scorecardresearch

सोयरे सहचर : अवाढव्य देहातलं गोंडस बाळ

हत्ती केळीचे खांब खात उभा होता. मी उभा असलेल्या डाव्या कोपऱ्यातून अगदी किंचित सरकलो आणि पुढच्या क्षणी सोंडेतला मोठा केळीचा खांब खरसेलनं दाणकन् जमिनीवर आपटला.

‘‘मोठं आयुष्य जगण्यापेक्षा, आहे ते आयुष्य मोठं करण्याचा प्रयत्न करा, हे प्रसिद्ध उद्गार मला खरोखर पटले ते हत्तींच्या सहवासात. अवाढव्य शरीराच्या हत्तींचं भावभावनांनी ओथंबलेलं वर्तन, सभ्यतेनं, शांततेत जगण्यातली त्यांची सहजता आणि प्रिय व्यक्तीचा राग आला तरी तो जास्त वेळ धरून न ठेवण्याची निरागस प्रगल्भता मला फार शिकवून गेली. सगळय़ात बुद्धिमान प्राणी असलेला माणूस म्हणून आपण किती कचकडय़ाचं जगतो, हे मला या मित्रांनी शिकवलं. सुरुवातीला केवळ वेळेचा सदुपयोग म्हणून हत्तींचा अभ्यास करण्याचा माझा प्रवास सुरू झाला. तो मला केवळ हत्तींनाच नव्हे, तर माणसालाही ओळखायला शिकवत आहे,’’ सांगताहेत हत्ती अभ्यासक आणि ‘ट्रंक कॉल- द वाइल्ड लाइफ फाउंडेशन’चे  संस्थापक आनंद वर्षशदे.

माझ्या आयुष्यात हत्ती येणं ही घटना म्हणजे प्रचंड नकारात्मकतेनंतर आलेला अतिशय सुखद काळ होय. माझी केरळला बदली होणं ही मला मिळालेली शिक्षा होती. मी नोकरी सोडतो, असं म्हटल्यावर बायकोव्यतिरिक्त इतर नात्यांनी जो सूर लावला तो खरा तर अनपेक्षित होता. माझ्या निर्णयाचा त्रास बायकोला होऊ नये किंवा नवऱ्यानं प्रयत्नच केला नाही, असं तिला वाटू नये, या विचारानं शेवटी मी केरळमध्ये दाखल झालो. आता खरा मी निवर्षश्चत होतो. मला मल्याळम् येत नव्हती. अशा स्थितीत माझ्यासमोर कोणी माझी टिंगल केली काय किंवा राजकारण खेळलं काय,

न मला ते समजणार होतं, न त्यानं मला काही फरक पडणार होता. मिळालेल्या भरपूर वेळेचा सदुपयोग म्हणून हत्तींवर ‘फोटो स्टोरी’ करायला घेतली, ती खऱ्या अर्थानं आयुष्य जगायला शिकवणारी ठरली..   आपण किती कचकडय़ाचं जीवन जगतो आहोत, हे हत्तींच्या सहवासात लक्षात आलंच, पण त्याचवेळी नाती, मैत्रीचं नातं जोडत  सकारात्मक पद्धतीनं कसं जगता येऊ शकतं, हे अनुभवही खूप प्रेरणा देणारे ठरले. हत्तींमध्ये लोभ, मत्सर नव्हता, असं निश्चितच नाही. पण तो इतका लटका असायचा, की आपल्याला राग आला होता हे हत्तीदेखील विसरून जायचे. मला हत्तींच्या विश्वात घेऊन जाणाऱ्या कृष्णा आणि गंगा यांच्यासाठी माझ्या मनातला एक कोपरा सतत हळवा असतो. कृष्णा आणि गंगा ही दोघंही आईवेगळी झालेली हत्तीची पिल्लं. पुढे या पिल्लांनी जग सोडून जातानाही मला खूप मोठा धडा शिकवला! कृष्णा गेल्याचं दु:ख करत बसल्यामुळे मी परत ‘एलिफंट सेंटर’ला गेलोच नाही. कदाचित दु:ख करत बसण्यापेक्षा पुन्हा तिथे गेलो असतो तर गंगाची अवस्था कळली असती. गंगासाठी उभा राहिलो असतो, तर गंगा नक्कीच वाचली असती. आपलं दु:ख उगाळत बसण्यापेक्षा ज्यांना आता तुमची गरज आहे त्यांच्यासाठी उभे राहा, हा तो धडा.

