प्रकाश मुळे
माझा जन्म १९६८ चा. पुढच्याच महिन्यात वय र्वष ५५ सुरू. ‘साठी बुद्धी नाठी’ म्हणतात, म्हणजे हीच ती कदाचित उर्वरित ५ र्वष.. मागे वळून पाहताना आयुष्याचा हिशेब मांडण्याची आणि जमल्यास ज्या गोष्टींमुळे जीवनाला काहीसा आकार आणि अर्थ मिळाला असं वाटतं त्याचा काथ्याकूट करण्याची वेळ! माझं जन्मगाव परळ गाव. म्हणजे पक्का मुंबईकर आणि त्यातही चाळकरी, म्हणजे अख्खी चाळ संस्कृती कोळून प्यालेला माणूस. प्राथमिक शिक्षण इयत्ता सातवीपर्यंत महापालिकेच्या शाळेत. त्या वेळेस या शाळेला ‘उलटीपालटी शाळा’ असं गमतीनं म्हणत. अर्थात त्या वेळेला हे माहिती नव्हतं, की हीच ‘उलटीपालटी’ आयुष्यात खूप उलथापालथ घडवून आणणार आहे; तेही चांगल्या अर्थानं.

माझं सातवी ते नववीचं शिक्षण शिरोडकर शाळेत झालं. अभ्यासाव्यतिरिक्त वक्तृत्व, नाटय़, संगीत आणि कबड्डीसारखे खेळ यांची तोंडओळख झाली ती इथे. मला वाटतं, हरहुन्नरी, चतुरस्र व्यक्तिमत्त्वाची बीजं रोवली गेली ती इथेच. त्यातही ही शाळा जास्तीत जास्त जवळच्या कामगार वस्तीतल्या निम्न मध्यमवर्गीय कोकणी समाजातल्या मुलांची. कोकणी हेल, मालवणी भाषा आणि कोकणी फणसासारख्या बोलायला ‘रफ’, पण स्वभावानं तितक्याच गोड अशा मैत्रिणींची ओळख याच काळातली. एका वेगळय़ा संस्कृतीशी जवळून परिचय. तरी घरातल्या ब्राह्मणी संस्कारांमुळे, खाण्यावर असलेल्या र्निबधांमुळे मुंबईतल्या सुप्रसिद्ध कोकणी मांसाहारी खाद्यसंस्कृतीला मुकलो हे मात्र खरं. (त्याचा वचपा आता यथेच्छ करी ते रस्सा यावर काढतोय हे अलाहिदा!)

Ketu Nakshatra Gochar 2024 Ketu Transit In Hasta Nakshatra Positive Impact On These Zodiac Sign
छाया ग्रह केतूची ‘या’ राशींवर होईल कृपा! नक्षत्र बदलानंतर येतील आनंदाचे दिवस! उत्पन्न वाढवण्याची मिळेल संधी
Gold Silver Price on 1 March
Gold-Silver Price on 1 March 2024: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात तेजी, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
Trigrahi Yog
३० वर्षांनी ‘त्रिग्रही योग’ बनल्याने होळी २०२४ च्या आधी शनिदेव ‘या’ राशींना करणार श्रीमंत? लक्ष्मी कृपेने प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता

त्यानंतर झाला तो गिरणी कामगारांचा संप. त्यात झालेली आमच्या गिरणगावाची आर्थिक कोंडी, झालेली वाताहत आणि आमची दहावीत ‘एन्ट्री’ एकाच वेळची. आम्ही घरात एकूण चार जण. आई, बाबा, मी आणि छोटा भाऊ. वडील मिल कामगार. तोपर्यंत दोन वेळा खाऊन आणि मधल्या वेळेत चिवडा, शेव असा खाऊ खाऊन समाधानानं पोट भरणारे आम्ही संपानंतर आणि त्याच काळात वडिलांच्या निवृत्तीमुळे आर्थिकदृष्टय़ा अधिकच अडचणीत आलो. मग आमची रवानगी मामाच्या गावाला- नाशिक जिल्ह्यात सिन्नर इथे झाली. दहावी शिकण्यासाठी. (तिथेच माझी दिसायला आणि स्वभावानंही नितांतसुंदर अशा जोडीदाराशी नशिबानं गाठ मारून ठेवली होती. अर्थात ते समजायला पुढची काही र्वष जावी लागणार होती.)

सिन्नर एक तालुक्याचं गाव. त्या वेळेला खेडंच होतं ते. तिथल्या खास दोन आठवणी, ज्यांनी नुसतंच मनात घर केलं नाही, तर जीवनाला आकार देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. एक म्हणजे प्रेमळ, जीव लावणारी आणि अखंड काळजी घेणारी आजी- जिला आम्ही सर्वजण ‘माई आजी’ म्हणायचो. दुसरं म्हणजे गोंदेश्वराचं फार जुनं, हेमाडपंथी मंदिर. अभ्यास करण्यासाठी, एकाग्र होण्यासाठी अप्रतिम जागा. दहावीत मिळालेलं पहिलं यश (त्या वेळच्या मानांकनाप्रमाणे)- शाळेत पहिल्या पाचमध्ये नंबर आला. ते या दोघांमुळे. त्यानंतर मुक्काम परत हलवला मुंबईत आई-बाबांकडे परळला. अकरावीला प्रवेश घेतला ‘एम.डी. कॉलेज’ला, परळमध्येच.

