आपुले मरण पाहिले म्या डोळा…

मृत्यू अटळ असला तरी जोपर्यंत तो समोर दिसत नाही तोपर्यंत तो जाणवतही नाही. मात्र एकदा का तो समोर ठाकला आणि क्षणाक्षणाने जवळ येऊ लागला तर? डॉ. ऋजुता या आमच्या वाचक-लेखक मैत्रिणीने पाठवलेत तिचे मृत्युशय्येवरील हे अनुभव.

मृत्यू अटळ असला तरी जोपर्यंत तो समोर दिसत नाही तोपर्यंत तो जाणवतही नाही. मात्र एकदा का तो समोर ठाकला आणि क्षणाक्षणाने जवळ येऊ लागला तर? डॉ. ऋजुता या आमच्या वाचक-लेखक मैत्रिणीने पाठवलेत तिचे मृत्युशय्येवरील हे अनुभव. डॉ. लिली जोशी यांच्या ‘माझे मीपण इथे ठेवून जाईन’ या लेखाला (१८ जानेवारी) प्रतिसाद म्हणून हे दोन लेख.
फेब्रुवारी २८ ची गोष्ट. हॉस्पिटलमध्ये जनरल हेल्थ चेकअपसाठी जायचे होते. प्रकृतीच्या गंभीर तक्रारी काही नव्हत्या, पण तपासणी केलेली बरी म्हणून. मुलाला नर्सरीत सोडून नवऱ्याने, कमलेशने मला बंगळुरूच्या मणिपाल हॉस्पिटलमध्ये सोडले. पूर्ण चेकअपसाठी पाच-सहा तास लागणार होते. रक्ताच्या तपासण्या, छातीचा एक्स-रे, पोटाची सोनोग्राफी, ईसीजी पोटात थोडीशी धाकधूक होत होती. कोलेस्टेरॉल, शुगर निघाली तर काय?
रक्ताचे रिपोर्ट, पोटाची सोनोग्राफी, डॉक्टरांची तपासणी सर्व काही नॉर्मल होते. इतक्यात छातीचा एक्स-रे रिपोर्ट आला. हृदयाला लागून डाव्या फुप्फुसात शिरलेला मोठा पांढरा डाग एक्स-रेच्या काळ्या फिल्मवर ठसठशीतपण दिसत होता. ‘‘हृदय आणि फुप्फुसाला कवेत घेणारा टय़ूमर दिसतोय.’’ डॉक्टर आवंढा गिळत चाचरत म्हणाले. म्हणजे काय याचा अर्थ माझ्या मेंदूपर्यंत थेटपणे पोहोचला. अचानक माझ्यासाठी आजूबाजूचे जग आउट ऑफ फोकस झाले. डोळ्यातून कधीचाच अश्रूंचा महापूर सुरू झाला होता. हे असं अर्धवट वयात आजाराला बळी पडणं म्हणजे फसवणूक झाल्यासारखं वाटत होतं. कशीबशी घरी आले. घरात आल्यावर माझा पावणेचार वर्षांचा मुलगा दुडदुडत समोर आला. मृत्यूचा आतापर्यंत उलटा अनुभव घेतला होता. ओटीतलं बाळ अनेक वेळा हातात आलं नव्हतं. आता माझी जायची वेळ होती. बाळाला मिठी मारून रडताना वाटलं, ‘कसं होणार याचं? अजून तहान-भूक काही कळत नाही. आई थोडा वेळ दिसली नाही तर कावराबावरा होतो. मला सोडून एक दिवसही कुठे राहिला नाही. रात्री कुणाच्या कुशीत झोपेल?’ माझ्या मृत्यूपेक्षा त्या लहान जिवाचे कसे होणार याचीच चिंता काळीज चिरत होती.
दोन दिवस अश्रूंच्या महापुरात वाहून गेले. मनाला सुन्न करणारा बधिरपणा आला होता. दोन दिवसांनी केलेल्या सिटी स्कॅनमध्ये निदान आलं मॅलीग्नंट टय़ूमर. हा एक्स रे माझा नाहीच अशी जी मनाला अंधूक आशा होती तीही नष्ट झाली. मी जीवशास्त्राची विद्यार्थिनी. त्यामुळे इंजिनीयर असलेल्या नवऱ्यापेक्षा या आजाराच्या भयावह रूपाचे मला जास्त आकलन झाले होते. हातात वेळ थोडा होता. ‘कर्करोगाचे स्थान पाहात माझ्याकडे फक्त तीन ते सहा महिने आहेत.’ मी कमलेशला सांगितले. ‘आपण मुंबईला परत जाऊ. सगळ्यांबरोबर राहू आहे तेवढा वेळ आनंद घालवू.’ त्याने उसनं अवसान आणीत उत्तर दिले. तो जणू धैर्याचा मेरुमणीच. थोडंसं धैर्य मीही उसनं घेतलं.
