्या पाकळ्या टाकल्यात. सभोवती हारही लटकवले आहेत. सवडी डोक्यावर घुंघट घेऊन बसलीये आणि आपल्याला पाहात लाजून तोंड लपवतीये. आपण हात वर करत हार बाजूला करतोय.. तोच ‘टाक टप्पू टाक, टाक.  आर कर की आऊट.’ असा आवाज त्याच्या कानावर पडला आणि तो भानावर आला. तोपर्यंत सवडी तिथून हसत हसत पळून गेली होती. पळतानाही तिच्या चेहऱ्यावरचा आनंद संत्याला घायाळ करत होता. नजरेतून ती तीर सोडत होती आणि प्रत्येक तीर खचाखच संत्याच्या काळजात घुसत होते.

संत्याची लव्हस्टोरी बहरात आलेली. एव्हाना संत्याचं जंगाट वर्गातल्या प्रत्येकाला समजलं होतं. त्यामुळं प्रत्येक पोरगा सवडीला सोडून दुसऱ्या पोरीवर लाइन मारत होता. सवडी सगळ्यांची वहिनी होती. संत्या ‘करीब’ पिक्चरमधला बॉबी देओल होता, ‘राजा हिंदुस्तानी’मधला आमीर खान होता. अर्थात, सवडी संत्याची असली तरी ती फक्त मनामध्ये. प्रत्यक्षात त्यांच्यात कधी बोलणं नव्हतं की चिठ्ठीची देवाणघेवाण नव्हती. वर्गामध्ये जोक झाला की एकमेकांकडं पाहून हसायचं आणि हसरा चेहरा मनामध्ये साठवायचा एवढंच त्यांचं प्रेम.

दोघंही एकमेकांकडं पाहून हसत होते. एकमेकांकडं पाहून लाजत होते. पण, कधी संत्यानं तोंड उघडलं नाही की कधी सवडीनंही त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. कदाचित त्यांचं प्रेम होतंच तसं. नेहमीच अबोल.

एकमेकांकडं पाहण्यात नववी उरकली आणि एकमेकांची स्वप्न पाहण्यात दहावीही झाली. गावातली शाळा संपली आणि शिक्षणासाठी दोघांचे मार्ग वेगळे झाले. संत्याच्या घरची परिस्थिती बेताची. त्यामुळं दहावी झाली आणि त्यानं तालुक्याला आयटीआयच्या वेल्डर ट्रेनिंगला अ‍ॅडमिशन घेतलं. सविता गावच्या बागायतदाराची पोरगी. तिनं शहरात अकरावी सायन्सला अ‍ॅडमिशन घेतलं. दोघांची ताटातूट झाली.

पण, सवडी कधी गावात आली तर तेवढय़ापुरती दोघांची बघाबघी व्हायची. तेव्हाही दोघं एकमेकांकडं पाहून हसायचे. अकरावी तशी हसण्यात गेली. पण हळूहळू त्या हास्यामधली जादू गायब होऊ लागली होती. त्या नजरेत पूर्वीसारखा प्रेमाचा ओलावा नव्हता. का कुणास ठाऊक, पण दोघांचं प्रेमही या व्यवहारी जगात कोरडं पडत चाललं होतं.

सविता शहरात गेली आणि हळूहळू शहराची होऊ लागली. तिच्या वागण्याबोलण्यात बदल होऊ लागला. कॉलेजमध्ये तिला बॉयफ्रेंड आहे, असं संत्याचे दोस्त संत्याला नेहमी सांगायचे. पण संत्यावर त्याचा फारसा परिणाम होत नव्हता. त्यामुळं सवडी संत्याचा फक्त टाइमपास होता की काय, असंही त्याच्या दोस्तांना वाटायचं. पण संत्याचं एकच म्हणणं असायचं, तिला बॉयफ्रेंड असो नाहीतर तिचं लग्न होऊ दे तिचं माझ्यावर प्रेम होतं आणि ते कायम राहणार.

दिवसामागून दिवस धावत गेले. कॉलेज संपलं आणि सविता डॉक्टर झाली. तिनं कॉलेजमधल्या तिच्याच तोलामोलाच्या मुलाशी प्रेमविवाह केला. संत्याही गावाजवळच्या एमआयडीसीतल्या कंपनीत कामाला लागला. संत्याच्या घरच्यांनी त्याचंही नात्यातल्या मुलीशी लग्न लावून दिलं. दोघांचा आपापला संसार सुरू झाला. दोघांच्या घरचे पाळणेही हालले. पण दोघांच्या डोळ्यांसमोरून कधीमधी नववीचे दिवस धावत जायचे आणि दोघंही पुन्हा एकदा स्वप्नामध्ये त्या मदानावर पोहचायचे.

सवडीला बॉयफ्रेंड आहे हे ऐकूनही संत्याला वाईट वाटत नव्हतं. तिनं प्रेमविवाह केल्याच्या गोष्टीनंही तो दु:खी झाला नव्हता. संत्याचंही लग्न झाल्याची रुखरुख सवडीच्या मनाला कधी लागली नव्हती. मग खरोखरच या दोघांमध्ये प्रेम होतं का?

संत्याची बायको तिसऱ्यांदा गरोदर राहिली होती. दिवस भरले होते. डॉक्टरांनी तिला तातडीनं शहरातल्या दवाखान्यात हलवलं. संत्याची बायको प्रसूतीच्या कळांनी हैराण झाली आणि भरल्या डोळ्यांनी संत्या, ‘माझ्या बायकोला वाचवा’ असं म्हणत डॉक्टरांच्या पाया पडायला गेला. समोर डॉ. सविता उभी होती. डॉ. सविता म्हणजे संत्याची सवडी. डॉक्टर सवडी. तोच प्रसन्न चेहरा. तेच गुलाबी गाल, तेच तळ्यासारखे शांत डोळे, तेच मुलायम ओठ..

