योजना यादव अनेक भीती या जगताना तयार झालेल्या असतात, तर काही भीती मात्र आपल्या पूर्वपिढीकडून आपल्यात उतरत जातात. त्यात कधी ‘समाज काय म्हणेल’ची भीती तर कधी त्यातून आलेल्या एकटेपणाची भीती. त्याचं असं ‘कंडिशनिंग’ होतं की, भयाचं पॅकेज हाती येतं. कसं बाहेर पडणार या ‘जेनेटिक स्विच’मधून? रुपेरी बटांतून म्हातारपण चमकू लागलं की मनावर अनुभवांची एक ओली रेघ उमटते. आठवणींचा सारिपाट गतकाळाच्या सोंगट्या नाचवत राहतो. कदमताल सुरू होतो. एक पाय उद्यात, तर एक मागे. हल्ली हा कदमताल अधिकच आकार धरतो आहे. म्हणजे नाळ तोडून दूर जावं म्हणता म्हणता पुन्हा पूर्वापार जाणिवांचा झाकोळ मन व्यापून जातो आणि सारं आईपाशी जाऊन थांबतं. जिथून विसाव्याची सुरुवात होते, तिथूनच एका भयाचाही प्रारंभ होतो. आता ती तशी माती होऊन केव्हाच नवं रोप धरून बसली असेल. पण तिने मागे सोडलेल्या श्वासांसोबत आनंदाच्या चांदण्यांइतकाच एका विचित्र भयाचा काळोखही मागे सोडला आहे. हे भय आहे स्वत:त आई, आजी, पणजी, आजोबा किंवा एकूणच आधीची पिढी दिसण्याचं. आणि तेही गुणांपेक्षा छोटी छोटी वैगुण्यं, भय आणि कमतरता अधिक दिसण्याचं. माझी समुपदेशक सांगते, आपण स्वत:सोबत मागच्या कित्येक पिढ्यांची नकारात्मकता, सवयी वाहून नेत असतो. एका पिढीतून दुसरीत मुरलेलं, दुसरीतून तिसरीत, तिसरीतून चवथीत आणि असंच पुढे. ही साखळी त्या त्या पिढीत तोडून टाकली नाही, तर ती तशीच मुरत राहते. छळत राहते आणि अगणित काळातल्या पूर्वजांची दु:खं, वेदना, भय आजची पिढी स्वत:च्याही नकळत मिरवत राहते. तर गोष्ट अशी सुरू होते. माझ्या झोपेचा आणि रात्रीचा गेली कित्येक महिने काडीमोड झाला आहे. त्रास, त्रागा, भीती, दु:खं, कुतूहल असे टप्पे ओलांडून तो आता माझ्यासाठीही हसण्याचा विषय झाला आहे. या निद्रानाशावर उपाय शोधताना माझ्या समुपदेशकानं दैनंदिन इलाजांसोबतच मला माझ्या जन्माच्याही आधीपासूनच्या परिस्थितीकडे पाहायला सांगितलं. मनाच्या ‘टाइम मशीन’मधून प्रवास करताना खरोखरच आजच्या आपल्या भय, वेदना, सवयी आपण कशा आपल्या आधीच्या पिढ्यांकडून उसन्या घेतल्यात तेही जाणवलं आणि एकमेकांवर वेड्यावाकड्या पडलेल्या काड्यांच्या खेळांसारखं दुसरी काडी हलू न देता एक एक काडी अलगद उचलण्याला सुरुवात झाली. आई, शकुंतला आबासाहेब देसाई अर्थात शकू. वयाच्या १३व्या वर्षी शकुंतला शिवाजी यादव झाली. इनामदार घरातली लेक थेट हमालाच्या घरात. इनामदारांचा ताठ कणा घेऊन यादवांच्या फाटक्या अंगणात पाऊल ठेवलं, पण जनी म्हणते तसं तिचंही ‘समूळ साल माया सांडूनियां दिजे, परि अहंबीज जतन करा’, सुटलं नाही. त्यात वयाच्या चाळिशीच्या आतच पदरी सहा पोरं घेऊन विधवा झाली. ‘कंडिशनिंग’ ही आजन्म होत राहणारी प्रक्रिया आहे. दरवेळची परिस्थिती त्यात नव्या आकारांची भर घालत राहते. तसंच तिचंही झालं. परिस्थितीशी