मृत्यूशी झुंजताना फार कमी माणसे यशस्वी होतात. कारण मृत्यू चहूबाजूंनी, दाही दिशांनी तुम्हाला गिळंकृत करायला येतो. अनेक आघाडय़ांवर लढायला लागतं. धरती, आकाश, पाताळ कुठ्ठे कुठ्ठे म्हणून कणभर जागा दम घ्यायला मिळत नाही. माणसं गांगरून जातात. आयुष्य आपण ठरविलेल्याप्रमाणे पुढे जात नाही. मात्र योग्य नियोजन केलं तर मृत्यूही सुसह्य़ होऊ शकतो. समोर आलेल्या मृत्यूच्या प्लॅनमध्ये मी माझे उरलेले आयुष्य बसवायला घेतले. सामाजिक, कौटुंबिक, वैयक्तिक, शारीरिक, मानसिक अशा चढत्या भाजणीनं अनेक आघाडय़ांवर लढायचं होतं. आर्थिक आघाडी हा एक स्वतंत्र विषय होता.
या दरम्यान केलेली शस्त्रक्रिया अयशस्वी झाली. हृदय-फुप्फुसाला चिकटलेला टय़ूमर काढणं डॉक्टरांना अजिबात शक्य झालं नव्हतं. भरपूर पोषणद्रव्ये मिळत असल्यानं जोमानं वाढणारा टय़ूमर पाहून डॉक्टरही हबकले होते. ‘जास्तीत जास्त सहा महिने’ या माझ्या अनुमानावर त्यांनीही शिक्कामोर्तब केलं होतं. शेवटचे दिवस आपल्या माणसांत काढावे म्हणून आम्ही तिघे मुंबईला परतलो..
समोर उभ्या ठाकलेल्या माझ्या मृत्यूला भेटलेला प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे सामोरे गेला. स्वार्थाची काटेरी टोके अन् प्रेमाच्या धाग्यानं केलेली कशिदाकारी याचा एक विस्तृत पटच माझ्यासमोर या काळात उलगडत गेला. मानवी स्वभावाबद्दलचे माझे ज्ञान विस्तारले. जाणिवांच्या कक्षा रुंदावल्या. कदाचित मृत्यूने शिकविलेलं शहाणपण म्हणजे हेच असावं!
मुलाचे कसे होणार? याच चिंतेनं मी ग्रस्त होते.
मुंबईला गेल्यावर ‘ती’ मला भेटायला आली. माझा तिच्यावर फार जीव. गेल्या काही वर्षांत माझ्या अडचणीच्या काळात तिने मला खूप आधार दिलेला. बाळाला तिच्याकडे सोपवून मी पुढच्या प्रवासाला जाण्याच्या घाईत होते. ‘मला काही बाळाला सांभाळायला जमणार नाही.’ तिने कोरडेपणानं सांगितलं. मृत्युशय्येवरच्या माणसाशी सडेतोडपणे बोलण्यास काहीच हरकत नसते. कारण त्याचं मन सांभाळण्यातील फायद्या-तोटय़ाचा हिशोब संपलेला असतो. मला तिची स्वत:च्या कुटुंबाला या मृत्यूच्या सावलीपासून दूर ठेवायची धडपड जाणवली. मी दु:खी समजूतदारपणे मान हलवली.
