scorecardresearch

सोयरे सहचर : निसर्गातला थरार!

आमच्या सोसायटीतच एकदा एक गरुडाचं पिल्लू पडायचं निमित्त झालं आणि तेव्हापासूनच माझी निसर्ग निरीक्षणाची सुरुवात झाली.

सोयरे सहचर : निसर्गातला थरार!

‘‘जंगलाच्या विविध रूपांचं दर्शन छायाचित्रणातून घडताना अनेक गोष्टी शिकत गेलो. जंगलाचं सौंदर्य डोळय़ांत आणि कॅमेऱ्यात साठवून घेण्यापासून ‘जंगलचा कायदा’ समजून घेण्यापर्यंतचा हा माझा प्रवास निव्वळ थरारक होता..’’ येत्या १९ ऑगस्टच्या ‘जागतिक छायाचित्रण दिना’च्या निमित्तानं सांगताहेत वन्यजीव छायाचित्रकार युवराज गुर्जर.

आमच्या सोसायटीतच एकदा एक गरुडाचं पिल्लू पडायचं निमित्त झालं आणि तेव्हापासूनच माझी निसर्ग निरीक्षणाची सुरुवात झाली. १९८८ मधली ही गोष्ट. कावळय़ांनी जखमी केलेलं ते गरुडाचं पिल्लू. त्या वेळी आमच्या सोसायटीतल्या एका पक्षीतज्ज्ञांनी डॉ. सालिम अलींच्या पुस्तकातली त्या पक्ष्याविषयीची माहिती मला दाखवली होती. तेव्हापासून कुतूहलापोटी माझ्या जंगलातल्या वाऱ्या सुरू झाल्या त्या आजतागायत!

सततच्या जंगलभेटींमुळे पक्षीनिरीक्षणात मी थोडाफार तरबेज झालो. भीमाशंकर इथे झालेल्या प्रथम वन्य गणनेसाठी राज्याच्या वन खात्याला मदतही केली. त्याच वर्षी ताडोबा जंगलामध्येही वाघांची गणना होणार होती. त्यांना त्यासाठी मदत करायला आम्ही गेलो होतो. त्या वेळी महाराष्ट्रात मेळघाट हा एकमेव व्याघ्र प्रकल्प होता आणि ताडोबाचं जंगलाचं व्याघ्र प्रकल्प होण्यासाठी नाव सुचवलं गेलं होतं. त्यामुळे खूप काटेकोरपणे, कसून वाघांची गणना करायची होती. आम्ही चालत चालत ताडोबाच्या जंगलात वाघांच्या ठशांचा मागोवा घेत होतो. एवढय़ात रस्त्यात भेटलेल्या एका गावकऱ्यानं सांगितलं, की जवळच एका विहिरीत वाघाचे दोन बछडे पडले आहेत. जंगलातल्या एका बिनकठडय़ाच्या विहीरवजा खडडय़ात ते दोन बछडे पडले होते. विहिरीत पाणी कमी होतं. त्याच्या एका बाजूला खडकाच्या कपारीत बसून दोघं बच्चे सौम्य गुरगुर करत होते. मात्र आत उतरून त्यांना बाहेर काढण्याची हिंमत कुणालाही होत नव्हती. हळूहळू उन्हं वर चढू लागली, वाघाच्या बछडय़ांना उन्हाचा त्रास होऊ लागला आणि ते आणखीनच आत आत, कपारीत शिरू लागले. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते, पण त्याला ते मुळीच दाद देत नव्हते. शेवटी कुठून तरी दोरीची जाळी पैदा करण्यात आली. ती विहिरीत सोडून पुढच्या बाजूनं बांबूनं बछडय़ांना ढोसून त्या जाळीत ढकलायचा प्रयत्न सुरू झाला. असा ५-६ वेळा प्रयत्न केल्यावर एक बछडा कसाबसा त्या जाळीत शिरला आणि त्याला आम्ही हलकेच वर ओढू लागलो. पण त्याचं वजन काही त्या जाळीला पेललं नाही आणि बछडा धाडकन पाण्यात पडला. या प्रकारामुळे दुसरा बछडा जाम घाबरला आणि एकदम आत जाऊन बसला. पहिल्या खाली पडलेल्या बछडय़ाला मात्र मोठय़ा शर्थीनं बाहेर काढण्यात आम्ही यशस्वी झालो आणि त्याला एका पिंजऱ्यात सुरक्षित ठेवलं. दुसरा घाबरलेला बछडा मात्र बाहेर यायला तयार नव्हता. पुन:पुन्हा प्रयत्न केल्यावर अखेर दुपारी चारच्या सुमारास बछडय़ाला बाहेर काढण्यात आम्हा सर्वाना यश आलं. संध्याकाळी त्यांना ठेवलेल्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडा ठेवून, त्यांची आई येऊन त्यांना नेते का हे बघायचं ठरलं. दुसऱ्या दिवशी पाहिलं, तर आनंदाची गोष्ट म्हणजे त्या रात्रीच त्यांच्या आईनं त्यांना तिथून हलवून सुरक्षित ठिकाणी नेलं होतं. वाघाची आणि माझी ही पहिली भेट. अचानक झालेली. पण माझ्यासाठी ती इतकी चित्तथरारक होती की कायम लक्षात राहिली.

