डॉ. अंजली जोशी

‘आमच्या वेळी आम्ही असं वागत नव्हतो..’ नव्या पिढीबद्दल ऐकू येणारी ही सततची टीका. पण आताचा काळदेखील तसा नाही! आता तरुण मुलंमुली आपली मतं स्पष्ट, अनेकदा पालकांना उद्धट वाटणाऱ्या भाषेत सांगून मोकळी होतात. त्यांनी आपलं सर्व ऐकावं ही अपेक्षा कशी करता येईल? अशा स्थितीत पालकत्वाचीही दिशा कशी बदलता येईल? नाही तर दोन्ही बाजूंनी नुसत्याच ठिणग्या उडत राहतील आणि जखमी होतील आपल्याच आप्तांची मनं..

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
Stop Breaking Nails While Washing dishes Cooking With Simple Remedies Skin Expert Tells How To Make Nail Grow Faster & thick
भांडी घासली, स्वयंपाक केला तरी नखे सहज तुटणार नाहीत यासाठी डॉक्टरांनी सांगितले उपाय; या टिप्स हात करतील सुंदर
Framework That Stunts Progress
जिंकावे नि जगावेही : प्रगतीला खीळ घालणारी चौकट

सकाळी सकाळी आईबाबांशी बाचाबाची झालीच. हा आता नित्यक्रम झाला आहे. आजचा सुट्टीचा दिवसही त्यातून सुटला नाही. कॉफी निवांत पीत असताना काल मी हातावर गोंदवून घेतलेला टॅटू आईच्या नजरेला पडला. ‘‘पूर्वा, अगं किती मोठा टॅटू हा! सगळा हात भरून गेलाय. किती विचित्र दिसतोय!’’ लगेच तिची टिप्पणी.

आयताच विषय मिळाल्यावर बाबा ही संधी थोडीच सोडणार? ‘‘फॅशनच्या नावाखाली वाट्टेल ते चाललंय सध्या! मागच्या महिन्यात पुढच्या बटा निळय़ा करून आली होती. स्वत:ला जास्तीत जास्त कुरूप करून घ्यायची फॅशन! किती उडवलेस या टॅटूवर?’’ बाबांनी विचारलंच. मी काहीच बोलले नाही.
मग आईनंच पुस्ती जोडली. ‘‘आमच्या वेळी आम्ही हातावर मेंदी काढायचो. ती शोभून दिसायची. हे असले टॅटू किती ओंगळवाणे दिसतात!’’ माझ्या डोक्यात ठिणग्या पेटल्या. ‘‘हे माझे हात आहेत. त्यावर काय शोभून दिसतं आणि काय नाही, हे मी ठरवणार. तुम्ही नाही!’’
‘‘पूर्वा, हे काय बोलणं झालं? असे संस्कार केलेत तुझ्यावर? आईबाबांना उलटून बोलणं शिकवलं तुला?’’
‘‘मी क्लोन नाहीये तुमची. तुमच्यासारखी नाही वागणार. स्वत:चे विचार आहेत मला. ते तुमच्यापेक्षा पूर्ण वेगळे आहेत. वेगळे आहेत म्हणून चुकीचे आहेत, असं नाही.’’ मीही ठणकावून सांगितलं.