माझे वडील साहित्याचे विद्यार्थी अन् विज्ञानाचे शिक्षक (अ. भि. गोरेगावकरचे ज. गो. पाटील सर) आयुष्यभर त्यांनी आम्हाला विज्ञाननिष्ठ, विवेकनिष्ठ विचारसरणी शिकवली. ‘ताई, मृत्यू हा नियम आहे. जगणं हा अपवाद.’ वयाच्या ७४ व्या वर्षी ते मोठय़ा हिमतीने मला जीवनाचे तत्त्वज्ञान सांगत होते. अविचल राहून जसे काही झालेच नाही या थाटात त्यांनी माझ्याबरोबर पूर्वीसारख्याच साहित्य, काव्य, नवीन शोध याबद्दल गप्पा मारणं सुरू ठेवलं. आपल्या लाडक्या लेकीला असं गंभीर आजारानं घेरलेलं पाहून आईच्या हृदयाला काय झालं ते कल्पनेपलीकडले. पण त्या माउलीनं माझ्यासमोर डोळ्यांतून अश्रू म्हणून काढले नाहीत. एकांतात किती गाळले याची मोजदाद नाही. मनातल्या मनात खंत करीत राहिली अन् तिचं आरोग्य खालावत राहिलं. मात्र त्याचबरोबर ‘तुला थोडं थोडं पथ्याचं, पौष्टिक खायला देते म्हणजे तुझी शक्ती टिकून राहील. तू बरी होशील.’ असं म्हणून घरात आशेचे किरण पसरवीत राहिली. गलितगात्र झालेल्या मला आंघोळ घालण्यापासून सर्व कामे न कुरकुरता न थकता करत राहिली. धाकटी बहीण डॉक्टर. त्यामुळे कर्करोगाच्या रूपात आलेल्या यमराजाला तिनं सर्वात आधी ओळखलेलं. वास्तव माहीत असताना आई-वडिलांसमोर चढवलेला ‘ताई नक्की बरी होणार’चा मुखवटा सांभाळताना तिचे हृदय किती विदीर्ण होत होते याची कल्पना मला होती. कारण मीही तसाच एक ‘आय डोन्ट केअर’चा बेफिकीर मुखवटा चढवलेला. दूरगावाहून ती धडपडत मुलींना घेऊन मला भेटायला येई. उपचारांसाठी योग्य डॉक्टर शोधणं, आलेले रिपोर्ट दुसऱ्या चार डॉक्टरांना दाखवून अजून काही करता येईल का हे पाहणं हेही तिचंच काम.
भाऊही सकाळी उठल्याउठल्या हातात एक गोड गाठोडं घेऊन माझ्या खोलीत येई. ते टकलू, गोरं गोरं बाळ दात नसलेलं बोळकं दाखवून आपल्या टक्कल पडलेल्या, काळवंडलेल्या आत्याकडे निव्र्याजपणे हसू उधळत असे. जमेल तेव्हा भाऊ-मृणाल गप्पा मारत. आक्रसत चाललेल्या काळाच्या कुपीतून सहवासाचे क्षण मिळवायची त्यांची धडपड चालू होती.
आमच्या मुलाला या सर्व घडामोडी बाहेरून वेगळ्या स्वरूपात समजण्यापेक्षा आम्हीच सांगणे आवश्यक होते. तो या सर्व गोष्टींना कसा प्रतिसाद देईल याबद्दल आम्ही संभ्रमातच होतो. त्याला एक्स-रे दाखवून आईच्या छातीत कॅटरपिलरने घर केले आहे ते हॉस्पिटलमध्ये जाऊन काढावे लागेल असं शांतपणे सांगितलं. टीव्हीवरच्या जाहिरातींमुळे दात कुरतडणारे कॅटरपिलर त्याला माहीत होते. पुढेही सर्व रिपोर्ट त्याला दाखवत असू. तोही इतका तयार झाला की घरी आलेल्या मंडळींना नीट समजावून देई. मुलांची आकलनशक्ती वाढते म्हणायचे की मुलं अकाली प्रौढ झाली म्हणायची? त्या बाळजीवानं आम्हाला खूप सहकार्य केलं. उपचारांदरम्यान ते दोघं सासरी अन् मी माहेरी अशी विभागणी सोयीसाठी केली होती. वर्ष-दीड र्वष बाळाने आईविना काढलं. कधीतरीच हट्ट केला. रोज संध्याकाळी बापलेक मला भेटायला येत. येताना तो उडय़ा मारत येई. पण जाताना त्याचा पाय आणि माझा जीव जड होई. त्याच्या बाबाने तर स्थितप्रज्ञाचा आव आणलेला!
त्याच्या हरणासारख्या डोळ्यांत आई जवळ नाही याचे दु:ख मला दिसे.
