डिजिटल शिक्षणाचे फायदे-तोटे

शिक्षक घरातून निवांत, एकांतात ऑनलाइन लेक्चर घेतो आणि विद्यार्थी घरी बसून निवांत ज्ञानार्जन करतो,

डॉ. अनिल सपकाळ dranilsapkal@gmail.com
गेल्या दीड वर्षांत विद्यार्थी आणि अगदी अजिबात संगणक न वापरणारा शिक्षकही ऑनलाइनशिक्षणाला सरावला. माध्यमबदलाने काही प्रमाणात सोय के ली, तरी त्यामुळे शिक्षणपद्धतीवर होणाऱ्या दूरगामी परिणामांचे काय? रविवारच्या (५ सप्टेंबर) शिक्षक दिनाच्या निमित्ताने ऑनलाइन शिक्षणाची दोन शिक्षकांनीच मांडलेली वस्तुस्थिती.

करोनाकाळात सुरक्षित सामाजिक अंतर पाळण्याचे बंधन आले. शिक्षण क्षेत्रातही ते आले. सर्व स्तरावर ‘ऑनलाइन’ शिक्षण पद्धतीचा अंगीकार झाला. केवळ टाळेबंदी झाली म्हणून ही पद्धत स्वीकारली गेली असली, तरी ती त्यापूर्वी अंशत: मुक्त विद्यापीठे, दूरशिक्षण पद्धतीमध्ये पारंपरिक विद्यापीठांनी स्वीकारली होती. ही पद्धत पारंपरिक अध्यापनशास्त्राचा अवलंब करणाऱ्यांना लवकर स्वीकारावी लागेल असे मला तेव्हा जाणवत होते.

नव्वदच्या दशकानंतर पारंपरिक पद्धतीमधील अध्यापकांना ‘डिजिटल’ विद्यापीठांचा भाग करून घेण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने शिक्षकच ज्ञानाचा स्रोत आहे, ही भूमिका बदलायला लागली होती. तो विद्यार्थी-शिक्षक संवाद आहे. शिक्षक हा ज्ञान देणारा नसून त्याऐवजी ‘सुलभक’ आहे, हा विचार रुजू लागला होता. २१ व्या शतकातील कौशल्ये अंगी बाणावीत म्हणून चार ‘सी’ शिक्षणव्यवस्थेत महत्त्वाचे झाले. संप्रेक्षण (कम्युनिके शन), नवनिर्मिती, चिकित्सक विचारपद्धती, सहकार्य, या मूल्यांचा नवा दृष्टिकोन कसा वापरता येईल हा प्रयत्न सुरू झाला. रचनावादी शिक्षणपद्धतीने ज्ञान मिळवणे ते ज्ञाननिर्मिती करणे हा प्रवास बदल म्हणून स्वीकारला गेला. त्याला नव्या अद्ययावत ‘डिजिटल’ तंत्राने पुष्टी दिली. अधिकाधिक माहितीचा स्रोत खुला होत असताना विद्यार्थ्यांनी माहितीचे विश्लेषण करावे ही भूमिका मध्यवर्ती होती, परंतु शिक्षण क्षेत्रातून तिला तितकासा प्रतिसाद मिळत नव्हता. या पार्श्वभूमीवर करोना काळातील टाळेबंदी झाली.