कान्हा हे मध्य प्रदेशातलं जंगल वाघांसाठी प्रसिद्ध आहे. उत्तम व्यवस्थापनेसाठी आणि प्राण्यांच्या उत्तम संख्येसाठीसुद्धा हे जंगल जगभरातल्या छायाचित्रकारांमध्ये प्रसिद्ध आहे. याच कारणानं मी आजवर या जंगलाला अनेक भेटी दिल्या. पहिल्याच भेटीत आम्हाला तिथे वीरू हा एक निष्णात ड्रायव्हर भेटला. त्याचं आणि आमचं सूत बरोबर जुळलं. तो प्रवासी वाचण्यात हुशार असावा. पहिल्याच फेरीत त्यानं ओळखलं होतं, की आम्ही फक्त ‘वाघ वाघ’ करत गाडी पळवायला सांगणाऱ्यातले नाहीत. आम्हाला काय आणि कसं बघायचं आहे, हे त्याला उमगलं होतं. मोठय़ा वन्य प्राण्यांबरोबरच छोटासा सुतार पक्षी बघण्यातही आम्हाला रस आहे हे त्याच्या चटकन ध्यानात आलं. म्हणूनच एखादा पक्षी किंवा प्राणी दिसला की त्याची गाडी अलगद थांबत होती. त्या प्राण्या-पक्ष्याच्या जवळपास अशा काही कोनात तो गाडी उभी करत होता, की आम्हाला छायाचित्रण अगदी सहज करता येत होतं. यानंतर आमचा वाघ पाहाण्यासाठी ‘टायगर शो’मध्ये नंबर लागला. वीरूनं गाडी चालवता चालवता वाटेत त्याबद्दल माहिती सांगितली. भल्या पहाटे तीन-चार माहूत आपल्या हत्तींवरून वाघाचा माग काढतात आणि वायरलेसवरून ‘इन्फर्मेशन सेंटर’वर वाघ दिसल्याची बातमी आणि ठिकाण कळवतात. या सेंटरवर गाडीला आपला क्रमांक कळतो, त्यानुसार ते गाडी तिथपर्यंत घेऊन जातात. वाघ रस्त्यापासून बराच आत असेल, तर हत्तीवर बसवून पर्यटकांना वाघ दाखवतात. तो वाघ पाहण्याची आमची उत्कंठा पराकोटीला पोहोचली होती.. आम्ही कॅमेऱ्याला टेलीफोटो लेन्सेस लावून सज्ज झालो. वाघ आत दाट जंगलात असल्यामुळे हत्तीवरून डुलत डुलत आत गेलो. काटेरी झाडांपासून, बांबूपासून स्वत:ला वाचवत वाचवत आम्ही वाघ कुठे दिसतो का ते शोधत होतो. एवढय़ात हत्ती थांबला. आम्ही दूरवर नजर लावली, कॅमेरे सरसावले, पण वाघ काही दिसेना. आमची अगतिकता आणि अज्ञान बघून माहूत हसला आणि म्हणाला, ‘‘अहो तिकडे लांब काय बघताय? खाली पायाखाली बघा!’’ आम्ही नजर खाली वळवली, तर खाली १०-१२ फुटांवर एक वाघीण बसली होती. इथेही पुन्हा गोची झाली! कॅमेऱ्याला लांब पल्ल्याच्या लेन्सेस लावल्यामुळे वाघिणीच्या तोंडाचा काही भाग किंवा पाठीचा, शेपटीचा भागच कॅमेऱ्यात मावत होता. त्यामुळे फोटो काढण्यात काहीच अर्थ नव्हता. कॅमेरे खाली ठेवूनही जंगल खूप सुंदर आहे हा पहिला धडा निसर्गानं मला तिथे दिला. मग आम्ही वाघिणीला नुसतं मनसोक्त पाहून घेतलं. अर्थात हरएक ‘टायगर शो’मध्ये वर सांगितल्यासारखाच अनुभव येतो असं नाही. एकदा अशाच एका टायगर शोमध्ये एक वाघ बघितला, तो १४ महिन्यांचा बच्चा होता. ‘बच्चा’ म्हटलं तरी त्याची वाढ पूर्ण झाली होती आणि प्रौढ वाघापेक्षा काही वेगळा तो दिसत नव्हता. भल्यामोठय़ा शिळेवर तो विराजमान झाला होता. मी ज्या हत्तीवर बसलो होतो तो वयानं लहान होता. त्यामुळे त्याची उंची तुलनेनं कमी होती. यामुळे झालं असं, की तो वाघ चक्क माझ्या ‘आय लेव्हल’ला होता. समोरून मला त्याची हवी तितकी छायाचित्रं घेता येत होती. असे प्रसंग जंगलात छायाचित्रकाराच्या वाटय़ाला नेहमी येत नाहीत. पण अचानक ते घडलं, की जणू मोठी ‘लॉटरी’च लागल्यासारखाच तो आनंद असतो! मी मनसोक्त छायाचित्रं काढली.