 हत्तींसाठी फोटोंचा प्रोजेक्ट करत असताना सुरुवातीच्या टप्प्यात समजली ती हत्तीची देहबोली. हत्तीच्या वागण्याच्या पद्धती आणि एका टप्प्यावर त्यांच्या संवादाच्या पद्धती. यातून नकळत अभ्यासाला सुरुवात झाली. केरळ     वनखात्यानं त्या वेळी टाकलेल्या विश्वासातून या अभ्यासाला गती मिळाली. हत्तींचं सकारात्मक वागणं अभ्यासता येऊ लागलं. फोटो प्रोजेक्ट चालू असताना हत्तीच्या असलेल्या गरजा आणि माणसाचं त्यांच्याबरोबरचं वागणं हे दोन्ही प्रत्यक्ष बघायला मिळालं. सकाळी सहा वाजता जेव्हा मी ‘एलिफंट सेंटर’ला पोहोचत असे, तेव्हा कित्येकदा कृष्णा आणि गंगा माझ्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत हे लक्षात येत असे. तिथे पोहोचल्यावर त्या दोघांनाही मी आधी त्यांना भेटावं असं वाटत असे. नकळतपणे, आजारी असलेल्या कृष्णाकडे मी प्रथम जात असे आणि नंतर गंगाकडे. गंगाकडे गेल्यावर मात्र गंगा माझ्या हातातून तिचा चेहरा आधी सोडवून घेऊन दुसरीकडे बघायची आणि आपण रुसलोय हे मला दाखवून द्यायची! पण थोडंसं गोंजारलं, की लगेच आपली सोंड माझ्या हातावर टाकून स्वत:चे लाड करून घ्यायची. तिच्याशी खेळत असताना जर मी निघालो, तर मला स्वत:कडे ओढून घ्यायची. मग थोडा वेळ थांबून मी परत तिच्याशी खेळायचो. पुन्हा निघायला लागलो, की ती परत थांबवणार! थांबलो तर ठीक; नाही थांबलो, तर माझा स्टँडवर असलेला कॅमेरा ती ढकलायची. जसं मी हत्तींचं निरीक्षण करतो, तसेच हत्तीदेखील माझं निरीक्षण करतात, याची मला तेव्हा प्रकर्षांनं जाणीव व्हायची. किती प्रेम, विश्वास होता तिचा माझ्यावर.     