शिक्षणाची व्यवस्था विस्कळीत होईल अशी परिस्थिती निर्माण झाली असताना ‘ऑफलाइन’कडून ‘ऑनलाइन’ पद्धतीकडे ‘शिफ्ट’ स्वीकारला गेला. ‘मूडल’ शिक्षण व्यवस्थेचा (अभ्यासक्रमांच्या व्यवस्थापनाबाबतचा संगणकीय ‘प्लॅटफॉर्म’) परिचय करून दिलेला अभ्यासक्रम मीही पूर्ण केला. ‘मूडल’शिवाय इतरही पद्धतींचा वापर करून अध्यापक अध्यापन करू शकतात, हे सांगितल्याने ‘गूगल मीट’, ‘गूगल क्लासरूम’, ‘झूम’चा वापर होऊ लागला. विद्यार्थी नजरेआड गेला. पारंपरिक अध्यापन पद्धतीतील संवादी भाग अधिक महत्त्वाचा वाटत होता. पारंपरिक पद्धतीमधील अध्यापकांना या ‘डिजिटल’ विद्यापीठांचा भाग व्हावे लागेल असे शिक्षणाच्या वाटचालीकडे पाहिले की दिसते. ज्ञान अर्थव्यवहारात TPACK (टेक्नॉलॉजिकल पेडॅगॉजिकल कंटेंट नॉलेज) चौकट महत्त्वाची मानली गेली होती, तिचा अधिकाधिक वापर करावा हे स्वीकारले गेले. व्याख्यान, फळा-खडू आणि वर्गपद्धतीऐवजी नवी माध्यमे स्वीकारली. व्याख्यान, ई-मेल अथवा व्हॉट्सअ‍ॅप अशा समकालीन आणि पारंपरिक माध्यमांचा वापर करून माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आराखडा तयार केला गेला आणि आभासी वातावरणात विद्यार्थ्यांशी संवादी राहण्याचा प्रयत्न सुरू केला.

पदव्युत्तर वर्गासाठी मराठी साहित्याचा पाठय़क्रम शिकवत असताना पूर्वी समोरासमोर संवादी अध्यापन व्हायचे. वर्गात विद्यार्थ्यांच्या देहबोलीचा अंदाज यायचा, त्यांच्या ग्रहण क्षमतेचा अर्थ लावता यायचा. शिक्षक म्हणून अभिनेत्यासारखे अभिव्यक्त होता यायचे. मध्येच अभ्यासपत्रिकेनुसार ‘आयसीटी’चा (इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) वापर करता यायचा. हे सगळे समोरासमोर व्हायचे. साधनग्रंथ आणि संदर्भगं्रथ यांची उपलब्धता आणि देवघेव सहज व्हायची. परंतु ‘ऑनलाइन’मध्ये सगळे मोबाईल ‘डेटा’ आणि मायाजालावरील ‘डेटाबेस’ यावर अवलंबून होते. विजेच्या लपंडावावर आणि रेंजच्या लहरींवर अवलंबून होते.  मला अधिक प्रश्न भेडसावला तो ‘डेटा’ आणि ‘डेटाबेस’चा. मायाजालावर विद्यार्थ्यांना साधनग्रंथ, संदर्भ साधने उपलब्ध नव्हती. मायाजालावर मराठी ज्ञानभाषेतील अत्यंत अल्प ‘डेटा’ उपलब्ध आहे. जो उपलब्ध आहे, तो अत्यंत सामान्य आणि ‘लोकप्रिय’ स्वरूपाचा आहे. विद्यापीठांनी आपला डेटाबेस निर्माण केला पाहिजे. साधन आणि संदर्भग्रंथ डिजिटल स्वरूपात उपलब्ध हवेत. पुस्तकांचे ‘डिजिटलायझेशन’ व्हायला हवे. मी ‘नॅशनल डिजिटल लायब्ररी’ची लिंक देऊन काही फायदा होत नव्हता. काही शासकीय प्रकाशने ‘पीडीएफ’ स्वरूपात उपलब्ध होती, पण ती पाठय़क्रमाशी संबंधित नव्हती. विद्यार्थी म्हणायचे, ‘सर, संदर्भ पुस्तकांच्या पीडीएफ द्या.’ ‘नेटवर शोधा’ हे तात्त्विक उत्तर वाटायचं त्यांना! माझ्यापुढे प्रश्न  असे, की प्रकाशकांच्या स्वामित्व हक्काचे काय? मराठी प्राध्यापकांच्या एका ‘व्हॉटस्अ‍ॅप’ गटात पुस्तकाची ‘पीडीएफ’ करून पाठवली म्हणून एका प्रकाशकाने न्यायालयात खटला दाखल करायचे ठरवले. विद्यार्थ्यांना काही ‘ई-बुक्स’ सुचवली, तर विद्यार्थ्यांना ती खरेदी करण्यात आर्थिक अडचण होती. ‘किंडल’ विकत घ्यावे, तर तिथे हवी ती पुस्तके नाहीत. विद्यापीठांच्या आणि सार्वजनिक ग्रंथालयांच्या स्रोतांवर अवलंबून असलेला विद्यार्थी हवालदिल झाला होता. ग्रंथालयातील बंदिस्त पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली तरच या सगळ्याला अर्थ आहे. नाही तर केवळ शिक्षक हाच ज्ञानाचा स्रोत राहणार. मी ऑनलाइन ‘लेक्चर घेणे’ म्हणजे केवळ व्याख्यान देणे नाही. सातत्याने काही ‘शेअर’ करणे आले. ते मोबाइलवर पुरेसे पाहता येत असेल का, हा मला प्रश्न पडायचा. म्हणजे डेटाबेस उपलब्ध नसणे, संदर्भ उपलब्ध नसणे या के वळ विद्यार्थ्यांच्या समस्या नसून माझ्याही समस्या झाल्या .