या वर्षीच्या मे महिन्यातल्या माझ्या जंगल सफारीत ‘टायगर शो’मध्ये असंच काहीसं घडलं. आम्हाला खबर मिळाली की चार वाघ एकत्र बसले आहेत. आम्ही त्वरेनं ते पाहण्यासाठी आमचा नंबर घ्यायला गेलो, मात्र ही खबर बऱ्याच जणांना आधीच मिळाली असल्यामुळे त्यांनी आधीच नंबर घेतले होते. रांगेत आमच्या गाडीचा क्रमांक बराच नंतरचा होता. आम्ही थोडे नाराज झालो आणि टायगर शोच्या ठिकाणी निघालो. रस्त्यातच एका जीपवाल्यानं खबर दिली, की एक वाघ उठून खाली दरीत निघून गेला. आम्ही आणखीनच खट्टू झालो. त्या जागेवर आम्ही पोहोचतच होतो, एवढय़ात लोकांचा हल्लागुल्ला वाढल्यामुळे दुसरा वाघसुद्धा उठला आणि चालायला लागला. एक हत्ती आणि त्याचा माहूत पर्यटकांना ते वाघ दाखवून परत येत होता, तो आमच्या गाडीच्या जवळ आला आणि त्यानं त्याचे पर्यटक उतरवले. आता तो हत्ती रिकामाच होता आणि त्याला त्या वाघाच्या मागे मागे जायचं होतं, नाहीतर तो परत झाडीत नाहीसा झाला असता. मी माहुताला विनंती केली की मी बरोबर येऊ का? त्यानं मान हलवताच मी कॅमेरा सावरून वर चढलो. हत्ती लहान असल्यामुळे आम्ही दोघंच त्याच्या हौद्यात बसलो होतो. आता आमच्या पुढेच एक वाघीण रस्त्यात चालत होती. एवढय़ात रस्त्याच्या डावीकडून आणखी एक वाघ रस्त्यावर उतरला. आता आमच्या डावीकडून एक वाघ चालला होता आणि एक उजवीकडून. असंच थोडं अंतर गेल्यावर वाघ रस्ता सोडून माळरानावर उतरले. एवढय़ात मागे हत्तीनं आवाज केला आणि आम्ही मागे बघितलं, तर तिसरा वाघ आमच्याच हत्तीच्या मागे मागे चालला होता. हा प्रसंग खरोखरच रोमांचकारक आणि थरारकही होता. माझ्या हत्तीच्या चक्क तीनही बाजूंनी तीन वाघ चालले होते आणि आम्ही मधून चालत होतो. थोडय़ाच वेळात ते तीन वाघ एकत्र आले. त्यात एक आई आणि तिची १८ महिन्यांची पूर्ण वाढलेली दोन नर-मादी पिल्लं होती. आता माझ्या कॅमेराला वाव मिळाला आणि वाघांची एकत्र छायाचित्रं टिपायला सुरुवात केली. असं बरंच अंतर गेल्यावर एका पाणवठय़ावर तीनही वाघ पाण्यात उतरले, पाणी प्यायले आणि त्यांनी डुंबायला सुरूवात केली. कॅमेऱ्याचं मेमरी कार्ड आणि त्याबरोबर माझं मनसुद्धा भरून गेलं!