या हत्तींबरोबर जगत असताना हत्तीनं शिकवलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘हत्ती तितक्या प्रकृती’! म्हणजेच हत्तीच्या कुठल्याही कळपाचं वागणं अगदी सारखं असतं, पण जशी जशी तुमची त्यांच्याशी मैत्री होत जाते, तसं प्रत्येक हत्तीचं एक वेगळं व्यक्तिमत्त्व असतं, हे तुमच्या लक्षात यायला लागतं. त्याचप्रमाणे हत्तीचं तुमच्याशी वागणं ही तुमच्या क्रियेला दिलेली प्रतिक्रिया असते. आता आमचा खरसेल हा हत्ती बघा ना.. ओडिशा वन खात्याला त्यांच्या राज्यात असलेल्या खरसेल जंगलात फार पूर्वी कधीतरी तो सापडला होता. १९९३ पासून (म्हणजे मी दहावीत असतानापासून) आतापर्यंत त्यानं सात लोकांना ठार मारलं होतं. मध्यंतरीच्या काळात तो परत चिडचिडा झाला होता. वन खात्यातर्फे आम्हाला जेव्हा त्याच्यासाठी बोलावलं, तेव्हा तो ‘डेब्रीघर वन्यजीव अभयारण्या’मध्ये होता. पहिल्या भेटीतच मला कळलं, की खरसेल खूप रागावला आहे. त्याच्या देहबोलीतून ते समजत होतं. माहूत आणि कर्मचाऱ्यांना दारापाशी थांबवून मी हत्तीपासून काही अंतरावर उभा राहिलो. हत्ती केळीचे खांब खात उभा होता. मी उभा असलेल्या डाव्या कोपऱ्यातून अगदी किंचित सरकलो आणि पुढच्या क्षणी सोंडेतला मोठा केळीचा खांब खरसेलनं दाणकन् जमिनीवर आपटला. त्यानं केलेल्या हालचालीमुळे काही गोष्टी लक्षात आल्या आणि माझ्या वागण्या-बोलण्यामध्ये मी बदल केला. पुढच्या अर्ध्या तासामध्ये खरसेलच्या वागण्यामध्ये प्रचंड फरक पडला. खरसेल मला समोर उभा राहू देऊ लागला. दुर्दैवानं अंधार वाढू लागला आणि त्या दिवशीचं काम आम्हाला तिथेच थांबवावं लागलं. दुसऱ्या दिवशी सकाळी कामाला सुरुवात केली, तशी काल मला आलेली शंका खरी ठरली. खरसेल दोन्ही डोळय़ांनी अगदी कमी बघू शकत होता. त्याच्याशी गप्पा मारत असताना मी त्याला बरं वाटेल अशा काही गोष्टीही करत होतो. त्याच्या आजूबाजूची सफाई करत होतो. साधारण दहाच्या आसपास त्याला आंघोळ घातली आणि सात माणसं मारणाऱ्या खरसेलची आणि माझी एवढय़ा वेळात खूप गोड मैत्री झाली. त्याच्या वागण्यात आमूलाग्र बदल झाला. पहिल्या दिवशी केळीचे खांब आपटणारा खरसेल दुसऱ्या दिवशी सोंड पुढे करून माझ्याकडून केळीचे खांब आणि गवत मागत होता. पुढच्या चार दिवसांत तो पूर्ण शांत आणि खेळकर झाला. मग आम्ही ठरवलं, की त्याला जंगलातून फिरवून आणायचं. तब्बल दोन महिने साखळदंडात असलेला खरसेल मुक्त होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या मागे चालू लागला. जंगलात जाईपर्यंत तो अगदी सामान्यपणे चालत होता. पण जसे आम्ही जंगलात शिरलो, तसं एखाद्यानं लीलया घरात चालावं तसा तो चालत होता. जसं आपण ओळखीचा माणूस दिसल्यावर त्याच्याकडे पाहून हात करतो, तसा तो आजूबाजूच्या झाडांना स्पर्श करत होता!  अधू असलेल्या त्याच्या डोळय़ांमध्येही चमक दिसावी इतका तो खूश दिसत होता. त्याच्या चालण्यातल्या सहजतेनं त्याचं जंगल- त्याचं घर त्याला किती माहिती आहे, याचा सहज अंदाज येत होता. मी अचानक नेहमीची वाट सोडून बाजूच्या एका वाटेकडे वळलो. तसा तो थांबला, त्यानं माझ्याकडे बघून आवाज काढला आणि चक्क सोंडेनं मी चुकीच्या रस्त्याला चाललोय हे निदर्शनाला आणून दिलं. माझ्यासाठी ही गोष्ट बऱ्यापैकी चक्रावून टाकणारी होती. पण मी त्याच्या घरात होतो आणि त्याचं म्हणणं मला मान्य करावं लागणार होतं! मी गुमान रस्ता बदलला. आम्ही परत ‘एलिफंट सेंटर’वर आल्यावर खरसेल शांतपणे खाली बसला. त्याच्या दोन्ही डोळय़ांमध्ये मी औषध घातलं, त्यानंही ते शांतपणे टाकून घेतलं. आता तो

अगदी शांत झाला होता. इतक्या दिवसांचा त्रस्तपणा निवळला होता जणू.

 मध्यंतरी बऱ्याच मोठय़ा काळानंतर त्रिवेंद्रमजवळच्या कोटुर आणि कोचीनजीक ‘कोडणाड एलिफंट सेंटर’मध्ये गेलो. मध्ये बराच काळ गेल्यामुळे माहूत बदलले होते. काही मला ओळखत होते, तर काही नव्हते. पण हत्तींनी मात्र मला बरोबर लक्षात ठेवलं होतं! त्याची दोन बोलकी उदाहरणं म्हणजे मीना आणि सुनीता हत्तीणी. ‘कोटुर एलिफंट सेंटर’मध्ये मीनाचा माहूत बदलला होता. मी मीनाच्या जवळ जायला लागलो तसं त्यानं मला थांबवलं. मी तिथून निघालो आणि तळय़ाकाठी येऊन उभा राहिलो. थोडय़ा वेळानं तोंडानं चक-चक-चक आवाज काढत मीना माझ्याजवळ आली. माहुतानं मला तिच्याजवळ जायला दिलं नाही म्हणून माहुताला घेऊन ती तळय़ापर्यंत आली होती. तिथेच काठावर उभं राहून माझ्याबरोबर मनसोक्त गप्पा मारल्या, नंतर ती निघून गेली! तेव्हाचा माहुताच्या चेहऱ्यावरचा अविश्वास आणि हे काय घडतंय, ही भावना मी कधीच विसरू शकणार नाही.