मी अध्यापक म्हणून माझ्या वैयक्तिक ग्रंथालयाचा वापर करत होतो. दृकश्राव्य चित्रफिती, चित्रपट, नाटके यांचा साठा ‘ऑफलाइन’साठी वापरतो. तो रिसोर्स ‘ऑनलाइन’ अध्यापनात विद्यार्थ्यांना देता येत नाही. ‘सामना’ हा पाठय़क्रमासाठी नेमलेला चित्रपट मी ऑफलाइन वर्गात विद्यार्थ्यांना दाखवायचो. पण तो ‘ऑनलाइन’मध्ये मला त्यावेळी मायाजालावर सापडला नाही. मी लेक्चरदरम्यान तो ‘शेअर’ केला. मुलांनी त्याची प्रत ही विकत घ्यावी किंवा डाऊनलोड करावी. पण ते ‘टोरंट’वर शोध घेतात.

जे चुकीचं आहे. ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक विद्यार्थ्यांना अभ्यासाला आहे. ते संहिता आणि प्रयोग या दृष्टीने वर्गात प्रत्यक्ष शिकवताना काही संदर्भ सहज देता यायचे, दाखवता यायचे. ‘माय पानोरामा इंटरनॅशनल पुणे’ यांचे नेटवर उपलब्ध ‘घाशीराम कोतवाल’ विद्यार्थी पाहायचे. या नाटकाची बाजारात न आलेली, पण संग्रहात उपलब्ध असलेली ‘थिएटर अकॅडमी’ची निर्मिती मात्र दाखवता येत नाही. स्वामित्व हक्काचं काय, हा प्रश्न मला भेडसावतो. त्यामुळे उपलब्ध साधनांचा वापर करण्यावर भर असतो, जे ‘ऑनलाइन’चा मुख्य उद्देश बाजूला ठेवणारे आहे. शिक्षक हा ज्ञानाचा स्रोत आहे, हे विधान बदलत नाही. त्याची ‘फॅसिलिटेटर’ची भूमिका राहत नाही.

