डॉ. नागेश टेकाळे
जगभरात कर्करोगाची पकड आजही घट्ट असली तरीही सकारात्मक प्रतिसादामुळे भारतीय स्त्रियांमधला मृत्युदर कमी झाला असल्याचे ‘लॅन्सेंट’चे संशोधन सांगते. मात्र कर्करोग होऊच नये किंवा प्राथमिक टप्प्यावरच त्यावर उपचार होण्यासाठी खूप काही गोष्टी- अगदी अर्थसंकल्पात आरोग्यनिधी वाढवण्यापासून आदिवासी पाडय़ांवरील लोकांचा जनुकीय अभ्यास करण्यापर्यंतची गरज आहे. आजच्या ‘जागतिक कर्करोग दिना’च्या (४ फेब्रुवारी) निमित्ताने घेतलेला आढावा.
आज ४ फेब्रुवारी म्हणजे ‘जागतिक कर्करोग दिन’. जगात प्रतिवर्षी सरासरी १५ लाख लोकांना कर्करोग होत आहे, मात्र अमेरिकेसारख्या विकसित आणि श्रीमंत राष्ट्राच्या तुलनेत भारतात या रुग्णांची संख्या कमी आहे. आकडय़ांमध्ये सांगायचे, तर आपल्या देशात जेव्हा एक लाख लोकसंख्येमागे १०० कर्करोगाचे रुग्ण असतात, तेव्हा अमेरिकेत हेच प्रमाण ३०० असते. शास्त्रज्ञ म्हणतात, की भारतातील तरुणांची वाढती संख्या हे यामागचे कारण असावे. या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे भारतात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे, पण सकारात्मक प्रतिसादामुळे या स्त्रियांचा मृत्युदर कमी आहे. ही सकारात्मकता, जागरूकता जास्तीत जास्त वाढावी यासाठी आजचा दिन महत्त्वाचा.
यावर ‘लॅन्सेंट, ऑन्कोलॉजी’ या संशोधनपत्रिकेत प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे जगामध्ये पुरुषांमधील कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण स्त्रियापेक्षा २५ टक्के जास्त असताना भारतात मात्र नेमके उलट चित्र आहे. स्त्रियांमध्ये गर्भाशयमुखाचा कर्करोग (Cervical), स्तन, बीजांडकोश आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण ७० टक्के असले, तरी औषधोपचारांना सकारात्मक प्रतिसाद देऊन बऱ्या होणाऱ्या स्त्री रुग्णांची संख्याही तेवढीच जास्त आहे. याउलट धूम्रपान आणि तंबाखू खाण्यामुळे पुरुषांमध्ये होणाऱ्या मुख आणि फुप्फुसांच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे आणि तसाच त्याचा मृत्युदरसुद्धा. त्यामुळे भारतात स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचे कर्करोगामुळे झालेले मृत्यू जास्त आहेत.
भारतामध्ये स्तनांचा कर्करोग सर्वसाधारणपणे सगळीकडेच आढळतो आणि त्याचे प्रमाण कर्करोगाच्या एकूण रुग्णांच्या जवळपास २७ टक्के आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून हे प्रमाण सातत्याने वाढतच आहे. आपल्याकडे ४० ते ५० वयोगटामधील स्त्रिया स्तन आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगास सामोऱ्या जाण्याची शक्यता जास्त असते, तर विकसित राष्ट्रांत सर्वसाधारणपणे ६० वर्षे वयाच्या पुढच्या स्त्रियांमध्ये नंतर हे चित्र पाहायला मिळते. अर्थात यात जेवढे आनुवंशिक शास्त्र आहे, तेवढेच त्यास वातावरण आणि पर्यावरणाचे घटकसुद्धा जबाबदार आहेत. ‘लॅन्सेंट’मधील एक संशोधन सांगते, की कर्करोग हा ‘जीनोमिक’ (Genomic-जनुकीय) आजार आहे. संशोधनात सिद्ध झाले आहे, की BRCA1 आणि BRCA2 ही जनुके स्तनांच्या कर्करोगाच्या प्रमाणात ४ ते ८ पट वाढ दर्शवतात. म्हणूनच काही कुटुंबांत आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळते. पण असे असले, तरी हे आनुवंशिक प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमीच आहे. म्हणूनच वाढत्या स्तन-कर्करोगाच्या रुग्णांसाठी जनुकीय परीक्षण ग्राह्य धरता येईल असे नाही. मात्र एक खरे आहे, की या प्रकारच्या कर्करोगामध्ये भौगोलिक स्थानानुसार चढउतार निश्चितच आढळतो. राजधानी दिल्ली भागात स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे स्त्रीचा आपल्या अवयवांबाबतचा संकोच आणि स्त्रीसुलभ लज्जा, यामुळे झालेला कर्करोग अनेकदा त्या रुग्णापर्यंतच सीमित राहतो. पुष्कळदा अक्षम्य दुर्लक्ष होते आणि आजाराबद्दलच्या अज्ञानामुळे तज्ज्ञ डॉक्टरकडे जाण्याचे टाळले जाते वा विविध कारणांचा आधार घेऊन पुढे ढकलले जाते. ‘लॅन्सेंट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या अहवालाचे लेखक आणि ‘राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंध आणि संशोधन संस्था, नोएडा’चे संचालक डॉ. रवी मल्होत्रा सांगतात, की स्तनांचा कर्करोग वाढण्याची काही प्रमुख कारणे म्हणजे स्त्रियांच्या आहारात स्निग्ध पदार्थाचा जास्त समावेश असणे, लठ्ठपणा, उशिरा होणारे लग्न आणि बाळाला अंगावरचे दूध कमी देणे, ही आहेत.