पण तोंडावाटे त्याने शब्दही काढला नाही. किमोने केस गेलेल्या अन् काळवंडलेल्या माझ्या गालांची पापी घेऊन ‘आई तू किती सुंदर दिसतेस. मला खूप आवडतेस.’ असं म्हणत माझ्यावर प्रेमाचा वर्षांव करत राहिला. माझ्या जोडीदाराबद्दल काय म्हणावं? हिमालयासारखा तो माझ्या पाठीशी उभा राहिला. मृत्यूलाही शांतपणे सामोरे जाण्याचे धैर्य त्याने मला दिले. आला क्षण आपण पुरेपूर जगू हा विश्वास दिला. पाण्यापरी वाहणाऱ्या पैशाची पर्वा केली नाही. ऑफिसमधले महत्त्वाचे प्रोजेक्ट आणि माझ्या हॉस्पिटलच्या वाऱ्या त्यानं कसं काय जमवलं हे ईश्वरालाच माहीत. सर्व आवराआवर करण्याची मृत्युपंथाला लागलेल्या माझी धडपड त्यानं समजून घेतली. त्याला कितीही अशुभ वाटले तरी बँकांमध्ये नॉमिनेशन करणे, माझ्या एकटीच्या नावाऐवजी दोघांची नावे घालणे, मृत्युपत्र करणे हे माझे सर्व हट्ट पुरवले. त्याचबरोबरीने आपली संशोधक वृत्तीही जागृत ठेवली. या दुर्मीळ कर्करोगाबद्दल जगभरातील संशोधनाचा मागोवा घेणे, ते पेपर माझ्या डॉक्टरांना दाखविणे, माझे रिपोर्ट जगभरातील डॉक्टरांकडे पाठवून कुठे आशेची तिरीप सापडते का हे पाहणे यासाठी अथक प्रयत्न केले. माझ्या वेडय़ा, कातर मनाला जपण्यासाठी बाळाला पाळणाघरात न ठेवता स्वत: सांभाळले. सर्वच शब्दांच्या पलीकडलं..
अशा तऱ्हेनं आजूबाजूंच्या सर्वाचं वागणं वरवर नॉर्मल असल्यासारखं चाललं होतं. तरी माणसाच्या ऐकू येणाऱ्या क्षमतेपलीकडल्या ध्वनिकंपनांमध्ये एक शोकस्वर आसमंतात भरून राहिला होता. एकमेकांवर अतिशय प्रेम करणाऱ्या हृदयांची ताटातूट होत असते. तेव्हा त्या मूकरुदनाचा आवाज तिन्ही लोक व्यापून टाकतो.
मृत्यूला सामोरे जाण्याची माझी अशी तयारी होत होती. एक मनाशी घट्ट ठरवले होते की, मनाची तगमग करून मरायचे नाही. ही सर्व प्रक्रिया नीट समजून घेऊन शांतपणे मृत्यूशी हस्तांदोलन करायचे. या दरम्यान किमो रेडिएशनला न जुमानता अकरा महिन्यांतच कर्करोग परत जोमाने वाढायला लागलेला. आता काहीच उपचार उरले नाहीत. डॉक्टरांनी निराशेने मान हलवली. प्रत्येक दिवस बोनस; विज्ञान, तत्त्वज्ञान, हाताला मिळत गेलं ते वाचत गेले.
विज्ञान सांगतं, प्रत्येक प्राणी हा पेशींचा बनलेला आहे. सर्व पेशींच्या कार्यात, जनन-मरणात सुसूत्रता  आहे. कधीतरी या चक्राची लय बिघडते. रोगजंतूंचा शिरकाव होतो किंवा आपल्याच पेशी बंड करतात. शरीर प्रतिकार करायचा आटोकाट प्रयत्न करतं. परंतु कधीकधी हे प्रयत्न विफल होतात. रोग बळावतो आणि प्राणी मृत्युमुखी पडतो. यातून प्राणी वाचलाच तरी भक्षक आहेत, निसर्गातील दुसरी संकटं आहेत. म्हणूनच मृत्यू हा नियम आहे, जगणं हा अपवाद आहे. निसर्गातील सर्व घटकांचा अशा रीतीने समतोल राखला जातो. जन्म आणि मृत्यू अनेक रूपांत घाला घालणार. त्यामुळे मीच का? आताच का? असेच का? हे प्रश्न मृत्यूच्या स्वरूपात गैरलागू. प्राप्त परिस्थिती स्वीकारणे एवढेच आपल्या हाती.