जागतिक करोना साथीत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेताना ‘एमसीक्यू’- म्हणजे बहुपर्यायी प्रश्न पद्धत ही परीक्षा पद्धती स्वीकारली आहे. जुनी परीक्षा पद्धती ज्ञानाच्या अनुषंगाने चिकित्सक, विश्लेषणात्मक अशी होती, विद्यार्थ्यांच्या भाषिक आणि साहित्यिक क्षमतांचा विकास त्या ठिकाणी होता. महासाथीच्या काळात ही पद्धत बहुपर्यायी उत्तरांमध्ये बदलली. बहुपर्यायी प्रश्नांची काही वैशिष्टय़े आणि महत्त्व असले तरी ती भाषिक क्षमता आणि कौशल्ये विकसित करण्यासाठी उपयोगी आहे का, ते तपासले पाहिजे. म्हणजे समजा बहुपर्यायी प्रश्नांमध्ये दहा ‘चूक की बरोबर’ प्रश्न जर विचारायचे असतील, तर त्यातल्या सहा प्रश्नांची उत्तरे ही बरोबरच असतात आणि चार चूक असतात. विद्यार्थ्यांनी दहापैकी सहा ठिकाणी जर बरोबर असं उत्तर बरोबर दिले असेल तर त्यांना ६० टक्के गुण मिळालेले असतात. त्यामुळे एमसीक्यू ही अधिक पाठांतर, पठणकेंद्री आहे.

विद्यार्थी आणि शिक्षक हे नाते अशाने संपेल. विद्यार्थी हा केवळ ग्राहक आहे, ‘उपभोक्ता’ आहे, त्यामुळे आवश्यक तेवढेच द्या; त्याने आवश्यक ते खरेदी करावे असे घडूच शकते. विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये घुसून बाजार मांडता येतो. सध्या ‘वर्क फॉर्म होम’ सुरू आहे. शिक्षक घरातून निवांत, एकांतात ऑनलाइन लेक्चर घेतो आणि विद्यार्थी घरी बसून निवांत ज्ञानार्जन करतो, हे चित्र मला फसवे वाटते.

‘ऑफलाइन’मध्ये व्याख्यानाचा एक सर्जनशील अनुभव मिळायचा, पण ‘ऑनलाइन’मध्ये तसे होतच नाही. तो अधिक एकपात्री प्रयोग  होतो. विद्यार्थी ‘बँडविड्थ’ अडचणींमुळे कॅमेरा बंद करून काय करत असावेत? ते ऐकत असतील का? आपण जे ‘शेअर’ करतो आहोत ते पाहत असतील का? असे बरेच प्रश्न मनात येतात. माझे काही विद्यार्थी गावाला गेले आहेत. गावाला मोबाइल रेंजचा भलताच प्रश्न आहे. ते रेंज येईल त्या दिशेला मोबाइल करून लेक्चर ऐकतात. परीक्षेचे प्रकल्पाचे सादरीकरण करताना रेंजची वाट पाहत बसतात. काही वेळेला त्यांचे सादरीकरण ऑनलाइन घेण्याच्या ऐवजी ‘टेलिफोनिक’ घ्यावे लागते.

माध्यम साक्षरता ही तंत्राच्या आणि उपयोजनाच्या दृष्टीने होणे आवश्यक आहे. माझा एक विद्यार्थी म्हणाला, ‘सर, पोटाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. डेटाचं काय?’ फ्री डेटा, मुबलक डेटाबेस, माध्यम साक्षरता निर्माण झाली तर अडचणींवर मात होईल. ‘ऑनलाइन’ शिक्षण हा जागतिक महासाथीच्या काळातील प्रश्न मला वाटत नाही. तो अध्यापनशास्त्रातील प्रश्न वाटतो. विद्यार्थ्यांचे प्रश्न हे शिक्षकांचे प्रश्न आहेत, असे मी समजतो. त्यामुळे ‘डिजिटल डिव्हाईड’ हा सामाजिक दरीचा अत्यंत कळीचा प्रश्न आहे. तो केवळ नवे माध्यम, अध्यापनशास्त्र आनंद देते की नाही, एवढय़ापुरता मर्यादित नाही .

(लेखक मुंबई विद्यापीठात मराठी विभागात प्राध्यापक आहेत.)

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Teacher article about online education fact on the occasion of teacher s day zws

ताज्या बातम्या