स्त्रियांच्या कर्करोगामध्ये शहरीकरणाचा प्रभावसुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे. अमेरिकेत ८० टक्के स्तन-कर्करोगाच्या रुग्णांचे पहिल्या अथवा दुसऱ्या टप्प्यामध्येच निदान केले जाते, तर भारतात मात्र बहुसंख्य रुग्ण हे तिसऱ्या, चौथ्या टप्प्यामध्येच डॉक्टरांच्या संपर्कात येतात. अशा वेळी बराच उशीर झालेला असतो. त्यातील एक समाधानाची गोष्ट म्हणजे असे असूनही उपचारपद्धतीस सकारात्मक प्रतिसाद मिळाला, तर यातील ६० टक्के रुग्ण बरे होऊ शकतात. गर्भाशयमुखाचा कर्करोग हा ‘ह्युमन पॅपिलोमा व्हायरस’मुळे (HPV) होतो आणि उपचारपद्धतीस तो सकारात्मक प्रतिसाद देतो. आपल्याकडील स्त्रियांमध्ये याचे प्रमाण जवळपास २३ टक्के आहे. आपल्याकडे २००८ पासून शासनातर्फे ‘एचपीव्ही’ प्रतिबंधक लस ११ ते १३ वर्षे वयाच्या मुलींना नियमित दिली जाते म्हणून सध्या याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. मात्र दिल्ली आणि पंजाबचा अपवाद वगळता या लसीकरणाबद्दल इतर राज्यांत हवी तेवढी जनजागृती अजूनही झालेली नाही. हा कर्करोग निश्चितच बरा होऊ शकतो, म्हणून याबद्दल स्त्रियांच्या मनातील भीती काढून टाकायला हवी. लैंगिक शिक्षण आणि आरोग्य (‘रीप्रॉडक्टिव्ह सेक्शुअल हेल्थ’) याबद्दल मुलींमध्ये जागरूकता निर्माण करणे, त्याचबरोबर शासनाच्या आरोग्य कार्यक्रमात ‘एचपीव्ही’चे लसीकरण समाविष्ट करणे हे याचसाठी गरजेचे आहे. ‘लॅन्सेंट’चा हा कर्करोगासंबंधीचा अहवाल असेही म्हणतो, की भारताच्या लोकसंख्येत आदिवासी नागरिकांसह ४,००० पेक्षाही जास्त
जाती-प्रजातींचे लोक आहेत. त्यांचा जनुकीय अभ्यास करून त्यामधील विशिष्ट ‘जेनेटिक बायोमार्कर्स’ शोधणे गरजेचे आहे, कारण या संशोधनामध्येच कर्करोग प्रतिबंधक उपचारांचे सर्व धागेदोरे लपलेले आहेत. या मुद्दय़ाचा विस्तार करताना त्यांनी असा उल्लेख केला आहे, की पंजाबमधील स्त्रियांच्या कर्करोगाचे प्रमाण आणि ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या पंजाबी स्त्रियांमधील कर्करोगाचे प्रमाण, याचा समांतर, तुलनात्मक अभ्यास होणे गरजेचे आहे. या संशोधनामधून आपणास स्थानिक हवामानाचा कर्करोगाशी असलेला संबंधसुध्दा लक्षात येऊ शकतो. यातले महत्त्वाचे म्हणजे हे दोन लोकसंख्येचे समूह एकाच जनुकीय वंशाचे असून ते फक्त वेगवेगळय़ा वातावरणात राहात आहेत.
भारतात १९७६ पासून ‘कर्करोग नियंत्रण कार्यक्रम’ चालू आहे, पण अजूनही त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जात नाही अशी खंत वैद्यकीय क्षेत्रामधून व्यक्त केली जाते. ‘लॅन्सेंट’च्या या अहवालाच्या वेळी देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) आरोग्य सेवेचा हिस्सा जेमतेम १.५ टक्के होता. आता तो २.१ टक्के आहे आणि २०२५ पर्यंत तो २.५ टक्के होईल असे म्हटले जाते. अमेरिकेच्या १९ टक्क्यांच्या तुलनेत आपण कितीतरी मागे आहोत.
तरीही आशेचा किरण म्हणजे भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने देशातील ७०० पैकी १६५ जिल्ह्यांमध्ये स्त्रियांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबीर प्राधान्याने सुरू केले आहे. परंतु ज्या प्रमाणात कर्करोगाची पकड आजही घट्ट आहे ती पाहाता औषधोपचाराची सार्वत्रिकता वाढवणे आणि त्याला सर्वानीच सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे आहे.
(लेखक मूलभूत विज्ञानाचे अभ्यासक आहेत)