तू ऐकत्येस ना?..

दोन स्वप्नांमधल्या मिथक इंटरवलला मूर्तरूप देतेस तू नि भास-आभासांचे पक्षी किलबिलतात. एखाद्या कल्पनारम्य प्रदेशात वावरल्याचा फील मला येत राहतो. वाटते गच्चच गच्च मिठी मारावी तुला नि पुरावे द्यावेत लौकिकाला तुझ्या अस्तित्वाचे; पण तुला कवळता येत नाही नि न थांबण्याचा तुझा हा पूर्वापार हट्ट मीही केलाय मान्य. थांबलं की डबकं होतं. प्रवाही असण्याचं माहात्म्य तूच वर्णितेस, जाणतेस.. पण या दिशाहीन संज्ञा प्रवाही भरकटण्याचे प्रयोजन ध्यानात येत नाही.

national science day celebration 2024
हम सायन्स की तरफ से है
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
loksatta kutuhal article about perfect artificial intelligence
कुतूहल : परिपूर्ण बुद्धिमत्तेचे धोके
Razmanama Mahabharata in Persian language
महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?

अर्थातच अस्तित्ववादी शंकांनी कुरतडत जाते उबदार शाल नि उपयुक्ततेच्या सिद्धांतनांचे तर्कसूत्र मारा करत राहते खिशातल्या पोकळ पाकिटावर. ऐंद्रिय अतींद्रियाच्या द्वैतापलीकडे आकारविहीन नितळ प्रदेशात तल्लीन होण्याचे काही मार्ग दिसत नाहीत आणि त्यातून फावते त्यांचेच. तुझे स्वयमेवत्व एखाद्या मिजासखोर यशस्वी कलाकाराच्या अ‍ॅटिटय़ूडसारखे.. अपराजित असल्याचा अभिशापच झळाळत राहतो चेहऱ्यावर तुझ्या.. राग येतो तुझा. माझा पुरुषी इगो तटतटून तुटतो; पण संमोहनाच्या शक्तीने खेचला जातो मी तुझ्याकडे नि परिघाच्या आत तर तुझेच राज्य.. मी लडिवाळ आग्रहाने गुलाम होऊ पाहतो तुझा; पण तू तेही करू देत नाहीस नि माझे वर्चस्व तर शक्यच नाही. अनामिकेचे तुझे सशक्त अस्तित्व माझ्या नामाभिधानाला भस्मसात करत अधिराज्य गाजवते माझ्यावर. हे तुझं गारूड आरूढ झालं आहे माझ्या छातीवर. सर्वकाही व्यापून उरली आहेस तू.. एकाच वेळी तुझ्यात वात्सल्याने ओतप्रोत आईचे डोळे, प्रेयसीचे गंधाळलेले श्वास, बहिणीचे मायाळू स्पर्श, आजीची सनातन कुटुंबवत्सल चिंता.. हे नि असं बरंच काही जाणवू लागतं; पण आजी म्हणावे तर तू कुटुंबालाही मारतेस फाटा.. आणि आई म्हणावे तर मातृत्वाचे सोहळेही नाकारतेस तू. बहीण म्हटले तर तू नातंही नाकारतेस. प्रेयसी वाटतेस; पण त्याच्या किती पल्याड आहेस तू ,तरीही तुझी ओढ वाटतच राहते. या अनामिक ओढीचं निराकरण करता येत नाही.