उभा-आडवा संघर्ष करत पालकत्व सांभाळायची कसरत, त्यात तिच्या ताठ कण्यानं या संघर्षात भरच भर घातली. या ताठ कण्यांच्या माणसांच्या भयाविषयी बोलायला हवं. आपण मोडून पडणार नाही, असं स्वत:ला बजावत आधारांना अस्पर्श ठेवत जगण्याची कसरत करणं आणि त्यातलं भय पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं ही साखळी आपल्यापाशीच संपायला हवी, हा तो संघर्ष आहे. अवघ्या दुसरी-तिसरीत मी वडिलांना गमावल्यानंतर पुढची पाच-सहा वर्षं संपूर्ण घरच मोठ्या आघातातून जात होतं. दिवसभर स्वत:ला कामात झोकून देणारी आई रात्री संचारल्यासारखी करायची. जवळच असणाऱ्या रेल्वे रुळावर रात्री-अपरात्री रेल्वेचा आवाज आला की, ती उठून जीव द्यायला धावायची आणि मग आम्ही पाच-सहा जण तिला घट्ट बिलगायचो. बाप गमावण्याचा सारा भार आम्ही आईवर सोपवून होतो, पण कित्येकदा तिचा कडेलोट होई आणि तिला मरण जवळ करावंसं वाटे. बाह्य परिस्थिती मोठ्या बहिणींनी सांभाळली, पण मानसिक पातळीवरचा तिचा वनवास कुणालाच कमी करणं शक्य नव्हतं. सहा पोरांची जबाबदारी, आर्थिक विवंचना यापेक्षाही तिला तिचं एकाकीपण अधिक त्रास देत होतं. त्यातच समाजाच्या तथाकथित सभ्यतेच्या निकषांवर आपली मुलं यशस्वी होतील का? तसे संस्कार आपण त्यांच्यात रुजवू शकू का? ही भीती वरचढ होती. नवरा नसलेली बाई म्हणून तिच्या प्रत्येक कृतीत ‘समाज काय म्हणेल’ याचा विचार असे. आणि तोच विचार मुलांमध्ये रुजावा असंही तिला वाटे. पण तिला ज्या समाजाचं इतकं सोयरंसुतक होतं, तो संघर्षाच्या काळात कधीच पाठीशी उभा राहिलेला नाही. त्यामुळं त्या व्यवस्थेशी आपल्याला इतकं का घेणं-देणं असावं, हे तेव्हाही कळत नसे. पण तेव्हाही तिच्या ‘लोक काय म्हणतील?’ या विचारातून थोडी संघर्षाची ठिणगी पेटत असे. त्यातून तिचं एकाकीपण अधिकच गडद होत असे. त्या एकाकीपणानं संपूर्ण कुटुंबावरच झाकोळ धरला होता. काळानुरूप हे कमी झालं, पण तरी परिस्थितीबाबतच्या सगळ्या त्राग्यानं पुन्हा वेगळं रूप घेतलंच होतं. साध्या उदाहरणातून सांगायचं, तर ती भजनाहून आनंदात घरी आल्यावर दोरीवर वाळलेले कपडे तसेच असलेले दिसले की तिचा आनंद लगेच नाहीसा होई. क्षणापूर्वीचं अध्यात्म जाऊन मुलींवरचे संस्कार किंवा वय उतरणीवेळचा ‘ओसीडी’ वरचढ ठरे. आणि तिची चिडचिड सुरू होई. ती चिडचिड क्षणिक वाटली, तरी त्यात जन्मोजन्मीच्या त्राग्याचं संचित असे. हे असंच काहीसं वागणं आईच्या वडिलांमध्ये, आबांमध्येही पाहिलं होतं. आणि आबांनीही त्यांच्या वडिलांना थोडं लवकरच गमावलं होतं. त्यातून त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्यं ठरत गेली होती. याचा अर्थ आईची ही उसनवारी आबांकडून आली होती आणि आबांची न जाणो त्यांच्या आणखी कोणत्या ‘जेनेटिकल स्विच’मधून आली असेल. गंमत म्हणजे आज आईच्या त्याच वयात आम्ही बहिणी