 एकदा ‘कोडणाड एलिफंट सेंटर’मध्ये गेलो. तिथले माहूत मला ओळखत होते.  मी गाडी लावून सेंटरच्या दारात माहुताबरोबर बोलत उभा होतो. तेवढय़ात आतून हत्ती ओरडण्याचा आवाज आला. मी माहुताला ‘ही सुनीता आहे का?’ म्हणून विचारलं, तसा हसत तो म्हणाला, ‘तुम्ही आल्याचं तिला समजलेलं दिसतंय’. मी तिच्याजवळ गेलो आणि तिला कुरवाळलं, तसं अगदी गोड हसत तिनं माझं स्वागत केलं! मग मी अगदी शांतपणे माझं डोकं तिच्या सोंडेच्या वरच्या भागावर टेकवलं आणि डोळे मिटून घेतले. तिनं तितक्याच शांत भावनेनं मला भेटत डोळे मिटून घेतलं. डोळे उघडून मी मागे झालो, तसं तिनं गवताच्या भाऱ्याकडे खूण केली. पूर्वी सेंटरमध्ये आल्यावर मी भाऱ्यातल्या दोन काडय़ा तिला भरवत असे, ते तिच्या लक्षात होतं. तिनं माझ्याकडून त्या दोन काडय़ा वसूल केल्या आणि मगच मला सोडलं. एवढय़ा मोठय़ा, ताकदवान देहातलं ते गोंडस बाळ बघणं म्हणजे मौजच!

 कुटुंबपद्धतीवर प्रचंड विश्वास असलेल्या हत्तींच्या भावनादेखील त्याच्या आकारासारख्या मोठय़ा असतात. अगदी अलीकडे, काही महिन्यांपूर्वी ‘कमलापूर हत्ती कॅम्प’मध्ये काही दिवसांच्या अंतरातच दोन हत्तींच्या पिल्लांनी प्राण सोडले. लागोपाठ झालेल्या कळपातील दोन सदस्यांच्या मृत्यूमुळे कळप खचला होता. त्यात ती त्यांची आवडती दोन बाळं असल्यामुळे त्यांना झालेलं दु:ख प्रकर्षांनं जाणवत होतं. या कळपासाठी मला ‘कमलापूर कॅम्प’ला जाण्याचा वनखात्याचा निरोप आला. त्या कळपाबरोबर पूर्वीपासून मी काम करत असल्यामुळे कळपातले हत्ती मला ओळखत होते. मी तिथे पोहोचलो, तेव्हा कळप तळय़ामध्ये होता. राणी आणि मंगला या हत्तीणींनी आपली पिल्लं गमावली होती. राणी आणि मंगला मला बघितल्यावर तळय़ातून माझ्या दिशेनं आल्या. त्यांच्याशी बोलायला कशी सुरुवात करावी, असा विचार सुरू असतानाच दोघी माझ्यापर्यंत पोहोचल्या आणि मंगलानं आपलं बाळ गेल्याचं दु:ख आणि विलाप करत माझ्यासमोर काठावर तिचं डोकं ठेवलं. नकळत माझ्या डोळय़ांतून पाणी वाहू लागलं. त्याच क्षणी त्या दोघींनीही माझ्यावर केवढा मोठा विश्वास टाकला होता याची जाणीव झाली. मी मंगलाच्या डोक्यावर हात फिरवत तिचं सांत्वन करत होतो. पिल्लांच्या वियोगामुळे दोघींची अन्नावरची वासना उडाली होती. त्यांनी खाणं गरजेचं होतं, हे कळपाच्या प्रमुख मादीला कळत होतं. ती तिच्या परीनं त्यांना समजावत होती. पुढचे काही तास मी अखंड त्या दोघींशी बोलत होतो, अगदी नेहमीप्रमाणे मराठीत. माझ्या परीनं त्यांचं मन वळवण्याचा खूप प्रयत्न करत होतो. काही वेळेला चक्क खेळल्यासारखंदेखील करत होतो. बऱ्याच प्रयत्नांनंतर मी नकळत थांबलो. हळूहळू मंगला माझ्याजवळ आली आणि सोंडेनं माझ्या चेहऱ्याला कुरवाळू लागली. मंगलाच्या या कृतीतून मी तिला जे समजावण्याचा प्रयत्न करत होतो, ते तिला पटलंय असं तिला सांगायचं होतं.  राणी आणि मंगला दोघीही शांत झाल्या. व्यवस्थित खायला लागल्या आणि कळपाच्या प्रमुख मादीबरोबर आम्हालाही हायसं वाटलं!