स्वत:ला सावरत, आवंढा गिळत संत्यानं सवडीसमोर हात जोडले. आयुष्यातल्या पहिल्या प्रेमासमोर हात जोडले आणि म्हणू लागला, ‘‘माझ्या बायकोला वाचवा डॉक्टर, माझ्या बायकोला वाचवा. गावाकडचे डॉक्टर म्हणत होते पोरगं आडवं झालंय. हे घ्या हे कागद.’’ असं म्हणत संत्यानं डॉक्टरांनी दिलेले सगळे कागद डॉ. सविता यांच्या हातात दिले. डॉक्टरांनी तातडीनं शस्त्रक्रियेची तयारी केली. डॉ. सवितानं खूप प्रयत्न केले. रात्रभर शस्त्रक्रिया चालू होती. पण काही फायदा झाला नाही. बाळ आणि बाळाची आई दोघांनाही ते वाचवू शकले नाहीत. दोघांचाही मृत्यू झाला. सवडीनं ऑपरेशन थिएटरबाहेरच संत्याची माफी मागितली अणि केबिनमध्ये गेली. तिच्या पाठोपाठ संत्याही हताश पावलानं गेला आणि भिंतीला पाठ टेकवून खाली बसला. पाच दहा मिनिटं ढसाढसा रडला आणि बोलू लागला, ‘‘पाहुण्यांची पोरगी केली होती. लग्नाच्या पहिल्या रात्रीच मी तिला माझं सवडीवर प्रेम होतं, असं सांगितलं होतं. तवापासून ती नेहमी मला तुझ्याविषयी विचारायची. एकदा तरी मला सवडीला भेटायचंय, असं म्हणायची. तू जीव लावत होता अशा नशीबवान पोरीला आणि तुझ्यासारख्या पोराला सोडून गेलेल्या कमनशिबी पोरीकडं पाहून हसायचंय, असं म्हणायची. ती म्हणायची, तिनं जर तुझ्याबरोबर लग्न केलं असतं तर मला तुझ्यासारखा एवढा प्रेमळ नवरा मिळाला नसता. एकदा तरी मला तिला भेटून तिचे आभार मानायचेत, असंही म्हणायची. पण तिला काय माहिती? तिची आणि तुझी भेट ही तिच्या आयुष्याची शेवटची भेट असेल. मला जर हे माहिती असतं, तर मी दुसऱ्या दवाखान्यात नेलं असतं. पण कधी तिला इथं आणलं नसतं.’’

असं म्हणत संत्या पुन्हा ढसाढसा रडायला लागला. त्याला सवडीकडं पाहायचीही इच्छा झाली नाही. त्यानं डोळे पुसले आणि उभं राहत खाडकन दार उघडत तो बाहेर आला. संत्याच्या आईच्या मांडीवर त्याचं तान्ह लेकरू झोपलं होतं. त्यानं त्याला कडेवर घेतलं आणि लगबगीनं चालू लागला. पोरगं बापाच्या खांद्याला बिलगून झोपलं. संत्या कनाकना चालत काऊंटरपाशी गेला. तिथं त्यानं खिशातलं नोटांचं पुडकं काढून समोर मांडलं. तिथल्या माणसांनं पसे मोजले. संत्या नाक-डोळे पुसत होता. आवंढा गिळत होता. सवडी हताशपणं त्याच्याकडं पाहात होती. काऊंटरवरचा माणूस पळत डॉ. सविता यांच्याकडं आला आणि त्यानं बिलावर सही घेतली. पुन्हा पळत पळत जात त्यानं तो कागद संत्याकडं दिला. अध्र्या-पाऊण तासाचा वेळ गेला.

डॉ. सविता हॉस्पिटलमधून बाहेर आल्या आणि गाडीमध्ये बसल्या. त्यांची गाडी निघाली. सोबत संत्याच्या बायकोच्या मृतदेहाला घेऊन अ‍ॅम्ब्युलन्सही त्याच्या गावाकडं निघाली. दोन्ही गाडय़ा दोन दिशेला धावत निघाल्या. एकीकडं पहिल्या प्रेमाचं जिवंत प्रेत निघालं होतं तर दुसरीकडं दुसऱ्या पण खऱ्या प्रेमाचं खरं प्रेत निघालं होतं. पहिलं प्रेम जिवंत होतं. पण खरं प्रेम मेलेलं होतं. खऱ्या प्रेमानं पहिल्या प्रेमाला हरवलं होतं.

सवडीचं संत्यावर प्रेम होतं की नव्हतं तिलाच माहिती. संत्याचं सवडीवर खरोखरच प्रेम होतं का नाही हेही त्यालाच माहिती. पण संत्याचं त्याच्या बायकोवर आणि त्याच्या बायकोचंही संत्यावर निस्सीम प्रेम होतं हे मात्र खरं. ढसाढसा रडणाऱ्या संत्याला सोडून आज त्याच्या प्रेमाचे दोन मृतदेह दोन दिशेला निघाले होते. तो मात्र खऱ्या प्रेमाच्या मृतदेहासोबत होता. पहिल्या प्रेमाच्या मृतदेहाचा वाली दुसरा कुणीतरी होता याची त्याला खात्री होती.

नितीन थोरात

nitin.thrt@gmail.com