पोहोचल्यावर थोड्या-फार फरकानं तेच वागणं आमच्यातही कधी-कधी दिसत राहतं. अति परिपूर्णतेचा अट्टाहास आणि चिडचिड यांच्या या त्रासदायक मिलाफाचं भय वाटत असूनही ते स्वत:त प्रतिबिंबित होत असताना रोखता येत नाही. या भयात आणखी एका गोष्टीची चिंता वाटते. ते ‘जजमेंटल’ होण्याची. गोष्टी आपल्याला हव्या तशा झाल्या नाहीत की समोरच्याची स्थितीच समजून न घेता स्वसहानभूतीच्या कोषात जाण्याची. तेव्हा आईची चिडचिड समजण्याजोगी शहाणीव नव्हती. आज स्वत:चा त्रागा समजण्याची शहाणीव असली, तरी तो त्रागा चुकीचाच आहे, या शहाणिवेनंही भयात भर पडते. म्हणजे तेव्हा जे आई समजूनच घेत नाही, असं वाटायचं. ते आता आपण समजून घ्यायला कमी पडतोय आणि आपलं ‘कंडिशनिंग’ आपण दूर लोटायला हवं. ही जाणीव त्रास देत राहते. आणि ते आपण पुढच्या पिढीकडे सोपवू नये, याचं भयही सतत छळत राहतं. आईकडून खरं तेवढंच नाही घेतलं. तिची जिद्द, आत्मसन्मान, चिकाटी, मोजक्या उत्पन्नात स्वत:ला नेटकं ठेवण्याचं कसब, मदतीला धावण्याची सुहृदता आणि मी तर तिचं रूपही घेतलं. हक्कानं मिरवाव्या अशा किती गोष्टी घेतल्या. पण त्यासोबत काही वेदनांचं पॅकेजही मिळालं. अकाली सामोरं जावं लागणाऱ्या भयांचं पॅकेज मिळालं. रात्री-अपरात्रीच्या रेल्वेच्या आवाजाचं भय, मानसिक तणावातून तिला जडलेल्या सोरायसिसची भीती त्या भीतीतून पायाला एखादीही भेग न पडावी म्हणूनच सतत दक्ष असणं आणि कुठलीच सोबत कायम राहणार नाही, या अनिश्चिततेची कधीही न संपणारी जाणीव. अनेकदा सगळ्या सकारात्मकतेवर ही भयाची भावना वरचढ ठरते. ही अनिश्चिततेची जाणीव प्रत्येकात असते, पण माझ्यात ‘जेनेटिकल स्विच’मधून आलेल्या अतिरिक्त जाणिवेनं कधी कधी ‘पॅनिक अटॅक’चं स्वरूप धारण केलं आहे. आणि न जाणो कित्येकदा डोळ्याच्या कडा ओसंडून गेल्या आहेत. ‘जेनेटिकल स्विच’मधून आलेल्या भयाविषयी बरचसं संशोधनही झालं आहे. यात माणसांमधील सापांबद्दलची भीती त्यातूनच आली असल्याचं आढळून आलं आहे. तेच उंचीच्या भीतीबद्दल. उंचीची भीतीही पूर्वजांनी आपल्यात पेरलेल्या भयांपैकीच एक आहे. आपल्यातले असे अनेक भीतीविषयक अनुभव ‘प्री-प्रोग्राम्ड्’ असतात. जे एका विशिष्ट वयानंतर अधिक गडदपणे जाणवू लागतात. आणि त्यांची वेळीच कारणमीमांसा करणंही गरजेचं असतं. मज्जारज्जूंसंबंधीचे मानसिक विकार असोत किंवा मधुमेह आणि पचनसंस्थांसंबंधी विकार अशा विकारांच्या चिकित्सेत हा ‘मल्टीजनरेशनल’ दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. तरीही मागच्या पिढीचं देणं असलेल्या शारीरिक दु:खांवर उपचार होतच राहतील. गरज आहे ते मागच्या पिढ्यांकडून आपण कोणती मानसिक दुखणी घेतली आहेत, त्याची स्वत:लाच ओळख पटवण्याची आणि वेळीच त्यावर इलाज शोधण्याची. तर कदाचित आपण पुढच्या पिढीच्या चेहऱ्यावरची निराशा काही अंशी कमी करू शकू. yojananil@gmail.com