फ्रेंच तत्त्ववेत्ता माँटेग्यूने आयुष्याचे ब्रीदवाक्य सतरा शब्दांमध्ये सांगितले आहे, ‘‘माणूस जे काही घडले त्यामुळे जितका दुखावला जात नाही तितका तो त्या घटनेबद्दलच्या त्याच्या मतामुळे दुखावला जातो.’’ आणि त्या घटनेबद्दलचे मत बनवणे हे आपल्याच हाती असते.
काही वर्षांपूर्वी एका रेडिओ प्रोग्रॅममध्ये मला एक प्रश्न विचारण्यात आला, ‘‘आत्तापर्यंतच्या आयुष्यात तुम्ही शिकलेला सगळ्यात महत्त्वाचा धडा कोणता?’’
प्रश्न सोपा होता. आत्तापर्यंतच्या आयुष्यात मी सगळ्यात महत्त्वाचे आणि उपयोगी असे काय शिकलो, तर ‘आपण जो विचार करतो तो महत्त्वाचा असतो!’ जर मला समजले की, तुम्ही कशा पद्धतीने विचार करता, तर तुमचे व्यक्तिमत्त्व कसे आहे, याचा अंदाज मी करू शकतो. आपले विचारच आपल्याला घडवतात. आपली मानसिकता हा असा फॅक्टर आहे, जो आपले नशीब घडवतो.
तुमची आणि माझी सगळ्यात मोठी समस्या म्हणजे- योग्य विचार कसे निवडायचे? जर आपल्याला हे जमले, तर आपण आपल्या समस्या चुटकीसरशी सोडवू शकतो. रोमन साम्राज्यावर ज्याने राज्य केले तो जगप्रसिद्ध तत्त्ववेत्ता मार्कस् ऑरेलिअस याने सांगितले की, फक्त पाच शब्द तुमचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतात- ‘आपले विचारच आपले जीवन घडवतात.’ अगदी खरे आहे हे! जर आपल्या मनात आनंदी विचार आले, तर आपण आनंदी होऊ. जर आपण दु:खी विचार मनात आणले, तर आपण दु:खी होऊ. जर आपल्या मनात भीतिदायक विचार आले, तर आपण भयग्रस्त होऊ. जर आपल्या मनात उदासवाणे विचार आले, तर आपण आजारी पडू. जर आपण विचार केला की, आपल्याला यश मिळणार नाही, तर नक्कीच आपण अपयशी ठरू. जर आपण आत्मवंचनेत गुरफटून रडत राहिलो तर लोक आपल्यापासून दूर पळतील. नॉर्मन पेले म्हणतो, ‘‘तुम्हाला तुम्ही कसे आहात असे वाटते तसे तुम्ही नसता, तर तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही असता.’’
एखाद्या गंभीर समस्येचा आस्थेने विचार करणारा माणूससुद्धा ताठ मान करून शर्टाच्या बटणात सुंदर फूल खोचून रस्त्याने जाऊ शकतो. मी लॉवेल थॉमसला तसे करताना पाहिले आहे. पहिल्या महायुद्धावर त्याने एक सिनेमा काढला होता. त्याच्या प्रदर्शनाच्या वेळी त्याला जवळून भेटण्याचा योग आला. त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी युद्धाच्या पाश्र्वभूमीवरचे अनेक फोटो फार जवळून घेतले होते आणि अरेबियन सैन्याची चित्रफीतही बनवली होती. त्या काळात लंडनमध्ये आणि जगभरसुद्धा ते सर्व खूप सनसनाटी ठरले होते. लंडनमधील ऑपेरा सिझन सहा आठवडय़ांसाठी लांबणीवर पडला, तोही लॉवेलला त्याने केलेल्या धाडसाबद्दल लोकांना सांगता येईल व चित्रे दाखवता येतील, यासाठी. इतके प्रचंड यश त्याच्या पदरात या वेळी पडले. नंतर त्याने भारत व अफगाणिस्तानावर चित्रपट बनवले. त्यामध्ये दोन वर्षे घातली पण सगळीकडून अपयश यायला लागले. त्या काळात मी त्याच्याबरोबर होतो. मला आठवते, आम्ही अगदी स्वस्तातल्या हॉटेलमध्ये कोपऱ्यात बसून एकदा जेवण घेतले होते. तेसुद्धा एका मित्राने पैसे उसने दिल्यामुळे शक्य झाले. ही गोष्ट तुम्हाला सांगण्यामागचे तात्पर्य काय, तर लॉवेलला प्रचंड कर्ज झाले होते, अत्यंत निराशा पदरी पडली होती. तो मोठय़ा कोंडीत सापडला होता; पण तरीही तो चिंता करीत नव्हता. त्याला हे माहिती होते की, त्याने स्वत:च हिंमत हरलेली लोकांना दिसली, तर लोक त्याला शून्य किंमत देतील. त्याचे सावकारसुद्धा! म्हणून प्रत्येक दिवशी सकाळी लवकर उठून, बाजारातून एक फूल आणून, ते शर्टाच्या बटणात खोवून तयार होऊन तो ऑक्सफर्ड स्ट्रीटवरून न चुकता एक फेरी मारायचा; तेही ताठ मानेने आणि दमदार पावले टाकत! तो मनात सकारात्मक, धाडसी विचार आणायचा आणि पराभवाच्या विचारांचा पराभव करायचा. त्याच्या मते त्याची दुरवस्था लोकांना दिसता कामा नये.