मागे असाच कान्ह्याला श्रवणतालकडे येताना आम्ही ‘अलार्म कॉल’ ऐकला. याचा अर्थ नक्कीच जवळपास कोणीतरी मोठा शिकारी प्राणी असणार. आमच्या ड्रायव्हरनं- वीरूनं आवाजाच्या दिशेनं गाडी पळवली आणि त्या दिशेनं पुढे गेल्यावर एक भीषण दृश्य दिसलं. चार जंगली कुत्र्यांनी एका चितळाच्या पिल्लाला धरलं होतं. पिल्लू जीव खाऊन धावत असतानाच एका कुत्र्यानं त्याच्यावर झडप घातली होती आणि पाठोपाठ इतर तीन कुत्रेही त्याच्यावर तुटून पडले. थोडय़ाच वेळात त्यांची तोंडं रक्तानं माखून गेली. गिधाडांना ही खबर काही सेकंदातच लागली. ती आकाशातून हळूहळू तरळत बाजूच्या झाडावर स्थिरावली. आमच्या मागून आलेला एक कोल्हाही चकरा मारायला लागला. बहुधा त्यालाही या शिकारीतला वाटा हवा असावा. अवघ्या तीन-चार मिनिटांत चितळाच्या पिल्लाचा फडशा पाडून जंगली कुत्री तिथून हळूहळू गायब झाली. हा प्रसंग फारच झपाटय़ानं आणि रस्त्यापासून खूप आत घडला. त्यामुळे त्याचं फारसं छायाचित्रण करता आलं नाही. पण जंगलाच्या सौंदर्यपूर्ण चेहऱ्याची ही दुसरी बाजू मनात ठसली. हा ‘जंगलाचा कायदा’ आपल्याला क्रूर वाटला तरी त्या भवतालाची तीच रीत आहे. पुन्हा एकदा निसर्गातला थरार पाहायला मिळाला.