तुझ्यामागे धावणारा मी वेडा दिसतो गं आरशात पाहताना: तुझ्या नाभीरेषेवर रेंगाळणारा कित्येक काळापासूनचा यात्रिक.. बालसुलभ कुतूहलाने डोकावणारा.. तुझ्या बटांशी खेळत राहणारा.. तुझ्या वळणवाटांवरच मग्न होत, मध्येच भानावर येत तुझ्याशी संवादणारा.. माझ्याच असंख्य प्रतिमांचा कल्लोळ तुझ्या डोहात बुडालाय. अशा अस्फुट धुकेरी अवकाशात आंधळी कोशिंबिरीच्या खेळातल्या सारखा मी; जिला तिला स्पर्शून तुला पकडण्याचा प्रयत्न करतोय नि अर्थातच खेळातले सारेच हसताहेत माझ्यावर माझी उडालेली धांदल पाहून. माझ्या डोळ्यांवरच्या पट्टीने अंधार नाही होत माझ्यासमोर उलट रंग बदलू लागतात कॅलिडिओस्कोपमधून पाहय़ल्यासारखे. प्रत्येक क्षणाला वाटते आलो तुझ्यापाशी.. एक हातभर अंतरावर.. हात पुढे केला तरी स्पर्शू शकेन तुला पण हाताला लागते रिक्तिकांचे आभाळभर पसरलेले जाळे.. तू निसटतेस कशी? दोन्ही बाहू दूरवर पसरले तरी कवेत कशी येत नाहीस? मला चिडवत हसतेस फक्त.. आणि तुझं हसणं पाहून मोनालिसाचं स्मित आठवतं मला. तिच्याहूनही गूढ तू.. रवींद्रनाथांच्या ‘मोमोचित्ते नित नृत्ये’च्या जगण्या-मरण्याच्या काठावर चालणाऱ्या पदन्यासात कदाचित दिसू शकेल तुझं स्थितप्रज्ञ स्मित.. भावुक; पण भावनांचं बटबटीत प्रदर्शन नाही. अश्रूंचा जाहीरनामा नाही की विजयाचं उन्मादी विखारी हसू नाही. सारी कुंपणं तोडत सम्मीलनाच्या नव्या शक्यतांना आवतान देत तू येतेस पैंजण वाजवत. कातर कातर होत जातो मी. वाटते तुझ्या कुशीत लपून जावे मग पुन्हा फणा काढतो माझ्यातला पुरुष. तुझ्यातल्या आदिम सर्वोच्च सर्जकतत्त्वाचा मनोमन स्वीकार करूनही ‘पब्लिकली सबमिसिव्ह’ होणे मी नाकारतो. माझ्यातल्या अंतर्विरोधांना सामोरे जाताना भोवळ येते नि ग्लानीच्या सप्तकात विचित्र सूर येऊ लागतात. अशा ग्लानीत अथवा दारूच्या नशेत माणूस फार खरं बोलतो म्हणे. तो बापू म्हणतात तो आतला आवाज वगैरे अशा वेळी येत असावा का? तुला ऐकू येतो का आतला आवाज? अशा वेळी कशी पटणार आपल्या आवाजाची ओळख? स्मृतिभ्रंशाने दिग्भ्रमित झालेला जीव कोणत्या ओळखीच्या खूणगाठी बांधत असेल? आणि स्मृतींच्या प्रस्फोटातल्या झोताने घायाळ झालेला? भूत आणि भविष्याने जडावलेल्या वर्तमानात तू इतकी हल्लक हल्लक कशी होत जातेस? जडत्वाच्या कारस्थानाला कसं मोडीत काढतेस? यथास्थितीच्या कटात सारेच सामील आणि तू तरीही फुलायचं म्हणतेस. कुणाचं पाठबळ आहे तुझ्याकडे? की ‘एकला चलो रे’ म्हणत आनंदविभोर होऊन चालतेस अविश्रांत? मुक्कामापेक्षाही प्रवासाची मौज घेत. अंतिम थांब्यापेक्षाही वाटसरू असण्यातला आनंद उधळत चालली आहेस तू. जीपीएस हरवलेला मी तुझ्यासमवेतच शोधू शकतो माझे करंट लोकेशन..

खरं सांगायचं तर तुझ्या सबंध असण्याला एक हॉन्टिंग नाद आहे, जो घेऊन जातो मला बेरहम जंगलात, जिथं सापडू शकतं तुझ्या वेदनेचं व्युत्पत्तिशास्त्र. आणि अश्वत्थाम्याची सर्जक ओली जखम घेऊन पुन्हा वाटतं अंकुरावं.. पण हाती काहीच लागत नाही, निसटत जाते पुन:पुन्हा.. ही कासावीस थांबता थांबत नाही आणि.. आणि तू हसल्याचा मला पुन्हा भास होतो. भास की खरेच? तुझे अस्फुट हसणे कानाजवळ रेंगाळत राहते. पाठ सोडत नाही माझी. मी केव्हाच म्यान केलेले किंवा मलाच ते न गवसलेले. अशा वेळी परक्या इलिमेन्टला चढाई करणे आणखी सोपे. इतक्यातच मी तुला परके संबोधले, म्हणजे एक असण्याचे नाटक होते आणि नाटक फार काळ टिकवता येत नाही. उघडे पडतो आपण. मुखवटे फेकून द्यावे लागतात किंवा ते फाटतात. मुखवटय़ांची व्हॅलिडिटी ती किती! तू परकीच होतीस आणि मी सुद्धा तुझ्यासाठी; पण इतके परके असू की एकमेकांना परग्रहावरचे, एलियन वाटावे असे वाटले नव्हते. जवळ आल्यानंतरच प्रचंड दूर असल्याची जाणीव होते. ती पोखरून टाकते बधिर संवेदनेची एकाधिकारशाही. अशा बधिर मोनोपॉलीत आपली अल्पसंख्याक भावुकता मारली गेली नाही, तरच नवल! खरं तर आपली भावुकताच एकांगी. कदाचित खूप निवडक. तिला प्रतिष्ठित कोंदण मिळते हे खरे; पण आतून तिला पूर्वग्रहांची कीडच लागली आहे. तिचे असणे दर्शवणे एवढीच तिची इतिकर्तव्यता. म्हणजेच गंगेत घोडं न्हाल्याचं समाधान. संपलं नसल्याची तिला पुन:पुन्हा जाणीव करून द्यावी लागते, सिद्ध करावं लागतं म्हणजे तिची मरणघटका जवळ आली आहे; अन्यथा तिला अशा कचकडय़ा सिद्धतेची गरज भासली नसती. ती भासते याचाच अर्थ तिने आता शांतचित्ते मनोभावे पत्करावं स्वेच्छामरण. असं करणं हाच सर्वोत्तम पोलिटिकल करेक्ट ऑप्शन. किमान मरणानंतरच्या औचित्य सोहळ्यात टिकली जाईल तिची इंटेग्रिटी. या मरणोत्तर सन्मान सोहळ्याच्या प्रतीक्षेतच आहे मी.. म्हणजे श्राद्ध घालून कामावर जायला बरं!

तू ऐकत्येस ना?

श्रीरंजन आवटे

shriranjan91@gmail.com