इमरसनने त्याच्या ‘स्वावलंबन’ या निबंधात शेवटी जे लिहिले होते ते तुम्हाला सांगावेसे वाटते- राजकीयदृष्टय़ा विजय, भाडेवाढ, आजार बरा होणे, तुमचा आवडता मित्र परत येणं यांसारख्या तुमच्या मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी तुमचा उत्साह वाढवतात आणि तुम्हाला वाटते की, आता चांगले दिवस येणार आहेत; पण यावर विश्वास ठेवू नका. कदाचित असे नसेलही! तुमचा आनंद फक्त तुम्हीच मिळवू शकता, बाह्य़ गोष्टी नाही! एपिक्टस हा थोर तत्त्ववेत्ता म्हणतो, ‘‘आपल्या शरीरातील टय़ूमर किंवा गळू काढून टाकण्यासाठी आपण जेवढे दक्ष असतो त्याहीपेक्षा अधिक दक्ष आपल्या मनातील वाईट विचार काढून टाकण्यासाठी असले पाहिजे.’’
 फ्रेंच तत्त्ववेत्ता माँटेग्यूने आयुष्याचे ब्रीदवाक्य सतरा शब्दांमध्ये सांगितले आहे, ‘‘माणूस जे काही घडले त्यामुळे जितका दुखावला जात नाही तितका तो त्या घटनेबद्दलच्या त्याच्या मतामुळे दुखावला जातो.’’ आणि त्या घटनेबद्दलचे मत बनवणे हे आपल्याच हाती असते.
प्रॅक्टिकल सायकॉलॉजी या विषयात विल्यम जेम्स कधीच सर्वोत्तम नव्हता, पण त्याने केलेले पुढील निरीक्षण असे : ‘असे वाटते की, आधी आपल्या मनाला करावेसे वाटते आणि मग कृती घडते, पण वास्तवात मनाला वाटणे आणि कृती करणे या एकाच वेळी घडणाऱ्या गोष्टी आहेत आणि म्हणून जर कृतीवर नियंत्रण ठेवले- कारण ती आपल्या अखत्यारीतील बाब असते- तर आपोआपच आपण आपल्या भावनेवर ताबा ठेवू शकतो. वेगळ्या शब्दांत सांगायचे, तर आपण आपल्या भावना मनाचा निश्चय वगैरे करून ताबडतोब बदलू शकत नाही; पण आपण कृती करायची की नाही हे ठरवू शकतो. आणि म्हणूनच आपण आपली कृती बदलली, तर आपोआपच आपल्या भावना बदलतील.
तो म्हणतो, ‘अशा प्रकारे आनंदाकडे जाण्याचा मार्ग हा पूर्णपणे स्वायत्त आणि आपखुशीचाच असतो. जर कधी तरी तुमचा हा आनंद हरवला, तर पुन्हा आनंद शोधा, आनंदाने बोला, तसे वागा; जणू तो कोठे गेलाच नव्हता.’ इतकी सोपी युक्ती काम करील का? अहो, करून तर बघा! चेहऱ्यावर एक मोठ्ठे, मस्त प्रामाणिक हसू आणा, तुमचे खांदे मागे ढकला, दीर्घ श्वास घ्या आणि एखाद्या गाण्याच्या ओळी म्हणा. जर तुम्हाला गाणे येत नसेल, तर शिट्टी वाजवा, गुणगुणा. तुम्हाला लगेच विल्यम जेम्स जे म्हणाला त्याची प्रचीती येईल. तो म्हणतो त्याप्रमाणे जर तुमच्या मनाने उचल खाल्ली व आनंदाचे इशारे दिले, तर तुम्हाला नैराश्यात राहणे शक्यच नाही!
काही वर्षांपूर्वी मी एक असे पुस्तक वाचले, ज्याचा माझ्या मनावर आणि माझ्या आयुष्यावर खोलवर परिणाम झाला. त्या पुस्तकाचे नाव होते. ‘अ‍ॅज अ मॅन थिंक्स’ जेम्स अ‍ॅलेनने ते लिहिले होते. त्यात म्हटले होते : ‘इतर लोकांच्या आणि घटनांच्या प्रति माणसाने आपले विचार बदलले, तर ती माणसे व त्या घटनासुद्धा बदलतील. माणसाच्या विचारांमध्ये आमूलाग्र बदल झाला, तर तो स्वत:च त्याच्या आयुष्यात होणाऱ्या आमूलाग्र बदलांमुळे चकित होईल. लोक अशा गोष्टींकडे आकर्षित होत नाहीत ज्या त्यांना हव्या आहेत, तर त्या जशा आहेत तशाच ठिकाणी ते आकर्षित होतात. जे आपल्या आयुष्याला आकार देते ते देवत्व आपल्यामध्येच असते. माणूस जे काही मिळवतो, तो त्याच्या विचारांचा परिणाम असतो. माणसाचा विकास, त्याला मिळणारा विजय आणि त्याने संपादन केलेले यश हे सर्व त्याच्या सकारात्मक विचारांचेच फळ असते. जर त्याने त्याचे विचार सकारात्मक केले नाहीत, तर तो दुर्बल, दुर्लक्षित आणि दु:खी होईल.
(‘चिंता सोडा, सुखाने जगा’या डेल कार्नेजी यांच्या मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी प्रकाशित केलेल्या व अ‍ॅड. शुभदा विद्वांस यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकातील हा संपादित भाग, साभार.)

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Reactions of Political Leaders of Maharashtra in Famous Dialogues in Hindi Cinema
बाइट नव्हे फाइट…
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?