गेल्यावर्षीही एका सकाळी जंगल अतिशय सुनसान, शांत होतं. आम्ही श्रवणताललाच चाललो होतो. बघतो, तर रस्त्याच्या कडेला दोन रानकुत्र्यांनी चितळाचा एक भला मोठा नर नुकताच मारला होता. एकानं त्याच्या नरडीचा घोट घेतला होता. दुसरा कुत्रा तेवढय़ात तिथून कुठेतरी पळाला. इकडे पहिल्या कुत्र्यानं चितळाचे लचके तोडायला सुरूवात केली. ते पाहात असतानाच जीपच्या मागे मला काहीतरी हालचाल जाणवली. बघितलं, तर त्या दुसऱ्या कुत्र्यानं त्याचं अख्खं कुटुंब आणलं होतं. ५-६ माद्या आणि ६-७ तरुण पिल्लं. सर्वजण क्षणार्धात शिकारीवर तुटून पडले. प्रौढ कुत्र्यांनी चक्क मध्ये तोडून चितळाचे दोन भाग केले. लहान कुत्रे आपापला लहान हिस्सा घेऊन बाजूला जाऊन खायला लागले. पिल्लं एका ठिकाणी खातायत, तर प्रौढ एका ठिकाणी, अशी व्यवस्था. एकमेकांवर गुरकावत ते मांसाचे लचके तोडत होते. मध्येच काही जण श्रवणतालमध्ये जाऊन पाणी पिऊन आले आणि परत मांसावर तुटून पडले. थोडय़ाच वेळात तिथे फक्त त्या हरणाचं डोकं, शिंगं आणि काही हाडं एवढंच उरलं. अक्षरश: १५ ते १७ मिनिटांत त्यांनी ७०-७५ किलोंच्या हरणाचा फडशा पाडला होता. माझ्याबरोबर दुसरे एक छायाचित्रकार होते, त्यांना हे दृश्य फार भेसूर, क्रूर वाटलं. म्हणून त्यांनी काही त्याची छायाचित्रं काढली नाहीत. जंगलातला हा शिकारीचा नेहमीचाच प्रकार होता, पण आम्हाला त्या दिवशी तो अनुभवायला मिळाला.

दरवेळी मोठय़ा जंगलातच असे अनुभव येतात असं काही नाही. निसर्ग वेगवेगळी रूपं दाखवतच असतो. माझ्या दर रविवारच्या फेऱ्या कायम येऊर, नागला, कर्नाळा, फणसाड इथे होत असतात. या लहान लहान जंगलांत पण हमखास काही ना काही छान दिसतच राहातं. अनेक अविस्मरणीय अनुभवसुद्धा येतात. ज्या फुलपाखरांची आम्ही तासंतास वाट बघतो, ती फुलपाखरं चक्क माझ्या कॅमऱ्यावर किंवा हातावरच येऊन अनेकदा बसली आहेत. कित्येकदा सापांची, विंचवांची अचानक गाठ पडली आहे. या छोटय़ा छोटय़ा जंगलातल्या बारीक कीटकांच्याच माझ्या छायाचित्रांना आतापर्यंत देशात, परदेशात जास्त प्रसिद्धी मिळाली आहे. यासाठी मी त्या-त्या वेळी भारताचं प्रतिनिधित्व केलं, याचा मला सार्थ अभिमानसुद्धा आहे. दरवेळी लहान-मोठय़ा जंगलात जाताना डोक्यात एखाद्या छायाचित्राची ‘फ्रेम’ अगदी पक्की तयार असते, पण ते छायाचित्र तसं मिळतंच असं नाही.
जवळपास वीस वर्ष मी बिबळय़ाच्या छायाचित्राची वाट बघत होतो, पण माझ्याकडे त्याचं एकही छायाचित्र नव्हतं. याकरता भारतातल्या अनेक जंगलांना भेटी दिल्या, पण बिबटय़ानं मला काही छायाचित्र घेऊ दिलं नाही. भारताच्या बाहेर- श्रीलंका, केनिया, टांझानिया इथल्या जंगलांना भेटी दिल्या, तेव्हा बिबळय़ांची अनेक छायाचित्रं अगदी त्यांच्या पिल्लांसकट मिळाली.

न मिळालेली छायाचित्रं मिळवणं हा माझ्या पुढच्या जंगलभेटीचा ‘अजेंडा’ कायम असतो आणि त्या ओढीनंच मी कायम जंगलात जात राहातो..
ygurjar@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The forest photograph beauty cameras law of the jungle wildlife amy

ताज्या बातम्या