अशीच अलीकडची एक घटना. ओडिशा आणि छत्तीसगड ही दोन राज्यं ओलांडून हत्तींचा एक कळप नुकताच आपल्या राज्यात दाखल झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कळपासंदर्भात माझ्याशी चर्चा करून हत्तींच्या कळपाच्या मदतीसाठी मला गडचिरोलीत जायला सांगितलं. पुढच्या काही दिवसांतच जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ वर्षशदे यांनी प्रत्यक्ष जिल्ह्यात येऊन कामाचा आढावा घेतला. फील्डवर जाऊन त्या कळपाचं ठिकाण शोधून साधारण किती हत्ती असावेत याची खातरजमा करणारे आम्ही पहिलेच होतो. कळप शोधताना साधारण तीन वेळा आम्ही कळपाच्या जवळ पोहोचलो होतो आणि दोन वेळा प्रत्यक्ष दर्शन झालं होतं. पण एकदाही कळप आमच्यावर हल्ला करण्यासाठी धावून आला नाही. अर्थात कळपाला त्रास होऊ नये म्हणून आम्हीदेखील कसोशीनं प्रयत्न केले. या कळपाचं वागणं इतकं सभ्य होतं, की शेतात न जाता माणसासारखं बांधावरून चालण्याचा प्रयत्न कळपानं केला. शेतीचं नुकसान करण्यापेक्षा शेततळय़ांमध्ये जाण्याकडे त्यांचा कल जास्त होता. दिवसभर तो कळप जंगलातच राहात असे. रात्री माणसं आपापल्या घरात जात होती, त्या वेळी कळप शेततळय़ाकडे येत असे आणि पहाटेच्या वेळी परत जंगलात जात असे. म्हणजेच कळप सकारात्मक दृष्टिकोनातून नवीन घरात स्थिरस्थावर झाला आहे आणि माणसाकडून एका चांगल्या मैत्रीची अपेक्षा करतो आहे, हे लक्षात येत होतं.

असे नानाविध अनुभव. हत्तींबरोबर किंवा हत्तींच्या कळपाबरोबर असणं माझ्यासाठी एक प्रकारे योगसाधनेसारखंच आहे. प्रत्यक्ष कृतीतून बऱ्याच गोष्टी हत्ती शिकवतात. अधिभौतिकापेक्षा वास्तव निसर्गाचं महत्त्व शिकवतात. कळपात एकत्र राहात असताना कुटुंबाचं महत्त्व. प्रमुख मादी आपल्या कृतीतून कुटुंबाकरता कसे निर्णय घ्यावेत हे सतत दाखवत असते. खरंतर मोठं आयुष्य जगण्यापेक्षा, आहे ते आयुष्य मोठं करण्याकडे त्यांचा कल असतो, हे त्यांच्या कृतीतून तुम्हाला अनुभवायला मिळतं. मी अनुभवातून सांगतो, की जगातलं सगळय़ांत मोठं हृदय आणि सगळय़ांत मोठा मेंदू हत्तीला आहे. तुम्ही जर हृदयात बसलात, तर हत्तीच्या आकाराचं प्रेम मिळेल; पण जर तुम्ही मेंदूत बसलात तर हत्तीच्या आकाराचा राग मिळेल! 

    मुंबईच्या गर्दीचा अनुभव घेतलेला मी कळपात रमतो हल्ली. मी माणूस म्हणून हत्तीच्या हृदयाची वाट धरली आणि मला माणूस बनवणाऱ्या हत्तींचं खरं प्रेम अनुभवता आलं.

shindeanand79 @gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Than live a long life famous exclamation elephant huge negativity teaching live life even elephants forgotten akp

ताज्या बातम्या