‘‘हद्द झाली बाई हिची! आमच्या वेळी आईवडिलांसमोर मान वर करण्याचीही आमची हिंमत नव्हती. आणि इथे? साधं काही सांगण्याची खोटी, एखाद्या वैऱ्याप्रमाणे अंगावर धावून येते.’’ माझ्या तोंडातली कॉफी कडूजहर झाली. मग सांगावंच लागलं त्यांना, ‘‘हो. कारण हे आज नाही घडलेलं. सतत तुम्ही मला कशा ना कशावरून बोलत असता. सतत नावं ठेवत राहता. माझं काहीच कसं आवडत नाही तुम्हाला? हे नावडणं इतकं वाढलंय ना, की तुम्ही डोळय़ांसमोर पण नकोत मला!’’ खोलीत जाऊन मी कडी लावून घेतली. कुठल्याही क्षणी रागाचा स्फोट होईल असं वाटत होतं. सकाळपासून रात्रीपर्यंत आईबाबा सतत टोकत असतात. रात्री उशिरा जागण्यावरून, फोनमध्ये मग्न असण्यावरून, कपडे जागेवर न ठेवल्यावरून, बाहेरच्या खाण्यावरून, पेहरावावरून, एक ना दोन कारणं! आता बाहेर बसले असते, तरी ‘किती उशिरा उठतेस’ यावरून नाहीतर ‘आंघोळ किती उशिरा करतेस’ यावरून टोले हाणलेच असते. सुट्टीच्या दिवशी समजा सगळं उशिरा केलं किंवा केलंच नाही तर काय मोठं आकाश कोसळणार आहे? आणि हो, काही गोष्टी त्यांना न पटणाऱ्या असतीलही. पण कधी तरी त्या शांतपणे, समजूत घालून, पटेल अशा भाषेत जवळ घेऊन सांगणं यांना जमणारच नाही का? पण नाही! यांच्या दृष्टीनं ती शिस्त आहे. माझ्या दृष्टीनं ते करकचून बांधलेले, लवचीकता नसलेले मनमानी नियम आहेत आणि आई-बाबा स्वत:च तयार केलेल्या नियमांचे गुलाम झाले आहेत. त्यात ते मला बसवायचा प्रयत्न करतात. हे घर कसलं, तुरुंग आहे नुसता! मोकळा श्वास मिळत नाही इथे.‘आमच्या वेळी असं होतं’ म्हणून ऊठसूट तुलना करत राहतात. प्रत्येक पिढीला वाटतं, की पुढच्या पिढीपेक्षा त्यांच्या वेळचा काळ चांगला होता. पण म्हणून त्या काळातलं सगळं बरोबर आणि या काळातलं चूक, असं नसतं ना! त्या काळातले मापदंड वेगळे आणि आताच्या काळातले वेगळे. पण हे स्वीकारायला खुलेपणा हवा ना? पुस्तकं न वाचण्यावरून बाबा रोज बोलतात. त्यांच्या वेळी कशी पुस्तकं वाचली जायची वगैरे व्याख्यानं देतात. पण आता माध्यमं बदलली आहेत ना! मी पुस्तकं वाचत नाही, पण अनेक भाषांतले चित्रपट पाहते. किती विविध माहिती मिळते! भिन्न संस्कृतींची ओळख होते. अनेक जीवनानुभव कळतात. तुम्ही जे पुस्तकात वाचता, तेच मी दृक-श्राव्य माध्यमातून चित्रपटांतून वाचते. माझ्या दृष्टीनं चित्रपट ही माझी पुस्तकं आहेत. पण हे तुम्हाला पटेल तर ना? तुमच्या डोक्यात फिट्ट बसलंय, की चित्रपट पाहणं म्हणजे उडाणटप्पूपणा आणि पुस्तकं वाचणं म्हणजे गंभीरपणे काही करणं! काही सांगायला गेलं की माझ्यावरच डाफरतात. ‘आम्ही तुझ्यासाठी किती खस्ता खाल्ल्या आहेत,’ याचा पाढा आई सतत वाचत राहते. मग मी म्हणते, ‘‘नका ना खाऊ मग! मी सांगितलं का तसं करायला? तो तुमचा चॉइस आहे. मी का त्याचं ओझं घ्यायचं?’’ असं म्हटलं, की मग ‘बोलायची सोय नाही! उद्धट बोलते,’ म्हणून माझा उद्धार होणार. स्वत:ची मतं ठामपणे, लॉजिकली मांडणं म्हणजे उद्धटपणा किंवा त्यांचा अपमान कसा ठरू शकतो? लहान होते तोपर्यंत निमूटपणे ऐकलं तुम्ही सांगितलंत ते! मी दिवसभरात काय करायचं आणि काय नाही, हे तुम्ही ठरवत होतात. त्यात माझं बालपण आणि टीन-एज करपून गेलं, याची पर्वा तुम्हाला आहे का?