स्वत:च्या मृत्यूचे भय उणावले तरी त्या लेकराला सोडून जायला जीव धजेना. मग भारतीय तत्त्वज्ञानाकडे वळले. जीव-ब्रह्म, आत्मा-परमात्मा, माया, जन्ममृत्यूचे फेरे, मोक्ष या संकल्पनांवर भारतीय तत्त्वज्ञानाचा डोलारा उभा आहे. जीव हा ब्रह्माचाच अंश. जिवाचे अंतिम ध्येय ब्रह्मस्वरूप होणे म्हणजेच मोक्षपदी जाणे. मात्र जीव मायेच्या पाशात बद्ध असल्यामुळे त्याला आपल्या खऱ्या सत्-चित्-आनंद स्वरूपाचे विस्मरण होते. कर्मामध्ये त्याच्या वासना गुंतल्यामुळे संचित कर्माचे फळ भोगण्यासाठी म्हणून जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांमध्ये तो अडकतो. याच तत्त्वज्ञानावर आधारित थोडेसे वेगळे प्रमेय मी ‘टंल्ल८, ें२३ी१, टंल्ल८ छ्र५ी२’ या पुस्तकात वाचले. माझ्या मनाला ते फार भावले. त्यात म्हटलंय, आत्मा हा देवाचा किंवा शाश्वत चैतन्याचा भाग. देवातील विविध गुण अंगी बाणवायला म्हणून आत्मा पृथ्वीच्या शाळेमध्ये जन्म घेतो. दया, क्षमा, शांती, प्रेम, करुणा हे गुण जीवनातील अनेक सुख-दु:खाच्या प्रसंगांतून शिकतो. अनेक जन्म असा गुणसमुच्चय करून तो देवासारखा बनतो अथवा त्या शाश्वत चैतन्यात विलीन होतो. तोच मोक्ष. आपल्या प्रिय व्यक्ती आपल्याला वेगवेगळ्या रूपात, नात्यात जन्मोजन्मी भेटत राहतात.
तरीही आपल्या जीवलगांना सोडून जायला का जीवावर येते ? कारण आपण त्यांच्याबरोबर समरसून असे कधी जगलेलोच नसतो. प्रत्येक कृती करताना आपले मन दुसराच काही विचार करत असते. उदा- आपण लहान असताना कधी मोठे होऊ, कॉलेजात गेल्यावर नोकरी कधी लागेल, पुढे मुले-बाळे झाल्यावर वाटते, आता मुले केव्हा मोठी होणार..आहे ते वर्तमान, ती स्थिती आपण कधी आनंदाने अनुभवत नाही. मग अपुऱ्या राहिलेल्या इच्छा-आकांक्षा असा अचानक मृत्यू समोर ठाकला की भेडसावायला लागतात. म्हणून प्रत्येक क्षण पूर्णपणे अनुभवायचा. पंचेद्रियांनी.. कुंडीत फुललेला सुंदर गुलाब, रानफूल, दयाळ पक्षाचे मंजूळ गाणे, आयोराची जीवाला वेडी करणारी शीळ, पोर्णिमेचा चंद्र, उगवणारा सूर्य. त्या त्या क्षणात पूर्णपणे विरघळून जायचं. प्रेम करताना जीव उधळून प्रेम करायचं. मग इतकं सुंदर क्षण आपल्या वाटय़ाला आले, त्यासाठी त्या ईश्वराप्रती कृतज्ञताच मनी दाटते.
सर्व धर्म, संत, महात्मे दया, करुणा, प्रेम, क्षमा, शांतीचाच मार्ग दाखवतात. प्रार्थना, नामस्मरण या मार्गानी सगुणाची आराधना करा वा निर्गुणाचे ध्यान करा, पण भूतमात्रांशी मैत्र जडले तर देव पृथ्वीतलावरच भेटेल. मृत्युशय्येवरही ऐहिक गोष्टींपेक्षा निरपेक्ष प्रेम अधिक महत्त्वाचे वाढते. अंतरंगात करुणेचा नंदादीप पेटतो. चराचराप्रती प्रेम उंचबळून वाढते. तनामनावर शांतीची प्रथा फाकली की जिवाशिवाचे मंगलमय मीलन होते.
माणूस मृत्यू पावतो म्हणजे काय? तर त्याच्या देहाचे कार्य थांबते. त्याच्या पार्थिवावर केलेल्या दहन-दफन यांसारख्या अंत्यसंस्कारांमुळे परत पंचमहाभूतात विलीन होतो. म्हणजे आज माझ्या शरीरात जे अणूरेणू आहेत ते १०० वर्षांपूर्वी एखाद्या झाडाच्या रूपात असतील. लाखो वर्षांपूर्वी डायनोसोरच्या शरीराचा भाग असू शकतील किंवा आजपासून लाखो वर्षांनी एखाद्या नवीन ताऱ्यात / कृष्णमेघात असू शकतील. म्हणजेच एका अर्थाने मी अमर, अविनाशी आहे. मी या विश्वात आहे अन् हे विश्व माझ्यात आहे. मग देह सोडून जाण्यास दु:ख का?

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The deathbed experience

ताज्या बातम्या