‘बी.एस्सी.’पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. नाटकं, वक्तृत्व स्पर्धा, ‘सीआर’पदासाठी लॉबिंग, ‘मिस्टर एमडी’स्पर्धेत ‘सेकंड रनर अप’पर्यंत मजल, अशा अनेकविध उपक्रमांमध्ये भाग घेतल्यामुळे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व विकास होण्यास खूपच हातभार लागला. ‘एमडी कॉलेजची पोरं हुशार’ हे या अर्थानं नक्कीच बरोबर आहे! (नाटक, चित्रपट, खेळ, समाजकारण, राजकारण, पत्रकारिता असं एकही क्षेत्र नसेल जे ‘एमडी’च्या पोरांनी पुढे गाजवलं नसेल.) त्यामुळे नुसत्या त्या प्रवाहाबरोबर वाहत जरी गेलं, तरी नेतृत्वगुण, संघ व्यवस्थापन आपसूकच तुमच्यात भिनत जातं. डेल कार्नेजीचं पुस्तक- ‘हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल’ हातात पडायच्या आधीच त्यातल्या संकल्पना तुमच्या रक्तात भिनलेल्या असतात. याचा ‘मार्केटिंग आणि सेल्स’च्या क्षेत्रात अगदी ‘नॅशनल हेड’ बनण्यापर्यंत पुढे उपयोग होणार होता.

आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे ‘कॉलेजस्य कथा रम्या:’ हे काही आम्हाला अनुभवता आलं नाही. उलट खिशात दमडी नसल्यामुळे मित्रमैत्रिणींपासून लांब राहण्याचा दाहक अनुभव घेतला. (आता कधीतरी लाडात आल्यावर मुलगा मला विचारतो, ‘बाबा तुम्हाला कॉलेजमध्ये असताना गर्लफ्रेंड होती का?’ तेव्हा मी एक मोठा आवंढा तेवढा गिळतो! असो.)

कॉलेजमध्ये मराठी विषय शिकवायला केशव मेश्राम हे प्रख्यात लेखक आणि त्याहीआधी शांता शेळके. त्यांच्या त्या असण्यानंसुद्धा आमच्यासारखी उद्या पोट भरायची चिंता नको म्हणून विज्ञानात शिरलेली टाळकीही साहित्य, कविता, संगीत याचा सक्रिय आस्वाद घ्यायला शिकली. मला वाटतं, ‘पुलं’नी सांगितलेला – ‘दोन रुपये असतील खिशात, तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाची फुलं घे, भाकरी तुला जगवील आणि फुलं कशासाठी आणि कसं जगायचं हे शिकवतील,’ हा मार्ग मला आपलासा वाटतो. मला विज्ञानानं भाकरी दिली आणि साहित्य, कविता, संगीत, नाटक, सिनेमा यांच्या रसास्वादानं जीवन रसरसून जगण्याची ऊर्मी दिली ती आजतागायत.

‘बी.एस्सी.’च्या शेवटच्या वर्षी परीक्षा देता न आल्यानं ऑक्टोबरमध्ये परीक्षा देऊन ‘फस्र्ट क्लास’ जिद्दीनं मिळवला. अपयशातून यश मिळवण्यासाठी वडिलांनी दिलेले दोन मंत्र कायमचे मार्गदर्शक झाले. ‘हिम्मत-ए-मर्दा तो मदद-ए-खुदा’ आणि ‘जियेंगे तो और भी लडेंगे’. हा माझ्या जीवनासाठी महत्वाचा मंत्र झाला. त्याचा इतका सकारात्मक परिणाम जीवनावर झाला, की आरोग्य, आर्थिक यश आणि नातेसंबंध हे यशस्वी जीवन जगण्याचे जे मापदंड आहेत, त्याचं माप विधात्यानं माझ्या ओंजळीत भरभरून टाकलं. अगदी कितीही चढउतार जीवनात आले तरीही. तेव्हा आमच्या पुढच्या पिढीलासुद्धा कलाकारीच्या अवघड क्षेत्राच्या करिअरमध्ये नवसंघर्षांसाठी, नवी उंची गाठण्यासाठी याच मंत्राची संजीवनी बुटी कामी येईल याची मला खात्री आहे.

शेवटी व.पु. काळे यांनी म्हटल्याप्रमाणे ‘आयुष्य म्हणजेच एक संघर्ष. पण हा संघर्ष फक्त आयुष्यात ठरावीक उंची गाठेपर्यंत. एकदा का ती उंची गाठली, की आयुष्याचा पुढचा संघर्ष ती उंचीच संपवते.’ आपण मात्र कृतज्ञ राहायचं; त्या घराचं, त्या गल्लीचं, त्या शहराचं, त्या शाळा, कॉलेज, कंपनी, मित्रमैत्रिणी, सहकारी, नातेवाईक यांचं. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी योग्य वेळी दिलेली साथ, ज्यामुळे आपण एक ठरावीक उंची गाठू शकलो आणि आयुष्याचा नवनवीन अर्थ समजत गेला, समृद्ध करत गेला, तो एक परिपूर्ण जीवन जगण्यासाठी..
prakashmulay_2000 @yahoo.com