आता कॉलेज संपायला आलं, तरी तुमचा माझ्यावरचा पहारा काही कमी होत नाही. उलट वाढतच चाललाय. कुठूनही परतायला थोडा उशीर झाला, तरी फोनकॉल्स आणि मेसेजचा मारा करता. मग फोन बंद करण्याशिवाय काय पर्याय आहे? एकदा बाबा तर चक्क मैत्रिणीकडे घ्यायला आले. मित्रमैत्रिणींच्या गराडय़ात बाबांनी घ्यायला येणं किती लाजिरवाणं आहे! ‘दिवस चांगले नाहीत’ हे तुमचं ठरलेलं उत्तर. प्रत्येक पिढीला वाटतं, की पुढच्या पिढीचे दिवस चांगले नाहीत. समजा तसं असलं तरी त्यांच्याशी सामना करणं भाग आहे ना! खरं सांगा ना, की ‘आमचा तुझ्यावर विश्वास नाही’. माझे मित्र-मैत्रिणी माझ्यावर विश्वास ठेवतात, पण प्रत्यक्ष आईवडील ठेवत नाहीत, याचं किती दु:ख होतं! मी तुम्हाला पसंत नसलेलं काहीतरी करेन, याची धास्ती तुमच्या डोळय़ांत दिसते. इतकी धास्ती बाळगण्याएवढी का मी अपरिपक्व आहे? मी इतकी दुखावली जाते, की मी कुठे जातेय ते सांगणंच आता बंद केलंय. त्याबद्दलही ओरडा खातेच तुमचा.

मलाही तुमच्या अनेक गोष्टी आवडत नाहीत. एक-दोनदा माझा अनलॉक्ड फोन टेबलवर राहिला होता, तर सर्व मेसेजेस वाचत बसलात! मी तुमच्या फोनमधले खासगी मेसेज वाचले तर आवडेल का तुम्हाला? मी इतकी लहान नाही ना राहिले आता. प्रत्येकाचं स्वत:चं एक खासगी जग असतं आणि त्यावर अतिक्रमण करणं अयोग्य आहे, हे अगदी मूलभूत मूल्यसुद्धा तुम्ही पायदळी तुडवलंत. मला संस्कारांचे उपदेश करता, पण स्वत: मात्र ते पाळत नाही. याबद्दल बोललं तर, ‘तोंड वर करून बोलते.’ असं म्हणत नावं ठेवता. म्हणजे तुम्ही एकतर्फीपणे माझ्या चुका काढणार; मी मात्र तुमच्या काढायच्या नाहीत. कारण पालक म्हणून माझ्या चुका काढण्याचा तुम्हाला निसर्गदत्त हक्क आहे. हा खासा न्याय आहे!

‘सोशल मीडियामुळे तू बिघडत चालली आहेस’ असं म्हणता, पण तोच सोशल मीडिया तुम्हीही यथेच्छ वापरता. मीही असं म्हणू शकते ना, की ‘तुम्ही जे माझ्याशी वागता तो सोशल मीडियाचाच परिणाम आहे!’ की परिणाम फक्त एकतर्फीपणे माझ्यावरच आणि तुम्ही मात्र अभेद्य? असं म्हटलं, की माझ्यावर तुटून पडता. ‘आम्हाला चांगलं-वाईट कळतं, तुला नाही,’ हे ठेवणीतलं उत्तर. थोडक्यात तुम्ही ज्याला चांगलं म्हणाल, त्याला मीही चांगलं म्हटलं पाहिजे, आणि ज्याला वाईट म्हणाल, त्याला वाईट. असं का? ठरवू दे ना मला काय चांगलं आणि काय वाईट ते? पण तसं तुम्ही करणार नाही. कारण तुम्हाला हवी आहे तुमच्या ‘हो’ ला ‘हो’ म्हणणारी आणि तुमच्या प्रत्येक सांगण्याला मुकाटपणे माना डोलवणारी एक कठपुतळी! मी सज्ञान आहे. माझ्या आयुष्यावर तुम्ही आता नियंत्रण ठेवू शकत नाही. कॉलेज संपलं की आधी नोकरी मिळवीन आणि तुम्ही माझ्यावर केलेला खर्च पै न पै चुकता करीन.
मी पाहिलेल्या एका चित्रपटात शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालकांना काय सल्ला दिला होता माहीत आहे? ‘पालकांना मुलांसाठी करता येण्याजोगी सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे आपण चांगला माणूस आहोत, असं मुलांना वाटण्यास मदत करणं’. तुमचं वर्तन तर याच्या अगदी विरुद्ध आहे. तुम्ही पदोपदी मी कशी चांगली नाही हेच मला पटवून देत असता. माझ्याबद्दल चांगले शब्द बोलण्याची तुम्हाला बहुधा अॅलर्जी आहे. कौतुक केलं, की मी हुरळून जाईन अशी भीती असेल तुम्हाला. तुम्ही मारे म्हणता की ‘आम्ही पूर्वाचं कौतुक करतो.’ पण ते खरं नाही. कौतुक टीचभर, टीका मात्र वारेमाप..
दारावर टकटक झाली. ‘‘पूर्वा, दार उघड.’’ आईचा आवाज. ‘‘दिवसच्या दिवस अशी खोलीतच बसणार आहेस का? जरा बाहेर ये. आमच्याशी बोल.’’ मी अनिच्छेनं बाहेर गेले.

‘‘काय?’’ मी विचारलं. ‘‘उद्या तुझ्यासाठी काउन्सिलरची अपॉईंटमेंट घेतली आहे.’’ आई म्हणाली.
‘‘मला न विचारताच?’’ मी चिडलेच.
‘‘तुझं भलं कशात आहे, हे तुझ्यापेक्षा जास्त कळतं आम्हाला. त्यासाठी तुझी परवानगी घ्यायची गरज नाही.’’ आई म्हणाली. ‘‘तुम्ही चार पावसाळे जास्त पाहिलेत म्हणून माझ्या आयुष्यावर तुमचा हक्क आला का? मला काउन्सिलिंग हवं की नाही, ते मी ठरवीन.’’ ‘‘आली मोठी हक्काची भाषा करणारी! अजून कमवायची अक्कल नाही. इथे सगळं आयतं मिळतंय म्हणून आमच्या जिवावर ही मिजास! आमच्या घरात राहायचं असेल तर आम्ही सांगू ते मुकाटपणे ऐकावं लागेल.’’ बाबा म्हणाले.

डोक्यात ठिणग्या पेटत चालल्या. ‘आमचं घर’? म्हणजे हे घर माझं नाही? ‘आमचे पैसे’, ‘आमच्या जिवावर’, ‘आमच्या वेळी’.. तुम्ही दाखवून देताय की मी तुमची नाही. तुमच्यामध्ये मला स्थान नाही. पोटच्या मुलीला तुम्ही ‘डिसओन’ करताय. डोक्यात ठिणग्यांचा स्फोट झाला. मी मोठय़ानं ओरडले, ‘‘काउन्सिलिंगची गरज तुम्हालाच आहे. मला नाही. आपलं काही चुकतंय असं तुम्हाला वाटत नाही. तुम्ही आधी तुमचं वागणं सुधारा.’’
‘‘पूर्वा, काय हे बोलणं? आम्ही काळजीपोटीच बोलतो ना? आम्हाला आनंद होतो का तुला ओरडताना? उलट आम्हा दोघांनाही किती त्रास होतो याचा!’’ आई म्हणाली. तिच्या डोळय़ांत पाणी तरळत होतं.

मला सांगायचं होतं आईबाबांना, की मलाही यात आनंद होत नाही. उलट तुमच्यापेक्षा दुप्पट त्रास मला होतो. तुमची बाजू लढवायला निदान तुम्ही दोघं आहात. माझी बाजू मला एकटीलाच लढवायला लागते. सख्ख्या आईवडिलांना आपण आवडत नाही, आपण काही चांगली कामगिरी करू शकू असा विश्वास त्यांना वाटत नाही. सतत चिंता आणि धास्ती वाटत राहते आणि सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काय वाटतं ते त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही.. हे सहन करणं किती जीवघेणं आहे! पण माझ्या तोंडातून शब्द उमटलेच नाहीत. इतका वेळ मुश्किलीने अडवून धरलेला अश्रूंचा बांध मात्र आता फुटला.